मी तुळशीपाशी, लावता पणती एक,
अंगणी शेजीची येते चिमणी सुरेख
कसे गाल गुलाबी, कानी झुलती डूल
हातात बाहुली आणि जाईचे फूल...
अन् म्हणते करूनी गाल गोबरे मजला,
"पाहूनी मला का हसूच फुटते तुजला?"
तिज जवळी ओढूनी, सांगू पाहे मग मी,
"अगं बाळा, गोड तू सुंदर चपळ गं हरिणी,
अशी गोडच दिसशी, हळूच हसता तू गं,
तुज पाहून बाळा, हसू फुटे मजला गं"
ना कळते तिजला, परि हलविते मान,
बाहुलीस धरुनी तिथेच मांडी ठाण,
ही तिला भरविते काय पहा हे ध्यान,
म्हणे ऐक बाहूले, "करू तयारी छान!"
बाहुलीस सजविता, पाहे शांत मी बसूनी,
तिचे केस आवरते, फूल जाई गुंफूनी..
मग पावडर खोटे, तिट टिळाही देते
ह्रूदयास धरूनी "राणी माझी" म्हणते
म्हणे ऐक बाहुले, सुंदर तू ही दिसशी
जर हासता कोणी, तू ही खुदकन हसशी...
मी पाहता कौतुके, हळूच मज म्हणते ती
"कसे सगळेच हसले, बघ ना जरा हासता मी"
ती भुरकन जाते, आली तशीच उडूनी
अन् साठवते मी , आत-आत ती चिमणी,
मग मलाही वाटे, घ्यावे शिकून जरासे
हे तंत्र खुशीचे, आनंदाची गाणी...
अशी रोजच येते, चिऊ ही चिवचिवणारी
अन् गळ्यात पडते, "हसते का गं" म्हणूनी....
-वेणू (बागेश्री)
| लेखनविषय: |
|---|
मिसळपाव
प्रतिक्रिया
सुरेख
:)
सुंदर
सुंदर आहे कविता!
मस्त!
चिऊ आवडली! याच वृत्तातली "लाडकी बाहुली" काहीशी करूण आहे. पण ही बाहुली मस्त आहे!
किती ग गोड पोर!
किती ग गोड पोर!
मस्त! बा द वे तुळशीचा दिवा ऐकुन नवल वाटलं.
सुरेख
या कवितेला चित्र काढायला दिनानाथ दलालच हवे होते.
सुरेख, अप्रतिम.
धन्यवाद दोस्तहो...
धन्यवाद दोस्तहो...
तुळशीचा दिवा पाहून आश्चर्य का गो?
पैसा, अगदी बरोबर... त्या कवितेच्या चालीवर ही सदर रचना बसतेही चांगली :)
हृद्य.
हृद्य.
(No subject)
:)
धन्यवाद!
:)