Skip to main content

बाबासाहेबांना विनम्र अभिवादन

लेखक सचीन
शुक्रवार, 06/12/2013 या दिवशी प्रकाशित केले.
गुलामाला त्याच्या गुलामगिरीची जाणीव करून द्या म्हणजे तो बंड करून उठेल. शतकानु शतके धर्माच्या नावाखाली निर्दयी समाजाचा जुलूम अत्याचार सोसणाऱ्या कोट्यावधी अस्पृश समाजाला त्यातून बाहेर काढून मानाचे स्थान देणाऱ्या ह्या खऱ्याखुऱ्या भारताच्या रत्नास त्रिवार अभिवादन.भारतभूमीत धर्माच्या नावाखाली कोट्यावधी लोकांना जनावरासारखे वागवले जात असे त्यांना वाळीत टाकले जात असे त्यांना शिवणे म्हणजे विटाळ झाला असे मानले जात असे. लोक गोमुत्र पीत पण त्यांच्यासारख्याच हाडामासाच्या असलेल्या दलिताच्या हातचे शुद्ध पाणी त्यांना चालत नसे. गावातले तळे नदी ह्यावर जनावर पाणी पिल तरी कोणाची काही हरकत नसे. मात्र अस्पृश्य पाणी पिला तर मात्र चालत नसे. थोडक्यात त्यांची समाजात इज्जत हि जनावरापेक्षा कमी होती. शतकानु शतके हि परिस्तिथी सुरु होती. देव,धर्म मानणाऱ्या, रूढी परंपरा जपणाऱ्या अस्पृशांच्या जीवनात काडीचाही फरक पडत नव्हता.ज्या देवाला ते भजत त्याचे गुणगान करत पण ह्यांची परिस्तिथी मात्र जैसे थे होती.समाजातील अमानवी रुढींचा बळी हा समाज होता. अशा सामाजिक परीस्तिथीत दलितांचे उद्धारकर्ता भीमराव रामजी आंबेडकर १८९१ मध्ये जन्मास आले. बाबासाहेबांचा जन्म १८९१ चा नि मृत्यू १९५६ चा म्हणजे ६५ वर्षाचे आयुष्य त्यांना लाभले. तिसाव्या वर्षापासून ते सामाजिक जीवनात सक्रीय झाले म्हणजेच अवघ्या ३५ वर्षात समाजातील अस्पृश्यता दूर करण्याचा भीमपराक्रम त्यांनी केला. धर्मग्रंथावर चालणारी मनुची व्यवस्था बदलून स्वातंत्र्य, समता, बंधुत्व ह्यांचा संदेश देणारी धर्मनिरपेक्ष राज्य घटना त्यांनी व त्यांच्या सहकारयांनी तयार केली. व नव्या भारताचा उदय झाला. अस्पृश्यता आजही आहे मात्र वेगळ्या स्वरुपात. पूर्वीचे तिचे उघडे-नागडे स्वरूप बदलून आता ती छुप्या रीतीने आजही पाळली जाते. आजही ह्या समाजात खैरलांजी प्रकरण घडते,गावो गावी अत्याचार होतात, बाबासाहेबांचे नाव एखाद्या विद्यापीठाला द्यायचे झाले कि दंगे होतात. ह्या अशा दंग्यामधुनच माणसाचे खरे स्वरूप कळत असते.आपण इतके उच्च शिक्षित असूनही आपल्याला हा समाज अशी वागणूक देतो तर गावोगावच्या आपल्या अडाणी बांधवांवर किती अत्याचार होत असतील हि भावना बाबासाहेबांना निराश करत असे. बाबासाहेबांनी जेव्हा अस्पृश्यता निवारण्याच्या चळवळीला प्रारंभ केला तेव्हा पासून हिंदू समाजात ते अत्यंत अप्रिय ठरले. एकीकडे स्वातंत्र्य लढा जोमात सुरु होता महात्माजी त्याचे नेतृत्व करत होते हा लढा इंग्रजा विरुद्ध असल्यानं अख्खा देश त्यांच्या पाठीशी होता.संपूर्ण देशाचा त्यांना पाठींबा होता मात्र बाबासाहेबांचा लढा हा आपल्याच देशातील लोकांविरुद्ध होता. त्यामुळे ते बहुजन समाजात अप्रिय ठरत. स्वताची गुलामगिरी नष्ट व्हावी म्हणून इंग्रजाविरुद्ध लढणारे लोक स्वताच्या समाजातील एका मोठ्या लोकसमूहाला मात्र गुलामगिरीत ठेवू इच्छित होते हा विरोधाभास नव्हता का? नैतिकतेच्या पातळीवर दुसर्यांना गुलामगिरित ठेवून स्वताच्या स्वातंत्र्यासाठी लढणे हे योग्य ठरेल का? नेमका हाच प्रश्न बाबासाहेबांनी उचलला. इंग्रजांच्या काळात दलित समाजाला थोडे बरे दिवस आले होते त्यांना काही प्रमाणात का होईना शिक्षण मिळत होते, लष्करात नोकरीची संधी मिळत होती. परंतु जातीयवाद, शिवाशिव, सार्वजनिक पाणवठ्यावर पाणी पिण्यास मनाई, देवळात प्रवेश करण्यास मनाई असले प्रकार कमी होत नव्हते.परकीय लोकांच्या हातात देश असतानाही आपल्या समाजाचे हे हाल तर उद्या ब्रिटीश गेल्यावर आपल्या समाजावरील अत्याचार कोणत्या थराला जाईल ह्याची बाबासाहेबांना चिंता होती. त्यामुळे ब्रिटीश सरकार असतानाच त्यांनी आपला लढा तीव्र केला. महात्मा गांधीना त्यांनी प्रश्न केला कि स्वतंत्र भारतात आमचे स्थान काय असणार. एकीकडे महात्माजी हे अस्पृश्य हे हिंदू समाजाचे अभिन्न अंग आहे असे सांगत तर दुसरीकडे अस्पृश्यांना हिंदूंच्या देवळात प्रवेश नव्हता. सार्वजनिक पाणवठ्यावर त्यांना पाणी पिण्याचा हक्क नव्हता. बाबासाहेबांनी पहिले काम हे केले कि मनाने मेलेल्या समाजाच्या मनात क्रांतीचे, बंडाचे बीज जागृत केले. "असे जगणे जगण्यापेक्षा आपल्या आईच्या पोटातच तुम्ही का नाही मरून गेलात?" "१०० वर्षे शेळी सारखे जगण्यापेक्षा १ दिवस वाघासारखे जगा" हे बाबासाहेबांचे जळजळीत उद्गार दलित जनतेच्या मनात क्रांतीचा अंगार फुलवत होते. आणि शेवटी ठिणगी उडाली बाबासाहेबांच्या नेतृत्वाखाली माणुसकी मिळवण्याचा, माणूस म्हणून जगण्याचा हक्क मिळवण्याचा एक महासंग्राम सुरु झाला ज्याला जगाच्या इतिहासात तोड नाही. मुर्दाड मने झालेल्या दलितांना बाबासाहेबांसारखा अजोड सेनापती लाभला नि एक घमासान युद्ध सुरु झाले आपल्याच देशबांधवा विरुद्ध जे स्वताला जन्माने श्रेष्ठ समजत होते. एक पक्ष माणुसकीच्या हक्कासाठी लढत होता तर एक पक्ष धर्माचे दाखले देत अन्यायाचे समर्थन करत होता. हा लढा काही संपत्ती किंवा सत्ता मिळवण्याचा नव्हता तर माणुसकीचे हक्क मिळवण्याचा होता.निसगार्चे स्तोत्र पाणी ह्यावर आपलाही अधिकार आहे हे सिद्ध करण्यासाठी दलितांना पाणी पिण्याचा हक्क मिळावा म्हणून लढावे लागले हि जगातल्या इतिहासातातील एकमेव घटना असावी. शतकानु शतके अस्पृश्तेची रूढी सुरळीत चालू होती ती पाळणे हा उच्चवर्णीय आपला हक्क समजत होते तर आपण खालच्या जातीत जन्माला आलोय उच्चवर्णीयांच्या लाथा खाणे हा आपला जन्मसिद्ध अधिकारच आहे, परम कर्तव्य आहे असे दलित समजत होते. ह्या सर्वाना तडाखा दिला बाबासाहेबांनी. इतके दिवस अस्पृश्यता पाळणे हा आपला हक्कच आहे ह्या भ्रमात असणाऱ्या समाजाला बाबासाहेबांच्या चळवळीने धक्काच बसला. आता उघड अस्पृश्यता पाळणे आपल्या हिताचे नाही आपल्यालाही प्रतिकार होवू शकतो हि जाणीव त्यांना झाली. बाबासाहेब आंबेडकर हे फक्त एक नाव नाही तर ते आहे अन्यायाविरुद्ध बंड करण्याची शक्ती. शतकानु शतकाच्या जाती भेदाला काळाने दिलेले चोख उत्तर म्हणजे आंबेडकर. अन्यायाविरुद्ध मान न झुकवता प्रतिकार करणारा प्रत्येक जण हा आपल्यात एक आंबेडकर घेवून वावरत असतो मग तो मालकाच्या अन्याविरुद्ध उभा ठाकलेला नोकर असो, शासनाच्या अन्याया विरुद्ध उभी ठाकलेली जनता असो तिच्यात आंबेडकरी अंश असतोच. जेथे जेथे अन्याय अत्याचार असतो तेथे होणारे बंड म्हणजे आंबेडकर. आंबेडकर नावाची एक व्यक्ती इतिहासात होवून गेली पण आपल्या भावी पिढ्यांसाठी एक अनमोल ठेव ठेवून गेली ती म्हणजे प्रेरणा. अन्यायाविरुद्ध शरण न जाता लढण्याची प्रेरणा. आज साऱ्या जगात बाबासाहेबांचे नाव आहे त्यांच्या नावाने अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठातील विधी विद्यालयात अध्यासन स्थापन करण्यात आले आहे.. विद्यापीठाने निवडलेल्या जगभरातील शंभर विद्वानांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर बाबासाहेबांची निवड झाली. अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्या हस्ते कोलंबिया विद्यापीठात बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचं समारंभपूर्वक अनावरण करण्यात आलं. अमेरिकेतल्या कोलंबिया विद्यापीठाने डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा आगळा वेगळा सन्मान केला. विद्यापीठाने जगभरातल्या 100 विद्वानांची यादी केली आणि या यादीत पहिलं नाव होतं डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचं… विशेष म्हणजे या यादीत ते एकमेव भारतीय नाव आहे. त्यानंतर विद्यापीठाच्या स्कूल ऑफ इंटरनॅशनल अँण्ड पब्लिक अफेअरच्या हॉलमध्ये बाबासाहेबांचं पेंटिंग मोठ्या दिमाखात लावण्यात आलं. बाबासाहेबांचा लढा हा फक्त एक लढा नसून मानवमुक्तीचे प्रतिक ठरला आहे. आजही दलित समाजावर अत्याचार होतो त्यांच्या झोपड्या पेटवल्या जातात. झोपड्यातून येणाऱ्या स्त्रियांच्या, लहान मुलांच्या किंकाळ्या थांबलेल्या नाहीत पण कितीही अत्याचार अन्याय झाले तरी ते सहन न करता त्याविरुद्ध लढा देणे बंड करणे हि आंबेडकरी शिकवण दलित जनता विसरणार नाही. दलित जनतेची बाबासाहेबावर अमाप भक्ती आहे, प्रेम आहे, आदर आहे असे का? तो काही कोणी नवसाला पावणारा देव नाही कि सर्व दुखः दूर करण्याची हमी देणाराकोणी बुवा नाही. पण तो आहे मुकाट्याने अन्याय सहन करणाऱ्या समाजात क्रांतीची ज्वाला पेटवणारा युगपुरुष. पिढ्यान पिढ्या गुलामीत राहण्याची सवय झालेल्या समाजाला स्वतंत्रता देणारा महामानव. त्यामुळे असंख्य कार्यकर्त्यांची आपल्या ह्या उद्धारकर्त्याबद्दल एकच भावना असते ती म्हणजे ‘मेरे तन मे हे भीम मेरे मन मे हे भीम अगर मर जावू तो कफ़न पे लिख देना जयभीम जय भीम’. बाबासाहेबांना सादर प्रणाम तुम्ही पेटवलेली क्रांतीची मशाल आम्ही विझून देणार नाही. जयभीम.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 3830
प्रतिक्रिया 18

प्रतिक्रिया

गेल्या साठ वर्षात आम्ही गुलामीचेच आयुष्य नव्याने जगत आहोत. एकवीस टक्के मते मिळविलेला माणूस आमचा नेता होतो व शंभर टक्यांचे भवितव्य ठरवितो. अशा अजब लोकशाहीने जनता मूठभर राजकारण्यांची गुलाम झाली आहे. पाच वर्षातून एकदा मतदान करायचा अधिकार तो सुद्धा वरील पद्धतीने. आपली लोकशाहीच मुळात सत्ताधारी व विरोधी पक्ष अशी विभागून उभी राहिली आहे. पर्यायी पक्ष असे त्यास नाव का असू नये? विरोधी पक्ष हे घातक नाव कशासाठी ? दोन भावात एकाने घर चालवायचे असेल तर दुसरा भाउ विरोधी असतो काय? निवडणूक म्हणजे क्रिकेटचा सामना असतो काय ? एक जि़ंकला की बाकीच्यांना मत देणार्‍यांचा मताला काहीच किंमत नाही ? मग ते ७० टक्के का असेनात ! म्हणून कायदा करण्याच्या प्रक्रियेत सगळ्यानाच ( हरणार्‍याना देखील) सामील करावयाचे असेल तर proportionate voting power मिळाली पाहिजे तरच कायद्यामध्य लोकांच्या आकांक्षेचे खरे प्रतिविंब दिसेल ! बाबासाहेब त्यासाठी पुन्हा जन्म आपणच घ्यावा ही सादर विनंति !

In reply to by चौकटराजा

चौरा मस्तच ! लोकशाहीतील त्रुटी बरोब्बर मांडली आहे. घटनाकारांनी घटना लिहिलि तेव्हा चे राजाकारणी इतके हलकट नव्हते , निवड्णूका फेअर होत्या . नंतरच्या कॉग्रेसी राजाकारणाने लोकशाहीचे मातेरे केले. बाबासाहेबांनी जन्माला यावे नपेक्षा ,भरातातील लोक अधिक प्रबुद्ध व्हावेत , जाणते व्हावेत आणि प्रजासत्ताक आचंद्रसुर्य नांदो अशी प्रार्थना करीन. दरवेळी महात्मा जन्माला येईल आणि या मेंढरांना हाकलून धक्क्याला लावेल .. ये नही चलेगा ! औषध रोगापुरते नाहीतर औषढानेच समाजपुरुषाचे शरीर पोखरले जाते.. . आणि मग क्रांतीसारखी प्रतिजैविके .. जी कधी कधी हानीही करतात ! निरामय समाज पुरूष या राष्ट्राच्या नशिबातच नाही का ?

In reply to by विटेकर

लोकशाहीतील त्रुटी बरोब्बर मांडली आहे. पूर्वीच्या राजेशाहीत संस्थानशाहीतही हेच होत होतं .

In reply to by उद्दाम

आलात ? उत्तम , अपेक्षितच होत. पण तुमचा आक्षेप खालील वाक्याला असायला हवा. नंतरच्या कॉग्रेसी राजाकारणाने लोकशाहीचे मातेरे केले. असो. इथे वाद नको. "भारतीय राजकारणातील/ लोकशाहीतील काँग्रेसचे योगदान" असा धागा काढा. तिथे बोलू.

महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र श्रद्धांजली. आजच द आफ्रिकेचे महामानव नेल्सन मंडेला यांचे देहावसान व्हावे आणि दोन्ही युगपुरुषांचा महापरिनिर्वाण दिन एकच व्हावा हा नियतीचा कसला खेळ ? मंडेला यांनाही विनम्र श्रद्धांजली

नमस्कार

आंबेडकरांसारखे अलौकीक व्यक्तीत्व एकदाच जन्म घेते ...यालाच धर्मात अवतार असे संबोधत असावेत.बाबासाहेब आधुनिक बुद्धच होते.. जय भीम!

अवतार जर समाजाच्या उत्थानाचं कार्य करत असतील तर प पू डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अवतार म्हणावं लागेल. मात्र निव्वळ जयजयकार करुन आपलं कर्तव्य संपलं असं आपण सामान्य नि अनुयायी दोघेही आजच्या वाईट परिस्थितीला तेवढेच जबाबदार ठरणार आहोत. (हे सगळ्या समाजप्रवर्तक, सुधारक नि नेत्यांच्या बाबत लागू आहे.) समयोचित लेख नि आढावा. (सगळंच मान्य नाही मात्र ही वाद घालण्याची जागा नाही.) चौकटराजांचा प्रतिसाद देखील चिंतनीय आहे. महापरिनिर्वाणदिनानिमित्त मानवंदना!

वैचारिक वारशाची कसोटी..हा आजचा लोकसत्तामधील महापारीनिर्वान दिनाबाद्दलचा लेख . युरोपातही बाबासाहेबांचे नाव गाजत आहे त्यांच्या नावाची संघटना आहे. हा त्यांच्या विचारांचा प्रभाव आहे. http://www.loksatta.com/vishesh-news/mahaparinirvana-day-of-dr-b-r-ambed...

--^--

विनम्र श्रद्धांजली एकच साहेब बाबासाहेब बाबासाहेब बाबासाहेब बाबासाहेब...........

खरं तर असं श्रद्धांजली करणं मला पटत नाहि. श्रद्धांजली मृत व्यक्तीसाठी असते ना (बहुतेक)... बाबासाहेब केवळ एक विचार नव्हते, एक शरीर तर नव्हतेच नव्हते... ते एका मूलभूत समस्येचं तेव्हढंच सखोल समाधान मिळवण्याचा धाडसी प्रयत्न होते. जोवर हि समस्या आहे तोवर बाबासाहेब काळाच्या पडद्याआड जाऊ शकत नाहित.

__/\__