Skip to main content

अननसाचा मुरांबा

लेखक अनन्न्या यांनी सोमवार, 29/04/2013 15:27 या दिवशी प्रकाशित केले.
चार दिवसापूर्वीच माहेरी जाणं झालं, आणि तिकडे सुंदर अननस मिळाले. अननस पाहिल्यावर आठवलं, खूप दिवसात मुरांबा केलाच नाही! Ananas साहित्य: थोडा कमी तयार अननस, साखर, लवंग, वेलची दाणे. कॄती: अननसाचे साल आणि मधला कडक भाग काढून आपल्या आवडीप्रमाणे फोडी करून घ्याव्या. अननसाच्या फोडी कुकरला एक शिटी करून वाफवून घ्याव्या. जेवढ्या फोडी असतील तेवढीच साखर घ्यावी. साखर बुडेल इतके पाणी घालून पाक करण्यास ठेवावा. वाफवलेल्या फोडीना सुट्लेले पाणी पाक करताना त्यात घालावे. पाकाचा थेंब डीशमध्ये टाकून पहावा. ओघळ आला नाही, म्हणजे त्यात वाफवलेल्या अननसाच्या फोडी , लवंग, वेलची दाणे घालून परत मिश्रण आट्वावे. आता आधीप्रमाणेच डीशमध्ये थेंब टाकून पहावा. गार झाल्यावर काचेच्या बरणीत भरून ठेवावा. काचेच्या बरणीत ठेवल्यामुळे मुरांबा चांगला टिकतो, आणि रोज समोर दिसतो सुध्दा!Ananas

वाचने 8881
प्रतिक्रिया 33

प्रतिक्रिया

तोंपासू :)

आम्ही हा मुरांबा करताना अननस वाफवत नाही, अननसाचे तुकडे साखरेत तास दोन तास मुरत ठेवतो आणि मग त्याला पाणी सुटलं सरळ कढवायला घेतो. हापूस आंब्याचा अशाच प्रकारे मुरांबा करता येतो.

मस्तच, शिजवून घेणे हा शॉर्ट्कट असावा, त्यामुळे मुरांबा लवकर मुरत असावा. लोणची मुरांबे हे पदार्थ पारंपारीक पद्धतीने मुरल्यावर त्यांची लज्जत खुलते, असं माझं वैयक्तिक मत आहे. बाकी लहान असताना या मुरांब्यांनी नाकी नऊ आणले होते. डब्यात काही देण्यारासखं नसलं की मग आई चपात्यांच्या घडीत मुरांबा घालुन देत असे. त्याच्या रसामुळे चपात्या एकदम लीबलीबीत होऊन जात. शिवाय तो रस डब्याच्या बाहेर येउन आमचा गृहपाठ पण तपासत बसायचा. ;)

आवडला........ कधी केला नाही कि खाल्लासुद्धा नाही.पण नक्की करुन बघणार.

दिसतोय छानच पण अननसाचा मुर(आंबा) कसा ? मुरननस म्हणायला हवं ! :-)

छान झालाय. फोटू आवडला. कुकरला अननस शिजवून घेण्याची पद्धत आवडली. मी आधी अननसाच्या फोडी व निघणारे ज्यूस यामध्ये लागल्यास अर्धीवाटी पाणी घालून पातेल्यात शिजवून घेत असे. मग पाकात घालणे वगैरे. यापुढे तुमच्या पद्धतीने करून पाहीन.

In reply to by जेनी...

फोटोबद्द्द्ल विचारू नको, मला त्यातले काहीच समजत नाही. माझ्या मोबाइलला हा असा बय्रापैकी येतो फोटो! मला कॅमेय्राचे सेटींग काही समजत नाही. आता शिकते आहे, शेवटी मिपावर फोटो पोस्ट करायचे म्हणजे सगळा अभ्यास पाहिजेच!

पण फोडी सुरवातीपासून साखरेबरोबर शिजवल्या तर त्या थोड्या कडक होतात, आणि मी त्या पध्दतीने केला की साखर पडते बय्राचदा! अर्थात मला त्याचे टायमिंग बरोबर कळत नसेल. माझी आई साखर मिसळूनच शिजवते, सूडनी सांगितलेल्या पध्द्तीने!

अनन्याने केलेला हा 'मुर-अनन्यास' नावाचा अन्याय आम्ही अन्योक्ति न करता आवडला असे अधिकृतपणे जाहीर करतो.

कॄतीचे अनुकरण करून मनसोक्त हादडून तॄप्त व्हा असे अधिकृतपणे जाहीर करते.

आता कुठे फोटोसह धागे पोस्ट करता यायला लागलेत. इथे विडंबन टाकायचे म्हणजे आपले विडंबन होणार नाही याची काळ्जी घेता आली पाहिजे.

अतिंम पदार्थ (मोरंबा) फारच आकर्षक दिसतो आहे. ह्यावर, पातळ केलेले, साजूक तुप घालून खाण्यास अधिक मजा येते.

कधी कधी पाहुणे येणार असतील तर, वाटीभर दही , त्यात खोबर कोथिंबीर , हिरवी मिरची , मीठ आणि ह्या अननसाच्या फोडी घालून रायते करता येते....अप्रतिम लागते!

घरात अननस होतेच. आज करून पाहिले. पहिल्यांदाच केले म्हणून अगदी थोड्या प्रमाणात केले. एकदम छान झाले आहे. खुप खुप धन्यवाद्.

मला नक्किच आवडेल हा मुरंबा .