✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • लेख
  • भटकंती
  • कविता

सच्चिदानंद बाबांची गोष्ट

ध
धन्या यांनी
Sun, 08/11/2013 - 10:58  ·  लेख
लेख
गोष्ट तशी खुप जूनी. जवळपास आठशे वर्षांपूर्वीची. आताच्या आहमदनगर जिल्ह्यातील नेवासा नावाचं गाव. गावातील मोहिनीराजाचं मंदीर थेट समुद्रमंथनातील अमृतवाटप आणि विष्णूच्या मोहीनी अवताराच्या कथेशी निगडीत. या गावातील मुख्य रस्त्यातून एका सुंदर सकाळी संन्याशी वाटावीत अशी चार मुलं, तीन मुलगे आणि एक मुलगी मार्गक्रमण करत असतात. चौघांच्याही वयात थोडे थोडे अंतर असल्याचे जाणवत होते. एकमेकांच्या पाठीला पाठ लावून जन्माला आलेली सख्खी भावंडेच जणू. चौघांच्याही चेहर्‍यावर एक अतीव समाधान, शांती विलसताना दिसत होती. वाट चालत असताना या मुलांच्या समोरुन एक प्रेतयात्रा येते. प्रेतयात्रेच्या पुढे चालणारी एक स्त्री यातील एका बाल संन्याशाच्या पायावर भक्तीभावाने डोके ठेवते."अष्टपुत्रा सौभाग्यवती भव", तो बाल संन्याशी स्त्रीच्या चेहर्‍यावर हात ठेवून डोळे मिटून म्हणतो. स्त्री दचकते. दोन पावले मागे सरकते. संन्याशालाही प्रश्न पडतो. "काय झालं माई? दचकलात का?" संन्याशी शांतपणे विचारतो. "महाराज, तुमचा हा आशीर्वाद या जन्मी लाभणे शक्य नाही. ही माझ्या नवर्‍याची प्रेतयात्रा आहे." संन्याशी क्षणभर विचारात पडतो. पुढच्या क्षणी तो खांदा देणार्‍यांना तिरडी खाली उतरायला सांगतो. प्रेत कफनातून मोकळे करण्याची आज्ञा देतो. संन्याशाच्या चेहर्‍यावरील तेज पाहून त्याच्या शब्दाचा अव्हेर करण्याचे धाडस कुणालाच होत नाही. प्रेत कफनातून मोकळे केले जाते. "उठा सच्चिदानंद बाबा", तो बालसंन्याशी प्रेताच्या कपाळावर हात ठेवून म्हणतो. आणि काय आश्चर्य, ते प्रेत जिवंत होते. त्या बाल संन्याशाला नमस्कार करते. या सच्चिदानंद बाबांना पुढे हा बालसंन्याशी आपल्या भगवदगीतेवरील टीकेचा लेखक व्हायला सांगतो. ही त्या बालसंन्याशाची भगवदगीतेवरील टीका या सच्चिदानंद बाबांच्या उल्लेखाने संपते. शके बाराशते बारोत्तरे | तैं टीका केली ज्ञानेश्वरें || सच्चिदानंद बाबा आदरें | लेखकु जाहला || अजून एक गोष्ट. ही गोष्ट अगदी अलीकडची. १९८२ सालातली. मेल्व्हीन मॉर्स हे अमेरिकेच्या सिअ‍ॅटल येथील एका बालरुग्णालयात स्थायी वैद्यकतज्ञ म्हणून काम करत होते. अचानक त्यांना आयडाहोमधील पोकाटेलो येथून तातडीच्या मदतीसाठी बोलावले जाते. क्रिस्टल मेझलॉक नावाची एक आठ वर्षांची मुलगी पोहण्याच्या तलावात बुडाली होती. मॉर्स त्या ठीकाणी पोहचले तेव्हा त्या मुलीच्या हृदयाची धडधड थांबून १९ मिनिटे झाली होती.तिची बुब्बुळे विस्फारीत होउन स्थिरावली होती.मॉर्सनी आपले कौशल्य वापरुन त्या मुलीच्या छातीवर दाब देऊन तसेच इतर उपायांनी तिचे हृदय चालू करण्याचा प्रयत्न केला. आणि ते चालू झालेही. मुलीच्या हृदयाची धडधड चालू होताच पुढचे उपचार स्थानिक वैद्यांवर सोपवून मॉर्स आपल्या रुग्णालयात परतले. त्यानंतर काही आठवडे लोटले. मॉर्स दुसर्‍या एका रुग्णालयात काही कामानिमित्त गेले होते. त्याच रुग्णालयात क्रिस्टलवर उपचार चालू होते. मॉर्सना याची काहीच कल्पना नव्हती. क्रिस्टलला चाकाच्या खुर्चीवरुन एका खोलीतून दुसर्‍या खोलीत नेत असताना समोरुन मॉर्स गेले. त्यावेळी त्यांच्याकडे बोट दाखवून क्रिस्टल ओरडली, "हीच ती व्यक्ती, जिने माझ्या नाकात नळ्या खुपसल्या आणि त्यातून पाणी बाहेर काढलं." हे ऐकून मॉर्सना धक्काच बसला. कारण मॉर्सनी त्या मुलीवर जेव्हा उपचार केले तेव्हा ती मुलगी तांत्रिकदृष्ट्या म्रुतावस्थेत होती. त्यामुळे तिला आपल्यावर कोण उपचार करत आहे याची जाणिव होणे शक्यच नव्हते. मॉर्स यांनी क्रिस्टलच्या अनुभवाचा अभ्यास करायचे ठरवले. थोडयाच काळात या प्रकाराला मृत्यूसमीप अनुभव (नियर डेथ एक्स्पेरियन्स) म्हणतात हे ल़क्षात आले. या प्रकारावर तोपर्यंत जरी विपुल लेखन आणि नोंदी झाल्या असल्या तरी त्या सार्‍या नोंदी प्रौढांच्या होती. आतापर्यंत लहान मुलांच्या बाबतीत अशी कुठलीच नोंद झालेली नव्हती. मॉर्स यांनी या विषयावरचे वाचन तर वाढवलेच परंतू स्वतःही इतर लहान मुलांच्या अशा मृत्यूसमीप अनुभवांची नोंद करायला सुरुवात केली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या सार्‍या मुलांच्या अनुभवात समानता होती.काळोखी बोगदे, मृत नातेवाईकांशी भेट, देव-देवता पाहणे असंच वर्णन सार्‍या मुलांनी केलं होतं. याहीपेक्षा आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यांच्या या आठवणींमध्ये चक्क त्यांच्यावर उपचार होत असतानाच्याही आठवणी होत्या. आणि उपचार चालू असताना ती मुलं तांत्रिकदृष्ट्या मृत झाली होती. विज्ञानाने या अनुभवांचा पाठपुरावा चालूच ठेवला. वैज्ञानिकांनी बरेच सिद्धांत मांडले. त्यातील सामायिक कारणे काहीशी अशी आहेतः रक्तप्रवाह थांबणे, डोळ्यांना ऑक्सीजनचा पुरवठा थांबणे, शरीर मृत्यूशी झुंज देत असताना एपिनेफ्राईन आणि अ‍ॅड्रनलाईन अतिरिक्त प्रमाणात शरीराबाहेर स्त्रवणे. हा प्रश्न अगदी सर्वमान्य पद्धतीने निकाला निघाला नसला तरी वैज्ञानिकांनी माणसांवर संप्रेरकांचे प्रयोग करुन कृत्रिमरीत्या मृत्यूसमीप अनुभव निर्माण करण्यात यश मिळवले आहे. विज्ञान नविन असं काहीच निर्माण करत नसतं. ते फक्त निसर्गाच्या अज्ञात नियमांची उकल करत असतं. आता या क्षणी ज्या गोष्टी अतिंद्रीय, चमत्कार वाटत आहेत त्या तशा नाहीत. फक्त त्यामागचा कार्यकारणभाव आज तरी विज्ञानाला आपल्याला माहिती नाही. आणि या विश्वात निसर्ग नियमांपलिकडे जाऊन काहीही होत नसतं. त्यामुळे सच्चिदानंद बाबांची गोष्ट आपल्याला त्या बालसंन्याशाच्या योगसामर्थ्याचा चमत्कार वाटत असला तरी त्यामागेही अशीच काहीतरी वैज्ञानिक कारणे असतील. त्या बालसंन्याशाच्या नावावर खपवल्या जाणार्‍या इतरही चमत्कार कथा एकतर दंतकथा असाव्यात किंवा त्यात काही तथ्य असले तरी त्यामागे काहीतरी कार्यकारणभाव असावा. ज्यावेळी माणसाची मती कुंठीत होते, समोर घडलेल्या घटनेचं आकलन होत नाही त्यावेळी त्या घटनेला तो चमत्कार म्हणून मोकळा होतो. ही घटना एका पीढीकडून दुसर्‍या पीढीकडे गोष्ट स्वरुपात हस्तांतरीत होत असताना त्यावर अद्भुततेचा मुलामा अधिक अधिक दाट होत जातो आणि मग आपणही शाळेत विज्ञानाच्या पुस्तकांमध्ये जडत्व, गती, न्युटनचे गतीविषयक नियम अभ्यासलेले असतानाही आळंदीला गेल्यावर निरागसपणे विचारतो, "ती भींत कुठे आहे हो?"
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
समाज
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन

प्रतिक्रिया द्या
44547 वाचन

💬 प्रतिसाद (160)

प्रतिक्रिया

निअर डेथ एक्सपीरीयन्स आणि

धन्या
Mon, 08/12/2013 - 09:07 नवीन
निअर डेथ एक्सपीरीयन्स आणि ज्ञानेश्वरांनी सच्चीदानंद बाबांना शरीरात परत आणणे या भिन्न बाबी आहेत. सध्या एव्हढच.
ज्ञानदेवांनी सच्चिदानंद बाबांना जिवंत केले ही घटना जवळपास आठशे वर्षांपूर्वी घडून गेलेली घटना आहे. त्यावेळी नेमकं काय घडलं असावं हे आज आपण सांगू शकत नाही. जे सश्रद्ध आहेत ते चिकित्सेच्या भानगडीत पडणार नाहीत. त्यांच्यासाठी ही घटना ज्ञानदेवांच्या योगसामर्थ्याचे उदाहरण असेल. जे चिकित्सक आहेत त्यांच्या बुद्धीला मृत व्यक्तीला दुसरी व्यक्ती जिवंत करु शकते ही बाब पटणार नाही. ते उपलब्ध ज्ञानाचा उपयोग करुन या गोष्टीमागे काय कारण असावे हे शोधण्याचा प्रयत्न करतील. मी निरंजन घाटेंचं "संभव असंभव" पुस्तक वाचत असताना मला हे मेल्व्हीन मॉर्सच उदाहरण सापडलं. माझं कुतुहल जागं झालं. नियर डेथ एक्स्पेरियन्सबद्दल खुप काही वाचून काढलं. माझ्या आयुष्यात एक फेज अशीही आली होती की जेव्हा ज्ञानदेवाने मला झपाटून टाकले होते. तेव्हा हे सारे चमत्कार खरेही वाटायचे. पुढे चिकित्सक वृत्ती बळावल्यावर मी त्या चमत्कारांमध्ये सत्य शोधायला लागलो. सच्चिदानंद बाबांचा अनुभव हा नियर डेथ एक्स्पेरियन्सच आहे असा माझा दावा नाही. पण तो नियर डेथ एक्स्पेरियन्स असूही शकतो. त्यावेळी नेमकं काय घडलं हे आपल्याला माहिती नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

मी लिहिलय कोठेतरी, आमच्या

स्पंदना
Mon, 08/12/2013 - 09:38 नवीन
मी लिहिलय कोठेतरी, आमच्या गावात १ मे ला सकाळी साताच्या सुमारास मेलेली रखमा आज्जी संध्याकाळी सहाच्या सुमारास जागी झाली. उगा महाराष्ट्र बंद होता म्हणुन पावणे रावणे यायला वेळ झाला नाही तर.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

त्यावेळी नेमकं काय घडलं असावं...

अर्धवटराव
Mon, 08/12/2013 - 10:08 नवीन
आठशे वर्षांपूर्वी घडून गेलेल्या घटनेबाबत केवळ अंदाजच बांधता येतील हे खरय. पण माझा मुद्दा त्या विशिष्ट घटनेबाबत नाहि, तर ज्ञानदेवांनी किंवा एखाद्या योग्याने प्रेत उठवणे व नीअर डेथ एक्स्पीरीयन्स या दोन कन्सेप्ट्च्या भिन्नतेबाबत आहे. अगदी साधर्म्यच दाखावायचं झालं तर शरीरशास्त्र दृष्टीने नीअर डेथ एक्स्पीरीयन्स हा थोडाफार निर्वीकल्प समाधी सारखा आहे... अपघाताने घडलेली निर्बीज समाधीशी साधर्म्य दाखवणारी शरीराची स्थिती म्हणा हवं तर. (इथे "शरीरशास्त्र दृटीने" क्लॉज अत्यंत महत्वाचा आहे.) बाकी श्रद्धा, चिकित्सा वगैरे बद्दलचा वाद जुना आहे (आणि त्यात फारसं तथ्य देखील नाहि). आपल्या सभोवती दशदिशांत अनंत ज्ञान पसरलं आहे. ते सर्व काळोखात लुप्त आहे. आपला चिकित्सेचा टॉर्च आपण कुठल्या दिशेवर फोकस करतो व त्या टॉर्चची प्रखरता किती यावर त्या दिशेतलं तेव्हढच ज्ञान आपल्या दृष्टीटप्प्यात येतं. सच्चीदानंद बाबांची घटना योगसामर्थ्याचं उदाहरण आहे हे पटणं चिकीत्सेशिवाय शक्यच नाहि. योगसामर्थ्य म्हणजे पी.सी. सरकारचे जादुचे प्रयोग नव्हे. श्रद्धेशिवाय चिकित्सेला सुरुवातच करता येत नाहि. असो. सध्या गाडी वेगळ्या रूळांवर धावतेय. आपण त्याबद्द्लच बोलुयात. अवांतरः तुम्ही हे सगळं कुतुहल, चिकित्सा दृष्टीने बघता व त्याच दृष्टीकोनातुन तुम्ही हा लेख टाकला याची खात्री आहेच... त्याशिवाय मी प्रतिसाद टंकलाच नसता. अर्धवटराव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

सहमत !

आबा
Tue, 08/13/2013 - 19:33 नवीन
मृत्यूसमीपच्या अनुभवांचं सांखिकीय विश्लेषण मध्यंतरी वाचनात आलं होतं त्याची लिंक : http://www.koestler-parapsychology.psy.ed.ac.uk/Documents/MobbsWattNDE.pdf आणि त्याचंच मेंदूशास्त्रीय विश्लेषण इथे : http://www.pnas.org/content/early/2013/08/08/1308285110.abstract
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

लेख आणि प्रतिसाद आवडले

सुधीर
Mon, 08/12/2013 - 09:43 नवीन
त्या बालसंन्याशाच्या नावावर खपवल्या जाणार्‍या इतरही चमत्कार कथा एकतर दंतकथा असाव्यात किंवा त्यात काही तथ्य असले तरी त्यामागे काहीतरी कार्यकारणभाव असावा. +१ रमताराम यांचा प्रतिसादही आवडला.
  • Log in or register to post comments

रोचक विषय...

मदनबाण
Mon, 08/12/2013 - 10:58 नवीन
रोचक विषय... बाकी मॄत्यु जवळ आला की मनुष्य आणि इतर प्राणी यांच्या व्यव्हारात बदल होते असे म्हणतात. प्राणी आपल्या मूळ निवास स्थाना पासुन लांब जाउन देहत्याग करतात असे म्हणतात... तर मनुष्य प्राण्यांमधे सुद्धा अशी लक्षणे आठळुन आलेल्याच्या नोंदी आहेत म्हणे... मला माहित असलेली काही लक्षणे इथे देत आहे... ( ती सत्य असल्याचा माझा दावा नाही}) १) ज्याचा मॄत्यु जवळ आला आहे त्याला त्याच्या मॄत नातेवाईकां मधील व्यक्ती दिसु लागतात, किंवा ते बोलवत आहेत असे उल्लेख बर्‍याच वेळा त्यांच्या बोलण्यात करतात. २) भर उन्हात चालताना ज्या व्यक्तीचा मॄत्यु जवळ आला आहे त्या व्यक्तीला त्याची सावली अचानक दिसेनाशी होउ लागते. ३)ज्या व्यक्तीचा मॄत्यु जवळ आला आहे ती व्यक्ती सातत्याने निरवानिरवीची भाषा करु लागते...जवळच्या व्यक्तींना स्वतःच्या आर्थीक व्यव्हारांची माहिती देउ लागते. ४)बर्‍याच वेळा ज्याचा मॄत्यु जवळ अगदी जवळ आला आहे त्याला उलट्या आणि जुलाब होतात.
  • Log in or register to post comments

अजून सांगू का?

यशोधरा
Mon, 08/12/2013 - 11:36 नवीन
कानाच्या पाळ्या निस्तेज होतात डोळ्यांतील बाहुल्या मोठ्या होतात चेहर्‍यावर तेज दिसते (बुझनेसे पयले का दिया) किंवा निस्तेज होतो (तेल संपलंवाला दिया) वगैरे..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

लेखाची मांडणी आवडली. बाकी

इनिगोय
Tue, 08/13/2013 - 19:42 नवीन
लेखाची मांडणी आवडली. बाकी चर्चा वाचत आहे. वर दिलेल्या क्रमांक १ च्या बाबतीतली ही आठवण. ओळखीच्या एका लेखकांनी हयातभर टोपणनाव घेतले होते. त्याच नावाने ते लेखन करत, आणि कालांतराने कागदोपत्रीही तेच नाव वापरत. अंतःकाळी, शेवटच्या दोनेक दिवसात त्यांना त्या टोपणनावाने वावरणाऱ्या व्यक्तीच्या अंत्यसंस्कारांसाठी घरात गर्दी जमल्याचा भास होई. त्या गर्दीत स्वतःचे (दिवंगत) नातेवाईक दिसतायत असंही ते सांगत. मात्र ते नाव आपलंच आहे, याचा त्यांना पूर्ण विसर पडला होता. त्या काळात ते स्वतःचा उल्लेख मूळ नावाने करत होते. अशावेळी नेमकी कोणती माहिती शिल्लक राहत असावी आणि कोणती पुसली जात असावी? का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

उगीचच....

प्रभाकर पेठकर
Mon, 08/12/2013 - 11:25 नवीन
१ आणि ३ ही लक्षणे मृत्यू समिप आल्याची द्योतक वाटत नाहीत. पण 'आपला मृत्यू आता समिप आहे' अशा विचारांनी पछाडलेल्या कुणाही व्यक्तीच्या बाबतीत घडू शकतात. २ मध्ये वर्णीलेली अवस्था सूर्य बरोब्बर डोक्यावर असेल तर घडू शकते. तेंव्हाही सावली पायाशी असतेच पण मृत्यूच्या भयाने (तसा विचार कोणीतरी मनांत भरवला असेल तर..) दिसत नाही. ४ मध्ये वर्णिलेली परिस्थिती अनेकांच्या बाबतीत अनेकदा घडूनही ते मृत्यू पावले नाहीत. (वेळीच उपचार झाले असावे त्यामुळे डिहायड्रेशन {मृत्यूचे एक कारण} टळले असावे.) तसेच अनेक जणं उलट्या-जुलाबांशिवायही इहलोक सोडून गेल्याची अनेक उदाहरणे आजूबाजूला दिसतात.
( ती सत्य असल्याचा माझा दावा नाही})
बापरे! अशी माणसे कंस बंद करताना दोनदा करतात का?....ह.घे.
  • Log in or register to post comments

-

अमोल केळकर
Tue, 08/13/2013 - 10:03 नवीन
छान माहिती.... अमोल केळकर
  • Log in or register to post comments

लेखनशैली आवडली!!

बाळ सप्रे
Tue, 08/13/2013 - 11:47 नवीन
लेखनशैली आवडली!! परंतु मृत घोषित केलेल्याचे हृदय चालू करण्याच्या घटनेचा सच्चिदानंद बाबांना जीवंत करण्याच्या घटनेशी ताळमेळ लावण्याचा प्रयत्न हा .. पुष्पक विमाने वगैरे उदाहरणासारखाच आशावाद वाटतो. मृत घोषित केल्यावर काही वेळाने हृदय चालू करणे असे प्रयत्न डॉ. मांडक्यांसारख्या हृदयरोगतज्ञांनीही केलाय. जिथपर्यंत मेंदु जीवंत आहे तोवर ते कठीण असलं तरी अशक्य नसतं. सच्चिदानंद बाबांसारख्या गोष्टी या एखाद्या व्यक्तिचे उदात्तीकरण करण्याच्या नादात पसरवलेल्या अफवाच जास्त वाटतात. कारण ह्या गोष्टी सांगणार्‍या एकालाही जीवंत कसे केले यबद्दल एकही शब्द लिहावा/ सांगावासा वाटला नाही . कारण सांगणार्‍यांना त्यात जीवंत करण्याच्या प्रक्रियेपेक्षा ज्ञानेश्वर कसे श्रेष्ठ हे दाखवणे जास्त मोलाचे होते.. ज्ञानेश्वर्/ज्ञानेश्वरीचे साहित्यिक अध्यात्मिक मूल्य वादातीत आहे म्हणून ज्ञानेश्वर सर्व जीवनात काहिही करु शकतं अस उदात्तीकरण करण्याची प्रवृत्ती ही अशा कथांना कारणीभूत आहे.
  • Log in or register to post comments

ज्ञानेश्वर कसे श्रेष्ठ हे दाखवणे जास्त मोलाचे होते

अनिरुद्ध प
Tue, 08/13/2013 - 13:40 नवीन
अगदि अगदि,हे विधान पटले परन्तु,वयाच्या अवघ्या २१ वर्ष असताना सन्जीवनी समाधी घेतल्याने तरि ज्ञानेश्वरान्चे श्रेष्ठ्त्व सिद्ध व्हायला हरकत नसावि,आणि या बाबतित तरी धागाकर्त्याचे मत जाणुन घ्यायला आवडेल कारण त्यान्चा ज्ञानेश्वरान्चा अभ्यास खूपच प्रगल्भ आहे असे त्यानी म्हटले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाळ सप्रे

आणि या बाबतित तरी

धन्या
गुरुवार, 08/15/2013 - 07:43 नवीन
आणि या बाबतित तरी धागाकर्त्याचे मत जाणुन घ्यायला आवडेल कारण त्यान्चा ज्ञानेश्वरान्चा अभ्यास खूपच प्रगल्भ आहे असे त्यानी म्हटले आहे.
अहो पुर्ण लेखात मी कुठेही माझा ज्ञानेश्वरांचा अभ्यास खुपच प्रगल्भ आहे असं म्हटलेलं नाही. नाही म्हणायला एका प्रतिसादात असं लिहिलंय की कधी काळी ज्ञानदेवाने मला झपाटलं होतं. एखादया व्यक्तीच्या विचारसरणीचं, जीवन चरीत्राचं प्रगल्भ अभ्यास करणं आणि त्या व्यक्तीच्या गुणांनी झपाटून जाणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. जेमतेम चार दिवसांपूर्वी मी लिहिलेल्या लेखात मी जे लिहिलंच नाही ते माझ्या नावावर खपवलं जातंय तर दुनिया ईकडची तिकडे होईल यात नवल काय?
वयाच्या अवघ्या २१ वर्ष असताना सन्जीवनी समाधी घेतल्याने तरि ज्ञानेश्वरान्चे श्रेष्ठ्त्व सिद्ध व्हायला हरकत नसावि
ज्ञानदेव आपल्याला कधी कळलेच नाहीत. संजीवन समाधी घेण्यानं का कुणी श्रेष्ठ ठरतो? ज्ञानदेव खर्‍या अर्थाने ज्ञानाचा ईश्वर होते. ज्ञानदेव ज्ञानेश्वरीत शब्दसौंदर्याची उधळण करणारे सौंदर्याचे उपासक होते. ज्या समाजाने आई वडीलांच्या रुढींच्या आहारी जाऊन आई वडीलांचा बळी घेतला, ज्या समाजाने माधूकरीसाठी झोळी घेऊन फीरत असताना दगड मारली, झोळीच्या चिंध्या केल्या त्याच समाजासाठी "जो जे वांछील तो ते लाहो प्राणिजात" असं म्हणणारे ज्ञानदेव हा करुणेचा सागर होते. भारतीय तत्वज्ञानाचा अर्क असलेल्या भगवदगीतेवर नऊ हजार ओव्यांची टीका लिहूनही त्याचे सारे श्रेय आपल्यापेक्षा जेमतेम तीन चार वर्षांनी मोठ्या परंतू गुरुस्थानी असलेल्या भावाला आणि श्रोत्यांना देणारे ज्ञानदेव हे नम्रतेचं मुर्तीमंत रुप होते. कुठेतरी वाचलेलं आठवतंय, ज्ञानदेव हे आठशे वर्षांपूर्वी महाराष्ट्राला पडलेलं एक सुंदर स्वप्न होतं. किती यथार्थ आहे हे वर्णन! संजीवन समाधीबद्दल पुन्हा कधीतरी लिहिन सवडीने, नामदेवांनी लिहिलेल्या "समाधीचे अभंग" चा संदर्भ घेऊन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिरुद्ध प

चरीत्राचं प्रगल्भ अभ्यास करणं आणि त्या व्यक्तीच्या गुणांनी झपाटू

अनिरुद्ध प
Fri, 08/16/2013 - 13:09 नवीन
साहेब्,मी कुठे तरि वाचलेय्,कुठल्याही गोष्टीचे झपाट्लेपण हा त्या विषयाचा प्रगल्भ अभ्यास करण्यास प्रव्रुत्त करतो,असो आपला अभ्यास हा माझ्यामते माझ्या अल्पज्ञाना पेक्षा कितितरि पटिने प्रगल्भ आहे यात शन्काच नाही,जर आप्ल्याला माझ्या लेखनाचा रोख तिरकस वाट्ला असेल तर क्षमस्व,तसेच आपणसुद्धा प्रतिसाद देवुन ज्ञानात मोठी भर घातल्याबद्दल धन्यवाद,तसेच काही बाबतित आपले विचार जाणुन घ्यायचे आहेत्,तर व्य नि केल तर चालेल का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

पहिला यथार्थ प्रतिसाद!

संजय क्षीरसागर
Tue, 08/13/2013 - 16:50 नवीन
>सच्चिदानंद बाबांसारख्या गोष्टी या एखाद्या व्यक्तिचे उदात्तीकरण करण्याच्या नादात पसरवलेल्या अफवाच जास्त वाटतात. = करेक्ट >कारण ह्या गोष्टी सांगणार्‍या एकालाही जीवंत कसे केले यबद्दल एकही शब्द लिहावा/ सांगावासा वाटला नाही = आणि आपण त्यावर विश्वास ठेवतो! इतकंच नाही तर त्यापुढे जाऊन तसं नक्कीच झालं असावं हे लोकांना पटवायला एनडिए सारख्या गोष्टींचा आधार घेतो. जर गेलेला माणूस जीवंत करता येतो तर अध्यात्माची गरजच काय? अमृताचा शोधच निरर्थक आहे. यू हॅव द फॉर्म्युला, देन वाय वेस्ट टाईम? >सांगणार्‍यांना त्यात जीवंत करण्याच्या प्रक्रियेपेक्षा ज्ञानेश्वर कसे श्रेष्ठ हे दाखवणे जास्त मोलाचे होते. = इतकी साधी गोष्ट लोकांना आज देखील कळू नये याचं नवल वाटतं. >ज्ञानेश्वर्/ज्ञानेश्वरीचे साहित्यिक अध्यात्मिक मूल्य वादातीत आहे म्हणून ज्ञानेश्वर सर्व जीवनात काहिही करु शकतं अस उदात्तीकरण करण्याची प्रवृत्ती ही अशा कथांना कारणीभूत आहे. हा भाग सर्वात मोलाचा आहे! या प्रकारांनी, ज्ञानेश्वरांची प्रतिभा ज्ञानेश्वरीतून निर्विवाद सिद्ध झालेली असतांना, ती निष्कारण वादात येते. त्यांनी ज्ञानेश्वरीत काय सांगितलंय याऐवजी लोक भोळसटासारखे चमत्कारांच्या मागे लागतात. असे चमत्कार जोडून आपण उत्तमोत्तम साहित्याची वाट लावतो, स्वतःची आणि इतरांची दिशाभूल करतो आणि लोक अध्यात्मापासून वंचित होतात ही जनजागृती होईल तो सुदिन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाळ सप्रे

अर्ध सत्य

अनिरुद्ध प
Tue, 08/13/2013 - 17:00 नवीन
तुर्तास ईतकेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

जर माणूस जीवंत करण्याचा फॉर्म्युलाच गवसलायं तर

संजय क्षीरसागर
Tue, 08/13/2013 - 17:16 नवीन
ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरी कशाला लिहीतील? द फॉर्म्युला विल सुपरसिड स्पिरिश्युअ‍ॅलिटी! मृत्यू निश्चित आहे म्हणून तर अमृताचा (सत्याचा) शोध आहे, ही साधी गोष्ट लक्षात येतेय का पाहा. लोक इतके भंपक आहेत की असे श्लोक नंतर जोडून, उदत्तीकरणाच्या नादात, ते संपूर्ण ग्रंथाच्या प्रयोजनाचीच वाट लावतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिरुद्ध प

ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरी कशाला लिहीतील?

अनिरुद्ध प
Wed, 08/14/2013 - 16:04 नवीन
वर जो प्रसन्ग सान्गितला आहे त्यात 'ज्ञानेश्वरी' ही ज्ञानेश्वरानी लिहिली आहे असे कुठे म्हटले आहे,त्यानी असे म्हटले आहे कि 'ज्ञानेश्वरी' हि ज्ञानेश्वर महाराजान्नी सान्गितली आणि ती सच्चिदनन्द बाबानी लिहिली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

तुमच्या प्रतिसादांमधला उपहास

धन्या
Wed, 08/14/2013 - 22:45 नवीन
तुमच्या प्रतिसादांमधला उपहास कळत नाही असं नाही. वाईट वाटतंय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिरुद्ध प

माझा

अनिरुद्ध प
Fri, 08/16/2013 - 14:39 नवीन
वरिल प्रतिसाद हा श्री सन्जय याना होता आणि यात मी कुठेही उपहासात्मक भाषा वापरली नाही आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

सच्चिदानंद बाबांसारख्या

धन्या
गुरुवार, 08/15/2013 - 07:18 नवीन
सच्चिदानंद बाबांसारख्या गोष्टी या एखाद्या व्यक्तिचे उदात्तीकरण करण्याच्या नादात पसरवलेल्या अफवाच जास्त वाटतात. कारण ह्या गोष्टी सांगणार्‍या एकालाही जीवंत कसे केले यबद्दल एकही शब्द लिहावा/ सांगावासा वाटला नाही . कारण सांगणार्‍यांना त्यात जीवंत करण्याच्या प्रक्रियेपेक्षा ज्ञानेश्वर कसे श्रेष्ठ हे दाखवणे जास्त मोलाचे होते.. ज्ञानेश्वर्/ज्ञानेश्वरीचे साहित्यिक अध्यात्मिक मूल्य वादातीत आहे म्हणून ज्ञानेश्वर सर्व जीवनात काहिही करु शकतं अस उदात्तीकरण करण्याची प्रवृत्ती ही अशा कथांना कारणीभूत आहे.
सहमत आहे. मृत व्यक्ती जिवंत होऊ शकत नाही. पण समजा एखादी तशी घटना घडलीच असेल तर त्यामागे काय तथ्य असू शकेल याचा मागोवा घेण्याचा एक छोटासा प्रयत्न या लेखात केला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाळ सप्रे

लेख छान वाटला.

सौंदाळा
Tue, 08/13/2013 - 14:08 नवीन
लेख छान वाटला. याच विषयावर नारायण धारपांचे एक पुस्तक वाचले होते. (नाव कोणाला माहीत असेल तर क्रुपया सांगा, परत वाचायचे आहे) एक आश्रम चालवणारे आचार्य एका आत्महत्या करायला निघालेल्या तरुणीला वाचवतात (ती पाण्यात बुडुन काही वेळ झाल्यावर) आणि नंतर तिच्यावर काहीतरी प्रयोग करतात. आचार्यांना कोणतीतरी सिद्धी प्राप्त करुन घ्यायची असते आणि त्यासाठी प्रयोग करायला म्रुत्युच्या अगदी जवळ जाउन परत आलेलीच व्यक्ती पाहीजे असते अशा प्रकारची मस्त (भय)कथा होती. उर्जा अक्षय्यतेचा नियम (लॉ ऑफ कॉन्सर्वेशन ऑफ एनर्जी) यात उर्जा/एनर्जी शब्द काढुन तेथे 'जीव' हा शब्द घातला तर...
  • Log in or register to post comments

नारायण धारपांचे पुस्तक

वामन देशमुख
Tue, 08/13/2013 - 20:31 नवीन
नारायण धारपांचे पुस्तक देवाज्ञा http://www.bookganga.com/Preview/Preview.aspx?BookId=4899010251605104523&PreviewType=books http://www.bookganga.com/eBooks/Book/4899010251605104523.htm?Book=Devadnya
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सौंदाळा

मस्त रे धन्या

प्रकाश घाटपांडे
Tue, 08/13/2013 - 17:25 नवीन
विज्ञान नविन असं काहीच निर्माण करत नसतं. ते फक्त निसर्गाच्या अज्ञात नियमांची उकल करत असतं. आता या क्षणी ज्या गोष्टी अतिंद्रीय, चमत्कार वाटत आहेत त्या तशा नाहीत. फक्त त्यामागचा कार्यकारणभाव आज तरी विज्ञानाला आपल्याला माहिती नाही. आणि या विश्वात निसर्ग नियमांपलिकडे जाऊन काहीही होत नसतं.
तू तर अंनिसचा कार्यकर्ता च झाला कि! http://news.bbc.co.uk/2/hi/7794783.stm इथे एक आंधळी व्यक्ती खोलीतून वाट काढत कशी जाते हे दाखवले आहे. मेंदूचे अंतरंग कसे चकित करणारे असते.
  • Log in or register to post comments

तू तर अंनिसचा कार्यकर्ता च

धन्या
गुरुवार, 08/15/2013 - 07:04 नवीन
तू तर अंनिसचा कार्यकर्ता च झाला कि!
कार्यकर्ता असं नाही काका. पण ही विचारसरणी नरेंद्र दाभोळकर आणि श्याम मानव यांचं लेखन मनावर खोलवर भिडल्यामुळेच तयार झाली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे

ह्याचं कारण म्हणजे आम्हाला

प्यारे१
Wed, 08/14/2013 - 19:29 नवीन
ह्याचं कारण म्हणजे आम्हाला ज्ञानेश्वरीमध्ये जे काही सांगितलंय ते आचरणात आणणं जमत नाही. पण पटतं. मग करायचं काय? 'ज्ञानेश्वर महाराज की जय' म्हणायचं. ते करण्यासाठी काही अशा गोष्टी ज्या आपल्याला चमत्कार वाटाव्यात, सर्वसामान्यांना न समजणार्‍या अशा चरित्रात आणायच्या. मग 'जमतं'. १६ व्या वर्षी संस्कृत गीतेवर ९०००+ ओव्यांची टीका लिहीणं हा 'चमत्कार' पुरेसा नाही काय????? आमची ३३ व्या वर्षी अजून साधी वाचून होत नाही गीता. असो.
  • Log in or register to post comments

१६ व्या वर्षी संस्कृत गीतेवर

धन्या
गुरुवार, 08/15/2013 - 07:14 नवीन
१६ व्या वर्षी संस्कृत गीतेवर ९०००+ ओव्यांची टीका लिहीणं हा 'चमत्कार' पुरेसा नाही काय?????
चमत्कार हा शब्द काही आपण सोडून दयायला तयार नसतो. वयाच्या सोळाव्या वर्षी संस्कृत गीतेवर नऊ हजार ओव्यांची टीका लिहिली ही बाब अपवादात्मक असली तरी त्यात चमत्कार कसला? ज्ञानेश्वरी हा ज्ञानदेवांच्या तेजस्वी बुद्धीमत्तेचा, प्रगल्भतेचा, प्रतिभाशक्तीचा आणि त्यांच्या आई वडीलांच्या त्यांच्यावरील संस्कारांचा आविष्कार होता.
आमची ३३ व्या वर्षी अजून साधी वाचून होत नाही गीता.
एकदा हरीनाम सप्ताहात पारायणाला बसा, तीन दिवसांत वाचून होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

चमत्कार कसला?

प्रसाद गोडबोले
गुरुवार, 08/15/2013 - 13:46 नवीन
वयाच्या सोळाव्या वर्षी संस्कृत गीतेवर नऊ हजार ओव्यांची टीका लिहिली ही बाब अपवादात्मक असली तरी त्यात चमत्कार कसला?
तेजस्वी बुद्धीमत्ता, प्रगल्भता, प्रतिभाशक्ती >>> ह्या गोष्टी कश्या काय आल्या त्यांच्या कडे ? बरं मग आल्या तर आल्या पण फक्त त्यांच्या कडेच का आल्या ? निव्वृत्ती नाथ हे श्रेष्ठ होते ते स्वतःच का बरे नाही लिहु शकले ? किंवा सोपानांचा एखादा असा ग्रंथ मला तरी माहीत नाही ...एव्हन फॉर दॅट सेक , चांगदेवही बुध्दीमान प्रगल्भ आणि प्रतिभावान होते + योगी होते पण त्यांनी लिहिलेला एकही ग्रंथ का बरे समाजाच्या लक्षात राहु नये ? शिवाय माझ्या माहीती प्रमाणे जेव्हा विठ्ठलपंतानी देहत्याग गेला तेव्हा ज्ञानेश्वर महाराज केवळ १० वर्षाचे होते मग केवळ ८-९ वर्शाच्या संस्कारात एक लहान बाळ इतकं काही ग्रास्प करतो हा चमत्कार नव्हे का ? शिवाय भगवद्गीता , १८ उपनिषदे ब्रह्मसुत्र ह्यांच्या अभ्यासाला सामान्य माणसाला किमान ३ ते ५ वर्ष लागतील . अन त्यावर असे क्लासिक भाष्य करायला अजुन जास्त !! थोडक्यात ज्ञानेश्वर असामान्य होते हे कुठे तरी मान्य करावेच लागेल ...ह्यालाच भोळे भाबडे लोक चमत्कार म्हणतात . थोडक्यात काय तर ज्या गोष्टी , ज्यांचा कार्यकारण भाव आपल्या बुध्दीला समजत नाहीत त्यांना आपण चमत्कार म्हणतो .त्यामुळे प्रत्येकाचा चमत्कार घटनांचा सेट भिन्न भिन्न असेल ..... तेव्हा केवळ आपल्याला कळाले आहे म्हणुन उगाचच दुसर्‍यांच्या श्रध्दांना / किंव्वा अंधश्रध्दांनाही चमत्कार म्हणुन झिडकारणे हे योग्य नव्हे . (अवांतर : ही असली असहिष्णुता अंनिस च्या प्रत्येक कार्यक्रमात दिसुन येते , त्यामुळे अंध्द्श्रध्दा निर्मुलनाची इच्छा असुनही कित्येक पुरोगामी हिंदु अंनिस पासुन २ हात अंतर राखुन आहेत )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

तुमच्या सार्‍या आक्षेपांचं

धन्या
गुरुवार, 08/15/2013 - 14:57 नवीन
तुमच्या सार्‍या आक्षेपांचं उत्तर तुम्हीच दिलंय. :)
थोडक्यात ज्ञानेश्वर असामान्य होते हे कुठे तरी मान्य करावेच लागेल ...ह्यालाच भोळे भाबडे लोक चमत्कार म्हणतात .
असामान्य बुद्धीमत्तेची, प्रतिभाशक्तीची मुलं जन्माला येणं, त्या असामान्य अशा मुलांना पोषक असं वातावरण बालपणी मिळाल्यावर ती बुद्धीमत्ता, प्रतिभाशक्ती अजून उजळून निघणं यात चमत्कार कसला. अपवादात्मक परिस्थीतीमध्ये असं घडू शकतं. वयाच्या आठव्या वर्ष मुलं जोडाक्षरं शिकत असतात. परंतू तमिळनाडूमधील लविनश्री नावाच्या मुलीने वयाच्या आठव्या वर्षी मायक्रोसॉफ्ट प्रमाणित संगणक व्यवसायिक झाली. हा ही चमत्कार म्हणायचा का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

चमत्कार कसला?

प्रसाद गोडबोले
गुरुवार, 08/15/2013 - 15:49 नवीन
अरे मित्रा ,सर्वसामान्य माणसांच्या पोटी असामान्य बुध्दीमत्तेची मुले जन्माला येणे हा चमत्कारच आहे !! आणि बरीच उदाहरणे आहेत अशा चमत्कारांची एक यःकश्चित राजा की ज्याचे राज्य पंचक्रोशीबाहेर माहीतही नसेल त्याच्या पोटी असा पुत्र जन्माला यावी की करोडो लोकांनी त्याच्या उपासनेला लागुन जावे . किंव्वा एक यःकश्चित सुतार आणि त्याच्या बायकोला झालेला मुलगा ( तोही त्याच्याकडुन हे निश्चित नाही ) एतका महान व्हावा की आज अर्ध्या अधिक जगाने त्याचा मार्ग मान्य करावा !! अनुवंशिकतेच्या सिध्दांतानेही ह्यांचे स्पष्टीकरण देता येणार नाही . तेव्हा ह्या अशा आपल्या आकलनाच्या पलीकडेही अशा खुप गोष्टी आहेत ...आहेतच ... त्यांना चमत्कार म्हणायला काहीच हरकत नसावी . आणि हे विधान अध्यात्माच्या व्यतिरिक्त अनेक गोष्टीत ...विज्ञानातही लागु होते .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

ठीक आहे. सर्वसामान्य

धन्या
गुरुवार, 08/15/2013 - 16:02 नवीन
ठीक आहे. सर्वसामान्य माणसांच्या पोटी असामान्य बुध्दीमत्तेची मुले जन्माला येणे हा चमत्कारच आहे हे मी मान्य कातो. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

असेच ...तिथेच का ...?

चौकटराजा
गुरुवार, 08/15/2013 - 16:42 नवीन
असेच तिथेच का असे प्रश्न आपल्याला नेहमी पडतात त्याच्याकडे चमत्कार म्हणून पाहिले जाते. त्याला एकच उत्तर पुरेसे आहे ..ते म्हणजे योगायोग.. विनाश पर्यावसायी गोष्टीनाही हेच उत्तर लागू होते. कारण निसर्गात मुळातच शुभ अशुभ असे काही नसते. त्याच्यी व्याप्ती ज्ञानेशांच्या दिव्यते पेक्षाही मोठी त्यांच्या रचनेने स्तिमित झालेल्या तुमच्या माझ्या सारख्या सामान्य माणसांपेक्क्षाही मोठी . आता वैज्ञानिक बिग बँग चे कारण ही " योगायोग" असे मानू लागले आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

आता वैज्ञानिक बिग बँग चे कारण

धन्या
गुरुवार, 08/15/2013 - 18:48 नवीन
आता वैज्ञानिक बिग बँग चे कारण ही " योगायोग" असे मानू लागले आहेत.
बिग बँग होण्यास एका सेकंदाचा जरी उशीर झाला असता तरी कदाचित हे विश्व अस्तित्वात आलं नसतं असं काहीसं स्टीफन हॉकिग्जच्या "ब्रीफ हिस्टरी ऑफ टाईम" मध्ये वाचल्याचं आठवतंय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

तेव्हा केवळ आपल्याला कळाले

विजुभाऊ
Sat, 08/17/2013 - 00:16 नवीन
तेव्हा केवळ आपल्याला कळाले आहे म्हणुन उगाचच दुसर्‍यांच्या श्रध्दांना / किंव्वा अंधश्रध्दांनाही चमत्कार म्हणुन झिडकारणे हे योग्य नव्हे .
त्याचबरोबर मी म्हणतो म्हणून तुम्ही सुद्धा मानाच हा आग्रह कशाला. अंधश्रद्धा नको पण श्रद्धा असायला काय हरकत आहे असा एक फसवा युक्तीवाद केला जातो. श्रद्धा कशाला म्हणायचे हे ज्याचे त्याने ठरवावे. पंढरपूरच्या विठोबाला स्मरून शेतकरी काम करायला लागतो. आणि असत्यसाईबाबांच्या / नित्यानन्द बाबा / राधे मा यांच्या भजनी लागून त्याम्च्यावर पैसे आणि वेळ खर्च करत ओया दोन्हीना श्रद्धा म्हणायए की अंधश्रद्धा ? अंधश्रद्धे पायी अशिक्षीत लोकांची होणारी लुबाडणूक कशी होते ते देवदासी प्रथेसारख्या एखाद्या उदाहरणावरुन सुद्धा कळून येईल.
(अवांतर : ही असली असहिष्णुता अंनिस च्या प्रत्येक कार्यक्रमात दिसुन येते , त्यामुळे अंध्द्श्रध्दा निर्मुलनाची इच्छा असुनही कित्येक पुरोगामी हिंदु अंनिस पासुन २ हात अंतर राखुन आहेत )
यात काय आली असहिष्णुता? उलट श्रद्धेच्या कितीतरी बुवानी बापूनी लोकाना येडे बनवले आहे. अंधश्रद्धेला अंधश्रद्धा म्हंटले तर त्यात कसली आली असहीष्णुता? पुरोगामी हिंदू? म्हणजे नक्की काय हो? अवांतरः जानवे घालणे ही श्रद्धा की अंधश्रद्धा ? श्रावणीला पम्चगव्य प्राशन करणे ही श्रद्धा की अंधश्रद्धा? सत्यनारायणाच्या कथेतील साधुवाण्याची गोष्ट खरी मानायची की खोटी? रामायण हा इतीहास की केवल कवी कल्पना? कवी कल्पना असल्यास काही हरकत नाही. इतिहास मानल्यास गर्भवती बायकोला कोणाच्यातरी सांगण्यावरून काहिही शहानिशा न करता टाकून देणार्‍या रामाला आदर्श का मानायचे? अती अवांतर : रामाने वाली बरोबर काहीही वैर नसताना त्याची हत्या का केली? रामाने शंबुकाला काहीही चुक नसताना कानात शिसे ओतुन ठार मारण्याची आज्ञा का दिली? असो..... असे माझे प्रश्न आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

विजुभौंचे प्रश्न भारी आवडले.

शिल्पा ब
Sat, 08/17/2013 - 00:30 नवीन
विजुभौंचे प्रश्न भारी आवडले. अनिंसवाले हिंदूंच्याच मुळावर का असतात बॉ ? इथे हिंदू खूप आहेत वेग्रे युक्तिवाद चालणार नैत. अन देवदासी वगैरे वाईट प्रथांच्या विरोधात बहुतेक सगळेच जण आहेत. (ज्यांचे काही आर्थिक/सामाजिक वेग्रे हितसंबंध गुंतलेले नाहीत ते) बाकी ती शाम्बुकाची काय ती गोष्ट मला माहित नहि… सांगता का? खवत सांगितली तरी चालेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

उत्तरे

प्रसाद गोडबोले
Sat, 08/17/2013 - 03:08 नवीन
असे माझे प्रश्न आहेत.
विजुभाऊ , मागील चर्चेत बोलल्याप्रमाणे ..... आपण वारीच्या सुधारणेसाठी केलेल्या कार्याचा आढावा घेणारा लेख मिपावर पब्लिश झाला की (मी माझ्या कुवतीप्रमाणे) उत्तरे देईन ....पण तुम्हाला काही काम करायची इच्छाच नसेल अन नुसतीच ग्यानबाजी करायची असेल तर .. मला असल्या इंटलेक्चुअल मास्टर्ब्युशन मधे इंटरेस्ट नाही . सो , आपण हिंदुधर्म सुधारणेसाठी केलेल्या सकारात्मक कार्यावरच्या लेखाची वाट पहात आहे . बाकी , तुमच्या लेखाच्या प्रतिसादांत बोलु ....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

डु व्हाईल

प्रसाद गोडबोले
Sat, 08/17/2013 - 03:19 नवीन
do { printf("http://www.misalpav.com/comment/503873#comment-503873" } while ("http://www.misalpav.com/user/564" not done grassroot level work .); ; बझिंगा =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

ला असल्या इंटलेक्चुअल

विजुभाऊ
Sun, 08/18/2013 - 23:10 नवीन
ला असल्या इंटलेक्चुअल मास्टर्ब्युशन मधे इंटरेस्ट नाही . हा हा हा हा. या अध्यत्मिक क्रीयेबद्दल भलतेच प्रेम आहे हो तुम्हाला? असो. कोणाला काय आवडावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.मला बापुड्याला काहीच ग्यान नाही. ते मिळाएव म्हणून प्रश्न विचारले. उत्तर नसेल येत तर नका देवू. अवाम्तरः या धाग्याच अन वारीचा कसलाही संबन्ध नसावा. मी एका स्वतन्त्र धाग्यावर काही प्रश न्विचारले आहेत. त्याच्याशी इतर धाग्यांचा सम्बन्ध कशाला लावला जातोय. "The problem in mud wrestling with a pig is not that you get dirtier,but the pig enjoyes it."
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

बरं

प्रसाद गोडबोले
Mon, 08/19/2013 - 19:36 नवीन
अधिकारेविण सांगणे | अलभ्य होये तेणे गुणे | ह्या कारणे शहाणे | आधी अधिकार पहाती ||
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

+१११

अनिरुद्ध प
Tue, 08/20/2013 - 13:15 नवीन
+१११
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

उगीच्च?

प्यारे१
गुरुवार, 08/15/2013 - 19:13 नवीन
उगीच्च? चमत्कार या शब्दाला अवतरण चिन्ह देण्याचं कारण समजलं नाही का 'रे धन्या' तुला? त्यातला उपहास पोचला असावा असं वाटत होतं. नाही पोचला. असो. बाकी पारायणातलं 'तीन दिवसातलं वाचन' करुन कुणी टीका लिहीण्याएवढं 'फास्ट क्रॅश कोर्स वालं 'कुणी नसावं असं 'मला वाटतं.' बाकी कळावे, लोभ असावा. ( ही नम्र विनंती. ;) )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

गुरुवर्य...

धन्या
गुरुवार, 08/15/2013 - 19:22 नवीन
चमत्कार या शब्दाला अवतरण चिन्ह देण्याचं कारण समजलं नाही का 'रे धन्या' तुला? त्यातला उपहास पोचला असावा असं वाटत होतं. नाही पोचला.
शिकेल हळूहळू दुनियादारी. तेव्हढं पारायणाचं घ्या ज्ञानेश्वरी "वाचून काढायची" असेल तर. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

नाही चालत तातडी.

प्यारे१
गुरुवार, 08/15/2013 - 19:37 नवीन
नाही चालत तातडी. आमची 'श्रद्धा' वर नसेल त्यापेक्षा 'सबुरी' वर जास्त 'भक्ती' आहे. ;) (पहिल्या दोन अवतरणित शब्दांचा कॉपीराईट: साईबाबा, शिर्डीवाले)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

इंटरेस्टिंग

मन१
Wed, 08/14/2013 - 19:30 नवीन
देव्-धर्म्-श्रद्धा विषय तोच तो असला तरी मांडाणी आवदली. ररांचा प्रतिसाद तसाच त्यांचा जुना लेख(पुनर्जन्माच्या अकाउंट बद्दलचा)सुद्धा आवडला. तूर्तास इतकेच.
  • Log in or register to post comments

ज्याचं स्वतःचंच नक्की ठरत नाही त्याच्याशी चर्चा निष्फळ आहे!

संजय क्षीरसागर
गुरुवार, 08/15/2013 - 01:58 नवीन
माझ्या लेखावर दिलेल्या प्रतिसादात तुमची सुरूवात अशी आहे:
तरीही या प्रतिसादाच्या निमित्ताने माझी प्रतिवाद करण्याची हौस भागवून घेतो
पहिली गोष्ट, तुमच्याशी वाद घालण्यात मला रस नाही कारण तुमचं स्वतःचंच मत नक्की नाही. त्या प्रतिसादात शेवटी तर तुम्ही स्वतःच्या लेखनाची जवाबदारी नाकरलीये.
ती वाक्ये म्हणजे माझे मत नाही. तसेच सच्चिदानंद बाबांची गोष्ट हा नियर डेथ एक्स्पेरियन्स होता असंही माझं मत नाही. तसं काही असू शकेल असा माझा फक्त अंदाज आहे.
थोडक्यात सगळा तुमचा अंदाज आहे. विषय संपला! तिथे तुम्ही म्हटलंय :
माझा चमत्कारांवर विश्वास नाही. त्यामुळे ज्ञानदेवांबद्दल नितांत आदर असूनही मला त्यांच्या नावावर सांगितले जाणारे सारे चमत्कार हे दंतकथा वाटतात.
तुम्हालाच `सारे चमत्कार हे दंतकथा वाटतात' तर या लेखाचं प्रयोजन काय? आणि पुढे म्हणतायं :
त्या बालसंन्याशाच्या नावावर खपवल्या जाणार्‍या इतरही चमत्कार कथा एकतर दंतकथा असाव्यात किंवा त्यात काही तथ्य असले तरी त्यामागे काहीतरी कार्यकारणभाव असावा
तुम्ही एकदा दंतकथा म्हणतायं आणि त्याच वाक्यात `तथ्य' असल्याची शक्यता व्यक्त करतायं. तुमचंच नक्की ठरत नाहीये, तस्मात या लेखाला अर्थ नाही. असो, माझा हातखंडा असलेला अध्यात्म हा विषय....असं तुम्हाला वाटत असलं तरी तसं काहीही नाही. माझ्या लेखनावर, काहीही अभ्यास नसतांना, इतके दिवस तुम्ही उगीचच तिरकस प्रतिसाद दिलेत इतकंच सांगतो.
  • Log in or register to post comments

पहिली गोष्ट, तुमच्याशी वाद

धन्या
गुरुवार, 08/15/2013 - 04:03 नवीन
पहिली गोष्ट, तुमच्याशी वाद घालण्यात मला रस नाही कारण तुमचं स्वतःचंच मत नक्की नाही.
तुम्हाला लोकांशी वाद घालण्यात अजिबात रस नसतो हे मला माहिती आहे. पण मलाच तुमच्याशी काही मुद्द्यांवर प्रतिवाद करायचा होता. म्हणून मी तो प्रतिसाद दिला. ज्या गोष्टीचं मला पुर्णतः आकलन झालेलं नाही त्याबाबतीत मी कधीच स्वतःची ठाम मतं बनवत नाही. स्वतःची चूकीची मते रेटण्याईतका कोडगेपणा माझ्यात नाही.
थोडक्यात सगळा तुमचा अंदाज आहे. विषय संपला!
ती घटना जवळपास आठशे वर्षांपूर्वी घडलेली आहे. आठशे वर्षांपूर्वी काय घडले असेल याचा आपण फक्त अंदाजच बांधू शकतो. मी म्हणतो तसंच घडलं होतं किंवा तसंच आहे असं रेटून सांगण्यासाठी माणूस कमालीचा दुराग्रही असावा लागतो. मी तसा नाही.
तुम्हालाच `सारे चमत्कार हे दंतकथा वाटतात' तर या लेखाचं प्रयोजन काय?
दंतकथेच्या पाठीमागे काही तथ्यांश असू शकतो. त्या तथ्यांशाची चर्चा करणे हे या लेखाचं प्रयोजन.
तुम्ही एकदा दंतकथा म्हणतायं आणि त्याच वाक्यात `तथ्य' असल्याची शक्यता व्यक्त करतायं. तुमचंच नक्की ठरत नाहीये, तस्मात या लेखाला अर्थ नाही.
माझं वाक्य असं आहे: त्या बालसंन्याशाच्या नावावर खपवल्या जाणार्‍या इतरही चमत्कार कथा एकतर दंतकथा असाव्यात किंवा त्यात काही तथ्य असले तरी त्यामागे काहीतरी कार्यकारणभाव असावा मी जर तर अशी वाक्य रचना केली आहे. एकतर दंतकथा असाव्यात किंवा दंतकथा नसतील तर तर त्यात काही तथ्यांश असून त्यामागे कार्यकारणभाव असावा. तुम्ही म्हणताय तसं "तुम्ही एकदा दंतकथा म्हणतायं आणि त्याच वाक्यात `तथ्य' असल्याची शक्यता व्यक्त करतायं" असं नाही.
माझा हातखंडा असलेला अध्यात्म हा विषय....असं तुम्हाला वाटत असलं तरी तसं काहीही नाही.
इथे "माझा हातखंडा असलेला अध्यात्म हा विषय...." या शब्दरचनेला तुम्ही माझ्या आयटीवरील लेखाचा दूवा दिला आहे. तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. आयटी हा माझा हातखंडा असलेला विषय आहे असं मी कधीच दावा केलेला नाही. माहिती तंत्रज्ञान ही ज्ञानशाखा हा महासागर आहे. या महासागरातील फार फार तर ओंजळभर पाणी मी उचललं असेल. त्यामुळे या विषयात माझा हातखंडा आहे असं विधान मी कधीच करु शकणार नाही.
माझ्या लेखनावर, काहीही अभ्यास नसतांना, इतके दिवस तुम्ही उगीचच तिरकस प्रतिसाद दिलेत इतकंच सांगतो.
तुम्ही ज्या विषयावर लिहिता त्याचा माझा काहीही अभ्यास नाही असं तुम्ही म्हणताय ते कदाचित तथ्य असेलही. माझे प्रतिसाद तुम्हाला तिरकस वाटले असतील तर मी त्याबद्दल दिलगीर आहे.
ज्याचं स्वतःचंच नक्की ठरत नाही त्याच्याशी चर्चा निष्फळ आहे!
आणि तरीही तुम्ही हा प्रतिसाद देऊन तुमचा बहुमोल वेळ वाया घालवलात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

दंतकथेच्या पाठीमागे काही तथ्यांश असू शकतो?

संजय क्षीरसागर
गुरुवार, 08/15/2013 - 12:34 नवीन
त्या तथ्यांशाची चर्चा करणे हे या लेखाचं प्रयोजन.
तुम्ही फक्त अंदाज व्यक्त करतायं आणि त्याला तथ्याचा मुलामा देतायं.
त्यामुळे सच्चिदानंद बाबांची गोष्ट आपल्याला त्या बालसंन्याशाच्या योगसामर्थ्याचा चमत्कार वाटत असला तरी त्यामागेही अशीच काहीतरी वैज्ञानिक कारणे असतील.
आणि तुम्हाला पुढे जाऊन रेडा आणि भिंतपण कव्हर करायची आहे, म्हणून म्हणतायं :
त्या बालसंन्याशाच्या नावावर खपवल्या जाणार्‍या इतरही चमत्कार कथा एकतर दंतकथा असाव्यात किंवा त्यात काही तथ्य असले तरी त्यामागे काहीतरी कार्यकारणभाव असावा
हे वाक्य पाहा :
ज्यावेळी माणसाची मती कुंठीत होते, समोर घडलेल्या घटनेचं आकलन होत नाही त्यावेळी त्या घटनेला तो चमत्कार म्हणून मोकळा होतो.
याचा अर्थ, ते चमत्कार नव्हते तर त्यामागे कार्यकारण असावं हे तुम्हाला सुचित करायचंय. आणि तुमचा मूळ हेतू (दंतकथेच्या पाठीमागे काही तथ्यांश असू शकतो) तुम्ही पुढे दामटतायं. अर्थात, गाडी शेवटी पुन्हा चमत्कारावर आणली आहेच :
मग आपणही शाळेत विज्ञानाच्या पुस्तकांमध्ये जडत्व, गती, न्युटनचे गतीविषयक नियम अभ्यासलेले असतानाही आळंदीला गेल्यावर निरागसपणे विचारतो, "ती भींत कुठे आहे हो?"
मी खरं तर इतकं लिहीणार नव्हतो पण इतकी प्रगल्भ भारतीय बुद्धीमत्ता तुमच्यासारख्या (तरूणांच्या) भंपक विचारसरणीमुळे संशोधनाभिमुख होऊ शकत नाही ही प्रामाणिक खंत आहे. पाश्चिमात्य विमानाचा शोध लावतात आणि `रामायणात पुष्पक विमानाचा उल्लेख आहे' म्हणजे `ती टेक्नॉलॉजी आमच्याकडे पूर्वीपासनं होतीच' असा मूर्ख स्टँड घेऊन आपण भारतीय स्वतःच हसूं करून घेतो. ते सेल फोनचा शोध लावतात आणि आपण म्हणतो त्यात काय विषेश? कर्णपिशाच्च्य विद्या तर आम्ही पूर्वीपासूनच जाणतो! आता तुम्ही म्हणतायं `वी कॅन रेज अ डेड', आणि मी विचारतोयं `कुठेय तो फॉर्म्युला? फार हास्यास्पद परिस्थिती करून ठेवली आहे देशाची, या तुमच्यासारख्या मानसिकतेनं . धड संशोधन नाही की अध्यात्म नाही. संशोधन नाही कारण आपला विश्वास चमत्कारांवर! आपल्याला सगळं कष्ट न करता फुकट हवंय आणि अध्यात्माची वाट लावलीये कारण उत्तोमोत्तम साहित्याला असले भंपक चमत्कार जोडून ठेवलेत. तुम्हाला मी काय म्हणतोय ते पटत असेल तर पाहा. `गेलेल्या माणसाला जिवंत करून महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहून घेतली' असं मूर्ख विधान करून (आणि त्यात पुन्हा तथ्य शोधण्याचा बहाणा केल्यानं) ज्ञानेश्वरीचं अवमूल्यन होतं. कारण किमान बुद्धी असलेला माणूस देखील म्हणेल, ज्ञानेश्वरी नंतर वाचू, कुठेय तो फॉर्म्युला? ____________________________
माझे प्रतिसाद तुम्हाला तिरकस वाटले असतील तर मी त्याबद्दल दिलगीर आहे
धनाजीराव, तुम्ही अनेक तिरकस प्रतिसाद दिलेत हे तुम्हाला माहिती आहे. पण का कोण जाणे, तुम्हाला तिथल्यातिथे सुनवावं असा मला कधीही वाटलं नाही. तुमची ही दिलगीरी बहुदा मनापासून असावी. माझ्याबाजूनं, आय ऑलवेज लव्ह टू स्टार्ट ऑन अ क्लिन स्लेट, अँड ऑफकोर्स फॉर यू, दॅट इज माय प्रॉमिस.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

मूर्ख विधान??

जे.जे.
गुरुवार, 08/15/2013 - 20:53 नवीन
तुम्हाला मी काय म्हणतोय ते पटत असेल तर पाहा. `गेलेल्या माणसाला जिवंत करून महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहून घेतली' असं मूर्ख विधान करून (आणि त्यात पुन्हा तथ्य शोधण्याचा बहाणा केल्यानं) ज्ञानेश्वरीचं अवमूल्यन होतं. मूर्ख विधान?? हे जरा जास्त होतय. आणि आता तुम्हि केवळ विरोधासाठी विरोध करताय अस दिसतय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

तुम्ही विपर्यास करतायं

संजय क्षीरसागर
गुरुवार, 08/15/2013 - 23:11 नवीन
प्रतिसादातला शेवटचा भाग तुम्ही पाहा:
धनाजीराव, तुम्ही अनेक तिरकस प्रतिसाद दिलेत हे तुम्हाला माहिती आहे. पण का कोण जाणे, तुम्हाला तिथल्यातिथे सुनवावं असा मला कधीही वाटलं नाही.
लेखकाला उद्देशून मला काहीही म्हणायचं नाही. ते विधानाच्या संदर्भात आहे. आणि लेखकाशी मी केव्हाच सेटल केलंय हे तुम्ही विसरतायं :
तुमची ही दिलगीरी बहुदा मनापासून असावी. माझ्याबाजूनं, आय ऑलवेज लव्ह टू स्टार्ट ऑन अ क्लिन स्लेट, अँड ऑफकोर्स फॉर यू, दॅट इज माय प्रॉमिस.
आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही सोडून देतायं
मी खरं तर इतकं लिहीणार नव्हतो पण इतकी प्रगल्भ भारतीय बुद्धीमत्ता तुमच्यासारख्या (तरूणांच्या) भंपक विचारसरणीमुळे संशोधनाभिमुख होऊ शकत नाही ही प्रामाणिक खंत आहे.
फार हास्यास्पद परिस्थिती करून ठेवली आहे देशाची, या तुमच्यासारख्या मानसिकतेनं . धड संशोधन नाही की अध्यात्म नाही.
संशोधन नाही कारण आपला विश्वास चमत्कारांवर! आपल्याला सगळं कष्ट न करता फुकट हवंय आणि अध्यात्माची वाट लावलीये कारण उत्तोमोत्तम साहित्याला असले भंपक चमत्कार जोडून ठेवलेत.
मला वाटतं चर्चा भरकटवण्यापेक्षा, या अँगलनं ती विधायक होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जे.जे.

निद्रिस्त संपादक मंडळ.

प्रभाकर पेठकर
गुरुवार, 08/15/2013 - 12:48 नवीन
>>>> `गेलेल्या माणसाला जिवंत करून महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहून घेतली' असं मूर्ख विधान करून (आणि त्यात पुन्हा तथ्य शोधण्याचा बहाणा केल्यानं) ज्ञानेश्वरीचं अवमूल्यन होतं. कारण किमान बुद्धी असलेला माणूस देखील म्हणेल, ज्ञानेश्वरी नंतर वाचू, कुठेय तो फॉर्म्युला?<<<< संपादक मंडळ जागे आहे का?
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा