Skip to main content

वाफाळलेली कटींग चहा .. !!

रविवार, 12/01/2014 या दिवशी प्रकाशित केले.
शनिवारची संध्याकाळ, सात-साडेसातचा सुमार, नेहमीपेक्षा बरीच रिकामी ट्रेन. हा थंडीचा प्रताप म्हणून ट्रेन खाली, की ट्रेन खाली असल्याने वारा अंगाला येऊन जास्तच झोंबत होता माहीत नाही. पण खिडक्या बंद करूनही सुरसुरत आत शिरत होता. किंबहुना बारीकश्या फटीतून तीरासारखा अंगावर झेपावत होता. कसलाही आवाज न करता. जे चार चौदा सहप्रवासी होते त्यांची वार्‍याचा विरुद्ध दिशेला बसायला मारामारी चालू होती. कसलेही भांडण न करता. निदान उबेसाठी म्हणून कोणाच्या तरी सोबतीची गरज यावेळी भासते तसे माझ्याबरोबर कोणी नव्हते. खरे तर एखादी शाल ओढून आपले स्टेशन येईपर्यंत मस्तपैकी ताणून द्यावी अशी ती थंडी, पण तीच शाल नसली की झोपही लागू नये अशी ती थंडी. एका शालेची कमतरता गुलाबी आणि बोचरी थंडीतील फरक उघड करून जात होती. पण तसाही माझ्याकडे झोपण्याचा पर्याय नव्हताच. मध्ये काही कामासाठी पाचच मिनिटांसाठी का होईना वाशी स्टेशनला उतरायचे होते. वाशी स्टेशन ! शनिवार असो वा रविवार, गरमी असो वा थंडी, एक गजबजलेला परीसर ! पण स्टेशनबाहेरचा भलामोठा पटांगणासारखा आवार त्याच वेळी तितकाच मोकळा वाटणारा. स्टेशनबाहेर पडल्यावर समोरच्या रिक्षा वा बस स्टॅंड पर्यंत जाईस्तोवर याच मोकळ्या पटांगणातून थंडीशी लढत जायचे होते. पण जायचेच होते. माझे काम तिथेच होते. पाचच मिनिटांचे काम, पाचच मिनिटांत उरकले. आता पुन्हा त्या पटांगणातूनच परतायचे होते. पण त्याआधी शरीराला काहीतरी रसद पुरवणे गरजेचे समजले. हि तेथील आणखी एक तुफान गर्दीची जागा. रिक्षास्टॅडला लागूनच. कित्येक चहा वडा सामोश्याच्या टपर्‍या. झालेच तर ऑमलेट अन भुर्जीपाव. चायनीज वा मसाला डोसे खायचे असल्यास त्याचीही सोय. उभे राहणे जीवावर आले असल्यास बसण्याजोगे ओपन रेस्टॉरंटस. जे सभोवतालच्या मॉल्सच्या फूडकोर्टमध्ये मिळते ते थोड्याफार फरकाने इथेही उपलब्ध. एक गर्दीची टपरी मी देखील पकडली. भूक अशी नव्हतीच, किंबहुना काहीतरी गरमागरम तोंडात पडावे एवढीच इच्छा. इथे चहाला पर्याय नसतो. वाफाळलेली गरमागरम कटींग चहा. सोबत वडापाव नुसता तोंडी लावण्यापुरता. पण मला त्याचीही गरज नव्हती. तरीही सवयीने सर्वांच्या किंमतीवर नजर टाकली. अन अखेर बोर्डाच्या तळाशी ठळक खडूने लिहिलेल्या चहापाशी येऊन स्थिरावली. ठळक खडू, म्हणजे किंमत नुकतीच वाढवलेली दिसत होती.. कटींग चहा - ६ रुपये.. फुल्ल चहा - १० रुपये.. आजूबाजुला दिसणार्‍या चहाच्या गिलासांवर नजर टाकली तर कटींग चहाला छोटा ग्लास तर फुल्ल चहाला मोठा. छोट्या ग्लासाचा आकार दोन बोटांच्या चिमटीत लपून जावा इतपत. कधी दोन घोटांत संपून जावी समजू नये. घरी असताना बरेचदा यापेक्षा जास्त चहा मी आज मूड नाही, जात नाही, म्हणत मोरीत ओततो. तेवढी चहा आज बाहेर सहा रुपये झालीय हे समजले. नाहीतर मी अजूनही कॉलेजला मिळणार्‍या दोन रुपये कटींगच्याच विश्वात होतो. फुल्ल चहा घ्यायचे ठरवून पाकीटातले दहा रुपये काढायला हात बाहेर काढले, जे एवढावेळ जीन्सच्या पुढच्या खिशात खोचले होते. अन पुन्हा त्यांना गार वारा झोंबला तसे कधी एकदा पटकन पैसे ढिले करून चहा घेतोय असे झाले. पण चहा होता खरा दहा रुपये वसूल करणारा, हे त्याला हातांत घेताच समजले. दोन्ही हातांना एक छानसा चटका बसला. काठोकाठ भरलेला तो गरम काचेचा ग्लास माझ्या थंड हातांना जास्त वेळ धरवणे कठीण व्हायच्या आत खिशातून रुमाल काढून त्यात तो धरला. त्याच्या बाहेरच्या बाजूने काही चहाचे ओघळलेले डाग तर नाहीत ना याचा विचार न करता. त्या वाफाळणार्‍या चहाचा आस्वाद घ्यायला आता मी तयार होतो. ओठाला लावायच्या आधी मी तोंडाजवळ आणून त्यातून निघणारी वाफ नाकांत भरून घेतली. एवढावेळ प्रत्येक श्वासागणिक थंड वाराच आत शिरत होता. श्वास घेणे गरजेचेच असल्याने त्याला रोखायचीही सोय नव्हती. पण आता मात्र श्वासांमार्फत त्या चहावर दरवळणारी वाफ जितकी प्राशन करता येईल तितकी करून घेतली. पण पिण्यास एकदा सुरुवात करताच झरझर संपू लागली. शेवटचा घोट किंचित कोमटच भासला, अन अजून एक चहा प्यायची इच्छा झाली. चहापेक्षाही त्या वातावरणात अजून थोडावेळ वावरायची इच्छा होती. तेथील सिगारेटचा धूरही आज फारसा त्रासदायक न वाटता वातावरण गरमच करत होता. मूड बदलला तसे भोवतालचे जग अनुभवायची नजर बदलली. नेहमीच्या तरुणाईच्या हिरवळीला आज मफलरीचा साज चढल्याने ती वेगळ्याच रुपात खुलून आली होती. आता मी स्वताही तिचाच एक हिस्सा झालो होतो. पुनश्च लागलेल्या चहाच्या हुक्कीला न्याय द्यायला दहा रुपये जड नव्हतेच. दुसरी चहा संपताच मात्र मी तडक तिथून निघालो. चहाने अंगात आलेल्या उबेचा इफेक्ट ओसरायच्या आधी पाऊले झपाझप उचलत. दोन्ही हात खिशांत टाकून, अंगाचे मुटकुळे करून. अन आजूबाजुला माझ्यासारख्याच अवस्थेत दिसणार्‍या जीवांना न्याहाळत. ईतक्यात एक नजर एका वृद्ध जोडप्यावर पडली. सदरा लेंगा अन लुगडे असा मराठमोळा पोशाख म्हणून साहजिकच वाटणारा एक आपलेपणा. एका मळलेल्या गाठोड्यात संसार बांधून एक आडोसा पकडून बसले होते. मात्र दुसर्‍या बाजूने येणारी वार्‍याची लाट थोपवायला उपाय नव्हता. याआधी कधी असे कोणाला रस्त्याच्या कडेला पाहिले नव्हते असे नाही, पण या वातावरणात.. अन या वयात.. कसे सहन करत असतील हा विचार मनात आल्याशिवाय राहिला नाही. लांबून पाहता कुडकुडताना दिसले नाहीत, कदाचित त्यांच्या वेदना मेल्या असाव्यात वा माझी नजर. माझा स्टेशनवर जायचा रस्ता थोडाफार त्या कडेनेच जात होता. त्यांच्यावर पडलेली नजर आता त्यांना पार केल्याशिवाय फिरवणे शक्य नव्हते. आणि म्हणूनच मी माझी पावले जरा जास्तच झपझप उचलू लागलो. त्यांना मदत न करता पुढे जातोय हि टोचणी जास्त वेळा सहन करावी लागू नये हा एकच हेतू. मदत करायची म्हटली तरी त्यांना द्यायला एखादी शाल वा चादर बरोबर नाही असे स्वताच्या सोयीने अर्थ काढत मी माझी वाट धरली. पण अखेरच्या क्षणाला, मनात काही आले आणि थोडीशी वाट वाकडी करून त्यांच्यासमोर दहा रुपयांची नोट सरकवून पुढे गेलो.. ते तिथे भीक मागायला बसले होते की नाही हे माहीत नव्हते. त्यांना मदतीची गरज होती की नव्हती हे ही माहीत नव्हते. अन असली तरी काय येणार होते त्या दहा रुपयांत.. दोघांत एक फुल्ल चहा.. की वाफाळलेली एकेक कटींग. पोटाची आग त्यापेक्षा जास्त असल्यास कदाचित त्या दहा रुपयांत एखादा वडापावच घेतला गेला असता. अन तो ही कदाचित थंडगार.. पण मला मात्र एवढा विचार करायची गरज नव्हती. माझे काम झाले होते, मला समाधान मिळाले होते. आता मनाला कोणतीही टाचणी लागणार नव्हती. पण जर तेच दहा रुपये सरकवले नसले तर कदाचित रात्री झोपताना मला चादरीतून ऊब मिळाली नसती. स्साला कुणाला मदत करतानाही आपण आपलाच स्वार्थ बघतो. स्वताच्या वाट्याचे सुखं उपभोगताना मनात कसलीही अपराधीपणाची भावना उपजू नये म्हणून आणि ईतपतच मदत करतो. स्वताला थंडी वाजली तरच दुसर्‍याच्या थंडीची जाणीव होते, स्वताला भूक लागली तरच दुसर्‍याच्या पोटाची आग कळते. ती सरकवलेली दहा रुपयांची नोट म्हणजे माझी स्वतासाठीच एक वाफाळलेली गरमागरम कटींग चहा होती, जी मला स्वतालाच उब मिळावी म्हणून खर्च केली होते. बाकी मुंबई म्हटले की बस्स चार दिवसांची थंडी.. त्यानंतर ना मला थंडी वाजणार होती ना कोणाला वाजतेय याची मी पर्वा करणार होतो.. - तुमचा अभिषेक
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 11228
प्रतिक्रिया 57

प्रतिक्रिया

:)
स्साला कुणाला मदत करतानाही आपण आपलाच स्वार्थ बघतो. स्वताच्या वाट्याचे सुखं उपभोगताना मनात कसलीही अपराधीपणाची भावना उपजू नये म्हणून आणि ईतपतच मदत करतो.
अगदी अस्सेच विचार हल्ली डोक्यात घोळत असतात. आवडला अनुभव!!

स्वताच्या वाट्याचे सुखं उपभोगताना मनात कसलीही अपराधीपणाची भावना उपजू नये म्हणून आणि ईतपतच मदतकरणे वारंवार घडते आहे. यात बदल कसा करावा ?

In reply to by मुक्त विहारि

हे मत आपण नक्की का कसे बनवले याचा अंदाजा नाही, पण सध्याच्या जगात आर्थिक मदतीलाच सर्वश्रेष्ठ मदत समजले जाते हे हि एक आहेच.. :)

एक अनुभव चांगल्या पद्धतीने मांडला आहे. >>>>स्वताला थंडी वाजली तरच दुसर्‍याच्या थंडीची जाणीव होते, स्वताला भूक लागली तरच दुसर्‍याच्या पोटाची आग कळते. ह्यालाच संवेदना असे म्हणतात. 'संवेदना' म्हणजे 'सम वेदना' दुसर्‍याला होणारी वेदना आपल्यालाच होते आहे असा विचार करणे. अशा वृत्तीला संवेदनशीलता म्हणतात. ती फार महत्त्वाची असते. त्याच बरोबर 'स्वता' नाही 'स्वतः'. बाकी कांही प्रश्न पडलेतः >>>> हा थंडीचा प्रताप म्हणून ट्रेन खाली, की ट्रेन खाली असल्याने हा थंडीचा प्रताप म्हणून डबा रिकामा होता की डबा रिकामा असल्याने..असा स्वच्छ मराठी शब्दप्रयोग का नाही? हिन्दी आणि इंग्रजी भाषेच्या मराठीवरील आक्रमणाला आपणच हातभार का लावावा? >>>>स्टेशनबाहेरचा भलामोठा पटांगणासारखा आवार.... 'तो' आवार की 'ते' आवार???? >>>>वाफाळलेली गरमागरम कटींग चहा. 'ती' चहा की 'तो' चहा? >>>>चहा होता खरा दहा रुपये वसूल करणारा, जर चहा 'ती' असेल तर इथे 'तो' कशासाठी?

