✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

मोनार्क - १

क
किलमाऊस्की यांनी
Tue, 09/17/2013 - 09:48  ·  लेख
लेख
कॅनडातल्या एका छोट्या गावात रेल्वेलाईन शेजारच्या घरात खिडकीत बसून, रुळावरुन थडथडत धावणार्‍या मालगाड्यांची वाट बघत बसणं हा पाच वर्षाच्या छोट्या फ्रेडीचा आवडता छंद. मालगाड्यांची वर्दळ जेव्हा कमी होत असे तेव्हा रेल्वेलाईन पलिकडे पसरलेलं मोठ्ठ्च्या मोठ्ठं माळरान न्याहाळत बसणं हे फ्रेडीचं अजून एक काम. हिरव्यागार गवतात उगवलेली पिवळी-पांढरी रानटी फुलं,त्यावर घोंघावणार्‍या मधमाशा, रंगीबेरंगी फुलपाखरं, मधनूच भिरभिरणारे चतुर, फ्रेडी आपल्या पिटुकल्या डोळयांनी तासनतास निरखत बसे. एके दिवशी मांजरीच्या पिल्लासारख्या मऊमऊ अंगाच्या मधमाशीला पाहून अगदी न रहावल्याने फ्रेडी धावतच तिला पकडायला गेला. मधमाशीच्या अगदी जवळ जाताच मधमाशीने फ्रेडीच्या हाताला जोरदार डंख मारला. हाताला जोराचा झटका बसलेला फ्रेडी कळवळतच आईकडे धावला. आईने लागलीच जखमेवर मलमपट्टी करुन छोट्या फ्रेडीला समजावलं, "निसर्गाने संरक्षणासाठी मधमाशांना जन्मतःच तजवीज केलेली असते. नुसत्या हाताने मधमशी पकडायला गेलं तर त्या स्वरक्षणासाठी डंख मारतात. यापुढे कुठल्याही किट्काला नुसत्या हाताने स्पर्श करायला जाऊ नकोस." रोज खिडकीतून दिसणार्‍या पिटुकल्या मधमाशा इतक्या जोराने हल्ला करुन स्वतःच रक्षण करतात या गोष्टीचं फ्रेडीला राहून राहून कुतुहल वाटत होतं. वयाच्या पाचव्या वर्षी किट्क जगताशी जवळून झालेली ही छोटी ओळख फ्रेडीच्या आयुष्याला पुढे एक अनपेक्षित कलाटणी देणार होती. https://lh3.googleusercontent.com/-V5aZEmPOayk/UjfJaqwTZPI/AAAAAAAABeM/nBrR6d-pU-g/w567-h32-no/butterfly+line+divider+R.png मेक्सिकोतल्या सिएरा माद्रेच्या डोंगराळ भागातले रस्ते फुलपताकांनी सजले होते. आस्तेकांच्या काळापासून चालत आलेला 'एल दिया दे लोस मुएर्तोस" - मृतात्म्यांसाठी सणाचा आज दिवस. घरोघरी जय्यत तयारी चालली होती. मंडळी नविन कपडे घालून, तयार होऊन स्मशानाच्या दिशेने मृतात्म्यांसाठी भेट्वस्तू घेउन लगबगीने निघाली होती. जन्माने मेक्सिकन असलेली कॅथी, अमेरिकन केन सोबत थोड्या निराशेनेच स्मशानाकडे निघाली होती. कॅथी-केन दांपत्याच्या निराशेचं कारणंही तसंच होतं. गेले दोन वर्ष रोज मोटरसायकलवरुन गावोगाव फिरुन दोघे हताश झाले होते. जंगजंग पछाडूनही हाती काहीच लागलं नव्हतं. केनसोबत स्मशानाकडे जाताच कॅथीला प्रसन्न वाटू लागलं. जागोजागी थडग्यांवर ठेवलेली रंगीबेरंगी फुलं, मृतात्म्यांसाठी आणलेले गोड्धोड पदार्थ, फळांच्या वासाने वातावरण प्रसन्न झालं होतं. फुलाफळांच्या वासाने रंगीबेरंगी फुलपाखरं, मधमाशा स्मशानात भिरभिरत होत्या आणि अचानक कॅथीचं लक्ष सिएरा माद्रेच्या पर्वतरांगेकडे गेलं. केनला खूण करुन तिने त्या दिशेने काहीतरी दाखवलं. क्षणातच दोघांच्या चेहर्‍यावर पुसटशी आनंदाची लकेर उमटली. ज्या कोड्याची उकल शोधण्याकरीता कॅथी व केनच नव्हे तर दूरवर कॅनडात अहोरात्र कुणीतरी धडपडत होतं त्या कोड्याचा एक महत्वाचा दुवा हाती लागला होता. जिग्सॉ पझलच्या अनेक तुकड्यांच्या पसार्‍यात एक महत्त्वाचा तुकडा योग्य ठिकाणी जुळला होता. https://lh3.googleusercontent.com/-V5aZEmPOayk/UjfJaqwTZPI/AAAAAAAABeM/nBrR6d-pU-g/w567-h32-no/butterfly+line+divider+R.png खाली पसरलेला निळाशार अथांग समुद्र आणि त्याहून निळं डोक्यावरचं आकाश, मध्यान्हीचा सुर्य तळपत होता. हवेच्या प्रचंड झोताबरोबर चिमुकल्या पंखांच्या सहय्याने 'अ‍ॅना' जीव तोडून ऊडत होती. पंखातली शक्ती हळूहळू कमी होत होती. क्षणभर टेकायला दूरदूर पर्यंत जमिनीचा पुसटसा मागमूस दिसत नव्हता. छोट्या 'अ‍ॅना' साठी हे मोठं धाडस होतं पण 'अ‍ॅना'जवळ दुसरा पर्याय उपलब्ध नव्ह्ता. हिवाळा जवळ आल्याची चाहूल तिच्या तीक्ष्ण मेंदूला केव्हाच लागली होती. आणि हा दूरवरचा प्रवास करणारी ती काही एकटी नव्हती. तिच्या आधी कित्येक पिढ्या वर्षानुवर्ष हा समुद्र पार करतच होत्या. तिलाही हे करावंच लागणार होतं. स्वतःसाठी नव्हे तर पुढच्या पिढीसाठी, ती जगवण्यासाठी, फुलवण्यासाठी. पण 'अ‍ॅना' नक्की कुठे चालली होती? आणि का? https://lh3.googleusercontent.com/-V5aZEmPOayk/UjfJaqwTZPI/AAAAAAAABeM/nBrR6d-pU-g/w567-h32-no/butterfly+line+divider+R.png निसर्गाच्या एका विलक्षण कोड्याचं गुपित 'अ‍ॅना'च्या प्रवासात दडलं होतं. प्रवास नुसत्या किलोमीटर, मैल असल्या फुटकळ परिमाणात मोजला जाणारा नव्हे तर प्रवास अनेक पिढ्यांचा, वर्षानुवर्षं अविरत चालत आलेला. किटकशास्त्रातलं एक अजब स्थलांतर. फ्रेडीचं निसर्गावरचं निस्सिम प्रेम, वर्षानुवर्षं त्याने उपसलेले कष्ट, निराशेत जागलेल्या अनेक रात्री, कॅथी-केनची अफाट धडपड आणि त्याच्याच जोडीला अमेरिकेतल्या हजारो निरपेक्ष हातांनी केलेली मदत - या सर्वाचा परिपाक म्हणून निसर्गाच्या एका अनोख्या चमत्कारची उकल होणार होती. या जिग्सॉ पझलचा शेवटचा तुकडा जेव्हा जोडला गेला तेव्हा "२० व्या शतकातला किटकशास्त्रातला एक सर्वात मोठा शोध" जगाला अवाक करुन टाकणार होता. क्रमशः
  • मोनार्क - २
  • मोनार्क - ३
  • मोनार्क - ४
  • मोनार्क - अंतिम भाग

Book traversal links for मोनार्क - १

  • मोनार्क - २ ›
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
विज्ञान
लेखनप्रकार (Writing Type)
लेख

प्रतिक्रिया द्या
8110 वाचन

💬 प्रतिसाद (17)

प्रतिक्रिया

स्वागत.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 09/17/2013 - 09:55 नवीन
मोनार्कच्या सुंदर वर्णनाने पुढे कायची उत्सुकता लागलीच आहे. नव्या लेखमालिकेचं मनःपूर्वक स्वागत. आणि शुभेच्छा...! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

+१

मोदक
Tue, 09/17/2013 - 11:59 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

व्वा व्वा ...आली बुवा तुमची

आनन्दिता
Tue, 09/17/2013 - 10:00 नवीन
व्वा व्वा ...आली बुवा तुमची नवी लेखमाला एकदाची... ,,
  • Log in or register to post comments

वॉव.....

मुक्त विहारि
Tue, 09/17/2013 - 10:21 नवीन
मस्त... झक्कास सुरुवात...
  • Log in or register to post comments

हेमांगीके - अब बस नाम हि काफि है.

अग्निकोल्हा
Tue, 09/17/2013 - 10:29 नवीन
प्रचंड उत्सुकता, पुढिल भाग लवकर येउदे.
  • Log in or register to post comments

सुरेख

सुनील
Tue, 09/17/2013 - 10:52 नवीन
पक्षी-माशांच्या वार्षिक स्थलांतराविषयी आहे काय? उत्सुकता चाळवली गेली आहे!
  • Log in or register to post comments

मोनार्क....फुलपाखरांतल

स्पंदना
Tue, 09/17/2013 - 11:58 नवीन
मोनार्क....फुलपाखरांतल सगळ्यात मोठठ फुलपाखरु. जंगलभरुन झाडांना पानांसारखी लटकणारी फुलपाखरे. व्वाह...लवकर टाका पुढील भाग.
  • Log in or register to post comments

वा वा!

पैसा
Tue, 09/17/2013 - 12:49 नवीन
नवी मालिका सुरू झाली म्हणा! अगदी जीव भांड्यातच काय, सुपात पडला! त्यात मोनार्क म्हणजे सगळ्यात मोठ्या फुलपाखराच्या प्रवासाची कहाणी आहे का? जबरदस्त! येऊ दे पटापट!!
  • Log in or register to post comments

झकास

चाणक्य
Tue, 09/17/2013 - 18:46 नवीन
सुरुवात. उद्याच पुढचा भाग आला पाहिजे
  • Log in or register to post comments

वॉव ! मोनार्क म्हणजे

डॉ सुहास म्हात्रे
Tue, 09/17/2013 - 21:31 नवीन
वॉव ! मोनार्क म्हणजे अनपेक्षित, अनाकलनिय, अतर्क्य आणि असेच बरेच काही म्हणू शकू असे मोसमी प्रवासी... पहिल्या भागाने उत्सुकता चाळवली गेली आहे. पुभाप्र. लवकर लवकर टाका.
  • Log in or register to post comments

छान .

खेडूत
Fri, 09/20/2013 - 00:40 नवीन
छान . पुन्हा एकदा चांगल्या लेख मालेची सुरुवात. उत्कंठा वाढली आहे. आवश्यक तिथे फोटू पण टाकालच! फुलपाखरांची सजावट 'लाइक' केल्या गेली आहे!
  • Log in or register to post comments

भन्नाट! सुरवात आवडली.

शिवोऽहम्
Sat, 09/21/2013 - 13:00 नवीन
भन्नाट! सुरवात आवडली. केऑस थेअरीत ब्राझीलमध्ये फुलपाखराने पंख फडफडविले की फिलीपाईन्स मध्ये वादळ येतं. त्याची उगाच आठवण झाली.
  • Log in or register to post comments

सुंदर लेख व तितकीच सुंदर शैली

एस
Mon, 09/23/2013 - 00:56 नवीन
पुभाप्र.
  • Log in or register to post comments

vaachatoy!

प्यारे१
Mon, 09/23/2013 - 02:36 नवीन
vaachatoy!
  • Log in or register to post comments

वात पाहतोय पुढच्या भागाची

अमित खोजे
Mon, 09/23/2013 - 22:02 नवीन
वात पाहतोय पुढच्या भागाची
  • Log in or register to post comments

सर्व प्रतिसादकांचे मनःपूर्वक धन्यवाद !

किलमाऊस्की
Mon, 09/30/2013 - 01:13 नवीन
या मालिकेतला पुढील भाग मोनार्क - २
  • Log in or register to post comments

व्वा!

धमाल मुलगा
Tue, 10/01/2013 - 23:02 नवीन
The legend is back! :)
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा