रात भी है कुछ भीगी भीगी
https://www.youtube.com/watch?v=KXic0pmpKcw
मान्य कि सुनिल दत्त म्हणजे राज कपूर किंवा दिलिपकुमार नाही. मात्र त्याची अभिनयाची स्वतःची एक शैली आहे. विशेषतः डाकूच्या वेषात त्याच्याइतके चपखल ते दोघेही दिसणार नाहीत असे मला वाटते. तो फेटा, तो टिळा उंच्यापुर्या सुनिलदत्तला शोभुन दिसतात. “मुझे जीने दो” मधल्या “रात भी है कुछ भीगी भीगी” मध्ये सुनिलदत्तने वहिदाला पाहुन अंतर्बाह्य पेटलेला डाकू मस्त दाखवला आहे.
वहिदाच्या नृत्यकौशल्याबद्दल वादच नाही. मात्र त्याबरोबरच अभिनयही अविस्मरणिय. या गाण्यात ती नजरेनेच बोलते. बरेचसे टाईट क्लोजअप्स घेतले आहेत. “किसको बताये कैसे बतायें” या ओळीत वहीदा हलकेच ओठ चावते. आपल्याकडे काही वेळा ही कृती इतक्या रांगडेपणाने केली जाते की ती नुसती अश्लीलच नाही तर काहीवेळा विभीत्सदेखिल वाटते.पण वहिदाने हा तोल सांभाळला आहे. शेवटी हे गाणे कोठ्यावर नाचणार्या कलावंतीणीचे आहे मात्र त्याला धसमुसळ्या तमाशाचे स्वरुप दिलेले नाही.
काही कलावंत जो काही अभिनय करतात त्याला फक्त अप्रतिम हेच विशेषण लावता येते. लीला मिश्रा, ए.के हंगल ही अशी माणसं. त्यातलीच एक मनोरमा. मालकिणीच्या भुमिकेत ती येथे दिसते. फक्त काही सेकंदात तीने चेहर्यावर लोभट आणि मिंधेपणाचा भाव अतिशय परिणामकारकरित्या दाखवला आहे. सुनिलदत्त दौलतजादा करायला सुरुवात करतो तोपर्यंत ती नम्रपणाचा आव आणत असते. मात्र त्याने पैशाची थप्पी बंदुकीच्या टोकावर ठेवताच तिचा अनुभवी चेहरा बदलतो, संशयी होतो. हे सर्व मुळातुनच पाहण्याजोगे.
जयदेवचे संगीत त्याच्या समकालिनांपेक्षा वेगळे असायचे हे येथे देखिल दिसुन येते. चाल सोपी नाही पण अतिशय गोड. त्यातुन लताचा कोवळा आवाज. तिने घेतलेल्या ताना अतिशय मधुर वाटतात. आरशासारख्या जमिनीवर वहिदाचं प्रतिबिंब पडत असताना चित्रित केलेलं गाणं मला छायाचित्रणाच्या दृष्टीनेदेखिल आवडतं.
शेवटी एक आणखि गोष्ट लक्षात येते. माणसाला उत्तेजित करण्यासाठी आयटेम साँगची गरज नाही, कपड्यांची लांबीरूंदी तर कमी करण्याची मुळीच गरज नाही. तेथे वहिदासारखी अप्सरा हवी, ते खानदानी सौंदर्य हवे, ते अभिनय कौशल्य हवं आणि तो लताचा आवाज हवा.
अतुल ठाकुर
वर्गीकरण
****
धन्यवाद :)
In reply to धन्यवाद :) by Atul Thakur
Share>>Embed>>
एका अप्रतिम गाण्याचं सुंदर विश्लेषण
मस्त! मस्त!
आपल्याला सुनील दत्त भारी आवडायचा.
अतिशय सुरेख गाणं
In reply to अतिशय सुरेख गाणं by डॉ.प्रसाद दाढे
खरंच
डॉ दाढेंशी सहमत
सुंदर !!
आभारी आहे
गाणे आवडले,रगेल सुनील दत्त