Skip to main content

ढोकळा

लेखक स्वाती दिनेश यांनी सोमवार, 27/01/2014 21:29 या दिवशी प्रकाशित केले.
ढोकळ्याच्या अनेक रेसिप्या यापूर्वी येऊन गेल्या आहेत, पण ही एका गुज्जु मैतरिणीची बिनताकाची ही रेसिपी थोडी वेगळी वाटली म्हणून तुम्हा सर्वांसाठी- साहित्य- नेहमीचेच.. डाळीचे पीठ(बेसन) साधारण कपभर, २ चहाचे चमचे रवा, पाऊण ते १ चमचा खायचा सोडा, १/२ चमचा धणे खरगटून, १-२ हिरव्या मिरच्या + पेरभर आलं भरड वाटून्, साखर,लिंबू,मीठ,तेल,मोहरी,हिंग,खोबरे,कोथिंबिर कृती- अर्ध्या लिंबाचे २ चमचे साखर घालून पेलाभर सरबत बनवून घ्या. त्यात मावेल एवढे बेसन घाला आणि ढोकळ्याच्या पीठाला भिजवतो तितपर सरसरीत कालवा.साधारण कपभर पीठ लागते. त्यात २चमचे रवा, खरगटलेले धने १/२ चमचा, १ चमचा तेल,१चमचा आलं मिरचीचे वाटण घाला. चव बघून वाटल्यास थोडे मीठ घाला. एका पसरट पॅनमध्ये पाणी उकळत ठेवा. एका थाळीला तेलाचा हात लावून घ्या. पाणी चांगले उकळले की ढोकळ्याच्या मिश्रणात खायचा सोडा घाला व फेटून घ्या. मिश्रण फसफसताना दिसले की थाळीत ओता आणि पॅन मध्ये वाफवायला ठेवा. वर घट्ट झाकण ठेवा.ह्या झाकणाला पंचाने घट्ट बांधा म्हणजे वाफेचे पाणी त्यात शोषून घेतले जाईल व ढोकळ्यावर पडणार नाही- (ही चकलीची सुचवणी) साधारण १५ मिनिटे मध्यम आचेवर वाफवा, नंतर आच बंद करा व २ मिनिटे तसेच राहू द्या. नंतर थाळी बाहेर काढा. गार झाला की वड्या पाडा. ढोकळा वाफवत ठेवला की एकीकडे २ टेबल स्पून तेल तापवा, त्यात चमचाभर मोहरी,घाला. ती तडतडली की हिंग घाला. फोडणी गार झाली की त्यात एक चमचा साखर + १ चमचा लिंबाचा रस यांचे मिश्रण घाला. ढोकळ्यावर ही फोडणी ओता, ओले खोबरे व कोथिंबिरीने सजवा. .

वाचने 12432
प्रतिक्रिया 21

प्रतिक्रिया

ढोकळा अजिबात कर्रून बघणार नाही. आमच्या ढोकळ्याच्या नेहमी पाटवड्याच होतात.

In reply to by मुक्त विहारि

खायचा सोडा/इनो योग्य प्रमाणात घाला,जुना सोडा घालू नका. सोडा मिश्रणात घातल्यावर लगेचच फेसून अर्ध्या मिनिटात मिश्रण फसफसले की लगेचच थाळीत ओतून वाफवत ठेवा.वाफवायचे पाणी चांगले उकळलेले हवे, आणि एवढेही करुन पाटवड्याच झाल्या तर अमिरी खमण करा.. :) स्वाती

काय जबरा दिसतोय ढोकळा... पटकन उचलुन खावासा वाटतोय...(आता खाऊ शकत नाही म्हणुन :( )

ढोकळ्याची वेगळी पाककृती आवडली, ह्या विकांताला बनवणारचं...कनफर्म :) धन्यवाद.

हा पदार्थ मला कध्धी जमणार नाही याची खात्री आहे तरी वरील पाकृ वाचून थोडा उत्साह आलाय. जमल्यास ढोकळा नैतर अमीरी खमण आहेच!

पाकॄ आवडली. पण हे खमण आहे ना? ढोकळा म्हणजे बहुतेक ते चण्याची डाळ आणि तांदुळ भिजवुन वाटुन करतात तो ना? मी हे खमण आणि ढोकळ्या मधे नेहमी गफलत करते. फक्त एवढच नक्की आहे की खमण आणि ढोकळा वेगवेगेळे असतात.

सहीच.. :-)

अगदी छायचित्रात दाखविल्याप्रमाणेच झाला होता.. ढोकळा सोपा केल्याबद्दल धन्यवाद!