Skip to main content

(हैदराबादि) मिर्चि का सालन और बगारा राईस

लेखक दिपक.कुवेत यांनी सोमवार, 20/01/2014 13:03 या दिवशी प्रकाशित केले.
१. उप्स मिssssssर्रच्या (घाबरु नका ह्या नुसत्या लांबीला मोठया असतात; तिखट अजीबात नाहि) Mirchya २. बगारा राईस Rice ३. मर्चि का सालन Salan साहित्य सालन साठि: १. मोठया मिरच्या - ५ २. चेरी टोमॅटो - ३ ३. जीरं - १ चमचा ४. धणे (आख्खे) - १ चमचा ५. तीळ - पाव वाटि ६. किसलेलं सुखं खोबरं - ३/४ वाटि ७. कच्चे शेंगदाणे - पाव वाटि ८. ४ मध्यम कांदे उभे चीरुन ९. आलं/लसुण पेस्ट - २ चमचे १०. चींचेचा कोळ - पाव वाटि ११. तिखट - २ चमचे किंवा आवडिप्रमाणे कमी/जास्त १२. हळद - १/२ चमचा १३. तेल - १ वाटि १४. पाणि आवश्यकतेनुसार (फक्त वाटणाकरीता) १५. सजावटिसाठि कोथींबीर १६. मीठ चवीनुसार कॄती: १. एका नॉनस्टिक पॅन मधे अनुक्रमे कच्चे शेंगदाणे, सुखं खोबरं, जीरं, धणे आणि तीळ; लालसर होईस्त सगळे वेगवेगळे भाजुन/परतुन घ्या. वेगवेगळं अशासाठि कि तीळ/धणे लवकर भाजले जातात. सगळं एकदम घातलं तर शेंगदाणे/खोबरं नीट भाजलं जाणार नाहि. २. आता त्याच पॅन मधे १ चमचा तेल टाकुन उभा चीरलेला कांदा परतुन घ्या ३. भाजलेलं मिश्रण थंड झालं कि गरजेनुसार पाणी घालुन मीक्सरमधे त्याची मुलायम पेस्ट करुन घ्या ४. आता मध्यम आचेवर एका नॉनस्टिक कढईत/पातेल्यात १ वाटि तेल घाला ५. तेल तापलं कि आलं/लसुण पेस्ट टाकुन परता (ह्या स्टेपला टिप नं ४ बघा) ६. पेस्टचा कच्चा वास गेला कि वाटलेली पेस्ट टाकुन अगदि मंद आचेवर सतत ढवळत रहा (एक साधारण १५-२० मि.) तीळा मुळे पेस्ट कदाचीत खाली लागण्याची शक्यता आहे ७. पाणी पुर्ण आटुन कडेन तेल सुटु लागलं कि तीखट, हळद, चींचेचा कोळ आणि चवीनुसार मीठ घाला ८. एक ५ मि. ग्रेव्हित मोठया मिरच्या (देठासकट) आणि चेरी टोमॅटो (आख्खे) घाला ९. मंद आचेवर मधुन मधुन ग्रेव्हि/सालन हलवत रहा. शेवटच्या स्टेजला ग्रेव्हि/सालनावर पुर्ण तेलाचा तवंग येईल. तो पर्यत मिरच्यांची सालंहि मउ होतील आणि चेरी टोमॅटो अर्धवट गळालेले असतील. गॅस बंद करा आणि वरुन बारिक चीरलेली कोथिंबीर पेरा गरमा गरम मिर्चि का सालन खालील बगारा राईस बरोबर सर्व करा...... साहित्य बगारा राईस साठि: १. बासमती तांदुळ - २ कप २. दालचीनी - १ काडी ३. लवंगा - ४ ४. तमालपत्र - २ ५. काळि मीरी - ४ ६. काळि / मोठि वेलची - १ ७. हिरवी वेलची - ४ ८. आलं/लसुण पेस्ट - २ चमचे ९. बारीक चीरलेला पुदिना - १.५ कप १०. हिरव्या मिरच्या उभ्या चीरुन - आवडिप्रमाणे कमी/जास्त ११. उभे चीरलेले कांदे - २ १२. काजु मधुन तुकडे करुन - १० (एच्छिक) १३. साजुक तुप - ४ पळ्या १४. चवीनुसार मीठ कॄती: १. बासमती तांदुळ स्वच्छ धुवुन एक १/२ तास भीजत ठेवा २. मंद आचेवर आता एका जाड बुडाच्या पातेल्यात तुप तापलं कि खडे मसाले घाला. मसाले चांगले परतले कि आलं/लसुण पेस्ट घालुन परता ३. पेस्टचा कच्चा वास गेला कि उभे चीरलेले कांदे घालुन परता. कांदा पारर्दर्शक झाला कि पुदिना घालुन एक २ मि. परता ४. आता त्यात ३ कप पाणि घालुन उकळि आणा (ह्या स्टेपला टिप नं २ बघा) ५. आता त्यात भीजवलेले बासमती तांदुळ घाला व भात मोकळा शीजवुन घ्या ६. गॅस बंद केलात कि तुकडा काजु १ चमचा तुपात तळुन/शॅलो फ्राय करुन तयार भातात मिसळा गरमागरम बगारा राईस वरील मिर्चि का सालन बरोबर हाणा :) टिपा: १. मुळ ग्रेव्हि तीच ठेवुन त्यात वेगवेगळे पदार्थ घालुन वेगवेगळ्या सालन ग्रेव्ह्या बनवु शकतो. उदा: अ. मिरच्यां एवजी छोटया वांग्यांना स्वच्छ धुवुन त्यांना + ची चीर देउन फोडणीपात्रात कमीत कमी तेलात शॅलो फ्राय करुन घ्या आणि मग देठासकट ग्रेव्हित घाला......कि झाले भगारा बैंगन ब. नुसते छोटे चेरी टोमॅटो किंवा मद्रासी कांदे (दोन्हि आख्खे) ग्रेव्हित घातले......कि होईल टमाटर या प्याज का सालन क. कलरफुल सीमला मिरच्यांच (चौकोनी तुकडे करुन) सालन छान तर लागतंच शीवाय कलरफुलहि दिसतं. फक्त त्या ग्रेव्हित घालण्याआधी १ चमचा तेलात शॅलो फ्राय करा आणि अगदि चीमुटभर मीठ/धणे पावडर भुरभुरा जेणेकरुन खाताना सीमला मिरच्यांचे तुकडे प्लेन लागणार नाहित २. भाताच्या गुणवत्तेनुसार पाण्याचं प्रमाण अ‍ॅडजेस्ट करा. खरं तर मी पाणि उकळल्यामुळे खडया मसाल्यांचा रंग उतरुन भात तपकिरी झालाय. जर मसाले परतल्यावर लगेच भीजवलेला भात घातला तर भात मस्त पांढराशुभ्र होतो. असो आवड आपली आपली. ३. हैदराबादेत हे सालन खासकरुन चिकन/मटण बिर्याणी सोबत पेश करतात. वेल पण व्हेज बिर्याणीहि आपली काहि कसर सोडत नाहि. ४. आवडत असेल तर सालनात १ चमचा मोहरी (पण अगदि बारीक मीळते ती) घाला. मोठि घातलीत तर खाताना कदाचीत कडवट लागेल. वेल पण नाहि घातलीत तरी चव तसुभरहि कमी होत नाहि. चला तर मग करा आणि खायचा/खीलवायचा आनंद द्विगुणीत करा.......

वाचने 17084
प्रतिक्रिया 54

प्रतिक्रिया

In reply to by सुहास..

मस्त रेसीपी. फक्त एक सूचना " चेरी टोमॅटो अर्धवट गळालेले असतील." "गळालेले" ऐवजी "शिजलेले" हा शब्द वापरला तर बरे होइल. गळालेले या शब्दाचा अर्थ वेगळा होतो मराठीत

In reply to by विजुभाऊ

सन्जोपरावांनी एकदा हीच सुचना मलाही केलेली आठवतेय. तेव्हापासुन कटाक्षाने तो शब्द टाळत आलोय. :p

In reply to by गणपा

प्लीज योग्य तो बदल करावा.......

मस्तच... हे बगारा राईस आणि चिकन , बर्‍याच वेळा खाल्ले. आता एकदा बगारा राईस आणि मिरच्या खावून बघतो.

In reply to by Mrunalini

फोटो कातिल दिसताहेत. आणि दीपकभौंच्या पाकृंच्या देखणेपणाबद्दल काय बोलावे ? ...बोलूच नये, डोळ्यांनी खावे !

लाहौलविलाकुवत. आमा मियाँ, हमें तो मालुमीच्च नै के हयद्राबादी खाने में गोश्त के बिना भी खाना खातै बोल्के. परवर्दिगार तुमे सदा सलामत रक्खे -प्यारे हयद्राबादी.

In reply to by अभ्या..

भारतवारी येत्या फ्रेब्रु-मार्च मधे आहे. जमलं तर नक्कि भेटुया सगळे!

मिरची का सालन, कसला तवंग आलाय ...सॉल्लिड बगारा राईस पण छान दिसतोय...आवडल्या दोन्ही पाकृ :)

आत्ताच हापिसात जेवण करून आलो आणि समोर हि पाककृती बघुन पुन्हा पोटात भुक खवळली ना! बाकी छानच दिसते आहे हो पाकृ. नक्की करून बघणेत येईल.

मस्तच. अगदी शब्द खरा केलात तुम्ही

मिरची का सालन अल्टिमेट दिसतंय. करून बघते. इकडे (हैद्राबाद आणि आसपास) मुस्लिम लोक भात नेहमीच भगारा हुआच खातात. पथ्य असेल तर स्पेसिफिकली 'भगारे हुए चावल नक्को खाव खाली निखरे हुएच खाव' असं सांगावं लागतं. ;)

In reply to by साती

गंमत म्हणजे इथले बहुतेक लोक भाताला ' खाना' म्हणतात. खाना खायी म्हण्जे भात खाल्ला. नुसती पोळी भाजी खाल्ली तर खाली रोटी खायी म्हणत्तात. आमच्या कोंकणासारखं!

In reply to by सूड

पाकृत आहे ना बगारा राईस- भगारे चावल. इथे फोडणी म्हणजे बगार/ बगर/ भगर. निखरा म्हणजे नुसता पाणी घालून उकडलेला तांदूळ. आपण नेहमी घरी करतो तसा भात.

In reply to by साती

बगार/ बगर/ भगर. या शिवाय फोडणी साठीआणखी एक मुल्की( हैदराबादी) पाठभेद आहे---बघार माझी आवडती हैदराबादी भाजी म्हणजे बघारा बैंगन आणखी एक खुलासा -सालन म्हणजे कालवण

In reply to by साती

क्या सही बोलती तुम साती-आपा .. जब पेटां में तकलीप, तब्बीच तो रोटी खाते ना .. :) दिपक भाई, क्या सालन बनाये मिंया .. परसोकूंच्च नक्को नक्को बोलके, हमारे चाचू लेको गये थे व्हां बावर्ची, बिर्यानी खानेवास्ते .. अईसाईच मिर्च का सालन ..तब्बी मई सोंचू.. क्या रेसीपी होंगी ..और मियां.. ये हाजीर ..! ये पेठकर-साबां के साथ मिलको एक हैद्राबाद बिरयानी हाऊस खोलो मियां कुवेतमें तुम भी..

In reply to by पहाटवारा

हे बावर्ची हॉटेल म्हणजे व्हिटि-चर्नि रोड च्या मधे आहे तेच का? ते असेल तर त्या हॉटेलशी फार जवळिक आहे आणि बॅचलर डेज च्या आठवणी जोडलेल्या आहेत. तिथे आम्हि कॉलेजमित्र फक्त चिकन तंदुरी खायला जात असु. चौघाना एक एक तंदुरी, सोबत चिल्ड बीयर आणि शेवटि मसाला पान. छोटा, सोपा आणि सुटसुटित मेन्यु. सगळे नुकतेच कमवायला लागल्यामुळे बजेट मधे पण बसायचं शीवाय पोटभर. तंदुरी तर काय लागायची!!! गप्पा/टप्पा, चेष्टामस्करी, एकमेकांची खेचत स्टेशन कधी यायचं ते कळायचचं नाहि. वेल ह्या निमित्ताने त्या आठवणी परत ताज्या केल्यास मित्रा.....खुप खुप धन्यवाद.

In reply to by दिपक.कुवेत

मित्रा, ज्या बावर्ची होटेलचा ऊल्लेख मी केला, ते हैदराबादमधलेच आहे .. हैदराबाद सोडून मला आता बरेच दिवस झाले.. पण आठवणी अगदी ताज्या आहेत .. एकदम विसूनानांनी लिहिल्या-प्रमाणॅ .. परसूंकीच बात है ! -पहाटवारा

मस्तच आलाय रंग ग्रेव्हीला! दोन्ही पाकृ छान!

दोन्ही पाकृ एकदम मस्त! फोटो नेहमीप्रमानेच हायकल्लास!

सालना आन फोटो लंबर एक. आवडेश. :) -दिलीप बिरुटे

एक सांगायचच राहिलं......हे सालन फ्रिज मधे ४-५ दिवस आरामात टिकतं आणि जस जसं शीळं होत जातं तशी तशी चव अधीकाअधीक मुरत जाते.

अहाहा.. क्लास दिसत आहेत सालन आणि राईस.. स्वाती

सही दिसतं आहे सालन, मिरच्या मिळाल्या तर नक्की करुन बघेन. एक प्रश्न: सालनच्या पाकृमध्ये ६. पेस्टचा कच्चा वास गेला कि वाटलेली पेस्ट टाकुन अगदि मंद आचेवर सतत ढवळत रहा (एक साधारण १५-२० मि.) इथे १५-२० मि. खूप जास्त नाही का होणार? पेस्ट करपेल असे वाटतेय.

In reply to by सखी

नाहि पेस्ट करपणार नाहि कारण.....१. त्या करीता नॉन स्टिक कढई/पॅन वापर, २. सुरवातीला जे वाटिभर तेल घालतो त्याने पेस्ट खाली लागत नाहि, ३. शीवाय मंद आचेवर मधुन मधुन ढवळत रहा. वरती तेलाचा तवंग आला कि समजायच ग्रेव्हि पुर्ण शीजली आहे. एकदा नक्कि करुन पहा. सगळ्यांना आवडेल अशी आशा करतो.

पाकृ मस्त आहे. आवडली. आज करून पाहिली. पण मिरची ऐवजी बटाटे वापरले.

In reply to by अनन्त अवधुत

तेच म्हटलं मुळ ग्रेव्हि/सालन तेच ठेवुन त्यात आपापल्या आवडिचं घालुन काहिहि करु शकतो. बटाटा चाललाय तर तोंडलीहि (मधुन हलक्याश्या चीरुन) छान लागतील हा अंदाज लावतो.

खूप छान रेसिपी सजावट अप्रतिम तसेच फोटो ही खूप सुंदर . मागे एकदा हैदराबाद च्या paradise मध्ये चिकन बिर्याणी सोबत सालान ची चव चाखली होती खूप आवडले त्यामुळे पुन्हा एकदा मागवून त्याचा आस्वाद घेतला होता आमच्याकडे हा पदार्थ पितृपक्षात (श्राद्धाच्या दिवशी ) करतात वेगळेपणा इतकाच कि त्यात सुके खोबरे काजू आणि शेंगदाणे याच्या पेस्ट सहित वरून त्याचे काप ही करून घालतात (चिवड्यात टाकतात तसे ) पण ह्या पदार्थाला आमच्या येथील समस्त महिलावर्ग मात्र "पंचामृत" असे संबोधतो .ते का याचे कारण त्यांना अजून सांगता आलेले नाही तसेच मलाही कळलेलं नाही कारण माझ्या माहिती प्रमाणे पंचामृत म्हणजे दुध, दही,मध ,तुप आणि साखर या पाच वस्तूंनी बनलेला पदार्थ सत्य नारायणाच्या पूजेत अभिषेकाला आणि तीर्थ म्हणून वापरतात तो .

भगारे चावल आणि मिर्ची का सालन अप्रतिम. चिकन-मटण बिर्याणी बरोबर जेंव्हा हे असले कांही सालन (जास्त करून बैंगन सालन) देतात ते मला कधीच आवडले नाही. बिर्याणी आणि सालनच्या चवीत खूप फरक असतो. बिर्याणीला खरं पाहता कुठल्याच सालनाची गरज भासता कामा नये. त्यात इतपत मसाला असावा. अगदी वाटल्यास सोबत दही-कांदा घ्यावा.

काय राव मिर्ची का सालन ची रेसिपी मी आजच ई टि.वी मराठी की झी टि.वी वर पाहिली..... दोन्ही ही रेसिपी एकदम सेम. पण राव तोंडाला पाणीच आलय माझ्या.

कसलं भारी दिस्तय सालन आणि राईस. क्लास. या जेवणानंतर डेझर्ट म्हणुन काय खावे? फालुदा किंवा बटरस्कॉच आईस्क्रीम चालेल मला :) त्यानंतर पान मस्ट.

ही रेसिपी पाहिल्यापासून नवर्याने डोक आउट केलय की ही रेसिपी कर .आता सारे साहित्य आणून दिले आहे त्यामुळे करावीच लागेल. बाकी झाली की फोटो टाकतेच.तसे फोटो पाहून माझ्याही तोंडाला पाणी सुटलय यात काही शंका नाही.