Skip to main content

रात भी है कुछ भीगी भीगी

लेखक Atul Thakur यांनी शुक्रवार, 20/12/2013 20:34 या दिवशी प्रकाशित केले.
https://www.youtube.com/watch?v=KXic0pmpKcw मान्य कि सुनिल दत्त म्हणजे राज कपूर किंवा दिलिपकुमार नाही. मात्र त्याची अभिनयाची स्वतःची एक शैली आहे. विशेषतः डाकूच्या वेषात त्याच्याइतके चपखल ते दोघेही दिसणार नाहीत असे मला वाटते. तो फेटा, तो टिळा उंच्यापुर्‍या सुनिलदत्तला शोभुन दिसतात. “मुझे जीने दो” मधल्या “रात भी है कुछ भीगी भीगी” मध्ये सुनिलदत्तने वहिदाला पाहुन अंतर्बाह्य पेटलेला डाकू मस्त दाखवला आहे. वहिदाच्या नृत्यकौशल्याबद्दल वादच नाही. मात्र त्याबरोबरच अभिनयही अविस्मरणिय. या गाण्यात ती नजरेनेच बोलते. बरेचसे टाईट क्लोजअप्स घेतले आहेत. “किसको बताये कैसे बतायें” या ओळीत वहीदा हलकेच ओठ चावते. आपल्याकडे काही वेळा ही कृती इतक्या रांगडेपणाने केली जाते की ती नुसती अश्लीलच नाही तर काहीवेळा विभीत्सदेखिल वाटते.पण वहिदाने हा तोल सांभाळला आहे. शेवटी हे गाणे कोठ्यावर नाचणार्‍या कलावंतीणीचे आहे मात्र त्याला धसमुसळ्या तमाशाचे स्वरुप दिलेले नाही. काही कलावंत जो काही अभिनय करतात त्याला फक्त अप्रतिम हेच विशेषण लावता येते. लीला मिश्रा, ए.के हंगल ही अशी माणसं. त्यातलीच एक मनोरमा. मालकिणीच्या भुमिकेत ती येथे दिसते. फक्त काही सेकंदात तीने चेहर्‍यावर लोभट आणि मिंधेपणाचा भाव अतिशय परिणामकारकरित्या दाखवला आहे. सुनिलदत्त दौलतजादा करायला सुरुवात करतो तोपर्यंत ती नम्रपणाचा आव आणत असते. मात्र त्याने पैशाची थप्पी बंदुकीच्या टोकावर ठेवताच तिचा अनुभवी चेहरा बदलतो, संशयी होतो. हे सर्व मुळातुनच पाहण्याजोगे. जयदेवचे संगीत त्याच्या समकालिनांपेक्षा वेगळे असायचे हे येथे देखिल दिसुन येते. चाल सोपी नाही पण अतिशय गोड. त्यातुन लताचा कोवळा आवाज. तिने घेतलेल्या ताना अतिशय मधुर वाटतात. आरशासारख्या जमिनीवर वहिदाचं प्रतिबिंब पडत असताना चित्रित केलेलं गाणं मला छायाचित्रणाच्या दृष्टीनेदेखिल आवडतं. शेवटी एक आणखि गोष्ट लक्षात येते. माणसाला उत्तेजित करण्यासाठी आयटेम साँगची गरज नाही, कपड्यांची लांबीरूंदी तर कमी करण्याची मुळीच गरज नाही. तेथे वहिदासारखी अप्सरा हवी, ते खानदानी सौंदर्य हवे, ते अभिनय कौशल्य हवं आणि तो लताचा आवाज हवा. अतुल ठाकुर
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 4416
प्रतिक्रिया 12

प्रतिक्रिया

आवडल .

युट्युब लि़ंक विडीयो दिसेल अशी टाकता येते काय?

In reply to by Atul Thakur

यू ट्यूब मध्ये व्हिडिओ च्या Share>>Embed>> या दुव्यातला कोड copy करून इथे सरळ paste करायचा.

एका अत्यंत आवडत्या गाण्याची तितकीच सुरेख ओळख! मात्र डाकूच्या भूमिकेत दिलीपकुमारनेही झक्कास काम केलं होतं. या पाइंटावर जरा असहमत!

आम्रपालीमधे राजकपूर किंवा दिलीपकुमारची कल्पना पण करु शकत नाहि. कसक ये दिनरात कि म्हणणार्‍या वैजयंतीमाला शेजारी सुनील दत्तच शोभुन दिसला. मेरा साया मधे पत्नि विरहात तगमगणारा सुनील नैनोमे बदरा छाए मधे कसले आर्त भाव दाखवतो चेहेर्‍यावर. वैजयंतीमालाबद्दल काय बोलावं... गाईड वारंवार बघितला त्याचं एक मुख्य कारण वहिदाच. रातभी है कुछ भिगी भिगी पण एकदम खल्लास.

" रात भी है कुछ भीगी भीगी" हे एक नितांत सुंदर गाणे आहे. ठाकूरसाहेब म्हणतात तसे हे गीत कानांबरोबर नेत्रांनादेखील सुख देते. वहिदाचे अस्सल हैदराबादी मुस्लीम सौंदर्य सुनिल दत्तबरोबर आपल्यालासुद्धा घायाळ करतं. सुनिल दत्त सोबत त्याच्या साथीदारांची (सिद्धू आणि राजेन्द्रनाथ) एक्स्प्रेशन्ससुद्धा मस्त आहेत. लताबाईंनी तर अतिशय जीव ओतून हे गाणे गायलेले आहे..विशेषकरून "होश मैं थोडी बेहोशी हैं.." ह्या ओळी तर अंगावर काटाच उभा करतात. कोरस जेव्हा "छम छम, छम छम.." म्हणत असतो तेव्हा व्हायब्राफोन आणि मेन्डोलिनच्या कॉम्बिनेशनने एक गूढ माहौल निर्माण होतो.गाण्यातली हार्मोनियमपण एकदम भाव खाणारी आहे. मोस्टली आपल्या शामराव काबळ्यांनींच वाजवली असावी. अरेंजिंग त्यांचंच वाटतंय. तबला गाण्याच्या अंगाने अन कोठ्यावरच्या मैफिलीला साजेसा कुटलाय. लताबाईंचा शेवटचा आलाप पण भन्नाट! कसं जमून गेलंय सगळं !!

In reply to by डॉ.प्रसाद दाढे

लताबाईंनी तर अतिशय जीव ओतून हे गाणे गायलेले आहे.. या चित्रपटातील संगीत जरा हटके वालं आहे. रेश्मा और शेरा तील ' तू चंदा मै चांदनी' प्रमाणेच हे जयदेव लता कॉंम्बो श्रवणीय !

सुंदर !! सुनील दत्त ने, त्याच्या थंड डोळे , अजुन खुनशी दिसावेत म्हणुन का़जळ लावले आहे बहुधा :)

गाणे आवडले,रगेल सुनील दत्त ,आणि वहिदाची आदाकरी भावली, आशीच अदाकारी आसलेले तिसरी कसम सिनेमातले '' यही खाइश है तुम मुझको देखा करो'' गाने आठ्वले , मुबारक बेगमचा आवाज ,वहिदा आणि तिच्या सहकलाकरचा नाच पाहण्या सारखा आहे, इथे ती लिंक टाकून बघतो ,नाहीतर ट्यूब नळी वर आहेच http://youtu.be/T5w3D9KTWa4