मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

यष्टी

आतिवास · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
परवापासून घरात, साळंत “यष्टी येणार” बोल्तेत. गुर्जीबी ‘जगाची कवाडं उगडणार’ असलं कायबाय म्हन्ले. आमी समदयांनी जग्याकडं माना वळवून पायलं; तर बेनं रडाया लागलं जोरात. राती भाकरी हाणली की माजे डोळे गपागपा मिटत्यात. आण्णा म्हन्ले, “अन्जाक्का, झोपू नका. आपण एसटी पहायला जाऊ” “अंदारात दिसाचं नाय; सकाळी जाऊ” असं म्या बोल्ले तर आजीबी हसाया लागली. चावडीवर पोरंसोरं, आजीसकट झाडून समद्या बायाबी आल्यता. मान्सं तमाकू थुकत व्हती. बत्तीच्या उजेडात म्या आण्णांच्या मांडीवर जाऊन बसली. ते ‘विकास व्हणार, गाव सुदारणार’ म्हनत व्हते. जोरात आवाज आला. डोंगरावर कायतरी चमाकलं. “यष्टी” समदे वराडले. आण्णा हसत व्हते. तेनी मला खांद्यावर बशिवलं. लई लई दिसांनी. मला यष्टी आवडली. *शतशब्दकथा

वाचने 16131 वाचनखूण प्रतिक्रिया 36

पैसा Tue, 10/01/2013 - 22:29
मस्त! आमच्या गावात पहिल्यांदा यष्टी आली तो प्रसंग आठवला!

In reply to by अग्निकोल्हा

आतिवास Fri, 10/04/2013 - 08:47
आभार. आन्जीमध्ये ही प्रांजळ निरागसता मला जेव्हा दिसते तेव्हा ती व्यक्त होते इतकंच! शेवटी काय, माझ्यासारखे 'लेखक' (!) अनेकदा नुसते भारवाहक असतात :-)

सुधीर Wed, 10/02/2013 - 10:33
मिरसदारी वाचताना एखादं गाव डोळ्यासमोर उभं रहायचं, अगदी तसाचं अनुभव आला.

In reply to by यशोधरा

प्यारे१ गुरुवार, 10/03/2013 - 02:04
ती आमच्या पसरणीच्या न्हाव्याची म्हातारी.... मेली चित्रपट प्रदर्शित झाल्यावर सहा महिन्यात. शतशब्दकथा भन्नाट असतात हे नव्यानं काय सांगावं? :) एक पुस्तक होऊ शकेल! विचार करा.

तुषार काळभोर Wed, 10/02/2013 - 13:39
आनंद य्ष्टीच्या येन्याचा न्हाई, तर यष्टीच्या निमित्तानी आण्णांनी खांद्यावर घेतल्याचा झाला..

प्रभाकर पेठकर Wed, 10/02/2013 - 15:00
सुंदर शतशब्द कथा. छोटीच्या आणि मोठ्यांच्या वेगवेगळ्या भावना फार छान शब्दात पकडल्या आहेत. अभिनंदन. मला गावाकडचा अनुभव नाही. पण गावात प्रथमच सुरु होणारी यष्टी रात्री एवढ्या उशीरा येते? जरा पटलं नाही.

In reply to by प्रभाकर पेठकर

अभ्या.. गुरुवार, 10/03/2013 - 01:20
गावात प्रथमच सुरु होणारी यष्टी रात्री एवढ्या उशीरा येते? जरा पटलं नाही.
मुक्काम गाडी म्हणून सुरु केली असेल पेठकर काका. ;) सकाळी तो हार बिर घालून नारळ फोडायचा कारेक्रम आसेल. ;) . . आणि नेहमीप्रमाणेच आंजी एक नंबर सॉलीड. धन्यवाद अतिवासतै. :)

चिगो Wed, 10/02/2013 - 19:26
यष्टी तशीबी आठवणीतली खुणगाठ आहे.. अन्जाक्का नेहमीप्रमाणेच झकास..

In reply to by आतिवास

तिमा Sat, 10/05/2013 - 17:09
शतशब्दकथा सर्वांनी लिहाव्यात पण, काळजाला हात घालणारी कथा फक्त आतिवास यांचीच. आवडली हे सांगणं, ही फॉर्मॅलिटी ठरेल.

In reply to by तिमा

आतिवास Sat, 10/05/2013 - 18:19
तुम्ही आणि अन्य काही मिपाकरांनी इथं कौतुक केलं आहे या कथेचं, त्याबद्दल आभार. पुन्हा एकदा. "शतशब्दकथा" प्रकार माझ्या माहितीप्रमाणे नवा आहे मराठी आंतरजालावर. तो रुजण्यासाठी, सशक्त होण्यासाठी अनेकांनी विविध प्रयोग करण्याची गरज आहे. असे प्रयोग होताहेत, अनेक लोक लिहिताहेत आणि या विविधांगी कथा वाचकांच्या पसंतीस उतरत आहेत; निदान काहींना तरी त्या आवडत आहेत :-) ही एक समाधानाची बाब आहे. हा प्रकार टिकेल का - हा प्रश्न माझ्याही मनात आहे. बघू, काय होतंय ते!

पहिल्यांदा यष्टीत बसलेली एक म्हातारी आपल्या वाडीतली झाड मागे पळताना बघून ,खाली उतरण्यासाठी आरडा ओरडा करू लागली ,असा किस्सा आई सांगायची

पहिल्यांदा यष्टीत बसलेली एक म्हातारी आपल्या वाडीतली झाड मागे पळताना बघून ,खाली उतरण्यासाठी आरडा ओरडा करू लागली ,असा किस्सा आई सांगायची