तिचा एक दिवस

आतिवास जनातलं, मनातलं
शारदा एकदम दचकून जागी झाली. आपण कुठे आहोत आणि हा कसला आवाज आहे असा तिचा गोंधळ क्षणभरच टिकला. पहाटे पाणी आल्याआल्या लगेच भरलं तरच मिळतं, नाहीतर त्याचा काही भरोसा नसतो, म्हणून रात्री झोपताना नळ चालू ठेवून झोपायची तिने स्वतःला सवय लावून घेतली आहे. तरीही तिचे हे रोजचे दचकून जागे होणे मात्र काही संपत नाही. खरे तर आज शारदा खूप दमली आहे. शेजारी प्रकाश - तिचा नवरा - घोरत पडला आहे. रात्रीच्या जोर जबरदस्तीनंतर त्याचे हे निवांत झोपणे आणि तिची दमणूक हेही आता नेहमीचे झाले आहे. पाणी भरण्यासाठी त्याला उठवण्याचा मनात आलेला विचार तिने लगेच झटकून टाकला. पाणी राहायचे बाजूला, आणि त्याचे पुन्हा लगटणे चालू व्हायचे! त्या कल्पनेनेच तिच्या अंगावर शहारा आला. तिचे मन आणि तिचे शरीर आजकाल त्याच्या मागणीला तयार नसते. पण एकदा लाडीगोडीत ’जरा हळू’ असे तिने म्हणताच ’कोण असेल तसा, त्याच्याकडे जा मग’ असे म्हणत त्याने तरातरा बाहेरची वाट धरली होती. आपण थोडे जरी ताणले तरी हा लगेच दुस-या बाईकडे जाईल याची शारदाला तेव्हा खात्रीच पटली होती. मग बाहेरची काही लागण त्याने घेऊन येण्यापेक्षा त्याच्या इच्छेला निमूट शरण जाणे तिने स्वीकारले होते. “नाहीतरी लग्नाची बायको आहे मी त्याची, म्हणजे या शरीराचा मालकच की तो" असा कडवट विचार तिच्या मनात आला आणि तिचे अवसान आणखीच गळून गेले. या विचारांत पाच एक मिनिटे गेली असतील नसतील, शारदा उठली. शारदाला फक्त तीन बादल्या पाणी मिळाले. आता त्यातच कपडे धुवायचे, अन्न शिजवायचे, भांडी घासायची आणि आंघोळ करायची इतकी कामे तिला उरकावी लागणार तर! खरे तर तिच्या डोळ्यांमध्ये अजून झोप रेंगाळते आहे. पण आज कामाला दांडी मारून पण चालणार नाही, देसाई बाई चांगल्याच रागावतील, नाही गेले तर तिचे कामही सुटेल. आज देसाई बाईंच्या लेकाचा वाढदिवस आहे, बरेच पाहुणे येणार आहेत. शारदाला ’थोडा जास्त वेळ कामाला ये’ असं त्यांनी मागच्या आठवडयातच सांगितलं आहे. चार तास जातील पण त्याचे पन्नास रूपये द्यायचे त्यांनी कबूल केले आहे. घरात आज शिजवायला दाणा नाही. त्या पन्नास रूपयांच्या आशेने शारदाला थोडा उत्साह येतो. स्टोव्ह पेटतच नाही. बाटलीत केरोसीनचे जेमतेम चार थेंब दिसतात. म्हणजे चहाचा विचार बाजूलाच ठेवणे भाग आहे. तशीही घरातली साखर पण संपलीच आहे. निदान चपात्या भाजी करायचे काम वाचले याचाच शारदाला आनंद आहे. कालची रात्रीची थोडी भाजी आणि एक भाकरी शिल्लक आहेत. प्रकाशचे सकाळचे खाणे त्यात भागेल कसेबसे. नव-याची झोप उडू नये अशा सावधपणाने शारदा दार हलकेच लोटून लगबगीने घराबाहेर पाऊल टाकते. प्रकाश बरा असतो तेव्हा त्याच्या त्या जुनाट मोपेडवरून तो शारदाला ’श्रीराम’ सोसायटीपर्यंत सोडतो. पण चहासाठी तकतक नको म्हणून तिने आज त्याला उठवले नाही. कालची त्याची अजून उतरली नसणार म्हणजे आज काम बुडवून तो घरातच बसणार हे शारदाला आता अनुभवाने माहिती झाले आहे. आता त्यामुळे पुढची वीस मिनिटे शारदाला चालत जावे लागणार. सकाळी रस्त्यावर तितकीशी गर्दी नाही. पण शारदाच्या अंगात भरभर चालण्याइतकी ताकद नाही या क्षणी! शारदाला कामाच्या पहिल्या घरी पोचायला दहा मिनिटे उशीर झाला. मोकाशी बाई त्यामुळे रागावल्या आहेत. शारदावर त्या थेट ओरडायला सुरूवात करतात. खर तर दिवसभर मोकाशी बाई घरातच असतात. त्यांना काही कुठे कामाला जायचे नसते, त्यामुळे पाच दहा मिनिटे इकडे तिकडे झाल्याने तसा काही त्यांना फरक पडायला नको. पण त्या घडयाळावर नजर ठेवून बसलेल्या असतात. त्यांना काही सांगण्यात अर्थ नाही हे आता शारदाला अनुभवाने माहिती आहे. मोकाशी बाईंना काही ऐकून घ्यायची सवय नाही. शारदा काही न बोलता कामाला लागते, याचा मोकाशी बाईंना आणखी राग येतो. त्यांच्या तोंडचा पट्टा आता जोरातच सुरू आहे. रोजच्याप्रमाणे स्वयंपाकघरातले बेसिन खरकटया भांडयांनी गच्च भरले आहे. लोक खायचे नसताना, भूक नसताना इतके अन्न ताटात वाढून कशासाठी घेतात हा नेहमीचा प्रश्न आजही शारदाला पडतो. त्या खरकटयाच्या वासाची तिला खरे तर शिसारी येते. बाथरूममध्येही ढीगभर कपडे आहेत. मोकाशी बाईंना शारदाच्या मागे मागे हिंडायची वाईट खोड आहे. एक मिनिट त्या काही शांत बसत नाहीत. ’असेच कर, तसे करू नकोस’ असा सूचनांचा सारखा भडिमार चालू असतो त्यांचा. त्या शांत राहिल्या तर शारदाला भरभर काम उरकता येईल. पण मोकाशी बाई बोलत राहतात. शारदाने ’हो, नाही, बरोबर’ अशा थाटाचे काही उत्तर दिले, की त्यांना जणू प्रोत्साहन मिळून त्या नव्याने सुरूवात करतात. जोवर शारदा काही बोलत नाही, तोवर मोकाशी बाई तेच तेच बोलत राहतात. त्यांनी दिलेल्या दोन चार जुन्या साडयांवर शारदाचं वर्ष निभावत, आत्ताही शारदाच्या अंगावर त्यांनी दिलेलीच साडी आहे. म्हणून शारदा त्यांच ऐकून घेते. मोकाशी बाई तशी मनाने चांगली आहे, वेळप्रसंगी अडचण भागवते. त्यांना तोडून आपल्याला चालणार नाही याची