चारधाम यात्रा करावी का नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. सध्या भयानक आपत्तीमुळे चारधाम, विशेषतः केदारनाथ गाजते आहे. पण या लेखाचा विषय तो नाही. मी जेंव्हा चारधामांना भेट दिली त्याचे सचित्र प्रवासवर्णन करण्याचाही या लेखाचा हेतू नाही. तर एकंदरीतच, जे अनुभव आले त्यातून आपल्याला काही बोध घेता येतो का, याविषयी हा लेख आहे.
चारधामला मी जाणार, हे कळल्याबरोबर माझ्या समविचारी मित्रांनी थट्टा केली. 'अरे,तू इथे कधी कुठल्या देवळात जात नाहीस, कुठल्याही दिवशी तुझा उपास नसतो, ३६५ दिवस तू सामिष आहार करु शकतोस, तर तिथे जाऊन काय करणार आहेस?' अशा प्रकारच्या कॉमेंटस ऐकल्या. पण मला, त्या चारधामांच्या ठिकाणी असलेल्या निसर्गसौंदर्यात अतिशय रस होता. म्हणून मी कुठल्याही यात्रा कंपनीकडे न जाता मुंबईतल्या गढवाल निगमकडे गेलो. त्यांच्याकडून टूर आखून घेतली आणि आम्हा चार जणांना स्वतंत्र टॅक्सी ठरवून टाकली.
ऋषिकेश जवळ 'मुनी की रेती' हे फार सुंदर ठिकाण आहे. तिथले गढवाल निगमचे लोकेशन छान आहे.लागूनच गंगा नदी असल्यामुळे शांत आणि प्रसन्न वाटते. त्याउलट ऋषिकेशला फारच गजबजाट आहे. चारी धामांचा प्रवास करताना म्रुत्यु, कुठे ना कुठे, दर्शन देतोच, असे वाचले होते. आम्हालाही ते अनुभवायला मिळाले. कारण पहिल्याच यमुनोत्रीच्या प्रवासात, आमच्या ड्रायव्हरने मसुरीपर्यंत उगाच जास्त वेळ काढला. आणि त्यानंतर घाटात तो चक्क पेंगू लागला. समोरून येणार्या एकदोन वाहनांना निसटती धडक दिल्यावर आमच्या लक्षांत आले. लगेच पुढच्याच गांवात मी त्याला तिथल्या लोकल डॉक्टरला दाखवले, तेंव्हा तो दारु प्यायल्याचे स्पष्ट झाले. त्याला गाडीमधे दोन तास सक्तीने झोपवला. त्यानंतर त्याला उठवून एका नळाखाली त्याचे डोके धरले. चहा पाजला. एवढे सगळे केल्यावर तो शुद्धीत आला. माफी मागू लागला. पुढे मात्र, त्याने गाडी व्यवस्थित चालवली. या सर्व प्रकरणात आम्हाला पायथ्याशी पोचायला रात्रीचे आठ वाजले. मॅनेजरकडे रीतसर तक्रार करुनही काहीही झाले नाही. पुढचा सगळा प्रवास त्याच्याबरोबरच करावा लागणार, हे जेंव्हा स्पष्ट झाले तेंव्हा आम्ही सामोपचाराने घेण्याचे ठरवले. आणि तोही पुढे संपूर्ण ट्रीपभर नीट वागला.
यमुनोत्री आणि केदारनाथला चढावे लागते वा घोडा/डोली करावे लागते. गंगोत्री आणि बद्रीनाथला शेवटपर्यंत वाहन जाते. ज्याला निसर्गसौंदर्य लुटायचे आहे त्याने पायी चढावे. घोडा केला तर चढता-उतरताना जी अवस्था होते त्यांत इकडे-तिकडे बघणे शक्य होत नाही. सर्वात त्रास होत असेल तर भक्तिधुंद तांड्यांचा. पायी चालणार्यांचा सुद्धा ट्रॅफिक जाम होऊ शकतो, हे मी यमुनोत्रीला बघितले. वर गेल्यावर निसर्गाचा आनंद घेताच येत नाही. स्पोर्टस शूज काढून त्या ओल्या, निसरड्या पायर्यांवरुन सगळ्या मंदिरांत डोकवावे लागते. मला तर, प्रत्येक मंदिरातला 'देव' किती केविलवाणा दिसतो, एवढेच पहायचे होते. हात जोडायचा वा अभिषेक करण्याचा प्रश्नच नव्हता.
गंगोत्रीला गाडी एक किमी. आधीच थांबवतात, त्यामुळे बरेच चालावे लागते. तिथे तर बाजारच भरलेला असतो. गंगेच्या घाटावर मात्र नदीचे रुद्र दर्शन होते. अत्यंत गढूळ पाणी प्रचंड वेगाने वहात होते. माझ्या मेहुण्यांनी एक बाटली भरुन घेतली तर एक मिनिटांत सर्व गाळ खाली बसला आणि वरचे पाणी एकदम स्वच्छ दिसायला लागले. मी काही, ते पिण्याचे डेअरिंग केले नाही आणि बरोबरही आणले नाही.
केदारनाथचे जे गौरीकुंड, सध्या गाजते आहे, तिथे वर जायचा रस्ता एनक्रोचमेंटमुळे इतका अरुंद झाला आहे(आता होता असेच म्हणावे लागेल) की त्या घोडेवाले, डोलीवाले यांना चुकवत आंत प्रवेश करणे, हे एक दिव्यच होते. हा चौदा कि.मी. चा ट्रेक मात्र सुंदर आहे. डोलीतून जाडजूड माणसांना वाहून नेणार्या त्या, नेपाळी पोरांची मात्र कमाल वाटली. हे सीझनचे दोन महिने इथे येऊन बिचारे अक्षरशः घाम गाळून चार पैसे कमावतात आणि पावसाळा सुरु झाला की शेतीसाठी परत मायदेशी जातात. विरळ हवेत, आपण फा फू करत चढत असताना, हे आपल्या दुप्पट वेगाने एवढे ओ़झे अगदी लीलया वाहून नेतात. परत कायम हसतमुख. विश्रांती घेताना केळी खातात, तीच त्यांची एनर्जी! चढत असताना दोन्ही बाजूला इतक्या टपर्या उभ्या दिसल्या, त्यांत 'लेज' पासून सगळ्या पताका लटकत होत्या. रामबाड्याला पोचलो आणि जबरदस्त पावसाची सर आली. भिजल्या कपड्यांत थंडी भरुन आली. चहा प्यायल्याशिवाय ती काही थांबेना. ते आठवल्यावर वाटले की आत्ता लोकांनी भिजलेल्या अवस्थेत कसे दिवस काढले असतील? वरच्या रुम्स चांगल्या होत्या. पण जेवून परत येताना एका पंड्याने आम्हाला गाठलेच. मी 'टफ नट' आहे हे त्याने लगेचच ओळखले आणि मेव्हण्यांना पटवले. त्याने सांगितल्यानुसार सकाळी पांच वाजता मंदिराशी गेलो. प्रचंड मोठ्या बैठ्या लाईनीत त्याने आम्हाला अगदी प्रवेशदारापाशीच मधे घुसवले. तसे आम्ही देऊळ रात्रीच बघून आलो होतो. हातापायाला निसरड्या तेलकट स्पर्शाशिवाय दुसरी कुठलीच अनुभूति मला झाली नाही. दिवसा मात्र, बाकीचे अभिषेकात गुंतल्याचे बघून मी मंदिराच्या मागच्या बाजूला गेलो आणि चारधामला येण्याचे सार्थक झाले. तो भोलेनाथ, मागच्या त्या विहंगम दृष्यातच मला खुणावत होता.
बद्रीनाथला तर बाजारीकरणाचा कडेलोटच झाला आहे. त्या मंदिराला बाजूच्या असंख्य ओंगळ इमारतींनी वेढले आहे. तीच ती पंड्यांशी सौदेबाजी, तीच ढकलाढकली आणि तेच ते भक्तिधुंद तांडे! परत आल्यावर माझ्या एका मित्राला मी कबुलीच दिली होती की शेवटीशेवटी माझी अवस्था त्या ओमेन' चित्रपटातल्या बालनायकासारखी झाली होती. मंदिर आणि ती गर्दी अंगावर यायची आणि त्यापासून शक्यतो दूर पळून जावे, अशी तीव्र उर्मी मनांत दाटून यायची, फक्त माझ्या टाळूवर ६६६ चा आंकडा कोरलेला नसल्यामुळे मी आंत जाऊ शकायचो.
थोडक्यांत काय, तर निसर्गाची अनेक मनमोहक रुपे बघायला मिळतात तिथे, कधी आत्तासारखी मृत्युचीही रुपे दिसतात. पण निसर्ग अनुभवायला पृथ्वीवर दुसरी असंख्य ठिकाणे आहेत. त्यामुळे माझ्यासारख्या लोकांनी अशी ठिकाणे टाळावीतच. ह्या ट्रीपनंतर मी माझ्या आगामी लिस्टमधून वैष्णोदेवी, अमरनाथ, वगैरे जागा कायमच्या बाद करुन टाकल्या आहेत.
प्रतिक्रिया
प्रसिद्ध मन्दिरांमधला गोंधळ साउथमध्येही बघितला आहे. पण मुख्य गर्दीत न शिरता जरा बाजूला गेले तर खूप सुंदर गोष्टी बघायला मिळतात हे खरंच आहे.
चांगला लेख वाटला.
मी स्वतः जिथेही गर्दी असेल, अश्या ठिकणी जाणे मुळातूनच टाळत आलेलो आहे, मग ते ठिकाण कितिका प्रसिद्ध असेना. अजिबात गर्दी नसलेली, एकांतपूर्ण ठिकाणे हुडकली तर अजून सापडतात. तिथे जाणे बरे. बाकी धार्मिक स्थळांविषयी काही न बोलणेच इष्ट. पावसाळ्यात चारधाम वगैरे सारख्या ठिकाणी मुलाबाळांसकट वा वृद्धपणी जाण्याचा विचार निदान आतातरी तथाकथित श्रद्धाळू लोक सोडून देतील, अशी आशा.
पटला आणि आवडला. पर्यटन हा व्यवसाय 'ईको-फ्रेन्ड्ली' आहे म्हणून सरकारने त्यास प्रोत्साहन द्यावे असे सतत सांगितले जात असते. धार्मिक पर्यटनात वाढीस खूप वाव आहे असेही म्हटले जाते. पण माझी खात्री पटत चालली आहे की या भारतात कुठलीही गोष्ट/व्यवसाय पर्यावरणस्नेही असूच शकत नाही कारण त्या वस्तू/सेवेचे आश्रयदाते पर्यावरणस्नेही नाहीत. अगदी मानससरोवराचीही गंध,उदबत्त्या, धूपदीप,नैवेद्य,फळे इत्यादिकांनी पूजा करून तिथले स्वर्गीय जल दूषित करण्याचे महापुण्य मिळवलेले महाभाग पाहिले आहेत. जर पन्नास-शंभर लोकांकडून रोज अशी पूजा होत राहिली तर त्या स्फटिकनील जलाचे काय होईल? तीर्थे तर भयानक प्रमाणात प्रदूषित झालेली आहेत पण क्षेत्रांचीही कथा वेगळी नाही. सगळीकडे कुजलेल्या निर्माल्याचा, दुधातुपाचा ओशट वास, चिकटपणा, माश्या, सभामंडपाच्या छताला कोळीष्टके, अरुंद निसरडी वाट, पादत्राणे दूर कुठेतरी ठेवावी लागणे आणि तिथेच मूकसक्तीने पूजेची थाळी इ.घ्यावी लागणे, मंदिरप्रवेशाच्या अरुंद पायवाटेवर दोन्ही बाजूंना भिकार्यांची, फुटकळ विक्रेत्यांची गर्दी, नजिकच्या परिसरात शौचालये नसणे, आहेत तिथे देखभाल नसणे, प्रत्यक्ष शौचालयापर्यंत नेणारी वाट दुतर्फा 'भरून' गेलेली, पाणी नाहीच, अशा अनेक मनस्तापदायक गोष्टींना तोंड देउन झाल्यावर प्रत्यक्ष मंदिरात प्रचंड गर्दी, पुजार्यांची दमदाटी आणि सक्तीचे पूजाविधी, ओट्या किंवा अर्पण साहित्य फटाफट एका कोपर्यात उडवणे आणि देवीला/देवाला तुमची पूजा पावली हो s s असा मोठ्याने पुकारा करणे (ह्याला बहुतेक इलाज नसावा, कारण अशी अर्पणे-ऑफरिंग्ज प्रचंड प्रमाणात असतात.-- पण मग मोठ्या गर्दीच्या देवस्थानांत अशी अर्पणे स्वीकारण्यातच येणार नाहीत असे का नाही ठरवत?),देवासमोरून घाईघाईने पसार व्हावे लागणे-- छे. नको ती यात्रा आणि नको ते देवदर्शन असे होऊन जाते. हजारोंलाखोंच्या संख्येत येणारे भाविक हे पोटेन्शिअल ग्राहक असतात. केवळ फुटाणे,रेवड्या, लाह्या यांचेच नव्हे तर तिथल्या नदीचे तीर्थ, तिथला अंगारा/विभूति/उदी, तिथल्या देवाचे फोटो, स्थानिक खाद्यान्न (चटण्या, पापड, कोरडी पिठे, मिठाई, कचोरी, पोहे, बर्फी इ.)इ. या वस्तू विकणार्यांची एक फौज आणि लॉबीही असते. शिवाय गाडी-घोडा-पालखी वाले, सेल्फ-प्रोक्लेम्द गाइड्स्, फोटोग्राफर्स. या सर्व उत्पादनांचा धंदा त्या एकेकाळच्या छोट्याश्या निवांत गावात मोठ्या प्रमाणात सुरू होतो. (पॅकेजिंगसाठी वगैरे) प्लास्टिकचा उपयोग वाढतो, वापर आणि फेकून देणेही वाढते. यात्रेकरूंच्या मलमूत्रविसर्जनाची आणि त्याच्या विल्हेवाटीची समस्या बिकट बनते. गजबज वाढते, उष्णता वाढते, मोकळ्या जमिनींची अनुपलब्धता वाढून आहेत त्या जमिनींवरचे अतिक्रमणही वाढते. पर्यावरण ख्ड्ड्यात जाते.
यावर एकच उपाय दिसतो. सक्तीचे कुटुंबनियोजन. म्हणजे सगळीकडच्याच 'भक्तिधुंद' झुंडीतल्या टाळक्यांची संख्या कमी होऊन इतर नियोजनाला संधी मिळेल. असो. मूळ लेखापेक्षा प्रतिसादच मोठा होतोय की काय?
अतिशय मार्मिक प्रतिसाद!!!!!! पूर्ण सहमत.
प्रतिसादातला शब्दन शब्द पटला. सध्याच्या तीर्थक्षेत्रांची अगदी नेमकी परिस्थिती प्रतिसादातून दर्शवली आहे.
तिमांचं अनुभव लेखन आवडलं. अशा सगळ्या गोष्टी वाचल्या की अशा ठिकाणी जायचं धाडस होत नाही.
ह्या ट्रीपनंतर मी माझ्या आगामी लिस्टमधून वैष्णोदेवी, अमरनाथ, वगैरे जागा कायमच्या बाद करुन टाकल्या आहेत.
अगदी सहमत. पुण्य मिळवण्याच्या घाऊक चढाओढीतून तीर्थक्षेत्रात गर्दी होते आणि मग अनेकांची उपजीविका त्यात गुंतली जाते. जे झालं ते एका अर्थी 'अटळ' होतं :-(
त्याशिवाय मला ज्या निवांत, बिनगर्दीच्या जागा सापडतात; त्याबद्दल मी ज्यांना अशा जागा आवडतात आणि जे लोक त्या जागेचा निवांतपणा सर्वार्थाने जपतील याची खात्री आहे अशा (माझी प्रत्यक्ष ओळख असलेल्या) लोकांनाच फक्त सांगते.वैष्णोदेवी हा सुखद अपवाद आहे...एकदा जाउन बघाच...अप्रतिम
राही यांचा विस्तृत परिसाद अतिशय समर्पक आहे. त्यांनी वर्णन केल्याप्रमाणे सगळ्या धार्मिक स्थळांची गत झालेली आहे, हे कटु सत्य आहे. सध्या हिमालयात ओढवलेली आपत्ती अतिशय दुर्दैवी खरीच, पण त्यातून यापुढे भाविक मंडळी योग्य तो बोध घेतील, अशी आशा करणे, एवढेच आपल्या हाती आहे.
तिमा आणि राही यांनी मांडलेल्या निरिक्षणांचा अधिकाधिक प्रचार-प्रसार व्हायला हवा.
पर्यटनात मी ज्ञानयोगी मार्ग स्वीकारतो. जिथे खेचाखेच , लाईनी, अव्यवस्था, असेल अशा ठिकाणी जातच नाही. सबब माझ्या यादीतून पंढरपूर, सबरीमलाई, तिरूपति, अमरनाथ, वैष्णोदेवी , चार धाम, गुरुवायूर, मानसरोवर, कटाप केले आहे.
फारसा त्रास न देणारे, तंजाउरचे बृहदेश्वर, रामेश्वरम, पुरीचे लिंगराज, गोकर्ण या स्थानी जाताना आनंद वाटलेला आहे. देवा पेक्षा देवळात रस जास्त आहे. मनालीतले हिडिंबा देवळात भेट देण्यासारखे काय आहे हे मला अद्याप कळलेले नाही.
लिंगराज मंदिर भुवनेश्वर येथे आहे. आम्ही गेलो होतो तेव्हा नैवेद्य दाखवण्याची वेळ झाली होती, भरपूर गर्दी होती आम्ही पुढे गेलो तेव्हा एका पंडयाने आम्हाला पुढे नेले व आम्हाला हात जोडून तो जे म्हणतो ते म्हणावयास सांगितले, आजूबाजूला सर्व लोक हेच करत होते आम्हाला त्या आवाजात तो काय म्हणतोय हे ऐकू सुद्धा येत नव्हते तो म्हणाला येथे मागीतलेली इच्छा गुप्त ठेवावी म्हणजे आपल्या पतीला किंवा पत्नीला देखील सांगू नये व पूर्ण झाल्यावर येथे दर्शनास यावे. आम्ही बाहेर आलो त्याने आमचे नाव वगैरे लिहून घेतले व २५०० रु. देण्यास सांगितले, आम्ही कारण विचारले असता तो म्हणाला की पूजा करताना तुम्ही कबुल केले आहे व ह्या पैशातुन आम्ही भक्तांना प्रसाद वाटणार, माझ्या पतीने त्याला २५० रु. दिले आणि खर तर आम्हाला व्यवस्थित देव पाहायला सुद्धा संधी नाही मिळाली आणि तिथेच एक देवीचे देऊळ होते आम्ही आत दर्शन करावयास गेलो तर त्याने आम्हाला दक्षिणा म्हणून ५०१ रु. सांगितले आम्ही दिलेले १०० रु. त्याने नाकारले व आम्ही निघताना तो मला म्हणाला कि " तुम सुहागन होके ये चुडिया छोड के जा राही हो" माझा संताप झाला होता मी त्याला म्हटले " माताजी आशीर्वाद के बदले पैसे नाही मांग रही है"
खरय तुमचं तिमा, त्यामानाने मी खुप नशीबवान म्हणायचा, मी जवळ जवळ बारा वर्षांपूर्वी केली ती यात्रा. मी गेलो होतो तेव्हा इतकी वाईट परिस्थिती नव्हती. केदारनाथला तर फक्त एक धर्मशाळा होती. दुकानेसुद्धा ५-६ च होती. तिथली एक आठवण आहे माझी. बद्रीनाथला मी गेलो त्यादिवशी कोणत्यातरी बाबांचे तिथे किर्तन होते, खुप गर्दी होती. मंदीराच्याच जवळ मंडप टाकला होता. तेव्हा तो बाबा राम वनवासाला जातो तो प्रसंग वर्णन करत होते. खरतर मी काही तसा भावुक प्राणी नाही. पण त्या दिवशी कां कोण जाणे डोळ्यातुन अगदी पाणी येईस्तोवर गहिवरलो होतो. कदाचित, हिमालय, ते मंदीर, तिथली शांतता आणि एकुणच सगळ्या वातावरणचा परिणाम असावा.
हे असं काही झाल असेल तिथे तर आता जाण्यात अर्थच नाही.
पूर्वी गणपतीपुळे हे देखिल असचं शांत ठिकाण होतं. कौलारु मंदिर फार सुंदर होतं, आता मंदिर बांधुन काढलं. मोठ्ठा कळस आहे मंदिराला, आत संगमरवरी फरशा आहेत. पण आता तिथली शांतता हरवलीये. पूर्वी मी वर्षातून दोन -तिन वेळा जायचो तिथे पण आता दोन वर्षातून एकदा जातो कधीतरी.
मला कळत नाही, मंदिर हे शांत आणि साधे असावे हे लक्षात कां येत नाही लोकांच्या? जेवढी शांतता असेल तेवढे जास्त तुम्ही त्या सर्वशक्तिमानाच्या जवळ जाऊ शकता. घरातल्या देवघरातही हे जमू शकते, पण रोजच्या धकाधकीत, घरात असणार्या इतर माणसांच्या अस्तित्वाने, जो एकांत तुम्हाला तिथे मिळत नाही, तो मिळवण्यासाठी मंदिरे असतात, हे कधी कळणार लोकांना कुणास ठाऊक? त्या बाबतीत मला सुवर्णमंदिर खुप भावले होते. इतकी गर्दी असते तिथे पण शांतता आणि स्वच्छता याबाबतीत कुठेही तडजोड दिसली नाही मला. कमीतकमी मंदिराच्या हद्दीत तरी.
असो.
|| कालाय तस्मै नमः ||
आता मंदिरे = धंदा, धंदा आणि फक्त धंदा.
गणपतीपुळ्याच्या मंदीराबाबात सहमत. कौलारू मंदीर अजूनही आठवतय. मी १९८९ मध्ये गेले होते शाळेत असताना.
मात्र तिथला समुद्रकिनारा अजूनही बर्यपैकी स्वच्छ ठेवलाय हे नशीब.
ज्या प्रमाणात तिथे मोटरबोटी चालवतायत आणि इतर प्रकार चालतायत, त्यावरुन तरी असं वाटत नाहीये कि तो समुद्रकिनारा फार दिवस स्वच्छ राहील.
प्रत्येक सौदर्याला एक अभिशाप असतो म्हणतात. तसा या भारतभूच्या सौदर्याला गर्दी, अफाट लोकसंख्येचा अभिशाप लाभला आहे. देवळे त्या शापाची प्रथम बळी ठरली आहेत.
प्रतिसादातलं मॅटर कसं काय गायबलं ?
'भारतातल्या निसर्गसौंदर्याला अन धार्मिक स्थळांच्या सौष्ठवाला लाभलेला गर्दी अन बेसुमार लोकसंख्या हा एक शाप आहे.'
लेख अन प्रतिसाद दोन्ही आवडले.
केदारनाथला झाले, ते अत्यंत दुर्दैवी खरे, पण जणु निसर्गाने सर्व साफसफाई करून मंदिर तेवढे राखले आहे.
आता मोदींनी (गुजरात सरकार तर्फे) केदारनाथ परिसर आधुनिक स्वरूपात विकसित करण्याची तयारी दर्शवली आहे, देशातील कळकळीचे निसर्गप्रेमी, वास्तुविद, कलावंत, पुरातत्व विभाग इ. सर्वांनी पुढाकार घेऊन यासाठी योजना आखावी. मुख्य म्हणजे मंदिराचे आसपास अजिबात हॉटेले, धर्मशाळा, घुमट्या, ठेले, विक्रेते वगैरे नसावेत.
मोदींनी (गुजरात सरकार तर्फे) केदारनाथ परिसर आधुनिक स्वरूपात विकसित करण्याची तयारी दर्शवली आहेपण इटालियन हडळीचे गुलाम आता मोदींवरच आग ओकतायत. "शिखांची बदनामी" हवेतल्या हवेत फिरून काहीही भावना न व्यक्त करता परत आली. "पप्पू" हवापालटासाठी बाहेर देशी गेलाय म्हणे. दिग्गी राजा, मनीषबाबू ("किशन बाबूराव हजारे" फेम) बरळतायत. बाकी ही हिंदूंची देवस्थाने असल्याने इतक्या ढिसाळ्पणे आपत्कालीन यंत्रणा वागली असावी काय?
+१
तिमा, खरं आहे तुम्ही म्हणता आहात ते. चांगला लेख.
कुठल्याच मंदिराच्या आसपास अजिबात हॉटेले, धर्मशाळा, घुमट्या, ठेले, विक्रेते वगैरे नसावेत. चारी बाजूला फक्त निसर्गरम्य देखावा अथवा समुद्र, नदी (पूर न येणारी) वगैरे असावे. तेथून जवळच्या विमानतळावर अथवा रेल्वे स्टेशनला जायला सोलरपॉवर्ड बसगाड्या असाव्यात. थ्री अथवा फाईव्ह्स्टार कॉटेज हाटीलातून सगळ्या प्रकारचे खाणेपिणे आटपले की जरा निवांत होता यावे. दर्शनाची वेळ ऑनलाईन बुक करता यावी. तोपर्यंत मंदिरातल्या काचेसार्ख्या स्वच्छ फरशीवर ठेवलेल्या सोफ्यावर बसून टीव्ही बघता यावा. बडवे पुजार्यांएवजी त्या त्या वेळी कार्ड स्वाईप केले की गाभार्याचा दरवाजा उघडावा आणि देवाने आपल्याला कृतकृत्य करावे.
क्या बात!! क्या बात!!! इन्शाल्लाह आप की हर ख्वाहिश पूरी हो. आमीन!!!!
बॅट्या ह्या आमच्या ख्वाइशा नाहीत. आम्ही अजून गर्दीत आईराजा उदे उदे वालेच आहोत. शर्टावर कुंकवाचे हात ऊमटवून, कपाळभर मळवट भरणारेच आम्ही, रेलिंगच्या चक्रव्यूहात भोप्या सांगेल तेच करणारे आम्ही. ओवरीत जागरण गोंधळाला बसणारे पण आन चिकचिकीत फरशीवर दंडवत घालणार्याचे पायाला हात लावून कपाळावर टेकवणारे पण आम्हीच.
एकांत अन शांतता पायजे असेल तर आम्ही बोरी धरणावर जाऊन बसतो. तिकडे मुंबई पुण्याचे लोकं येत नाहीत ;)
हीहीही ;)
लेख आवडला आणि पटला.राहीच्या प्रतिसादाला +१०००००००
तिमा लेखन आवडले. आणि राहीचा प्रतिसादही नंबर एक.
-दिलीप बिरुटे
प्रतिसादही उत्तम! अगदी अभ्याचा तिरकस प्रतिसाद सुद्धा तसा बरोबर आहे. पण या सगळ्याला काय उपाय आहे? अफाट लोकसंख्या आहे आणि लोकांच्या हातातला पैसा वाढतो आहे. कुठेही जाणे सोपे होत आहे. त्या सगळ्यावर उपाय म्हणजे व्यवस्थित नियोजन व्हायला हवे. मंदिरांची मॅनेजमेंट तशी व्हायला हवी.
तीर्थक्षेत्रांच्या इथल्या घाणीबद्दल काय बोलावे? आम्ही मथुरेला गेलो, तिथे श्रीकृष्णाचे मंदिर दुपारची वेळ म्हणून बंद होते. देवळाबाहेर रस्त्यावर गटारे, डुकरे आणि माश्या बघून मुलांनी "इथून ताबडतोब जाऊया" चा धोशा लावला. इतका की कृष्णाचे दर्शन न घेताच पळ काढला.
गणपतीपुळ्याचे देऊळ जुने घरासारखे कौलारू होते तेव्हा भरतीचे पाणी देवळात यायचे आणि पौर्णिमेला तर देवापर्यंत पोचायचे. देवाला समुद्राच्या पाण्याचा अभिषेक व्हायचा. त्या देवळाची बांधणी मुद्दाम तशी केली होती. आता हे देऊळ असे का आणि कोणी बांधायचा निर्णय घेतला देवजाणे.
देवळाच्या प्रांगणात सिमेंटचे ब्लॉक्स घातले आहेत. त्यामुळे पायाला अक्षरशः चटके बसतात. जयगड कर्हाटेश्वराच्या अगदी एका बाजूला असलेल्या देवळातही देवळापर्यंतचा छोटा रस्ता जिंदालने सिमेंटचा केला आहे. चपला मुख्य रस्त्यावर काढून देवळापर्यंत पायर्या उतरायच्या म्हणजे दिव्यच आहे. तिथे पाय भाजून माझा छोटा भाचा रडायला लागला. अशा वेळी नको ते देवदर्शन असे वाटायला लागते.
नवीन काहीतरी करताना पर्यावरणाशी पूर्ण विसंगत असे काहीतरी करून ठेवतात. ना धड आधुनिक ना जुने असे काहीतरी विचित्र सगळीकडेच होऊन बसते. पण कोणाला त्याचे काय पडले आहे? कुठूनही पैसे गोळा करायचे आणि खर्च करायचे एवढेच! खरा देव असलाच तर असले सगळे प्रकार पाहून तिथून पळ काढत असेल!
वर्षातून एकदा उत्सव टाळून, देवाचा वार टाळून आडवारी कुलदैवताचं दर्शन घेणं नि त्यानंतर शक्यतो यात्रेवेळी नाहीतर असंच आडवारी गावदेवीचं दर्शन. शांत दर्शन होतं, फिरण्याची मजा येते.
पंढरीमध्ये पांडुरंग, पुंडलिक नि चंद्रभागा सोडले तर काय खरं?
पूर्वीच्या समाजरचनेतून आलेल्या परंपरांमध्ये नि आजच्या इन्स्टंट मनीच्या, आर्थिक सुगीच्या मानसिकतेत बदल झाला तर नि तरच सुधारणेला वाव आहे.
देवस्थानं सोडाच भाविक मूर्खच आहेत ह्या गृहीतकानुसार ते जातच राहणार, पर्यटन स्थळांची काय अवस्था आहे? ती कोण करतं? कासच्या पठारावर, महाबळेश्वरला, काय घाण कमी आहे? नको नको होतं.
बाकी असं काही झालं की शक्यतो हिंदू देव, देवस्थानं, तीर्थक्षेत्रं ह्यांना झोडपायला आम्ही पुढे असतो ह्याबद्दल दुमत नसावं. सगळ्यात सोप्पं असतं ते! इतरत्र कुठंच काही होतच नसावं.
थेटरात माणसं जळून मरतात, पिऊन उलथतात, धबधब्यांमध्ये वाहून जातात.
आषाढीनंतर आठेक दिवसांनी पंढरपुरला गेलो होतो माय गॉड पंढरपुरात मरण यायचंच बाकी होतं.
(भक्तच एवढे येतात तिथे व्यवस्था तरी किती पुरणार म्हणा)
-दिलीप बिरुटे
बाकी असं काही झालं की शक्यतो हिंदू देव, देवस्थानं, तीर्थक्षेत्रं ह्यांना झोडपायला आम्ही पुढे असतो ह्याबद्दल दुमत नसावं. सगळ्यात सोप्पं असतं ते! इतरत्र कुठंच काही होतच नसावं.बाकी सहमत, पण जे आहे ते आहेच!! अन्य धाग्यांवर पर्यटनस्थळांबद्दलही लिहिलेले पाहिले आहे. त्यामुळे फक्त देवस्थानांना झोडपतात असे म्हण्णे चूक वाटते. अन तसेही, स्वच्छतेमध्ये देवळे बर्याचदा मार खातात हे पाहिलेच आहे. त्यामुळे त्याबद्दल झोडपले तर काही वाटू नये. अन्य कुठे कुणाला अनुभव असेल, तर तोही अवश्य लिहावा. सगळे सोडून फक्त देवस्थानांना विनाकारण झोडपल्या जाते असा सूर दिसला, तो खटकला म्हणून हा प्रतिसादप्रपंच.
हा धागा 'चार धाम यात्रेच्या निमित्ताने' असा आहे आणि त्यात धार्मिक स्थळांच्या यात्रेचा संदर्भ आहे म्हणून धार्मिक स्थळांबाबत लिहिले. पर्यटनस्थळांबाबत धागा असता तर तिथल्या गैरसोयींबाबतही लिहिले असतेच. आणि गैरसोय ती गैरसोयच. मग ती हिंदू धार्मिकस्थळांमधली का असेना. अति आणि अनिर्बंध पर्यटनामुळे (यात धार्मिक पर्यटनही आलेच) पर्यावरणाचा र्हास होतोय हा मुद्दा महत्त्वाचा.
ता. क. (बरेच अवांतर आहे, पण...) देवदर्शनाला जाताना मंदिराच्या प्रवेशद्वारापर्यंत पादत्राणे पायात ठेवण्याची मुभा असावी आणि आतल्या फरश्यांवरून चालताना ती एखाद्या पिशवीत घालून स्वतःसोबत ठेवायची परवानगी असावी असे मला वाटते. यामुळे स्वच्छताभंग होणार नाही. मात्र पावित्र्यभंगाच्या मुद्द्याला उत्तर शोधावे लागेल. प्लास्टिक किंवा फोम रबराच्या वा तत्सम चपला (पिशवीत बरोबर ठेवलेल्या) चालतील का?
देवस्थानांना झोडपायचा लेखाचा उद्देश्य वाटत नाही खरंच. पण संधी उपलब्ध आहे म्हणून पर्यावरणाला धाब्यावर बसवून माणूस जेह्वा फक्त स्वतःचा स्वार्थ साधू पाहतो आणि त्यातून जे नुकसान होते त्याकडे लक्ष वेधणारा लेख वाटला. एकूणच पर्यावरण व त्याचा र्हास ह्याबद्दल एकूणच आपले जनमानस उदासीन असते. मग ते हिमालय असो, महाराष्ट्रातले गड किल्ले असोत, कास, महाबळेश्वर आणि इतर ठिकाणे असोत... उदाहरणार्थ : रायगडावर येऊन जिथे तिथे कचरा टाकणारे, आणि कचरा टाकू नका सांगितले तर हुल्लडबाजी करणारे लोक कमी नाहीत. नीट पाहिलेत तर जिथे राणीवशाचे महाल आहेत, तिथल्या मुख्य दरवाजाच्या वर एक मोठा पत्थर आहे, तिथे दारुच्या बाटल्या लपवलेल्या पाहिल्या आहेत! ट्रेकला जाऊन तिथली शांतता भंग करणे हा तर कित्येकांचा हक्क आहे! जिथे देवाला भेटायला, दर्शनाला जायचे ती देवस्थाने पंचतारांकित सोयींनी युक्त असावीत अशी अपेक्षा नक्कीच नाही पण ती स्वच्छ आणि साफ सुथरी असावीत हे म्हणण्यात काय चूक आहे? ज्या देवावर श्रद्धा आहे, त्या देवाला घाणीत, बजबजपुरीत कसे ठेववते? ते योग्य तरी कसे वाटते? आपल्या देवतांची आपण अवहेलना करतो असे नाही का वाटत?
सगळ्यांसाठी
;) माझे प्रतिसाद नीट वाचत जा. त्याशिवाय आपले प्रतिसाद देत जाऊ नका. ;)
देवस्थानांना झोडपण्याबद्दल बोलण्याआधीचं वाक्य वाचायचं का? परंपरा बदलण्या नि इन्स्टंट मनी बद्दल?
ह्या मध्ये इन्स्टंट नि इझी पैसे मिळवण्याची मानसिकता हे वरच्या सगळ्या गोंधळाचं, दयनीय अवस्थेचं नि घाणीचं कारण आहे. माझ्यासकट सगळेजण ह्यासाठी कारणीभूत आहेत हे सगळ्यांनी स्वतःशी कबूल केलं पाहिजे. प्रत्येक यात्रेच्या (पर्यटनस्थळं, देवस्थानं, स्मृतीस्थळं ऑल इन्क्लुझिव्ह) ठिकाणी येणार्या प्रत्येकासाठी च्या जेवण्या खाण्याच्या राहण्याच्या व्यवस्थे साठी आवश्यक परवानग्या योग्य त्या प्रकारे मिळवणं इथपासून शेवटच्या 'वेस्ट मॅनेजमेंट' पर्यंतचा प्रकार अर्थकारणामध्ये अतिशय वाईट प्रकारे हातळला जाताना आज दिसतो.
म्हणून माझं म्हणणं एवढंच की फक्त देवस्थानंच येऊ नयेत टिका सगळ्यांवरच व्हावी नि ती सकारात्मक परिणामात परिवर्तीत व्हावी.
दुर्दैवानं ह्यात देवस्थानांचा नंबर फार वरचा आहे. प्रत्येक देवस्थानांच्या विश्वस्त समितीच्या नावांच्या यादीकडं पाहिल्यावर हे लक्षात येतं.
अर्थात ती तशी येतात कारण भक्तीच्या, धाकाच्या, अकारण अस्थायी सहिष्णूतेच्या नावाखाली हे सगळं जाणूनबुजून खपवलं जातं. धर्मसंस्था भ्रष्ट झालेली आहे हे त्याचं मूळ कारण.
(थोडा स्वतःशीच वादः कालच्याच बातमीत एकनाथ महाराजांच्या वंशजांचा वाद वाचला. :( ज्यांनी आदर्श ठेवायचे तेच असं करतात तेव्हा निमूटपणं गप्प बसणंच इष्ट ठरावं का काय असा प्रश्न निर्माण होतो पण तरी काही आदर्श ठाऊक असल्यानं विश्वास नि श्रध्दा दोन्ही टिकून आहेत. असो! )
बाकीशी सहमत आहेच.
तुमचा प्रतिसाद नीट वाचून देआदुआ हे समजले.
अति आणि अनिर्बंध पर्यटनामुळे (यात धार्मिक पर्यटनही आलेच) पर्यावरणाचा र्हास होतोय हा मुद्दा महत्त्वाचा.सहमत. नुसते पर्यावरणच नव्हे तर माणसे (बघा जरा देवाला जाणार्या क्वालीस अन टवेरा इनोव्हाचे अपघात) आणि माणुसकी (मंदिरातला पैसा, झुंडशाही अन राजकारण) याचा पण र्हास होतोय. पण उपाय काय? पर्त्येक जण हेच म्हणणार. आमचे पैसे आमच्या भावना. तवा कसंय? त्यामुळे राहीतै, पैसातै ह्यांचे म्हणणे कीतीही पटले तरी हे अरण्यरुदनच.
मी प्रत्यक्ष अनुभवलेले नाही मात्र पंढरीच्या वारीतही विलोभनीय निसर्ग अनुभवायला मिळतो असे म्हणतात.
अमोल केळकर
पंढरीच्या वारीतही विलोभनीय निसर्ग अनुभवायला मिळतो
(वारीबाबत जितके वाचले आहे आणि संदेश भंडारेंनी काढलेले फोटो पाहिले आहेत त्यावरून) सहमत.
अवांतर -
वारीचा मुक्काम एका गावातून पुढच्या गावामध्ये हलल्यानंतर वारी मुक्कामी असलेल्या गावामधील गावकर्यांचे अनुभव, त्या गावाची 'वारी गावामध्ये येण्यापूर्वीची व नंतरची परिस्थिती' त्या त्या गावातील गावकर्यांचे अनुभव, मनोगते वगैरे बाबींवर कोणी अभ्यास केला आहे का..? असल्यास ते सर्व वाचायला आवडेल. कृपया स्त्रोत कळवावा.स्वतःला आभ्यास करायला नको हल्ली कुणाला. घरी बसून फोटु बघतायत! ;)
लेख आवडला आणि पटला.
हल्लीचा अजुन एक प्रकार म्हणजे बर्याच देवळांमध्ये असणारे जिर्णोद्धार चालू आहे, देवाला सोन्याचा / चांदीचा मुखवटा, चांदीची पालखी, सोन्याचा कळस वगैरे वगैरे करायचे आहे..सढळ हातांनी मदत करावी असे दिसणारे फलक.
आणि शेवटी जिर्णोद्धाराच्या नावखाली काहीतरी बकालपणा आणणारे करायचे. (काही अपवाद वगळता)
असो
या सार्याला गजानन महाराज , शेगांव अपवाद आहे... पुन्हा पुन्हा जावेसे वाटते..
म्हणजे देवश्तान ने ठरवले तर उत्तम काम करता येते!!! प्रश्न इच्छाशक्तिचा आहे.
आशा करु या की , ज्याप्रमाणे राजकारणात विकासाचा मुद्दा महत्वाचा ठरु पाहतोय , त्याप्रमाणे स्वच्छ देवस्थानेच केवळ पुढे जाउन मान्यता पावतील.
आप्ल्या या मता बद्दल पूर्ण पणे सहमत आहे.
असाच एक जुना लेख...
विठ्ठलाचा बाजार
एक दुवा :--- विठ्ठल दर्शनासाठी नेटवरुन आरक्षणाची सोय
जाता जाता :- हल्ली अधुन मधुन जशी मला सवड मिळाली की मी अॅक्टिव्ह दर्शन घेतो... साई बाबां पासुन सोमनाथ !
यासाठी या मंत्राचे पठण करतो :--- इसको लगा डाला तो लाईफ झिंगालाला. ;)
(डायरेक्ट दर्शन घेणारा) ;)
मी तीन वर्षापूर्ची मुन्नारला गेतो असताना साईट सीईंग करताना एक विचित्र प्रकार पहावयास मिळाला. अनेक जागी नव्यानी बांधलेली हॉटेल्स पाडीत होते . ड्रायव्हरकडे चौकशी करता कळले ती सगळी मंजूरी न घेताच बांधलेली होती. आमची आदर्श बिल्डींग कोण पाडणार ?
आमच्या पिताश्रींचे सगळे दोस्तलोक या यात्रेस जाऊन आलेत म्हणून यावेळी यांना जायचं होतं. आम्ही मुलांनी गेल्या तीनेक महिन्यांपासून त्यांच्याशी वाद घालून बेत हाणून पाडला होता. त्याचे चीज झाले असे वाटते. बाबांना एरवी गप्पा मारायचा मूड असला म्हणजे अठवड्यात एखाद दुसर्यावेळी फोनवतात पण आता "बघा, मी म्हटलं नव्हतं!" असं म्हणीन याची खात्री असल्यानं त्यांनी एकदाही फोन केला नाहीये. आता मीच करते. ;)
हे इतके वाईट होईल अशी अर्थातच आम्हाला कल्पना नव्हती पण हार्टपेशंट वडीलांना आणि दमेकरी आईला तिथे पाठवायचा धीर होत नव्हता. आमचे एक नातेवाईक जोडपे त्यांच्या मित्रमंडळीसोबत पंधरा वीस जण गेले असताना पस्तीशीतल्या नातेवाईक बाईंना दम्याचा अॅटॅक येऊन त्या दगावल्या. वैद्यकीय मदत वेळेत मिळाली नाही. ही गोष्ट निदान दहा वर्षापूर्वीची आहे. तेंव्हापासून मी धसका घेतलाय या ठिकाणांचा. आठेक महिन्यांपूर्वी बाबांचे मित्र तिकडे जायला निघाले. त्यांच्या पत्नी नवर्याला एकटे जाऊ देईनात. स्वत: दमेकरी असून बाईही सोबत गेल्या त्या परत आल्याच नाहीत. आता ते मित्र हा प्रसंग मनाला लावून घेत घरात एकटे बसतात म्हणून सुनेचा फोन आला होता. आता तर मी माझ्या आईवडीलांना जाऊ द्यायची नाही अजिबात. बाकी काहीही असो. हा प्रतिसाद लिहायचाही धीर होत नव्हता खरंतर!
सत्य आहे.
लेख आणि राही यांचा प्रतिसाद आवडला.
अजून एक गोष्ट म्हणजे मंदिरात, आवारात असलेले बंदूकवाले.... देवासमोर नमस्कार करायला अर्धा सेकंद पण थांबू देत नाहीत. गुरांना हाकलावे तसेच माणसांना पण हाकलतात आणि आपण पण त्यांच्या बंदुकीकडे बघून गपगुमानपणे निघावे.
-सूर्यपुत्र.
अवेळ