Skip to main content

साधीशीच माणसं ..

सोमवार, 02/12/2013 या दिवशी प्रकाशित केले.
सकाळी नेहमीपेक्षा वीसेक मिनिटे उशीराच घराबाहेर पडलो. ऑफिसला जायचे नसून ऑफिसच्याच कामासाठी इतरत्र जायचे होते. पुढची ट्रेन पकडायला हरकत नव्हती म्हणून बिछान्यातच पंधरा-वीस मिनिटे जास्तीचा मुक्काम ठोकला. तयारी मात्र नेहमीच्याच वेगाने झरझर आटोपून, मोबाईलमध्ये ट्रेनचा टाईम आणि आता झालेली वेळ, दोन्ही चेक करून रमतगमत चाललो तरी वेळेच्या आधी स्टेशनवर पोहोचेन अश्या हिशोबाने निघालो. पावले मात्र सवयीनेच झपझप पडू लागली, नव्हे किंचित जास्तच उत्साहाने. याचे एक कारण म्हणजे नेहमीच्याच त्याच त्या रूटीनमधल्या ऑफिसला जायचे नव्हते, आणि दुसरे म्हणजे पंधरा मिनिटांची एक्स्ट्रा झोप घेता आली या समाधानानेच एक छानशी तरतरी आली होती. भमरसिंग मिठाईवाल्याच्या गरमागरम समोश्यांचा वास छान पैकी नाकात भरून घेत, पुढील टपरीवरून सुटणार्‍या चहाच्या वाफा अंगावर झेलत पुढे पास झालो इतक्यात मागून सहजच एक आवाज आला, "अरे आपल्याइथे कुरीअरवाला कुठेय माहीतीये का रे?" आपल्याच नादात रस्त्याने जात असताना अचानक समोरून कोण्या अनोळखी माणसाने पत्ता विचारला की माझा नेहमीच गोंधळ उडतो. मला शाळाकॉलेजमध्ये तोंडी परीक्षांची कधी भिती वाटली नव्हती एवढी या चौकश्यांची वाटते. त्या शाळेतल्या तोंडी परीक्षेला निदान मी घरून अभ्यास तरी करून गेलेलो असायचो, पण इथे मात्र कोणीतरी अचानक आऊट ऑफ सिलॅबस प्रश्न विचारला आहे असे वाटते. तसे पाहता त्यांच्या प्रश्नाचे उत्तर दिलेच पाहिजे, किंबहुना ते आलेच पाहिजे अशी काही गरज नसते, तरीही "माहीत नाही" किंवा समोरून प्रश्न इंग्रजीत आला असेल तर "आय हॅव नो आयडीया" म्हणतानाही एक अपराधीपणाची भावना उगाचच माझ्या मनात दाटून येते. एवढेच नाही तर ती मला चेहर्‍यावर केविलवाणे भाव आणून मुद्राभिनयाद्वारे दाखवावीशीही वाटते. अश्यावेळी जेव्हा मी माझ्या एरीयात नसतो तेव्हा पटकन, "अ‍ॅक्च्युअली, मै यहा का नही हू" असे बोलून वेळ मारून नेतो. पण आपल्याच विभागात ते देखील करता येत नाही. आज मी माझ्या घरापासून पाचच मिनिटांवर असताना हा प्रश्न बेसावधपणे मागून आला होता. सुदैव एवढेच की बायको बरोबर नव्हती. अन्यथा समोरच्याने प्रश्न विचारताच तिने आम्हा दोघांकडे अश्या काही नजरेने बघितले असते की याने पण कोणत्या गाढवाला विचारलेय. आणि मग ती नजर बघून माझी आणखी धांदल उडाली असती. असो... कुरीअरवाला नक्की कुठे आहे आपल्या इथे याचा विचार मी ‘अं अं’ करत चालतच करू लागलो आणि प्रश्नकर्ता देखील माझ्या जोडीनेच चालू लागला. ईतक्या वेळात मी त्याला थोडेसे निरखून घेतले. वयाने माझ्यापेक्षा लहान आणि पोरसवदाच दिसत होता. माझ्याप्रमाणेच दोन्ही खांद्यावर सॅक टाकून तो देखील नोकरीधंद्यासाठी म्हणून स्टेशनच्या दिशेनेच जात होता. साधासाच पेहराव, चालणे बोलणे अन वागण्यातही पहिल्या नजरेत साधेपणाच भरला. त्याने मला विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर द्यायला मला पुर्ण वेळ देऊन, माझ्या चालण्याच्या वेगाशी आपला वेग जुळवून चालू लागला. काही लोकांना हे सहज कसे जमते याचे मला नेहमीच कौतुक वाटते. माझे बोलायचे झाल्यास, एखाद्या अनोळखी माणसाकडे चौकशी करायची असल्यास, मी आधी शब्दांची मनातल्या मनात जुळवाजुळव करून त्याची मनातल्या मनातच एक रंगीत तालीम करतो. त्यानंतर प्रश्न सोडवायला कोणती व्यक्ती पकडावी हे शोधायला घेतो. प्रश्न विचारायच्या आधीच त्याचे उत्तर याला माहीत तर असेल ना, माहित असल्यास नम्रपणे देईल का, माहीत नसल्यास उगाचच चिडचीड करत कुठून येतात हि असली लोकं अश्या नजरेने आपल्याकडे बघणार तर नाही ना, एखादी मॉडर्न पेहरावातली व्यक्ती दिसली की तिला ईंग्लिशमध्येच प्रश्न विचारावा लागेल का, असे एक ना सत्तर, सतराशेसाठ फाटे फोडतो. त्याहूनही मग एखाद्याला हेरून जेव्हा फायनल करतो तेव्हा त्याला दादा, मामा, काका, भाईसाब, एs बॉssस नक्की काय हाक मारायची याचा परत मनातल्या मनात गोंधळ, अन या गोंधळात मगाशी रटलेले चौकशीचे वाक्य एव्हाना बोंबललेले असते की झालीच म्हणून समजा आयत्या वेळेला ततपप.. असो... साधीशीच चौकशी हा बरोबरचा साधासुधा मुलगा अगदी सहजपणे करून गेला. त्याने मला ना दादा म्हटले ना मित्रा म्हटले. एक्सक्यूजमी तर दूरच राहिले. तसेच आता माझ्या बरोबर देखील असा चालत होता की जणू फार आधीपासूनचीच ओळख आमची. आता याला "माहीत नाही रे" असे तोडके मोडके उत्तर देऊन कटवता येणार नाही हे लक्षात आल्यावर मी उगाचच, आपल्याकडे कुरीअरवाला एक इथे, एक तिथे, पण तो आता तिथे असतो की नाही माहीत नाही रे, असे काहीतरी असंबद्ध पुटपुटायला लागलो. मी थोडासा बावचलोय हे त्याला समजले की काय कोणास ठाऊक पण त्याने स्वताच पुढे बोलायला सुरुवात केली, "ब्ल्यूडार्ट आणि डिएचएल दोघेही नाही बोलले रे, आणखी कोणी माहीत आहे का?" घ्या... उत्तर द्यायला उशीर केल्याने त्याने स्वताच नेमकी अशी नावे घेतली की मी उडालेल्या धांदलीतून सावरून सावचितपणे आठवायला घेतले असते तर कदाचित हिच दोन नावे पहिला आठवली असती. आता तिसरे कुठून आठवू.. पण इतक्यात मला पळवाट म्हणून एक छानसे उत्तर सुचले, "नाही रे, खरे म्हणजे मला कुरीअर करायचे झाल्यास ऑफिसमधूनच करतो ना, त्यामुळे काही कल्पना नाही इथली." "ऑफिसवाले कोणती कुरीयर सर्विस वापरतात?" त्याचा पुढचा प्रश्न. ‘अरे देवा असेही असते का?’ मी मनातल्या मनात. पण लगेच सावरून म्हणालो, "ते बदलत राहतात रे, आणि माझे ऑफिस बेलापूरला आहे.." "पण तुला ब्ल्यूडार्ट आणि डिएचएलवाले का नाही म्हणाले?" माझा हा प्रश्न विषय बदलायला होता की त्यात अजून अडकायला हे विचारताना मलाच समजत नव्हते. "कॅमेरा पाठवायचा होता बहिणीला. ती बेंगलोरला असते. डिएचएलवाले नाही म्हणाले, आणि मगाशी ब्ल्यूडार्टवाल्यांचा देखील फोन आला, परत पाठवतोय म्हणून." "ओह्ह, कॅमेरा तुटायफुटायची भिती वाटत असेल. दिवाळी फराळाच्या लाडू चकल्या कुस्करल्याचे बरेच जणांने अनुभव ऐकलेत" मी माझ्या जेमतेम ज्ञानाच्या भरवश्यावर तारे तोडले. "तसे नाही रे, चांगली पॅकींग केली आहे, दहा हजारांचा कॅमेरा आहे. बहिणीला तिच्या लग्नाच्या पहिल्या अ‍ॅनिवर्सरीला भेट द्यायची आहे. आम्ही तिघा भावांनी मिळून घेतलाय. ताईने बरेच केलेय रे आमच्यासाठी. आता आमचे पण कर्तव्य बनते ना. तिला कॅमेर्‍याची आवड आहे म्हणून देतोय, पण हे कुरीअरवाले उगाच वेळ काढत आहेत...." "हम्म.." गडी बोलताना थोडासा भावूक झाल्याने मला पुढे काही बोलायचे सुचले नाही. दहा हजारांचा कॅमेरा तिघांमध्ये मिळून म्हणजे काही फार मोठे गिफ्ट वाटत नसले तरी त्याच्या हातातला दिड-दोन हजारांचा मोबाईल पाहता त्याच्यासाठी त्या कॅमेर्‍याची पैश्यातली किंमत तितकीही कमी नसावी. "ऑनलाईन शॉपिंगने घेतला असतास तर तिथलाच अ‍ॅड्रेस देता आला असता, त्यात काही फसायला होत नाही, कॅमेर्‍यांचे तर ठरलेलेच मॉडेल असतात ना.." मी स्वता फारसा ऑनलाईन शॉपिंगचा चाहता नसलो तरी दुसर्‍याला सल्ले द्यायला आपले काय जाते. "बरोबर आहे रे तुझे, पण स्वताहून घेऊन देण्यात एक मजा असते ना.." ह्म्म.. गडी पुन्हा भावूक झाला आणि मी देखील तो मुद्दा तिथेच सोडला. पण त्याच्या या भावनात्मक उत्तराने माझे समाधान झाले नाही हे माझ्या चेहर्‍यावर दिसले की काय कोणास ठाऊक, पुढे तो स्वताहूनच त्याच्या बहिणीने त्याच्यासाठी, त्याच्या भावांसाठी, त्यांचे शिक्षण आणि नोकरीसाठी काय काय केले हे सांगू लागला. मी स्वता चाळीत वाढल्याने सर्व प्रकारची आणि सर्व परिस्थितीतील माणसे पाहिली आहेत. याची कथा काहीशी अशी होती, डोक्यावरचा वडिलांचा आधार कोवळ्या वयातच गेला, तर त्यांची जागा मोठ्या भावंडाने पर्यायाने इथे त्याच्या बहिणीने घेतली. नोकरीव्यतिरीक्त ट्यूशन घेऊन घरखर्चाचा भार उचलला. आता तिच्या लग्नाचा हा पहिलाच वाढदिवस म्हणजे या सर्वांची घडी बसवूनच तिने स्वताचा विचार केला असावा. काही त्याने सांगितले काही अंदाज मी बांधले. इतर काही खरे असो वा खोटे, पण झालेले संस्कार तरी नक्कीच दिसत होते. आपल्या बहिणीने आपल्यासाठी खस्ता खाल्याचे कौतुक एखाद्या अनोळखी माणसाला कौतुकाने सांगणे हि माझ्यामते तरी फार कौतुकास्पद बाब आहे. सार्‍याच गोष्टींची परतफेड करता येत नाही, पण जाण ठेवणे जमल्यास कर्तव्य आपसूक निभावले जाते. छे, मलाही भावूक केले गड्याने.. इतक्यात त्याला कोणाचातरी फोन आला, बहुतेक एखाद्या भावाचाच असावा. अजून एका कुरीअरवाल्यांनी कॅमेरा पाठवायला नकार दिला या विषयावरच त्यांचे बोलणे चालू झाले. बोलताना त्याचा चेहरा असा चिंतातूर झाला होता जसे ऐन परीक्षेच्या दिवशी एखाद्याला हॉल तिकीट सापडू नये. त्या भावाच्या बोलण्यावरूनच तो जवळच्या एका पानटपरीवर चौकशी करायला शिरला तसे मला माझ्या ट्रेनचा टाईम होत आल्याची आठवण झाली. थांबणे शक्य नव्हते, कारण हि ट्रेन चुकवणे मला परवडणारे नव्हते, माझीही कुठेतरी वाट बघितली जात होती. तसे मी त्याच्याजवळ जात त्याला, "आता मी निघतो" असे म्हणालो. "अरे हो, सॉरी.. तू हो पुढे.. तुझी ट्रेन असेल.. थॅंक्यू.." माझे दोन पैश्याचेही नुकसान केले नसताना तो मला सॉरी म्हणाला आणि मी न केलेल्या मदतीसाठी थॅंक्यू.. निघतानाही तो मला ‘मित्रा’ नाही म्हणाला की फॉर्मेलिटी म्हणून हस्तालोंदन नाही केले. मोजून सहा ते आठ मिनिटांचे आमचे एकत्र चालणे अन एकमेकांशी बोलणे झाले, पण तेवढ्या वेळेतही तो मला बराच उलगडला.. पुन्हा कधी तो मला भेटेल ना भेटेल, दोनचार दिवस त्याला कुरीअरवाला भेटला की नाही हि रुखरुख मनात राहील, चार-आठ दिवसांत कदाचित विस्मरणातही जाईल, पण अशी साधीशीच माणसे अधनामधना भेटत राहणे खूप गरजेचे असते.. खरंच, मदत होते अश्यांची, आपला स्वताचा चांगुलपणा टिकून राहण्यासाठी .. - तुमचा अभिषेक
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 5243
प्रतिक्रिया 25

प्रतिक्रिया

खरंच, मदत होते अश्यांची, आपला स्वताचा चांगुलपणा टिकून राहण्यासाठी ..
प्रचंड आवडले आणि भावले हे..

सार्‍याच गोष्टींची परतफेड करता येत नाही, पण जाण ठेवणे जमल्यास कर्तव्य आपसूक निभावले जाते
+१०००० छान लेख.

लेख आवडला. वर्तमानपत्रातील इतर त्रासदायक बातम्यांपेक्षा या अशा घटना वाचून बरे वाटते.
सार्‍याच गोष्टींची परतफेड करता येत नाही, पण जाण ठेवणे जमल्यास कर्तव्य आपसूक निभावले जाते.
अगदी सहमत. यावरून एक जुनी घटना आठवली. माझी आई ज्या महाविद्यालयात शिकवते तिथल्या एका शिपायाच्या घराचे वादळामुळे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. आईने पुढाकार घेतला, स्वतः पहिली रक्कम मदत म्हणून दिली. हे बघून इतर सर्व शिक्षकांनी देखील मदत केली आणि या पैशांमधून त्याचे नुकसान बऱ्याच प्रमाणात्भरुन निघाले. याशिवाय इतर काही वेळेला सुद्धा आईने त्याला काही न काही मदत केली होती. या घटनेनंतर अनेक वर्षानी माझ्या लग्नाच्या वेळी त्याने इतर शिक्षकांकरवी आईसाठी तिच्या पसंतीची ५०० रुपयांची साडी आणली. आणि लग्नाच्या ४ दिवस आधी घरी येउन आहेर म्हणून साडी, मला पैसे आणि बबन टॉवेल टोपी असे सगळे दिले. त्याच्यासाठी ५०० रु ही बरीच मोठी रक्कम होती. आणि आई त्याच्याकडून असे काही घेणार नाही हे त्याला माहित होते. किंमत किंवा वस्तूचे महत्व नव्हते पण या सगळ्यातून त्याचे प्रेम आणि केलेल्या मदतीची जाणीव हे हेलावून टाकणारे होते. हा प्रसंग अजूनही डोळ्यात पाणी आणतो. आणि प्रत्येक वेळी जगात चांगुलपणा आहे याची जाणीव करून देतात. आजही कुणाला मदत करताना पहिले त्या शिपायाची आठवण येते आणि तो नकळत स्फूर्ती देऊन जातो.

गुड!

अभिषेकराव, लेख आवडला..... :)

तुमचे लेखन नेहमीच छान असते .. लालित्यपूर्ण असते .. पण राग मानू नका, यावेळी जरा पाणी टाकून वाढवल्यासारखे वाटते. आरास छान आहे .. तुम्ही नेहमीच सुंदर फुलवता पण कथाबीज सकस नाही.. यापेक्षा अधिक उत्तम प्रसंग हवा होता , जिथे सामान्य माणूस अधिक मो़कळा होतो ,जसे की इस्पितळ ! सहज जाता जाता , पत्ता विचारणारा इतक्या मोकळेपणाने बोलेलच असे वाटत नाही. माझे एक निरिक्षण आहे , समदु:खी भेटला की माणूस आधिक मोकळेपणाने बोलतो... अर्थात हा प्रसंग खरा घडला असेल तर ..विशेष च म्हणायला हवे. बा़की उत्तम !

In reply to by विटेकर

खरंय आपलं. कथाबीज साधेसंच होते. लिहावेसे वाटले तसे लिहून काढले. घडले त्याच संध्याकाळी. अन्यथा दुसर्‍या दिवशी पार डोक्यातून निघून गेले असते. मात्र पाणी नाही टाकलेय हे हि तितकेच खरे, अन्यथा ते असे झाले असते की आपल्याला प्रसंग साधासा वाटला नसता. बाकी "सहज जाता जाता , पत्ता विचारणारा इतक्या मोकळेपणाने बोलेलच असे वाटत नाही." म्हणत असाल तर तेच भावले म्हणून लिहावेसे वाटले :) बाकी, प्रतिसादाचा राग कसला, एखादा लेख कोणाला आवडला नाही तर साहजिकच थोडेफार वाईट वाटतेच, पण त्यामागचे कारण समजणे तेवढेच चांगले.

आजकाल अनेकदा फसवणूकीचेही प्रकार होतात. स्टेशन, बस स्टॉप इ. ठिकाणी काहीतरी विषय घेऊन बोलणे सुरु होते, मग थोड्या वेळाने मदतीसाठी पैसे मागितले जातात, अर्थात तुमचा वेश, दिसण्यावरुन रकमेचा अंदाज घेऊन पैसे मागतात. कारण काहीही हॉस्पिटलला जायला रिक्शासाठी पैसे, पाकिट मारले इ. माझ्याबाबतीत हा प्रकार दहिसर स्टेशनला झाला होता. मी कॉलेजला जात होतो, तेव्हा एक माणूस भगवती हॉस्पीटलचा पत्ता विचारत होता. मग बोलता बोलता त्याने सांगितले की तो चुकुन दहिसरला उतरला. त्याच्या बायकोचे ऑपरेशन आहे, लवकर जायचे आहे. रिक्शाला पैसे देशील का? बहुतेक माझा गबाळा वेश पाहून त्याने कमी पैसे मागितले. माझ्याकडे तेव्हा ५० रु च होते. मी २० च दिले. पण तरीही तो मोबाईल रिचार्जसाठी पैसे मागत होता. मी ते ३० रु मला कॉलेजसाठी हवेत असे सांगुन कटवले. ही गोष्ट मी कोणाला सांगितली नाही (नेकी कर और दर्यामे डाल असा स्वभाव :)) पण २-३ दिवसांनी एका मित्राकडे असेच कोणीतरी एक्स्-रे रिपोर्ट घेण्यासाठी पैसे मागितले, त्याने ही २०० रु दिले. हे कळताच समजले की ही अशी एक "स्कीम" होती. अर्थात सगळे लोक असे फसवणारे असतीलच असे नाही, पण आपल्या चांगुलपणाचा गैरफायदा घेणारेही या जगात असतात हे लक्षात ठेवावे.

हाईट म्हणजे माझ्या एका कलिगच्या बाबतीत असा प्रकार खुद्द लंडनला घडला. कलीग इतर मित्रांबरोबर लंडन फिरत होता. मादाम तुसॉच्या जवळ एक गुजु जोडपे भेटले. ते ह्यांच्याशी बोलू लागले. परदेशात कोणी भारतीय भेटला की जरा जास्तच आपुलकी वाटते. त्यांनी सांगितले की "त्यांची मुलगी खेळताना पडली, फ्रॅक्चर झालेय, हॉस्पीटल मध्ये आहे. १००-१५० पौड खर्च झालाय. मदत कराल का? आम्ही लेस्टरला राहतो. घरी गेल्यावर पैसे पाठवतो" वगैरे त्यांच्या ग्रुपमधून कोणी १०-२० पौड देऊन १०० पौडची मदत केली. सर्वांचे फोन नं ही दिले. त्यांना आज गायत त्या जोडप्याचा फोन नाही आला.

कोण खरे कोण खोटे याची शहानिशा प्रत्येक वेळी कशी करणार शेवटी >>नेकी कर और दर्यामे डाल >> हेच खरे

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

खरंय.. आणि आपणही कोणालातरी कधी ना कधी फसवलेलं असतेच की.. फसवणारे लोक आपल्यातलेच असतात ना, न की परग्रहावरून आलेले..

In reply to by यशोधरा

जर तुम्हाला जगातली फसवणूक दिसते, समजते तर याचा किमान अर्थ एवढा तरी नक्कीच होतो कि तुम्हाला देखील फसवणूक कशी करायची हे जमू शकते. आता प्रश्न उरतो कि आपण प्रत्यक्षात वेळ आल्यावर ती कधी करतो का? तर याचेही उत्तर मग बरेचदा हो मिळून जाते, बस्स व्यक्तीनुसार आणि प्रसंगानुरुप प्रमाण प्रत्येकाचे कमीअधिक असते. (इथे तुम्हाला'चा जनरलाईज अर्थ घ्या, आणि फसवणूक म्हणजे एखादा मोठा घोटाळा धरू नका)

In reply to by तुमचा अभिषेक

असो. ही विधाने काही पटली नाहीत. फसवणूक दिसते म्हणजे करायला जमते हे तर फारच ओढून ताणून वाटते आहे अगदी गनरल अर्थ वगैरे घेऊनही. बाकीचंही काहीच पटलं नाही, पण ठीके. अपनी अपनी मतं.

I likes.. :)