Skip to main content

घुसमट

रविवार, 19/05/2013 या दिवशी प्रकाशित केले.
कॊम्प्युटरच्या पडदयाआड चेहरा लपवून मी तुझ्या खुर्चीकडे मोजून सोळाव्या वेळी बघतो. खुर्ची अजूनही रिकामीच आहे. आज गुरुवार. गुरुवारी सकाळी तू मोहक नवीन केशभुषेत येत असतेस! आज जरा जास्तीच वाट बघायला लावते आहेस. तुझे आकर्षक रेशमी केस प्रत्येक गुरुवारी त्यांनी धारण केलेली जानलेवा रुपे! त्यांचे नवनवीन रंग. कधी हलका सोनेरी कधी पिंगट तपकिरी, कधी मधूनच एखादी चुकार बंडखोर रंगाची बट रेखलेली कधी भुरभुरणारे कोरडे, मोकळे सोडलेले कधी वेट लुक मधाळ, नजर चिकटवून ठेवणारे तुझ्या प्रत्येक नवीन रुपाने पुन्हापुन्हा खल्लास होणारे ऒफ़िसमधले माझ्यासारखे अनेक जीव, त्यांच्याकडे तू दुर्लक्षच करतेस. पण तरीही आशेने त्यातील अनेक घोटाळतात तुझ्या आजुबाजुला. तुझी मादक नजर एकदा तरी त्यांच्या डोळ्यात भिडावी यासाठी. तुझ्या ओठाटून निसटणारी एखादी तरी स्मितकळी त्यांच्या ओंजळीत पडावी म्हणून. ते भाग्य सहसा कोणालाच लाभत नसते. तरीही आशाळभूत जीव तुझ्या आजुबाजुला काहीना काही कामानिमित्याने घोटाळीत संधी शोधत असतातच! मला मात्र कधीच ही धिटाई जमली नाहीयं. तसेही ह्या ऒफ़िसमधे नविनच आल्यामुळे अजून भीडही चेपली नाही. मिळेल, कधीतरी ह्या सुंदरकुंतलिनीच्या जवळ जाण्याची संधी! तोवर कॊम्प्युटरच्या पडद्याआडून तिच्या रेशमी बटा वा-यावर लहरतांना पाहून मीही वाहवा म्हणत डोलत असतो. आज अजूनही तू आलेली नाहीस. तुझे रिकामे टेबल पाहून जीव चोळामोळा होऊन पडला आहे. इतक्यात एक कल्पना व्याकूळ मनाला लिफ़्ट करून जाते. लिफ़्ट! खाली जाऊन तिची वाट पहावी! कदाचित तिच्या सोबत एकाच लिफ़्ट मधे वर येण्याची संधी! हम तुम एक लिफ़्ट मे बंद हो.....! और..... आणखी वाट पाहिली तर तू आलेलीही असशील. मी तडकाफ़डकी उठून खालच्या मजल्यावर जातो. लिफ़्टच्या थोडे दूर जाऊन बोर्डावरच्या नोटीस वाचीत उभा रहातो. इतक्यात दारात तू उभी दिसतेस. आज सोनेरी कुरळे केस मिरवीत आलेली आहेस. एक एक सोनेरी लडी दिमाखात नागमोडी विस्तारलेली. लिफ़्टपाशी आणखी काही लोक उभे आहेत. तू आणि मी एकाच वेळी लिफ़्ट पर्यंत पोहोचतो. तू माझ्याकडे एक नजर टाकतेस. त्या नजरेच्या तीराने मी विव्हळ. तेवढ्यात बाकीचे लोक आत गेलेले. मी आणि माझ्या मागे तू भरलेल्या लिफ़्टमधे प्रवेश करतो. उरलेल्या जागेत मी आणि माझ्यापुढे तू लिफ़्ट आपल्याला सामावून घेते. तुझ्या इतक्या निकट यायला मिळाले म्हणून मी हवेत तरंगतोय! अडचणीत उभे रहावे लागले म्हणून तू मात्र हलकेच मान फ़िरवून नाराजीचा एक कटाक्ष माझ्याकडे टाकतेस. तो किंचित त्रासलेला दृष्टीक्षेप देखील सुखावून जातो. सोनेरी कुरळ्या लडी आता अगदी इवल्याशा अंतरावरून मला गुदगुल्या करीत आहेत. लिफ़्टमधला पंखा जाणवायला लागला आहे. वरून येणारी गार हवा लागताच कोंबलेले जीव जरा हुश्श होऊन हालचाल करतात. वा-याचा हलका झोत जेव्हा तुझ्या बटांना गोंजारतो, तेव्हा एक विचित्र घुसमटून टाकणारा ऎसिडीक रासानयिक दर्प सगळीकडे पसरतो. तुझ्या शिरावरचा सोनेरी कुरळ्या नागीणींचा जथ्था अंगाला लागले्ले कुठलेसे विषारी लिंपण लिफ़्टमधल्या लोकांमधे उधळून त्यांना गुदमरवून टाकीत आहे अगदी कालपर्यंत..... जेव्हा तुझ्या बटांना... जवळीक साधायला आसुसलेला, आज दूर पळायला बघतोय मी नेहमी दुरून तडफ़डणारा....केशाने इथे मात्र जवळून तडफ़डतोय......विषाने घुसमटच आमच्या लेखी! तशीही, आणि अशीही!
लेखनविषय:

वाचने 2398
प्रतिक्रिया 6

प्रतिक्रिया

क्लायमॅक्सला एकदम चेंज ऑफ पेस पडल्यासारखा वाटला.

शेवटचा ट्विस्ट आवडला!

खिक्क! मस्तच. तिचा डिओस्प्रे ;) चा चॉईस हुकला. मला आधी शिंका येतात नि मग बाई/ माणूस दिसतं असलं काही असलं की. :)

सपनोंके मंजर ..... मला तर बाबा सुरवातीच सगळ आवडल. उगा स्वप्नाला स्पर्शायला जाउ नये.