शारदाला जाणीव आहे. पुढच काम जोशी बाईंच! शारदाने बेल वाजवल्यावर लगेच दार उघडत. दारात जोशी बाबा हसत उभा असलेला पाहून शारदाच्या हृदयाचा ठोका चुकतो. जणू तॊ शारदाची वाटच पाहत होता. जोशी बाई आठवडाभरासाठी त्यांच्या बहिणीकडे गेल्या आहेत, हे ती विसरलीच होती. जोशी बाईंची आई आजारी आहे, त्यामुळे त्यांना परत यायला दोन चार दिवस जास्तही लागू शकतात, तसे त्या शारदाला सांगून गेल्या आहेत. जोशी बाई चांगल्या आहेत, पण त्यांचा नवरा मात्र आगावू आहे. एरवीही त्याची नजर शारदावर असते. एक दोनदा तर त्याने चुकून लागला असं भासवत शारदाच्या अंगाला नको तिथे हात लावायचाही प्रयत्न केला होता. आता त्याचे हसणे पाहून दोन्ही पोरही घरात नाहीत हे शारदाला नीटच समजल. “मी तासाभराने येते त्या काकूंच काम आटोपून" असं शारदा शेजा-यांना ऐकू जावं अशा बेताने मोठया आवाजात म्हणते. त्यावर जोशी साळसूदपणे म्हणतो, "मला काय दुसरे उद्योग नाहीत की काय? लवकर काम आटोपून घे. मला कामाला जायचय. आई घरात नसताना कोणाला दार उघडायचं नाही असं मी मुलांना सांगून ठेवलय, म्हणजे तुला सुट्टीच पाहिजे म्हण की!” शारदाचा नाईलाज होतो. शारदा पुढच दार उघडच ठेवते आणि स्वयंपाकघराच्या खिडकीतून शेजारच्या बाईंशी मोठमोठयाने गप्पा मारते. जोशी तिच्या मागेमागे फिरायला लागल्यावर "साहेब, उगी एका जागी निवांत बसा पाच मिनिटं. माझ काम झाल की मग काय आवरायच ते आवरा’ असं मोठया आवाजात म्हणते. ते ऐकून शेजारची राणी मॅडम दार उघडून "काय जोशी, काय म्हणतेय सासूबाईंची तब्येत?” अशी चौकशी करायला लागते. जोशीला चडफडत पण हसतमुखाने राणीशी बोलावे लागते. कधीकधी शारदाला वाटते की तिची आणि जोशीबाईंची कहाणी खरे तर सारखीच आहे. आपल्या नव-याचे रंगढंग शारदा चांगली ओळखून आहे. जोशी बाई मात्र भोळीभाबडी आहे, इतकाच काय तो फरक. शारदा गरीब आहे, आणि जोशी बाई श्रीमंत आहे हे खरे, पण बाई म्हणून दोघींचेही जगणे तितकेच अभागी आहे असे शारदाला नेहमीच वाटते. क्षणभर जोशी बाईबद्दल शारदाच्या मनात कणव दाटून येते. उद्यापासून दुपारी जान्हवीताई घरी असेल तेंव्हा कामाला यायच असं स्वत:च्या मनाशी ठरवून शारदा बाहेर पडते आणि समोरच्या राणीच्या घरात शिरते. तिथे गरम चहाचा कप आणि चार बिस्किटे शारदाची वाट पाहत असतात. दोन मिनिटे निवांत बसून तो आयता चहा पिताना शारदा सुखावते. राणी शारदाला एक कागद देते. “नीट वाच आणि मग सही कर. काही शंका असली तर न लाजता मला विचार,” असं म्हणत ती शारदाच्या हातात पेनही देते. राणीची कोणीतरी एक मैत्रीण ’घरकाम करणा-या बायांची’ म्हणजे मोलकरणींची संघटना चालवते हे शारदाला माहिती आहे. एकदा ती बाई राणीकडे आली असताना तिने शारदाला कामाबद्दल खूप प्रश्न विचारले होते ते शारदाला आठवलं. राणी मोलकरणींच्या हक्कांबाबत शारदाशी नेहमी बोलते. आजही तिने नियमित आणि चांगला पगार, पगारी रजा, बोनस, आठवडयाची हक्काची सुट्टी अशा गोष्टी शारदाशी बोलायला सुरूवात केली. अशा गोष्टी बोलायला काय ऐकायलाही चांगल्याच वाटतात. पण शारदाला राणीच्या भोळेपणाचं नवल वाटतं. बाहेर काम मिळवायला आणि एक एक काम टिकवायला जीवाचा कसा आटापिटा करावा लागतो, हे राणी मॅडमला नाही समजायच. कामाला बाया कमी नाहीत, बाईलाच काम मिळत नाहीत अशी बाहेर परिस्थिती आहे. एका बाईने एका घरच काम सोडलं तर ते मिळवायला दहा बाया टपलेल्या आहेत. पोटापाण्याला रोजच्या पैसे लागतात आणि व्यसनी नव-याच्या बाईला ते स्वत: कमवावे लागतात, तिथं ही हक्कांची भाषा करायची म्हणजे पायावर धोंडा पाडून घ्यायचा म्हणा ना! राणी मॅडम बोलताहेत, त्यातली एक गोष्ट जरी बाहेर एखाद्या घरात बोलली तर त्या दिवशी लगेच ते काम सुटेल. या सगळ्या हक्कांशिवाय काम करायला अनेक बाया तयार आहेत. बायांची एकी वगैरे सगळं ठीक आहे, पण त्या एकीमुळे तांदूळ आणि साखर थोडीच स्वस्त मिळणार आहे, असा कडवट विचार शारदाच्या मनात येतो. पण राणीशी हे सगळं बोलण्यात काही अर्थ नाही. आपण बाई आहोत म्हणून शारदासारख्या गरीब बायांच दु:ख आपल्याला समजत, असा राणीचा समज आहे. राणी चांगली आहे, पण आपल्या जगण्याची दुर्दशा राणीला कधीही समजणार नाही, हे शारदाला मनातून माहिती आहे. शारदाला राणीचा चांगुलपणा समजतो, म्हणून ती राणीला कधी उलटून काही बोलत नाही. आजही ती नुसती मान डोलावते पण कागदावर काही सही करत नाही. राणी वैतागते आणि रागावून शारदाशी काही न बोलता पेपर वाचायला लागते. शारदाला वाईट वाटतं पण तिचा काही इलाज नाही. कागदावर सही केली नाही म्हणून राणी तिला कामावरून काढून टाकणार नाही याची शारदाला खात्री आहे सोसायटीतल्या दुस-या इमारतीपाशी पोलिस उभे आहेत. सोबत त्यांचा वास घेणारा कुत्रा पण दिसतो आहे. म्हणजे सोसायटीत आणखी एक चोरी झाली आहे तर! असा काही प्रकार झाला की शारदासारख्या हातावर पोट असणा-या लोकांवर पोलिसांची वाकडी नजर फिरलीच म्हणून समजायचे, हे आता शारदाला अनुभवाने चांगल माहिती झालं आहे. अर्थात पोलिसांना काही चोर पकडायचा असतो अशातला भाग नाही, गरीबांकडून पैसे उकळायला त्यांना चांगल निमित्त मिळतं इतक मात्र नक्की. पैसे दिले नाहीत तर पोलिस मग उगाच घरी चौकशीला येणार, कामे बुडवून चौकीत फुकटच्या चकरा मारायला लावणार, हे पाहून शारदाच्या नव-याचं डोक फिरणार आणि तो शारदावर भलतेसलते आरोप करणार. शिवाय कामाला दांडी मारली की ज्या त्या घरी ऐकून घ्याव लागणार, पोलिसांनी चौकीत बोलावल होत हे कळताच जी ती बाई संशयाने पाहणार. हे सगळ टाळायचं तर आज देसाई बाईंकडून जास्तीच्या कामाचे जे पन्नास रूपये मिळतील, ते या पोलिसांना द्यावे लागतील.... शारदाचा कामाचा उत्साह मावळतो. आता या सोसायटीत चो-या नेहमीच्याच झाल्या आहेत. पन्नासाच्या ऐवजी वीस रूपयांत पोलिसांना पटवता आलं तर आजच्या खर्चासाठी थोडे पैसे हातात राह्तील असाही विचार शारदाच्या मनात येतो. आणखी तीन घरचं काम आटोपून शारदा देसाई बाईंकडे पोचते तेंव्हा घडयाळाचा काटा बाराकडे झुकलेला असतो. लवकर यायला सांगितलेलं असतानाही शारदा नेहमीच्या वेळेपेक्षा तासभर उशीराच पोचली आहे, म्हणूने देसाई बाईंचा पारा चढलेला आहे. त्यांचा आरडाओरडा सुरू होतो. शारदाला खरे तर कोणी तिच्याशी असे चढया स्वरांत बोललेले आवडत नाही, पण आत्ता या क्षणी तर शारदाला मुकाटयाने ऐकून घेण्यावाचून पर्याय नाही. देसाई बाईंसाठी आजचा दिवस खास आणि म्हणून वेगळा असेल. पण शारदाला त्याचे काय? तिच्यासाठी हा नेहमीचाच आहे. कोणाच्या घरी वाढदिवस असो, लग्न असो, लग्नाचा वाढदिवस असो, बारसे असो की आणखी काही सण समारंभ असो, शारदाला काय फरक पडतो? या सगळ्याचा अर्थ शारदासाठी तरी ’अधिक राबणे’ इतकाच असतो. तिला या जास्तीच्या कामाचे चार पैसे जास्त मिळतात हे खरे. पण राबण्याच आणि हातात पडणा-या पैशांच गणित तिच तिलाच माहिती आहे! शारदा खोल्या झाडते, फरशी पुसून घेते. शारदा भांडी घासते. शारदा कपडे धुते. रोजची कामे उरकल्यावर – आज पाहुणे असल्यामुळे हेही काम जास्त आहे - शारदा स्वयंपाकघरात मदत करते. भाजी चिरणे, नारळ खोऊन देणे, कणीक मळणे, भाजी फोडणीस टाकणॆ, चपात्या लाटणे … शारदा कामावर काम करत राहते, उसंत कसली ती नाहीच तिला. एखाद्या यंत्रासारखी शारदा सकाळपासून गरागरा फिरते आहे. तिचे मन बंड करते. तिच्याभोवती देसाई बाईंच्या घरातली माणसे निवांत बसली आहेत. खाणे, पिणे, गप्पा सारे काही मजेत चालले आहे. मधूनच काहीतरी विनोद झाल्यावर सगळेजण खो खो हसत आहेत. सगळे मजेत दिसताहेत. त्यांच जगण चांगलं चाललेलं दिसतय. शारदाला वाटतं, यांच्याकडे पैसा आहे म्हणून केवळ माझ्यासारख्या गरीबाला हे लोक राबवून घेऊ शकतात. शारदाला सगळ्या जगाचाच राग येतो. ’माझ्यात काय कमी आहे?’ असा दिवसातून दहादा तिला पडणारा प्रश्न परत एकदा तिच्या मनात फणा काढून उभा राहतो. शारदा शाळेत असताना हुषार होती, चांगले मार्कही मिळायचे तिला. दहावीनंतर शिकायची स्वप्नं पाहिली होती तिनेही! शिकून नोकरी करायची, पैसे कमवायचे तिचे बेत हवेतच विरले कारण घरच्यांनी सोळाव्या वर्षीच तिच लग्न लावून दिल! शारदा नुकतीच अठराची झाली - ती अद्याप तिची स्वप्न विसरलेली नाही. आपली स्वप्न कधीही पूर्ण होणार नाहीत याची तिला जाणीव झालेली आहे. कदाचित म्हणूनच आजकाल तिला शिकल्या सवरल्या माणसांना असं निवांत बसलेलं पाहून त्यांचा राग येतो. शारदच्या डोळ्यात पाणी तरारून येत. आता या ठिकाणी या वेळी असे डोळे भरून येण चांगलं नाही हे जाणवून ती हलकेच पदराने आसवं पुसते. देसाई बाईंच्या घरच काम संपतं तेंव्हा संध्याकाळचे पाच वाजलेले आहेत. आता देसाई बाईंकडे पोराच्या वाढदिवसासाठीचे पाहुणे येतील. शारदाने सगळ तयारच केलेल आहे, आता तिच्या मदतीची गरज संपलेली आहे. “उद्या लवकर ये बर का" असं शारदाला दहा वेळा बजावायला मात्र देसाई बाई एवढया गडबडीतही विसरत नाहीत. शारदाला आपण ना दिवसभर काही खायला दिले, ना एवढया पदार्थांमधले दोन तिला बांधून देत आहोत – हे देसाई बाई सोयिस्करपणे विसरल्या आहेत. सकाळी राणी मॅडमकडे मिळालेल्या चहा बिस्किटांव्यतिरिक्त दिवसभरात शारदाच्या पोटात दुसरे काही गेलेले नाही. आता काम संपल्यावर भुकेच्या जाणीवेने ती व्याकूळ होते. दिवसभर कामात गर्क असल्याने जे जाणवले नव्हते ते सारे तिच्या नजरेसमोर येते. घराकडे वळाणारी तिची पावले जड झाल्याचे तिला जाणवते. घरात केरोसिनचा थेंब नाही, डाळ नाही, तांदूळ नाही, हे तिला आठवते. वाटेत पोलिस हप्त्यासाठी वाट पाहत असणार त्याच्या हातात काहीतरी टिकवल्याशिवाय आजची रात्र सुखाची जाणार नाही याचे तिला भान येते. शारदाजवळ वेळप्रसंगी लागली तर असावी म्हणून नव-यापासून लपवून ठेवलेली केवळ एक दहाची नोट आहे. तेवढयाने त्या पोलिसांची भूक थोडीच भागणार आहे? आणि समजा चुकून त्यांची भागली, तरी शारदाचे काय? प्रकाशचे काय? शारदाच्या मनात एक विचार येतो. जिन्यातून परत येऊन ती देसाई बाईंकडे पैसे मागते. तसेही देसाई बाईंनी आजच्या जास्तीच्या कामाचे पन्नास रूपये द्यायचे कबूल केलेले आहेच. शारदासाठी आज ते पन्नास रूपये लाखमोलाचे आहेत. पण शारदाच्या तोंडचे वाक्य पूर्ण होण्याच्या आतच देसाई बाईंचा आरडाओरडा सुरू होतो. “ मी काय तुझे पन्नास रूपये ठेवून पळून जाणार आहे की काय? पैशांच्या बाबतीत जेवढा चोखपणा दाखवतेस तेवढा कामाच्या वेळेबाबत बरी दाखवत नाहीस ती! आजचेच बघ, एवढे हजार वेळा तुला सांगूनही दोन तास उशीरा येऊन माझा खोळंबा केलासच ना? अगदी हजार रूपये मी देणे लागत असल्यासारखी घाई का करतेस? आलेल्या पाहुण्यांसमोर माझी अशी लाज का घालवतेस बाई? महिन्याचा पगार देताना देईन तुझे पन्नास रूपये. जा आता, उद्या मात्र लवकर ये, आजच्यासारखी कारणं नको सांगू मला." असे म्हणत दे़साई बाई शारदाची रिकाम्या हाती बोळवण करतात. देसाई बाईंच्या घरातले लोक, आलेले पाहुणे, शेजारीपाजारी विचित्र नजरेने शारदाकडे पाहतात. कानकोंडी होऊन शारदा निमुटपणे माघारी फिरते. आता आणखी काही बोलले तर हे काम सुटेल याची शारदाला जाणीव आहे. देसाई बाई पैसे काही बुडवणार नाही हे शारदालाही माहिती आहे. पण आपण देसाई बाईची आणि तिच्यासारख्या या ब-या घरातल्या बायांची नड जाणतो आणि त्यांच्या वेळेला कामात मदत करतो. आपल्या मदतीला, आपल्या वेळेला मात्र या कोणी उपयोगी पडत नाहीत अशा कडवट विचाराने शारदाला निराश वाटते. आपल्या कामाचे, हककाचे पैसे मागावे लागतात आणि ते हातात न पडता फुकटचा अपमान तेवढा होतो याचे शारदाला वाईट वाटते. घराकडे परतताना शारदाला केरोसिनची मोकळी बाटली दिसते, मोकळे डबे दिसतात. आज शिजवायचे काय आणि पोटात ढकलायचे काय याची शारदाला चिंता आहे. घरात प्रकाश कालच्या त्या शिळ्या भाकरीवरच असेल, म्हणजे त्याच्याही पोटात वणवाच पेटला असेल एव्हाना. अन त्याला तर भूक सहन होत नाही. कालची दारू अजून नीट उतरली नसेल तोवर भुकेच निमित्त त्याला मिळाल म्हणजे आज त्याच्या हातचा मार आहेच ठरलेला. देसाई बाईच्या कामामुळे आज घरी जायला उशीरच झालाय. म्हणजे संध्याकाळचही पाणी येऊन गेलं असणार. शेजारणीकडून काही उसन आणायची पण सोय नाही. त्यांच्याही घरात कमी अधिक हेच असणार. आता त्यांच्या घरातली पुरूषमाणसं कामावरून आली असतील, त्यांच्यासमोर काही उसन मागणही अवघड. त्यांच्यातल्या कोणाकोणाशी प्रकाशची कधी ना कधी काहीतरी शिवागीळ, बाचाबाची झालेली आहे. पुरूषांची आपापसातली भांडणं घरातल्या बाईची इच्छा असो वा नसो, तिला निभावून न्यावी लागतात. दुकानदारांची आधीचीच बाकी आहे, शारदाला कोणी दारात उभदेखील राहू देणार नाही, त्यांना चुकवतच तिला घराची वाट चालावी लागते अलिकडे. काय करायच? कुठे जायचं? - शारदाच्या डोक्यात विचारांच चक्र अविरतपणे चालू आहे. सकाळपासून नाही, गेल्या दोन वर्षांपासून! दिवसभर राब राब राबून शेवटी पोटात फक्त भूक उरावी या परिस्थितीमुळे शारदाला अगदी असहाय्य वाटतं, तिला स्वत:ची कीव येते. कशासाठी काम करायचं? कशासाठी जगायचं? या सगळ्याला कधी अंत तरी असणार आहे का? एक दिवस पोटभर अन्न नाही की एक दिवस सुखाची झोप नाही. कशासाठी राबायच मग इतक परक्यांच्या घरात, त्यांच वेडवाकडं ऐकून घेत? - या प्रश्नांनी शारदा गांजून गेली आहे. शारदाला वाटतं हे शहर म्हणजे लहानपणी आपण पुस्तकात वाचलं होत तशा एखाद्या राक्षसासारख आहे. दूरवरून याची भूल पडते, पण एकदा त्याच्या जवळ आलं की हे शहर आपल्यालाच गिळून टाकतं हे शहर आपल्याला हतबल करतं, आपली नामोनिशाणी मिटवून टाकतं. हे सगळं आपण एका क्षणात कां संपवू नये? नाहीतरी माहेरच्यांना आपली काही किंमत नाही, आपण मेलो तर प्रकाश आनंदाने दुसरं लग्न करेल; मोकाशी बाईला काय आणि देसाई बाईला काय दुसरी कोणीतरी बाई मिळेलच की कामाला. आपण नसल्याने कोणाचच काही अडणार नाही या विचाराने शारदा उद्विग्न होते. रस्त्यावर पुष्कळ मोठया इमारती आहेत. कोठल्यातरी गच्चीवर जाऊन खाली उडी टाकली की खेळ खलास होईल. हे रोजचे काम नको, की डोक्याला ताप नको. पण या शहरात शारदाला मरायचीही सोय नाही. सगळया उंच इमारतींच्या दारात वॉचमन बसलेले आहेत. त्यांच्य पन्नास प्रश्नांना उत्तर द्यावी लागतात. आणि एकदा आतमध्ये समजा गेल तरी गच्चीला कुलूप असत. या शहरात जीव द्यावा अशी एकही विहीर नाही. इथल्या नदीला पावसाळ्यातसुद्धा पाणी नसत. शारदाला या शहराचाच राग येतो. इथं धड जगायची सोय नाही आणि मरायचीही सोय नाही. हे जगणं रेटत नेण्याविना शारदाला काही पर्यायच नाही. शारदाच्या डोळ्यांतून अश्रू झरताहेत. आपल्या रडण्यालाही काही किंमत नाही, या आसवांत काही बुडवण्याची ताकद नाही हे शारदाला माहिती आहे. भुकेची कासाविशी, घरापासूनच तुटलेपण, दमणूक, एकाकीपणा, अपमान, भीती .. ….. या सगळ्याला सामोर जात शारदाचा एक दिवस पार पडला. असे आणखी किती दिवस तिला रेटून न्यायचे आहेत? जमेल का तिला हे निभावून नेणं? या प्रश्नाच उत्तर शारदाकडे नाही. आज नाही, कदाचित कधीही असणार नाही! ** अन्यत्र पूर्वप्रकाशित
वर्गीकरण
लेखनप्रकार

33 टिप्पण्या 10,226 दृश्ये
शेअर करा: 📱 WhatsApp

Comments

प्रभाकर पेठकर नवीन

लेखन म्हणून चांगले आहे पण वास्तवापासून थोडे फटकून आहे. आज कामवाल्या बाईंची तैनात; त्यांच्या, न सांगता मारलेल्या, दांड्या; खायची प्यायची बडदास्त आणि त्याच्या पुढे करावी लागणारी आर्जवं पाहता 'कामवाली बाई' हा वर्ग तितका कमकुवत राहिलेला नाही.

आतिवास नवीन

In reply to by प्रभाकर पेठकर

पेठकर काका, वास्तवापासून थोडे फटकून आहे. आणि 'कामवाली बाई' हा वर्ग तितका कमकुवत राहिलेला नाही. मान्य. तुमचा अनुभव आणि त्या अनुभवातून तुम्हाला लागलेला कथेचा अर्थ मान्य - अशा व्यापक अर्थाने मान्यता, सहमती. पण त्याचबरोबर वास्तव एकजिनसी कधीच नसते - त्यामुळे जे सरासरी (सर्वसाधारण) वास्तव असते त्याच्या अल्याड-पल्याड अनेक गोष्टी असतात इतकंच नमूद् करू इच्छिते.

आतिवास नवीन

In reply to by किसन शिंदे

हो. अवांतरः पूर्ण काल्पनिक,वास्तवाचा काहीही संबंध नसणारं लिहिणं ही बाब फार अवघड आहे माझ्या मते. तितकी प्रतिभा माझ्याकडे नाही.

बॅटमॅन नवीन

तरीच म्हणत होतो कुठेतरी वाचल्यासारखं वाटतंय अगोदर! पुन्हा वाचल्यावर तितकेच अस्वस्थ वाटले. अशाही बायका असतात आणि मुजोर कामवाल्याही असतात. मुजोरीचा अनुभव घेतलेला आहे.

उपास नवीन

सुंदर तरी कसं म्हणावं.. गुलजारचं घरोंदा मधलं गाणं आठवलं शहराचं वर्णन वाचून - दिन खाली खाली बर्तन है, और रात है जैसे अंधा कुआ.. इन सूनी अंधेरी आंखो मे आसू के जगह आता है धुआ.. जिने की बजाह तो कोई नही.. मरने का बहाना ढुंढता है.. ढुंढता है.. !!

पहाटवारा नवीन

In reply to by उपास

या प्रकारच्या पार्श्वभूमीवरच्या कथा, फिल्म्स पाहिल्याने असेल, विषय ओळखीचा जरी वाटला तरि प्रसंगांची गुंफण मनाला अस्वस्थ करते .. तेच लिखाणाचे यश! अवांतर : "ती असे करते .. तिला असे वाटते.. " अशा वाक्यरचनेपेक्षा, "तीने असे केले... तिला असे वाटले" .. अशी वाक्यरचना कदाचीत जास्त सुट्सुटीत वाटली असती .. अर्थात हे माझे मत! -पहाटवारा

आतिवास नवीन

In reply to by पहाटवारा

अवांतरात केलेल्या सूचनेबद्दल आभारी आहे. या कथेत बदल करुन पाहायला आता उशीर झालाय, पण पुढच्यावेळी नक्की दोन -तीन प्रयोग करुन बघेन प्रकाशित करण्यापूर्वी.

स्पंदना नवीन

छान लिहिलयस अतिवास. जरी कामवाल्या बायका पेठकरकाका म्हणतात तश्या मुजोर असल्या तरी घरातुन मार खाउन आलेल्या, बायका मी स्वतः पाहिल्यात. एकूण परिस्थीती अशीच आहे. पण कुणी दाखवत कुणी नाही दाखवत.

आतिवास नवीन

In reply to by स्मिता चौगुले

हो. ब्लॉगवर प्रकाशित केली आहे आधी. म्हणूनच 'अन्यत्र पूर्वप्रकाशित' अशी नोंद कथेच्या शेवटी केली आहे.

दादा कोंडके नवीन

पण काळ्या-पांढर्‍या व्यक्तीरेखांमूळे वास्तववादी वाटलं नाही.

पैसा नवीन

बाईचं आयुष्य कठीण असतं आणि कमी अधिक प्रमाणात गरीब असो की श्रीमंत काही बाबतीत सारखंच हेही चांगल्या प्रकारे व्यक्त झालंय. पण मला एवढ्या वर्षात घरकामासाठी लाचार झालेली बाई आजपर्यंत दिसली नाही. कामं असतातच. उलट गेली २ वर्षे माझा असा अनुभव आहे की जास्त पैसे द्यायला तयार झाले तरी मला घरकामाला कोणी मिळत नाहीये. त्यांना कमी पैसे मिळाले तरी फॅक्टरीत काम करणं जास्त आवडतं. पुण्यामुंबईसारख्या ठिकाणी इतक्या दबल्या गेलेल्या बायका असतीलही. पण मी जिथे रहाते तिथे तरी म्हणजे मध्यम दर्जाच्या शहरांमधे मोलकरीण हा वर्ग इतका दबला गेलेला अजिबात नाही.

भावना कल्लोळ नवीन

पैसा ताई, मुंबई मध्ये मी लहानपणा पासून कितीतरी बायकाना असे जीवन जगताना पहिले आहे, पाहते आहे. तुम्हा काही लोकांना हे वास्तववादी वाटणार नाही पण हे तितकेच खरे आहे, आजच्या काळात हि अशी परिस्थिती आहे कि दोन वेळच्या अन्नासाठी आतडी रगडे पर्यंत काम करावे लागते तेव्हा कुठे जाऊन घरात चुल पेटते. आतीवास ताई, मला तुमचे लेखन मनापासुन आवडले आहे आणि पटले सुध्दा आहेत. कारण प्रतेक्य नाण्याची दुसरी बाजू असते आणि ती दुसरी बाजु मी खूप जवळून पाहिलेली आहे.

पैसा नवीन

In reply to by भावना कल्लोळ

मुंबईसारख्या ठिकाणी अशा दबलेल्या बायका असतील हे मी आधीच लिहिले आहे. तिथे विषमताही पराकोटीची असते. आणि बांधकाम कामगार वगैरे क्षेत्रात तर नक्कीच असतील. पण मोलकरणी आणि त्याही आमच्यासारख्या मध्यम दर्जाच्या शहरांमधे इतक्या दबल्या गेलेल्या नक्कीच नाहीत!

प्रभाकर पेठकर नवीन

In reply to by पैसा

माझ्या निरिक्षणानुसार मुंबई-पुण्यातही कामवालीबाई मिळवणं आणि टिकवणं हे जास्तीचे पैसे मोजून, चहा-नाश्ता, जुन्या साड्या, ड्रेसेस देऊनही फार जीकरीचे झाले आहे. न सांगता दांड्या मारणे, स्वतःची चुक असूनही अजिबात एक शब्द ऐकून न घेणे हे सर्वसामान्य चित्र आहे. त्यावर कळस म्हणजे एखाद्या कामवालीशी तुमचे कांही कारणाने मतभेद झाले आणि तिला तुम्ही कामावरून काढून टाकले की ती तुमच्या घरी कोणी कामवाली कामासाठी येणार नाही ह्या साठी प्रयत्नशील राहते (यशस्वीही होते). अशा प्रसंगी नोकरी करणार्‍या बाईची ह्या कामवाली बाईमुळे फार फरपट होते. ह्या गोष्टी जवळून पाहिलेल्या (मुंबईत आणि पुण्यातही) आणि अनुभवलेल्या आहेत. बाकी प्रत्येकाला वेगवेगळा अनुभव येऊ शकतो. गरजू आणि कष्ट़करी बाई कामासाठी मिळाल्यास अनेक मुजोर कामवाल्यांच्या नोकर्‍या सुटतील. पण तसे होताना दिसत नाही. कारण ????

स्पंदना नवीन

In reply to by प्रभाकर पेठकर

पैसा आणी पेठकर काका तुम्ही ज्या बाया पहाताय आणी वर्णता आहात त्या मुळच्या स्वभावनेच मुजोर असतील, पण दारु पिऊन नवर्‍याने मोडलेले मनगट घेउन मी गेलीय बाईबरोअबर दवाखान्याला. बिचारी अस्स्स सुजलेल मनगट घेउन आली होती. मी खायला दिल्यावर मला नको म्हणुन खाली मान घातलेली राजश्री मला अजुनही आठवते. दोन दिवस घरात मुलांना सुद्धा अन्न नव्हत. मुसलमानाची ग्रॅज्युएट झालेली मुलगी नवर्‍याला आवडत नाही ऑफीसात काम केलेल म्हणुन दारात काम मागायला आली होती. भावाने हाकलुन दिलेली स्वाती चारदिवस आई यीएतो माझ्या घरात मुकाट पडुन होती. थरथरत अंग माझ मुंबईच्या आठवणींनी. त्यांच्या भानगडीत पडते म्हणुन नवर्‍याच्या जाम शिव्या खाल्ल्या.

पैसा नवीन

In reply to by स्पंदना

म्हणूनच मी सुरुवातीलाच लिहिलं की
बाईचं आयुष्य कठीण असतं आणि कमी अधिक प्रमाणात गरीब असो की श्रीमंत काही बाबतीत सारखंच हेही चांगल्या प्रकारे व्यक्त झालंय.
शिवाय मुंबईत अशा प्रकारे आयुष्य काढणार्‍या बायका असतील हेही लिहिलं आहे कारण मुंबईची अफाट लोकसंख्या आणि टोकाची विषमता, पण त्याचवेळी लहान शहरे आणि कोकणातली गावे पाहिलीत तर तिथे घरकाम करणार्‍या बायका स्वत;च्या हक्कांबद्दल जागरूक असतात. दर रविवारी आणि सणाला सुटी, वर्षसाडी, चहा खाणे हे सगळे सांभाळावे लागते तरी महिना १५००-२००० देऊन कायमची बाई मिळेल याची खात्री नाही. बांधकाम मजूर म्हणून गोव्यात आलेल्या हुबळीच्या कानडी बाया आजकाल मोलकरीण म्हणून कामे करणे पसंत करतात कारण त्याना तिथे बांधकाम कामगार म्हणून ८ तास काम करून २०० रु रोज मिळतात तर ५/६ घरची कामे करून १० ते १२ हजार आरामात मिळतात. कोकणात तर आधीपासूनच माणूसबळ उपलब्ध नाही. शेतीच्या कामाला १५०-२०० रुपये रोज देऊनही माणसे मिळत नाहीत. शिक्षणामुळे सरकारी योजनांची माहिती सगळ्यांना आहे. गोव्यात तर एका दारिद्र्यरेषेखालील कुटुंबाला विविध योजनांद्वारे महिना रु. ६००० पर्यंत पैसे मिळतात. कोकणात थोडे कमी. त्यामुळे काम न करता जगता येते. जास्त पैसे हवे अस्तील तर कारखान्यात कंत्राटी कामावर जाणे त्यांना पसंत असते. परवाच मी अगदी मोबाईल सुद्धा चालत नाही अशा आमच्या गावाला ८ दिवस अडकले होते कारण सासूबाई आजारी. आणि घरातले काम करायला कोणी मिळत नाही. शेवट एका बाईने सांगितली ती रक्कम कबूल करून तिला कामावर ठेवले आणि मी तिथून बाहेर पडले.

प्रभाकर पेठकर नवीन

In reply to by स्पंदना

दारु पिऊन नवर्‍याने मोडलेले मनगट घेउन मी गेलीय बाईबरोअबर दवाखान्याला.
मी नाकारत नाहीए. अशा केसेसही असतील पण तुरळक. सरसकट सर्व कामवाल्या बायका मार खाऊन हात मोडून घेणार्‍या नाहित. तसेच, त्यांचे नवरे हुशार असतात. दारूसाठी पैसा पाहिजे नं! बायकोची कमाई त्यांना माहित असते. सोन्याचे अंडे देणारी कोंबडी त्यांना मारून टाकायची नसते. एखाद दूसरा असतो मूर्ख.
तुम्ही ज्या बाया पहाताय आणी वर्णता आहात त्या मुळच्या स्वभावनेच मुजोर असतील.
मुजोर असण्याची त्यांना गरज नसते. नवरा आणि बायको दोघेही नोकरी करत असतात त्या घरची मिळकत त्यांना आपल्या राहणीमानावरून माहित असते, आपल्या वाचून ह्यांचे भयंकर अडणार हेही ठाऊक असते आणि घरकामासाठी मिळणार्‍या बायकांची वानवाही त्यांना ठाऊक असते ह्या सर्वातून त्या त्यांचे महत्व जाणून स्वतःची किंमत ठरवतात. कामवाल्या सहजासहजी मिळत नाहीत हे जाणून त्या अटी घालतात आणि 'स्वातंत्र्य' उपभोगतात. त्या मुजोर नसतात 'हुशार' असतात, संघटीत असतात. आपण (अक्कल नसलेले) गरजवंत असतो. अडला नारायण..... ह्या तत्वाने आपणच त्यांच्या अटी आणि नखरे मान्य करुन त्यांचे महत्व वाढवत असतो. आपल्यापुढे पर्यायच नसतो. असो. मार खाणार्‍या, हतबल, काम मिळत नसलेल्या कामवाल्या ज्या कदाचित मिळालेल्या कामाच्या ठिकाणी मुजोरी किंवा आळस करीत असाव्यात त्यांचे काम मालकीणीच्या पसंतीस उतरत नसावे त्याने त्यांचे काम वरचे वर सुटत असावे. मी ज्याला वास्तव म्हंटले आहे ते बहुसंख्य कामवाल्या बायकांना लागू असणारे आहे. एखाद दूसरा अपवाद असू शकतो.

आतिवास नवीन

सर्व वाचकांचे आणि प्रतिसादकांचे आभार. अनेक प्रतिसाद वाचून 'वास्तव म्हणजे नेमकं काय' असा एक प्रश्न (पुन्हा एकदा) डोक्यात घुमायला लागला आहे :-) - त्याबद्दल नंतर कधीतरी

निनाद मुक्काम … नवीन

दोन वर्षापूर्वी महिलादिना निमित्त लेख मिपावर लिहिला होता. तेव्हा मी मोलकरणी चे उदाहरण दिले होते , महेश च्या प्राण जाये पार शान ना जाये ह्या सिनेमात दिव्या दत्ता ने मोलकरणी चे सुंदर काम केले होते , तिचा नवर्या सोबत चा प्रसंग अंगावर शहारा आणतो. सध्या मागणी व पुरवठा ह्यांच्यात तफावत आल्याने काही मोलकरणी आपले उखळ पांढरे करून घेतात. मात्र त्यांना मिळणारा पगार त्यांच्या कामाच्या कामाने तुटपुंजा असतो , व भारतात श्रमाला प्रतिष्ठा नाहीं त्यामुळे ह्यांच्या नशिबी अश्या नरकयातना येतात. हॉटेल व्यवस्थापन चे शिक्षण घेतांना शिक्षा म्हणून दीडशे विद्यार्थ्यांची भांडी घासणे किंवा अशीच बरीच कामे केली आहेत संपूर्ण दिवस शिक्षा भोगून झाली की घरी जायचे त्राण नसायचे , तेव्हा एकदा आमचे सर आम्हाला म्हणाले एका दिवसात तुमची ही हालत , तर चार घरातील संपूर्ण कामे करणारी बाई अर्धपोटी एवढे काम रोज करते ,

प्रभाकर पेठकर नवीन

In reply to by निनाद मुक्काम …

मात्र त्यांना मिळणारा पगार त्यांच्या कामाच्या कामाने तुटपुंजा असतो , व भारतात श्रमाला प्रतिष्ठा नाहीं त्यामुळे ह्यांच्या नशिबी अश्या नरकयातना येतात.
निनाद, पुण्यात, आमच्या घरांत कामाला येणारी कामवाली बाई दिवसभरात १५ घरं करते. एका घरातून तिला ८०० ते १००० रुपये मिळतात. म्हणजेच तिची सरासरी मिळकत महिना १२०००/- च्या घरात आहे. ह्या शिवाय तिच्यासाठी, तसेच तिच्या मुलांसाठी, जुने कपडे , तिच्यासाठी रोज चहा-नाश्ता, तिच्या घरच्यांसाठी कधी जेवणातील एखादा ताजा पदार्थ (हल्ली घरकाम करणारी माणसे शिळंपाकं स्विकारत नाहीत), सणासुदीला गोड-धोड, दिवाळीचा बोनस इ.इ. तिला मिळत असते. त्यायोगे तिचा अर्ध्याहून अधिक घरखर्चही परस्पर भागविला जातो. घरकाम हे अत्यंत अंगमेहनतीचे काम आहे ह्यात ह्यात शंका नाही. पण १०-१२ तास अंगमेहनत करण्याची त्यांना सवय असते. आपण सटीसहामासी कधीतरी हे काम करतो आणि आपले अंग दुखते. पूर्वीच्या बायका पहाटे उठल्यापासून रात्री नीजेपर्यंत हीच घरकामे स्वतः करीत असायच्या, तेही निवृत्तीशिवाय, त्यांचेही कौतुक वाटते. आधुनिक महिलाही, पहाटे उठून मुलांचे/नवर्‍याचे खाण्याचे डबे बनवून ८ तास नोकरी करून (मुंबईत असणार्‍या, १-२ तास लोकलचा प्रवास करुन) घरी येऊन पुन्हा रात्रीचा स्वयंपाक करतात आणि मुलांचा अभ्यास वगैरे घेत असतात. त्यांना गृहीत धरले जाते. कित्येक नवरे घरकामाला हातही लावत नाहीत. (आता परिस्थिती बदलते आहे असे वाटते.). ५ वर्षांपूर्वी, आखातातील नोकरीसाठी, पुण्यात एका स्वयंपाक्याला मी राहणे, जेवण-खाण, गणवेष आणि भारतात जाण्यायेण्याच्या खर्चाव्यतिरिक्त महिना १५०००/- (त्या काळच्या पगाराच्या दरानुसार) देऊ केले होते पण त्याने, 'साहेब, मला इथेच (पुण्यात) सकाळी ६ तास आणि संध्याकाळी ४ तास काम करून २००००/- रुपये मिळतात' असे सांगून नम्रतेने नोकरी नाकारली होती. ही माणसं फार भरपूर कमावत आहेत असा माझा दावा नाही परंतु अत्यंत तुटपुंज्या कमाईत दिवस काढताहेत असेही नाही. गरजेनुसार कमवत आहेत आणि नविन काम स्विकारायचे की नाही हेही स्वतः ठरविण्याइतपत स्वतंत्र झाले आहेत. कांही तुटपुंजे अजूनही गरीबीत असतील, त्यांच्यातच कांही दोष असतो पण, जे कामकरी कामाच्या बाबतील स्वच्छ, टापटीप, वक्तशीर आहेत ते सतत मागणी मध्ये आहेत.

सस्नेह नवीन

बर्‍याच जणांचे मत मोलकरणीचे चित्रण अवास्तव आहे असे दिसले. पण मी म्हणते, कथा वास्तववादीच असावी असे आहे का ? किंवा सध्याच्या काळाशी संगत नसून काही काळापूर्वीची परिस्थिती दाखवत असेल तर काय बिघडले ?

प्रभाकर पेठकर नवीन

स्नेहांकिता, कथा लेखनाबद्दल वाद नाहीए. माझ्या पहिल्या प्रतिसादातही म्हंटले आहे की 'लेखन म्हणून कथा चांगली आहे.' पण त्यातील कांही तपशिलांवर भाष्य केले तर ते लेखकास्/लेखिकेस आपल्या लेखनावर पुन्हा विचार करण्यास आणि भविष्यातील लेखनात समतोल साधण्यास मदतीचे होते. चर्चेचा उद्देशच तो असतो. लेखकास/लेखिकेस हतोत्साहित करण्याचा नसतो.
सध्याच्या काळाशी संगत नसून काही काळापूर्वीची परिस्थिती दाखवत असेल तर काय बिघडले ?
कथा कुठल्या जुन्या काळाशी संबंधीत वाटत नाही. प्रकाश बरा असतो तेव्हा त्याच्या त्या जुनाट मोपेडवरून तो शारदाला ’श्रीराम’ सोसायटीपर्यंत सोडतो. म्हणजे कामवालीचा नवरा पेट्रोल वाहन बाळगणार्‍यातला आहे. ही सद्य परिस्थिती आहे. हा जुना काळ नाही. त्या काळात कामवालीच्या नवर्‍याकडे साधी 'सायकलही' नसायची. राणीची कोणीतरी एक मैत्रीण ’घरकाम करणा-या बायांची’ म्हणजे मोलकरणींची संघटना चालवते हे शारदाला माहिती आहे. हेही वाक्य आधुनिक काळ दर्शविणारे आहे.

सस्नेह नवीन

In reply to by प्रभाकर पेठकर

भविष्यातील लेखनात समतोल साधण्यास मदतीचे होते. चर्चेचा उद्देशच तो असतो. लेखकास/लेखिकेस हतोत्साहित करण्याचा नसतो.
मला आपल्या प्रतिसादातून असे काही जाणवले नाही, काका .विषय काय आहे, यापेक्षा तो कसा खुलवला आहे हे पहावे हा दृष्टीकोन होता, बस.

प्रभाकर पेठकर नवीन

In reply to by सस्नेह

मला आपल्या प्रतिसादातून असे काही जाणवले नाही
माझा पहिला प्रतिसाद पुन्हा वाचावा...
आज कामवाल्या बाईंची तैनात; त्यांच्या, न सांगता मारलेल्या, दांड्या; खायची प्यायची बडदास्त आणि त्याच्या पुढे करावी लागणारी आर्जवं पाहता 'कामवाली बाई' हा वर्ग तितका कमकुवत राहिलेला नाही.
लेखनातील भावनेशी सहमत असलो तरी त्यातील 'तपशिल' वास्तवापासून दूर आहे हे मला सांगायचे आहे. हे इतके स्पष्ट लिहूनही 'जाणवले' नसेल तर खरंच आश्चर्य वाटते आहे. भविष्यात 'लेखन करताना भावनेला महत्व देत लेखन करतानाही वास्तवाचे भान सुटू नये' हा विचार लेखकापर्यंत पोहोचवायचा आहे आणि तो लेखकास पटल्यास तो एक, भविष्यात होणारा फायदा आहे. असो. हा फक्त लेखावरील चर्चेतील माझा मुद्दा आहे. तो योग्यच आहे असा माझा आग्रह नाही. पण ते एक प्रामाणिक लेखन आहे. पटले नाही तर सोडून द्यायचे स्वातंत्र्य लेखकास/लेखिकेस असतेच.

अभ्या.. नवीन

छान लिहिले आहे. प्रत्येकीच्या कथा निराळ्या, व्यथा निराळ्या . :-( आमच्या इथल्या शान्तामावशीची पोरगी भांडे घासणार्या आईला ओळख पण दाखवत नाही. आइच्य्याच पैशाने मोबाइलवर बोलत कॉलेजला जाते. :-(

म्हैस नवीन

लेखन म्हणून चांगले आहे पण वास्तवापासून थोडे फटकून आहे. आज कामवाल्या बाईंची तैनात; त्यांच्या, न सांगता मारलेल्या, दांड्या; खायची प्यायची बडदास्त आणि त्याच्या पुढे करावी लागणारी आर्जवं पाहता 'कामवाली बाई' हा वर्ग तितका कमकुवत राहिलेला नाही.
अगदी बरोबर . थोडे काय वास्तवाशी खूप जास्त फटकून आहे .