Skip to main content

पंढरीचा राया : अभंग

लेखक गंगाधर मुटे यांनी शुक्रवार, 19/07/2013 14:54 या दिवशी प्रकाशित केले.
पंढरीचा राया : अभंग-१ पंढरीच्या राया । प्रभु दीननाथा ॥ टेकितो मी माथा । तुझे पायी ॥१॥ युगे किती उभा । एका विटेवरी ॥ येवुनी बाहेरी । पहा जरा ॥२॥ बदलले जग । आणि माणसेही ॥ तशा देवताही । बदलल्या ॥३॥ कनकाच्या भिंती । सोन्याचे कळस ॥ सोन्याची हौस । देवालाही ॥४॥ त्यांचे भक्त बघा । विमानाने जाई ॥ आम्हा कारे पायी । बोलावतो ॥५॥ देव गरीबाचा । तू राहिला गरीब ॥ भक्तही गरीब । ठेविले तू ॥६॥ आम्हां कारे असा । गरीबीचा शाप ॥ असे काय पाप । आम्ही केले? ॥७॥ अभयाने देवा । करा नियोजन ॥ जेणे भक्तजन । सुखी होती ॥८॥ - गंगाधर मुटे ................................................ . शुभहस्ते पुजा : अभंग-२ प्रथम पुजेला । लालदीवा मस्त ॥ सत्ताधारी हस्त । कशाला रे ॥१॥ त्यांचे शुभ हस्त । कसे सांगा देवा ॥ हरामाचा मेवा । चाखती ते ॥२॥ लबाड लंपट । तयांची जमात ॥ माखलेले हात । रक्ताने गा ॥३॥ पाय तुझे कैसे । नाही विटाळले ॥ मन किटाळले । कैसे नाही ॥४॥ म्हणा काही देवा । आहे साटेलोटे ॥ अभयास वाटे । शंका तशी ॥५॥ - गंगाधर मुटे ......................................................... (आषाढी एकादशीच्या निमित्ताने पांडुरंगाला थोडेसे साकडे) ………………………………………… . बोला पुंडलिकावरदे हरी विठ्ठल .......!!
लेखनविषय:

वाचने 3169
प्रतिक्रिया 6

प्रतिक्रिया

सोन्या रूपानं मढला, मारवाड्याचा बालाजी। शेतकऱ्यांचा विठोबा, पानफुलामधी राजी।। - बहीणाबाई

अभंग आवडला. युगे किती उभा । एका विटेवरी ॥ येवुनी बाहेरी । पहा जरा ॥२॥ मस्तच. -दिलीप बिरुटे

शुभहस्ते पुजा : अभंग-२ http://mimarathi.net/smile/congrats.gif ओळि ओळितून बसलीया ओळी, अता यांची पोळी कैशी भाजेल... लावा अभंगाचे पान पंढरीला, विठुराया गेला वैकुंठाला...