म्हणे चोख्याची महारी
भारतातील सर्वांत जास्त अन्याय झालेला समाजाचा वर्ग कोणता? (टारगटपणा नकोय, "नवरे" कोण म्हणाला तिकडे? आणि तेही इकडेतिकडे बघत, तोंडातल्या तोंडात पुटपुटत? गप बसा! हा धागा गंभिर आहे)
अर्थात दलित. त्यांना ना शिक्षणाचा अधिकार, ना आर्थिक सुबत्ता मिळवावयाला वाव, नाही सामाजिक समतेचा वारा आणि नाही ज्या धर्मात त्यांनी जन्म घेतला त्या धर्मातील देवाला बघण्याचीही परवानगी. शेतात राबणारा बैल बरा, त्याला वर्षातून एकदा कां होईना गळ्यात माळा घालून रस्त्याने मिरवत जाता यावयाचे, मोठ्या घरची मालकीण त्याला ओवाळून, पुरणपोळीचा घास भरवावयाची! आणि बैलाचा स्पर्श झाला म्हणून कोणी अंघोळ करत नव्हता. पण दलितांचा या बाबतीत पहिला क्रमांक लागेल कां? मला खात्री नाही. दलित निदान चार वर्णातील एका वर्णाचे होते पण चारही वर्णात त्यांच्या सारखाच एक अतिशोषित, दुर्लक्षित, निराधार, असहाय्य वर्ग होताच (व आजही आहे) ... स्त्रियांचा.
फार पुरातन काळापासून हे चालू आहे. सीता निर्दोश आहे हे माहीत असूनही श्रीरामाने सीतेचा त्याग केला. युधिष्ठिराने द्रौपदी पणाला लावली. बुद्धाने नवप्रसुत बायकोला न सांगता घर सोडले. सतीची प्रथा रुढ केली. ज्याना जाळले नाही त्यांना मुंडन करून घरात जनावराप्रमाणे राबविले. त्यांना शिक्षण नाकारले. त्यांचा संपत्तीमधील हक्क नाकारला. सकाळपासून कामाला जुंपले. अगदी लहान भाऊ-बहीण यांच्यांमध्ये भेदभाव निर्माण केला. तो पुरुष आहे, त्याने काम केले नाही तरी चालेल, तू मुलगी आहेस, तू काम करावयासच पाहिजे असे तिच्यावर बिंबवले. असो. किती सांगणार? मुद्दा हा की या दोन गटांत तरतम ठरवणं कठीणच. मग विचार करा, दलितांमधील स्त्रीयांची गत काय?
समाजात काही विचारवंत असतातच ज्यांना ही चूक कळली. म.फुले, आगरकर, कर्वे, डॉ. अंबेडकर, म.गांधी इ. थोर लोकांनी ही परिस्थिती बदलण्याकरिता जीवापाड प्रयत्न केले. मध्यकाळातही मध्वाचार्य, बसवण्णा, चक्रधर इ.. यांनीही ही रुढी फोडावयाचा प्रयत्न केला. ज्ञानेश्वरांचे या क्षेत्रातले काम उल्लेखनिय आहे. मृदु स्वभावाचे ज्ञानेश्वर बंडखोर नव्हते. चालू चौकट मोडणे त्यांना मान्य नव्हते. आपल्याला विहित कर्मे ही ईश्वराने दिलेली आहेत, ती सोडून न देता कशाप्रकारे करावीत हे त्यांनी सांगितले.आज आपल्याला करावे लागणारे काम,भोगावा लागणारा त्रास, हे पूर्वसंचिताचे फळ आहे यावर सर्वांचा विश्वास होता. ज्ञानेश्वरांनी काय केले, हे काम चांगल्या प्रकारे पण निष्काम बुद्धीने कर, त्यात उच्चनीचपणा नाही, तीच देवाची सेवा, पूजा आहे असे त्यांनी सांगितले
विहित कर्म पांडवा ! आपुला अनन्यु वोलवावा !
आणि हे चि प्रेमसेवा ! सर्वात्मकाची !! १८.९०२
तेया सर्वात्मका ईश्वरा ! स्वकर्मकुसुमाची वीरा !
पूजा केली होये अपारा ! तोखालागी !! १८.९१३
यामुळे काय झाले, काम कमी झाले नाही, त्यातील कष्ट कमी झाले नाहीत, पण मनाला एक उभारी आली. मांगाला मृत ढोरे ओढतांना "मी जगण्याकरिता हे हीन काम करत आहे " अशी खंत न वाटता " ही तर ईश्वराची सेवा आहे, मी त्याची पूजा केल्याने मला त्याचा या जन्मी व पुढील जन्मी फायदा होईल ’ असा आनंद मिळू लागला. ही एक प्रकारची फसवणूकच आहे असे आज तुम्ही म्हणू शकता पण त्या काळी हा एक फार, फार मोठा दिलासा होता. आणि हे ज्ञानेश्वरांसारख्या "महाविष्णूचा अवतार" मानल्या गेलेल्या मान्यवराने सांगितल्यामुळे अल्प काळांत जनी सारखी दासी त्यांना "सखा माझा ज्ञानेश्वर" असे अभिमानाने म्हणू लागली तर कोणत्याही जातीतला त्यांना "माउली माझी" असे सहजपणे मॊठ्याने गर्जू लागला. आता चोख्याला देवळांत जाऊन विठोबाचे दर्शन घेता येत नाही याची खंत वाटेनाशी झाली, नव्हे आता त्याची गरजच उरली नाही.आता विठोबाच त्याच्या झोपडीत आला. त्याच्या हातचे खाऊ लागला. जनीला पाणी भरावयाला,आणि शेण्या गोळा करावयाला एक मदतनीस सखा मिळाला. सावता माळ्याला ’कांदा मुळा भाजी ! अवघी विठाबाई माझी" याचा साक्षात्कार झाला. भक्ती सगळ्या समाजात होतीच. आता हळुहळु ज्ञानही पाझरू लागले. अद्वैत आजही आपणास समजून घेण्यास अवघड वाटते. तेही समोर चालताबोलती उदाहरणे असल्यामुळे असेल म्हणा सोयरेसारखी एक महारीण सहजपणे अभंगात गुंफू लागली. कोण ही सोयरा?
नामदेवांच्या घरातील सर्वजण अभंग रचत. तीच गत चोखा मेळा याच्या महार कुटुंबातील लोकांची. त्याची बायको, मुलगा, बहीण, मेहुणा सगळे अभंग रचू लागले. सोयरा चोख्याची बायको. चोख्याच्या ५००-५५० अभंगांच्या मानाने तिचे अभंग कमी आहेत. पण त्यातील भाव मनमोहक आहेत. आज तिचा एक अभंग आपण पहाणार आहोत. तिला लिहता-वाचता येत नव्हते हे लक्षणीय आहे. तिला ज्ञानेश्वरी वाचता येत नव्हती. कोणी वाचत असेल तेव्हा ऐकणे एवढेच शक्य. तरीही त्या ग्रंथातील सार ती चार ओळीत सांगू शकते ! ज्ञानेश्वरांनी रेड्याच्या मुखी वेद वदविले, भिंत चालवली या चमत्कारांना तुम्ही आम्ही नाकारू शकतो पण निरनिराळ्या खेडेगावातील, निरनिराळ्या व्यवसायातील, जातीजमातीतील, बहुजन समाजातील स्त्री-पुरुषांना काव्य लिहण्यास उद्युक्त करणे हा केवढा चमत्कार ! चला तर सोयराबाईचा अभंग पहा
अवघा रंग एक झाला ! रंगी रंगला श्रीरंग !!१!
मी तूं पण गेले वाया ! पाहता पंढरीच्या राया !!२!!
नाही भेदाचे ते काम ! पळोनी गेले क्रोध काम !!३!!
देही असूनी तू विदेही ! सदा समाधिस्त पाही !!४!!
पाहते पाहणे गेले दुरी ! म्हणे चोख्याची महारी !!५!!
ज्ञानेश्वरीत काय सांगितले आहे ?
(१) सर्व भूतांच्या ठाई एकच परमामा वसतो, अवघे प्राणीमात्र एकाच ब्रह्माचे अंश आहेत.
(२)"अहं", मी म्हणजे माझे हे शरीर, हा भाव परमात्म्याची ओळख झाली की सुटतो.
(३) एका दुसर्यातील दुराव्यामुळे षड रिपूंना वाव मिळतो, पण जर तुम्हाला कळले की त्याच्यात व तुमच्यात एकरूपता आहे तर लोभ. क्रोध, मत्सर आदि निर्माणच होणार नाहीत.
(४) एकदा आत्म्याची ओळख झाली की नित्यकर्मे करत असतांनाही तुमचे परमात्म्याशी असलेले संधान तुटत नाही.
समाधीत मिळणारी शांती, समाधान तुम्हाला सर्व काळ मिळते.
(५) या नंतर त्रिपुटी,दृष्य-दर्शन-द्रष्टा, ही नाहिशी होते.
आणि हेच तर सोयराबाई अभंगात सांगत आहे. ही बहुरंगी दुनिया एकच आहे व श्रीरंग या आपल्या चित्विलासात रंगला आहे. विठोबाला पहिले की भेदभाव मिटतात. अरे बाबा, या नश्वर देहातील अनश्वर आत्मा तूच आहेस व सदासर्वकाळ समाधीसुख मिळवणे तुला शक्य आहे. चोख्याची महारी सांगत आहे "सांडली त्रिपुटी" (दीप उजळला घटी)
किशोरीताईंनी गायलेला अभंग येथे ऐका.
http://music.ovi.com/in/en/pc/Product/Kishori-Amonkar/Avagha-Rang-Ek-Jh…
शरद
वाचने
4965
प्रतिक्रिया
18
मिसळपाव
प्रतिक्रिया
सुरेख विवेचन
उत्तम लेख...
सुंदर लेख
छान.
अप्रतिम! अभंग लाडका आहेच.
+१
In reply to अप्रतिम! अभंग लाडका आहेच. by प्यारे१
तुमची लेखनशैली आणि मांडणी सुरेख आहे
किती सुरेख..
सर, अजून लिहा....!
++१
In reply to सर, अजून लिहा....! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सुंदर
देणे देवाचे.
नेहमी प्रमाणेच लेख आवडला.
अभंग सोयराबाईचा असलेला माहित
सुरेख
खूप सुंदर लिहिले आहे!!!!
फारच छान लेख. नविनच ओळख समजली
>>ही तर ईश्वराची सेवा आहे, मी