In reply to by प्रभाकर पेठकर

श्री. पेठ्कर काकांशी सहमत ! पण चहा मात्र उभयलिगी आहे ( " ते" उभयलिंग नव्हे.. दोन्ही लिगी असणारे ) स्त्रीलिंगी आणि पुल्लिंगी ही ! पुण्यातला " तो " चहा , मुंबईला ती " चाय " होतो हा स्वानुभव आहे !

In reply to by विटेकर

ती चाय होते. ती चहा होत नाही. जन्मापासून मुंबईकर, आदि जोशी

In reply to by विटेकर

>>>>पुण्यातला " तो " चहा , मुंबईला ती " चाय " होतो हा स्वानुभव आहे ! माझा अनुभव उलटा आहे. मुंबईत तो चहा म्हणतात पुण्यात ती चहा. मुंबईत, चहा प्यायलो म्हणतात तर पुण्यात सर्रास चहा पिली म्हणतात. मुंबईतही विशिष्ट जाती जमातीत आणि चाळ संस्कृतीत ब्राह्मणेतरांमध्ये असा शब्दप्रयोग केला जातो. तर पुण्यात ब्राह्मण-ब्राह्मणेतर सर्वच जणं चहा पिली म्हणतात.

In reply to by प्रभाकर पेठकर

पुण्यात सर्रास चहा पिली म्हणतात.
कुठल्या पुण्यात ऐकलंय हे? पुण्यात हमखास `तो चहा' आणि `चहा प्यायलो' असंच म्हणतात

In reply to by संजय क्षीरसागर

>>>>कुठल्या पुण्यात ऐकलंय हे? अशी किती पुणी ठाऊक आहेत तुम्हाला? यादी द्या त्यात असेल तर 'सिलेक्ट' करून सांगतो.

In reply to by प्रभाकर पेठकर

प्रतिसाद.... चहा उभयलिंगी आहे?....हा शोध पुणेकरांचाच...आणि पुणेकरांचे व्याकरण हा शोधाचा विषय. (बाकी लाख लोकांत पुणेकर ओळखणे सहज जमते )

In reply to by ज्ञानव

हा शोध तुम्ही कुठून लावला?
आणि पुणेकरांचे व्याकरण हा शोधाचा विषय
पुण्याची मराठी ही प्रमाण मराठी आहे अशी सार्वत्रिक मान्यता आहे. तुम्ही मानता की नाही हा तुमचा प्रश्न.
(बाकी लाख लोकांत पुणेकर ओळखणे सहज जमते )
संपूर्ण सहमत, कारण त्याला `किती पुणी आहेत' वगैरे प्रश्नच पडत नाहीत!

In reply to by संजय क्षीरसागर

>>>>कारण त्याला `किती पुणी आहेत' वगैरे प्रश्नच पडत नाहीत! पण 'कुठल्या पुण्यात?' असले तद्दन बालसुलभ प्रश्न त्याला पडतात.

In reply to by संजय क्षीरसागर

पुण्याची मराठी ही प्रमाण मराठी आहे अशी सार्वत्रिक मान्यता आहे.
दुर्दैवाने हि सार्वत्रिक मान्यता पुणे हद्दीच्या बाहेर जात नाही.
(बाकी लाख लोकांत पुणेकर ओळखणे सहज जमते )
हा उपरोध ही कौतुकाने घेणे "म्हणले" पुणेकरांनाच "ठऊकय "

In reply to by ज्ञानव

अहो ते कंसातील वाचा हो , वाचण्यासाठी लिहिल्यं ते ! (" ते" उभयलिंग नव्हे.. दोन्ही लिगी असणारे ....) . . . . . अक्षरें गाळून वाची| कां तें घाली पदरिचीं |नीघा न करी पुस्तकाची| तो येक मूर्ख ||२-१-७०|

