✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

पुत्र व्हावा ऐसा गुंडा...

प
पिलीयन रायडर यांनी
Wed, 08/28/2013 - 15:43  ·  लेख
लेख
पुत्र व्हावा ऐसा गुंडा... ह्याचा कवीला जो काही अर्थ अपेक्षित असेल तो असेल.. पण आमच्या लेकरानी शब्दशः घ्यायचा ठरवला आहे. आणि तो बहुदा "गुंडा" सिनेमाच्या हिरो सारखा "गुंडा" हा असावा.. असो.. तर..आमचे सुपुत्र झोपेतुन उठतात तेच मुळी बटन दाबुन मशिन चालु केल्या सारखे.. एकदम धो धो एनर्जी कोसळायला सुरवात होते. तिथुन पुढे दिवसभर ती तशीच कोसळणार असते. दम दिल्या सारखा हाका मारत सुटतो..चावतो..उड्या मारतो..बोचकारतो..लाथा मारतो आणि वर "हा हा" करुन हसतो.. जोवर त्याला बाहेर नेत नाही तोवर हे सगळं चालु असतं..बर गप गुमान नेईल तिकडं जावं तर तसं नाही..पायानी आम्च्या पोटाला लाथा मारुन (घोड्याला कसं पायानी वळवतात्..तस्सचं..), हातानी दिशा दाखवत... "इक्कं..तिक्कं..ऊंम्म... नाईईई.." असं बोंबलत हवं तिकडे नेतो.. खाली सोडलाच तर तरा तरा रांगत जाऊन भांडी खाली पाड.. टिव्ही ओढ्..कचरा खा.. झाडु चोख..खिडक्याशी गाडी गाडी करुन बोटं अडकवुन घे..असले उपद्व्याप चालु होतात. त्याच्या सोबत नक्की खेळावं काय हेच आम्हाला कित्येकदा समजत नाही.त्याच्या खेळण्यां सोबत आम्हीच अर्थहीन खेळ सुरु करतो म्हणजे तो समोर बसुन शांत पणे काही तरी करेल.. पण तो ढुंकुनही पहात नाही. दिवसभर आम्ही सोबत नसतो. आजी एकटी कंटाळुन जाते.म्हणुन मग टीव्ही.. तर आता त्याला सगळ्या मालिकांचे टायटल साँग्स आवडयला लागलेत. होम मिनिस्टर तर ऊड्या मारुन पहातो (कारण त्यात बर्‍याचदा टाळ्या वाजवतात, बॉल चे खेळ असतात..) पण ह्या वेळ घालवण्याला काही अर्थ नाही. तो अजुन चालत (आणि मुद्द्याचं) बोलत नसल्याने इतक्यात त्याला पाळणाघर / प्ले ग्रुप मध्ये टाकु नये असं मत आहे. पोरगं रोज नवीन काही तरी शिकतय.. अक्कल "एक्स्पोनेन्शीयली" वाढत चालली आहे. तेवढ्याच स्पीडनी आमची बुद्धी तोकडी पडत चालली आहे. त्याला खेळायला द्यावं तरी काय? त्याच्या सोबत "काऊ काऊ ये.." च्या शिवाय अजुन काय खेळावं? "केस कुठयत केस? कान कुठय कान" च्या पुढे काय शिकवावं? त्याच्या learning मध्ये भर पडेल असं काय करावं?
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
99442 वाचन

💬 प्रतिसाद (145)

प्रतिक्रिया

पाळणाघर!

ऋषिकेश
Fri, 08/30/2013 - 09:27 नवीन
स्वानुभव सांगतो मुलाला चांगल्या भरपूर मुले असलेल्या पाळणाघरात ठेवा. आजीलाही दुपारची झोप मिळेल आणि मुलाला समवयस्कांमध्ये रमता येईल. माझे आई-वडील सोबर राहत असूनही ४-६ तास मुलीला पाळणाघरात सोडतो (अगदी ७ महिन्यांची होती तेव्हा तास दोन तास सोडायचो आता दीड वर्षाची आहे तेव्हा ५-७ तास सोडतो). तीही तिथे जायला तीही उत्सूक असते. अनेक नव्या सहज गोष्टी शिकते. वेगवेळ्या भाषा कानावर पडतात, ठराविक वेळी ठराविक गोष्टींची आपोआप सवय लागते रुटीन सेट होते, फुकटचे हट्ट, रडरड (जी बर्‍याचदा कंटाळ्यामुळे होते) कमी होतात आणि मुख्य म्हणजे तिचे आजी आजोबा आणि आम्ही दोघेही फ्रेश असतो. (तुम्हाला म्हणून सांगतो ;) महिना-दोन महिन्यातून एखाद्या कामकाजाच्या दिवशी दोघांनी सुट्टी काढून, मुलीला पाळणाघरात सोडून स्वतः पिक्चर बघणे, दुपारी शांत झोप काढणे यातही फार गंमत येते. करून बघा :P)
  • Log in or register to post comments

काय ओझं उतरलं हो माझ्या

पिलीयन रायडर
Fri, 08/30/2013 - 09:47 नवीन
काय ओझं उतरलं हो माझ्या मनावरचं... कसं होतं..की आपण दिवसभर घरात नसतो..खरं तर ही सगळी मरमर लेकरासाठीच असते. पण तरीही मनात एक अपराधीपणाची भावना असते. पाळाणघरात ठेवायचं म्हणलं (आणि तुम्ही सांगताय त्याच कारणांसाठी.. अजुन एक नवं वातावरण मिळावं म्हणुन..) की १० मधले ९ जण "अजिबात नको" असंच म्हणतात.. जो १ जण "बिनधास्त पाठवा" म्हणतो तो पाळणाघरात जाणर्‍या हसर्‍या पोराचा पालक असतो. अशी हसरी पोरं पाहिली की वाटतं राहील ना आपलंही पोरगं मस्त.. पण बॅकग्राउंड म्युझिक सारखे बाकी पण सल्ले मनात घोळत असतात. जसं की इन्फेक्शन होईल, खुप मुलांमध्ये नीट लक्ष दिलं जाणार नाही.. आणि ते बरोबरही असतात... ह्या गोंधळामध्ये..अपराधीभाव घेऊन घरात शिरलं की डोकं धरुन बसलेले आजी आजोबा दिसतात.. त्यांच्या उरावर नाचणारं पोरगं दिसतं.. टीव्ही वरच्या कुठल्या तरी फालतु मालिकेच्या म्युझिक वर नाचत तो "लादा लादा (राधा) " किंचाळत असतो.. जरा कुठे आपलं मत पक्कं व्ह्यायला लाग्तं की ह्या पे़क्षा पाळाणाघरच बरं की जेवणाची वेळ येते.. आपलं लेकरु म्हणल्यावर आपण त्याच्या मागे पळुन पळुन त्याला २ घास जास्त भरवायचा प्रयत्न करतो. झोपेला आला की त्याची अजुन नाटकं सुरु होतात. तेव्हा अर्धातास मांडी हलवत, गाणी म्हणत आपण कुर्कुर न करता बसुन रहातो. मग ते अचानक ते कार्टं पिल्लु वाटायला लागतं.. वाटतं कोण ह्याचं असं निगुतीनी करणारे पाळणाघरात? आयुष्यात कोण कुणाचं करत?? ह्याच्या वाटणीचे २-३ च वर्ष.. मग शाळेचा धाक, मुलांमधली भांडणं , अभ्यास आणि अजुन ना ना प्रकार येणारचेत... असे गोंडस विचार मनात घोळवत आपण झोपतो.. आणि रात्री २ वाजता पुन्हा टाहो फोडुन "कार्टं" रडायला लागलेलं असतं.. त्याला भु बु, हम्मा दिसतं असते झोपेत..आपल्याला सकाळी उठुन ऑफिसला जायचय हे दिसतं असतं.. आई बापाला सगळंच समजत असतं की काहीच समजत नसतं..? पोराची काळजी असते, आजी-आजोबांची दगदग दिसते..नवरा बायकोनी गेल्या १-२ वर्षात साधा पिक्चर पाहिला नाहीये हे ही माहिती असतं.. फक्त ह्यावर नक्की "सर्वांना पटेल" असा उपाय काय... हे माहीत नसतं...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश

खरं तर ही सगळी मरमर

ऋषिकेश
Fri, 08/30/2013 - 17:21 नवीन
खरं तर ही सगळी मरमर लेकरासाठीच असते. पण तरीही मनात एक अपराधीपणाची भावना असते. पाळाणघरात ठेवायचं म्हणलं (आणि तुम्ही सांगताय त्याच कारणांसाठी.. अजुन एक नवं वातावरण मिळावं म्हणुन..) की १० मधले ९ जण "अजिबात नको" असंच म्हणतात..
अगदी खरंय. त्यांची कारणंही बरोबर असतात. अनेकांना पाळणाघरांत विचित्र अनुभव येतातही. म्हणूनच म्हटलं की "चांगलं व बरीच मुलं (व त्या प्रमाणात त्यांना सांभाळायला मावश्या) असलेलं" (शक्य व जवळ असल्यास एखादं प्रोफेशनल) पाळणाघर शोधा आणि मुलाला सोडायच्या वेळेत हळूहळू वाढ करा. त्याला जशी तेथील सवय नसते तशीच तेथील कर्मचार्‍यांना, मावशींना आपल्या मुलाची सवय नसते. दोघांना एकमेकांची सवय झाली की तुम्ही मोकळे! ;) याचा अजून एक फायदा म्हणजे आजी-आजोबांना कधी चार दिवस कुठे जाऊन यायचं असेल किंवा काही कामं असतील तर आपल्या मुलांत अडकून रहावंही लागत नाही मात्र नातवाचा बर्‍यापैकी सहवास मिळाल्याने ते आनंदीही राहतात. माझी मुलगी दिवसभर खेळून इतकी दमते की संध्याकाळी ७:३० ८ वाजता जी झोपते ते -मधे पाणी-दूधासाठी (डोळे मिटून - झोपेतच) रडणं सोडलं- तर सकाळी५:३०-६लाच उठते. रुटीन, झोपेच्या वेळा, जेवायच्या वेळा एकदम सेट. मुलीमुळे गेल्या वर्षात हार्डली ५-७ वे़ळा जागरण करावं लागलं असेल. :) आजारी पडणं चालुच असतं हे खरंय पण ते त्या वयात सगळ्याच मुलांच चालु असतं. अ‍ॅन्टीबायोटिक्स किंवा इतरही उपायांचा भडीमार कटाक्षाने टाळल्याने आता तीची अंगभूत रोगप्रतिकारशक्ती वाढलेली कळत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

.

दादा कोंडके
Wed, 09/04/2013 - 17:01 नवीन
काय ओझं उतरलं हो माझ्या मनावरचं...
हम्म. मुळात आपण आपल्या मुलासाठी वेळ देउ शकत नाही ही टोचणी बर्‍याच जणांना असते. हे सगळं त्याच्याचसाठी तर चाल्लयं अशी स्वतःची समजूत करून घेणं हा शुद्ध दुटप्पीपणा असतो. मुलासाठी आपला क्वालीटी वेळ द्यायचा की तेव्हड्याच वेळात नोकरी करून चार दिडक्या फेकून त्याला पाळणाघरात ठेवायचं हा प्रत्येकाचा निर्णय असतो. त्या बदल्यात घराबाहेर पडण्याचं, आर्थिक स्वातंत्र्य मिळतं, अनुभवविश्व की काय, तर तेही विस्तारतं म्हणतात. काही पालक मात्र याची स्वतःला अजिबात रुख रुख लावून घेता, न लाजता :) पोरांना पाळणाघरात टाकतात. पण केवळ अशीही लोकं असतात हे कळल्यावर पहिल्या प्रकारातल्या लोकांनी 'हुश्श्य' का करावं हे कळलं नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

प्रयत्न करते.. बघा आता कळतय का ते..

पिलीयन रायडर
Wed, 09/04/2013 - 18:06 नवीन
बाहेर जाऊन कमावण्याचा "दिडक्या फेकुन पोरांना पाळणाघरात ठेवता येणे" हा एकच उपयोग नसतो. समजा माझं उत्पन्न नसतं तर आज नक्की काय काय माझ्या पोराने गमावलं असतं १. मोठं घर - आम्ही ५-६ जण आहोत म्हणजे ४ खोल्या हव्यात. आता एक पगार येत नसेल तर, फक्त एकाच्या पगारावर घर घ्यावं लागेल, त्यातच बाकीचं सगळं भागवावं लागेल (किराणा, दुध, भाज्या, औषधं आणि अजुन खूप काही) २. अर्थातच ह्या सगळ्यात काटकसर करावी लागणार. म्हणजे ती पण एक तडजोड आहे. ३. लक्झुरी म्हणता येतील अशा गोष्टी - पुस्तकं, सिडिज, खेळणी, पर्यटन इ. ज्यात काटकसर होईल. ४. सर्वात मह्त्वाचं - माझ्या मुलगा जन्मला तेव्हा त्याला एक त्रास होता ज्यातुन तो कदाचित जगलाच नसता. जवळपास आहे ते विकावं लागतय की काय अशी परिस्थिती होती. माझ्या कंपनीच्या इन्शुरन्स ने ८०% भार उचलला. तरी लाखभर रुपये आमचेही इतरत्र खर्च झाले. अजुनही होत असतात. ह्या सगळ्याचा भार एकट्याच्या पगारावर उचलता आला असता का? असेच घरात बाकी पण मेंबर आहेत ज्यांना दुखणी आहेत. त्यांच्या आयुष्याचा विचार करु की क्वलिटी टाईमचा? तशी तर रस्त्याच्या कडेला, खरकट्यावर भिकार्‍याची पोरं पण जगतात. प्रश्न हा आहे की तुम्हाला तुमच्या मुलाला नक्की कसं वाढवायचय? तुम्ही म्हणाल करा काटकसर आणि जगा.. पण मुलांना वेळ द्या. हे लिहीताना तुमचे गुहितक असे आहे की दोघांचे पगार हे "जरुरी पेक्षा जास्त" आहेत. कशावरुन? ज्यांना घरातुन रुपयाही मिळाला नाही, आणि ज्यांना ० तुन सगळं एका शहरात उभं करायचं आहे त्यांच्यासाठी अशा महागाईमध्ये (मोठ्या कुटुंबाला पोसण्यासाठी) एकाचाच पगार पुरेल का? केवळ आर्थिक स्वातंत्र्य मिळावं म्हणुन लोक बाहेर जात असतील की आर्थिक गरजा पुर्ण व्हाव्या म्हणुन? मला कुणी घरबसल्या महिन्याच्या पगारा एवढे पैसे देणार असेल तर मी का पडेन घरा बाहेर? आणि हुश्श का केलं हे तुम्हाला समजेल असं वाटत नाही त्या मुळे
स्वतःला अजिबात रुख रुख लावून घेता, न लाजता पोरांना पाळणाघरात टाकतात. पण केवळ अशीही लोकं असतात हे कळल्यावर पहिल्या प्रकारातल्या लोकांनी 'हुश्श्य' का करावं हे कळलं नाही.
ह्या विनाकरण वैयक्तिक वाक्याला फाट्यावर मारत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दादा कोंडके

बरोबर

दादा कोंडके
Wed, 09/04/2013 - 19:16 नवीन
१. मोठं घर - आम्ही ५-६ जण आहोत म्हणजे ४ खोल्या हव्यात. आता एक पगार येत नसेल तर, फक्त एकाच्या पगारावर घर घ्यावं लागेल, त्यातच बाकीचं सगळं भागवावं लागेल (किराणा, दुध, भाज्या, औषधं आणि अजुन खूप काही)
बरोबर
२. अर्थातच ह्या सगळ्यात काटकसर करावी लागणार. म्हणजे ती पण एक तडजोड आहे.
सहमत
३. लक्झुरी म्हणता येतील अशा गोष्टी - पुस्तकं, सिडिज, खेळणी, पर्यटन इ. ज्यात काटकसर होईल.
हम्म.
४. सर्वात मह्त्वाचं - माझ्या मुलगा जन्मला तेव्हा त्याला एक त्रास होता ज्यातुन तो कदाचित जगलाच नसता. जवळपास आहे ते विकावं लागतय की काय अशी परिस्थिती होती. माझ्या कंपनीच्या इन्शुरन्स ने ८०% भार उचलला. तरी लाखभर रुपये आमचेही इतरत्र खर्च झाले. अजुनही होत असतात. ह्या सगळ्याचा भार एकट्याच्या पगारावर उचलता आला असता का? असेच घरात बाकी पण मेंबर आहेत ज्यांना दुखणी आहेत. त्यांच्या आयुष्याचा विचार करु की क्वलिटी टाईमचा?
खरं आहे तुमचं म्हणणं.
तशी तर रस्त्याच्या कडेला, खरकट्यावर भिकार्‍याची पोरं पण जगतात. प्रश्न हा आहे की तुम्हाला तुमच्या मुलाला नक्की कसं वाढवायचय? तुम्ही म्हणाल करा काटकसर आणि जगा.. पण मुलांना वेळ द्या. हे लिहीताना तुमचे गुहितक असे आहे की दोघांचे पगार हे "जरुरी पेक्षा जास्त" आहेत. कशावरुन? ज्यांना घरातुन रुपयाही मिळाला नाही, आणि ज्यांना ० तुन सगळं एका शहरात उभं करायचं आहे त्यांच्यासाठी अशा महागाईमध्ये (मोठ्या कुटुंबाला पोसण्यासाठी) एकाचाच पगार पुरेल का?
रास्तच आहे तुमचं म्हणणं. पण हे वरील विचार प्र्याक्टीकल विचार करणार्‍या बायकोचे आहेत. एक आई म्हणून मुलाला वेळ देता न येणं याची कायम तुम्हाला चुटपूट लागलीच पाहिजे. जेंव्हा ही अपराधीपणाची जाणीव पैश्यापेक्षा वरचढ होइल तेंव्हा तुम्ही नोकरी सोडून मुलाला वेळ द्याल. आई (आणि वडीलांची) बरोबरी दुसरं कुणिही करू शकत नाही. आता स्वतःच्या समजुतीसाठी मुलं पाळणाघरात राहून सोशल होतात म्हणा हवं तर. पण ते काही खरं नव्हे हो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

मला चुटपुट लागते.. पण तशी

पिलीयन रायडर
Wed, 09/04/2013 - 19:28 नवीन
मला चुटपुट लागते.. पण तशी सगळ्यांनाच "लागलीच पाहिजे" असं मला वाटत नाही. तो प्रत्येकाचा वैयक्तीक प्रश्न आहे. समजा कुणाचे मुल फार सोशल नसेल तर पाळणाघरात जाणं त्याच्या फायद्याच आहे. शिवाय मुल ३-४ वर्षाच होईस्तोवरच हा प्रश्न आहे. नंतर मुलं शाळेत जातात, त्यांच स्वतःच रुटीन सुरु होतं. मग तेवढ्या ३-४ वर्षांसाठी अनेक वर्षांपसुन असलेली, कष्टाने मिळवलेली आणि सोडली तर परत (३-४ वर्षाच्या गॅप नंतर) मिळण्यास कर्मकठीण नोकरी का सोडायची? त्या ऐवजी थोडी तडजोड करणे आप्ल्या आणि मुलांच्या संपुर्ण आयुष्यासाठी उपयोगी नाही का? आता त्या मुळे पर्यायाने जे इतर प्रश्न उभे रहतात ते सोडवायलाच हा धागा काढलाय ना? तसंही आई घरी असण्याचेही तोटे असतात.. कुठलीच परिस्थिती १००% योग्य कधीच नसते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दादा कोंडके

एक आई म्हणून मुलाला वेळ देता

ऋषिकेश
गुरुवार, 09/05/2013 - 15:36 नवीन
एक आई म्हणून मुलाला वेळ देता न येणं याची कायम तुम्हाला चुटपूट लागलीच पाहिजे. जेंव्हा ही अपराधीपणाची जाणीव पैश्यापेक्षा वरचढ होइल तेंव्हा तुम्ही नोकरी सोडून मुलाला वेळ द्याल
एक कळलं नाही हे तुम्ही आईलाच उद्देशून म्हणताय का दोन्ही पालकांना? कारण अशी चुटपट वडिलांनाही असलीच पाहिजे. मग दोघांनी आपापल्या आतले आई-बाबा जागवून किंवा एक आई-बाबा म्हणून चुटपुट लागवून घ्यावी आणि अप्राधीपणा पैशापेक्षा वरचढ झाला की दोघांनीही नोकरी सोडून देत मुलांना वेळ द्यावा असे आपले म्हणणे आहे का? का अशी चुटपुट लाऊन घेणे हे फक्त आईचेच कर्तव्य आहे (आणि बाप हे फक्त पैसेच कमवायचं मशीन आहे) असं आपलं म्हणणं आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दादा कोंडके

बरोबर.. हा प्रश्न विचारायचा

पिलीयन रायडर
गुरुवार, 09/05/2013 - 15:58 नवीन
बरोबर.. हा प्रश्न विचारायचा होता मलाही.. आईच का? वडील का नाही? स्पष्ट विचाराय्च झालं तर "आईने नोकरी करु नये" असं तुम्हाला म्हणायचय का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश

.

दादा कोंडके
Fri, 09/06/2013 - 10:39 नवीन
(या धाग्यावर आता) गप्प बसायचे ठरवले आहे. - डोक्यात बत्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

हम्म..

ब़जरबट्टू
Fri, 09/06/2013 - 11:13 नवीन
"आईने नोकरी करु नये" असं तुम्हाला म्हणायचय होते म्हणून तुम्ही गप्प बसलेत का ? मुद्दे येऊ द्या हो, गप्प बसतो म्हणून "मन्नूला" कुणी चांगले समजत का ? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दादा कोंडके

दादा साहेबांच्या आशयाशी काही

सौंदाळा
Fri, 09/06/2013 - 11:44 नवीन
दादा साहेबांच्या आशयाशी काही अंशी सहमत. अर्थात चुट्पुट आई-वडील दोघांना पण असली पाहीजे नव्हे ती असतेच. पण मुलांचे भवितव्य घडवण्यासाठी / सुरक्षित करण्यासाठी आणि स्वतःचे निव्रुत्तीनंतरचे जीवन मुलांवर (आर्थिक बाबतीत) अवलंबुन न राहण्यासाठी पैसा मिळवणे चुकीचे नाही. पण माझ्या बघण्यात, जवळच्या नात्यात (काकी, आत्या, वहीनीची आई वगैरे..) अश्या बर्‍याच स्त्रिया आहेत ज्यांनी मुले सातवी-आठवीत असताना नोकरी सोडुन पुर्णवेळ ग्रुहीणी राहुन मुलांकडे लक्ष द्यायचा निर्णय घेतला. याची कारणे अशी असु शकतील की या वयापर्यंत नोकरी (साधारण १५-१७ वर्षांची नोकरी)करुन पुरेशी शिल्ल्क जमा झालेली असते (पुरेशी कशाला म्हणावे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे)आणि मुलांची महत्वाची शैक्षणिक वर्षे जवळ आलेली असतात, हे मुलांचे वयात येण्याचे वय असते आणि त्यांना वाईट संगतसुद्धा याच वयात लागु शकते. आता आइनेच नोकरी का सोडवी वडीलांनी का सोडु नये यावर तर मी बोलणार देणार नाही (हा काथ्या अनेकदा कुटुन झाला आहे) तरीपण जर वडील घरातील कामे करायला तयार असतील तर त्यांनी सोडवी नोकरी. त्यांना आणि आईला चालत असेल तर. (दोघांचे आर्थिक उत्पन्न सारखे धरले आहे)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दादा कोंडके

आई बापाला सगळंच समजत असतं की

वैदेही बेलवलकर
Fri, 08/30/2013 - 11:10 नवीन
आई बापाला सगळंच समजत असतं की काहीच समजत नसतं..? पोराची काळजी असते, आजी-आजोबांची दगदग दिसते..नवरा बायकोनी गेल्या १-२ वर्षात साधा पिक्चर पाहिला नाहीये हे ही माहिती असतं.. फक्त ह्यावर नक्की "सर्वांना पटेल" असा उपाय काय... हे माहीत नसतं... ++++++++++ १ कधी कधी तर मनात खूप अपराधीपणाची भावना येते कि आपण जन्म तर दिला पण तिच्यासाठी वेळच नाहीये आपल्याकडे.
  • Log in or register to post comments

वाचतेय गं!

अनन्न्या
Fri, 08/30/2013 - 16:20 नवीन
मी स्वत: लेकाच्या या वयात घरातच होते. म्हणून तुझ्या समस्येवर काय उपाय ते पटापट सांगण्यासारखे सुचले नाही. म्हणून वाचनमात्र राहिले. काहीच प्रतिक्रीया नाही दिली. खरंतर इथल्या बाबा लोकांनी इतके मस्त उपाय सुचवलेत की या साध्या साध्या गोष्टी इतक्या व्यवस्थितपणे नसत्या सांगता आल्या मला!
  • Log in or register to post comments

मीझी मुलगी अशीच भरपूर अ

विजुभाऊ
Sat, 08/31/2013 - 23:44 नवीन
मीझी मुलगी अशीच भरपूर अ‍ॅक्टीव्ह होती. प्ले गृप ला जायला लागल्यावर तिला मित्रमैत्रीणी मिळाले. त्यामुळे तिचा वेळ बरा जाऊ लागला. तसेच तिच्या अंगातली एनर्जी जिरायला मदत झाली. प्लेगृप मधे मुले बरीच खेळत असतात. त्यात त्यांचा वेळ जातो. इतक्या लहान वयात संगीत वगैरे शिकवणॅ शक्य नाही. मात्र शक्य असेल तर मुलाना बालगीते सतत कानावर पडत राहीली तर त्यांचे स्वरज्ञान तयार होते. अडीच वर्षानंतर त्याना गाणे शिकवू शकतो. मुलाना चेंडु / फुगे अशा गोल वस्तु फार आवडतात. त्यातही ते रम्गीत असेल तर मजा येते.
  • Log in or register to post comments

आमच्या घरात एक रत्न ८

दशानन
Sat, 08/31/2013 - 23:51 नवीन
आमच्या घरात एक रत्न ८ महिन्यापुर्वी आले आहे, आराध्या!!! देवा रे.. माझा सारखा हॉरेबल अंकल कोणाला असू नये ;) तिचा मुड मला एवढा पटकन कळतो की मी तिच्या मुड नुसार वागतो व ती बया फक्त माझ्यासोबत असली तरच बोलते.. तीचे आई-बाबा काय वाटेल ते करु देत.. आज्जी काय वाटेल ते करु दे.. पण ही एक शब्द बोलेले तर शपथ. दंगा करेल, हसेल पण बोलणार नाही. पण माझ्याशी मस्त गप्पा मारते... तीला बाईक राईड आवडते.. का नाही आवडणार आसपासच्या सगळ्या बाईक्स मध्ये माझी बाईक मोठी आहे, व रेड कलर आहे ;) पुस्तके वाचा, सगळे लिहलेले असते.. मुलांना/बाळांना कश्याचे आकर्षण असते.. :)
  • Log in or register to post comments

गुंडा असाच राहू दे!

पैसा
Wed, 09/04/2013 - 16:44 नवीन
सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे प्रत्येक मूल वेगळे असते. त्याच्या आवडीनिवडी, तसेच बौद्धिक, मानसिक आणि शारीरिक विकासाचा वेग संपूर्ण वेगळा असतो. त्याच्याशी आपण जुळवून घ्यावे लागते. माझ्या एका चुलतबहिणीच्या मुलीला १ वर्षाची झाली तरी दात आले नव्हते. ती एकदा म्हातार्‍या फॅमिली डोक्टरकडे गेली तेव्हा सहजच म्हणाली की मुलीला अजून दात आले नाहीत. डॉक्टर म्हणाले, "तुम्ही लोकं काळजीच फार करता. मी माझ्या आयुष्यात अजूनपर्यंत दात न आलेला मनुष्य पाहिला नाही!" तेव्हा जस्ट रिलॅक्स!! टेन्शन घेऊ नको. माझ्या २ मुलांत जमीन अस्मानाचा फरक होता. मुलगी ११ व्या महिन्यात चालणे आणि बोलणे व्यवस्थित शिकली. वर्षाची असताना ती व्यवस्थित गाणी म्हणत असे! मात्र खूप नाजूक आणि अशक्तच होती. खाण्यापिण्याचीही कटकट असायची. मात्र मुलगा असाच चळवळ्या, सतत काहीबाही करत असायचा. पण २ वर्षाचा होईपर्यंत बोलत नव्हता. आपण हाक मारली तर लक्षही देत नसे. शेजारी रहाणार्‍या एका डॉक्टरला तर शंका आली की हा ऑटिस्टिक आहे की काय! त्यामुळे आम्हीही घाबरलो. आणि त्याच्या सायकिट्रॅस्टकडेही फेर्‍या झाल्या. त्यांनी आणि त्याच्या पेडिआट्रिस्टने मात्र ठामपणे सांगितलं की याची शारीरिक स्किल्स इतर मुलांपेक्षा जास्त डेव्हलप झालीत, मात्र त्याचा आयक्यु नॉर्मलपेक्षा थोडा जास्त आहे. अशी मुलं खूपदा भाषेच्या स्किल्सकडे सुरुवातीला दुर्लक्ष करतात. नंतर तो हळूहळू बोलायला लागला. ते मात्र अगदी नॉर्मल संभाषण! मात्र सुरुवातीपासून त्याच्या हालचाली एवढ्या ऑर्गनाईज्ड असायच्या की रांगत असतानाही कूकरला हळूच एक बोट लावून बघायचा गरम आहे की काय म्हणून! आज दोघंही व्यवस्थित शिकत आहेत. आणि त्यांच्या वयाला ज्याला नॉर्मल म्हणता येईल असेच वागतात. आम्ही एक पथ्य नेहमी पाळलं, ते म्हणजे कधीही त्यांच्याशी बोबडं बोललो नाही. मोठ्या माणसासारखं बोललो. त्यामुळे बोबडं बोलणे हा प्रकार दोन्ही मुलांनी फारसा केला नाही. खेळाच्या बाबतीत म्हणशील तर वाढणार्‍या मुलांसाठी प्रत्येक गोष्ट ही खेळाची संधी असते. तशीच शिकायचीही संधी असते. त्याचं फार टेन्शन घेऊ नको. दुसरा काही ऑप्शन मिळाला की टीव्ही पाहणे कमी होईल. आम्ही दोघाही मुलांना गाड्या, भातुकली, बाहुल्या, सायकली वगैरे खेळणी जेव्हा जशी हवी असतील तशी दिली. सगळी मुलं वेगळी असतात तसे आजी आजोबाही वेगळे असतात. त्यामुळे एखादी आजी मुलांसोबत मजेत राहील तर दुसरी एखादी आजी कंटाळून जाईल हेही आपण समजून घेतले पाहिजे. एकदा माझ्या सासूबाई मारे माझ्या मुलाला गाणं म्हणून झोपवत होत्या, तर हा ३ वर्षांचा औरंगझेब म्हणे, "आजी तू मला गाणं झोपवण्यासाठी म्हणतेस की जागं ठेवण्यासाठी?" त्यांचे आपसातले संबंध जसे असतील तसे राहू देत. त्यात मधे पडू नये. मुलांना पाळणाघरात ठेवण्याचा एक फायदा म्हणजे मुले सोशल होतात. पण त्याचवेळी तिथे कोणी संसर्गजन्य रोगाने आजारी मूल येत नाही ना यावर लक्ष ठेवावे लागते. शेअरिंगची सवय लागेत असं म्हणतात, पण त्याबद्दल मी जरा साशंक आहे. कारण धाकटे भावंड आल्यानंतर जेलसी ची बाधा होते ती खरं म्हणजे कधीच जात नाही. मुले वाढवणे यावर दुसर्‍याला सल्ले देणे फार सोपे आहे. पण असे काही प्रॉब्लेम्स आणि काळज्या आठवल्या की आपण कशातून गेलोय याची आठवण आता नको वाटते. काही वर्षांनी नातवंडे सांभाळायला मी बहुतेक तयार होणार नाही!
  • Log in or register to post comments

मुळात मुलाच्या आणी मुलीच्या

सुबोध खरे
Sat, 09/07/2013 - 09:42 नवीन
मुळात मुलाच्या आणी मुलीच्या वाढीचे गणित वेगळे आहे. मुली मुलांपेक्षा लवकर बोलायला आणी चालायला लागतात. त्यामुळे त्यांच्यात तुलना करणे चुकीचे आहे. तसेच दोन मुलांमध्ये (किंवा दोन मुलींमध्ये) तुलना करणे सुद्धा चुकीचे आहे. आपल्याच दोन्ही हाताच्या अंगठ्यांचे ठसे जुळत नाहीत तर दोन मुले सारखी कशी असणार? माझ्या कडे येणाऱ्या स्त्री रुग्णांची हि तक्रार मी इतक्या सुरात आणी तालात ऐकली आहे कि आता मी शेवटी त्या स्त्रियांना शांत पणे विचारतो कि जर तुम्ही आपल्या मुलाची शेजारच्या मुलाशी तुलना करता तर तुमच्या यजमानांनी तुमची तुमच्या शेजारणीशी तुलना केली तर चालेल काय? हे वाक्य शंभर हिस्श्यानि लागू पडते. मुळात मुल कसे वाढवायचे हा विषय बायकोशी(किंवा नवर्याशी) कसे वागायचे यासारखे गहन (आणी अजून कोणालाही नक्की न सापडलेले) आहे. आणी कोणताही एक मंत्र किंवा सूत्र याला लागू पडत नाही असे आमचे मत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

मी माझ्या आयुष्यात अजूनपर्यंत

arunjoshi123
Wed, 09/04/2013 - 18:23 नवीन
मी माझ्या आयुष्यात अजूनपर्यंत दात न आलेला मनुष्य पाहिला नाही!
किती विनोदी असावा हा डॉक्टर!!
  • Log in or register to post comments

प्रयोग

arunjoshi123
Fri, 09/06/2013 - 17:57 नवीन
१. लहान मुलांवर कसलेच प्रयोग करू नयेत. २. स्वतःला त्याच्यापेक्षा शहाणे समजून वागू नये. ३. मुलांना थोडेसे आळशी बनू द्यावे. ४. आपले विचार लादू नयेत. ५. दोन मुले भांडू लागली तर भांडू द्यावी, मधे पडून कलकलाट करू नये. ६. जबरदस्तीने खाऊ घालू नये, आवडत नाही ते खाऊ घालू नये. ७. दहा पेक्षा जास्त तास गाढ झोपी घालावे, १० वर्ष वय होईपर्यंत ८. हजार गोष्टी शिकवू नयेत. ९. रागावू नये. १०. फालतूचे संस्कार करू नयेत. ११. आपण, आपले स्वत्व महत्त्वाचे कि मूल महत्त्वाचे ते नीट ठरवावे. उलटसुलट वागू नये. १२. त्यांच्यासमोर भांडू नये. १३. त्यांना न आवडणार्‍या गोष्टी करायला लावू नये. १४. अभ्यासाची सक्ती करू नये. १५. घाण झाल्यानंतर नॅपी लगेच बदलावी. घरी पोहचायची वाट पाहू नये. १६. ९ वर्षापर्यंत इंजेक्शने द्यावीत १७. मुलाने बोलणे चालू केले तर मोठ्यांनी आपले बोलणे बंद करावे आणि त्याचे ऐकावे. १८. तो कसा आहे त्याची जास्त वर्णने करू नयेत. १९. त्याने एखादा अपशब्द बोलला तर तो लगेच त्याच्या मेमरीतून वाईप करू नये. २०. खेळणे देण्यास मना करू नये. २१. नवनविन कपडे घेऊन द्यावेत. २२. 'आपली आपल्या आयुष्यातील अपूर्ण स्वप्ने...' इ त्याच्यावर लादू नयेत. २३. प्रत्येन प्रश्नाला 'अर्थपूर्ण' असे उत्तर द्यावे. २४. मुलांच्या झोपेत व्यत्यय येईल असे काही करू नये. २५. खाणे, कपडे घालणे, ब्रश करणे, इ इ लवकर शिकावे म्हणून अट्टाहास करू नये. २६. मुलाचे काम तू करायचे कि मी या वादात लांबवू नये. २७. मूलावर खर्च झालेल्या पैशाच्या हिशोब ठेऊ नये. २८. मूलासाठी आपण त्याग करत आहोत अशी भावना मनात आणू नये. २९. मूलाची इतर मूलांशी कोणतीच तुलना करू नये. ३०. मूलाला दूध पाजवावे.
  • Log in or register to post comments

सर्वात भारी प्रतिसाद!

संजय क्षीरसागर
Sat, 09/07/2013 - 15:20 नवीन
सगळे मुद्दे बिनचूक आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123

प्रिंट आऊट काढतो.

प्यारे१
Sat, 09/07/2013 - 17:05 नवीन
प्रिंट आऊट काढतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123

___/\___

पिलीयन रायडर
Sun, 09/08/2013 - 18:32 नवीन
___/\___ जमिनीवर पालथं पडुन साष्टांग दंडवत!! प्रिंट आउट काढली आहे.. !!! उगं टेन्शन घ्यायची मुळात गरजच नाहीये.. पोरगं बरोब्बर नीट वाढणार आहे.. आपल्याच फुकाचं डोकं लावायची दिव्य हौस आहे ती कंट्रोल मध्ये ठेवावी लागणारे!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123

खरं आहे गं.

पद्मश्री चित्रे
Sun, 09/08/2013 - 19:22 नवीन
खरं आहे गं. माझे पण दोन मुलगे आहेत, पण ते अगदी लहान असताना पण मी नोकरी केली, प्रमोशन्स घेतली . घरी आजी-आजोबा होते आणि ते त्यांच्या परीने बघत पण होते. ही टेंपररि फेज आहे हे लक्षात घे. शक्य नसेल तर नोकरी सोडु नकोस. रुखरुख वाटते , पण इलाज नाही . घरी आई असणं, आजी-आजी-आजोबा नी बघणं , पाळणाघरात ठेवणं सगळ्याचे फायदे-तोटे आहेत. नोकरी सोडली नाहीस तर पुढे शाळेत पण जाणवत रहातं की घरी असलेल्या आया मुला.चे प्रोजेक्ट्स , डान्स यात जास्त पुढे असतात, आपण तितका वेळ नाही देवू शकत, त्याची तयारी ठेव मनाची . अर्थात, त्याने काही फार फरक पडत नाही, मुलं आपोआप शिकत जातात थोडं मोठं झाल्यावर. काही गोष्टी मात्र मी आवर्जून करत असे- १. घरी आल्यावर फ्रेश होवून किमान एक तास तरी मुलां सोबत फक्त बोलायचं. आजी-आजोबांच्या (क्षु ल्ल क असल्या तरी) तक्रारी ऐकायच्या. २. सुट्टी असेल तेव्हा दोघांनी मुलांना घेवून बाहेर जायचं-बाग,झू ,तलावपाळी. ३. वेळ ची भरपाई भारं-भार खेळणी आणुन करायची नाही, त्याचा काही उपयोग नसतो, उलट मुलं लवकर हा दोष ओळखतात आणि त्याचा बरोब्बर फायदा घेतात थोडं मोठं झाल्यावर. ४. स्वत:ची एनर्जी लेव्हल थोडी वाढवायची जेणे करून ऑफिस, प्रवास याचा आपला ताण मुलांना जाणवणार नाही . शक्य असल्यास एखादी मुलगी ठेव दिवसभर घरी , म्हण्जे मूल घरात पण राहील, आजी-आजोबा पण कमी दमतील कारण ती मुलगी त्याच्या बरोबरीने खेळू शकेल.
  • Log in or register to post comments

और कूछ

arunjoshi123
Wed, 09/11/2013 - 13:52 नवीन
३१. स्वप्ने - आजकालची मुले टीव्ही फार पाहतात. त्यात खूप दुष्ट लोक खूप दुष्टपणे वागतात. छोटा भीम, इ मालिकांतला खलनायक आपल्याला तकलादू वाटला तरी मुलांना तो 'भिकारी' वैगेरे विषयांवर लिहिणारा कोण तो कादंबरीकार, त्याच्या पुस्तकातल्या विकृत लोकांइतकाच खल वाटतो. म्हणून मुलांना खूप जास्त संख्येने आणि खूप घाबरवणारी स्वप्ने पडतात. म्हणून ती सामान्य माणसापेक्षा झोपेतून जास्तवेळ , जास्तदा उठतात, सूसू करतात. पण सकाळी स्वप्न विसरतात आणि आपल्याला सांगू शकत नाहीत. सबब मुलांना आई बाबांनी त्या खलनायकाला कसे ठोकले आहे, त्याला पालक मुलाला कसे स्पर्शही करू देत नाहीत, स्वप्नात त्याचा पाठलाग कसे करू देत नाहीत, त्याला कसे टाइट बांधून टाकतात असे सांगत राहावे. असा व्हिलेन आला आणि बाळाने नुसते 'आई' म्हणून बोलावले तर ती कशी व्हिलेनला एका फटकार्‍यात ढिशूं करून लोळवते याच्या साग्रसंगीत कहाण्या सांगाव्यात. शेवटी मुलाला त्या पटून तो बिनधास्त झोपू लागतो. ३२. श्रद्धास्थान - मुलांचा नेहमी कोणी ना कोणी एक हिरो असतो. त्याने ते फार भारी प्रभावित झालेले असतात. उदा. छोटा भीम, मोगली, बेंटेन, नोबिता, हल्क, इ इ. पालकांनी स्वतः हिरो बनण्याचा प्रयत्न करू नये, ज्या लोकांच्या चूकांचा टेप २४ तास मूलासमोर चालू असतो ते लोक हिरो बनू शकत नाहीत. सध्याला माझ्या ६ वर्षाच्या मुलाचा हिरो 'द ग्रीन हल्क' आहे. त्या हल्कच्या नावावर, आणि त्याच्या मायबापांच्या आमच्या झालेल्या माहितीच्या तथाकथित आदानप्रदानाच्या नावावर मी मुलाला सगळी एरवी त्याची नावडती हिरवी फळे, हिरव्या भाज्या, मसल येण्यासाठी पुशअप्स खपवले आहेत. सबब मुलाचे असे एखादे श्रद्धास्थान बनवावे आणि त्याच्या कल्याणाच्या चार गोष्टी त्याच्या गळ्यात मारायच्या असतील तर त्याला नेहमी नेहमी असा 'निष्पक्ष' संदर्भ द्यावा. या धाग्यावर कव्हर झालेली मुले थोडी लहान आहेत, पण ती लवकरच मोठी होणार आहेत आणि त्यांना १-२ वर्षापासून हे सूत्र लागू पडते. ३३. सुप्तप्रेम - ऑफिसमधे दिवसभर मुलाची चिंता केल्याने मुलाला काही मिळत नाही. मुलांना असे 'अंतःकरणातले प्रेम' कळत नाही आणि नको असते. त्यापेक्षा त्यांना डायरेक्ट प्रेम आवडते. म्हणजे बाबा त्याला सोडून रोज ऑफिसात 'त्याच्या भविष्यासाठी गेले' तर ते त्याच्यामते काही कामाचे नसते. म्हणून सहसा आतड्याला पिळ पाडून प्रेम करणे टाळावे. याउलट ऑफिसातून एखादा फोन टाकून साहेब काय करत आहेत ते जाणावे. उदा. ते नॅशनल जिओवर डायनासोर पाहात आहेत. मग इंटरनेटवरून डायनोसोरचा एक मस्त कलर प्रिंट काढावा व घरी गेल्यानंतर हा 'हे दुर्मिळ चित्र दिवसभर झटून तुझ्यासाठी आणले आहे' असे सांगावे. मग बाबांच्या विरहाचे दु:ख कमी होते आणि आपण त्यांना कामाला जुंपले आहे अशी एक आत्मसन्मानात्मक भावना उभी राहते. सबब सुप्तप्रेमाला महत्त्व देऊ नये आणि ते मुलाला कळावे अशी अपेक्षा तर मुळीच ठेउ नये. अगदी ठळक, ठसठशीत दिसणारे, कृत्यात्मक प्रेम करावे. ३४. लॉजिक - मुले विचित्र विधाने करतात आणि वैचित्र्यपूर्ण प्रश्न विचारतात. त्यांच्या विचारतलं लॉजिक बर्‍याचदा भयंकरच गंडलेलं असतं. उदा. 'हाथी सबसे बडा अ‍ॅनिमल क्यूं होता है?', 'मुझे चिप्स कि भूख क्यूं लगती हैं?'. हा प्रश्न निरर्थक आहे असे सांगू नये. प्रश्न निरर्थक नसतो, तो समजावून घेण्याची समोरच्याची पात्रता सिमित असते. 'प्रत्येक प्राण्याचा आकार वेगळा, त्यांना एका लाईनने मांडले तेव्हा हत्ती सर्वात मोठा निघाला.', 'त्याला खायला प्यायला खूप मिळते म्हणून...', 'तो लहानपणी लहान होता, आता नीट वाढला म्हणून ..' 'व्हेल त्याच्यापेक्षा मोठा असतो', 'जिराफ उंचीने मोठा असतो, हत्ती वजनाने...', 'देवाने प्रत्येकाला एक काम नि त्यानुरुप शरीर दिले आहे' असे कोणतेही उत्तर द्यावे. अगदी वि़ज्ञानाची त्यांच्यामानाने किचकट तत्त्वे सांगीतली मुले गुपचूप ऐकतात (आपणही तसेच करतो म्हणा!). एक दोन तीन चार या क्रमाचे किंवा हजार, लक्ष, कोटी या क्रमाचे भय आणि आदर आणि सहजता त्यांचे ठायी समान असते. सबब मुलांना कळणार नाही म्हणून प्रश्न मोडीत काढू नये, सारवासारवीचे उत्तर देऊ नये. शिवाय मुले खतरनाक असतात. प्रश्न विचारतात आणि उत्तर ऐकतच नाहीत. 'प्रश्न पडणे'च काही मुलांना उत्तरासमान वाटते. तेव्हा उत्तर देताना 'हो ना रे सोन्या?', 'खरे ना बाळा?' असे प्रत्येक वाक्यागणिक विचारावे.
  • Log in or register to post comments

सुप्तप्रेमाला महत्त्व देऊ नये

पिलीयन रायडर
Wed, 09/11/2013 - 16:16 नवीन
सुप्तप्रेमाला महत्त्व देऊ नये आणि ते मुलाला कळावे अशी अपेक्षा तर मुळीच ठेउ नये. अगदी ठळक, ठसठशीत दिसणारे, कृत्यात्मक प्रेम करावे.
लहान मुलच काय, मोठ्यांच्या बाबतीतपण हे लागु पडेल.. सतत "समजुन घ्या माझ्या भावना" ह्या मोड वर रहाण्यापेक्षा क्रुतीतुन व्यक्त कराव्या भावना.. बाकी प्रतिसादा साठी- पुन्हा दंडवत..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123

अपात्र

arunjoshi123
Wed, 09/11/2013 - 17:02 नवीन
माझ्या एक सामान्य पिता म्हणून केलेल्या निरीक्षणांतही बर्‍याच चूका आहेत. जे अस्सल (म्हणजे विदाऊट कंफ्यूजन), नैसर्गिक (पणे वागणारे) आणि फूलटाइम पालक आहेत त्यांची ताण न येऊ देता (कितीतरी) मुले मोठी करायची हातोटी जगावेगळी आहे. सबब अशा दंडवतांस मी पात्र नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

वरील प्रतिसाद वाचले नाहीत. ते

रेवती
Wed, 09/11/2013 - 22:27 नवीन
वरील प्रतिसाद वाचले नाहीत. ते नंतर वाचीन. एकदम माझ्या मुलाचे बालपण आठवल्याने मनात विचारांची गर्दी झालीये. आमचंही पोरगं अस्स्स्स्स्सच असल्याने लाकडी ब्लॉक्स, लाकडी इतर खेळणी आणाली होती. त्याचा उपयोग खेळण्यापेक्षा फेकण्यासाठी आधी जास्त झाला. घरातल्या सगळ्या फर्निचरवर अगदी दारे खिडक्या, पॉटी असे सगळीकडे स्टिकर्स लावण्यात बराच वेळ खर्ची पडू शकतो. "हां, आज आपण लिव्हिंगरूममध्ये स्टिकर्स लावू" म्हणून सोडून द्यायचे. ते काम होईपर्यंत आपली भाजी चिरून फोडणीला पडते. मग कणकेचा गोळा व एक्ट्रा लाटणे देऊन "हां आता पोळी लाटा" ती पोळी काळी असली तरी भाजून दाखवायची व टाकून द्यायची. ;) माझ्या सासूबाईंनी एका संपूर्ण भिंतभर पांढरा कागद (त्यावेळच्या त्याच्या उंचीप्रमाणे)लावून दिला होता. तिथे क्रेयॉन्स घेऊन चित्रकला (?)चालायची. मग सगळ्या हॉटव्हिल्सच्या कार्स (जवळजवळ १०० होत्या) त्या एका खुर्ची खाली एका ओळीत लावा. तोपर्यंत कुकर लावणे, कोशिंबिरीची तयारी होते. मोठाली फनेल्स आणाली होती. ज्या डब्यात धान्य भरायचे असेल त्यात फनेल ठेवून छोट्या वाटीने पुड्यातून सोडवून दुसर्‍या पातेल्यात ठेवलेले धान्य भरायला सांगायचे (२ वर्षाच्या आसपास असताना). ते घरभर भिरकावले जाणार. आपण वेळेवर उचलून ठेवणे आलेच. कढी खिचडी केल्यास "मलाही तुमच्यासारखीच हाताने खायची आहे." मग सगळीकडे सारवणार. (मुले असे करतातच असे वाचल्याने तो राडा नंतर आवरायचा). डिशवॉशर मधून काचेचे बाऊल्स काढून एकदा फेकून दिले. मी तिथे जाईपर्यंत तीनेक फोडून झाले होते. दणकट पॅकिंगमध्ये मिळणारे सामान आणून तसेच ठेवावे. ते उलटे पाल्टे करून बघण्यात अर्धा तास जातो व आपली कामे पुढे सरकतात. आपल्या मुलाची गार्‍हाणी आईवडीलांना सांगू नयेत. कौतुक म्हणून सांगितल्यास चालतील पण "मग आम्ही कसे पार पाडले असेल?" असा कुत्सित प्रतिसाद मिळण्याची शक्यता जास्त! "तुम्हाला एका मुलाचे करायला जमत नाही आणि आम्ही तीन मुले, सासूसासरे, दिर असे सगळे करायचो. तुम्हाला ना काही जमत नाही. सारखे रडायला सांगा" वगैरे ऐकून तुम्ही अपुरी झोप, हापिसमधील काम, उशिराने चालू केले शिक्षण यात मेलेले असाल. मग "मी विचारतीये काय अन तू सांगतीयेस का?" असा रागाने सवाल गेला तर फोनवर पलिकडे डोळ्यांना पदर लावलेला असतो. आमच्याशी बोलायची ही पद्धत नव्हे वगैरे ऐकून घ्यावे लागते. मागल्या अठवड्यातही मी ग्रोसरी दुकानात असताना तिथे फोन करून "काय आहे का वेळ?" असे प्रेमाने विचारले. "मी ग्रोसरी करतीये, नंतर घरे गेल्यावर फोन करते" झाऽऽऽले! "जन्मदात्यांशी बोलालयला तुम्हाला वेळ नाही का?" यावर आहे ना आहे ना, बोला. असे सगळे आपण शिकत जातो. ;) मुलांचे "हे काय आहे? ते काय आहे?" अश्या प्रश्नांना उत्तरे न देऊन सुटका नाही. आमचे मूल मोठे झाल्याने परवाच "रेप म्हणाजे काय?" हा प्रश्न आला व बर्‍या भाषेत खरे उत्तर द्यावे लागले. त्यापेक्षा काऊ चिऊ बरे असतात.
  • Log in or register to post comments

जीवनसार, वाचून गार !

डॉ सुहास म्हात्रे
Wed, 09/11/2013 - 22:49 नवीन
जीवनसार, वाचून गार ! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

का हो? काही चुकले का?

रेवती
Wed, 09/11/2013 - 23:06 नवीन
का हो? काही चुकले का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

छे हो, उलट स्तुतीच केली आहे.

डॉ सुहास म्हात्रे
Wed, 09/11/2013 - 23:13 नवीन
छे हो, उलट स्तुतीच केली आहे. चपखल गोष्टी सोदाहरण सांगितल्या म्हणून. गैरसमज नसावा. (स्वगतः आम्हाला काव्यात गती नाही हेच खरे :( )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

वा रेवतीताई.. काय प्रतिसाद

पिलीयन रायडर
Fri, 09/13/2013 - 10:49 नवीन
वा रेवतीताई.. काय प्रतिसाद आहे!!! मी पण सध्या भांड्यांच्या रॅक समोर बसुन "काय वाट्टेल ते करु देणे" हे सुत्र अवलंबिले आहे.. त्यात त्याचा जो वेळ जातो तेवढ्यात चार कामं होऊन जातात.. मागच्या पिढीच्या रिअअ‍ॅक्शन बद्दल सहमत. अपण वैतागलेले असतो..त्यात ह्यांना ५० प्रश्न आनि १६७२९२९ उपदेश करायचे असतात.. कधी आपला आवाज चढला की लगेच पलीकडले आवाज उतरतात.. आणि अगदी पडेल आवाजात "बरय्..ठिके..हम्म्म..." एवढ्यावर बोलणे येते..म्हणुन मी आजकाल "एक्स्ट्रॉ केअर" घेउन जस्तीत जास्त मधाळ आवाजात बोलते.. म्हणजे पुन्हा मानापमान नको.. पाळणाघरात ठेवायचा विचार पक्का होत आहे. लवकरच जाईल तो. आणि त्याला ते आवडेल अशी मला खात्री वाटतेय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

आता प्रतिसाद वाचत आहे.

रेवती
Wed, 09/11/2013 - 22:53 नवीन
आता प्रतिसाद वाचत आहे. पाळाणाघरात सोडण्याबाबत ऋषिकेशशी फारच सहमत आहे.मुलगा २ वर्षांचा झाल्यावर अठवड्यातून दोन अर्धे दिवस अशी सुरुवात केली. त्याला ते भयंकरच आवडले. मग पुढील वर्षी पाच दिवस रोजचे ४ तास जाऊ लागला (पाच वर्षांनंतर आवडेनासे झाल्यावर पुन्हा २ दिव्सच जात असे पण तोपर्यंत किंडरगार्टनही सुरु झालेले असते). साधारण २ वर्षांचे वय झाल्यावर त्यांना इतर मुलांमध्ये मिसळण्यास आवडू लागते. पाळाणाघरात सोडण्याबाबत काहीही वाटून घेऊ नकोस. फक्त ते त्याला आवडते ना बघ.
  • Log in or register to post comments

ह्याचा कवीला जो काही अर्थ अपेक्षित असेल तो असेल.

भ ट क्या खे ड वा ला
Sat, 09/14/2013 - 10:04 नवीन
विंदा यांच्या काही कविता तुम्हाला या पुस्तकातून मिळतील , त्या मुलांबरोबर share करा. वाचा, वाहून दाखवा, वाचायला द्या , (वेळ,वय या प्रमाणे ) राणीची बाग एकदा काय झाले, सशाचे कान एटू लोकांचा देश, परी ग परी अजबखाना, सर्कसवाला पिशीमावशी आणि तिची भुतावळ अडम् तडम् टॉप सात एके सात बागुलबोवा इत्यादी इत्यादी
  • Log in or register to post comments

बरेच दिवस फक्त प्रतिसाद

कवितानागेश
Sun, 09/15/2013 - 00:11 नवीन
बरेच दिवस फक्त प्रतिसाद वाचतेय... मी एक बघितलय की प्रत्येक मुलाची एनर्जी लेव्हल वेगळी असते आणि आवड/मागणीसुद्धा. त्यामुळे खरं तर प्रत्येक मूल नवीन आव्हान घेउन उभे राहिलय असं वाटतं.. माझी भाची अशीच 'गुंड' होती. तिला गोष्ट सान्गायला लागलं तरी एका जागी बसून ऐकायची नाही , भोवती नाचायची आणि मला मध्ये खांबासारखं उभं करुन गोल गोल फिरायची. मोकळे सोडले तर माकडासारखी झोपाळ्याच्या कड्यांना लटकून छतापर्यंत पोचायची. एकदा मला तिला कडेवर घेउन, उभे राहून लागोपाठ २९ वेळा राष्ट्रगीत म्हणावं लागलं होतं... तिला झोपवायला! ती भिन्तीवर अडकवलेल्या देवघराच्या बाजूला असलेल्या खुर्चीवरुन देवघराला लटकून 'गंपती कूक्क' करत कितीही वेळ खेळायची.. शेवटी देवघराची जागा बदलली आणि गणपतीबाप्पाचा मस्त टाईमपास घालवला. :) एक तास प्ले ग्रुपमध्ये पाठवलं तर मजेत गेली आणि पहिल्याच दिवशी तिथल्या बाईंसकट सगळ्यांच्या नकला घरी येउन करुन दाखवल्या. आणि हे सगळे दीड वर्षाची असताना..... तेन्व्हा लक्षात आले कि हिला एकाच वेळेस हाताला, पायाला आणि डोक्याला बिझी ठेवणारे खेळणं द्यायला हवय.. मग एक दिवस पेटी- हार्मोनियम काढून दिली. त्या वेळे तिला भाता मारायलादेखिल कुणाची लुड्बुड नको होती. एरवी घरभर वादळासारखी धावणारी मुलगी एका जागी एक तास स्वस्थ बसून हवे तसे स्वर वाजवत बसली होती. :) मग तिला आगगाडीचा भोन्गा, कूकरची शिट्टी, चिव-चिव, डिन्ग डॉन्ग बेल.. अश्या आवाजान्च्या जवळ जाणारे आवाज पेटीवर वाजवून दाखवले. मग स्वारी खुश!
  • Log in or register to post comments

पेटी...अप्रतिम आयडिया..पुढे

पिलीयन रायडर
Sun, 09/15/2013 - 15:29 नवीन
पेटी...अप्रतिम आयडिया..पुढे मागे वापरुन पहाता येईल.. एखादं वाद्य शिकवणे किंवा किमान नुसतं वाजवायला देणे हे खुप छान आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

कल्पकता !

डॉ सुहास म्हात्रे
Sun, 09/15/2013 - 15:45 नवीन
व्हॉट अ‍ॅन आयडिया मदाम !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

+१ वाद्य खेळायला देणे अतिशय

ऋषिकेश
गुरुवार, 09/19/2013 - 10:39 नवीन
+१ वाद्य खेळायला देणे अतिशय चांगली कल्पना आहे. मुलीला मी खेळण्यातला डमरू, झांजा, छोटा ड्रम, जत्रेत मिळणारी बासरी आणि कचकड्याचा सेलवर चालणारा कॅसियो वगैरे आणून दिला आहे. (पैकी ड्रम फोडून झाला आहे) सध्या गेले चार दिवस कचकड्याच्या कॅसिओतील सेल संपल्याने तो वाजत नाहिये तर त्याची आठवण झाल्यावर त्याला फटके देऊन "बोल बोल!" असे त्याला 'वा! करणे' चालु असते. आणि वाजला नाही की "ऐकत नाही" असे म्हणते आणि दुसर्‍या खेळाकडे वळते :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

गुंडापुत्र ह्यांना नुकतेच

पिलीयन रायडर
Fri, 09/20/2013 - 09:50 नवीन
गुंडापुत्र ह्यांना नुकतेच पाळणाघरात पाठवणे सुरु झाले आहे.. आज दिवस दुसरा.. हे माझ्या कंपनीचेच पाळणाघर आहे. त्यामुळे आवारातच आहे. कधीही मुलगा रडला जास्त तर ते बोलवुन घेतात. पहिला दिवस म्हणुन १ तास त्याला तिथे ठेवणे ..आणि त्यापैकी ५ मिन तरी किमान त्याला सोडुन बाहेर जाऊन लपणे असा प्लान होता. पण झालं असं की पोरगं ५ व्या मिनिटाला इतर पोरांमध्ये जाऊन बसलं आणि मायबापाला विसरलं.. मग आम्ही निघुन गेलो.. जवळपास १ तासानी मी जाऊन डोकावुन आले तर निवांत पणे एक बॉल घेउन तो खेळत बसला होता.. तेव्हा माझ्या लक्षात आलं की मुलं चटकन कुठेही रुळतात.. रुळत नाहीत ते पालक.. इथे माझ्या ममतेच्या गंगा जमुना डोळ्यातुन वहात होत्या.. आणि तिकडे माझा मुलगा मस्त पणे जिंगल्स ऐकत बसला होता.. पुढे मग झोप आली की आई आठवली मग रडापडी सुरू झाली..तेवढं तरी होणारच होत.. पण १ तासासाठी गेलेला ४ तास तिथे राहुन आला... आजही मोजुन १.५ मिनिटाला तो पोरांमध्ये घुसला..मी गेले हे त्याला समजलं पण नाही.. तसा माझा मुलगा मस्तीखोर आहे. घरात तो खुप दंगा करतो. पण पाळणाघरात आल्यापासुन तो शांतपणे बघत बसला होता. कुणी त्याचं खेळणं घेतलं तरी तो फक्त बघत राहीला. एरवी पण दुसर्‍या मुलाने त्याला त्रास दिला तर तो उलट काहीच प्रतिकार करत नव्हता. आम्ही समोर असु तरच हे पोरगं शेर आहे.. नाही तर गप बसतं.. आता हा स्वभाव कसा बदलतो हे पाहण्या सारखे असेल.. मला वाटतं की तो थोडा तरी अ‍ॅग्रसिव्ह होईल.. असं सगळ्यांचच म्हणणं आहे की तो अजुन जास्त सोशल होईल.. एरवी तो त्याचे लाड करणार्‍या मोठ्यांकडे लग्गेच जायचा. पण त्याच्या वयाच्या मुलांसमोर बुजरा व्हायचा. बघु आता काय होतय ते.. तसाही तो तिथे ४ तासच असणारे.. तेवढीच त्याच्या आजीला विश्रांती...
  • Log in or register to post comments

अरे वा!

ऋषिकेश
Fri, 09/20/2013 - 14:31 नवीन
अरे वा! अभिनंदन! :) आता आराम मिळाल्यावर त्याच्याच त्याच (तथाकथित) गुंडगिरीमुळे त्रास होत नसल्याने (उलट निरागतेची मजाच वाटत असल्याने) त्याच्या कारनाम्यांचे कोण कौतुक महिनाभरात सांगु लागाल बघा ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

व्वा मस्त वाटलं ऐकून ... आणि

उदय के'सागर
Fri, 09/20/2013 - 10:24 नवीन
व्वा मस्त वाटलं ऐकून :) ... आणि तुम्ही जे म्हणालात "मुलं चटकन कुठेही रुळतात.. रुळत नाहीत ते पालक" ह्याला +१ माझाही मुलगा १.३ वर्षाचा आहे, तो ११ महिन्याचा होता तेव्हाच त्याला पाळणाघरात टाकणार होतो. का उगीच आज्जी आजोबांना त्रास द्यायचा ह्या एकमेव भावनेतून हा निर्णय घेतला होता. पण मुलाच्या आज्जीच्याच डोळ्यातून गंगा-जमूना वाहू लागल्या आमचा हा निर्णय ऐकल्यावर... आता त्यांची हौस म्हणून १.५-२ वर्षाचा होईपर्यंत घरीच ठेवणार आहोत मग पाळणाघर नक्की...पण त्यापूर्वी इथे पाळणाघराबद्दलचे 'अलमोस्ट' सगळ्यांचेच चांगले मतं वाचून छान वाटले :) माझ्या आईला पण देईन हे वाचायला आणि हो अर्थात तिला पाळणाघर पण दाखवायला नेणार आहे.. तेवढंच समाधान (तिच्या डोक्यात पाळणाघर म्हणजे अश्शी मोठ्ठी खोली त्यात पन्नास एक पाळणे, मुलं रडतायेत, पाळण्यातच शी-शू चालू आहे कोणाचं लक्ष नाही, तिथल्या आया मुलांना शांत बसवण्यासाठी मारताहेत ... हे असलं काहीतरी आहे ..अर्थात त्यांच्या काळी हे असले आधुनिक आणि महागडे पाळणाघरे कुठे होते म्हणा .. तिचा असा गैरसमज साहाजिकच आहे)
  • Log in or register to post comments

अहो तुमची आईच कशाला..मी १०

पिलीयन रायडर
Fri, 09/20/2013 - 11:30 नवीन
अहो तुमची आईच कशाला..मी १० वेळा ह्या पाळाणाघरात जाऊन सुद्धा अजुन माझं मन तयार होत नव्हतं. मी सुद्धा लहनपणी पाळणाघरात राहीले आहे. पाळणाघर नुसतं म्हणायला.. खालच्या काकुंकडेच आई सोडुन जायची, ते ही फक्त ४-५ तासांसाठी. पण ती माणसंच विचित्र होती. त्यांनी कायम आम्हाला आश्रिता सारखं वागवलं जेव्हा की त्यांना आम्हाला सांभाळण्याबद्दल पैसे मिळायचे. त्याचा माझ्या मनावर खुप परिणाम झाला. पाळणाघर म्हणजे जिथे खुप खुप उदास, परकं वाटतं अशी जागा असं माझं मत होतं.. पण..खुप विचार करुन माझं मत बदललं.. १. मी ज्या पाळणाघरात गेले ते लोक प्रोफेशनल तर नव्हतेच पण चांगली माणसं पण नव्हती. मी १ लीत अस्ल्याने मला आप्लं-परकं ह्या गोष्टी कळत होत्या. माझी ३ वर्षाची बहीणही माझ्या सोबत राहिली. पण तिच्या मनावर असे कोणतेच परिणाम झाले नाहीत. कारण मुळात तिला फारसं काही कळतच नव्हतं. लहान वयात पाळाणाघरात जाण्याचा हा फायदा असतो. पटकन अडजस्ट होतात मुलं. २. जिथे माझा मुलगा जातोय ते कंपनीचे पाळणाघर आहे. तिथे सकाळच्या दुध नाश्ट्या पासुन सगळे दिले जाते. त्यात मुलांचा विचार करुन मेनु आखलेला असतो. आणि तो वेळेवर दिला जातो. घरी सुद्धा जेवण छानचे असते पण आपण रोजचं रोज ठरवुन , विचार करुन बनवत नाही. इथे मुलं नीट जेवतात असा माझा अनुभव आहे. मी मुलाला सारखी जाऊन काचे आडुन बघुन येऊ शकते हा अजुन एक फायदा. दुपारी मी चक्कर मारली तर मुलांचे खेळ चालु होते. बेडुक उड्या, कागद फाडणे, पाणी उडवणे असले ही प्रकार करुन घेतात. बागेत नेतात. गाणी शिकवतात. हे सगळं घरी करुन घेण्या एवढे त्राण आपल्यात नसतात. तिथे २-३ शिक्षिका आहीत खास लहान मुलांचे. आई-बापात पण नसेल इतका अफाट पेशन्स त्या पोरींमध्ये आहे. अत्यंत प्रेमानी चालु असतं सगळं.. नोकरी करणार्‍या आई-बाबांना पाळणाघराशिवाय पर्याय नसतो. किती वर्ष आपण आपल्या आइ-वडिलांना बांधुन ठेवणार मुलांसाठी? त्यांनाही बाहेर जावं वाटतं, समवयस्क लोकांमध्ये गप्पा हाणाव्या वाटतात.. पण मुलांमुळे ते अडकतात. माझ्या ही सासुबाईनी डोळ्यातुन पाणी काढलं.. मी सुद्धा काल त्याला पाळणाघरात झोपवत होते तेव्हा मुसळधार रडुन घेतलं.. हतबलता वगैरे आली होती थोडा वेळ.. पण आज माझा मुलगा मस्त खेळतोय तिथे आणि आपण पालक त्यांची चिंता करत इथे चर्चा करतोय!! शेवटी घर ते घर.. त्याला पर्याय नसतो. पण मुलांनही कधीतरी हे कळतच की सगळं काही मिळत नाही आयुष्यात. घर कधीतरी सोडावं लागतच. माझ्या मुलाला ती जाणिव सव्वा वर्षाचा असताना झाली.. मला पहिलीत असताना झाली.. माझ्या नवर्‍याला १२वी नंतर घर सोडल्यावर झाली... प्रत्येकाची वेळ वेगळी असते.. पण ती येतेच.. आणि ती वेळ येते तेव्हा पिल्लु ओंजळीतुन आकाशात उडायला सोडल्या सारखी साजरी करावी.. त्याचं धडपडणं हे पक्षानी पहिल्यांना पंख फडफडवुन आकाशात भरारी मारण्याचा प्रयत्न आहे असं समजावं.. उगाच अशा प्रसंगान आपण करुणेची झालर लावतो.. आपल्या पिल्लाकडे "बिचारं बिचारं" म्हणुन पाहिलं की आपण,पिल्लु.. परिस्थिती सगळंच बिचारं बिचारं होतं..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उदय के'सागर

काही अपडेट्स..

पिलीयन रायडर
Tue, 12/31/2013 - 14:54 नवीन
आता मुलगा पाळणाघरात रुळला आहे.. काही निरीक्षणे १. १५-२० दिवस त्रास झाला. पण शेवटी मग घट्ट करुन त्याला ५-६ तास ठेवायला सुरवात केली. ह्या मध्ये दिवाळीत बाहेर फिरायला गेलो होतो, तेव्हा तो माझ्या भावाच्या मुला सोबात खुप खेळला. कदाचित तेव्हा त्याला इतर लहान मुलांशी खेळायची मजा कळाली. त्या नंतर जेव्हा परत पाळणाघरात ठेवले तेव्हा तो फार चटकन रुळला. २. १ आठवडा तो नुसता झोपुन रहायचा. नाही तर रडत रहायचा.. पण १ महिन्या मध्ये तो आता इतर मुलांसोबत खेळायला लागलाय. बोलणं लक्षणीयरित्या वाढलय. आता वाक्य बोलतो. "पुली दे" "मला मोबाईल दे" वगैरे.. ३. जाताना रोज रडतो, पण एकदा का पाळणाघरात गेला की खेळतो.. मग त्रास देत नाही. ४. कसं ते कळालं नाही पण त्याची चिडचिड पण कमी झाली आहे. आता तो चावत / मारत नाही. मी इथल्या चर्चे नंतर थोदं ओरडुन / धपाटे घालुन पाहिलं.. आता मी त्याला मारत नाही. तो तसा मला अजिबात घाबरत नाही, पण त्याच्या वडिलांना घाबरतो. त्यांनी आवाज चढवला की ऐकतो, त्यामुळे मारायची वेळ येत नाही. त्याला १-२ दा मारल्यावर मला असं वाटलं की ह्याला अजुनही मुद्दा कळत नाहीये. मग मी खुप पेशन्सनी त्याला समजावुन सांगायला लागले. आता पण आधी त्याच्याशी बोलतो. असं करु नये वगरे सांगतो.. ५. त्याला रात्रि झोपेतुन रडत उठाय्ची सवय होती. ती कमी झाली असली तरी अजुनही मध्येच रडु शकतो. त्याचं काही लॉजिक नाहीये. कदाचित जेव्हा तो खुप पळापळी करतो तेव्हा पाय दुखत असतील.. किंवा मध्ये सर्दी झाली होती तेव्हा श्वास घेताना त्रास होत असेल.. आजकाल तरी रात्री शांतता असते.. ६. खेळ - मोबाईल त्याला आवडतो, थोडा वेळ खेळायला दिला तर तो २ गोष्टी प्रामुख्याने पहातो. १. स्वतःचे जुने व्हीडिओ. ते त्याला खुप आवडतात. त्यात तो माणसं ओळखत बसतो. २. एक अ‍ॅप आहे, त्यात वेग्वेगळे प्राणी , त्यांचे आवाज (बॅकग्राउंडला फार मस्त म्युझिक आहे) वगैरे आहे. त्यात तो प्राणी पाहुन तसे आवाज काढतो. प्राणी ओळखतो. शिवाय स्लाईड केल्यावर पुढचा प्राणी दिसतो हे ही कळालय. प्राण्याच्या तोंडाला टच केलं की तो प्राणी तोंड उघडुन जोरात ओरडतो हे ही कळालय.. त्याला रोज झाडांना पाणी घालायला नेतो. तेव्हा बाहेर जे काही निवडक पक्षी दिसतात ते तो पहातो.. क्रिकेट त्याला खुप आवडतं, म्हणुन त्याचे बाबा-काका-आजोबा त्याला काही ना काही शिकवतात.. आजी शुभं करोती शिकवते.. मी १-२ ओळींच्या गाण्यावर हातवारे शिकवतेय.. भाज्या ओळखायला शिकवतोय. पाळणाघर हे प्ले स्कुल टाईप असल्याने तिथे चित्र वगैरे काढायला शिकवत आहेत. त्याला बाहेर फारसं नेणं होत नाही. पण वेळ काढुन ते ही करायचे आहे (जसे की मंदिर, बाजार वगैरे) एकंदरित बाहेर पडल्यानी जरा धीट झाला आहे. आता तो पटकन कुणाकडेही जातो. घाबरत नाही. आधी बेल वाजली तरी रडायचा. आता मस्त पैकी काका - मावशी असं नातं जोडुन कडेवर जातो. ह्यात एक मुद्दा महत्वाचा असा की त्याच्या कार्डिओलॉजिस्ट च्या मते (त्याची १५ व्या दिवशी ओपन हार्ट सर्जरी झाली आहे. पण आता तो उत्तम आहे.) त्याच्यात आयर्न आणि व्हिट. डी कमी पडल्याने तो चिडचिडा झाला होता आणि पटकन सर्दी वगैरे होत होती. (आता तो तेव्हा पहिल्यांदाच अंघोळ केल्यावर लगेच गाडीवर पाळणाघरात जायला लागला होता, त्यानेही वारं लागुन सर्दी होऊ शकते असं मला वाटायचं. मुळात सिझनल सर्दी कोणती आणि त्या पेक्षा सिरीयस सर्दि कोनती हे मला अजुनही नीट कळत नाही.) उपाय म्हणुन गोळ्या / सप्लिमेंट देणं त्या बाईला मान्य नाही. तिच्या मते खाणं चांगलं हवं. म्हणुन रोज अंड + शक्य तेव्हा पाया सुप + रोज उन्हात १५-२० मिनिटे नेणे + रोज २ भाज्या + १ फळ + दुध बंद (त्याने लोह शोषायला प्रॉब्लेम होतो असं तिचं मत - मी दुध कमी केलं पण बंद नाही) हे आवश्यक आहे. मी पाया सुप दिलं नाही (मी नॉनव्हेज बाबतीत साशंक आहे.. आम्ही खात नाही. त्यानी खावं पण त्याच्या साठि करुन द्यायची माझी हिंमत होत नाहीये..) पण मी अंड + उन्हात नेणे आणि बा़कीच्या गोष्टी नीट पाळल्या. खज्र + ड्राय फ्रुट्स नेमाने सुरु केले. त्याच्या रक्त तपासणी मध्येही विट. डी वाढल्याचे दिसले. आणि खरच चिडचिड कमी झाली आहे. एक आता ते पाया सुप च जमवायचं बघतेय.. अगदीच कुणी नाही मिळालं तर मग किळस बाजुला ठेवुन स्वतः करीन. पण एकंदरीत खाण्यातुन मुलां वर फार फरक पडतो असे माझेही मत झाले आहे. समांतर :- ऐसी वरील ही चर्चा - http://aisiakshare.com/node/2368 आणि विशेष करुन ऋषिकेश चा प्रतिसाद वाचनीय आहेत..
  • Log in or register to post comments

अभिनंदन!

ऋषिकेश
Tue, 12/31/2013 - 14:58 नवीन
अभिनंदन! :) इथे नुसतीच चर्चा न करता, त्यातून काही उपाय निवडून केलेल्या उपायांचा परिणामही आवर्जून दिलात याचेही कौतूक वाटले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

+११११

प्यारे१
Tue, 12/31/2013 - 16:14 नवीन
+११११
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश

पाया सुप? म्हणजे काय?

arunjoshi123
Tue, 12/31/2013 - 15:09 नवीन
पाया सुप? म्हणजे काय?
  • Log in or register to post comments

मटण - म्हणजे माझ्या मते -

पिलीयन रायडर
Tue, 12/31/2013 - 15:19 नवीन
मटण - म्हणजे माझ्या मते - बकर्‍याच्या पायाचे सुप.. जे की मुख्यतः हाड असते म्हणे..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123

मटण सुप (अर्थातच आकर्षक

मोदक
Tue, 12/31/2013 - 15:41 नवीन
मटण सुप (अर्थातच आकर्षक छायाचित्रांसह) पाया
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

परवा मिपावरच कुठेतरी ही लिंक

पिलीयन रायडर
Fri, 06/20/2014 - 13:52 नवीन
परवा मिपावरच कुठेतरी ही लिंक सापडली. आज जरा निवांत चाळुन पाहिली तर खजिनाच हाती लागलाय. बहुदा ह्या विषयी मिपावर चर्चा झाली असावी. अरविंद गुप्तांची खेळणी इथे काय नाहीये…!! पुस्तकांचा अक्षरश: खजिना आहे. वेगवेगळी खेळणी कशी बनवावी ह्याची प्रात्यक्षिके आहेत. तब्बल वीस भाषांमध्ये फिल्म्स आहेत. ह्यातल्या बऱ्याच गोष्टी अजून माझ्या २ वर्षाच्या मुलाला इतक्यात झेपणार नाहीत… पण पुढे जाऊन ही साईट अत्यंत उपयोगी ठरणार हे नक्की. सध्या ह्या साईट वरची पुस्तकं डाउनलोड करून वाचून दाखवता येतील. नक्की हा माणूस कोण आहे म्हणून गुगलल्यावर ही माहिती सापडली :- अरविंद गुप्ता या शिवाय मायबोली वरही हा एक धागा आजच वाचनात आला. पुनश्च उद्योग .... उन्हाळ्याच्या सुट्टीत १० वर्षाचे मुल इतकं काही करू शकतं हे पाहून धक्का बसलाय!!!! आमची प्रगती :- सध्या आम्ही पुस्तकं आणुन चित्रे ओळखणे, गोष्टी तोडक्या मोडक्या शब्दात सांगणे इतपत प्रगती केली आहे. बिल्डिंग ब्लोक्स पासून घर बनवणे (म्हणजे २-४ ब्लोक्स जोडणे) वगैरेही जमायला लागलय. पण कुठलीही गोष्ट आधी तोंडात घालायची सवय (अजुनही) न सुटल्याने चिकणमाती वगैरे देता येत नाही खेळायला. मुख्यत: सगळ्या खेळण्यांनी मारामारी किंवा क्रिकेट खेळणे चालू आहे. तुमच्या कडे काय नवीन?
  • Log in or register to post comments

तुमच्याकडील प्रगती आवडली.

रेवती
Fri, 06/20/2014 - 17:46 नवीन
तुमच्याकडील प्रगती आवडली. चिकणमाती देता येत नसेल तर प्ले डो मिळतो तो दिल्यास काय होईल? एक सुचवणी. आमच्याकडे शाळेला उन्हाळ्याच्या सुट्ट्या चालू होतायत. नेहमीचेच क्लासेस चालू ठेवायचा विचार आहे. टेनिस बरे जमतेय असे प्रशिक्षिकेने सांगितले व आता चांगल्यातली रॅकेट आणायला सुचवल्याने ती आणली. परवा तबल्याचे सादरीकरण आहे. प्रेक्षकवर्ग मोजून पंधरा वीस असणारे. क्लासची मुले व आईवडील एवढेच! ;) तरी रोज कुरकुर सुरु आहे कारण लोकांसमोर वाजवायचे नाहीये. नवीन वेबसाईट समजलीये व शिक्षिकेने त्यावरील गणिताची तयारी सर्वांना करण्यास सुचवले आहे. पुढील यत्तेचा अभ्यासक्रम जाहीर झालाय व सुट्टीत त्याची ओळख करून घेण्यास सुचवले आहे. सुट्टी सुरु झाल्यावर आमची मायलेकरू मराठी शिकवणी सुरु होते. गेली ४ वर्षे हे सुरु आहे पण ५ ओळी सलग वाचणे यापेक्षा आमची प्रगती होत नाही कारण मनात एकच गोष्ट आहे की 'मला या भाषेची गरज नाही'. सम्जावून सांगितले पण आता वाद घालण्यात मला स्वारस्य नाही. तसेच शिकवत राहणार. येत्या भारतवारीत दुकानांच्या पाट्या वाचता आल्या की बरे वाटेल अशी आशा! सध्यातरी त्याच्या डोळ्यासमोर भरपूर झोपेची स्वप्ने आहेत व संध्याकाळाचे मैदानावरील खेळणे! सध्या एवढेच मलाही जमेल. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा