Skip to main content

दिवाळीच्या निमित्ताने : वर्दीतला "तो" आणि आपण.....

लेखक माम्लेदारचा पन्खा यांनी शनिवार, 26/10/2013 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रांनो,एव्हाना सगळीकडे दिवाळी निमित्त धामधूम सुरु झाली असेल....नवीन खरेदी,फराळाची तयारी,छान छान बेत अशा उत्साह वातावरणात ओसंडून वाहतोय....एरवी महागाईने कंबरडे मोडलेले असले तरी ह्या दिवसात माणसं जमेल तशी हौसमौज करून घेतातच. उच्च मध्यमवर्गीय आणि श्रीमंत गणल्या जाणाऱ्या वर्गात तर दिवाळी हे मोठेच प्रस्थ असते. जो तो आपापल्या वकुबाप्रमाणे दिवाळीचा आनंद घेत असतो.अशा दिवसांचा आनंद न होता त्यांच्या कल्पनेनेच पोटात गोळा येणारा एक उपेक्षित वर्ग आपल्या समाजात आहे आणि तो म्हणजे लहानपणी ज्याच्याविषयी भीती वाटते अथवा घालण्यात येते,मोठेपणी ज्याचा आदर वाटतो, संकटाच्या प्रसंगी ज्याच आधार वाटतो आणि त्याच्याविषयी एखादी बातमी कळल्यावर त्याची जाहीर निंदा नालस्ती होते,शिव्या शाप ऐकायला मिळतात आणि तरीही आपले कर्तव्य रात्रंदिवस बाराही महिने अथकपणे करतच राहतो असा वर्दीतला "तो". मीही परवा सहकुटुंब दिवाळीची खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत गेलो होतो. रस्त्यात माणसांपेक्षा वाहनेच जास्त झाल्यामुळे आता उडणाऱ्या गाड्यांच्या निर्मितीला आणि व्यापाराला खूप सुगीचे दिवस आहेत असे प्रकर्षाने जाणवले (बहुतेक रिलायन्स ह्या उद्योगाची तयारी करत सुद्धा असेल कुठे तरी गपचूप). आपली दुचाकी,चारचाकी वाहने ठिकठिकाणी रस्ते अडवून उभी करणे हे खास भारतीय माणसाचे लक्षण आहे. घराप्रमाणेच रस्ते सुद्धा आपल्या तीर्थरूपांच्या मालकीचे असल्यासारखी बेपर्वा वृत्ती सगळ्या वाहनचालकांमध्ये दिसू लागली आहे. लोकांना होणाऱ्या त्रासाचे काहीच सोयरसुतक नसल्यासारखे हे लोक भ्रमणध्वनीवर शिळोप्याच्या गप्पा ठोकत असतात. माझी रिक्षा सुद्धा अशाच एका वाहननिर्मित ट्राफिक जॅम मध्ये कितीतरी वेळ अडकली होती. बसून बसून कंटाळा आल्यामुळे मी इकडे तिकडे पाहत होतो. समोरच चौकात आपले "मामा" दिसले. मध्यमवयीनच होते (त्यांना भरघोस मिशा पण होत्या.मिशांशिवाय मामा शोभून दिसतच नाहीत.बिन मिशांचा मामा पोरगेला दिसत असल्यामुळे गल्लीतले कुत्रेही त्याचे ऐकत नाही). ते जीव तोडून सगळ्या गाड्यांना शिस्त लावायचा प्रयत्न करत होते पण एक जण त्यांचे ऐकेल तर शपथ. स्वयंचलित दिव्यांनी का कोण जाणे पण त्या दिवशी मान टाकली होती त्यामुळे त्या चौकात ते दोन्ही हातात तलवारी घेतलेल्या बाजीप्रभू देशपांड्यान्सारखे झुंजत होते. त्यांना चकवा देऊन दोन तीन चुकार बाईकवाले त्यातून निसटले. एक अत्यंत उर्मट दिसणारा फ़ोर्चुनरवाला गाडी पळवण्याच्या प्रयत्नात अखेर त्यांच्या तावडीत सापडला आणि त्यांच्या तोंडाचा पट्टा सुरूच झाला. पहिल्यांदा ग म भ न ची बाराखडी यथेच्छ म्हणून घेतल्यावर त्यांनी त्याला खाली उतरायला सांगितले. एव्हाना त्याचा उर्मटपणा अंतर्धान पावून त्या जागी भेदरलेल्या सशाचे भाव उमटले होते. मामांनी व्यवस्थित हजेरी घेऊन झाल्यावर त्याची रीतसर पावती फाडली(हे पाहून सगळ्यांना आश्चर्य वाटले !). दरम्यानच्या काळात मामांनी बोललेल्या स्वगताचा सारांश थोडक्यात त्यांचे नशीब,सरकारचा नाकर्तेपणा,गाडीवाल्यांचा वाढलेला माज,अपुरे पगार,आरोग्याच्या तक्रारी,सततच्या डुट्या करून आलेला थकवा असा चौफेर होता. ते ऐकून थोड्या वेळासाठी का होईना आजूबाजूच्या लोकांच्या डोळ्यात त्यांच्याविषयी क्षणिक सहानुभूती उमटली. सिग्नल सुटल्यानंतर माझ्यासकट सगळे आपापल्या मार्गाला लागले पण मामा मात्र तिथेच राहिले. हे पाहून मनात विचार आला की कसे जगात असती आणि काय करत असतील हे लोक? ह्यांना त्यांचे आयुष्य नाहीये का? का त्यांनी मिळणाऱ्या पगाराच्या बदल्यात स्वताची आणि घरच्यांची परवड करून घ्यायची? सतत समाजातल्या गरीब ते श्रीमंत,चोर ते साधू अशा मोठ्या कॅनव्हासवरचे आयुष्य त्यांनी बघितलेले असते. अंगावर वर्दी चढवली म्हणून आतल्या भावना थोड्याच मारता येतात? त्यानाही राग ,लोभ, मोह, दंभ, मद, मत्सर असे षड्रिपू असणारच. त्याना सांभाळत आपल्यासारख्या भारतमातेच्या (सु?)पुत्रांना सांभाळणे काही खायचे काम नाही. माझे मन नकळत मला आजवर आलेल्या पोलिसांच्या अनुभवांकडे वळले. लहानपणी इतर मुलांप्रमाणेच मला "झोप नाहीतर पोलिस येतील,आम्ही तुला पोलिसांच्या ताब्यात देऊ आणि ते तुझी टींगटोळी करून नेतील" असे सांगितले जायचे. मला "ताब्यात " आणि "तांब्यात " ह्यामध्ये फरकच कळत नव्हता त्यामुळे पोलिसांकडे खूप मोठा तांब्या असणार आणि ते त्यान मुलांना भरून नेत असणार अशीच माझी कल्पना होती ! नंतर जसजसा शाळेत जाऊ लागलो तशी समाजात पोलिसांची चोरांना पकडण्यासाठी गरज आहे एवढे ज्ञान प्राप्त झाले होते.कोणी त्रास दिला तर पोलिस काकांना सांगायचे हे शाळेत शिकवले त्यामुळे पुढे त्यांची भीती वाटेनाशी झाली आणि त्याजागी त्यांचा आदर वाटू लागला. कॉलेजात जायला लागल्यावर वेगवेगळ्या कारणांसाठी पोलिसांची भीती प्रत्येकालाच वाटते (सुज्ञास अधिक सांगणे न लगे !) माझा एक मित्र आणि मी मात्र बाइक वरून भटकत असताना इतक्या वेळा मामांना शेंड्या लावल्या आहेत की बास....वयाने आम्ही घोडे दिसत असताना सिग्नल तोडला म्हणून मामांनी थांबवले होते आणि पैसे दिल्याशिवाय सुटका नव्हती.... मित्राने काकुळतीला आलेला चेहरा करून मामांना सांगितले "साहेब (हवालदाराला पण साहेब म्हटले कि अर्धी लढाई जिंकतो आपण तिथेच !) आम्हाला जाऊ द्या....बारावीला सातव्यांदा बसतोय..आता फायनल परीक्षेचा पेपर आहे....ह्यावेळी नापास झालो तर घरचे जीव घेतील ..." असे म्हटल्यावरच मामाने "जा,जा पेपर द्या..पुन्हा सिग्नल तोडू नका..." असे सांगून आमचे लायसन्स देऊन सोडून दिले. तर असे करता करता पूर्णपणे सज्ञान झाल्यावर पोलिसांविषयी वाटणारे एक सुप्त आकर्षण आणि त्यांचा रुबाब पाहून सगळ्यांनाच कधी न कधी वाटते की आपण त्यांच्यासारखेच असावे (म्हणून तर पोलिसांवर निघणारे सगळे पिक्चर हिट होतात !) तसे मला पण वाटले की आपण ही पोलिस व्हावे पण नशिबाने मला त्यांच्या विरुद्ध काम करण्याची संधी दिली (म्हणजे चोर डाकू नव्हे हो...वकिल्बाबू !!) तिथून पुढे कायम पोलिस आणि मी एकत्रच झालो...रोजचेच सवंगडी ! वाहनावर काळापांढरा स्टीकर लागला आणि माझ्या परिसरातले पोलिस भलतेच बदलले की राव......मी चुकून जरी काही गोंधळ घातलाच तरी कुठलेही मामा हसून 'जा' सांगतात..काही वेळा मात्र माझे काम दुधारी शस्त्रासारखे असते.तुम्हीच असे वागायला लागलात तर लोक काय करतील असा उपदेश सुद्धा खूप मामांनी दिलेला आहे....सुरुवातीला "तुमच्या वडिलांची गाडी आहे का" असे विचारायचे (लहान दिसत होतो मी तेव्हा !) एकदा कोर्टाच्या बाहेर सिग्नल तोडला म्हणून एक मामा आडवे आले. त्यांना मी सांगितले की मला कोर्टात जाऊ द्या, माझी केस आहे ...तर मामांनी सिक्सरच ठोकला. म्हणाले "कसली केस आहे तुमच्यावर?? अजून काय गोंधळ घातले आहेत?" मी त्यांना म्हटले "साहेब.....माझ्या चेहऱ्यावर जाऊ नका...मी केस लढायला जातोय, माझ्यावर कोणतीही केस नाहीये...." एकदा घरी झालेल्या एका शोर्ट सर्किट मुळे लागलेल्या आकस्मिक आगीच्या प्रसंगी माझ्याकडे ऐनवेळी फायर ब्रिगेडचा नंबर नसल्याने जवळच्या पोलिस स्टेशनमध्ये एका ओळखीच्याला रात्री तीन वाजता फोन केला आणि त्यांना फायर ब्रिगेडला घेऊन यायला सांगितले. फायर ब्रिगेडचे सगळे आलेले लोक "फुल टाईट" अवस्थेतले होते. त्यांना काय झालंय ते समजवायलाच खूप वेळ गेला. अशा प्रसंगी पोलिस मात्र आमचा जबाब घ्यायच्या मूडमध्ये होते. तुमचा कोणावर काही संशय आहे का वगैरे खास पोलिसी थाटाचे प्रश्न त्यांनी विचारले पण आम्ही सगळे नीट सांगितले म्हणून ते निघून गेले. रोजच्या पेपरात एकदा "सरकार पोलिसांसाठी मोफत घरे बांधून देणार" अशी पोलिसांसाठी गाजर दाखवणारी बातमी वाचल्यावर "ते सगळे पोलिस आता रांगत असतील " असा विचार डोक्यात आला. हातात लाठ्या देऊन ए के ४७ शी लढायला सिंहाचे काळीजच लागते पण हेच काळीज देशाव्यातिरिक्त त्या व्यक्तीच्या जवळच्या लोकात पण अडकलेले असते हे कुणालाच जाणवत नाही. पोलिसांबरोबर रोजचेच संभाषण असल्यामुळे त्यांची कार्यपद्धत जवळून पाहण्याची संधी मिळाली.साध्या शिपायापासून ते पोलिस महासंचालक पदापर्यंतच्या वर्दीतला "तो" जवळून अनुभवायला मिळाला. एक माणूस म्हणून ते कसे आहेत हे त्यांच्याच तोंडून ऐकणे ह्यासारखा उत्कंठावर्धक अनुभव दुसरा नसेल. त्यांचे त्रास, नोकरीचा तणाव,घरच्या जबाबदाऱ्या असे पोलिसांचे आपले असे स्वताचे प्रश्न आहेत ते सुटल्याशिवाय त्यांच्या कामात सुसूत्रता येणार नाही हे पक्के लक्षात आले. घडणाऱ्या सगळ्याच घटनांना स्वत जबाबदार नसतानाही कायदा आणि सुव्यवस्थेची धुरा वाहणारे हे रथी महारथी आपल्या समाजात आहेत म्हणून आज जे काही दिसतंय ते तरी टिकून आहे. मी कित्येकदा सण समारंभ अशा वेळी बंदोबस्ताला असलेल्या पोलिसांच्या डोळ्यांमध्ये त्यांची अशी स्वप्ने कधी पूर्ण होतील का हे प्रश्नचिन्ह बऱ्याच वेळा पाहिलंय...प्रत्येक सणाच्या वेळी कुटुंबीयांपासून दूर असलेले त्यांची बाबा,भाऊ,नवरा हि रूपे ( आणि आता तर आई,बहिण,मुलगी सुद्धा !) बाजूला ठेवून कर्तव्यतत्परतेने समाजाचे प्राणपणाने रक्षण करणे हेच ज्यांचे काम आहे त्यांच्या कामाला केवळ सलाम..... मागच्या १५ ऑगस्टला माझ्या हातून चुकून सिग्नल तुटला म्हणून एका निवृत्तीला आलेल्या मामाने त्याच्या मनातल्या अशाच सगळ्या भावनांना माझ्या निमित्ताने वाट करून दिली.यांत्रिक वाहनांच्या कोंडाळ्यात राहूनही आपले माणूसपण जपणाऱ्या त्या माणसाचे सगळे बोलणे मी शांतपणे ऐकून घेतले. तिथून निघालो आणि एका दुकानात जाउन २-३ मोठ्या शीतपेयांच्या बाटल्या विकत घेतल्या आणि बंदोबस्ताला असलेल्या त्या मामाला आणि त्याच्या सहकार्यांना नेउन दिल्या आणि ते करत असलेल्या कामासाठी त्यांना "धन्यवाद" म्हटले . ते स्वीकारतानाही त्याचे हात थरथरत होते. न बोलताच मला त्यांच्या डोळ्यातल्या भावना कळल्या आणि माझा स्वातंत्र्यदिन एका वेगळ्या अर्थाने सत्कारणी लागला. ह्या येणाऱ्या दिवाळीत भरपूर मौजमजा करा.... आनंद लुटा..... पण "तो" आपल्याबरोबर सदैव आहे हे लक्षात ठेवा आणि त्याबद्दल संधी मिळेल तेव्हा त्याच्याकडे कृतज्ञता व्यक्त करायला विसरू नका ....
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 4804
प्रतिक्रिया 21

प्रतिक्रिया

पोलीसांना असेच गरीब ठेवणे ही बर्‍याच लोकांची सोय आहे. २४ तास ड्युटी आणि शिव्या शापाचे धनी.

छान विषयाला हात घातलाय !

समाज खरोखरीच चांगल्या पोलिसांच्या बाबतीत संवेदनशील होऊन त्यांच्या कामाची तात्काळ दाद द्यायला शिकला तरी खूपसे पोलिस बदलतील अशी भाबडी आशा आहे. आपण कामानिमित्ताने बरेचदा अनावश्यक ठिकाणीही मुक्तहस्ताने आभार मानतो, मग एखाद्या ट्रॅफिक सुरळीत चालवायला किंवा कायदा/सुव्यवस्था राखायला मदत करणार्‍या पोलिसाला मोकळेपणे 'धन्यवाद/ थँक यू' तरी नक्कीच म्हणू शकतो ना?

लेख खूप आवडला. अजून अनुभव ऐकायला आवडतील. मला पुण्याच्या फायर ब्रिगेड चा खूप चांगला (सकारात्म)) अनुभव आहे, त्यांच्या गाडीतून खूप वेळा मी साप पकडायला गेलो आहे.

सगळ्यांना खूप धन्यवाद...

लेख आवडला. लिहायचं राहून गेलं. नेटची ये जा सुरु आहे.

ह्या येणाऱ्या दिवाळीत भरपूर मौजमजा करा.... आनंद लुटा..... पण "तो" आपल्याबरोबर सदैव आहे हे लक्षात ठेवा आणि त्याबद्दल संधी मिळेल तेव्हा त्याच्याकडे कृतज्ञता व्यक्त करायला विसरू नका ....
+१

माझेही पोलिसांबरोबरचे तुरळक अनुभव चांगलेच आहेत. अगदी कठीण परिस्थितीत बिचारे काम करतात. व्ही आय पी च्या बंदोबस्तातून राहिलेले आमच्या संरक्षणासाठी आणि मग त्यातून शिल्लक राहतील ते त्यांच्या घरी जाणार! अगदी थँकलेस जॉब म्हणतात तो हाच!

माझा एक मित्र आणि मी मात्र बाइक वरून भटकत असताना इतक्या वेळा मामांना शेंड्या लावल्या आहेत की बास....वयाने आम्ही घोडे दिसत असताना सिग्नल तोडला म्हणून मामांनी थांबवले होते आणि पैसे दिल्याशिवाय सुटका नव्हती.... मित्राने काकुळतीला आलेला चेहरा करून मामांना सांगितले "साहेब (हवालदाराला पण साहेब म्हटले कि अर्धी लढाई जिंकतो आपण तिथेच !) आम्हाला जाऊ द्या....बारावीला सातव्यांदा बसतोय..आता फायनल परीक्षेचा पेपर आहे....ह्यावेळी नापास झालो तर घरचे जीव घेतील ..." असे म्हटल्यावरच मामाने "जा,जा पेपर द्या..पुन्हा सिग्नल तोडू नका..." असे सांगून आमचे लायसन्स देऊन सोडून दिले..... ......मी चुकून जरी काही गोंधळ घातलाच तरी कुठलेही मामा हसून 'जा' सांगतात.... ....काही वेळा मात्र माझे काम दुधारी शस्त्रासारखे असते.तुम्हीच असे वागायला लागलात तर लोक काय करतील असा उपदेश सुद्धा खूप मामांनी दिलेला आहे.... ....एकदा कोर्टाच्या बाहेर सिग्नल तोडला म्हणून एक मामा आडवे आले.... ....मागच्या १५ ऑगस्टला माझ्या हातून चुकून सिग्नल तुटला....
लेखामागिल भावना समजल्या, वाखाणण्याजोग्या आहेत. पण त्याहून महत्त्वाचे, रहदारीचे नियम पाळायला शिका. आपणच पोलीसांचे काम वाढवायचे, त्यांचा मनःस्ताप वाढवायचा आणि त्यांना शीतपेयाच्या बाटल्या देऊन पापाचे परिमार्जन केल्याचा आव आणायचा हा दुट्टप्पीपणा आहे. 'मामांना शेंड्या लावल्या आहेत', 'मामा आडवा आला' वगैरे शब्द प्रयोगातूनही स्वतःच्या चुकीच्या वागण्याबद्दल मनांत कुठल्याही प्रकारची खंत जाणवत नाही आणि पोलीसाबद्दल आदरही जाणवत नाही. पोलीसांना 'मामा' हे कोणी आदराने म्हणत नाही. त्या मागे हेटाळणीचीच भावना असते. त्यामुळे, ऊन-वारा-पाऊस अंगावर झेलत, रहदारी नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करणार्‍या पोलीसाला लेखात सर्वत्र वापलेले 'मामा' हे संबोधन खटकले. त्यामुळे शेवटच्या दोन परिच्छेदांत पोलीसांप्रती व्यक्त केलेली कणव प्रामाणिक असली तरी पोकळ वाटते. असो. त्यापेक्षा, स्वतः नियम पाळा, पुढच्या पिढी समोर एक चांगला आदर्श ठेऊन त्यांनाही ह्या समाजातील एक जबाबदार नागरीक बनवा. शीतपेयाच्या बाटल्या देण्याच्या तात्पुरत्या उपाययोजनेपेक्षा त्यांच्यावरील कामाचा ताण कमी करण्याचे भरीव कार्य करा. जरा स्पष्ट लिहीले आहे राग मानू नये.

In reply to by प्रभाकर पेठकर

तुमचा स्पष्टवक्तेपणा आवडला परंतु वर उल्लेखलेले अनुभव आल्यानंतरच माझी त्यांच्याकडे बघण्याची दृष्टी बदलली आहे. नियम पाळणे हे सगळ्यानीच केले पाहिजे परंतु "सरकारी कामात अडथळा आणणे" सारखी कलमे पोलिसांना मनमानी करण्याची मुभा देतात आणि सामान्य माणूस त्याविरोधात बोलू शकत नाही हे गैर आहे. सर्वसामान्य माणसांमधे असणारी त्यांची प्रतिमा लेखात वापरणे अपरिहार्य आहे .त्यामागे त्यांचा उपहास अथवा हेटाळणी करणे हा उद्देश नव्हता. चुकून कधीतरी उल्लंघले जाणारे नियम आपल्याला गुन्हेगार बनवत नाहीत. त्यांच्यासाठी जे करणे त्या वेळी शक्य होते ते केले. ह्यात परिमार्जन करण्याचा प्रश्न येऊ नये. त्यांच्याविषयीची भावना सार्वत्रिक आहे आणि २६/११ नंतर ती वेगळ्याच उंचीवर पोचलेली आहे. त्यामुळे त्यांचे कार्य वादातीत आहे हे सांगणे न लगे.

एका अत्यंत दुर्देवी प्रसंगात म.पो. शी भेटण्याचा योग आला.. अनुभव फारच क्लेश्दायक आणि सर्व कर्मचरि चढत्या भाजणीने (हुद्द्यानूसार) बेमुर्वतखोर आणि अतिशय मग्रूर वागले (आमच्या समोर आलेल्या "आमदार्-नगरसेवकांसमोर "मात्र एअर ईंडियाचा महाराजा झालेले पाहिले आहे) त्यामुळे तिळ्मात्र अनुकंपा नाही.. प्रतिसाद अस्थानी वाटल्यास अवश्य काढून टाकावा..

माझे मामा मुंबई पोलीसमध्ये होते. माझ्या मामींच्या शब्दात सांगायचे तर, ना कधी दिवाळीची अंघोळ, ना कधी दिवाळीचा फराळ, ना लक्ष्मीपूजन, ना दिवाळीचा पाडवा. हे सगळ दिवाळी झाल्यावर जमल तर देव दिवाळीला नाही तर जेंव्हा घरी जातील तेंव्हा. दसरा तर १० दिवस रात्रंदिवस बाहेरच! पोलीस स्टेशनवरच दोन तीन तासाची झोप आणि पुन्हा ड्युटी! वरची कमाई आपण पहातो पोलीसांच्यात पण मी घाटकोपरजवळची पोलीस वसाहत पाहीली आहे, वरळीचीपण पाहीली आहे, (माझा मित्र आहे आता मुंबई पोलीसात) नाही वाटत एव्हढा पैसा मिळतो. माझे वैयक्तीक पोलीसांचे अनुभव फार छान आहेत. घाटकोपर ट्रेन स्टेशनवर बोंम्ब स्फोटानंतर एकदा ट्रेन मधुन बाहेर पडत असताना, समोर चांगली दणदणीत बंदूक घेउन उभ्या पोलीसाकडे पाहून मिश्किल हसत मी "दंबूक?" अस म्हंटल्यावर लाजुन लालभडक झालेला पोलीस पाह्यलाय. अंधेरी बांद्रा रस्त्यावर एकदा आमच्या रिक्षाला हात दाखवून समोरच ट्रॅफिक सोडलेल्या पोलीसाला "माझी जयपूर ट्रेन सुटते आहे बांद्र्यावरुन १५ मिनीटात" म्हंटल्यावर आमच्या रिक्षात ड्रायव्हर जवळ बसुन आम्हाला सिग्नल पार करुन देणारा पोलीस पाह्यलाय. (ती ट्रेन अक्षरशः २ मिनीटात सुटली आम्ही आत शिरल्यावर.) अंधेरी पवई रस्त्यावर एकदा रस्त्यावर धरणे धरुन बसलेल्या कामगारांच्या गोंधळात " माझी मुलगी आजारी आहे. कामवाल्या मावशीचा फोन आलाय, मला घरी पोहोचु दे" अस विनवल्यावर माझ्या रिक्षात बसून चांगल मरोळपासून आनसा इंडस्ट्रीयल एस्टेटपर्यंत रिक्षा आणुन सोडणारा पोलीस पाह्यलाय. ( साकीनाक्याचा ट्रॅफिक त्याच्या वर्दीमुळे झटक्यात पार पडला) कुर्ल्याला एकदा एक माणुस पाठलाग करतो आहे म्हणुन सांगितल्यावर त्या माणसाला गचांडी धरुन समोर उभा करुन ठेवुन" ताई तुम्ही जा! मी बघतो याला!" म्हणणारा पोलीस आठवतोय. मुलाच्या पासपोर्टचा प्रॉब्लेम झालाय म्हंटल्यावर स्वतःच वजन टाकणारा मित्र ही पोलीसच आहे.( तेंव्हा पासपोर्टवरचे फोटोज गायब करुन अवैध पासपोर्टसाठी वापरायची टोळी कार्यरत होती त्या खात्यात. मी नशीबाने सुटले. बाकी सगळे फार रखडले.) हं! माणस चांगली असतात, वाईट असतात अन पोलिसही माणुसच आहेत हे ध्यानात घेतल की झालं. अगदी मजेशीर आठवण म्हणजे चर्चगेट मध्ये एकदा बिल्डींग पेटली होती. आम्ही दोघे तेंव्हा शनिवार रविवार मुंबई पायी पायी पालथी घालत असू. आम्ही नेमके तेथुन पास होत होतो. अन गर्दी हटवण्यासाठी आलेल्या पोलीसाने "ए! चलो बाजु हटो म्हणत नेमकी माझ्या बाजूला काठी आपटली. ती लागली रस्त्यावरच्या हायड्रंटला पण मी दचकून अशी किंचाळले की पोलीस सगळ टाकून कळवळुन, "लागल? लागल?" अस कितीवेळ विचारत राहीला. मला हसून हसून पुरेवाट झाली. या वेळी जाईन भारतात तेंव्हा एखादी पाण्याची बाटलीतरी देउच शकेन मी एखाद्या उन्हात तंगणार्‍या पोलिसाला असा विचार मनात आला.

लेख पटला नाहीये. पोलीसांबद्दल कृतज्ञता व्यक्त करावी ? कश्याबद्दल नक्की ? देशभक्ती का खरच मुद्दा असतो का ती नोकरी घेतांना ? का पोटापाण्याची सोय म्हणून घेतली असते तो नोकरी ? किती उक्चाशिक्षित हवालदार बनतात हो, देशसेवा करायचीय म्हणून ? अजून असा कुणी बघितलेला नाहिये. आणि पोलिस बनल्यावर काय काम करायचेय, त्यातले धोके, त्रास हे सर्वच त्यांना माहित नसते काय ? मुळात ही कामे करायचीय म्हणुनच पैसा मिळतो त्याला. शिक्षण, सरकारी नोकरीतला आश्वासकपणा, या नोकरीत असलेली वरकमाई व मिजास हेच मुख्य कारण बघितलेत. आणि उन्हातान्हाची, दिवस रात्र सेवा, घरापासुन दूर असणे हे जर मोजमाप असेल तर नोकरीवाला हे करतच असतो की. बायकापोरांपासुन दूर असलेला कामगार, ६ -६ महिने समुद्रात राहणारे तंत्रज्ञ आणि दिवसरात्र सेल्समध्ये फिरणारे, रात्रपाळी करणारे यांच्याबद्दल पण कृतज्ञता व्यक्त करावी. सगळेच देशाला या ना त्या प्रकारे मदत करताच असतात. का जी दिसत नाही ती देशसेवा नाही ? पण त्यांचा कमी पगार, सुट्ट्या हा मुद्दा आहे, पण हा आपला मुद्दा आहे का ? याबद्दल चा लढा त्यांनी लढायचा का आपण ? आपल्यातरी कुठे आपला पगार जास्त वाटतो ? का सुट्ट्या जास्त वाटतात ? असावा, त्यांना पण चांगला पगार असावा, सुविधा असाव्या. पोलिसांची नोकरी कष्टदायक, धोकादायक आहे हे मान्य आहे, पण हळ्हळ, कृतज्ञता वैगरे नाही आपल्याला ट्राफिक हवालदार जाम आवडतात, :) पण म.पु.से नाय :(

लेख पाहीला. पोलिस विपरीत परिस्थितीत काम करतही असतील परंतु अनेक प्रसंग असेही आहेत की ज्यामुळे पोलिसांची कणव वगैरे तितकी वाटत नाही. अर्थात रस्त्यातल्या उभ्या पोलिसाबद्दल द्वेषही वाटत नाही. पोलिस अनेक वेळेला केवळ वाहतूक नियंत्रण न करता केवळ टार्गेट पूर्ण करायला उभे राहील्या सारखे चौकात उभे राहीलेलेही पाहीले आहेत. सगळ्यात पोलिस हा प्रकार डोक्यात केव्हा गेला माहीत आहे? पासपोर्ट व्हेरीफिकेशनच्या वेळेला. मी आणि माझा एक मित्र दोघेही एकत्र गेलो पोलिस स्टेशनला व्हेरीफिकेशनसाठी. माझे पासपोर्टचे आणि त्याचे लष्करी अधिकारी म्हणून अधिकारी प्रशिक्षण संस्थेत (आयएमए) दाखल होण्यासाठीचे व्हेरीफिकेशन हवे होते. माझ्याकडून २०० रुपये आणि त्याचे संपूर्ण करियर त्या व्हेरीफिकेशनवर अवलंबून होते म्हणून त्याच्याकडून ५०० रु घेतले. पोलिसांबद्दल वगैरे चा आदर तेव्हाच संपला. इत्यलम्.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

तुम्ही नाही म्हणुन पाहिलय कधी पैसे द्यायला? मी सरळ नाही म्हणते. माझे तीन्ही पासपोर्ट साकिनाका पोलीस स्टेशनातुन एक एक पै न देता मी करुन घेतलेत. तुम्ही द्यायला फार उत्सुक असता ना म्हणुन ते घेतात. मी वयाच्या २२व्या वर्षी पहिला एल आय सी अधिकार्‍याला झापला. मि. नांबीयार रितायरमेंटला आलात अन पोराच्या वयाच्या लोकांकडुन असा पैसा मागता? वर आम्ही धडपद करत नाही म्हणता? कसे जाणार आम्ही पुढ तुम्ही असे पोखरायला लागल्यावर? अस विचारल होत मी. लागोपाठ दुसरा वाद म्हाडा बरोअबर. पेपर आहेत? काम कर नाही तर बघ. तुम्ही खिसा रिकामा करायला जाता, ते घेतात.