२१ जून, मॉस्को..(२)
लेखनप्रकार (Writing Type)
संध्याकाळी घरी आल्यावर जेवून ८.४५ च्या सुमारास घराजवळील 'व्हिक्टरी पार्क' कडे निघालो.
व्हिक्टरी पार्क सोव्हियत युनियनच्या अंतीम काळात तयार झाले. हे रशिया आणि नाझी जर्मनीच्या 'ग्रेट पेट्रीयोटिक वॉर'(१९४१ ते १९४५ दुसरे महायुध्द)च्या विजयाचे स्मारक आहे. १९९५ मध्ये या विजयाच्या सुवर्ण महोत्सवप्रसंगी या स्मरकाचे उद्घाटन झाले. या जागेला आणखी ऐतिहासिक महत्व देखील आहे. १८१२ मध्ये याच ठिकाणी नेपोलियनचा पराभव झाला होता.
व्हिक्टरी पार्कचे प्रवेशद्वार
येथे नयनरम्य कारंजाचे पांच मोठे चौकोन आहेत. या पांच चौकोनात मिळून एकूण १४१८ कारंजे आहेत. पाच चौकोन युध्दाची पांच वर्षे तर १४१८ कारंजे त्यातील प्रत्येक दिवसाचे प्रतिक आहेत.
येथील १५० मिटर उंचीचा विजय स्तंभावर विजयदेवता कोरली आहे.
फुलांनी सुशोभित केलेले घड्याळ हे या जागेचे खास आकर्षण आहे. या घड्याळातली वेळ पहा रात्रीचे साडेनऊ वाजले आहेत आणि अजूनही कडक ऊन आजूबाजूच्या इमारतींवर स्पष्टपणे दिसत आहे.
आणि हो ओळख करून द्यायची राहून गेली. या दोन उंच सावल्यात उजवीकडे अस्मादिक आहेत तर डावीकडे 'अर्धांग' आहे!!
रशियन भाषेतील जाहिरात फलकावरील वेळ आणि आजूबाजूचे वातावरण...
अजूनही सूर्यास्ताला जवळपास एक तास दहा मिनिटे बाकी आहेत. व्हिक्टरी पार्क मधून निघून 'क्रेमलीन'च्या दिशेने जाणारी बस पकडून 'मोक्सवा' नदीच्या पुलाकडे जायला निघालो. बसप्रवासात संध्याकाळ्च्या सोनेरी प्रकाशात न्हाऊन निघालेल्या इमारती मनाला भुरळ पाडत होत्या.
१.
२.
'मोक्सवा' या नदीच्या नांवावरुनच या शहराला 'मॉस्को' हे नांव मिळाले. ही नदी ५०३ कि.मी. लांब असून या नदीच्या खो-यात १७६०० वर्ग किलोमिटरचा भाग येतो. मॉस्को शिवाय मोझाहायक्स, झेविगोड, झुकोवस्की, ब्रोनेस्टी, वोस्करेसेनक्स या शहरांचा प्रवास करून या नदीचा कलोम्ना येथे सुप्रसिध्द व्होल्गा नदीशी संगम होतो.
येथे पोहेचेपर्यंत ९.५० झाले आहेत. मात्र अगदी मनोरम संध्याछाया वातावरण प्रसन्न करीत आहेत. या पहा काही रंगछटा....
१.
२.
३.
निसर्गाचा एक अपूर्व सोहळा, पश्चिम क्षितिजावर भगवान सहस्त्ररश्मी तर पूर्व क्षितिजावर रजनीनाथ.
आता सूर्यदेवही मावळतीकडे झुकले आहेत जणू काही आपल्या रीष्टवाचात 'अजून किती वेळ उरला आहे बाबा आजची ड्यूटी संपायला!' असाच विचार करीत असावेत.
१.
२.
येथून दहा मिनिटांच्या अंतरावर असलेल्या घराकडे आम्हीही निघालो. मात्र पांचव्या मजल्यावर आपल्या घराकडे न वळता प्रथम सर्वात वरच्या नवव्या मजल्यावर जाऊन १०.१८ चा मुहूर्त साधायचा होता.
एक धीर गंभीर शांतता पसरली होती. सुर्यनारायण या वर्षातील आजची उत्तर गोलार्धातील सर्वात लांबलचक सेवा बजाऊन थकून भागून परतले होते. मॉस्कोच्या आकाश रेषेवर रक्तिमा पसरला होता.
जाता जाता या आकाशरेषेत सर्वात उंच तांबूस रंगाची इमारत 'मर्क्युरी सिटी टॉवर' आहे ही युरोपखंडातील सध्याची सर्वात उंच (३३९ मिटर) ७५ मजली इमारत आहे.
आजच्या दिवसात निसर्गाचा हा आगळावेगळा चमत्कार पाहायला मिळाला तो आपल्या बरोबर अनुभवण्याचा प्रयत्न केला आहे. २१ डिसेंबरला याच्या उलट परीस्थिती पाहायला मिळेल तेव्हा पाहुया जमले तर याच विषयावर पुन्हा भेटू..
समाप्त.
प्रतिक्रिया
वा!!
अहाहा...!
+१
दोन्ही भाग
नेपोलियनचा पराभव
कदाचित...
माझे मस्क्वा
फोटु आणि माहिती आवडली...
वर्षातील एका महत्वाच्या
मस्तच! अजून येऊ दे.
आधीचे आणि हेही फोटू आवडले.
साहेब, आयुष्यात पहिल्यांदा
मनापासून आभार..
-
मस्तच!
धन्यवाद