श्रावण बाळ
तो बसला होता …. हताश …. भिंतीला पाठ लावून ….
मांड्यांच्या बेचकीत डोकं आणि डोक्यावर स्वतःच्याच हातांचा आधार ….
त्याचे अर्धोन्मीलित डोळे आणि पापण्यांच्या ओल्या कडा ….
पाठीवर पडलेल्या मायेच्या प्रत्येक स्पर्शागणिक निघालेला हुंदका ….
सांत्वनाचे शब्द ऐकत फुटलेले आसवांचे बांध ….
एकाच रेषेत घरंगळत विसावणारे अश्रू ….
जमिनीवर पडून हळूहळू नाहीसे होत होते ….
पण दुःख असं हवेत विरतं का?
ओठ विलग झाले तर क्वचितच निघणारे अस्फुट शब्द ….
अर्थहीन …..
त्याला तर सगळंच निरर्थक …
येणाऱ्या जाणाऱ्यांच्या अगम्य शब्दां सारखे…
बनियान ला पडलेली भोकं मोजत थकलेलं शरीर ….
अन् नियतीच्या आघातांनी खचलेलं मन….
पण या धक्क्याने सगळंच खचलं … घरातलं वार्धक्य आणि तारुण्य ….
कोपऱ्यात बसलेल्या मुलासाठी सगळंच थोपवून धरलेलं ….
राग, शोक, दुःख यांच्या आहुत्या दिल्या त्या सरणावर ….
पण चेहेऱ्यावरचे भाव मात्र राहिले तसेच ….
कायमचा व्रण असल्या सारखे ….
रिकाम्या घरात रमलेला भूतकाळ ….
मिणमिणत्या पणतीच्या अंधारात बुडालेलं वर्तमान ….
आणि कोपऱ्यात मान खाली घालून बसलेलं भविष्य ….
“ती” त्याचं विश्व ….
“तो” तिचा श्रावण बाळ ….
इतके वर्ष श्रावण बाळाची कावड त्याने प्रेमाने सांभाळली ….
आज मात्र एक पारडं रिक्त झालं ….
तो बसला आहे …. हताश …. भिंतीला पाठ लावून ….
वाचने
2264
वाचनखूण
प्रतिक्रिया
6
आनंद?
डोळ्यासमोर आलं सारं!!
छान लिहिलंत
.......!!
ओह
भिडलं.. अगदी आतपर्यंत..