Skip to main content

ती गेली तेव्हा...

लेखक पद्मश्री चित्रे यांनी सोमवार, 20/05/2013 01:30 या दिवशी प्रकाशित केले.
आई जाऊन एक वर्ष झालं.जखमेवरची खपली निघावी तसं काहीसं वाटत होतं सतत. तसं पाहिलं तर अखेरचे काही महिने तिचं अस्तित्व फक्त "असणं" इतकाच होतं. डोळे ,कान केव्हाच काम करायचे थांबले होते. आणि स्मरणशक्ती- तिने ही काढता पाय घेतला होता. या सार्‍यात ती तिच्या मनातले काहीच सांगू शकली नाही. कधी कधी वाटतं, कसं वाटलं असेल हळु हळु असं अंधार गुहेत जाताना? आठवणीची एक एक पाकळी मिटताना? या जगापासून दूर खेचलं जात असताना तिच्या मनाने, शरिराने किती आकांत केला असेल! वाईट वाटतं की किती प्रयत्न केला तरी आम्ही तिच्यापर्यंत पोहचतच नव्हतो. मधे एक अदृश्य पोलादी पडदा असावा तसं होतं. डोळ्यादेखत ती दूर जात होती आणि आम्ही पुन्हा पुन्हा हाका देण्याशिवाय काही करू शकत नव्हतो. मुठीतुन निसटणारे वाळूचे कण पकडण्यासाठी एक वेडी लढाई चालू होती.. एका वेड्या आशेवर की पुन्हा आठवणी जाग्या होतील.. आई आम्हाला ओळखेल..बोलेल.. पण पाटी पुसावी तशा एक एक गोष्टी पुसट होत जात होत्या. रीवाईंड व्हाव्या तशा. आधी जुजबी ओळखी विसरत गेल्या.. मग नातेवाईक.. मग आम्ही.. शेवटी तर तिचं बालपण आठवत असाव. असं वाटत होतं तिच्या तुटक बोलण्यावरून. पण तरी कधीच ना त्रागा ना कुणाला त्रास. माणसाचा स्वभाव इतका ही बदलत नाही? ना बोलता शांतपणे ती या काळोखाच्या सोबतीत ही सहजतेने जात राहीली. तिच्यासाठी आम्ही सारे होतो पण बिन नावाचे, बिन चेहरयाचे .. सगळे सारखेच. .आपल्या माणसापर्यंत आपण पोहचूच शकत नाही ही जाणीव खूप वेदना दायक असते हे तेव्हा जाणवलं. ती जर जन्मदाती आई असेल तर आपली हतबलता , व्यरथ ठरणारा आटापिटा काळ्जाला घरं पाडीत जातो. या मॅदर्स डे ला वर्तमान पत्र, ईतरांचे संदेश वाचून खूप जाणवलं की आता माझी आई या जगात नाही. आज मी देखील एक आई आहे पण तरीही हे माझं पॉरकेपण जाणवत रहातं. काहीही न बोलता , शांतपणे देवघरातल्या समई सारखी तेवत राहणारी आई नक्कीच कुठून तरी माझ्याकडे, आम्हा सर्वांकडे त्याच मायेने बघत असेल नाही का?
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 4030
प्रतिक्रिया 18

प्रतिक्रिया

तुम्ही आठवणी जागवल्या. माझी आई, माझ्या (आणि भावंडांच्या) नशिबाने शेवटच्या आठवड्यापर्यंत सगळ्यांना ओळखत होती, बोलत होती. तिच्या सर्व जाणीवा जाग्या होत्या. शेवटच्या आठवड्यात क्वचित वर्तमानात यायची, भावाला, बहिणीला ओळखायची बोलायची (मलाही ओळखत असावी असा माझा अंदाज) आठवड्याभरात, दिवाळीच्या पहिल्या दिवशी आम्हा भावंडांच्या नजरेसमोर तिने डोळे मिटले, शेवटचा श्वास घेतला. आम्ही सर्वार्थाने पोरके झालो. तुम्हाला आईची येणारी आठवण, दु:खाचे कढ प्रामाणिक आहेत. आईचे संस्कार विसरू नका. त्या संस्कारांची जन्मभराची साथ म्हणजेच प्रत्यक्ष आईची साथ.

देणार्‍याने देत जावे घेणार्‍याने घेत जावे घेता घेता घेणार्‍याने देणार्‍याचे हात घ्यावे फुलवा देणार्‍याचे हात घ्यावे.

आई वडिलांचं जाणं हेच ख-या धाग्यांचं तुटणं असतं, नाळ तिथंच जोडलेली असते म्हणुन. कधी कधी वाटतं ही नाती नकळत्या वयातच संपतात तेच बरं असतं. असहायता आणि दु:ख हे एकत्र सहन करायची ताकद प्रत्येकाला मिळतेच असं नाही.

मनाला भिडणारे आहे.. अंतर्मुख करणारे लेखन. तुम्ही म्हणता तसे खरचं मलाही वाट्तं आई कुठूनतरी लक्ष ठेऊन आहे. एरवी नास्तिक, बुध्दीप्रमाण्यावर विश्वास ठेवतांना हा मात्र हळवा कोपरा बुध्दी पेक्षा भावना प्रबळ असल्याचे दाखऊन देतो.

In reply to by लाल टोपी

असेच म्हणते. नक्कीच आई लक्ष ठेवुन असणार. आपल्या आईच्या आठवणी मुलांना सांगत रहा, किंवा तिच्या काही सवयी असतील तर तुम्ही लावुन घेऊ शकता, पोरकेपणा काही अंशाने कमी होण्यास मदत होईल ही आशा.

अंगणात गमले मजला संपले बालपण माझे... खिडकीवर धुरकट तेव्हा, कंदील एकटा होता.

In reply to by पैसा

..... +१

धन्यवाद तुम्हा सर्वांचे. खूप दिवसांनी लिहिलं , मन मोकळं केलं. बरं वाटलं. तुमच्या सह-अनुभूती साठी, प्रतिसादासाठी आभार