दिवाळी आली की मारवाडी रेशनच्या दुकानासमोर एक पलंग टाकतो, पलंगावर एक सतरंजी, काही फळांची रिकामी झालेली लाकडी खोकी खाली-वर पायर्यांसारखी चढण करुन विक्रीसाठी फटाक्याची रास लावतो. संध्याकाळी सात साडे-सातच्या सुमारास लक्ष्मीपुजनाचा तो दिवस, सगळी दुनिया सजलेली असते, सजवलेली असते, सगळ्यांच्या अगांत नवीन कपडे, घरा-घरातुन फराळाचा सुगंध, कुठे धुप तर कुठे दीपमाळ, कुठे लायंटिंग तर कुठे १००० फटाक्याची लड लावलेली !! चैतन्यमय आणि प्रसन्नचित्त वातावरणामध्ये 'ती' मारवाड्याच्या दुकानापुढे उभी रहाते. ज्या एका वयात सर्वच मुली सुंदर दिसतात, त्या वयात आलेली, सावळा रंग, पाढर्या शुभ्र डोळ्यांमध्ये काळी-भोर बुब्बुळे आणि तितकीच लाचारी !! थोडीशी गडबडलेली, हाताची मुठ घट्ट आवळलेली असते. अंगामध्ये जुनाट, तपकिरी रंगाचा आणि मळवटलेला सलवार कुर्ता, तिच्या त्या गलिच्छ वेषभुषेमुळे, ऐन भरास आलेल्या दिवाळीत " हे काय ध्यान ?? " म्हणुन कोणाचे लक्ष जावु शकते मित्राशी बोलत असताना माझे ही जाते.
" काय पाहिजे ? " राजवाड्याच्या दरवाज्यापाशी भिकारी घुटमळताना दिसला की पहारेकरी ज्या जरबेने विचारतो तसे मारवाडी विचारतो.
" पफफ..टा...के " चाचरत ती सांगते आणि आवळलेल्या मुठीतुन शंभराची नोट काढुन देते.
" यात काय येतय ? " म्हणत मारवाडी नोट घेतो आणि कॅरीबॅग मधे जमेल तसे फटाके टाकुन देतो, तोवर इतर मंडळी कचर्याच्या ढिगार्याकडे बघावे तसे तिच्या अवताराकडे बघत असतात. कॅरीबॅग घेवुन ती निघुन जाते.
तासाभराने, माझं काम संपवुन मी घराकडे निघतो. चालताना रस्त्यावर फटाके फोडणार्या , नवीन कपडे अंगावर असलेल्या साधारण दहा-एक वर्षाच्या मुलाकडे माझे लक्ष जाते, लक्ष जाते ते मुळात त्याच्या हिरमुसल्या आवाजाने, फटाके फुसके निघाल्याचा राग दर्शवणार वाक्य त्याच्या तोंडुन बाहेर निघत असते, मघाशी दिसलेले 'ते' ध्यान त्याची समजुत काढायचा प्रयत्न करीत असते, मागे एक पत्र्याची दहा बाय दहा ची खोली असते. आत एकुलता एक बल्ब असतो, दोन पणत्या दिसतात आणि त्याच दरवाज्यामध्ये एक स्त्री असते, गळ्यात फक्त काळी पोत असते, तिच्याही अंगामध्ये जुनी, जीर्ण झालेली मळवटलेली साडी असते. दरवाज्याशेजारी सायकल असते, त्या सायकल ला टेकुन एक पुरूष उभा असतो, तो टॉवेलवरच असतो, तिघांच्या ही चेहर्यावर त्या फटाके फोडणार्या मुलाविषयी कौतुकास्पद भाव असतो.
दुसर्या दिवशी साधारंण ११ च्या सुमारास मी फर्नीचरच काम करणार्या एका मित्राला घेवुन दुसर्या मित्राच्या घरी जातो, ज्याच्या घरी फर्नीचरचे काम आहे, तो खुप उच्चभ्रु सोसायटीत रहातो, जाताना सिक्युरिटितुन फोन करुन परवानगी घ्यावी लागते, सिक्युरिटी मध्ये ईन्ट्री करावी लागते, मित्राच्या त्या तीन बिएचके च्या हॉलमध्ये, मधोमध, एक छोटासा रंगीत फाऊन्टन आहे, मला छान वाटते, थोडी जळजळ ही होते. कामाचे फायनल करत असताना, आतल्या खोलीतुन " अरे, दहा हजाराचे फटाके आणलेत, पण हा फोडतच नाही " अस, बहुधा, फोनवर चाललेल्या संभाषणातुन, एक वाक्य कानावर पडते, लक्षात रहाते. काम फिक्स करुन आम्ही लिफ्ट धरतो, दहाव्या मजल्यावरून खाली येताना सातव्या मजल्यावर लिफ्ट थांबते, पुन्हा तेच 'ध्यान' त्याच अवतारात लिफ्ट मध्ये शिरते, आजही हातामध्ये कॅरीबॅग असते, पण त्यात उरलेली भाजी आणि पुर्या दिसत आहेत. भातही त्यामध्ये मिसळलेला असतो, तिचा लपवण्याचा प्रयत्न चालु असतो, त्या वासाने माझी ही भुक चाळवते, माझा मित्र मात्र लिफ्टमधल्या आरश्यातुन तिच्या छातीच्या उभाराकडे बघत असतो. मी चमकतो, कालच्या नजरा कचर्याचा ढिगार्याकडे बघणार्या, आजची नजर उत्तेजित करणारी, नैसर्गिक की अनैसर्गिक, मला समजत नाही. लिफ्ट पुन्हा दुसर्या मजल्यावर थांबते. माझा चेहरा त्रस्त होतो, पण माझ्या पेक्षाही कैकपटीने त्रस्त चेहरा करुन एक सोन्या-नाण्यांनी लदबदलेली स्त्री लिफ्ट मधुन हिच्याकडे बघत असते, ही हातातली कॅरीबॅग पुन्हा लपवायचा आटापिटा करते.
" तुला ९ वाजता बोलावले होते ना, कालचे सगळे जेवणा-खावणाचे भांडे तसेच पडलेत "
" ते आईची तब्येत बरी नव्हती काल " केविलवाण्या स्वरात ही म्हणते.
" हम्म महिन्यातले २५ दिवस तेच एकते मी, जा आता ! सगळ काम आवरुन घे " फटकार्या आवाजात, चावी हातात देत तो भव्य दिव्य स्त्री-देह आत शिरतो आणि ही लिफ्टमधुन बाहेर.पडते.
त्या नंतरचा भाउबीजेचा दिवस सुरु होतो तोच मुळात लगबगीने, एकुलती एक बहीण घरी येणार आहे म्हणुन माझ्या घरात सकाळपासुन गाजावाजा चालु असतो. तिला ओवाळ्णी म्हणुन द्यायच गिफ्ट घेवुन मी परत येत असताना एका कार मधुन माझ्या नावाची आरोळी कानी पडते, त्या आरोळीच्या जनकासाठी, त्या मित्रासाठी बाईक थांबवावी लागते, कारमध्ये स्त्री-पुरुषांचा मेळावा भरलेला असतो. अगंठ्याच्या सोनेरी भडकपणा आणि मेक-अप मुळे माझ्या डोळ्यावर कोणीतरी १००० चा हॅलोजन मारतोय असा मला भास होतो.
"अरे, बहिणीसाठी सोनं घ्यायला गेलो होतो " मित्राचा प्रदर्शन करण्याचा मुड स्पष्ट दिसतो.
" काय आणल ? " तितक्याच रसहीन आवाजात मी विचारतो.
" हे दिड लाखाच्या बांगड्या केल्या " माझं तिथे लक्ष नसते. " चल, हॅप्पी दिवाली " करुन मित्र जातो. बाईक ला किक मारायच्या आधी माझे समोर लक्ष जाते. त्याच मित्राचं बिल्डिंग कन्ट्रक्शन चालु असते, आजच्या दिवशी ही चार-पाच मजुर काम करत असताना दिसतात, परवा सायकलला टेकु करुन उभा असलेला काटक पुरुष उचलत नसतानाही कमरेला झटका देवुन हाताने घन वर पर्यंत उचलुन शिगेवर धरलेल्या पाचरीवर दणकावत असतो. वातावरणात ती ऑक्टोबर का नोव्हेंबर हिट म्हणतात तशी गर्मी असते, त्याच्या चेहरा घामाने ओला झालेला असतो, तो पुसायला ही वेळ नसतो, न्युटन च्या नियमाप्रमाणे होणारी गतिमान अवस्थेत होणारी ती कृती अखंड चालु असते.
त्या पुरुषाची नजर मात्र समोर असते, समोर त्या दिवशी दरवाज्यापाशी उभी असलेली स्त्री, आज एका शुभ्र कपडे घातलेल्या, खुर्चीवर बसलेल्या एका पुरुषासमोर उभी असते, आज साडीवर मळवटलेला शर्ट असतो, त्याची बटण धड नसतात, एका हातात घमेल आहे, साडीचा पदर एका हाताने सारखा-सारखा ठीक करावा लागतो आहे. बसलेल्या पुरुषाची नजर स्थिर दिसत नाही. मला आठवते की हा बसलेला ईसम मला नुकत्याच भेटलेल्या मित्राचा धाकटा आहे, त्याचा हात खिशात जातो. काही नोटा निघुन तिच्या हाता दिल्या जातात. देताना त्याचा हाताला स्पर्शाचा हव्यास आहे असे वाटते. मी बाईकवरून घरी सटकतो. संध्याकाळी बहीणीला सोडवुन परतताना त्या घराकडे नजर जाते, ओवाळणी चालु असलेले चित्र दिसते, ताटामध्ये सकाळच्या (असाव्यात) नोटा दिसतात. थोडा आनंदित आणि थोडा हिरमुसलेल्या चेहर्याने 'ती' ओवाळत असते.शेजारी ते जोडपे त्या दोघांकडे पुन्हा कौतुकाने बघत असते.
शनिवारचा दिवस येतो. मला संध्याकाळचं दुसर्या गावातल्या मंडळाच्या पार्टीच आमत्रंण असते, अर्थात कॉकटेल डिनर !! कारनेच जायचे-यायचे असल्याने मी ठरविलेल्या ठिकाणापर्यंत चालत निघतो. माझ्या पुढ्यात तो पुरुष आणि त्याचा एक मित्र चालत असतात.
" चलायच का ? " मित्र विचारतो.
" आज नको , घरात पैशे लागताहेत "
" मी भरतो ना आज , तुमच्यासाठी कायपन, गावावरून आल्यावर भिकच मागायचा राहिलो होतो मी, आपल्याला ही लाईन तु शिकवली, पुढल्या वेळेला हवं तु भर !! "
दोघांचा रस्ता बदलतो, त्यां दोघांचा देशी च्या दुकानाकडे जाणारा, माझा त्याच्या त्या पत्र्याच्या घरापासुन जातो, तिथे 'ती' दरवाज्यात उभी असते, स्त्री मात्र दरवाज्याच्या पुढ्यात, दोन्ही हात हनुवटीवर ठेवुन बसलेली असते, दहा वर्षांच पोर डोळे लुकलुक करत आईच्या मांडीला रेटुन बसलेले असते, तिघांच्या डोळ्यांना वाट बघण्याची शिक्षा झालेली असते. मी पुढे जातो...तिकडे पार्टीत माझा मित्र " घे ना राव !! खास तुझ्यासाठी शिवास रिगल मागविली आहे, तुमच्यासाठी काय पन " मी आश्चर्याने त्याच्याकडे बघतो.
दिवाळी नंतरचे दोन दिवस सरतात. धुरकट वातावरण, फटाक्यांचे आवाज, अरबट-चरबट-तेलकट-गोड खा़णं आणि खंडीभर पाहुण्यांनी मेटाकुटीला आलेला माझा जीव लवकर झोपी जातो, आणि त्याच मुळे कधी नव्हे ते पहाटे जाग येते, थोडी शुध्द हवा खावी म्हणुन मी बाहेर पडतो. वातावरण थंड असल्याने आणि स्टाईल मारावी म्हणुन, भावाने युएस वरून डॉलर मोजुन आणलेले जॅकेट घालतो. थोड अतंर चालुन गेल्यावर मला तेच 'स्त्री आणि पुरुष' दिसतात, पुरुषाच्या हातात सायकल असते, सायकल ला डबा लावलेला असतो, त्यांच्या मागुन 'ती' चालत असते, 'ती' ने त्या दहा वर्षाच्या पोराचे बोट धरलेले असते, तिची वेषभुषा तशीच असते, पण त्या दहा वर्षाच्या पोराच्या अंगावर कार्पोरेशनच्या शाळेचा युनिफॉर्म असतो. पाठीला बॅग असते. खुप स्मार्ट दिसत असतो. शेजारून एक कार हॉर्न मारत जाते.
" ताई, मी तुला एक दिवस कार मध्ये फिरवणार "
तिच्या चेहर्यावर हास्य पसरते, सुर्य उगवत असतो, आशेची किरणं मनाचा ताबा घेत असतात, चौकामध्ये सगळ्याचे रस्ते बदलतात, पोरग समोरच्या शाळेत शिरत, 'ती' उच्चभ्रु सोसायटीला जाणार्या रस्त्याकडे जाते, पुरुष आणि स्त्री सायकलवर कामगार कट्ट्याकडे जातात, मी चौकातल्या टपरीवर येतो. टपरीवर ओळखीचे काका भेटतात, ते त्यांच्या घरात पोट कमी करायचा बहाणा करून, जॉगींग च्या निमीत्ताने बाहेर निघालेले असतात, आमचे वजनदार काका इडलीची तिसरी प्लेट मागवितात.... नेहमीचचं !!!
वाचने
10032
प्रतिक्रिया
48
मिसळपाव
प्रतिक्रिया
वाश्याचं लिखाण म्हणजे भिडणारं
हेच म्हणतो...
In reply to वाश्याचं लिखाण म्हणजे भिडणारं by प्यारे१
+१
In reply to हेच म्हणतो... by टिवटिव
हेच . . दुसरे शब्द नाहीत
In reply to +१ by बहुगुणी
+ १ नेहमीसारखंच लिहीलंय
In reply to हेच . . दुसरे शब्द नाहीत by अद्द्या
काय बोलू?
छान लेख. खूप दिवसांनी काहीतरी
वांझोटी इच्छा
चांगल उतरवलय
नेहमीचंच असलं तरी चटका
जितका सणसणीत लेख तितकाच दमदार
In reply to नेहमीचंच असलं तरी चटका by नगरीनिरंजन
डिस्पॅरीटी इन्डेक्स
(No subject)
हेही एक जग - आणि त्याकडे
+१
In reply to हेही एक जग - आणि त्याकडे by आतिवास
+२
In reply to +१ by किसन शिंदे
थंडी सारखं
जबरदस्त!
खूप संवेदनशील, गंभीर करणारं
वाश्या नेहमीच असं का रे?
सून्न.......
वाश्या नेहमीच सुन्न करणारं
.
सुहासचे लेख वाचले की मनात
सुखांत हि आवडला.
खरं वास्तव तर हेच आहे सध्या
__/\__
जोर का झट्का जोरसेच लगा
(No subject)
In reply to जोर का झट्का जोरसेच लगा by वैशाली माने
.
अप्रतिम लेखन !
:(
लेख आवडला
मनाला खुप चटका लावला. आपण खुप
नेहमीचंच!
हम्म्म!
लेखनाची स्टाईल आवडली.
>>भावाने मेजवानीला
In reply to लेखनाची स्टाईल आवडली. by सस्नेह
बर्याचदा आमंत्रण
In reply to >>भावाने मेजवानीला by सूड
अतिशय कौतुकास्पद मांडणी
:)
सद्ध्या वाचनाची मनस्थिती
सुहास खुप छान लिहले आहेस
खरं तर याला काय प्रतिसाद
ग्रेट,च्यायला ...... हे कस
लेख भारीच आहे... पण त्या
वाचून अस्वस्थ झाले...
युही आप लिखते हो , दर्द को