✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

सबलीकरण

आ
आतिवास यांनी
Mon, 04/29/2013 - 09:52  ·  लेख
लेख
पुरुष माणसं मीटिंगमध्ये हजर असताना त्या खुर्चीत बसू शकत नाहीत, मी मात्र बसू शकते. मी महागडे कपडे वापरू शकते, त्या नाही वापरु शकत. मी चारचाकीने प्रवास करू शकते, त्या कधीच चारचाकीत बसलेल्या नाहीत. मी डिजीटल कॅमे-याने फोटो काढू शकते, त्यांनी कधीच फोटो काढलेला नाही. मी वेगवेगळ्या राज्यांत प्रवास करते, त्यांच्यापैकी अनेकींनी शेजारचा तालुकाही पाहिलेला नाही. माझ्याकडे मोबाईल फोन आहे, त्यांच्याकडे तो नाही. मी वाचू शकते,लिहू शकते – त्या शाळेत गेलेल्या नाहीत. मी माझ्या इच्छेने मला हवे तेव्हा आणि मला पाहिजे तितके पैसे खर्च करू शकते; त्यांना अशी चैन करता येत नाही. मी इंग्रजी बोलते, त्या बोलायचे तर लांबच, समजूही शकत नाहीत ती भाषा. माझ्या सोबत असलेल्या स्त्रियांचा दृष्टीने ‘तुम्ही किती हुशार आणि आम्ही किती अडाणी’ असा मुद्दा अधोरेखित करणारी ही यादी न संपणारी आहे. त्यांच्या दृष्टीने मी जणू कुठल्यातरी परग्रहावरून आले आहे. त्यांच्या आणि माझ्या जगण्यात साम्य तर नाहीच पण त्यांना कधी माझ्यासारखं जगता येईल ही शक्यताही त्यांना दिसत नाही. खरं तर या जाणीवेत, या भावनेत, या अभिव्यक्तीत एक संदेश पण आहे माझ्यासाठी. ‘तुम्ही जे काही बोलाल, ते आम्हाला लागू पडणार नाही’ असंच जणू त्या स्त्रिया मला सांगायचा प्रयत्न करताहेत. मी बरीचशी संदर्भहीन आहे त्या परिस्थितीत. मला त्या स्त्रियांची भावना समजते. पण सत्याला अनेक बाजू असतात आणि त्यांना केवळ सत्याची एक बाजू दिसते आहे असं मला वाटतं. कारण त्या सत्याची दुसरीही एक बाजू आहे – ती मला आत्ताच दिसते आहे असं नाही, तर अनुभवाने मला ती माहिती आहे. त्या बाजूची चर्चा झाल्याविना हा संवाद पूर्ण नाही होणार माझ्यासाठी. मी गुजरात राज्यात आहे. तापी जिल्ह्यातल्या छिन्दिया गावाच्या एका पाड्यात मी आहे. माझ्या सोबत पंधरा वीस कोटवालिया स्त्रिया आणि काही मुले-मुली आहेत. भारत सरकारने एकंदर ७५ आदिवासी समूहांना ‘आदिम जनजाती’ अशी मान्यता दिलेली आहे. या समुहांची जीवनशैली बरीच जुन्या पद्धतीची आहे आणि विकासाचा वारा त्यांच्यापर्यंत न पोचल्याने त्याच्या फायद्यांपासून ते वंचित आहेत. त्यांची शेतीची आणि उपजीविकेची साधनं आधुनिक झालेली नाहीत अद्याप. मीटिंगच्या आधी मी त्यांच्या वस्तीतून एक फेरफटका मारते आहे. त्यामुळे त्यांच्या आयुष्याचा प्राथमिक स्वरूपाचा अंदाज मला आला आहे. शिवाय इथं येण्यापूर्वी माझ्या सहका-यांनी मला या समूहाची, या गावाची माहिती पुरवली आहे. त्यामुळे समोर येत असलेल्या दृश्यात अनपेक्षित, धक्का बसावं असं काही नाही माझ्यासाठी. जे आहे ते काही फारसं सुखावह नाही, हे मात्र निश्चित. स्त्रियांच्या सोबत फेरफटका मारताना अनेक विषयांवर आमच्या गप्पा होत आहेत. त्यात मी वर उल्लेख केलेले अनेक मुद्दे येताहेत. इथं मला त्यांच्या जगण्याबद्दल जितकं कुतूहल आहे, तितकंच, किंबहुना थोडंसं जास्तच त्यांना माझ्या जगण्याबद्दल आहे. शिवाय मी एकटी आणि त्या वीस जणी – त्यामुळे एकापाठोपाठ मला प्रश्न विचारण्याची संधी त्यांना आहे. मला गुजराती भाषा चांगली समजते त्यामुळे त्या विनासंकोच प्रश्नांच्या फैरी माझ्यावर झाडत आहेत. मला गुजराती फार चांगलं बोलता येत नाही – बोलण्याच्या ओघात मी व्याकरणाच्या चुका करते आहेत. त्यामुळे खूष होऊन त्या स्त्रिया आणि लहान मुलं हसत आहेत. माझे प्रश्नही बहुधा विनोदी आहेत. पाड्यात भटकताना मला एक सायकल दिसते, तेव्हा ‘तुमच्यापैकी कुणाला येते सायकल?” या माझ्या प्रश्नावर सगळ्याजणी हसतात. कदाचित त्या प्रश्नातूनच ती वरची प्रश्नोत्तरी उगम पावली आहे. झाडाखाली एक पुरुष बसला आहे. तो माझा प्रश्न ऐकतो आणि त्या स्त्रियांना त्यांच्या (आदिवासी) भाषेत काहीतरी सांगतो, त्यावर एकच हशा उसळतो. “काय म्हणाले ते भाई?” मी विचारते. तर तो भाई म्हणालेला असतो की, “सांगा येते सायकल आम्हाला म्हणून. त्या बेनसमोर कशाला काही येत नाही म्हणता? तिला थोडचं खरं काय ते कळणार आहे?” पण त्या स्त्रिया खोटं सांगत नाहीत. कदाचित मी ‘दाखवा बरं चालवून’ असं म्हणेन याचा त्याना एव्हाना अंदाज आला असावा. पण तो माणूस हुशार आहे – अनोळखी लोकांसमोर आपली बलस्थानंच फक्त जाहीर करावीत – हे त्याचं धोरण तसं पहायला गेलं तर योग्यच आहे. भटकून झाल्यावर आम्ही एक ठिकाणी बसून ‘मीटिंग’ करतो आहोत आता. माझ्या इथं येण्याने स्त्रियांचा न्यूनगंड वाढणं योग्य नाही याची मला जाणीव आहे. त्यांनी त्यांना येत नसणा-या गोष्टी प्रामाणिकपणे मला सांगितल्या आहेत. आता गरज आहे मीही तितकंच प्रामाणिक असण्याची. gujrat women मिटींगमधली औपचारिकता पार पडते – ओळख, स्वागत वगैरे. आता मी बोलायचं आहे. मी ती संधी घेते. त्या स्त्रियांच्या रोजच्या कामाची चर्चा सुरु करते. आजपर्यंत कोटवालिया समाजाने गायीम्हशी कधीच पाळल्या नव्हत्या. पण सरकारी योजेनेचा भाग म्हणून आता त्यांना म्हशी मिळाल्या आहेत. इथल्या स्त्रिया आणि पुरुष काहीही अनुभव पाठीशी नसताना म्हशीची धार काढायला लागल्या आहेत. “हं! मला नाही येत गायी-म्हशीची धार काढायला.कधीच काढली नाहीये मी धार,” मी सांगते. सगळ्या हसतात. या सगळ्या स्त्रिया शेणाच्या गोव-या करतात, मला हेही काम येत नाही करता. जंगलात एकटीने जायचं आणि जळणासाठी पाहिजे ती (योग्य या अर्थाने) लाकडं आणायची हे रोजचं काम आहे त्यांचं. मी जंगलात एकटी जाऊ शकणार नाही आणि कोणतं लाकूड जाळण्यासाठी योग्य आहे हे मला कळत नाही आणि मला लाकूड तर तोडताच येणार नाही हे मी जाहीर करते. सगळे पुन्हा हसतात. आता त्यांना गंमत वाटायला लागली आहे. आत्तापर्यंत मी ‘हुशार’ होते त्यांच्या दृष्टीने, पण मला अनेक गोष्टी येत नाहीत हे हळूहळू त्यांच्या लक्षात येतंय!! हापशावरून त्या पाणी आणतात – घराला लागेल तितकं. मला भरलेली बादली उचलायला फारसं जमणार नाही हे मी त्यांना सांगते. त्या स्त्रियांना त्यांची आदिवासी भाषा आणि गुजराती दोन्ही चांगल्या येतात, हिंदीही थोडी थोडी बोलता येते. म्हणजे त्यांना तीन भाषा येतात. मलाही हिंदी, गुजराती येत असलं तरी त्यांची भाषा मात्र येत नाही. त्या चुलीवर स्वैपाक करतात, मला तर चूल पेटवताही येत नाही, स्वैपाक करणं तर फार पुढची गोष्ट! त्यांना बांबूची बास्केट बनवता येते – जी मला येत नाही. bamboo basket आता आमच्या चर्चेत रंग भरायला लागला आहे. मला असंख्य गोष्टी येत नाहीत याची त्यांना झालेली जाणीव त्यांच्यात एक वेगळाच आत्मविश्वास जागा करते आहे. त्यांना तालावर नृत्य करता येतं; मला येत नाही. त्यांना गाणी गाता येतात वेगवेगळ्या प्रसंगाना अनुरूप; मला गाता येत नाही. त्यांना झाडं ओळखता येतात, झाडांची नावं सांगता येतात – माझं ज्ञान दोन-चार झाडांपल्याड जात नाही. त्यांना ‘माशांची आमटी आणि भाजी ’ बनवता येते मस्त – मला मासेही ओळखू येत नाहीत वेगवेगळे. शहरतली असले, शिकलेली असले, पैसेवाली असले, इंग्रजी बोलता येणारी असले ... तरी मला सगळं येत नाही ही गोष्ट आता त्या स्त्रियांना चकित करून गेली आहे. माझ्यासाठी ही साधी गोष्ट आहे. जगण्याची काही कौशल्य त्या स्त्रियांकडे आहेत – काही माझ्याकडे आहेत. काही माझ्याकडं असणारी कौशल्य जशी त्यांच्याकडं नाहीत तशीच त्यांच्याजवळ असणारी अनेक कौशल्य माझ्याकडं नाहीत. त्या काही बाबतीत अडाणी आहेत तर मी काही बाबतीत अडाणी आहे. नेमक्या कोणत्या गोष्टीमुळे आमच्यात फरक पडला आहे हा? शिक्षण? जात? आर्थिक स्थिती? शहर-खेड्यात असणा-या संधी? त्या आदिवासी आहे आणि मी नाही म्हणून? धर्म? हा फरक केवळ वर्तमानाताला आहे की त्याला भूतकाळ आहे? हा फरक इथं संपणार की भविष्यातही असाच राहील? अनेक प्रश्न. त्या प्रश्नांची उत्तरं माहिती नाहीत; जी माहिती आहेत ती विषण्ण करणारी आहेत. म्हणून मी प्रश्न विचारत नाही, त्यांची उत्तरं इथं शोधायचा प्रयत्न करत नाही. आम्ही मिळून ज्या गप्पा मारतो आहोत, त्यातून आमची एकमेकीच्या आयुष्याबद्दलची समज वाढायला मदत होते आहे हे मात्र नक्की! त्यातून आमचे सगळ्यांचेच सबलीकरण होते आहे कळत नकळत! स्वत:ला पाहिजे तसे निर्णय घेत स्वत:चं आयुष्य घडवण्याची क्षमता असणं अशी सबलीकरणाची ढोबळ व्याख्या करता येईल. ही क्षमता प्रत्येक व्यक्तीला आणि समूहाला मिळणा-या संधींवर अवलंबून असते. आपली बलस्थानं कोणती याचं भान असणं ही या प्रक्रियेतली महत्वाची गोष्ट आहे. आमच्या या चर्चेतून आम्हाला आमची बलस्थानं कळली हे फार चांगलं झालं! आपल्याला जे चांगलं करता येतं त्याबद्दल आपल्याला काय वाटतं याच्याइतकंच महत्त्व आहे ते आपल्याला जे काही चांगलं करता येत नाही त्याबद्दल आपल्याला काय वाटतं ते!! त्यादिवशी आमच्या त्या गप्पा आम्हाला सगळ्यांनाच नवा विचार देवून गेल्या. मी काय केलं मला नाही माहिती; पण त्या स्त्रियांनी मला थोडं अधिक सबल केलं त्यादिवशी!!
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
समाज
जीवनमान
राहणी
प्रवास
लेखनप्रकार (Writing Type)
अनुभव

प्रतिक्रिया द्या
9509 वाचन

💬 प्रतिसाद (52)

प्रतिक्रिया

सुंदर.

चित्रगुप्त
Mon, 04/29/2013 - 10:05 नवीन
सुंदर, प्रांजळ आणि अंतर्मुख करणारे अनुभव आणि लिखाण. तुमचे आणखीही अनुभव अवश्य लिहावेत.
  • Log in or register to post comments

विचार करायला लावणारे विचार.

सस्नेह
Mon, 04/29/2013 - 13:27 नवीन
विचार करायला लावणारे विचार.
  • Log in or register to post comments

+१

शुचि
Mon, 04/29/2013 - 16:06 नवीन
आतिवासताई मिसळपाववरती अजून आपले अनुभव जरुर शेअर करा. खूपच वेगळ्या विश्वातील अनुभव आहेत आपले. विश्व तर वेगळे आहेच पण प्रसंगाकडे पहाण्याचा आपला दृष्टीकोन काही हटके आहे. खूप आवडला हा लेख.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

नेहमीप्रमाणेच सकस लेख. विचार

बॅटमॅन
Mon, 04/29/2013 - 13:56 नवीन
नेहमीप्रमाणेच सकस लेख. विचार करायला लावणारा.
  • Log in or register to post comments

+१ सकस... लेख.

अग्निकोल्हा
Mon, 04/29/2013 - 15:32 नवीन
नेमक्या कोणत्या गोष्टीमुळे आमच्यात फरक पडला आहे हा?
तुमची बहुतांश बलस्थाने बौध्दीक, तर त्यांची शारीरीक, पण प्रामुख्याने हा फरक पडला आहे तो आर्थिक स्थिती व अभिव्यक्ती स्वातंत्र्यात असलेल्या तफावतीमुळे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

लेख आवडला.

गणपा
Mon, 04/29/2013 - 13:59 नवीन
लेख आवडला.
  • Log in or register to post comments

लेख आवडला...

मन१
Mon, 04/29/2013 - 15:38 नवीन
सोप्या भाषेत, पण म्हत्वाची गोष्ट मांडलित.
  • Log in or register to post comments

लेख आवडला

jaypal
Mon, 04/29/2013 - 15:54 नवीन
तुम्हास शुभेच्छा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मन१

विनंती

आतिवास
Mon, 04/29/2013 - 18:35 नवीन
'मिपा'च्या शब्दकोषात /परिभाषेत 'शुभेच्छा' शब्दाचा नेहमीपेक्षा काही वेगळा अर्थ असल्यास जाणकारांनी प्रकाश टाकावा ही विनंती :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: jaypal

नाही सरळ अर्थ आहे.

ढालगज भवानी
Mon, 04/29/2013 - 18:36 नवीन
नाही सरळ अर्थ आहे. "वाढदिवसाच्या शुभेच्छा" यास वाकडा अर्थ आहे :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आतिवास

खूप छान लिहिलंय..

विसोबा खेचर
Mon, 04/29/2013 - 16:06 नवीन
खूप छान लिहिलंय..
  • Log in or register to post comments

लेख नेहमीप्रमाणेच आवडला.

मस्त कलंदर
Mon, 04/29/2013 - 16:07 नवीन
लेख नेहमीप्रमाणेच आवडला.
  • Log in or register to post comments

खूप छान लेख !

डॉ सुहास म्हात्रे
Mon, 04/29/2013 - 18:34 नवीन
असं वेगळ्या अंगाने वस्तुस्थितीकडे पाहणं फार कमी जणांना उमजतं... जमतं... आणि ते प्रकटपणे कबूल करणं तर अगदीच विरळा. तुमचे काम आणि विचार याबाबत अजून बरेच काही वाचायला आवडेल. पुलेप्र.
  • Log in or register to post comments

लेख आवडला

सहज
Mon, 04/29/2013 - 18:41 नवीन
आपल्या पूर्वजांनी कधी काळी जंगल सोडून नदी, गाव, शहर असे स्थलांतर केले व काही लोक अजुन दाट वस्तीहून दूर जंगलात रहात आहेत हा मुळातला एक मोठा फरक असावा काय? ह्या म्हशी सरकार दिल्या म्हणजे घरटी एक म्हैस की एका वस्तीवर अमुक म्हशी असे काही प्रमाण? यांना ग्रामपंचायत वगैरे सांभाळतात की कोणाला दिल्या आहेत? म्हशीचा सांभाळायचा खर्च, आरोग्य सेवा हे कसे? दूध व गोवर्‍या याची विल्हेवाट कशी. सॉरी पण प्रश्न डोक्यात आलेच :-) (कोण म्ह्णते सरकार मदत करत नाही? :-) )
  • Log in or register to post comments

प्रामाणिक. सुरेख.

यशोधरा
Mon, 04/29/2013 - 18:43 नवीन
प्रामाणिक. सुरेख.
  • Log in or register to post comments

वाह! लेख आवडला.

रेवती
Mon, 04/29/2013 - 19:23 नवीन
वाह! लेख आवडला.
  • Log in or register to post comments

अंतर्मुख करवणारा लेख.

प्यारे१
Mon, 04/29/2013 - 20:56 नवीन
अंतर्मुख करवणारा लेख. बरंच म्हणावंसं वाटतंय ह्या सबलीकरणाबद्दल नि तथाकथित सबलीकरणाबद्दलही. थोडक्यात. लिंग, स्थल, अर्थ, जन्म, कारण, परिस्थिती-निरपेक्ष सबलीकरण/ समान पातळीवर आणणं शक्य नाही. कास्ट अवे मध्ये शेवटी लायटर ने सहज पेटणारी आग बघून टॉम हॅन्क्सचं तोंड जसं होतं त्यामधून एक प्रकारचा विरोधाभास व्यक्त होतो तसाच विरोधाभास इकडे देखील आहे. सहजसाध्य नळाच्या तोटीतून सुटणारं पाणी नि पूर्ण दिवस घालवावा लागून मिळणारं चार घागरी पाणी. लेख आवडला.
  • Log in or register to post comments

अंतर्मुख करवणारा लेख. +११

मोदक
Mon, 04/29/2013 - 21:08 नवीन
अंतर्मुख करवणारा लेख. +११
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

+१

बहुगुणी
Mon, 04/29/2013 - 21:46 नवीन
साध्याच शब्दांतला पण अंतर्मुख करवणारा लेख. मानवी आयुष्यातली थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी सोप्या शब्दांत उलगडून सांगितलीत. आणि मी काय केलं मला नाही माहिती; पण त्या स्त्रियांनी मला थोडं अधिक सबल केलं त्यादिवशी!! हा प्रामाणिक शेवट खूप भावला. आणखी लिहा तुमच्या अनुभवांविषयी. धन्यवाद!
  • Log in or register to post comments

लेखन आवडले...

मदनबाण
Mon, 04/29/2013 - 21:58 नवीन
लेखन आवडले... :) जाता जाता :--- बरेच दिवस मनात प्रश्न आहे, तो आता विचारुनच टाकावा म्हणतो... हे तुमच्या आयडीच असं का नामकरण केल आहेत ? काही खास कारण ?
  • Log in or register to post comments

सुरेख

अभ्या..
Mon, 04/29/2013 - 22:04 नवीन
सुंदर आणि प्रामाणिक लेखन. शब्द शंभर असोत की जास्त, तुम्ही तुमच्या भावना समर्थपणे पोहोचवता. अप्रतिम प्रकटनासाठी धन्यवाद. . अवांतरः बाणराव नाव बहुधा स्पेलिंग उलट केलेले असावे असा माझा कयास ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

बरोबर

आतिवास
Tue, 04/30/2013 - 12:59 नवीन
अभ्या.., अवांतराबाबत तुम्ही नोंदवलेला कयास बरोबर आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

अब्या... तु लैच हुशार !

मदनबाण
Tue, 04/30/2013 - 19:04 नवीन
अब्या... तु लैच हुशार ! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आतिवास

मधलं

श्रावण मोडक
Mon, 04/29/2013 - 22:21 नवीन
दोन ओळी किंवा दोन वाक्यांमधलं काही वाचायचा प्रयत्न केला आणि मग असं वाटलं, बरंच काही कळलं. मग क्षणात कळलं, ते तर उगाचच वाटतंय की कळलं... माझं हे असं केल्याबद्दल... काहीही म्हणत नाही. वाचत राहतो... _/\_
  • Log in or register to post comments

प्रतिसाद आधी समजला नव्हता

आतिवास
Tue, 04/30/2013 - 22:09 नवीन
प्रतिसाद आधी समजला नव्हता अजिबात. आता कळला - असं वाटतं आहे :-) आभार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

मनापासून

चाणक्य
Tue, 04/30/2013 - 10:38 नवीन
आलेलं हे लिखाण मनाला भिडलं. कौशल्ये म्हणा किंवा बलस्थाने म्हणा, त्याने आयुष्य प्रथम सुसह्य व्हायला हवं आणि मग समृद्ध....
  • Log in or register to post comments

अप्रतिम

स्पा
Tue, 04/30/2013 - 10:41 नवीन
साध्या शब्दातला विचार समृद्ध करून जाणारा लेख
  • Log in or register to post comments

प्रतिसादाला शब्द सुचत नाहियेत

तुमचा अभिषेक
Tue, 04/30/2013 - 13:40 नवीन
प्रतिसादाला शब्द सुचत नाहियेत तुर्तास धन्यवाद एवढेच म्हणतो. :)
  • Log in or register to post comments

मलाही.

स्पंदना
Tue, 04/30/2013 - 17:41 नवीन
मलाही. त्यात मी खेड्यातल्या स्त्रीया अगदी जवळुन रोज पाहिलेल्या. कोण सबल कोण दुर्बल काही कळत नाही. बहुतेक फरक हा कुंडीतल्या रोपात अन जंगलातल्या झाडात असतो तसा असावा. जे काही करता आहात त्या कामात जो आनंद आहे, जे आत्मिक समाधान आहे ते इतर कोणत्याही जॉब मध्ये मिळणार नाही याची खात्री आहे मला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुमचा अभिषेक

फार सुंदर लेख! आधी वाचला होता

मिहिर
Tue, 04/30/2013 - 18:14 नवीन
फार सुंदर लेख! आधी वाचला होता तेव्हा ही आवडला होता आणि आत्ता वाचल्यावरही तितकाच आवडला.
  • Log in or register to post comments

लेख आवडला. सबलीकरणाचा अर्थ मात्र कळला नाही!

नरेंद्र गोळे
Tue, 04/30/2013 - 19:11 नवीन
परिसरातील हवेवर, पाण्यावर, जमिनीवर, वनांवर शतकानुशतकांच्या वावरामुळे त्यांचा अधिकार होता; तो बाहेरच्या लोकांच्या कायद्याच्या व्याख्येनुरूप अचानकच नाहीसा झाला. ज्यांनी तो नाहीसा केला तेच आज सबलीकरणाचा चारा घालत आहेत. काय अर्थ आहे त्या सबलीकरणाला? त्यांना वहिवाटीच्या अधिकाराने वनांची मालकी/ स्वामित्वच खरे तर द्यायला हवे. त्याबाबत आज आपल्या देशाचा कायदा दुर्बल ठरत आहे. तो सबल/ सशक्त करायला हवा!
  • Log in or register to post comments

त्या

तिमा
Tue, 04/30/2013 - 19:18 नवीन
लेख आवडला. त्या स्त्रिया आपल्या सर्वांपेक्षा जास्त सुखी आहेत कारण, त्या निर्व्याज हंसणे विसरल्या नाहीयेत त्यांना आपल्या बँक बॅलन्सची चिंता नाहीये स्वार्थी लोक आपल्या देशाला कसे कुरतडत आहेत याची त्यांना जाणीव नाहीये उगाच लांबचा विचार करुन चिंतेत बुडण्याची त्यांना संवय नाहीये उद्या, पेट्रोल, वीज वगैरे उर्जास्त्रोत बंद झाले तरी त्या आपल्यापेक्षा आनंदी आयुष्य जगू शकतील.
  • Log in or register to post comments

खूप छान

विकास
Tue, 04/30/2013 - 19:44 नवीन
अनुभव आवडला तसेच लिहीण्याची शैली देखील.
स्वत:ला पाहिजे तसे निर्णय घेत स्वत:चं आयुष्य घडवण्याची क्षमता असणं अशी सबलीकरणाची ढोबळ व्याख्या करता येईल. ही क्षमता प्रत्येक व्यक्तीला आणि समूहाला मिळणा-या संधींवर अवलंबून असते.
सहमत. त्यात अजून एकच गोष्ट अधिक असावी असे वाटते, (त्यात तुमच्या मताचे खंडन वगैरे नाही): ती म्हणजे, एकूणच रहाणीमानातली दरी कमी होणे. आपण सर्वच ज्या तथाकथीत विकसीत/अधुनिक जगात रहात असतो तेथे काही बदल घडणे जसे आवश्यक आहे तसेच बदल घडून हा आदीवासी समाज देखील खर्‍या अर्थाने असलेल्या अधुनिकतेच्या जवळ येयला हवा असे वाटते. त्यांना अनुदाने आणि सेवाभावी संस्थांच्या मदतीवर, हेतू कितीही चांगला असला तरी काही अर्थाने नकळत आदीवासीच ठेवणे होऊ नये असे वाटते.
  • Log in or register to post comments

मर्यादित

श्रावण मोडक
Tue, 04/30/2013 - 23:51 नवीन
एकूणच रहाणीमानातली दरी कमी होणे.
प्रतिसाद मर्यादित आहे. राहणीमान आणि दरी असा मुद्दा येथे आहे. माझ्यासमोर आलेला एक प्रश्न (शब्द माझे): तो किवा ती, काय म्हणते: पाणी आणण्यासाठी मी एक डोंगर उतरून जातो, तुम्ही लोकं नोकरीसाठी डोंबिवलीपासून व्हीटीपर्यंत जाता. तुमच्या घरात स्वयंपाक घराच्या शेजारीच संडास असतो, आमच्याकडं नाही. आमची गुरंही आमच्या घरात असतात, तुमच्याकडं ती जागाही (अंगण, असं काही तरी त्याला म्हणायचं आहे) नाही. मी निवांत जगत असतो. तुम्ही येता. माझी जमीन घेता, मला बाहेर काढता. अचानक माझ्या पोराला सांगता, शिपाई किंवा त्यासारखंकाही तरी हो... ती/त्याला रेशनवर अवलंबून रहावं लागतं. त्याला किंवा तिला शिपाई होण्यासाठी दहावीपर्यंतचं शिक्षण लागतं, असं तुम्ही म्हणता. हे काय असतं? राहणी कुणाची, कुठून, कुठं न्यायची आणि कशी?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

:)

विकास
Wed, 05/01/2013 - 09:29 नवीन
माझे म्हणणे हे, "हेतू कितीही चांगला असला तरी काही अर्थाने नकळत आदीवासीच ठेवणे होऊ नये असे वाटते." या एका वाक्यात आहे. आदिवासींच्या जमिनी घेणे अथवा तत्सम संदर्भात नाही. त्यांनी तेथे काँक्रीटचे जंगल करून रहावे असा देखील नाही. पण जी "आवश्यक" अधुनिकता/बदल आहेत ते त्यांना मिळायला हवेच. (वरील लेखातील चित्रातील स्त्रीयांचे कपडे तेच सुचवत नाहीत का?). त्यांना आदीवासीच ठेवायचे मला पटत नाही. कधीकाळी आपण सगळे, सगळे म्हणजे सगळे जगच आदीवासी होतोच की. त्याही आपले पूर्वज झाडावर पण लटकून मार्गक्रमण करायचे. मध्यंतरी काही भाईबंद लोकलट्रेनला लटकून करायला लागले. आता जमेल तसे गाड्यातून वगैरे पण प्रवासाचा प्रयत्न करतातच. मग या आदीवासींना हट्टाने डोंगर चढून पाण्यासाठी जायला उत्तेजना देण्याचा हट्ट कशाला हवा? त्यांना देखील अधुनिक शिक्षण मिळणे गरजेचे आहे. त्यानंतर त्यांनी काय करायचे हे त्यांचे ते ठरवतील. बाकी त्या भागातील एन्क्रोचमेंटच्या बाबतीत मी आपल्याशी सहमतच आहे. पण त्यांना तसेच ठेवायचे असे जर आपल्याला म्हणायचे असेल, तर पुलंच्या भाषेत, ओवी ऐकायला गोड लागते म्हणून आजच्या काळातही जात्यावर दळण्याचा हट्ट करण्यातला प्रकार होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

रोचक

सहज
Wed, 05/01/2013 - 09:49 नवीन
श्रामो, विकासराव दोघांचे प्रतिसाद विचार करायला लावणारे. श्रामो: राहणीमान-जीवनशैली हे मुद्दे अगदी मान्य आहेत त्यात वादच नाही. सर्वांनी सरसकट आजची नागरी जीवनपद्धती अवलंबवावी हे चूक व अन्य पर्याय उपलब्ध असावे हे नक्की. जर सुखसाधने व रुपया-पैसा याला डावलून कोणी, त्यांना योग्य ते सुख-संपत्तीपूर्ण जीवन जगू इच्छीत असेल तर तो मार्ग उपलब्ध हवाच. पण आता इथे "आमची जमीन/माझी जमीन घेता" याबाबत खुलासा हवा. "सब भूमी गोपाल की" ची जागा आजच्या जगात सब भूमी सरकार की हे तर आलेच ना? आदीवासी जीवनपद्धती शहरीकरणात नष्ट होउ नये हे मान्य पण उद्या देशाची नैसर्गीक साधनसंपत्ती, त्याची विल्हेवाट त्यासंबधी निर्णय हा जटील प्रश्न आहे. उद्या आदीवासींच्या जागी सोने, कोळसा, इंधन साठे सापडले की त्याचा वापर कसा करायचा हे ठरवणे जगातल्या कोणत्याच आदीवासींच्या हातात असते का? नगरविकास करताना शहरी, ग्रामीण भागातील लोकांचीही जमीन जातेच. स्वयंपूर्ण जीवनशैली दाखवणार्‍या आदिवासी जीवनपद्धती टिकवायला हव्या. पर्यटनाची जोड देउन दोन्ही बाजुंनी एकमेकांचा फायदा करुन घ्यायला हवा. "एन्क्रोचमेंट, आमची जमीन" असा संघर्ष टाळता येणे शक्य आहे. आज नाही म्हणले तरी अनेक नागरी संस्था व सरकार पर्यायाने आपण, आदीवासी विकास, मदत यात सहभागी आहोत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

तुम्ही सर्वांनी रोचक मुद्दे

आतिवास
Wed, 05/01/2013 - 11:14 नवीन
तुम्ही सर्वांनी रोचक मुद्दे मांडले आहेत. या धाग्यावर प्रतिसाद देत बसलो आपण; तर उगाच हा धागा पुन्हापुन्हा वर येत राहील. त्यापेक्षा'सबलीकरण' या विषयावर चर्चा करण्यासाठी वेगळा धागा काढता येईल का? (मला फार चांगली चर्चा करता येत नाही :-); त्यामुळे मी असा धागा काढण्यात फारसा अर्थ नाही!!)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

आदिवासी

श्रावण मोडक
Wed, 05/01/2013 - 13:28 नवीन
विकास आणि सहज या दोघांच्याही प्रतिसादावर माझ्यापुरती काही स्पष्टकीरणे देतो, आणि आतिवास यांच्या सूचनेनुसार थांबतो. स्वतंत्र चर्चेस मात्र मी तयार आहे. आदिवासींना आदिवासी ठेवायचे की नाही याचा निर्णय तेव्हाच होऊ शकेल जेव्हा आदिवासी म्हणजे काय हे आधी ठरेल. त्याचसंदर्भात मूळ प्रतिसादात डोंबिवली ते व्हीटी आणि पाण्यासाठी डोंगर उतरणे याची तुलना मांडली. ही तुलना माझ्या डोक्यातून आलेली नाही तर एका आदिवासीनेच माझ्यासमोर मांडलेली आहे. तेव्हा, आपण आधी आदिवासी जीवनशैली म्हणजे काय हे ठरवले पाहिजे. आदिवासीला आदिवासी ठेवायचे याला माझा तेव्हा विरोधच असेल जेव्हा हे जगणं वंचनेच्या गौरवावर आधारलेलं असेल. त्याला विरोधच. आदिवासींसंदर्भात विकास हा आतून की बाहेरून हा मुद्दाही आधी निकालात काढावा लागेल. अचानक एका पिढीत उठून त्यांची विशिष्ट जीवनस्रोतांवर आधारलेली जीवनपद्धती संपवून त्यांना अशा दुसऱ्या जीवनपद्धतीत ढकलायचे की, जिथं जीवनस्रोतांची साधी माहितीही नसते, पात्रता आणि क्षमता तर दूरच, त्याला माझा विरोधच असेल. जगण्यातली क्लीष्टता (कॉम्प्लेक्सिटी या अर्थाने) लादून त्यांची जीवनशैली विकसीत केली, ही भावनाही मला मान्य होऊ शकत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

सुंदर लिहिलंय..

पिशी अबोली
Tue, 04/30/2013 - 20:06 नवीन
सुंदर लिहिलंय.. :)
  • Log in or register to post comments

कळसुबाई-हरिश्चंद्र अभयारण्यात

मालोजीराव
Tue, 04/30/2013 - 20:27 नवीन
कळसुबाई-हरिश्चंद्र अभयारण्यात, चांदोली,भीमाशंकर-आहुपे भागात अजूनही काही पाडे असेच आहेत आधुनिकतेपासून दूर मोबाईल,वीज,रस्ते अजूनही पोचले नाहीत तिथे लेख वाचून त्या ट्रेक्स ची आठवण झाली. तुमच्या लेखातील महिलांचा पेहराव आणि चित्रात दिसणारे मागील घर त्या तुलनेत थोडा आधुनिक वाटलं
  • Log in or register to post comments

आभार

आतिवास
Tue, 04/30/2013 - 22:07 नवीन
सर्व वाचकांचे आणि प्रतिसादकांचे आभार. ग्लिफ, सहज, प्यारे१, चाणक्य, नरेंद्र गोळे, तिमा, विकास आणि मालोजीराव यांनी 'सबलीकरण' या मुद्द्यावर काही विचार मांडले आहेत. त्याबद्दल त्यांचे आणखी एकदा आभार.
  • Log in or register to post comments

लेखन फारच सुंदर झालंय!!

किसन शिंदे
Tue, 04/30/2013 - 22:32 नवीन
लेखन फारच सुंदर झालंय!! वर मालोजीराजे म्हणतात त्याप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातल्या वाडा-मोखाडा या गांवामध्येही असे पाडे पाहिले आहेत, जिथे विकासाचा दुरपर्यंत संबंध नव्हता.
  • Log in or register to post comments

लेख आवडला. 'अमुकतमुक करू शकणे

राजेश घासकडवी
Wed, 05/01/2013 - 17:13 नवीन
लेख आवडला. 'अमुकतमुक करू शकणे' च्या ज्या दोन याद्या आल्या आहेत त्यांत काही मूलभूत फरक आहेत. 'करू शकणे' चे दोन अर्थ होतात - एक म्हणजे कौशल्य या अर्थाने. दुसरा अर्थ असा आहे की माझ्याकडे ती गोष्ट करण्याचे अधिकार आणि क्षमता आहे. टोपल्या विणता येणं हे कौशल्याचं उदाहरण आहे, तर पुरुषांची उघड बरोबरी, खर्चायला पैसे, उत्तम कपडे आणि सर्वांचं नेतृत्व करण्याचा जो अधिकार आहे या कौशल्यांपलिकडच्या गोष्टी आहेत. तुम्ही काही दिवस खर्च केलेत तर तुम्हाला टोपल्या विणणं थोडंफार तरी जमू शकेल. त्यांना तुमचे अधिकार प्राप्त होणं जवळपास अशक्य आहे. त्यामुळे सबलीकरण हा नुसता कौशल्यांचा भाग नाही.
  • Log in or register to post comments

प्रामाणिक आणि छान!

पैसा
Wed, 05/01/2013 - 19:45 नवीन
प्रत्येक व्यक्तीची आपआपल्या जागी काही बलस्थाने असतात, तर काही दुर्बल जागा असतात. ती प्रत्येकाला कळतातच असे नाही. ज्याला कळली तो सुखी आणि स्वतंत्र होतो. ज्याला कळत नाहीत तो अहंकारी नाहीतर न्यूनगंडाने पछाडला जातो. पूर्वी एकदा मी खेड्यातल्या स्त्रियांबद्दल लिहिले होते, की १९७०-८० च्या दशकात सुद्धा एका खेड्यात नवरे मुंबईत कामाला असताना त्यांच्या गैरहजेरीत घर, शेती, मुले समर्थपणे सांभाळणार्‍या स्त्रियांचा एक वर्ग मी पाहिला आहे. त्याना स्त्री मुक्ती हा शब्द माहित नसेल पण त्या नक्कीच सबल होत्या, आहेत. आपण स्त्री मुक्ती, सबलीकरण वगैरेंबद्दल बोलताना शहरात रहाणार्‍या, त्यातून उच्चवर्गीय आणि उच्चशिक्षित महिलांचा एक वर्ग नेहमी डोळ्यांपुढे ठेवतो. अशा स्त्रियांची एकूण संख्या एकूण लोकसंख्येच्या प्रमाणात कितीशी आहे? फारतर १-२ टक्के असेल. आणि ज्यांची जाणीव आम्हाला क्वचितच होते असा खेड्यातल्या अल्पशिक्षित, गरीब स्त्रियांचा वर्ग किती प्रमाणात आहे? त्यांच्या अस्तित्त्वाची केवळ जाणीव आम्हाला काही गोष्टी शिकवून जाईल.
  • Log in or register to post comments

मस्त लिहिलंस.

यशोधरा
गुरुवार, 05/02/2013 - 13:35 नवीन
मस्त लिहिलंस.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

+१.... GDP Vs GNH

डॉ सुहास म्हात्रे
Fri, 05/03/2013 - 15:09 नवीन
मूलभूत आर्थिक स्थैर्य हे खूपच महत्वाचे असते पण कमालीची आर्थिक सुबत्ताही माणसाला सुख-स्थैर्य देऊ शकत नाही..... म्हणूनच आता समाजाच्या / देशाच्या उत्कर्षाच्या मोजणीत gross domestic product (GDP) पेक्षा gross national happiness (GNH) ला जास्त महत्व येउ लागले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

.

सूनिल
Wed, 05/01/2013 - 22:01 नवीन
majhya mate te sabalch ahet kashala tyana tras deta ani vikas kay tekal karanar ani kay tyana shikavanar.....sadhyachya gramin bhagapeksha tar hajar patine tyanche aayushya changale ahe......
  • Log in or register to post comments

छान.

परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 05/02/2013 - 14:59 नवीन
लेखाने मला थोडं अधिक समॄद्ध केलं.
  • Log in or register to post comments

नेहमीप्रमाणे वाचकालाही समृद्ध

ऋषिकेश
गुरुवार, 05/02/2013 - 15:10 नवीन
नेहमीप्रमाणे वाचकालाही समृद्ध करणारे लेखन.. आवडले.. श्रामोंचे मतही ग्राह्य + चिंतनीय आहे
  • Log in or register to post comments

खुप वेगळ जीवन मांडलय तुम्ही

साऊ
Fri, 05/03/2013 - 06:51 नवीन
खुप वेगळ जीवन मांडलय तुम्ही आप्ल्यापेक्षा. पण आपण सबल आहोत हे कशावरुन ठरवायच?
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा