नौदलातील आयुष्य -३
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
हि मी अश्विनी या नौदलाच्या कुलाबा रुग्णालयात काम करीत असतानाची गोष्ट आहे. तो मंगळवार होता. एके दिवशी रात्री दहा वाजता मला नौदलाच्या पोलिस स्टेशन वरून फोन आला कि लवकर रुग्णवाहिका पाठवा. मी चौकशी केली तेंव्हा आमच्या दोन रुग्णवाहिका बाहेर गेल्या होत्या.एक रुग्णाला पोहोचवायला आणि दुसरी आणायला गेली होती. इतर दोन रुग्णवाहिका उभ्या होत्या पण त्यात चालक नव्हता(रात्रपाळीला दोन चालक असत). मी तिथे सूचना देऊन ठेवली होती कि रुग्णवाहिका जशी येईल तशीच पोलिस स्टेशन ला पाठवा. पुढच्या दहा मिनिटात परत दोन वेळा फोन आला कि ताबडतोब रुग्णवाहिका पाठवा. मी जर वैतागून पोलिस स्टेशनला फोन केला आणि सांगितले जोवर बाहेर गेलेली रुग्णवाहिका येत नाही तोवर मी कशी पाठवणार. मला रुग्णवाहिका चालवता येत नाही नाही तर मीच घेऊन आलो असतो!!!!. त्यावर तिथला प्रभारी अधिकारी (लेफ्ट. कमांडर यादव) मला म्हणाला सर इथे एक मुलगी बहुतेक बाळंत होण्याच्या बेतात आहे त्यामुळे जितक्या लगेच जमेल तितक्या लगेच पाठवा. पुढच्या दहा ते पंधरा मिनिटात त्या मुलीला घेऊन तो अधिकारी (लेफ्ट. कमांडर यादव) रुग्णवाहिकेतून स्वतः आला. मी त्याला विचारले कि हि कोण मुलगी आहे? त्याने सांगितले कि मला माहीत नाही. ती माझ्या घरी आली आणि मला प्यायला पाणी मागितले. मी तिला पाणी दिले तर ती म्हणाली मला कळा येत आहेत आणि आता मला तुम्ही रुग्णालयात घेऊन चला.मी तिला विचारले कि तू मझ्याकडे का आलीस त्यावर ती म्हणाली कि तुम्ही नौदलाचे पोलिस आहात आणि तुम्ही मला रुग्णालयात घेऊन जाल याची खात्री आहे. घरी उगाच बायकोशी वाद नको म्हणून मी तिला प्रथम पोलिस स्टेशन ला आणले आणि तुम्हाला फोन केला. ती इतक्या वेदनेत होती कि तिला जीप मधून आणण्याची माझी हिम्मत झाली नाही. मी गडबडीत ती कोण काय ते सुद्धा विचारले नाही.
रुग्णवाहिकेत पहिले तर एक एकोणीस वर्षाची सुंदर मुलगी अतिशय वेदनेत कण्हत होती. मी त्या मुलीला रुग्णवाहिकेत आतच तपासले आणि माझ्या लक्षात आले कि ती पुढच्या फार तर अर्ध्या तासात बाळंत होणार आहे. मी त्या रुग्णवाहिकेला तसेच प्रसूती विभागात पाठवले आणि तेथे फोन केला कि एक मुलगी बाळंत होण्याच्या बेतात आहे तिला ताबडतोब टेबलवर घ्या.तिचे बाकी कागदपत्र आपण नंतर बनवू. पाच मिनिटात तिथल्या मेट्रन चा फोन आला कि सर ती मुलगी एका जे सी ओ(ज्युनियर कमिशन्ड ऑफिसर) ची मुलगी आहे आणि तिचे लग्न झालेले नाही. तर तुम्ही ताबडतोब इथे या. आता मी उठून सरळ प्रसूती विभागात गेलो. आणि तिला विचारले कि तू कोण आहेस? त्यावर तिने दिलेली माहिती अशी होती की माझे वडील 8 गढवाल रेजिमेंट मध्ये सुभेदार आहेत. (हि 8 गढवाल रेजिमेंट तेंव्हा कुलाब्यात तैनात होती) आणि माझ्या वडिलांना सांगू नका. इकडे मेट्रन मला सांगत होती कि सर तिला सेंट जॉर्ज हॉस्पिटल ला पाठवून द्या
कारण ती नियमाप्रमाणे पात्र (एनटायटल्ड) नाही. सरकारी नियमाप्रमाणे सैनिकांची लग्न न झालेली मुलगी सर्व उपचारास पात्र असते. पण लग्न झालेली मुलगी प्रसूतीसाठी पात्र नाही. त्या नियमात लग्न न झालेली मुलगी प्रसूतीसाठी पात्र आहे कि नाही याचा उल्लेख नाही. (नियम बनवणार्याने हि शक्यता गृहीत धरली नसावी) शिवाय लश्करी संस्कृतीत बिनलग्नाची मुलगी प्रसूतीसाठी कोणी लष्करी रुग्णालयात घेऊन येईल अशी सुतराम शक्यता नाही.
मी जरा आवाज चढवून मेट्रनला गप्प केले आणि म्हटले अशा अवस्थेत ती मुलगी कुठे जाईल?आणि तिची तयारी असली तरी माझी नाही. प्रभारी वैद्यकीय अधिकारी म्हणून मी याची जबाबदारी घेतो आहे तेंव्हा तुम्ही तिची प्रसूती करा. तुम्हाला झेपत नसेल तर मी प्रसूती करेन ( मी स्त्रीरोग विभागात काम करीत असताना जवळ जवळ वीस प्रसूती केल्या होत्या त्यामुळे त्यावेळेस मला तेवढा आत्मविश्वास होता). यावर मेट्रनने गपचूप तिची प्रसूतीची प्रक्रिया चालू केली आणि पुढच्या सात ते आठ मिनिटात ती मुलगी माझ्यासमोरच बाळंत होऊन तिला एक गोंडस मुलगा झाला (वेळ साधारण साडे अकरा असावी).
लष्करात सैनिकावर अवलंबून असणारे त्याचे कुटुंबीय हे त्याच्या नावाने रुग्णालयात भरती होतात त्यामुळे त्या मुलीचे भरतीचे कागदपत्र हे daughter of Sub Negi म्हणून बनवले गेले. आता याची खात्री करण्यासाठी काहीतरी कागदपत्रे असणे आवश्यक असते. शिवाय हि असाधारण परिस्थिती होती म्हणून मी ८ गढवाल रेजिमेंट च्या एडज्यूटंट ला फोन केला आणि विचारले कि आपल्याकडे सुभेदार नेगी आहेत काय? त्यावर त्याने सांगितले कि आमच्याकडे दोन सुभेदार नेगी आहेत. मी परत विचारले कि ज्यांची मुलगी १९ वर्षाची आहे असे कोण आहेत त्यांच्याशी मला बोलायचे आहे कारण त्यांची मुलगी रुग्णालयात भरती झाली आहे. यावर त्याने मला सुभेदार नेगीना फोन लावून दिला. मी त्यांना मुलीबद्दल सांगितले कि तिला रुग्णालयात भरती केले आहे. त्यांनी घाबरत घाबरत विचारले सर माझी मुलगी कशी आहे. मी त्याना धीर दिला आणि सांगितले मुलगी ठीक आहे पण तिच्या भरतीची कागदपत्रे तयार करण्यासाठी आपल्याला रुग्णालयात यावे लागेल. त्यावर ते म्हणाले सर मी लगेच येतो. पुढच्या अर्ध्या तासात ते आपल्या एका मित्राला घेऊन लष्करी जीपने रुग्णालयात आले. त्यांना बाह्य रुग्ण विभागातून मी प्रसूती कक्षात घेऊन गेलो. त्यांनी घाबरत घाबरत मला सारखे मुलगी कशी आहे याची चौकशी चालविली होती. मी त्यांना मुलीला भेटवले आणि विचारले कि हीच तुमची मुलगी आहे ना? त्यावर ते हो म्हणाले आणि त्यांच्या जीवात जीव आला. यानंतर त्यांनी विचारले सर तिला काय झाले आहे आणि तिला भरती का केले आहे? मी त्यांना बाजूला घेऊन गेलो आणि सांगितले कि हा तुमचा नातू !! ती आताच बाळंत झाली आहे. यावर सुभेदार नेगींचा चेहरा पांढरा फट्ट पडला. ते दोन क्षण काहीच बोलले नाहीत मग मटकन खाली बसले आणि त्यांनी रडायला सुरुवात केली. दोन मिनिटांनी त्यांनी बोलायला सुरुवात केली. सर मै बरबाद हो गया मै किसीको मुंह दिखाने लायक नाही रहा. मुझे खुद्कुशी करनी पडेगी.पुरे गढवालमें मेरी बेइज्जति हो जायेगी. मेरे पास खुद्कुशी के अलावा कोई चारा नाही है! माझी परिस्थिती विचित्र झाली होती. एक तर प्रभारी अधिकारी म्हणून मी त्यांना सत्य परिस्थिती सांगणे भाग होते पण यातून असे काही होईल असा मी विचारच केलेला नव्हता. तरीही मी त्यांना हाताला धरून बाहेर आणले आणि सांगितले कि आपण शांत व्हा. त्यांच्या मित्राला सांगितले कि त्यांची मुलगी जरा सिरियस आहे तेंव्हा त्यांची काळजी घ्या. माझ्या सहाय्यकाला मी त्यांच्या वर नजर ठेवायला सांगितले आणि ताबडतोब ८ गढवाल रेजिमेंटच्या एडज्यूटंट ला परत फोन केला.(या वेळेस रात्रीचा एक वाजला होता) त्याला हे सांगितले कि सुभेदार नेगी अतिशय तणावाखाली आहेत आणि एखादे वेळेस आत्महत्येचा प्रयत्न करतील यासठी मला ताबडतोब त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी तीन जवान पाहिजेत. एवढा फोन करून मी नेगी साहेबाना आपल्या खोलीत घेऊन गेलो त्यांच्या मित्रासोबत त्यांना एक ग्लास पाणी पाजले. एक काम्पोजची गोळी खायला लावली. काही वेळाने तीन जवानाना घेऊन तो एडज्यूटंट( तो मेजर होता. दुर्दैवाने मला त्याचे नाव आठवत नाही) स्वतः आला. त्याला मी बाजूला घेऊन परिस्थिती समजावली. मग तो नेगी साहेबाना घेऊन गेला. थोड्या वेळाने मेट्रन त्या नवजात बालकाचे जन्माचे दाखले घेऊन आल्या. बोलता बोलता त्या म्हणाल्या कि या मुलीचे एका नौदलाच्या डॉक यार्ड मधील आर्टीफायसर(हा पण जे सी ओच असतो) बरोबर प्रेम जमले होते. मी त्यांना विचारले कि हि गोष्ट नऊ महिने कशी लपून राहिली. त्यावर त्या म्हणाल्या कि मुलीचे वडील राजस्थानात लष्करी सरावावर गेले सहा महिने बाहेर होते आणि तिची आई मनोरुग्ण आहे( स्कीझो फ्रेनिया) आणि तिचा इलाज अश्विनीत चालू आहे.
दुसर्या दिवशी मी हि गोष्ट आमच्या वैद्यकीय समाजसेविकेला सांगितली आणि विचारले काय करता येईल का ते पहा.
यानंतर मी ते विसरून गेलो. शनिवारी सकाळी त्या समाजसेविका मला भेटल्या आणि त्यांनी मला पुढची कहाणी सांगितली. या मुलीचे प्रेम होते त्या आर्टीफायसरशी (त्याचे आडनाव रावत होते आणि तो गढवालीच होता) त्यांनी संपर्क केला तेंव्हा त्याने आपले तिच्याबरोबर प्रेम आहे हे मान्य केले आणि म्हणाला कि मला तिच्याशी लग्न करायचे होते. तिच्या घरच्याना प्रेम विवाह मान्य नाही आणि ती अजून लहान आहे म्हणून त्यांची तयारी नव्हती. यानंतर त्या मुलीचा त्याच्याबरोबर शुक्रवारी आर्य समाज मंदिरात रीतसर विवाह झाला. सुरुवातीला मूल अनाथाश्रमात द्यावे असे ठरत होते पण रावत म्हणाला ते मुल माझेच आहे तर त्याला अनाथाश्रमात का ठेवायचे? अशा रीतीने मंगळवारी रात्री घडलेले नाट्य शनिवारी सुखांत होऊन संपले.
प्रतिक्रिया
जबरा अनुभव..
आयला...
शप्पथ!!!! !!!!!!!!!!!!!!!!!!!
हम्म्म्....डॉक्टरांना बर्याच
हम्म!
भारीच!
मस्त !!!
बाळ नशिबवान म्हणाय्च.
अपर्णा ताई ,
रोचक अनुभव
मस्त अनुभव
एकदम फिल्मी वाटणारी सत्यकथा.
एकदम फिल्मी वाटणारी सत्यकथा
डॉक्टर तर खर लिहीतातच खटपट्या
ओह !!!
बापरे
@ अर्पणा,
आधी फिर्याद कोण करणार हा
Thanks Maa हा चित्रपट बघा
ऑफीस मध्ये असल्याने नंतर बघेन
भयंकर चित्रपट आहे..
आयला लै भारी ष्टोरी. सुखांत
धन्य आहे!
अनुभव...
मागे मालाडला एक घटना घडलेली.
खतरनाक कथा........इतकेच
ह्या अकाली मात्रुत्वाचा लेख टाकु काय?
जबरी
नशीब!
लेख छान !!!