Skip to main content

विजय आणि भूक (शतशब्दकथा)

लेखक एच्टूओ यांनी शुक्रवार, 06/09/2013 09:48 या दिवशी प्रकाशित केले.
(मि पा वर लिहिण्याची ही पहिलीच वेळ आहे. जुन्याजाणत्या मि पा करांनी सांभाळून घेणे. चू भू दे णे ) या वर्षीच्या नागपंचमीला आमच्या "वनमित्र" संघटनेच्या आंदोलनात जवळपास ५० नागांना गारुड्यांच्या तावडीतून जंगलात सोडलं.पोलिसांचीही लगेच मदत मिळाली आणि तत्पर कारवाई करून १२ गारुड्यांना तुरूंगात टाकलं. आधीच मिडिआला फोन केल्यामुळे, "अध्यक्ष" या नात्याने मी आंदोलनचे यश प्रेस कॉन्फरन्स मध्ये विजयी मुद्रेने मांडले. घरी आलो. आजीशी बोलतांना तिने विचारलं "नागांना रानात सोडलं,चांगलच केलं. पण गारूड्यांना तुरूंगात का डांबल?" " अगं आजी, कायदाच आहे तसा" "ते काही मला कळत नाही सोन्या ! पण त्या गारूड्यांची मुलं आज बापाची वाट पाहत उपाशी झोपतील रे..." आजीच्या पाणावलेल्या डोळ्यांकडे पाहून मी अन्तर्मुख झालो.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 3414
प्रतिक्रिया 22

प्रतिक्रिया

म्हणूनच म्हणतात की कायदा गाढव आहे... पण खरी गोष्ट अशी आहे की असा कायदा बनवणारे गाढव असतात आणि त्यांना निवडून देणारे आपण मतदार महागाढव असतो. जर जास्त चांगले रोजगाराचे साधन मिळाले तर कोण कशाला गारुडी बनेल? ही गोष्ट, जी तुमच्या आजीला सारासार विवेकाने गोष्ट समजली, त्यासाठी लागणारी बुद्धी आपण गहाण टाकलीय. म्हणून आपण साप साप म्हणत भुई धोपटत बसतो आणि आपण इकडे गुंतलो आहेत हे पाहून चलाख बोके लोणी खाऊन पसार होतात. काहीतरी काल्पनीक कारणे सांगून भलत्यालाच दोषी ठरवण्याची टूम गेल्या काही दिवसात मिपावरच्या लेखांमध्येही दिसते आहेच !

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

सहमत मी सुद्धा.. कथा अन त्यातील आशय देखील आवडला, पटला.

खरे आहे आजीचे. रोज लाखो कोंबड्या, बकरे इ. खाण्यासाठी ठार मारले जातात, त्याचे काय? मेनका (की मनेका) गांधी इकडे लक्ष घालतील काय?

पण गारूड्यांना तुरूंगात का डांबल?
साप गारुड्यांच्या परडीत (शब्द चुकला वाटतं) नेहमी बंद असतात, त्याची फिलिंग काय आहे ते गारुड्यांना जाणवून देण्याकरिता कायद्यात तसं प्रावधान आहे. बाय द वे, सापांचे इतर अनेक उपयोग आहेत (antidote, etc), तिथे साप वापरणार्‍यांचे काय करणार? गारुड्यांचा नक्की गुन्हा काय आहे? पर्यावरणात ढवळाढवळ? मनुष्य इतके प्राणी वापरतो, त्यात साप एक अजून. कि तेही exstinct होऊ लागलेत?

In reply to by arunjoshi123

मनुष्य इतके प्राणी वापरतो, त्यात साप एक अजून. कि तेही exstinct होऊ लागलेत?
भारतासारख्या शेतीप्रधान देशात उंदरांमुळे धान्य नासाडी होण्याचं प्रमाण खूप जास्त आहे. आता ते आकडे हाताशी नाहियेत पण डोळे फिरवणारे आकडे आहेत. साप मोठ्या प्रमाणात उंदीर-घुशी खात असल्यामुळे सापांचं महत्व आहे. वाढत्या शहरीकरणामुळे सापांची संख्या खूप कमी होउ लागली आहे. याशिवायही इकोसिस्टम मध्ये सापांचं मह्त्व आहेच.

In reply to by अग्निकोल्हा

प्रतिसादाबद्दल धन्यवाद. वास्तविक, या कथेतून कोणताही बोध देण्याचे प्रयोजन नाही.

पुढील लेखनासाठी शुभेच्छा भविष्यात अजून मोठे लेख लिहावे तुम्हाला जमू शकते हे ह्या छोटेखानी लेखातून समजते