Skip to main content

163 वर्षांचा प्रदिर्घ इतिहास

लेखक लीलाधर
सोमवार, 15/07/2013 या दिवशी प्रकाशित केले.
असणारी तारसेवा म्हणजेच टेलिग्राफ सेवा आज दिनांक 15/07/2013 रोजी सेवेतुन निव्रुत्त झाली आहे त्यामुळे अत्यंत खेद होत आहे. आपल्या प्रत्येकाच्याच जीवनात तारेचे महत्व अबाधित आहे म्हणुनच या सेवेचा लाभ आपण सार्र्यांनिच घेतला आहे आपले अनूभव मांडुया.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 6286
प्रतिक्रिया 40

प्रतिक्रिया

मी चवथी पाचवीत असेपर्यंत आजोबांची, आत्याची, मामाची तार घरी येत असे पण तेव्हा त्या तारेचे महत्व एवढे काही कळत नसे पण हा काहि खास कारण असल्यावरच तार येई इतपतच मर्यादित महत्व कळत होते.

गावांमधे तार आली की रडारड सुरू व्हायची कारण कोणीतरी "गेल्या"शिवाय लोक तार करत नसत.

मुलगा/मुलगी झाल्याच्या तारा दिवसा यायच्या. (कारण डिलीव्हरीची घाई नसायची, 'ती' डिलीव्हरी होऊन गेलेली असायची) पण आजारपणाच्या, मृत्यूच्या तारा दिवसाच काय पण रात्री अपरात्रीही यायच्या. कारण प्रसंगाचे गांभीर्य आणि कदाचित तार 'पानेवाले को' (हे 'पानेवाला', 'भेजनेवाला' शब्द पोस्टाचेच.) घाईघाईने त्या दूरच्या गावी प्रवासास निघावे लागते म्हणून कोणी आजारी असल्याची/गेल्याची तार असेल तर ती जेंव्हा पोस्टात येते तेंव्हाच ताबडतोब डिलीव्हर केली जाते. कोणी आजारी असल्याचे आधी ठाऊक असेल आणि रात्रीबेरात्री दाराची कडी वाजवून 'तारवाला' अशी हाक ऐकली की उरात धडकी भरायची. कोणी आजारी नसले तरी रात्री येणारा 'तारवाला' म्हणजे 'वाईट बातमी' हे ठरलेलेच. घरातील सर्वजणं उठून बसायचे. तार पाठवताना शब्द संख्येवरून शुल्क आकारणी असायची. त्यामुळे कमीत कमी शब्द वापरून आशय पोहोचवायचा असा प्रयत्न असायचा. उदा. 'ठकी सिरियस. स्टार्ट इमिजिएटली' अशी तार यायची. पण ताबडतोब दुसर्‍या दिवशी 'ठकी इज' म्हणजे, 'ठकी अजून जीवंत आहे, निघण्याची घाई करू नये' एवढा अर्थ त्या दोन शब्दात असायचा. पुढे, ठराविक (अभिनंदनपर तारा) संदेशांसाठी नुसते क्रमांक असायचे. (त्याची यादी तारखात्याच्या खिडकी बाहेर लावलेली असायची) उदा. क्रमांक १ म्हणजे परीक्षेत यश मिळाल्याबद्दल अभिनंदन २. नवदांपत्यास अनेक आशिर्वाद ३. मुलगा झाल्या बद्दल अभिनंदन ४ मुलगी झाल्या बद्दल अभिनंदन. इ.इ.इ. ही उदाहरणे आहेत असेच क्रमांक आणि आशय नसतील. अशा तारांची शुल्क आकारणी कमी आणि ठराविक असायची. तारेच्या फॉर्म वर कमी लिहावे लागायचे. तारेत घरचा पत्ता (पानेवालेका) लिहीतानाही नेमका लिहावा लागायचा. उगीच, 'ह्याच्या समोर', 'त्याच्या मागे', 'विद्या प्रसारक मंडळाच्या विद्या मंदिर समोर' वगैरे लंब्याचौड्या बाता नसायच्या. कारण प्रत्येक शब्दाला शुल्क आकार असायचा. पत्यात श्रीयुत, सौभाग्यवती, कुमार, कुमारी वगैरेंनाही फाटा दिला जायचा. कारण परत तेच शब्दाला पैशे पडतात. त्यामुळे सरळ 'प्रभाकर पेठकर, सहानी वाडी, दहिसर (प), मुं. ६८' एवढ्या पत्यावर तारा यायच्या. तारवाल्याची सायकल लाल रंगाची असायची. पोस्टाच्या पेट्यांचा वगैरे रंग लाल असतो. तर तीच रंगसंगती वापरली जायची. मला मात्र लहानपणी वाटायचे तारवाला 'डेंजरस' बातम्या आणतो म्हणून त्याची सायकल लाल. पण इतर पोस्ट्मनच्या सायकली (असल्याच तर) साध्या काळ्या असायच्या. कारण त्या पोस्ट खात्याने दिलेल्या नसायच्या. पोस्ट्मन स्वखर्चाने घ्यायचे. स्वतःचे चालण्याचे कष्ट वाचविण्यासाठी. पोस्टमन आणि तारवाला ह्यांचे एक नंबर शत्रू म्हणजे गल्लीतले कुत्रे. कदाचित पोस्ट्मन आणि तारवाल्यांच्या सर्वसामान्यांपेक्षा आगळ्या वेगळ्या असलेल्या पोशाखामुळे असेल. रोजच्या येणार्‍या पोस्ट्मनच्या अंगावरही हे कुत्रे भूंकत असतात. रात्रीबेरात्री कुत्रे भुंकायला लागले की (आणि नात्यात कोणी आजारी असेल तर) मोठी माणसे म्हणायची, 'बापरे, तारवाला आला की काय?' आणि दाराची कडी वाजून हाक यायची 'तारवालाSSS' की तार न उघडताच घरात मजकूर समजायचा. तारेची प्रथा मागे पडली होती. (अजून बंद झाली नव्हती). पण दूरध्वनी आणि भ्रमणध्वनी आले आणि तार हा प्रकार मागे पडला. झटपट निरोप इथून तिथे व्हायला लागले. परदेशातील आप्तही संपर्कात आले. तेंव्हाही रात्री-अपरात्री भ्रमणध्वनीची घंटी वाजली की भिती वाटते. माझी आई वृद्ध आणि आजारी असताना असाच अपरात्री भ्रमणध्वनीच्या घंटीचा मी धसका घेतला होता. मन चिंती ते वैरी न चिंती. तार, तारखाते, तारवाला ह्यांनी समाजाची अतोनात आणि अमुल्य सेवा केली आहे. सुखदु:खाच्या बातम्या तातडीने पोहोचविल्या आहेत. तार संबंधीत सर्व कर्मचार्‍यांना शतशः प्रणाम.

In reply to by प्रभाकर पेठकर

बघ लील्या ह्याला म्हनतेत अनुभव आणि प्रकटन. तू 163 वर्षाचा इतिहास 163 शब्दात मांडायाला निघालाय. घेतला तांब्या की टाक जिलबी. ज़रा लिहावे डीत्टेल मदी. ;-)

In reply to by अभ्या..

@ घेतला तांब्या की टाक जिलबी. ज़रा लिहावे डीत्टेल मदी. smiley>>> =)) ह्या लिल्या'ला हेच तर मी(ही) ;) सांगत असतो!!! पण...................................छे!!!... असो! @पेठकरकाका>>> माहिती येक नंबर! ============================================== "ऐकेल...तर तो लिल्या कसला?" अशी सही घ्यावी म्हणतो! =))

In reply to by अभ्या..

लील्याला अजुन डीटेल्मंदी ऐकायची सवय नाय ना.. :) आता काही दिवसांत दोनाचे चार होतील .मग एकदा डिटेल मध्ये ऐकयची सवय झाली की ........ ;)

In reply to by प्रभाकर पेठकर

बघ लील्या ह्याला म्हनतेत अनुभव आणि प्रकटन. तू 163 वर्षाचा इतिहास 163 शब्दात मांडायाला निघालाय. घेतला तांब्या की टाक जिलबी. ज़रा लिहावे डीत्टेल मदी. ;-)

In reply to by बॅटमॅन

अररर लील्याला तीनदा मेसेज करावा तवा एक उत्तर येतं. म्हणून रे. बाकी येतोस काय? आज दुपारीच रिकामा हाय. ज़रा बसू ;-)

In reply to by प्रभाकर पेठकर

मस्तच लिहीलत काका. फोन रिंगची भिती का कुणास ठाऊक माझ्या मनातही आहे. आणि मी फोन केल्यावर तो घरच्या कोणी रिसीव्ह नाही केला तरी हजारो विचार मनात येतात.

तार म्हटली की शब्दांची काटकसर आणि उलटापालट व त्यामुळे होणारे घोळच जास्त लक्षात रहातात.. उदा. पाठवलेला संदेश "babu's marriage fixed with limaye's daughter" मिळालेला संदेश "babu's garage mixed with lemon water" :-)

ना कधी कुणाची तार आली ना कुणाला केली. मुळात सारा नातेवाईकांचा गोतावळा मुंबईच्या आसपासच होता. त्यामुळे कधी 'तार' वापरण्याचा प्रसंगच आला नाही. ज्या ज्याकाही कथा/चुटके माहित आहेत त्या इतरांच्या लिखानातुनच सामोर्‍या आल्या. आज घडीला तंत्रज्ञान इतकं काना कोअपर्‍यात फोफावलयं की पत्रं/तारा त्यामानाने फारच आउट्डेटेड झाल्या आहेत/होत्या. पेठकर काकांचा प्रतिसाद आवडला.

दूरध्वनी जेव्हा एकदम नवीन आले होते तेव्हा आमच्या ओळखीत आणि नात्यात मिळुन फक्त माझ्या आत्या़कडे दूरध्वनी होता. एकदा आत्याकडे संध्याकाळी फोन आला की आजोबांचे (आत्याचे वडील) आतेभाऊ (नावः वामन) वारले. आत्या जवळ रहात असल्यामुळे तिने आम्हालादेखिल तो निरोप सांगितला. हे आजोबांचे आतेभाऊ दुर्धर रोगामुळे आजारीच होते त्यामुळे फारसा धक्का असा कोणालाच बसला नाही. त्याच दिवशी रात्री १०.३०/११.०० च्या सुमारास तार आली. 'वामन एक्स्पायर्ड. स्टार्ट इमिजिएटली' पण आधीच कळल्यामुळे कोणालाच काही वाटले नाही पण २ मिनटाने पाठवणार्याचा पत्ता बघितला आणि सगळे धक्का बसल्यासारखे शांत झाले. आजोबांचे सख्खे भाऊ ज्यांचे नावसुध्दा वामन होते ते अचानक ह्र्दयविकाराच्या तीव्र झटक्याने गेले होते. सारखे नाव आणि म्रुत्युचा एकच दिवस हा दुर्दैवी योगायोग जुळुन आला. तारेची माझी एकमेव धडकी भरवणारी आठवण..

वरील पेठकरांचा प्रतिसाद आवडला... आज तार संपल्याची तार कोणी कुणाला केली असेल का, असा प्रश्न पडतो. पण या बातमी संदर्भात तारे सारखे अथवा अधुनिक काळातील ट्वीटरप्रमाणे त्रोटक नाही, तर रकाने भरले जात आहेत, यातच तारेचे कधीकाळचे महत्व समजू शकते... म्हणूनच, आज वॉल स्ट्रीट जर्नल मध्ये "The Future Doesn't Stop. STOP - What Morse, Edison, Jobs and others wrought." असा या निमित्ताने एक अग्रलेख आला आहे. त्यात दिलेल्या माहितीनुसार, स्मार्टफोन्स अस्तित्वात आल्यानंतर दरदिवशी भारतात १६०,००० इतक्या केल्या जाणार्‍या तारांची संख्या एकदम ५००० वरती घसरली. परीणामी भारत संचार निगम हे वर्षाला $२३ मिलियन्स इतके फुकटचे घालवत होते. गणवेष तसाच असला तरी नेहमीच्या पोस्टमनपेक्षा तार घेऊन येणारा पोस्टमन वेगळा असायचा...तार आली म्हणल्यावर ती उघडेपर्यंत धडधड होणे हे झाले नसेल असे फारच कमी असतील... स्कॅनिंग करून डॉक्यूमेंट अ‍ॅटचमेंट म्हणून इमेलने पाठवायच्या जमान्यात आता तारे नंतर "फॅक्स की जान खतरे मे" असे म्हणायचे का? :)

In reply to by विकास

कदाचित घरगुती दूरध्वनी यंत्राचा (लँड लाईन) क्रमांक वरचा असावा.

मोर्स कोड चा वापर करणारी भारतीय टपाल व्यवस्था हि बहुदा शेवटची संस्था असावी. मोर्स कोड ची माझी माशीन आता बहुदा म्युझियम मध्ये द्यावी लागणार.

श्वेत-धवल टिव्ही जाऊन रंगीत टिव्ही आले चावीची घड्याळं जाऊन क्वार्ट्झ घड्याळं आली रेकॉर्ड जाऊन कॅसेट आल्या, कॅसेट्स जाऊन सिडी आल्या दिल नी मेणबत्त्या जाऊन विजेचे दिवे आले अशा अनेक जुन्या गोष्टी जाऊन, अनेक नव्या गोष्टी आल्या तेव्हा कुणी रडलं नाही, आताच का उमाळे येतायत?

In reply to by आदिजोशी

श्वेत-धवल दूरदर्शन संच, चावीची घड्याळे, ध्वनीतबकड्या, कंदिल, मेणबत्या, कल्हईवाले, छापखान्यातील खिळे जुळारी वगैरे वगैरे त्या त्या व्यवसायावर अवलंबित कारागिरांना ते ते व्यवसाय बंद पडत गेले तेंव्हा असेच दु:ख होऊन तेही रडले असणार पण त्या काळात प्रसार माध्यमे इतकी प्रभावी नव्हती तेंव्हा त्या गरीब बिचार्‍यांची छायाचित्र प्रसारमाध्यमात, संस्थळांवर झळकली नाहीत. त्यांचे अश्रू सर्वसामान्यांपर्यंत पोहोचलेच नाहीत. आज निदान त्यांच्या भावना, संवेदना आपल्या पर्यंत पोहोचत आहेत. आपण कांही मदत करू शकत नाही पण निदान अशी हेटाळणी करू नये. हे अश्रू नुसतेच नोकरी संपल्याचे, उत्पन्न थांबल्याचे नसतात. कित्येक वर्षे केलेल्या सेवेशी भावनिक संबंध जुळलेले असतात ती सेवा आता काळाच्या पडद्याआड जाणार ह्या दु:खानेही अश्रू अनावर होतात.