In reply to by प्रभाकर पेठकर

"रोज-मरा" या शब्दात फक्त रोज हा शब्द नाही , दैनंदिन शब्द फक्त रोज हाच अर्थ ध्वनित करतो.. रोज- मरा या शब्दात जे दैन्य आहे ( रोजच्या मरणातले ) ते दैनंदिन शब्दात ध्वनित होत नाही ! " दैन्य्-दिन" असा म्रराठी शब्द नाही अन्यथा त्यातून अर्थ सूचित होऊ शकतो.

In reply to by विटेकर

'रोजमर्रा' असा शब्द आहे त्याचा शब्दकोषिय अर्थ 'दैनंदिन' असाच दिला आहे. संदर्भासाठी इथे पाहा. 'रोजमरी' हा, 'रोझमरी' ह्या काँटिनेंटल मसाल्यातील सुगंधी पानांच्या, नांवाचा भ्रष्ट उच्चार होऊ शकतो.

In reply to by प्रभाकर पेठकर

२५-३० वर्षात पुण्यात एकदाही चहा पिली असा शब्द प्रयोग ऐकलेला नाही. पेठांमध्ये नाही, परंपरागत घरात नाही, बर्‍या वाईट अमृततुल्यांमध्येही नाही, नवीन उपनगरांमध्येही नाही. चहा घेतला असाच शब्द प्रयोग केला जातो. सर्रास चहा पिली असं म्हणतात हे तर १००% खरं नाही. यात पुणेरीपणा आणि तथाकथित जाज्वल्य अभिमान वगैरे काही नाही. जो अनुभव आहे तो आहे. कुठल्या विशिष्ट ठिकाणि नियमित पणे ऐकला असल्यास जरूर सांगा, जाऊन खात्री करण्याचा प्रयत्न करेन. किती पुणी आहेत वगैरे वाद जे खाली चालू आहेत त्यात पडण्याची बिलकूल इच्छा नाही. त्यावर प्रतिसादही दिला जाणार नाही.

In reply to by मैत्र

"चहा पिली" आणि "चहा प्यायला" यापैकी कोणतेही वाक्य मी पुण्यात ऐकलेले नाही. माझ्या तेथील वास्तव्यात फक्त "चहा पाज" हेच वाक्य ऐकलेले आहे.

In reply to by गवि

>>> चहा पाज. हाताला नुकतीच मेंदी लावलेली असल्यास असं फर्मान येऊ शकते! गविं ना पुण्यात असे विविध अनुभव वारंवार आले असण्याची शक्यताही नाकारता येत नाही. मित्राद्वारे चहा पाज असं वाक्य ऐकल्यावर शांतपणे 'मी पाजतो तू पैसे दे' असे म्हटल्याशिवाय पुणेकर म्हणवून घेऊ नये. -सरळ विचारकर्ता प्यारे ;)

In reply to by प्यारे१

गविं ना पुण्यात असे विविध अनुभव वारंवार आले
विविध अनुभव मेंदी लावण्याचे की चहा पाज म्हणून घेण्याचे ? काहीही असू शकेल नाही का ? ... पुरुषस्य भाग्यं... यापेक्षा अधिक काय बोलू? (संभ्रमित)

In reply to by विटेकर

केसांना मेंदी लावण्याच्या वयातल्या मनुष्याबद्दल कायकाय कल्पना करतात लोक.. ;) अहो मेंदीचा काही संबंध नाही. तो प्यारे बोलतो आणि तुम्ही ऐकता..

In reply to by मैत्र

श्री. मैत्र, माझा मूळ प्रतिसाद हा श्री. विटेकर ह्यांच्या 'स्वानुभव' मांडणार्‍या प्रतिसादाला उद्देशून होता. त्यांच्या अनुभवाला मी आव्हान दिलेले नाही तर माझा अनुभव मांडला आहे. त्यातही मुंबई आणि पुण्यात वेगवेगळ्या परिस्थितीत आणि जमातीत दोन्ही शब्दप्रयोग ऐकले आहेत असे म्हंटले आहे. म्हणजेच त्यांचे मत, स्वानुभव अंशतः स्विकारला आहे. आता सर्रास शब्दाबद्दल. माझ्या नात्यात आणि मित्रांमध्ये मी 'चहा पिली' हा शब्दप्रयोग सर्रास ऐकला आहे. मी कधीच पुण्यात सलग अनेक वर्षे (४-५च्या वर) राहिलेलो नाही पण पुणे शहराशी आणि अनेक माणसांशी माझा गेल्या ६० वर्षात अनेकदा संबंध आला आहे. पूर्वीच्या काळी हा शब्द मीही कधी ऐकला नव्हता. पण हल्ली (गेल्या १०-१५ वर्षात) हा शब्दप्रयोग मी वर उल्लेखिलेल्या व्यक्तींकडून अगदी अनेकदा ऐकला आहे. असो. जसा श्री. विटेकरांचा अनुभव तसाच माझा ही अनुभवच. पण म्हणजे सर्व इतरांनाही तोच अनुभव यावा असा माझा आग्रह नाही. तुमचा अनुभव माझ्यापेक्षा वेगळा असू शकतो. तुम्हाला नसेल पटला तर सोडून द्या. असेही, आपल्याला न पटणारे अनेक मुद्दे येतच असतात. अगदी सर्वांनी हिरीरीने विरोध केला तरीही माझेच खरे, मीच सर्वद्यानी, तुमच्या भल्यासाठीच माझा जन्म आहे असे भासविणारे कित्येक पोकळ मुद्दे मांडणारे कांही महाभाग आहेत. त्यांच्याकडे जसे आपण दुर्लक्ष करून पुढे जातो. तसेच, माझा मुद्दा पटला नसेल तर सोडून द्यावा, ही नम्र विनंती.

In reply to by प्रभाकर पेठकर

हा विटेकर काकांच्या प्रतिसादातून आलेला मुद्दा माझ्या लक्षात आला नव्हता. " तर पुण्यात ब्राह्मण-ब्राह्मणेतर सर्वच जणं चहा पिली म्हणतात. पुण्यात सर्रास चहा पिली म्हणतात. " यातून जे एक सरसकटपणे केलेलं विधान वाटतं त्यावरच मी माझं मत मांडलं -- त्याच पद्धतीने की हा माझा अनुभव आहे. तुमचा वेगळा असेल तर कुठल्या भागात / ठिकाणी असेल तर ऐकायला उत्सुकता वाटेल. ही वरची मूळ प्रतिसादातली दोन्ही वाक्ये पाहता -- "पुण्यात वेगवेगळ्या परिस्थितीत आणि जमातीत दोन्ही शब्दप्रयोग ऐकले आहेत असे म्हंटले आहे." असं वाटलं नाही म्हणून प्रतिवाद केला. इत्यलम..

In reply to by मैत्र

चहाने मित्र मिळतात हे म्हैते पण चहाने (कसा/कशी का असेना शुध्द किंवा अशुध्द) ढिगभर प्रतिसाद पण मिळतात हे कळले. ;)

In reply to by सूड

शीर्षक अन् दुसरं वाक्यः हा थंडीचा प्रताप म्हणून ट्रेन खाली, की ट्रेन खाली असल्याने वारा अंगाला येऊन जास्तच झोंबत होता माहीत नाही. याच्यात अंमळ वेळ गेला. (होय.. आमची टुपलाईट जरा उशीरा पेटते.) बाकी वाचतो आता...

उत्तम अनुभव ! ही संवेदना मरु देऊ नका .. रोजमरी ( पेठकर काका.. मराठी शब्द ?) आयुष्यात आपल्या संवेदना बोथट होत जाण्यासारखा शाप नाही .. ! प्रत्येकवेळा त्यासाठी काही करायलाच हवे असे नव्हे पण त्याची "जाणीव" होणे महत्वाचे ! तसे झाले नाही तर "दु:ख माझं दु:ख माझ हुंड्या- झुंबरा" टांगलं जातं ! अर्थात त्यातही स्वार्थ आहेच .. आपल्यापेक्षा कुणीतरी अधिक दु: खी आहे हा विचारसुद्धा माणसाला नकळत सुखावून जातो....किती क्रूरपणा आहे हा ! अस्तु .. छान लिहिता तुम्ही !

In reply to by विटेकर

>>>>रोजमरी ( पेठकर काका.. मराठी शब्द ?) तुमच्या वाक्यात 'दररोज' हाच शब्द चपखल बसतो. रोज मरे त्याला कोण रडे? मराठीत असे म्हणतातच.

तुमचे लेख खूप आवडतात .... नेहमीच. हा तर इतका आवडला. वर कोणीतरी म्हटले तसेच म्हणते ही संवेदनशीलता मरु देऊ नका शिवाय - शेअर इट!! शेअर युअर ट्रुथ!!! इट मेक्स अ दिफरन्स इन द वल्ड!!!

In reply to by शुचि

शेअर इट!! शेअर युअर ट्रुथ!!! इट मेक्स अ दिफरन्स इन द वल्ड!!! >>>> अगदी हेच अश्याच अर्थाचे काल माझी बायको हा लेख वाचल्यावर पुटपुटली होती.. प्रयत्न नेहमी हाच राहतो :) प्रतिसादाबद्दल धन्यवाद !

In reply to by रामपुरी

मला माहीत आहे, जे लोक असे म्हणतात त्यांनी शब्दन शब्द वेचून वाचला असतो :) प्रतिसादाबद्दल धन्यवाद, मराठी इतकेही चांगले नाही की आपसूकच फूलप्रूफ व्याकरण लिहिले जाईल, बरेचसे प्रूफरीडींगमध्ये दुरुस्त करतो. सूचना कराल तर सुधारणाही घडेल..

In reply to by तुमचा अभिषेक

मला माहीत आहे, जे लोक असे म्हणतात त्यांनी शब्दन शब्द वेचून वाचलेला असतो प्रतिसादाबद्दल धन्यवाद, आपसूकच फूलप्रूफ व्याकरण लिहिले जाईल इतकेही मराठी चांगले नाही. बरेचसे प्रूफरीडींगमध्ये दुरुस्त करतो. सूचना कराल तर सुधारणाही घडेल... यातील इंग्रजी शब्दाना पर्यायी शब्द आहेत पण आता कंटाळा आला. असो... लेख पूर्ण वाचल्याशिवाय लेखात दुरूस्ती करणे शक्य नाही पण लेख वाचणं सुद्धा शक्य नाही. तस्मात पु ले शु (अर्थातच मराठी).

In reply to by रामपुरी

प्रतिसाद वाचत आहात, हे ही नसे थोडके. किंबहुना याचा अर्थ प्रतिसादांमध्ये तरी मी शुद्ध व्याकरणप्रूफ मराठीत लिहितोय तर :)

आणि हो, मराठीची बोंब आहे खरी.. लिखाणामुळे सुधारतेय हे विशेष, अन्यथा बोलायला फुल्ल टू बंबैय्याच आहे.. इथेही सांगायचे तर मी अजूनही कन्फ्यूज आहे की तो चहा की ती चहा :) बाकी एवढे जण म्हणताहेत तर तो चहाच असेल !

लिखाण आवडलं. पण तुमच्या लिखाणावरचा बंबय्या हिंदीचा प्रभाव कमी करायचा प्रयत्न केलात तर छान! त्यासाठी जुनी मराठी पुस्तकं वाचा.

In reply to by पैसा

कधी कधी भरभर कागदावर उतरवताना तसा विचार करत नाही. मूळ विचार ज्या बंबैय्या भाषेत येतात तीच भाषा जपली नाही तर विचारांशी प्रामाणिक राहणे होणार नाही ही त्या मागची भावना. मात्र बरेचदा लिखाणांत शुद्ध भाषेचा बाज राखण्याचा प्रामाणिक प्रयत्न असतोच. आता हे मला वैयक्तिक ओळखणार्‍यांनाच पटू शकेल. खरे सांगायचे तर या लिखाणाच्या सवयीमुळे माझी नेहमीची चॅटींगची शैली सुद्धा अशी बदलली आहे की समोरचे जुने मित्र बोलतात अरे ए ते तुझ्या आता लिखाणाच्या स्टाईलमध्ये बोलू नकोस, माहिती आहे मोठा आहेस लिहिणारा, सरळ बोलायचे तर बोल, शहाणपत्ती करू नकोस वगैरे वगैरे..