Skip to main content

पार्कात दिसलेली 'ती'

लेखक वडापाव
गुरुवार, 14/11/2013 या दिवशी प्रकाशित केले.
उन्हाळ्याची सुटी चालू होती. तेव्हा मी रोज संध्याकाळी आमच्या शाळेच्या ग्रुपला बोलवायचो आणि त्यातले जे येतील त्यांच्याबरोबर गावभर हुंदडायचो. मी कॉमर्सचा विद्यार्थी त्यामुळे मला रोजच वेळ असायचा. आमचा अख्खा शाळेचा ग्रुप इंजिनिअरिंग कडे वळलेला. त्यामुळे माझ्या सुट्टीत त्यांच्या परिक्षा चालू नाहीतर क्लासेस तरी चालू. क्वचितच अख्खा ग्रुप जमायचा. असाच एकदा आमच्या ग्रुप मधल्या जान्हवी आणि पूजा मला भेटल्या. त्या दोघी एकमेकींच्या अगदी घट्ट मैत्रिणी. जान्हवी इंजिनिअरिंग करणारी, आणि पूजा ग्रुपमधली एकुलती एक कला शाखेची विद्यार्थिनी. दोघी ब-याच महिन्यांनी एकमेकींना भेटल्या होत्या त्यामुळे त्यांचा आनंद आणि उत्साह उतू चालला होता. आम्ही गीतांजलीत गेलो. बीएमसी ने दहिसरमध्ये बांधलेला मस्त पार्क आहे तो, वेल मेंटेन्डसुद्धा आहे. बसायला भरपूर जागा आहे, आणि फिरायला इंग्रजी क्यू अक्षराच्या आकाराचा ट्रॅक. मला चालायची सवय आणि आवड सुद्धा. पण या दोघी जाड्या म्हशी, नुसत्या त्या पार्कापर्यंत जाताना जे काही थोडंफार चाल्ल्या, तेवढ्यानेच दमून गेल्या. मला म्हणाल्या, तू पार्कात राऊंड मारत बस चालायची एवढी हौस आहे तर. तसंही आम्ही ब-याच दिवसांनी भेटलोय, तेव्हा आम्हांला जरा जीटी(गर्ल्स टॉक) करायचंय. सो आम्हाला डिस्टर्ब करु नकोस. मला ह्यांच्या जी-टॉक मध्ये अजिबात रस नसतो. मी एवढा चांगला बाजुला असताना कोणत्यातरी फडतूस लुख्ख्या मुलाला क्यूट म्हणून त्याच्या गप्पा मारत बसतात. ते ऐकण्यापेक्षा चालेन मी थोडासा, चालेल. म्हणून मी पार्कात फेरी मारायला लागलो. पार्क तसा मोठा आहे. बोरीवलीच्या सावरकर उद्यानाएवढा नसला, तरी ब-यापैकी मोठा आहे. ट्रॅकच्या एका बाजूला जागोजागी खांब लावल्येत. त्या खांबांना छोटे स्पिकर्स लावल्येत. हळू आवाजात त्यातून जुनी हिंदी गाणी, कधी कधी आरत्या, जुनी मराठी गाणी लावलेली ऐकू येतात. पार्कच्या मुख्य दरवाज्यापासून लांब असलेल्या, दुस-या टोकाला, लहान मुलांना खेळण्यासाठी घसरगुंडी वगैरे प्रकार आहेत. त्याची निगासुद्धा छान राखली जाते. समोरच सगळ्या वयोमानातल्या मुलांना पकडा-पकडी, लंगडीसारखे खेळ खेळायला प्रशस्त फ्लोअरिंग केलंय. त्याच्या शेजारीच फूटबॉलसाठी छोटंसं मैदानसुद्धा बांधलंय. पार्कच्या शेजारीच रिलायन्स इंटरनॅशनल स्कूलची इमारत आहे. तिथे काचेच्या भिंतींमधून आत चाल्लेली डान्स प्रॅक्टिस रोजच दिसत असते. पार्कात येणारे काही ज्येष्ठ नागरिक काचेमागच्या सुडौल आणि सुदृढ शरीराच्या पोरीबाळींकडे(म्हणजे त्यांच्या नाचाकडे) चष्मा सावरून बघत असतात अधून मधून. अशा नागरिकांना सपत्निक यायला आवडत नाही. पण काहीजणांचा नाईलाज असतो. असो. मी पार्कात ट्रॅकवरून फिरायला लागलो. २-३ फे-या मारल्यानंतर मुख्य गेटमधून २ माझ्या वयाच्या वाटणा-या मुली आत आलेल्या मी पाहिल्या. पार्कात अशा मुली येतच असतात अधून मधून... त्यांचे सखे मागाहून येतात, किंवा आधीच आलेले असतात. त्यामुळे सुरुवातीला मी विशेष लक्ष दिलं नाही. दहिसरमधल्या हिरवळीचा दर्जाही दिवसेंदिवस घसरतच चाल्लाय. त्याउलट आमच्या कॉलेजमध्ये चिक्कार जैवविविधता पाहायला मिळते. अर्थात, त्या वरायटीमधले कितीही प्रकार माझ्या नजरेत भरले, तरी आम्ही कोणाच्याच नजरेत भरत नाही याची खंत असतेच. असो. त्या दोघी मुली एका बाकडावर जाऊन गप्पा मारत बसल्या. मी त्या बाकड्याच्या बाजुने जाताना डोळ्याच्या कोप-यातून त्या मुलींकडे बघून घेतलं. एक जरा जाडी होती, दुसरी बारीक पण सुरेख होती. तिने चौकटीचा शर्ट घातला होता. बास, ओझरत्या नजरेत इतकंच कळलं. बाकी तपशील राऊंड २ मध्ये कळेल म्हणून मी थोडा पुढे गेल्यावर झप-झप पावलं टाकायला लागलो. मी आधीच लंबू टांग असल्याने माझा चालण्याचा नॉर्मल वेगच इतरांपेक्षा जास्त आहे, त्यात भरभर चालल्याने फेरी पटकन संपली. येउन बघतो तर बाकडावर कुणी नाही. मी मान फिरवून इकडे तिकडे शोधायला लागलो. बघतो तर थोड्याशा अंतरावरनं त्या माझ्या पाठीच येत होत्या. चौकटीच्या मुलीशी यावेळी माझी सरळ-सरळ नजरा-नजर झाली. छानच होती ती. मी तिच्याकडे बघितल्यावर तिने नजर हटवली नाही. की चेह-यावरचे भावही बदलले नाहीत. पण ती थोडी तिच्या मैत्रीणीजवळ सरकली. कदाचित यांना माझी शंका आली असावी. मी बाकड्याजवळ येऊन आता थबकलो होतो, त्यामुळे पुन्हा त्यांच्यासमोरच लगेच चालायला सुरुवात करणं मला बरोबर वाटलं नाही. त्यांची शंका वाढली असती. मी बसलो. बसताना डोळ्याच्या कोप-यातून तिच्याकडे मी बघत होतोच. मी बाकडावर बसल्याक्षणी त्यांच्या चालण्याचा वेग थोडा कमी झाल्यासारखा वाटला, जाणवला. पण त्या थांबल्या नाहीत, पुढे निघून गेल्या. त्या ट्रॅकवर एकाच दिशेने चालावं लागतं. वन-वे म्हणा ना. त्या माझ्या बाजुने पुढे निघून गेल्यावर मी उल्टा चालायला लागलो. ट्रॅकचा आकार क्यू सारखा आहे, पण सगळे लोक गोलाकार भागातच फिरतात. क्यूच्या शेपटीत सहसा कोणी शिरत नाही. मी शेपटीत शिरलो. शेपटीत शिरताना मी त्यांना दिसेन, अशी वेळ साधून शिरलो. शेपटीच्या शेवटच्या टोकाजवळ आल्यावर मी हळूच मागे वळून पाहिलं. त्या दोघीसुद्धा शेपटीत शिरल्या होत्या. मोबाईलमध्ये खुडबुड करण्याचं निमित्त साधून मी माझ्या चालण्याचा वेग भरपूर कमी केला. त्यांना माझ्या बरंच जवळ येऊ दिलं. मग मोबाईल खिशात घालून मी टोकापर्यंत चालत गेलो, आणि गिरकी घेतल्यागत वळलो. पुन्हा नजरानजर झाली. थोड्या वेळासाठी असं वाटलं, की ती हसली. त्या दोघी आता टोकाकडे चालत येत होता. ट्रॅकच्या दुतर्फा कट्टा आहे. त्या दोघी टोकाजवळ पोचायच्या आधीच मी कट्ट्यावर जाऊन बसलो. ते बघून ती चौकटीवाली मुलगी तिथेच थबकली. तिला ते अपेक्षित नव्हतं. तिच्या मैत्रीणीने तिला कोप-याने खुणावलं आणि दोघी टोकापर्यंत चालत जाऊन पुन्हा वळल्या. मी बसूनच राहिलो. दोघी वळून पुढे शेपटीबाहेर निघून गेल्या. तिने दोन-तीनदा मागे वळून पाहिलं, आणि मी तिच्याकडेच बघतोय हे कळल्यावर झटकन पुढे बघितलं. पोरगी माझ्या मागे लागली होती तर... आयला!! हा अनुभव नवीनच होता. माझी छाती धडधडायला लागली. मी पटकन जान्हवी आणि पूजाला जाऊन सांगितलं. दोघींनी मला उडवूनच लावलं. 'उगाच काहीतरी फेकू नकोस. तुझ्या मागे मुली कशाला लागतील रे? बघ जरा स्वतःकडे.' असं म्हणून फिदीफिदी हसायला लागल्या. तेवढ्यात त्या दोघीजणी आमच्या अगदी जवळून पुढे गेल्या. मी म्हटलं, 'ती चेक्सवाली आहे ना, ती बघत्येय सारखी माझ्याकडे' तशी पूजा म्हणाली, 'चल हा, राहूदे! एकवेळ ती दूसरी बघत्येय म्हणाला असतास तर पटलं असतं. ती चेक्सवाली चांगली आहे ती तुला कशाला भाव देईल? तूच बघत असशील सारखा तिच्याकडे' - 'तेच' जान्हवीने पुष्टी जोडली. मी म्हटलं मी सिद्ध करु शकतो. मी जिथे जातो तिथे त्या माझ्या पाठी पाठी येतात. नीट बघा आता. तशा दोघींनी भुवया उंचावल्या. 'बघु' असं म्हणाल्या. मी पुन्हा राऊंडवर निघालो. आता माझ्या मनात एक भिती निर्माण झाली. या मुलीला आता मला फॉलो करण्याचा कंटाळा येऊन तिने तसं करणं बंद केलं तर? पोपटच होईल की माझा. पण आता चॅलेंज घेतलं होतं, सो मी पुढे जाऊन चालायला लागलो. मी पूजाकडे पाहिलं. दोघी म्हशी माझ्यावर लक्ष ठेऊन होत्या. मी पुन्हा क्यूच्या शेपटीत शिरलो. माझा पाठलाग करणा-या मुलींनाही ते दिसलं. मी तसा ब-यापैकी काँफिडेंट होतो. पण ज्याची धास्ती होती, तेच झालं. त्या मुली काही शेपटीत शिरल्या नाहीत. माझा पोपट झाला. शेपटीतून बाहेर येऊन पाहतो तर जान्हवी आणि पूजा घोड्यासारख्या खिंकाळ्या फोडत हसत सुटल्या होत्या. पण मी हार मानली नव्हती. मी ट्रॅकवरून उलट्या दिशेने चालायला लागलो. ट्रॅकच्या वर्तुळाकार कक्षेत एका ठिकाणी माझी त्या दोन मुलींशी गाठ पडली. कुठून कोणास ठाऊक, त्या दोघींना अजून दोघीजणी येऊन मिळाल्या होत्या. चेक्सवालीशी नजरानजर झाली, पण जास्त वेळ नाही. पूजा-जान्हवी बसल्या होत्या त्या ठिकाणाहून हे दृश्य दिसणं शक्य नव्हतं. त्यात आधीच त्या ठेंगण्या. मी पुन्हा फेरी मारली, पुन्हा नजरानजर. पण यावेळी मी झटकन मान वळवली. ती मुलगी मात्र मलाच बघत असावी. मला कळेना, मुलगी असून ती मला बिनधास्त चेकआऊट करत होती आणि मी मात्र मुलगा असून एवढा का लाजत होतो? उत्तर मिळालं. दोघींच्या चार झाल्या आणि मला मायनॉरिटी कॉम्प्लेक्स आला. चेक्सवालीला माझ्यात इंटरेस्ट असल्याने ती बघत होती, आणि बाकी तिघी माझ्यात नेमकं बघण्यासारखं काय आहे, या कुतुहलाने माझ्याकडे बघत असाव्यात. मी धावतच पूजा आणि जान्हवीकडे गेलो. म्हटलं, 'झालं बराच वेळ बसलात तुम्ही. आता चाला माझ्याबरोबर. तुम्हांलाही दिसेल ती चेक्सवाली बघत्येय माझ्याकडे.' जान्हवी पूजा माझा पुनश्च पोपट होईल आणि त्यांना त्यावर मनसोक्त हसता येईल अशा आशेने उत्साहात उठल्या आणि माझ्याबरोबर चालायला लागल्या. आम्ही उलटे चालत होतो. आता मायनॉरिटी कॉम्प्लेक्स नव्हता. या दोघी म्हशी त्या चौघींना पुरून उरणा-या होत्या. पुन्हा फे-या मारल्या. तीन-चारदा नजरानजर झाल्यावर दोघींचा विश्वास बसला. खरंच कौस्तुभकडे बघत्येय ती मुलगी. मग त्या दोघी बसल्या आणि मला त्यांनी एकट्यालाच 'काहीतरी कर, बोल तिच्याशी. स्माईल तरी दे निदान व्यवस्थित' असं म्हणून एकट्यालाच पुन्हा एकदा फेरी मारायला पाठवलं. पण नजरानजरीपलिकडे गोष्ट पुढेच जाईना. शेवटी मीही कंटाळलो आणि पूजा-जान्हवीबरोबर जाऊन बसलो. चौघी आमच्या समोरून एक-दोनदा गेल्या, पण आता नजरानजर होईना. झालं, ती मुलगीही कंटाळली तर... जाऊद्या. आम्ही तिघं बाहेर पडलो. या दोघी मला 'फट्टू-फट्टू' म्हणून हिणवत होत्या. मी निराश झालो होतो. आम्ही गेटबाहेर पडल्यावर आरामात हळू हळू चालत पुढे निघालो. मी सहजच मागे वळून पाहिलं. बघतो तर चौघी आमच्या पाठोपाठ पार्क बाहेर पडल्या होत्या. चेक्सवाली आणि जाडीने दुस-या दोघींना बाय म्हटलं आणि त्या आमच्या मागोमाग येऊ लागल्या. मी खूश, जान्हवी आणि पूजा तर वेड्याच झाल्या. तेवढ्यात मला श्रीरंगचा कॉल आला. त्यालाही मी भेटायला येणार का म्हणून बोलावण्यासाठी कॉल केला होता. उचलला नव्हता त्याने. जान्हवीने माझ्या हातून सेल खेचून घेतला आणि बोलायला लागली, 'अरे श्रीरंग, कौस्तुभच्या मागे मुली लागल्यायत चक्क!! हो-हो खरंच लागल्यात आधी आम्हाला खरं वाटलं नाही पण ब्ला ब्ला ब्ला ब्ला--' सुरु झाली. मोठमोठ्या आवाजात बोलायला लागली. पूजा नुसती हसत होती. त्या दोघी मुली आमच्या मागेच होत्या. ब-यापैकी जवळ होत्या. त्यांना ऐकू गेलं असणार. माझी छाती जास्तच धडधडायला लागली. आणि त्या दोन मुलींनी रस्ता क्रॉस केला. उघडपणे 'काय यार, जरा हळू बोलायचं ना' आणि मनातल्या मनात असंख्य शिव्या मी जान्हवीला घातल्या. त्या मुली रस्ता ओलांडून आता एका गल्लीत शिरत होत्या. तिथून पुढे गेल्यावर त्या दिसेनाशा होणार होत्या. चेक्सवालीने मागे वळून पाहिलं. मी बघतच होतो. आयुष्यात कधी हिम्मत झाली नव्हती, पण या अनोळखी मुलीला मी धीर करून एक स्माईल दिली. ती मुलगी थांबली, हसली, आणि तिने चक्क 'बाय-बाय' अशा अर्थी हात हलवला. माझा विश्वासच बसेना. मी पाठी वळून माझ्या दिशेकडून येणा-या दुस-या कुणाला ती हात करत नाहीना, याची खात्री केली. आणि मग मीही हात केला. ती मुलगी पुन्हा हसली, आणि निघून गेली. माझ्या छातीची धडधड मात्र वाढतच चालली होती. अंगावर सारखा शहारा येत होता. आणि आपणही 'बघणेबल' आहोत, या साक्षात्काराने खुश होऊन घरी गेलो. त्यानंतर पार्कात ब-याचदा जाणं-येणं झालं. अजुनही होतं. पण 'ती' पुन्हा कधीच दिसली नाही.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 8796
प्रतिक्रिया 38

प्रतिक्रिया

तुमचं क्यासलिंग झालं भो....... आमच्या कॉलेजात असेच एक टवाळ पोरींचा गृप होता. ठरवू कोणाचातरी मोरु करयच्या पिजा पारचा तो गृप.

In reply to by विजुभाऊ

वर्चे स्टेटमेन्ट खालीलप्रमाणे वाचावे तुमचं क्यासलिंग झालं भो....... आमच्या कॉलेजात असेच एक टवाळ पोरींचा गृप होता. ठरवू कोणाचातरी मोरु करायच्या पैजा मारायचा तो गृप.

ऐसे छोटे छोटे हादसोंसे अपना कॉन्फीडन्स बढानेका वडापावजी. नाराज नय होने का. वैसे भी चलते चलते, कवायत भी हो जायेगी, और ऐसे और कोई मिल जायेगा . फिकर नाय करनेका.

वपा डाव दादा तू भीड बिनधास्त. "आपणही 'बघणेबल' आहोत, या साक्षात्काराने खुश होऊन घरी गेलो." याच्यात सर्व समजून जा भाव

In reply to by कपिलमुनी

कपिल्मुनी, एका महान मिपामित्राची आठवण या निमित्ताने तुम्ही जागी केलीत याबद्दल तुमचे आभार. आता या आठवणी बुडवून टाकण्यासाठी ग्लास भरणे आले... शॅ... - (गुलाबी जीन्स घ्यायची शेवटची इच्छा असलेला) सोकाजी जिला गुडघ्यावर खिसा, खिशाला एक फ्लॅप, फ्लॅप वर बोटभर लांबीची पट्टी आणि ती पट्टी अडकविण्यासाठी पुन्हा खिशावर एक स्टील ची रिं

आपणही 'बघणेबल' आहोत, हे आयुष्यात प्रत्येकाला वाटतंच कारण असा प्रसंग एकदातरी घडतोच आयुष्यात ! उत्कंठावर्धक लिखाण आहे. खूप छान !

दहिसरमधल्या हिरवळीचा दर्जाही दिवसेंदिवस घसरतच चाल्लाय. त्याउलट आमच्या कॉलेजमध्ये चिक्कार जैवविविधता पाहायला मिळते.
प्यार आ गया गधीपर तो परी क्या चिज है। वडापाव जी प्यार आने की कमी है। और कुछ नही.
पार्कात येणारे काही ज्येष्ठ नागरिक काचेमागच्या सुडौल आणि सुदृढ शरीराच्या पोरीबाळींकडे(म्हणजे त्यांच्या नाचाकडे) चष्मा सावरून बघत असतात अधून मधून. अशा नागरिकांना सपत्निक यायला आवडत नाही.
ज्येष्ठ नागरीकच का? तुम्हीही पाहताच आणि ते ही पाहतातच (मध्यमवयीन काय धुतल्या तांदूळासारखे असतात?) सर्वच जणं पाहतात मग फक्त ज्येष्ठांनाच का बरे आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करताय? ज्येष्ठांनी काय डोळे बंद करून रस्त्याने चालावे? कधीतरी तुम्हीही ज्येष्ठ होणार आहात. (तुम्ही व्हावे हाच माझा आशिर्वाद).
त्यानंतर पार्कात ब-याचदा जाणं-येणं झालं. अजुनही होतं. पण 'ती' पुन्हा कधीच दिसली नाही.
अरे यार! उसके लिए जीगर होनी चाहिए। जी मुलगी आवडली (आणि जिला तुम्ही आवडलात) तिला तिन्ही लोकांतूनही शोधून काढायला जीगर असावी लागते. असे हातपाय गाळून, असेल माझा हरी तर देईल......(बाकी समजून घ्या) असे म्हणून घटना मनासारख्या घडत नसतात. वडापावजी, दहिसरातच वाढलेल्या आणि प्रेमप्रकरणे (अनेकवचन) केलेल्या आमच्या सारख्या 'ज्येष्ठां'कडून शिका काही.

In reply to by प्रभाकर पेठकर

आमच्या सारख्या 'ज्येष्ठां'कडून शिका काही
प्रणाम गुरुवर्य !! " काकांचा सल्ला " हे सदर चालू व्ह्यायची वाट पहात आहे :)

In reply to by कपिलमुनी

पेठकर काकांना "केवळ पुरुषांसाठी" विभागात, निदान आमच्यासारख्या गरजू लोकांची सोय म्हणुन तरी, "काकांचा सल्ला" हे सदर चालू करण्याची विनंती करत आहे.

In reply to by प्रभाकर पेठकर

वडापावजी, दहिसरातच वाढलेल्या आणि प्रेमप्रकरणे (अनेकवचन) केलेल्या आमच्या सारख्या 'ज्येष्ठां'कडून शिका काही.
काकाऽऽ, मला वाचवा!!! त्या प्रेमप्रकरणांचा संक्षिप्त इतिहास ल्ह्या की ओ प्लीज, माझ्यासारख्या अनेक गरजूंची सोय होईल. :)

In reply to by बॅटमॅन

काकाऽऽ, मला वाचवा!!
संक्षिप्त इतिहास लिहायला बसलो तर 'काकूं'ना आयती सर्व डिटेल्स मिळतील आणि जो गहजब घडेल तो पाहिलात तर तुम्हाला 'अरे! काकांना कोणी वाचवा' असे बोंबलत फिरावे लागेल.

In reply to by प्रभाकर पेठकर

काय हे, बस का काका!! मूळ पदार्थ तोच, पण मसाला अन बाकी काही घटक वेगळे घालायचे, तसा पदार्थ तुम्ही बनवणे तत्त्वतः शक्य असले तरी तुम्ही बनवलाय असे कोणी कशाला म्हणेल ;) हे आम्ही तुम्हाला सांगायचं होय ;)

In reply to by प्रभाकर पेठकर

ज्येष्ठ नागरीकच का? तुम्हीही पाहताच आणि ते ही पाहतातच (मध्यमवयीन काय धुतल्या तांदूळासारखे असतात?)
आम्हीही पाहतोच की पण ते तसं न लिहून दाखवण्यामागे लुच्चेपणा होता. :) मध्यमवयीन लोक सहसा त्या पार्कात जास्त दिसत नाहीत.
असे हातपाय गाळून, असेल माझा हरी तर देईल......(बाकी समजून घ्या) असे म्हणून घटना मनासारख्या घडत नसतात.
हॅ हॅ हॅ हॅ
वडापावजी, दहिसरातच वाढलेल्या आणि प्रेमप्रकरणे (अनेकवचन) केलेल्या आमच्या सारख्या 'ज्येष्ठां'कडून शिका काही.
तोच तर प्रॉब्लेम आहे कोणी थोरली मंडळी या सगळ्या बाबतींत आम्हाला मार्गदर्शन करतच नाहीत. उलट असलेल्या मार्गांत अडवणूक केली जाते. तुमच्यासारखेच ज्येष्ठ मिळत नाहीत ना काका त्याचीच तर खंत आहे. :(

पदार्थ तुम्ही बनवणे तत्त्वतः शक्य असले तरी तुम्हीच बनवलाय असे कोणी कशाला म्हणेल
मान्य. पण स्वानुभवाशिवाय विधानांना वजन प्राप्त होत नाही. मग ते ललित लेखन होईल. इथे, ललित लेखनावरूनही वादळापूर्वीची शांतता, चक्रिवादळ आणि वादळानंतरची भयाण शांतता अनेकदा अनुभवली आहे. 'तुम्हाला हे सर्व सुचतं म्हणजे तुम्ही तसेच वागत असणार' असा अनाकलनिय आणि सर्वस्वी स्तंभित करणारा आरोपही झेलला आहे. हतबलता म्हणजे काय असते ते अशा परिस्थितीतच समजते. असो. भलत्या भरीस पाडू नका. प्रत्यक्ष भेटीत वाट्टेल त्या विषयावर चर्चा करू. हांSS आपण घाबरत नाही कोणाला.

In reply to by प्रभाकर पेठकर

अहो चालतं. ललित तर ललित. उद्देश काही का असेना, वाचून थोडे क्लू मिळतील.
इथे, ललित लेखनावरूनही वादळापूर्वीची शांतता, चक्रिवादळ आणि वादळानंतरची भयाण शांतता अनेकदा अनुभवली आहे. 'तुम्हाला हे सर्व सुचतं म्हणजे तुम्ही तसेच वागत असणार' असा अनाकलनिय आणि सर्वस्वी स्तंभित करणारा आरोपही झेलला आहे. हतबलता म्हणजे काय असते ते अशा परिस्थितीतच समजते. असो. भलत्या भरीस पाडू नका.
अरेरेरेरे....असो. शेलक्या विशेषणांनी गौरवण्यासच योग्य अशा लोकांच्या आरोपांना किती किंमत द्यायची हे तर तुम्हाला कोणी सांगायला नकोच. एनीवेज़, चुकूनमाकून मस्कतात कधी आलोच तर तुम्ही जेव्हा फ्री असाल तेव्हा अवश्य परामर्श घेतल्या जाईल. नपेक्षा तुम्ही भारतात आल्यावर कट्टा तर करूच.

मेस मधे एका स्त्रि बहुल अमराठी कंपू मधिल एक मुलगी अशीच उघड लाइन देत होती आठवडा गेला कन्फर्म होण्यात की ती फक्त माझ्यात विशेष रस घेत आहे! तो कंपू जणु माज्याशी जुनी ओळख असल्या प्रमाणे थोड़े थोड़े स्माइल देऊ लागला तरअवनी(मुळ नाव बदललेले नाही) अगदी आतुरतेने मी त्यांना केव्हा जॉइन होतोय याचे मूक निमत्रंण देत माज्या डोळ्यात डोळे घालून एक एक घास सावकाश घेत घेत शक्य तितके रेंगाळत जेवण संपवायची... आता कृती करायची वेळ माझी होती, मी ती केली. शांतपणे नजर चुकवत बहुदा कितीतरी महिन्यांनी मी प्रथमच भात चमच्याने न खाता हाताने घास घेउ लागलो... मग त्यांची प्रतिक्रिया बघायला नजर वळवली तो अवनी हाताने भात खात होतीच शिवाय नजरेत यात काय एव्हडे आम्ही सुध्दा भात हातानेच संपवतो हा भाव होता. मजा म्हणजे दुसऱ्या दिवसापासून सर्व कंपू चमच्या ऐवजी हाताने भात संपवु लागला. अन माझ्यासमोर मैत्रीचा हात पुढे करण्या शिवाय पर्यायच उरला नाही

परत काही गोष्ठी अठवुन मनात गुदगुल्या होतात राव !साला दिल तो एकदम डार्लिंग डार्लिंग हो गया.आज गाड्या घोडा सगळ काही मिळवल राव पण शाळाकॉलेजचे असे काही दिवस औरच राव.आमची तर थर्ड इयरलाच लग्न करुन विकेट पडली होती राव.जोडीनच कॉलेजला जायचो.

अरेरे! या बाबतीत आम्ही फारच मागास दिसतोय म्हणजे :( असो, पण भौ तुम्ही भिडा. आम्हीही आहोत पाठीशी ! ( तिच्या नाही तुमच्या :) )

अधिक बघणेबल व्हाल .. शिवाय मैत्रिणिंना असं सारखं म्हैस वगैरे म्हणू नका हो, त्यांनी कधी पण मिपा वरील तुमचा धागा वाचला तर शिंगावर घेतील ना..

In reply to by मराठी कथालेखक

उलट वडापाव जास्त खाल्ला तर बघणेबल होईन असं वाटतं. मैत्रिंणींनी बघितला धागा तरी हरकत नाही. एकतर इथे नावं बदलून टाकलीयत, आणि त्यांना तोंडावर म्हैस म्हणतो मी. :) तेवढं चालतं.

याला म्हणतात दैव देत आणी कर्म नेत. ज्यावेळी तुमच्यावर त्या दोन म्हशि खिदळत होत्या तेव्हाच तुम्हि त्याना डच्चु देवुन या नव्या पाखराकडे जायला हव होत. नसत्या पैजा लावत बसलात आणि तुमच्या नावाला जगलात. त्या दोन म्हशि पाव आणि तुम्हि मधला वडा. (स्वतह्चा वडा करुन घेतलात.)

शीर्षक बघून अंमळ या कवितेची आठवण झाली. मला पाऊस आवडतो, अन पावसात भिजलेली ती... पण तिला मी आवडत नाही म्हणून खड्ड्यात गेला पाऊस.. अन खड्ड्यात गेली ती =)) =)) =))