✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

एफर्टलेस मॅगी नूडल्स !

स
साळसकर यांनी
गुरुवार, 11/14/2013 - 09:51  ·  लेख
लेख
६ नोव्हेंबर २०१३. भारत बनाम वेस्टईंडिज. पहिला कसोटी सामना. सारा प्रकाश झोत सचिन रमेश तेंडुलकर वर. कारण देखील तसेच. क्रिकेटच्या या देवाची अखेरची कसोटी मालिका. कारकिर्दीतली शेवटून दुसरी आणि १९९ वी कसोटी. पहिल्या दिवशी टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेणारी वेस्टईंडिज २३४ ला गारद आणि भारत बिनबाद ३७. दुसर्‍यादिवशी सचिन बॅटींगला येणार म्हणून काही जणांनी चक्क सुट्ट्या टाकलेल्या. ज्यात एक मी देखील होतो, जो दुकान सोडून घरी थांबलेलो. सचिन बॅटींगला २ गडी बाद झाल्यावर येतो म्हणून घरी तशी सक्त ताकीदच देऊन ठेवली होती की दुसरी विकेट पडल्यापडल्याच मला उठवा. पण झोप लागतेय कोणाला, सामना सुरू व्ह्यायच्या आधीपासूनच एक्स्पर्ट कॉमेंट ऐकत मी टीव्हीसमोर ठाण मांडून. देवाकडे एकच प्रार्थना, सलामीवीरांना कमीतकमी खेळायची बुद्धी दे रे, अन देवाने ती ऐकली. अर्ध्या तासातच सचिन मैदानावर दिसू लागला. भारताची दुसरी विकेट पडल्यावर टाळ्यांचा एवढा कडकडाट आजवर झाला नसेल. पण आता पुढचे काही क्षण श्वास रोखून बसायचे होते, जो पर्यंत सचिन सेट होत नाही तो पर्यंत टीव्हीवरून नजर न हलवण्याचे होते. ऑन साईडला दोन सुरेख चौकार लगावत मी आज क्रिकेटरसिकांना पर्वणी द्यायला सज्ज आहे असा इशारा त्याने देताच मी जरा रिलॅक्स झालो, अन इथेच नियतीने डाव साधला. कांदेपोह्याचा चमचा तोंडाजवळ नेतो न नेतो तोच अचानक प्रतिस्पर्धी खेळाडूंचा एकच कल्ला. वर पाहिले तर एलबीडब्ल्यूची अपील, स्ट्राईकला सचिन, कॅमेरा अंपायरवर. त्या चेंडूवर नक्की काय घडले हे पाहिले नसल्याने श्वास घशात. जो पर्यंत तो अंपायर नकारार्थी मान हलवत नाही तोपर्यंत. पण त्याने बोट उचलले आणि खेळ खल्लास, रंगात भंग, क्रिकेटप्रेमींचा पचका. पुढचे काही क्षण एकच शांतता. तिथेही आणि इथेही. रिप्लेमध्ये निर्णय संशयास्पद दिसत असल्याने थोडी निराशा, थोडी चीडचीड. मात्र थोड्याच वेळात परिस्थितीचे भान राखून ग्राऊंडबाहेर पडणार्‍या सचिनसाठी पुन्हा टाळ्यांचा कडकडाट. कारण एका अपयशी इनिंगने त्याच्या आजवरच्या कामगिरीचे मोल तीळमात्र कमी होणार नव्हते. सचिन निराश मनाने मानवंदना स्विकारत पॅवेलियनमध्ये दाखल..! - एण्ड ऑफ पार्ट वन - . . . अ‍ॅण्ड नाऊ, - पार्ट टू - सचिन बाद झाल्यावर टिव्ही बंद करायचे दिवस आता गेले. नव्या दमाचे खेळाडू या बिकट परिस्थितीतून बाहेर काढतात का यावर आता सार्‍यांच्या नजरा. धवन, विजय, पुजारा हे तिघे सचिनच्या आधीच तंबूत परतले होते तर फॉर्मातला आणि भरवश्याचा कोहली सचिनपाठोपाठ माघारी. बिनबाद ३७ ने झालेली दिवसाची सुरुवात तासाभरात ८३ धावा ५ बाद या स्थितीत परिवर्तित. खेळपट्टीवर संकट मोचक धोनी आणि आपला पहिलावहिलाच कसोटी सामना खेळणारा रोहित शर्मा. वेस्टईंडिज फिरकी गोलंदाज शिलिंगफोर्डने विणलेल्या जाळ्यातना बाहेर पडायच्या प्रयत्नात असलेला भारतीय संघ पाहताना नुकत्याच झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत स्वान आणि पानीसरने आपली उडवलेली धांदल सर्वांच्या ताजी स्मरणात. आपल्या सदोष तंत्रासह बचाव करावा की आपले शक्तीस्थान वापरून काऊंटर अ‍ॅटेक करावा या चक्रव्यूहात फसलेला कर्णधार माही. इथून आपण एका पराभवाच्या दिशेनेच प्रवास करणार आहोत असे समजून चुकलेला प्रेक्षक. मात्र इथेच सर्वांचे अंदाज चुकवून गेला तो आपला सध्याचा सर्वात लाडका फलंदाज रोहित गुरुनाथ शर्मा ! पण खरेच तो अंदाज चुकवून गेला का??? माझ्यासाठी तरी याचे उत्तर - नाही. इतर कोणाला नसेल पण मला त्याच्याबद्दल पुरेपूर खात्री होती. माझ्या रिकाम्या पोह्यांची प्लेट उचलायला म्हणून आलेल्या वहिनीची स्कोअरबोर्ड वर नजर जाताच ती ओरडली, अरे देवा ..!! जेमतेम क्रिकेट समजणार्‍या जगातल्या सर्वच बायकांची उत्स्फुर्त प्रतिक्रिया नेहमीच अशीच अतिउत्साही असते. त्यातही रोहित शर्माला खेळपट्टीवर पाहताच तिने सरळ पाचाच्या सहा विकेट मोजल्या. कारण एकेकाळी त्याचे खराब दिवस चालू असताना, जेव्हा तो बरेचदा आल्याआल्याच हजेरी लाऊन परत जायचा तेव्हा आमच्या दादाने त्याला "मॅगी नूडल्स" हे नाव दिले होते. मॅगी नूडल्स म्हणजे बस्स, दोन मिनिटांचाच खेळ..! आणि हेच तिच्या लक्षात राहिले होते. कदाचित गेल्या वर्षभरात त्याने केलेली लक्षवेधी कामगिरी त्यांचे लक्ष वेधून घेण्यास कमी पडल्याने अजूनही ते दोघे त्याला त्याच नावाने हाक मारायचे. आज आपल्या कारकिर्दितील पहिल्याच कसोटीत संघातली स्वताची जागा बनवायच्या दडपणाव्यतिरीक्त आता भारताचा डाव सावरायचे अतिरीक्त दडपण पाहता दादा देखील वहिनीच्या हो मध्ये हो मिसळवून मोकळा झाला. पण मला मात्र कमालीचा विश्वास होता की कदाचित स्वताची जागा टिकवण्याच्या दडपणाखाली तो बाद झाला असता, मात्र संघहिताचे दडपण त्याच्या पथ्यावरच पडणार होते. कारण हेच त्याला आवडते, अश्या परिस्थितीत खेळणे हिच त्याची खासियत आहे आणि म्हणूनच इथूनच सुरू होणार होती एक लेझी एलिगन्स असलेली एफर्टलेस फटक्यांनी भरपूर खेळी ! धोनीबरोबर त्याने केलेल्या ७३ धावांच्या भागिदारीने नामुष्कीच नाही टाळली तर सामन्यात आपल्याला थोडेफार परत आणले होते. तरीही धोनीच्या बाद होण्यानंतर डाव पटकन गुंडाळला जाण्याचा धोका होताच. कमी धावांच्या सामन्यात पाचपन्नास धावांचा लीड देखील कोण घेतो याने फरक पडतो. मात्र आश्विनच्या जोडीने त्याने आपला सहजसुंदर खेळ तसाच सुरू ठेवला. बघता बघता त्याचे शतक धावफलकावर लागले तर आश्विनचे अर्धशतक. धावगती कसोटीला अनुसरून असली तरी बघता बघता एवढ्यासाठीच म्हणालो कारण रोहित टोटल चान्सलेस इनिंग खेळत होता, कधीही आता हा पटकन बाद होईल आणि वेस्टईंडिज सामन्यात परत येईल असे वाटत नव्हते. त्यामुळे घड्याळाचा काटा जसा सरकत होता तसे धावांचे चक्र फिरत होते. आपण वेस्टईंडिजचा स्कोअर केव्हाच पार करून आता त्यांना लीड द्यायला सुरुवात केली होती. दडपण दडपण ज्याला म्हणतात ते केव्हाच झुगारले गेले होते, नव्हे आता ते दोघांनी मिळून वेस्टईंडिजच्या माथ्यावर नेऊन टाकले होते. तरीही, खराब होत जाणार्‍या खेळपट्टीवर चौथ्या डावात कमीतकमी फलंदाजी करण्यासाठी हा डाव शक्य तितका लांबवणे गरजेचे होते आणि नेमके हेच त्याने ओळखून शतकानंतरही कुठलीही घाईगडबड न करता आपली रनमशीन चालूच ठेवली. पलीकडून आश्विनचे शतक झाले आणि इथे रोहित शर्माने रेकॉर्डबूकमध्ये आपले नाव नोंदवले होते. पहिल्याच सामन्यात द्विशतक झळकावणार्‍या निवडक खेळाडूंच्या पंक्तीत बसायचा मान त्याने थोडक्यात गमावला असला तरी तब्बल १७७ धावांची बोहणी केली होती. ज्या स्थितीतून त्याने सामना खेचून आणला ते पाहता सामनावीराचा बहुमान अर्थातच त्यालाच देण्यात आला. मुंबईकर सचिनचा खेळ पहायला आलेल्या कोलकतावासीयांची नाराजगी कमी कशी करता येईल हे एका दुसर्‍या मुंबईकराने पाहिले होते ! जे क्रिकेट नियमित फॉलो करतात त्यांना रोहितच्या गेल्या वर्षभरातील कामगिरी बद्दल खोलात जाऊन सांगायला नकोच. तरीही आकड्यांचा खेळ न करता सांगायचे झाल्यास यंदाच्या वर्षी एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा त्याच्याच असाव्यात. त्यातही नुकतेच ऑस्ट्रेलियाविरुद्ध झळकावलेले धडाकेबाज आणि सोळा षटकारांनी सजलेले द्विशतक कोण कसे विसरणार. आयपीएल आणि चॅम्पियन ट्रॉफी या ट्वेंटी-२० क्रिकेटच्या फॉर्मेटमध्येदेखील त्याच्या मोक्याचा क्षणी भरभरून केलेल्या धावांमुळेच मुंबईने या दोन्ही चषकांवर आपले नाव कोरले. एक कर्णधार म्हणून दडपण न घेता खेळ उंचावण्याची त्याची क्षमता विशेषच. आता कसोटीत देखील त्याने आपला पहिलाच शिक्का खणखणीत उमटवला आहे आणि हे तो पुढेही करणार यात कोणतीही भविष्यवाणी नाहीये. सामना जिंकवून द्यायची क्षमता असलेल्या एखाद्या खेळाडूला आपण मॅचविनर असे संबोधतो मात्र त्याच निकषावर मी रोहितचा उल्लेख सिरीज विनर म्हणून करेन. एक गंमतीशीर तुलना करायची झाल्यास, रोहितची आजवरची कारकिर्द मला "कोई मिल गया" चित्रपटातील हृतिक रोशन सारखी वाटते. त्यात हृतिकचे नाव "रोहित मेहरा" होते, तर हा आपला रोहित शर्मा. तेच नाव, तसेच आडनाव बस्स काही अल्फाबेट्स आपली जागा बदलून येतात, पण कमाल मात्र तीच. त्या सिनेमात आधी इतरांपेक्षा दुबळा म्हणून गणल्या गेलेल्या हृतिकमध्ये अचानक जादू’च्या चमत्काराने एवढी ताकद येते की की तो बास्केटबॉलचा बॉल लीलया आकाशात भिरकाऊन देतो. तर इथेही एकेकाळी संघात जागा मिळवण्यासाठी धडपड करत असलेला रोहित आजकाल चमत्कार झाल्यासारखे क्रिकेटचा चेंडू लीलया सीमारेषेच्या पार भिरकाऊ लागला आहे. पण हा कायापालट चमत्काराने नक्कीच झाला नाहीये ना यामागे कुठली जादू आहे. त्याच्यात असलेल्या टॅलेंटबद्दल सुरूवातीपासूनच कोणालाही शंका नव्हती. क्रिकेटचे जाणकार हे वेळोवेळी बोलून दाखवायचे तर सामान्य क्रिकेटरसिकाला देखील त्याच्या काही खास ठेवणीतल्या फटक्यातून ते जाणवायचे. पण नेमके काय गंडले आहे ते समजत नव्हते आणि त्यामुळे त्याच्यातले फलंदाजीचे असामान्य स्किल धावांमध्ये परावर्तित होत नव्हते. काहींच्या मते त्याचे शॉट सिलेक्शन चुकायचे तर काहींच्या मते टेंपरामेंटचा प्रॉब्लेम होता. पण ते जे काही होते त्याला तो आता दूर भिरकाऊन देऊन सज्ज झाला आहे एवढे मात्र नक्की. असे म्हणतात की टॅलेंट आणि ग्रेटनेस एका पिढीतून दुसर्‍या पिढीत पास होत असते. हेच जर फलंदाजीच्या कौशल्याबद्दल असेल तर ते नेहमी एका मुंबईकराकडून दुसर्‍या मुंबईकराकडे पास होत आलेय. ‘लिटील मास्टर’ सुनिल गावस्करच्या पर्वानंतर ‘मास्टर ब्लास्टर’ सचिनने या खेळावर आपली हुकुमत गाजवली, तर येणारा काळ नक्कीच ‘एफर्टलेस वंडर’ रोहित शर्माचा असेल. सचिनच्या अंतिम कसोटी मालिकेत रोहितचे होणारे पदार्पण हा निव्वळ योगायोग नक्कीच नसावा नाही का ! - अंड्या उर्फ आनंद
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
क्रीडा
लेखनप्रकार (Writing Type)
लेख

प्रतिक्रिया द्या
6060 वाचन

💬 प्रतिसाद (34)

प्रतिक्रिया

छान लेख

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 11/14/2013 - 10:09 नवीन
छान...! रोहित जब्राच खेळला. >>>>सचिन बाद झाल्यावर टिव्ही बंद करायचे दिवस आता गेले. :) अहो, पूर्वीही तसं नव्हतं. असो, आज उगा सच्या फ्यानला नाराज नको करायला. बाकी, रोहित शर्मा आणि विराट कोहली ही तुफान जोडी क्रिकेटला लोकप्रिय करेल असे वाटते. अर्थात नवनवीन क्रिकेट खेळाडुंनी क्रिकेट रंगतदार करावं. सचिनला मागे विचारलं होतं की तुमच्या नंतर तुमचे रेकॉर्ड्स कोण मोडेल असं वाटतं तर त्याने रोहित आणि विराटचं नाव घेतलं होतं. अर्थात दोघांनाही सच्यासारखी फॉर्म्सनुसार वर्षानुवर्ष खेळायची संधी मिळावी. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

@. सचिनच्या अंतिम कसोटी

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 11/14/2013 - 10:37 नवीन
@. सचिनच्या अंतिम कसोटी मालिकेत रोहितचे होणारे पदार्पण हा निव्वळ योगायोग नक्कीच नसावा नाही का !>>> करेक्ट ! +++१११ :) @ती ओरडली, अरे देवा ..!! जेमतेम क्रिकेट समजणार्‍या जगातल्या सर्वच बायकांची उत्स्फुर्त प्रतिक्रिया नेहमीच अशीच अतिउत्साही असते>>> :-D रनरेटर विधान! :-D
  • Log in or register to post comments

अहो ते वाक्य तसे नाही

साळसकर
गुरुवार, 11/14/2013 - 10:44 नवीन
अहो ते वाक्य तसे नाही की सर्वच बायकांना जेमतेम क्रिकेट समजते... तर असे आहे की ज्या ज्या बायकांना जेमतेम क्रिकेट समजते त्यांची टिपिकल स्टाईल अशीच असते.. अतिउत्साही प्रतिक्रिया.. अर्थात, हे माझे निरीक्षण आहे.. बाकी जराही क्रिकेट न समजणार्‍या बायका दूर राहतात, आणि चांगले क्रिकेट समजणार्‍या योग्य अन अचूक तेवढेच बोलतात.. एवरेज काढला तर नक्कीच पुरुषांना बायकांच्या तुलनेत क्रिकेटमधील जास्त समजते आणि जास्त आवड असते, पण सरसकट सर्वच बायकांना कमी दाखवण्याचा हेतू नव्हता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

हर हर महादेव!!! __/\__

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 11/14/2013 - 12:47 नवीन
हर हर महादेव!!! __/\__
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साळसकर

त्यांना प्रतिसाद खेचायचे

यशोधरा
गुरुवार, 11/14/2013 - 12:52 नवीन
त्यांना प्रतिसाद खेचायचे असतील! तुम्हांला समजत नाय अ आ. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

हम्म्म्म्म....! तेच खरं!

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 11/14/2013 - 13:11 नवीन
हम्म्म्म्म....! तेच खरं! त्या वाक्यापुढे ही Image removed. स्मायली टाकुन गपायला हवं होतं
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

दर प्रतिसाद खेचण्यामागे इथे

साळसकर
गुरुवार, 11/14/2013 - 13:15 नवीन
दर प्रतिसाद खेचण्यामागे इथे मला बोनस पॉईंट मिळून पुढे नाताळच्या शॉपिंगच्या वेळी त्यानुसार सवलत मिळणार आहे का हो.. त्यापेक्षा देवाकडे प्रार्थना करेन की मला येणारे ४-१४ प्रतिसाद तू घे आणि बदल्यात रोहित वा सचिनला ४० धावा काढू दे..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

सचिनला ४० धावा? अरारा! ४००

यशोधरा
गुरुवार, 11/14/2013 - 13:30 नवीन
सचिनला ४० धावा? अरारा! ४०० तरी म्हणायचे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साळसकर

अहो आता बास्स की!

प्यारे१
गुरुवार, 11/14/2013 - 13:34 नवीन
अहो आता बास्स की! त्या सचिनला किती छळाल? ;) ते प्रा. डॉ. सचिनचे फ्यान आहेत की टीकाकार आजवर समजलं नाहीये मला. बाकी आम्हाला पूजायला कुणीतरी 'गणपती' वर्षभर लागतोच. सचिन गेला नाही तोवर रोहित शर्मा, विराट कोहली ह्यांच्या नावाने संझगिरींचे लेख यायला सुरु झाले. 'रात गयी बात गयी' सारखी दुनिया हाय एकंदर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

ओक्के अल्जेरियन दादा!

यशोधरा
गुरुवार, 11/14/2013 - 13:35 नवीन
ओक्के अल्जेरियन दादा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

अल्जेरियन दादा!

बॅटमॅन
गुरुवार, 11/14/2013 - 14:17 नवीन
अल्जेरियन दादा!
अल्जीरियाच्या राजधानीत "तमाम खालांचा दावा आहे, प्यारे भाऊ छावा आहे", "केली एकच मेल-भसाभस निघालं तेल", "तमाम अल्जीरिया के जानिब से आप का इस्तेकबाल- प्यारे" इ.इ. घोषणांसकट बाजूला अरबी झग्यात एका हातात फिरनी आणि दुसर्‍या हातात फलाफल घेऊन प्यारेभौंचा फटू आणि खाली "होऊ दे खर्च, तेल आहे घरचं" अशा ट्यागलैनसकट समस्त अल्जीरियन नेत्यांचे, झालंच तर एखाददुसर्‍या सौदी प्रिन्सचे फटू असलेले फ्लेक्स डोळ्यांपुढे दिसून क्षणभर अं.ह. झालो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

(No subject)

यशोधरा
गुरुवार, 11/14/2013 - 14:18 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

मेलो मेलो मेलो!

प्यारे१
गुरुवार, 11/14/2013 - 14:45 नवीन
मेलो मेलो मेलो! बाकी जमलंय. पण >>>सौदी प्रिन्सचे फटू असलेले फ्लेक्स लई खुन्नस हाय बे सौदी वाल्यांशी. फक्त मक्का आहे म्हणून सौदी चांगलं बास्स. अल्जेरियन लोक्स लई मोक्काळ आहेत. त्यांना धर्माच्या नावावर बंधनांचा प्रचंड राग आहे. सौदी वाले ह्यांना मानत नाहीत नि हे सौदी वाल्यांना. (देशस्थ- कोकणस्थांसारखं आहे.) दाढीच वाढव, बुरखाच घाल अशा नि त्याहून जास्त कट्टरतेच्या 'जबरदस्तीविषयी' ह्यांना लई राग आहे. आम्ही मुसलमान आहोत नि त्याबद्दल अभिमान पण आहे पण उगा शो ऑफ वगैरे नाही असं... हे व्हायचं कारण म्हणजे अल कायदा नि तत्स म लोकांनी २० वर्षांपूर्वी केलेले गोंधळ. मुळात १३० वर्षं फ्रेंचांनी केलेल्या राज्यामुळं 'मोकळे'पणा ठाऊक आहे ह्यांना. असो. लई अवांतर झालं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

हम्म बरोबरच आहे. सौदी वाले

बॅटमॅन
गुरुवार, 11/14/2013 - 14:53 नवीन
हम्म बरोबरच आहे. सौदी वाले तसेही वायझेडच आहेत. फक्त त्यांचे अल्जीरियावाल्यांशी सुद्धा वाकडे आहे हे नव्याने कळाले, याबद्दल आधी कधी वाचनात आलेले नव्हते. आम्ही जवळपास अख्खी उत्तर आफ्रिका खंप्लीट अरबाळलेली आहे असेच समजत होतो. अन सौदी-अल्जीरिया अन देब्रा-कोब्रा ही तुलना म्हणजे चिकन चेट्टिनाड-कोल्लापुरी गावरान कोंबडी आणि आमटी-सांबार यांच्या तुलनेगत वाटली ;) कुठे तो तिखटजाळपणा आणि कुठे हे पाणीदार पदार्थ =)) बाकी इराणी लोकही अरबांवर असेच चिडून असलेले पाहिलेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

वाईट वाटलं...

प्रभाकर पेठकर
गुरुवार, 11/14/2013 - 15:09 नवीन
सौदी-अल्जीरिया अन देब्रा-कोब्रा ही तुलना म्हणजे चिकन चेट्टिनाड-कोल्लापुरी गावरान कोंबडी आणि आमटी-सांबार यांच्या तुलनेगत वाटली
शिवाजी महाराज, पेशवे, स्वराज्य तसेच स्वातंत्र्यासाठी लढलेल्या अगणित स्वर्गस्थ कोब्रा-देब्रांच्या जीवाला झालेल्या यातना समजुन घेतल्यास त्यांचे आत्मे शांत होतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

पेठकरकाका, कृपया गैरसमज नसावा

बॅटमॅन
गुरुवार, 11/14/2013 - 15:12 नवीन
पेठकरकाका, कृपया गैरसमज नसावा. देब्रा-कोब्रा समाज पानीकम आहेत असे दाखवण्याचा आजिबात हेतू नव्हता. एकमेकांना न मानणे या भावनेची तीव्रता दाखवण्यासाठी ती उपमा दिली इतकेच. बाकी भावना पोचल्या अन त्यांच्याशी अर्थातच सहमत आहे :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

@ "केली एकच मेल-भसाभस निघालं

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 11/14/2013 - 15:08 नवीन
@ "केली एकच मेल-भसाभस निघालं तेल" >>> Image removed. हसून हसून हार्ट-फेल! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

अय्या दादा काय म्हणतेस ??

जेनी...
Fri, 11/15/2013 - 22:18 नवीन
अय्या दादा काय म्हणतेस ?? काका ंहेत ना ते ??? :-/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

विराट कोहलीचे नाव नका काढू

साळसकर
गुरुवार, 11/14/2013 - 13:38 नवीन
माझा अत्यंत नावडता खेळाडू.. अत्यंत उद्दाम आणि बेशिस्त वर्तन !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

हम्म.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 11/14/2013 - 15:06 नवीन
आता तरुण पोरं म्हटल्यावर थोडा उद्दामपणा करणारच ना... पण, त्याचे फटके कडक असतात राव. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साळसकर

खरय हो

साळसकर
गुरुवार, 11/14/2013 - 15:39 नवीन
म्हणून जास्त वाईट वाटते, उगाच तरुणांसमोर चुकीचा आदर्श ठेवला जातो. सध्या तो जाहिरातदारांसाठी ब्रांड वॅल्यू झाल्याने वर्तणूकीवर कंट्रोल ठेवायला बघतो, ठेवायला लागतेच, बघूया येत्या काळात कसे ते.. असो, मध्यंतरी त्याचा एक फेसबूकावर फोटो पाहिला होता, एका पार्टीमध्ये तो अत्यंत खालच्या पातळीचे एक चित्र टी-शर्टवर मिरवत होता. अन त्यात फेक वगैरे काही वाटत नव्हते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

हाच तो अश्लील टीशर्ट फोटो

साळसकर
गुरुवार, 11/14/2013 - 23:32 नवीन
लिंक - http://www.pardaphash.com/news/virat-kohli-tshirt-becomes-a-buzz/711825.html संबंधित बातमी देखील आहे, असा युथ आयकॉन नसला तरच बरे नाही का..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

च्यायला....

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 11/15/2013 - 09:19 नवीन
हम्म, जरा जास्तच फाल्तुपणा वाटतोय. :( भो खेळावर लक्ष दे म्हणावं. चला, सच्याची ब्याटींग पाहुन घेऊ एकदा. आज अर्धा तास मैदानावर टीकला तर मोठी धावसंख्या उभारील असे वाटते. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साळसकर

हाहा

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 11/14/2013 - 14:57 नवीन
>>>> ते प्रा. डॉ. सचिनचे फ्यान आहेत की टीकाकार आजवर समजलं नाहीये मला. =)) सच्याला एक विनिंग खेळायला मिळते की दोन कोणास ठाऊक ? मला वाटतं भारतीय फलंदाज धावांचा डोंगर उभा करतील आणि विंडिजला पराभव स्वीकारावा लागेल. आता सचिन फ्यान क्लबला विनंती की मला विचारु नका की सच्या किती धावा करेल ते ? सच्या आज लवकर बाद झाला तरी सच्याच्या निवृत्तीमुळे सच्या फ्यान क्लबच्या भावनांना आवर घालणे तसे कठीन जाणार आहे, तेव्हा त्याची कारकिर्द पाहता त्याला पुन्हा खेळु द्यावे, इथपर्यंत माझं मत बनलं आहे. :) स्कोर नाऊ भारत बिनबाद ३७/० :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

आला सचिन बॅटींगला..

साळसकर
गुरुवार, 11/14/2013 - 15:50 नवीन
आज खेळणार तो... करोडोंची बेटींग लागलीय.. वरील दोन्ही विधानांचा आपसात संबंध नाही..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अहो माझ्यातर्फे ४०

साळसकर
गुरुवार, 11/14/2013 - 13:37 नवीन
थोडा हातभार तुम्ही पण लावा की.. लेख लिहा, प्रतिसाद कमवा, धावांत रुपांतर करा, आणि वाटा :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

>>> तर येणारा काळ नक्कीच

श्रीगुरुजी
गुरुवार, 11/14/2013 - 15:17 नवीन
>>> तर येणारा काळ नक्कीच ‘एफर्टलेस वंडर’ रोहित शर्माचा असेल. जरा धीर धरा. इतक्यात निष्कर्ष काढू नका. २००७ मध्ये पदार्पण केल्यावर तब्बल साडेपाच वर्षांनी रोहीत शर्मा धावा करायला लागला आहे. २०१२ मध्ये त्याने १४ एकदिवसीय सामन्यात एकूण १६८ धावा केल्या होत्या. द. आफ्रिका व ऑस्ट्रेलियात तो टिकाव धरतो का ते बघू. त्यानंतरच तो 'एफर्टलेस वंडर' आहे का 'दो दिन का मेहमान' आहे ते कळेल. शिखर धवन व मुरली विजयची हीच कथा आहे. अनेक वर्षे संधी मिळाल्यावर गेल्या वर्षाभरात त्यांनी धावा करायला सुरूवात केली आहे. आफ्रिका व ऑस्ट्रेलियात त्यांचा खरा कस लागेल.
  • Log in or register to post comments

सहमत आहे तसा..

साळसकर
गुरुवार, 11/14/2013 - 15:49 नवीन
धवनची ग्यारंटी तशी मी घेणार नाहीच, मुरली विजय माझ्यामते सर्वसाधारण खेळाडू आहे जो कायम येत जात राहणार, कोणी त्याची जागा घेणारा भेटला तर कायमचा बाहेरही जायला वेळ नाही लागणार. रोहितबद्दल बोलायचे झाल्यास आवडीचा खेळाडू असल्याने थोडे कवतुक आपसूक जास्त झाले असणार, मात्र त्याच्या आधीच्या अपयशांना बेनेफिट ऑफ डाऊट देता येईल. बरेच खेळाडूंना कारकिर्दीच्या एका टप्प्यावर एका किकची गरज असते जिथून ते मागे वळून पाहत नाहीत, सारेच वयाच्या सोळाव्या वर्षांपासून चमकतील असे सचिन नसतात. त्याच्या आधीच्या अपयशांचा उल्लेख मी लेखात केला आहेच, पण सध्याचे त्याचे वर्ष नुसते फॉर्मवर नाही तर फॉर्म+क्लास याचा मिलाप आहे या विश्वासानेच हा लेख टाकला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

छान लिहिलंय

पैसा
Fri, 11/15/2013 - 10:51 नवीन
मुंबईत चांगल्या फलंदाजांची परंपरा आहेच. आणि रोहित शर्मा नक्की त्याच परंपरेतला आहे. मग त्याला दो मिनट्स म्हणा नाहीतर आणखी काही!
  • Log in or register to post comments

एफर्टलेस रोहितने आज लाज राखली

साळसकर
Fri, 11/15/2013 - 16:47 नवीन
एफर्टलेस रोहितने आज लाज राखली माझ्या लिखाणाची !
  • Log in or register to post comments

++++१

झंम्प्या
Fri, 11/15/2013 - 17:27 नवीन
++++१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साळसकर

दुसरी इनिंग होईल असे वाटत नाही.

अनन्न्या
Fri, 11/15/2013 - 17:24 नवीन
आजची खेळी सचिनची शेवटची खेळी ठरेल असे वाटतेय.
  • Log in or register to post comments

आजची खेळी ही सचिनची शेवटचीच

श्रीगुरुजी
Fri, 11/15/2013 - 20:04 नवीन
आजची खेळी ही सचिनची शेवटचीच खेळी. विंडीज डावाने हरतील. यदाकदाचित विंडिजने डावाचा पराभव टाळला तर धोनीने दुसर्‍या डावात सचिनला सलामीला पाठवावे. खरं तर या सामन्यात नाणेफेक जिंकल्यावर धोनीने फलंदाजी घ्यायला हवी होती, म्हणजे सचिनला २ डाव मिळाले असते. पण या डावात ७४ करून शेवट गोड केला त्याने. आता तो परत खेळताना दिसणार नाही. आता यापुढे फक्त मर्त्य मानवच क्रिकेट खेळताना दिसतील. तो क्रिकेटमधून निवृत्त झाला तरी आमच्यासारख्या कोट्यावधी भक्तांच्या हृदयातून तो कधीच निवृत्त होणार नाही. तिथे त्याचे स्थान अढळ आहे.
  • Log in or register to post comments

गोलंदाजीचा टर्न बाकी आहे अजून

साळसकर
Fri, 11/15/2013 - 21:36 नवीन
आणि उद्या धोनी ती नक्की देणारच ! सचिन विकेट देखील हमखास काढणार ! उलट एखादा तळाचा फलंदाज स्वताचे नाव सचिनची शेवटची विकेट म्हणून रेकॉर्डबूकमध्ये सन्मानाने नोंदवण्यासाठी हसत हसत सुळीवर चढेल ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा