✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

एक संध्याकाळ

स
स्पा यांनी
Fri, 03/18/2011 - 07:30  ·  लेख
लेख
४ वाजतात. मी पीसी बंद करून उठतो, ऑफिस मधल्या अनेकांच्या भुवया उंचावल्या जातात. अरे हा आज इतक्या लवकर कलटी? मी त्या नजरा जाणीवपूर्वक टाळतो.आज मनस्थितीच विचित्र असते, त्यात अजून बसून काम करणं मला तरी निदान शक्य नसतं . कामाचं टेन्शन झेपत नाहीये कि बाकीच्या टेन्शन मुळे काम झेपत नाहीये , काहीच कळत नाहीये. खाली येतो आणि बाहेर चालू लागतो, बाहेर भन्नाट हवा सुटलेली असते, पण सगळे उष्ण वारे , हम्म उन्हाळा सुरु झाला तर मी स्वतःशीच पुटपुटतो. आज चालत जाऊया नाहीतरी लवकर निघालो आहे. उन्हाची तीव्रता आता बरीच कमी झालेली असते, पण सुर्यनारायण मात्र अस्ताला जाण्याआधी मस्त त्याची चित्रकलेची हौस पुरवून घेत असावा, आकाशात केशरी,निळसर, अश्या अनेक रंगांची जणू रंगपंचमी सुरु होती, अहाहा काय निसर्गाचा चमत्कार आहे !!! पण साला मनात कसलं मळभ साठलंय देव जाणे, चालता चालता, विचारांचे घोडे चौखूर उधळलेले असतात. कधी कधी एखाद्या सकाळी प्रचंड ढग आकाशात गोळा होतात, सोसाट्याचा वारा सुटतो, गडगडत, विजा चमकतात पण अख्खा दिवस पाऊस काही पडत नाही,जीवाची काहिली मात्र होत राहते , तसच काहीस झालंय. भरपूर रडावस वाटतय, पण छ्या, मी आणि रडू ? मनातला पुरुषी बाणा जागा होतो. का रडू नये? पुरुषाला भावना नसतात ? त्या काय फक्त दारू पोटात गेल्यावर बाहेर काढायच्या असं थोडी आहे? अनेक म्याचो म्यान बार मध्ये पोरींच्या वरताण रडताना पाहिलेले आहेत मी. मनात द्वंद सुरूच असत. गाडीच्या आवाजाने मी दचकतो, विचारांच्या तंद्रीत न बघतच रस्ता क्रोस करत होतो. वा काय गाडी आहे, जवळ जवळ ४०-५० लाखांची सहज असेल, काय आरामदायक आयुष्य आहे यार, गाडी निघून गेल्यावर मी नजरेआड होईपर्यंत बघत बसतो , नक्की कोणीतरी श्रीमंत बापाचा पोरगा असणार , नुसता पैसा! सकाळी उठून रात्री झोपेपर्यंत पैसा कसा खर्च करावा याचाच विचार करत असतील साले. टिपिकल मध्यमवर्गीय विचार सुरु होतात. नाहीतरी साले आपण रोज सकाळी उठलं कि ७.२८ ची लोकल पकडायची जीवघेणी शर्यत, किडा मुंगी सारख स्वतःलाच चिरडून घ्यायचं, भयानक स्पर्धेत स्वतःला लोटून द्यायचं, दिवसभर गुरासारख राबायचं आणि रात्री कधीतरी दमून असंच चिरून चिरडून घरी यायचं . घरचे बिचारे तोपर्यंत झोपलेले असतात, कोणाशी संवाद नाही , थट्टा मस्करी नाही, काहीच नाही, सगळे मिळून पत्ते खेळून सुद्धा २ ३ वर्ष सहज झाली असतील, हल्ली ऑनलाईन गळाभेटी होतातच, एकमेकांना "लाईक" केलं कि विषय संपला. सालं आरामात जाऊन झोपायला तर अजून हक्काचं घर सुद्धा नाहीये. राहतं घर खाली कराव लागेल कि काय अशी परिस्थिती. आजूबाजूचे गगनचुंबी इमले बघत उगाचच त्यात राहणार्यांचा हेवा वाटतो. मनातला कडवट पण वाढतच असतो, स्टेशन येत तसं गजबजाटाने भानावर येतो. मुकाट खाली मान घालून ट्रेन ची वाट बघत बसतो. एका कोपऱ्यात एक भिकारी बाई बसलेली असते साधारण तिशीची, बाजूला एक छोटंसं नंगु पोर, आणि छातीची कवटाळलेलं एक तान्हुल, तिच्या चेहऱ्याची गालफड बसलेली, शरीर फाटके कपडे आहेत , म्हणून दिसतंय एवढी परिस्थिती, केसांचा अवतार, डोळ्यात कसल्याच भावना नाहीत, भिकार्यांच्या डोळ्यात निदान लोचट , पैसे मिळतील अश्या भावना मी बघितलेल्या आहेत, पण अशी स्वप्न शून्य नजर.. बापरे अंगावर शहारा येतो. ते तान्हुलं तिला लुचायचा प्रयत्न करत असतं, आणि माउली तशीच बसून, त्याची भूक कशी भागेल? मी पटकन रिक्षाचे वाचवलेले पैसे त्या नंगु पोराच्या हातात टेकवतो, ते उद्या मारत परत तिच्याकडे जात, पण तिच्या चेहर्यावरची रेषही हलत नाही , मला तो प्रकार असह्य होतो, ट्रेन येतंच असते, मी पटकन आत शिरतो, लवकर निघाल्याने ट्रेन बरीचसी रिकामीच असते , मस्त विंडो सीट मिळते. लोकल सुसाट सुटते , खिडकीतून वर आल्यावर जरा बरं वाटत. समोर कॉलेजचा कंपू बसलेला असतो, नुसता दंगा माजवलेला असतो त्यांनी, एकमेकांची खेचत, थट्टा मस्करी करत , अख्या डब्याच लक्ष वेधून घेतलेलं असत, मधेच एक दोघे जण माझ्याकडे बघत असतात, मीच त्यांच्यासमोर एवढं खत्रूड आणि निर्विकार थोबाड घेऊन बसलो असेन म्हणून असेल कदाचित परत पावसाची आठवण येते, त्यांचा आनंद जल्लोष पाहून , बाहेर मुसळधार पाऊस बरसतोय, आणि मी कोरडा राहून खिडकीतून बघतोय , तशीच माझी अवस्था असते . बाजूला लक्ष जात, एक प्रेमी युगुल त्याच्याच विश्वात गुरफटलेलं असत, तो तिला सारख चिडवत असतो, ती मधेच चिडायची, मधेच हसायची, मधेच तोंड फिरवून खिडकी बाहेर बघायची, पण तिचा त्याच्या हातातला हात मात्र तसाच, जणू जन्मोजन्मीची साथ देण्यासाठीच गुंफलेला. तीच लक्ष माझ्याकडे जात, मी गोंधळून चटकन नजर फिरवतो. गाडीने ठाणे सोडलेले असते, समोरचा कंपू पण उतरून गेलेला असतो, एखादा कुशल शिंपी ज्याप्रमाणे समोरचं कापड कुशलतेने सरसर कापत जातो, तसाच निसर्गाचा विशाल पट्टा कापत ट्रेन भरधाव निघालेली असते, चला आता २० मिनिटात डोंबिवली! बाहेर खाडी दिसत असते , आणि परत सूर्यनारायणाच दर्शन होत , त्याचा केशरी रंग इतका लोभस दिसत असतो कि बस , खाडीच पाणी सुद्धा केशरी रंगात नटलेल असत, मी पटकन दोन तीन फोटो काढतो मोबाईलवर , पण नीट येत नाहीत , असो शक्य तेवढ्या कटू आठवणी दूर करण्याचा प्रयत्न सुरु असतो. बोगद्यातून गाडी बाहेर येते आणि मुंब्रा देवीचा डोंगर दिसू लागतो . नकळत हात जोडले जातात, "सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके ........ " हे त्रम्बिके, नारायणी सर्वांचं मंगल कर. "जो जे वांछील तो ते लाहो" खरं आहे, सर्वांना सर्व काही मिळो, सर्व स्वप्न पूर्ण कर, त्या समोरच्या जोडप्याला कधीही वेगळं करू नकोस, विचार उलट सुलट कोणाबद्दलही येत असतात . ठाकुर्ली येत मी उतरतो . घरी पोहोचल्यावर आई दरवाजा उघडते , " अरे मन्या तू? इतक्या लवकर ? तब्येत बरी आहे ना? थांब पाणी आणते, बाबा सुद्धा आलेले असतात, ते सुद्धा विचारतात का रे असा दिस्तोयेस , बॉस ने झापला कि काय? मी हसतो. आई बाहेर येत म्हणते , अहो आता तो आलाय ना लवकर बरंय ना, रोज ११ वाजतात बिचाऱ्याला, मन्या तुला मस्त चहा टाकते हे पण घेतील अर्धा कप ! पोहे करू का पटकन ? बाबा पटकन पोहे आणा ना जरा खालून ,संपलेत आणि मला कॉफी ची दोन पाकीट पण आणा, आईची धावपळ बघतच बसतो, बाबा कधीच खाली सटकलेले असतात, मी हातपाय धुवून ग्यालरीत उभा राहतो, समोरची झाड केशरी उन्हात रंगलेली असतात, एका फांदीवर घरट्यात चिमणा चिमणी आणि त्यांचं पिल्लू चिवचिवाट करत असतात, . . . . . . आणि आत, मनात मुसळधार पावसाला सुरुवात झालेली असते
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
मुक्तक
जीवनमान
रेखाटन

प्रतिक्रिया द्या
18057 वाचन

💬 प्रतिसाद (76)

प्रतिक्रिया

छानच...

चिगो
Sat, 03/19/2011 - 22:27 नवीन
मस्तच लिहीलयंस स्पाऊ भाऊ... आवडेश..
  • Log in or register to post comments

वा रे वा! अतिशय सुरेख,

मेघवेडा
Sun, 03/20/2011 - 01:16 नवीन
वा रे वा! अतिशय सुरेख, प्रामाणिक मुक्तक. छान लिहिलं आहेस. असंच लिहीत राहा. :)
  • Log in or register to post comments

मस्त लेखन!

रेवती
Sun, 03/20/2011 - 02:21 नवीन
मस्त लेखन!
  • Log in or register to post comments

सर्वांचे मनापासून आभार....

स्पा
Mon, 03/21/2011 - 09:05 नवीन
सर्वांचे मनापासून आभार....
  • Log in or register to post comments

छानच रंगवल आहे मध्यमवर्गिय

जागु
Mon, 03/21/2011 - 15:27 नवीन
छानच रंगवल आहे मध्यमवर्गिय जिवन.
  • Log in or register to post comments

कं लिवलंय...कं लिवलंय!

धमाल मुलगा
Mon, 03/21/2011 - 15:50 नवीन
एकदम झक्कास रे! च्यायला, इतकं जगात भारी लिहितोस खरं, मग नेहमी का नाही लिहीत रे? :) बाकी, लेख वाचताना एक सल, एक जिद्द, एक आशा ह्यांचा सुरेख साक्षात्कार होत राहतो आहे. और भी लिख्खो स्पा! :)
  • Log in or register to post comments

सिंपली सुपर्ब... मस्त..

मराठमोळा
Mon, 03/21/2011 - 21:17 नवीन
सिंपली सुपर्ब... :) मस्त.. एकदम आवडेश.
  • Log in or register to post comments

मस्त लिहिलय....

हरिप्रिया_
Tue, 03/22/2011 - 11:44 नवीन
मस्त लिहिलय.... :)
  • Log in or register to post comments

आधी वर काढलेल्या

कवितानागेश
Fri, 07/15/2011 - 16:31 नवीन
आधी वर काढलेल्या धाग्यांपेक्षा हे मुक्तक जास्त छान आहे! :)
  • Log in or register to post comments

असच, उगीच, सहजच पण मस्त (कूल)

आत्मशून्य
Fri, 07/15/2011 - 17:14 नवीन
असच, उगीच, सहजच पण मस्त (कूल) लेखन.
  • Log in or register to post comments

स्पावड्या रॉक्स!

प्यारे१
गुरुवार, 01/09/2014 - 12:20 नवीन
स्पावड्या रॉक्स!
  • Log in or register to post comments

छान लेख !

विटेकर
गुरुवार, 01/09/2014 - 13:03 नवीन
प्यारे भौ . इतका सुंदर लेख वर काढल्याबद्दल धन्स ! अत्यंत चित्रदर्शी ! परम मूर्खामाजी मूर्ख| जो संसारीं मानी सुख |या संसारदुःखा ऐसें दुःख| आणीक नाहीं ||४०||
  • Log in or register to post comments

+१

मूकवाचक
गुरुवार, 01/09/2014 - 16:03 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विटेकर

मस्त...

शरभ
गुरुवार, 01/09/2014 - 14:29 नवीन
मस्त स्पा. लोकलचा प्रवास म्हणजे जिव्हाळ्याचा विषय. बर्याच आठ्वणींना उजाळा मिळाला. आणि लवकर निघुन घरी येई पर्यंतचा वेळ म्हणजे एकतर विचार नाहीतर झोप ! (अमंळ "शेलू"ची आठवण जाहली...)
  • Log in or register to post comments

स्पावड्याचा इतका नितांतसुम्दर

बॅटमॅन
गुरुवार, 01/09/2014 - 15:58 नवीन
स्पावड्याचा इतका नितांतसुम्दर लेख वर काढल्याबद्दल प्यारे यांना बहुत धन्यवाद!!! मस्त लेख रे. आवडेश जबराट!!!! लोकल प्रवासाचे भाग्य कधी वाट्यास आलेले नसले तरी असे वातावरण बघत गावाबाहेर सैकल ताबडवत जायचो ते दिवस आठवले....पंढरपूर रोड आणि मी व माझी सायकल. संध्याकाळची वेळ , दूरवर दिसणारा दंडोबाचा डोंगर आणि हळूहळू काळे होत जाणारे आकाश...ते सर्व मनात भरून घेत मग घरी पोहोचायचो. झोपताना पुन्हा मनात सगळं तस्संच... छ्या राव, प्री-इंटरनेट दिवसांची आठवण करून दिलीत...पुण्यात ***** किमान वीसेक किमी दूर गेल्याशिवाय निसर्गच सुरू होत नै, लै डोस्कं फिरतं :(
  • Log in or register to post comments

येस. प्री-इंटरनेट दिवस!!

कवितानागेश
गुरुवार, 01/09/2014 - 16:05 नवीन
येस. प्री-इंटरनेट दिवस!! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

ओह

स्पा
गुरुवार, 01/09/2014 - 17:51 नवीन
बरोबर दोन वर्षापूर्वी लिहिलेलं आज एकदम वर आलं प्यारे काका , आणि वल्ली धन्स :) लीमौ म्हणते तसं प्री-इंटरनेट दिवस आता सांगायला हरकत नाही , ह्या दिवशी कंपनीने हातात "हाकलपट्टी पत्र " ठेवलेलं होतं, बरोबर एक महिन्याच्या पगारासकट ( अर्थात देवाच्या कृपेने नंतर काही महिने मी अजून काम केलं तिथे ) पण आता दोन वर्षांनी आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन पूर्ण बदलला आहे प्रत्येक क्षण भरभरून जगा बस्स... जो दिवस येईल त्याकडे एक आव्हान म्हणून बघा भविष्याची काळजी करा, चिंता करू नका :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

अप्रतिम लेख!

अजया
गुरुवार, 01/09/2014 - 16:05 नवीन
ठाकुर्ली,आमचे स्टेशन...:( पावसाळे,संध्याकाळी,रोजची ६:५०ची स्लो...
  • Log in or register to post comments

जियो !...........

वेल्लाभट
गुरुवार, 01/09/2014 - 16:13 नवीन
जियो !........... काय लिहिलंयस मित्रा.....जबर्.... तुझ्या लेखनरूपी मल्हाराने आमच्या मनातही पाऊस कोसळला मित्रा.. क्लास.
  • Log in or register to post comments

विटेकर काका, +१ मूवा, बॅटमॅन

प्यारे१
गुरुवार, 01/09/2014 - 16:46 नवीन
विटेकर काका, +१ मूवा, बॅटमॅन नि इतर. आभार मानायचेच तर मा. श्री. वल्ली ह्यांचे मानावेत. खरा हक्क त्यांचा आहे. त्यांनी http://misalpav.com/node/26690 'पाऊस असा रुणझुणता' वर स्पा च्या लेखाचा दुवा दिला होता.
  • Log in or register to post comments

(No subject)

प्रचेतस
गुरुवार, 01/09/2014 - 18:43 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

पांडुब्बाचं स्व भावपूर्ण

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 01/09/2014 - 20:37 नवीन
पांडुब्बाचं स्व भावपूर्ण लेखन. :)
  • Log in or register to post comments

बेस्ट...

नाखु
Fri, 01/10/2014 - 14:17 नवीन
स्पा पेशल लिखाण.
  • Log in or register to post comments

मस्तच

Rahul D
Sun, 05/01/2016 - 19:02 नवीन
"पण साला मनात कसलं मळभ साठलंय देव जाणे, चालता चालता, विचारांचे घोडे चौखूर उधळलेले असतात. कधी कधी एखाद्या सकाळी प्रचंड ढग आकाशात गोळा होतात, सोसाट्याचा वारा सुटतो, गडगडत, विजा चमकतात पण अख्खा दिवस पाऊस काही पडत नाही,जीवाची काहिली मात्र होत राहते , तसच काहीस झालंय. भरपूर रडावस वाटतय." हे आमच्या बाबतीत होत आहे.
  • Log in or register to post comments

स्पा चांगलं लिहिता कि तुम्ही.

कॅप्टन जॅक स्पॅरो
Sun, 05/01/2016 - 19:08 नवीन
स्पा चांगलं लिहिता कि तुम्ही. तेवढं "तें"च्याकडे लक्ष दिलं असतत तर मनास मणभर संतोष जाहला असता.
  • Log in or register to post comments

स्पा यांचे सुंदर मनापासून

वैभव जाधव
Sun, 05/01/2016 - 19:22 नवीन
स्पा यांचे सुंदर मनापासून आलेले लिखाण!
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा