Skip to main content

मांडवाखालून !!

लेखक सूड यांनी सोमवार, 18/11/2013 01:09 या दिवशी प्रकाशित केले.
हातातल्या बेसनाच्या लाडवाचा एक घास घेतला असेल तो फोन वाजला. उचलला खरा पण एरवी आपण होऊन कधी फोन न करणार्‍या व्यक्तीचा फोन बघून जरा आश्चर्यानेच कॉल अटेंड केला... तो,"हं, बोल मामी. काय म्हणत्येस." पलिकडून, " मी मजेत तुझं कसं काय चाल्लंय. कशी काय झाली टूर." "झाली बर्‍यापैकी, बाकी काय चाल्लंय." "बाकी रोजचंच, बरं मी काय म्हणत्ये नोकरीचं तुझं व्यवस्थित चाललंच आहे आता पुढचा काय प्लान?" "म्हणजे?" "म्हणजे लग्नाचं वैगरे कसं काय?" "अजून तरी काहीच विचार नाही, बघू कसं काय होतं ते" "बरं बघ हं, माझ्या भाचीसाठी..म्हणजे मोठी बहीण आहे कनई तिच्या मुलीसाठी स्थळ शोधणं चाललंय. माझ्या बहिणीनं मागच्या वेळी गणपतीत तू आला होतास तेव्हा तुला पाह्यलं होतं, म्हणली विचारुन बघ काय म्हणतोय. विचार कर जरा. मुलीला मी अगदी तिच्या लहानपणापासनं बघतेय. सगळं नीट सांभाळेलशी आहे" आता प्रश्न असा होता की या मामीनं मोठ्या मामीसारखा कधी तुसडेपणा केला नव्हता की फटकून वागली नव्हती. एरवी त्याच्या उत्तरासमोर भलेभले गार होत. पण आता काय करावं हे त्याला कळत नव्हतं. हिला दुखवायचंही नाहीये आणि येवढ्यात लग्नाला हो म्हणावं की नाही तोही प्रश्न आहे. फोनवर मामीची कॅसेट चालू असताना हे सगळं गरगर डोळ्यासमोर फिरत होतं. मग लख्ख उजेड पडल्यासारखं झालं!! पत्रिका!! ही जुळली नाही तर नकारही देता येईल आणि कोणाला दुखवल्यासारखंही होणार नाही. पाव्हण्याच्या जोड्यानं विंचू मारल्यासारखं होईल. त्याचं उत्तर, "बरं, एक काम कर मामी. मुलीची जन्मवेळ, जन्मतारिख आणि जन्मस्थळ पाठव. मी इथं ऑनलाईन पत्रिका चेक करतो." "आत्ता फोन ठेवते आणि मेसेज पाठवते सगळ्या डिटेल्ससहित. पण मावशीला वैगरे यातलं काही सांगू नको फायनलाईझ झाल्याशिवाय" फोन डिस्कनेक्ट झाला पण डोक्यात चक्र सुरु झालं होतं. मावशीला का नाही सांगायचं!! आणि येऊन जाऊन ठरवूनच करायचं तर मग ही लपवाछपवी का? ते काही नाही जो काही निर्णय असेल तो सगळ्यांना सांगायचा. होकार असो वा नकार घरातल्या मोठ्या माणसांच्या कानावर ही बातमी असायलाच हवी. मेसेजच्या रिंगने हे विचारचक्र थांबलं. मेसेजमधले सगळे डिटेल्स एका साईटवरच्या रिकाम्या जागांमध्ये टाकले आणि 'Show Horoscope' वर क्लिक केलं. आता हा दुसरा धक्का होता. नक्षत्र मघा, प्रथम चरण इत्यादि इत्यादि...आयला!! म्हणजे पाचेक मिनीटापूर्वी जिथे नकाराला वाव आहे असं वाटत होतं तिथे चक्क छत्तीस गुण जुळतायेत? अष्टमात मंगळ होता, पण मुलगी खरंच चांगली असेल तर या गोष्टींकडे दुर्लक्ष करायला काय हरकत आहे. आता सरळ पुढच्या बोलाचालींसाठी ग्रीन सिग्नल द्यायचा. सगळंच बघत बसलं तर आता जे रखडून राह्यलेत त्यांच्यासारखी आपली गत व्हायची. सगळे विचार चालू असतानाच फोन लावला.."हं मामी, मी आताच सगळे डिटेल्स चेक केले ऑनलाईन. छत्तीस गुण जुळतायेत. मंगळ आहे मुलीला, पण मुलगी खरंच चांगली असेल तर मी हे सगळं इग्नोर करायला तयार आहे. पन्नास टक्के तरी होकार आहे माझा. बाकी मुलीशी भेटून वैगरे काय ते ठरवेन. तुम्ही मोठी माणसं काय ते बघून घ्या." "बरं झालं कॉल केलास ते. मी आत्ता बहीणीला कळवते." "हो, पण माझं स्वतःचं घर वैगरे नाहीये हे माहितीये ना त्यांना? ते सगळं मान्य असेल तरच पुढे बोला म्हणाव." "ते त्यांना माहित असल्याशिवाय का मी तुला विचारलं?? मुलगीही नोकरी करतेच आहे त्यामुळे तू फार काळजी करू नकोस. सगळं नीट होईल." आता मात्र खरंच टेंशन आलं होतं. ज्या गोष्टीला अजून अवकाश आहे असं वाटत होतं ती अगदी जवळ येऊन ठेपली होती. सगळ्याच गोष्टी पसंतीप्रमाणे झाल्या तर त्याच्या भाषेत यावर्षीच सगळा 'निक्काल' लागणार होता. दोन तीन मित्रांना फोनाफोनी झाली. अजून मुलीचा फोटो पाह्यला नव्हता. त्यामुळे पुढच्या कॉल्स कडे लक्ष लावून राहणं होतं. तीनेक दिवसांनी पुन्हा फोन.. "तुझ्या पत्रिकेची स्कॅन कॉपी आणि तुझा फोटो मेल करतोस का?" "अगं मामी, पण सगळे डिटेल्स तर मी दिले होते. ऑनलाईन पत्रिका बघू शकतात की!! मी नाही का पाह्यली?" "हो, पण त्यांना स्कॅन्ड कॉपीच हवीये आणि तुझा फोटोही. मुलगी तिचा फोटो नंतर पाठवील. त्यांच्या घरचं नेट गंडलंय." "ठिकाय, मी उद्या सकाळपर्यंत पाठवतो." सगळे डिटेल्स त्याने पाठवले. आता पुढला कॉल येईस्तवर निश्चिंती होती. पण त्यांचा होकार आला तर ?? अजून कोणालाच माहिती नाहीये. ते काही नाही, घरात आणखी कोणाला तरी हे माहित असायलाच हवं असं मन ओरडून सांगत होतं. . . . . . . गुरुवारी सगळे डिटेल्स पाठवलेत, आज रविवार. काही बातमी आलेली नाहीच, पण आता स्वस्थ बसता उपयोगी नाही. आता मात्र सरळ मावशीचं घर गाठलं. अथपासून इतिपर्यंत जे काही घडलं ते सगळं सांगून जरा डोकं आणि मन दोन्ही शांत झाल्यासारखं झालं.चहा वैगरे उरकलाच असेल, तो पुन्हा फोन आला. "बोल मामी" "आताच बहिणीचा कॉल आला होता. त्यांनी दाखवली म्हणे एका ज्योतिषाला पत्रिका तुझी. काय तर म्हणे मुलाचा शनि दुर्बळ आहे, हे लग्न तितकंसं चांगलं ठरणार नाही." "ओक्के, हरकत नाही. बरं झालं लवकर कळवलंस." मावशी शेजारीच उभी राहून ऐकत होती. त्यामुळे ती समजून गेली. त्याला मात्र नकाराचा शोक मानावा की पुढल्या सगळ्या खर्चाचं आलेलं टेंशन चुटकीसरशी सुटलं याचा आनंद मानावा ते कळत नव्हतं. शेवटी मन म्हणालं अरे आनंदच हा!! मागचा सलग आठवडाभर पुढच्या खर्चाचं प्लानिंग, विचार याच्या बेरीज वजाबाकीत घालवलास त्यातून आता निदान पुढलं स्थळ येईस्तवर सुटका झाली आहे. या सगळ्या विचाराने कुठेतरी त्याचा जीव भांड्यात पडल्यागत झालं. त्याच्या चेहर्‍यावर हसू बघून मावशीच्या कपाळावरच्या आठ्याही गेल्या. गाडी पुन्हा रुळावर आली होती. दोन तीन दिवस गेले. ऑफिसला जायची तयारी चालूच होती तो पुन्हा मामीच. आता काय नवीन म्हणून कपाळावर आठ्या आणत कॉल अटेंड केला. "थोडा घोळ झालाय अरे." "काय झालं?" "तेच रे मी माझ्या भाचीचं म्हणलं नव्हतं का?" "ह्म्म, मग?? नक्की काय झालंय?" "त्याचं काय झालं, त्या लोकांनी ज्या ज्योतिषाकडे पत्रिका दाखवली त्याचे प्रेडिक्शन्स नीट नव्हते रे. ते लोक आता म्हणतायेत. तुमच्या इथं कुणाकडे तरी पत्रिका दाखवून बघा." "कशाला, मामी?? आता एकदा आलाय ना नकार. मग पुन्हा काय? बरं त्यांना जे काही आधी कोणी सांगितलंय ते त्यांच्या डोक्यातून जाणार आहे का? त्यांच्या मनात या गोष्टी राहणारच ना कुठेतरी. नकार आलाय ना, मग जरा थांबूच. निवांत होऊ दे सगळं." "तू फारच मनाला लावून घेतलंससं दिसतंय. नकार नव्हताच रे तसा त्यांचा. मी मुलीला फोटो पाठवायला सांगते तुझ्या इमेल आयडीवर आत्ताच. पत्रिकाही दाखवून घ्या तुम्ही लोक." त्याने काहीही प्रत्युत्तर न करता फोन ठेवला. नक्की काय चाल्लंय कळत नव्हतं. विचारलं त्यांनी, नकार दिला त्यांनी आणि आता परत होकारही देतायेत?? नक्की माणसं काय म्हणायची ही? आता इतकी डळमळीत आहेत तर नंतर काय करतील हे लोक. आपण शांत बसावं. फॉलो अप करुन वैतागून विषय सोडून देतील. आठवडाभरानं पुन्हा कॉल. "काय ठरलं मग?" "कशाबद्दल?" "फोटो पाठवला होता की तिनं, पाह्यला नाहीस का?" "नाही. मी मेल आल्या आल्या ताबडतोब डिलीट केला." "असं का केलंस?" "का म्हणजे? मी काय खेळणं आहे का? विचारलं तुम्ही, नकार तुम्ही दिलात, परत होकार देताय. एका दगडावर पाय आहे का नाही? इतके दिवस मान राखायचा म्हणून गप्प बसलो होतो, पण आता हे अति होतंय असं नाही का वाटत? मी नुसत्या बर्थ डिटेल्सवर सगळं शोधलं. मुलीला मंगळ आहे तोही इग्नोर करायची तयारी दाखवली. त्यांचा मात्र माझ्या पत्रिकेच्या स्कॅन्ड कॉपीसाठी, फोटोसाठी आग्रह? कुठल्या युगात वावरताय? मुलीचा फोटो मी मागितला नाही ठीकै, पण घरचं नेट बंद आहे हे कारण कोणाला सांगता? सायबर कॅफे ओस पडलेत का? हे बघ, आता त्यांना म्हणाव आम्हाला घाई नाहीये. निवांत बघू आणि तेवढ्यात जर कोणतं स्थळ आलं मुलीसाठी तर खुश्शाल पुढे जा म्हणाव." "असं कसं बोलतोस तू? माझ्या भाचीला काय मुलं मिळणार नाहीत की काय?" "ठीकाय ना!! मला पण हिच्याशिवाय दुसरी मुलगी मिळणार नसल्यासारखं तुमचं वागणं का चाल्लंय?" पलिकडून फोन डिस्कनेक्ट. . . . . . तीन महिन्यांनी..... "काय गं? काही कॉल केलेलास का त्याला?" "मी का करु? माझा अपमान केलाय त्याने?" "हो, पण लहान आहे. सांभाळून घे ना!" "वन्सं, तुम्हाला म्हणून सांगत्ये. इतकं चांगलं स्थळ आणलं मी. पण हा माजोरडेपणा म्हणावा की काय? माझी भाच्ची अगदी सोन्यासारखी आहे हो. म्हणे दुसरं स्थळ मिळालं तर शोधा. माझ्या भाच्चीला मुलं मिळणार नाहीत की काय!" "हो, अगदी गुणाचीच आहे हो तुझी भाची. मला माहित आहेच की सगळं. नकार कळवायला तू त्या रविवारी फोन केलास ना त्याला तेव्हा त्याच्या शेजारीच उभी होते मी." भावजय तोंडात मारल्यासारखी गप्प बसली.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 28208
प्रतिक्रिया 96

प्रतिक्रिया

In reply to by बॅटमॅन

एकच अनुभव घेऊन थांबलास का? सीसीडीमधे गेलास का नाही कधी? आणखी कोणी भेटली नाही का? लाडू कधी? -क्रमशः

शक्यतो स्वत:च्या लग्नाची बोलनी स्वत: करु नये कमीत कमी नात्यातील स्थळ आले तर करुच नये, पुढचा कडवटपना टाळता येतो, बाकि आन्भव लिहलाय मस्त :-)

In reply to by शैलेन्द्र

२ प्रश्न- १) पांडूला अनुभव आला असेल का? २)आणी असेल, तर तो "अनुभव" असेल का??? =))

"का म्हणजे? मी काय खेळणं आहे का? विचारलं तुम्ही, नकार तुम्ही दिलात, परत होकार देताय" या सगळ्या अनुभवातून गेलेली असल्याने सांगते कि जेवढ्या लवकर "अरेंज लग्न " हा एक बाजार आहे हे मान्य कराल तेवढा त्रास कमी होइल. पूर्वी हा फक्त मुलींसाठी बाजार असायचा, मुलगा येउन बघून जाणार, चालून दाखव गाऊन दाखव सांगणार, आणि तो (किंवा त्याच्या घरचे) होकार नकार ठरवणार. हल्ली हा दोघांसाठी पण बाजारच आहे, किमान लग्न लागेपर्यंत तरी. तुम्ही असा विचार करा कि एखाद्या मुलीशी तुमची बोलणी चालू आहेत, तुम्हाला ती आवडलीये पण काहीही नक्की झालं नाहीये, त्याचं वेळी दुसरं स्थळ बघितलत, ती पण मुलगी चांगली आहे पण पहिली जास्त चांगली आहे, तर तुम्हाला दुसऱ्या मुलीला सरळ नकार देण्यापेक्षा थोडं लांबवत ठेवावं आणि पहिलीचा नकार आला तर उत्तर द्यावं असं नाही वाटणार का? अवांतर : नकारासाठी "योग नाही" हे एक उत्तम कारण मी ऐकलं होतं, उगाच कोणालातरी नावं ठेवण्यापेक्षा मला तरी हे कारण आवडलं :D

In reply to by वीणा३

हे किंवा पत्रिका जुळत नाही हे कारण चांगले आहे. आमच्या मामासाठी(तो डॉक्टर आहे) मुलगी पाहून झाल्यावर आमच्या आजोबांनी पत्रिका जुळत नाही सबब योग नाही असे कळविले होते त्यावर वधूपित्याने दूरध्वनी करून त्यांना विचारले अहो तुम्ही इतके सुशिक्षित आणि पत्रिकेवर विश्वास कसा ठेवता ? इतके अंधश्रद्ध असला असे वाटले नाही. यावर आमचे आजोबा त्यांना शांतपणे म्हणाले कि त्याचे असे आहे कि आम्हाला तुमची मुलगी अजिबात पसंत नाही पण मुलीच्या मनाचा विचार करून आम्ही तसे कळविले होते पण आता तुम्ही आम्हाला शिव्या घालता तर स्वच्छ सांगतो कि मुलगी ठेंगणी आणि स्थूल आहे आणि आमच्या मुलाच्या मानाने काहीच नाही आणि मुख्य म्हणजे मुलाला अजिबात पसंत नाही. सबब आपला योग जुळणे नाही. तरीही मुलीच्या मनाचा विचार करून तिला पत्रिका जुळत नाही हे सांगावे.

In reply to by वीणा३

@नकारासाठी "योग नाही" हे एक उत्तम कारण मी ऐकलं होतं, उगाच कोणालातरी नावं ठेवण्यापेक्षा मला तरी हे कारण आवडलं>>> या सगळ्या कारणांन्ना(खरोखर)-पुरुन,उरणारं कारण देता येत...आणी ते सर्रास देतात. ते म्हणजे (अता) पत्रिका जुळत नाही...आंम्ही त्या दुसर्‍या ज्योतिषाला दाखवली!(आणी त्याच्या कडून,पहिली "जुळणी" तोडून'ही घेतली)

एक किस्सा सांगते , आमच्या हापिसातला एक कलिग त्याने किमान ५० एक मुली पाहील्या अस्तील एकही आवडत नव्हती, हीचे काय ही काळी आहे , तिचे काय ती जाडी आहे, अमुकला चष्मा आहे, तमुक ठेंगणी आहे ,हिचे शिक्षण कमी , तिचे माझ्यापेक्षा जास्त ,अशा नानाविध कारणाने मुली नाकारत गेला शेवटी एक त्याचे आइ बाबा अन घरचे इतके वैतागले की स्थळ आले की त्याला एकट्यालाच जा म्हणायचे मुलगी पाहयला , कारण दगदग, सुट्ट्या , प्रवासखर्च इइ वैतागुन गेले होते बिचारे अन वरतुन मुलगी आपल्या दिवट्याला नाही पसंत पड्ली तर नकार कळवण्याचा अजुन एक ओझ मनावर शेवटी आइबाबानी स्पष्ट सांगितले कि नुसत दिसण्यावर जाण्यापेक्षा गुण/ संस्कारपण बघ मुलीचे शेवटी नाही - हो करत एक मुलगी पसंद पडली तर म्हणतो कसा " हिच्यापेक्षा अमुकतमुक छान होती का ग आइ ? " आइला मुलीची इत्यंभुत माहीती होती म्हणुन शेव्टी आइने पुढाकार घेउन स्थळाला होकार कळवला अन एक आठ्वड्यात साखरपुड्यातच लग्नही उरकले, आता स्वारी मजेत आयुष्य जगतेय कारण बायको खुप छान अन गुणी आहे त्याची ,आता म्हणतो ", खरेच हिला गमावले असते मुर्खपणामुळे , आता समजले आइ-बाबांनी भरपुर उन्हाळॅ पावासाळे पाहिलेत त्यांच म्हणन ऐकुन घेतल ते बर झाल ,नाय तर नुसत आपलच घोड दामटवत बसलो होतो"

निरिक्षणाने मी एक गोष्ट नक्की सांगतो , लग्नाच्या बाबतीत आई- वडिलांचा निर्णय शिरसावंद्य मानावा ! आपली(मुलगा अथवा मुलगी) नेमकी कशी आहे हे त्यांना बरोब्बर माहीत असते ! सहजीवनासाठी अत्यंत आवश्यक असे उभयताण्चे स्वभाव , आवडी - निवडी जुळायला आणि त्या १००% जुळल्या नाहीत तर ते सहन करायची आपल्या अपत्याची क्षमता त्यांना पुरेपूर ठाऊक असते. आप्ल्यापेक्शा आपण आपल्या आई- वडिलांना अधिक चांगले माहीत असतो - निदान त्या वयात तरी! अगदी प्रेम विवाह जरी केला तरी, त्यांना विश्वासात घेणे अत्यंत महत्वाचे असते. निर्णय बरोबर आला तर आपण्च सुखी होऊ.समजा निर्णय चुकला तर ते तुमच्यामागे ठामपणे उभे राहतात,कठीण प्रसंगी आपल्या माणसांसारखा आधार नाही. अयशस्वी विवाहात प्रेम विवाहांचे प्रमाण जास्त आहे असे ही माझे निरिक्षण आहे ! ( सॅम्पल फ्रोम - मध्यमवर्गीय मराठी कुटुंबे, अर्थात अपवाद असतीलच )

वीणा३ व विटेकरांशी सहमत. पूर्वी हा लग्नाचा बाजार फक्त मुलींसाठी होता आता मुलांसाठीही झालाय त्यामुळे गोष्ट पचवायला जड जातय. पूर्वी मुलांकडून दिसायला, शिक्षणाला, स्वभावाला एक चाम्गली मुलगी असली तरी दुसरी यापेक्षा चांगली मिळतीये का (काहीजण जास्त हुंडा मिळतोय का)यासाठी पहिल्या स्थळाला ताटकळत ठेवणे सर्रास असे. शिवाय मुलीच्या नाकाचा कोन इतके अंशात नाही, किंचित सावळी असली खुस्पटे काढली जात असत. चष्मा असणे हेही कारण असे. आता मुलांनाही ते ऐकून घ्यावे लागते एवढेच! मग पत्रिका जुळत नाही हे सांगणे बरे असते. घरातील ज्येष्ठांना आपल्या स्वभावाचा पुरेपूर अंदाज असतो म्हणून ते योग्य मुलगी/मुलगा आपल्यासाठी पसंत करण्याची शक्यता असते. (१०० टक्के म्हणत नाही). कठीण काळात आपल्याला नक्की कोणती मदत लागेल हे त्यांना त्यामु़ळेच समजते. सूड, दोन प्रतिसाद दिलेत तुझ्या धाग्याला. लक्षात ठेव. ;) जे काही घडले आहे हे फक्त तुझ्याच बाबतीत झालेय असे अज्जिबात नाही. बरेचदा मध्यस्थांचे कन्फ्यूजन, मोठेपणा देण्या घेण्याची गरज यात मुलामुलींची मने दुखावतात. तुझ्यासारखे हजारोजण आहेत हे लक्षात घेतलेस की त्रास कमी होईल. झाल्याप्रकारात मुलीचा दोष कितपत आहे कोणास ठाऊक? तुलाच खरे काय ते माहित. निदान फोटू तरी बघायचास. न जाणो एक खरच चांगली मुलगी मिळाली असती. तुला संसार मामीशी करायचाय की मुलीशी? यापुढे जी मुलगी आवडेल तिची मावशी चांगलीच असेल कश्यावरून?

In reply to by रेवती

तुला संसार मामीशी करायचाय की मुलीशी? यापुढे जी मुलगी आवडेल तिची मावशी चांगलीच असेल कश्यावरून?
हे बाकी १००% पटले.

ववसुमं आणखी कोणाला खरंखुरं वाटायच्या प्रतिसाद द्यावा म्हटलं. तर, सगळ्यात आधी लेखात नक्की काय म्हणायचंय हे बर्‍याचशा लोकांनी समजून उमजून प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद. या सगळ्या प्रकारात खटकलेल्या गोष्टी: १) सगळ्या प्रकरणात आपल्याला बाव्हल्यासारखं नाचवलं गेलं ही जाणीव (अर्थात होकार दिला असता तर न जाणो पुढेही तेच घडलं असतं). २) ज्या व्यक्तीचा आपण अगदी आदर करत होतो त्या व्यक्तीने असं वागणं. ३) बरीचशी सूत्र आपण हलवूनसुद्धा शेवटी माझा अपमान झाला हे सांगत सुटणं. बरेच लोक म्हणले की मुलीचा फोटो बघायचा कदाचित पसंत पडली असती, झाला प्रकारच इतका मनस्ताप देणारा होता की आता ती मुलगी अगदी मदनाची पुतळी असली तरी नको असं झालं होतं. नकार पचला नाही असंही काही जणांचं मत पडलं. जसा मला नकार द्यायचा अधिकार आहे तसा तो समोरच्या व्यक्तीलाही आहेच की!! आपलं दिसणं, कामाचं स्वरुप, उत्पन्न, कौटुंबिक पार्श्वभूमी असं काहीही खटकू शकतं समोरच्या व्यक्तीला. ते खटकणं मनात न ठेवता सरळ नकार द्यायला गट्स लागतात ज्या त्यांनी सुरुवातीला दाखवल्या, त्यात काहीही वावगं नव्हतंच. प्रश्न हा होता की एकदा नकार आणि पुन्हा अगदी दोन दिवसांनी होकार. ज्याचा अर्थ ती मंडळी स्वतःच्या निर्णयावर ठाम नाहीत. न जाणो ह्या डळमळीतपणामुळे त्यांनी अगदी लग्नाच्या आदल्या दिवशीही मत बदललं असतं. आता त्यांनी दिलेला नकार कोणीही पचवायचा पण त्यांना कोणाचा नकार पचनी पडत नसेल तर मग काय म्हणावं. असो. झाला प्रकार एकंदरीतच हात दाखवून अवलक्षण पैकी होता. जे यातून गेलेत, जे जातायेत सगळ्यांचेच प्रतिसाद उपयोगी पडतीलच!! धाग्याचं काश्मीर न करता समजून उमजून प्रतिसाद दिल्याबद्दल पुन्हा एकदा आभार. इति लेखनसीमा!! :)

In reply to by सूड

पंत अहो मुलीचा काय दोष होता त्यात ? फोटो बघुन , भेटुन ती स्वतहा स्वताहाच्या मतावर किती ठाम राहु शकते हे बघायचं होततना गावाला एवढं महत्व कशाला देत बसायचं

पुजा इज राइट ! अहो कधी कधी आपण ईतरांच्या( अती) हस्तक्षेपामुळे मुलीचा अथवा मुलाचा काही दोष नसताना सरळ बघण्याआधी नकार कळवतो जे चुकीच आहे अशाने बरीच चांग्ली स्थळ हातची जातात . ( स्वानुभवानी शहाणी झालेली पियु )

प्रतिसादही धाग्या इतकेच रोचक आहेत; पण एखाद्याने एखादा निर्णय घेऊन कृती करून झाल्यावर तू असं करायला नको होतं असं म्हणणे मला थोडंसं क्रूर वाटतं. उगाच त्या माणसाच्या मनात चुकचुक होत राहते. कथानायकाने जे केलं ते योग्यच होतं.

In reply to by नगरीनिरंजन

ननि काका तुम्ही जर असा प्रतिसाद दिलात तर धाग्याची शंभरी होइल का सांगा बरं :-/