✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

THANK YOU शेतकरी दादा!

र
रामबाण यांनी
Wed, 11/27/2013 - 12:36  ·  लेख
लेख
काही वर्षांपूर्वी नेटवर असंच भटकत असताना Thank a farmer (TAF) बद्दल वाचनात आलं. अमेरिकेतला एक शेतकरी १५५ लोकांची भूक भागेल एवढं अन्न पिकवतो म्हणे; त्या शेतकऱ्यांचे मोठे ऋण आपल्यावर आहे, त्यांचे आभार मानायलाच हवे; असं अगदी लहानपणापासून तिथे बिंबवलं जातं. यासाठी thank a farmer day सारख्या संकल्पना पुढं येतात. त्याला शाळेपासून ते कार्पोरेट जगतापर्यंत, समाजाच्या प्रत्येक घटकाचा चांगला प्रतिसादही मिळतो. Have u thanked a farmer today? असं तिथं विचारलं जातं. राष्ट्राध्यक्ष बराक ओबामांनीही शेतकरी आणि ग्राहक यांच्यातली दरी दूर करण्यासाठी KNOW YOUR FARMER, KNOW YOUR FOOD (KYF2)ही योजना सुरु केली. हे सगळं वाचताना वाटलं... आपल्याकडेही शेतकरी आणि ग्राहक यांच्यात फार मोठी दरी आहे. फक्त कांद्याचे किंवा दूध- साखरेचे भाव थोडेसे वाढले की शेतकरीनामक कोण्या खलनायकाचं हे काम आहे असं शहरी ग्राहकांना ठामपणे वाटतं. यापलिकडे शेतकऱ्याचा आणि आपला काही संबंध आहे हे आपण मानायलाच तयार नसतो. आपण जे खातो ते मॉलमधून येतं किंवा आपल्या घरी दूध येतं ते भैय्यामुळेच; असं बऱ्याच शहरी मुलांना आजही वाटतं. मॉलच्या चकाचक रॅकवर दिसणारा गहू-तांदूळ-दूध-भाजीपाला आपोआप येत नाही, यासाठी ऊन-वारा-पावसाची तमा न करता, निसर्गापासून ते राजकारणी, दलालांपर्यंत अनंत अडचणींशी सामना करत, शेतकरी नावाचा उपेक्षित जीव कुठेतरी दोन-चारशे किलोमीटरवर शेतात राबत असतो हे त्यांना कळणार कसं? अन्नदाता सुखी भवइथेच आपण प्रत्येकजण महत्वाचा रोल निभावू शकतो. शेतकऱ्याच्या कष्टाची जाणीव ठेवून ती नव्या पिढीपर्यंत पोचेल याची काळजी आपल्यालाच घ्यायला हवी. बियाणं वेळेवर मिळत नाही, खतं वेळेवर मिळत नाही, मजूरांची समस्या वेगळीच, कुठुन तरी कर्ज मिळवायचं, शेतात काहीतरी पेरायचं, पाऊस त्याच्या लहरीप्रमाणेच पडतो, निसर्ग साथ देईल अशी प्रार्थना करायची, दिवस रात्र मेहनत करायची, शेवटपर्यंत पीकाची काळजी घ्यायची, चांगलं उत्पादन मिळालं तर बाजारभाव चांगला मिळेल- व्यापाऱ्यांची मेहेरनजर राहिल अशी अपेक्षा करायची. अशा आणि आणखी अनंत अडचणींवर मात करत शेतकरी जगत असतो. त्याच्या आत्महत्येच्या-मरणाच्या बातम्या आपल्यापर्यंत अधनंमधनं पोचतात पण तो जगतो कसा ते पोचतंच नाही, आपणही कधी ते जाणून घ्यायचा प्रामाणिक प्रयत्न करत नाही. अशा प्रतिकुल परिस्थितीत जो शेतकरी आपल्यासाठी अन्न पिकवतो त्याच्याबद्दल आपण कधीतरी विचार करतो का? ज्याच्यामुळे आपल्याला दोन वेळचं अन्न मिळतं त्या शेतकऱ्याचे आभार मानायचे, ही कल्पना मला त्यामुळेच खूप आवडली. तशी Thank a farmer (TAF) ही संकल्पना आपल्यासाठी नवी नाहीय,‘अन्नदाता सुखी भव’ असं म्हणत आपल्या पूर्वजांनी शेतकऱ्यांचे आभारच मानले आहेत, फक्त आपल्याला त्याचा थोडासा विसर पडत गेला इतकंच. पाश्चात्यांचं अनुकरण करायची आपल्याला सवय आहेच, आता तिकडे TAF सुरु आहे म्हटल्यावर आपल्यालाही ‘अन्नदाता सुखी भव’ म्हणजेच ASB चं महत्व कळेल अशी आशा करायला काय हरकत आहे. शहरीकरणाच्या-आधुनिकतेच्या झगमगाटात आपण ग्रामीणभागापासून- शेतकऱ्यापासून मनानं दूर गेलो आहोत. TAF म्हणा, ASB म्हणा यानं किती फरक पडेल किंवा शेतकरी-ग्राहकामधली दरी किती मिटेल माहिती नाही, पण शेतकऱ्याच्या कामाबाबत थोडी माहिती, थोडा आदर जरी येत्या पिढीच्या मनात निर्माण झाला तरी एका मोठ्या बदलाची ती सुरुवात असेल. थँक यू शेतकरी दादा आपल्याला कोणी पत्ता सांगितला किंवा पाणी दिलं तरी आपण त्याचे आभार मानतो, त्याला thank you म्हणतो. घरी आलेल्या अंकलने चॉकलेट दिलं तरी त्याला thank you म्हणायचं मुलांना शिकवलं जातं. आपल्या घरात ज्याच्यामुळे अन्नधान्य-भाजीपाला-दूधदही येतं त्या शेतकऱ्याचे आभार मानायला काय हरकत आहे. त्याच्यापर्यंत तुमचा आवाज नाही पोचणार कदाचित, पण तुमच्या शुभेच्छा-आशिर्वादाचे तरंग नक्की पोचतील. मग आज माननार शेतकऱयाचे आभार? म्हणणार ना THANK YOU शेतकरी दादा?
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
समाज
जीवनमान
लेखनप्रकार (Writing Type)
विचार
सद्भावना

प्रतिक्रिया द्या
4171 वाचन

💬 प्रतिसाद (12)

प्रतिक्रिया

THANK YOU .

जेपी
Wed, 11/27/2013 - 12:53 नवीन
आवडल . काही देशात आभारप्रर्दशन दिवस ' असतो . आपल्या कडे नाही . एक चांगला उपक्रम होईल .
  • Log in or register to post comments

गूड वन

कपिलमुनी
Wed, 11/27/2013 - 13:33 नवीन
आपल्याला लागणार एक दिवसाचं अन्न स्वतः पिकवून तयार करायला लावला पहिजे शाळे मधून ! या मधून मुले अनुभवाने समृद्ध होतील ..आणि कष्टाची जाणीव होउन अन्नाची नासाडी करणे थांबेल
  • Log in or register to post comments

कृतघ्न मी...

प्रभाकर पेठकर
Wed, 11/27/2013 - 13:55 नवीन
>>>>आपल्याकडेही शेतकरी आणि ग्राहक यांच्यात फार मोठी दरी आहे. फक्त कांद्याचे किंवा दूध- साखरेचे भाव थोडेसे वाढले की शेतकरीनामक कोण्या खलनायकाचं हे काम आहे असं शहरी ग्राहकांना ठामपणे वाटतं. यापलिकडे शेतकऱ्याचा आणि आपला काही संबंध आहे हे आपण मानायलाच तयार नसतो.<<<< >>>>आपण जे खातो ते मॉलमधून येतं किंवा आपल्या घरी दूध येतं ते भैय्यामुळेच; असं बऱ्याच शहरी मुलांना आजही वाटतं.<<<< >>>>जो शेतकरी आपल्यासाठी अन्न पिकवतो त्याच्याबद्दल आपण कधीतरी विचार करतो का?<<<< इथे आपण बर्‍याच गोष्टी (लेखाच्या सोयीसाठी) गृहीत धरल्या आहेत. असो. फक्त शेतकरीच का? सगळ्यांचेच आभार मानले पाहिजेत. दलाल, वाहतुकदार, व्यापारी, किरकोळ दुकानदार, माझे वडील (जे कुटुंबाचे पोट भरण्यासाठी राबराब राबायचे), माझी आई जी माझ्यासाठी स्वयंपाक करायची, स्टेनलेस स्टीलचे ताट्, वाट्या, तांब्या-भांडे बनवून माझ्या पर्यंत पोहोचविणारे, डायनिंग टेबल-खुर्च्या बनवून माझ्यापर्यंत पोहोचविणारे वरील प्रमाणेच अजून एका साखळीतील घटक, माझ्यासाठी कपडे बनविणारे आणि माझ्या पर्यंत पोहोचविणारे वरील प्रमाणेच अजून एका वेगळ्याच साखळीतील घटक, शिक्षण क्षेत्रातील शिक्षक, शाळा बांधणारे गवंडी, सुतार, रंगारी, शाळेची घंटा बनविणारे कारागिर, महाविद्यालयातील अशीच एक साखळी, वह्या पुस्तकांसाठी कागद बनवायला झाडे तोडून कारखान्यांना पुरविणारे, कागदाच्या रिम्सचे वाहतुकदार, छापखाने, अभ्यासक्रम ठरविणारे, पुन्हा किरकोळ विक्रेते वगैरे वगैरे अनेक अनेक जण आहेत ज्यांचे मी आभार मानू इच्छितो. हे सर्व नसते तर काय झालं असतं ह्या विचारांनी पोटात गोळा येतो. जेवढा विचार करावा तेवढे माझ्या अस्तित्वाला आकार देणारे लाखो लोक आठवायला लागले. वेड लागायची वेळ आली. बापरे! एका जगण्यात मी किती जणांचे उपकार डोक्यावर घेऊन फिरतो आहे. कधी ह्यांचे उपकार मानण्याचा, त्यांचा Thanks म्हणण्याचा विचारही नाही केला. मी अत्यंत कृतघ्न माणूस आहे ह्या विचाराने भयंकर वैफल्य आले आहे. आपण आपल्या ह्या लेखाद्वारे ह्या सर्वांची जाणीव करून दिली. ही कृतघ्नता वृत्तीत बाळगून मृत्यूला सामोरे जाण्यापेक्षा ह्या सर्वांप्रती मी आता कृतज्ञता व्यक्त करून मनांत कुठलाही सल न बाळगता मृत्यूला सामोरा जाईन. आपला आभारी आहे.
  • Log in or register to post comments

हाहाहा...

रामबाण
Wed, 12/04/2013 - 09:26 नवीन
चला, लेखाचा हेतू साध्य झाला म्हणायचा :-D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

थोडे

ईन्टरफेल
Fri, 12/06/2013 - 21:04 नवीन
थोडे दिवस थांबा प्रभाकर जी ! आपल्याला दोंन्हि वेळ्चे खाद्य मॉल मधुन मिळेल आसि व्यवस्था केलि गेलेलि आहे ! आपल्या कडे पैसा आहे तर पैसा फेको तमाशा देखो ............
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

ह्म्म

विटेकर
Wed, 11/27/2013 - 14:36 नवीन
कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम अशा दयाघन परमेश्वराचे आभार मानावेत , त्यातच सारे आले कारण आपण सारे त्याचेच अंश आहोत ! वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे सहज हवन होते नाम घेता फुकाचे जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म उदर भरण नोहे जाणिजे यज्ञकर्म ! दुसरे असे की , आपल्याकडे आप्न आभार मानत नाही , ॠण मानतो . १. मातृ -पितृ ॠण २. गुरु ऋण ३. देव ऋण आणि ४. समाज ॠण ते ऋण मानले आणि तसे वर्तन केले म्हणजे आभार मानण्यासारखेच आहे. त्यासाठी वेगळा दिवस करण्याचे प्रयोजन असावे असे वाटत नाही. यानिमित्ताने एक जुनी गोष्ट आठवली : माझे पुण्यातील शिक्षण निगडीतील एका सिंधी डॉक्टर दाम्पत्याच्या (आर्थिक ) सहकार्याने सोपे झाले होते. नोकरी लागल्यावर त्यांना भेटून गिप्फ्ट दिली, आभार मानले , तेव्हा डोक्टर महशय म्हणाले , ही गिफ्ट परत घेऊन जा , मला परत फेड हवीच आहे , तू अन्य विद्यार्थ्यांना केलेली मदत मला पाहायची आहे , तीच माझी परत फेड ! समाजाकडून आलेले परत समाजाला देणे ही उतराई होण्याचे पद्धत ! त्यात शेतकरीच काय सारेच आले.
  • Log in or register to post comments

समाजाकडून आलेले परत समाजाला

बॅटमॅन
Wed, 11/27/2013 - 18:13 नवीन
समाजाकडून आलेले परत समाजाला देणे ही उतराई होण्याचे पद्धत ! त्यात शेतकरीच काय सारेच आले.
प्रचंड सहमत!!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विटेकर

@विटेकर...

मुक्त विहारि
Fri, 12/06/2013 - 20:44 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विटेकर

लेखाची कल्पना आवडली

पैसा
Wed, 11/27/2013 - 14:49 नवीन
विटेकर यांचा प्रतिसादही आवडला. साखळी तुटू देऊ नका!
  • Log in or register to post comments

हे घ्या शेतकर्यांचे आभार ..

विटेकर
Wed, 11/27/2013 - 16:20 नवीन
वदनी कवळ घेता नाम घ्या मातृभुचे | सहज स्मरण होते आपुल्या बांधवांचे | कृषीवल कृषीकर्मी राबती दिन रात | श्रमिक श्रम करोनी वस्तु त्या निर्मितात | स्मरण करुनी त्यांचे अन्न सेवा खुशाल | उदर भरण आहे चित्त होण्या विशाल | हा श्लोक ही बर्यापैकी प्रचलित आहे.
  • Log in or register to post comments

हा श्लोक आमच्या

जेपी
Wed, 11/27/2013 - 17:39 नवीन
हा श्लोक आमच्या संस्क्रुत च्या सरांनी शिकवला होता . आता विसरलो होतो . धन्यवाद .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विटेकर

विटेकर

अनिरुद्ध प
Wed, 11/27/2013 - 16:29 नवीन
काकांशी सहमत
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

नवीन सदस्य

  • सदस्य: चिनू१९८५
    नोंदणी: Wed, 03/25/2026 - 09:02
  • सदस्य: साधक भूषण
    नोंदणी: Mon, 03/23/2026 - 19:02
  • सदस्य: दीपक चकवे
    नोंदणी: Mon, 03/23/2026 - 11:07
  • सदस्य: भूषण तळवेलकर
    नोंदणी: Sun, 03/22/2026 - 23:18
  • सदस्य: Jayashree15
    नोंदणी: Sun, 03/22/2026 - 18:55
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा