Skip to main content

मराठी माध्यम की इंग्लिश मिडीयम

लेखक नर्मदेतला गोटा यांनी शुक्रवार, 26/04/2013 13:53 या दिवशी प्रकाशित केले.
महाराष्ट्रातील सगळ्या घरात सध्या एक अगदी चर्चेचा मुद्दा असतो. तो म्हणजे मुलांना मराठी माध्यमाच्या शाळेत घालायचे की इंग्लिश मिडीयमच्या शाळेत. याचे नेमके उत्तर कुणाकडेच नसते. इंग्लिश माध्यमामधे मुलाला घालणारे पालक काही स्वतः फाडफाड इंग्लिश बोलत नसतात. त्यांना मराठीचे प्रेम नसते असेही नाही पण यामुळे मुलाचे भले होइल असा एक विचार मात्र असतो. मराठी काय मुद्दाम शिकायला लागत नाही. ती आसमंतात असतेच पण व्यवहारामधे, नोकरीसाठी इंग्लिश आवश्यक आहे असा एक समज या पालकांचा असतो. इंग्लिशचा पोटापाण्याशी फार पूर्वीपासून संबंध जोडण्यात आला आहे. आता राज्यकर्त्यांमुळे अनेक गोष्टी बदलतात. हेही खरे. आज शाळेत अरबी फारसी किंवा तुर्की कंपलसरी केले तर ? पण एके काळी अरबी फारसी आणि काही प्रमाणात तुर्की या भाषा गरजेच्या होत्या. इंग्रजी अंमलानंतर अनेक गोष्टी बदलल्या. इंग्रजीचे आगमन झाले. स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रजांविरुद्ध लढणार्‍या अनेक स्वातंत्र्ययोद्ध्यांना इंग्रजीचे उत्तम ज्ञान असे. खरी पंचाइत स्वातंत्र्यानंतर झाली. इंग्रज गेल्यानंतर इथल्या राज्यकर्त्यांपैकी काही हटवाद्यांनी इंग्रजांच्या अनेक गोष्टींबरोबरच इंग्रजीही हटविली. स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या पिढीला अनेक शैक्षणिक प्रयोग अनुभवायला लागले. परिणाम त्यांच्या इंग्रजीवर झाला. तोपर्यंत महाराष्ट्रातील अनेक शासकीय कार्यालयांचेही बर्‍यापैकी मराठीकरण झाले होते. याला कोणतेच शासकीय खाते अपवाद नाही. त्यामुळे किमान शासकीय सेवेत नोकरी मिळायला अडचण येत नसे. पण इंग्रजीचा न्यूनगंड निर्माण झालाच. मग आपल्याला नाही तर मुलांना तरी हे हाल भोगायला लागू नयेत. या विचाराने इंग्रजीकडे वळणारेही काही पालक आहेत. या सगळ्यातून असे दिसते की पाल्याला इंग्रजी / मराठी माध्यमाच्या शाळेत घालताना आपली संस्कृती टिकवायची किंवा बुडवायची यापेक्षा उद्याच्या जगात पाल्य नीटपणे आपल्या पायावर उभा रहावा एवढाच विचार असतो. काही जणांना वाटते मराठीमुळे भले होइल, काहींना वाटते इंग्रजीमुळे भले होइल. अनेकजण जे दहावीपर्यंत मराठीतून शिक्षण घेतात ते पुढे अकरावी सायन्सला विनातक्रार इंग्लिशमधून अभ्यास करतात. गुजरातमधे गुजरातीतून इंजिनयरींग करण्याची सोय आहे. तसे महाराष्ट्रात नाही. आजूबाजूला नजर टाकली तर आयुष्यात यश मिळवलेल्या अनेक यशवंतांपैकी अनेकजण मराठीमधे शिकलेले आढळतात तर अनेकजण इंग्रजीमधे शिकलेले. म्हणजे मराठी कि इंग्रजी या निश्कर्षापर्यंत येणेही अवघड होऊन बसते. बरं सामान्य माणसाला दोन्ही माध्यमांचे समर्थन खरे वाटते आणि कन्फ्युजन आणखी वाढते. इंग्रजीमधे शिकलेल्या अनेक लोकांना मराठी साहित्य वाचताना अडचणी येतात. मराठी मधले बारकावे, अलंकार समजत नाहीत. पण रोजीरोटी मराठीवर अवलंबून नसल्याने त्यांचे काही अडत नाही भले त्यांचे सगळे आयुष्य इंग्लंडमधे नव्हे तर महाराष्ट्रातच जाते. आता पुण्यामंबईत पूर्वीसारख्या दर्जेदार मराठी शाळा राहील्या आहेत कुठे ? असा प्रश्नही कानी पडतो. यातही महाराष्ट्र सरकारचे धोरणही मराठी शाळांबाबत दुजाभावाचे आहे. नव्या मराठी शाळांना परवानगी मिळत नाही. मिळाल्यास अनुदानापाशी अडते. त्यामुळे लोकांनाच मराठी नको आहे यापेक्षा शासनालाच मराठी शाळा नकोशा झाल्या आहेत. अजून एक गोष्ट. आमच्या परिचयातील एक मुलगी. तिला कंपनी फ्रान्सला पाठवणार होती. याकरीता जुजबी फ्रेंच ती शिकत होती. तिचे एकच म्हणणे असे, इंग्लिशशी झगडण्यात इतकी वर्षे गेली. ते पुरेसे नाही म्हणून आता फ्रेंच शिकावे लागते आहे. त्यामुळे पडलेला प्रश्न हा आहे की संस्कृती कशी टिकेल यासाठी नव्हे मुलांच्या रोजीरोटीसाठी कोणते माध्यम योग्य ? इंग्रजी माध्यमात शिकले तरी पुढच्या पंधरा वीस वर्षांनंतर इंग्रजीचे तितके महत्त्व शिल्लक राहील का ? की उद्या जर्मन, फ्रेंच, जपानी, चीनी इ. भाषा शिकाव्या लागणार आहेत! तेव्हा नेमके कोणते माध्यम निवडावे ? हा मोठा प्रश्न आहे.

वाचने 55365
प्रतिक्रिया 151

प्रतिक्रिया

कोणत्याही भाषेत शिकावे, पाया पक्का पाहिजे. नाहीतर एक ना धड भाराभर चिंध्या अशी अवस्था होते.

निर्णय घेण्यास माझी मी मुखत्यार असते तर माझी मुलगी मराठी मिडीअम मध्ये शिकली असती. तिला मराठीचा गोडवा पूर्ण कळणार नाही ही एक सल राहून गेलेली आहे. मराठी मिडीअम मध्ये शिकून माझा काडीचाही तोटा झालेला नाही उलट मी कविता वाचून, जयवंत दळवी, पुलं, जी ए अशा लेखकांचे साहीत्य वाचून खूप खूप श्रीमंत झाले असे म्हणेन.

In reply to by भावना कल्लोळ

माझी पण हीच साल आहे.
याच विषयावरच्या धाग्यावर दिलेल्या प्रतिसादातला भाग चिकटवण्याचा मोह होतोय. अवांतरः एक स्नेही अगदी नाईलाजाने अमेरिकेत रहायला गेले. त्यात दुष्काळात तेरावा महिना म्हणजे त्यांना तिथलच नागरिकत्व मिळालं. तिथंच मुलंही झाली. आता त्यांची कितीही इच्छा असली तरी तिथे मराठी माध्यमातली शाळा असणं शक्यच नाही. त्यामुळे मनावर दगड ठेउन त्यांना मुलांना नरक यातना भोगायला इंग्रजी शाळेत घातलं. बिचारे, सगळ्या आप्तांना मराठी विषयीची कळकळ बोलून दाखवतात, पण दैवाचं दान थोडंच मनाप्रमाणे पडतं? पण अमेरिकन.. नाही बृअहन्महाराष्ट्रातलं विश्वमराठी साहित्य संमेलनाला वगैरे हजेरी लाउन थोडं बरं वाटतं म्हणतात. असो.

In reply to by भावना कल्लोळ

माझी पण हीच साल आहे.
भावनाताई, भावना पोहचल्या.. पण जरा टायपतांना बघा हो. आणि मला वाटतं, हे वाक्य "मला पण तोच सल आहे." असं असायला हवं.. :-) (सेमीइंग्लीश माध्यमातला मराठी) चिगो

मराठी'च'. संबंधच नाही दुस-या 'मिडियम' चा. घातलं धोतर सोडून दुस-याच्या जीन्स च्या मागे लागण्याचा हा जो काही खुळचट पणा या देशात फोफावलाय, तो देशाचा (पूर्णपणे) घात करेल. देश सोडा, मराठी माणसं का अशी विचारदरिद्री होत आहेत, हे अनाकलनीय आहे. हॅप्पी गुढीपाडवा म्हणणा-यांच्या जशी मुस्काटात वाजवावीशी वाटते तशीच आपल्या मुलांच्या आयसीएसई आणि सीबीएसई शाळांचे गोडवे मर्सिडीज आणि बीएमडब्ल्यू ची थोरवी गात आसल्यागत गाणा-यांच्याही वाजवावीशी वाटते. आणि मग साने, जोशी, कुलकर्णी अशी आडनावं असलेली ही (नावाला मराठी) मुलं चार लोकात म्हणतात, 'सॉरी माझं मराठी इतकं चांगलं नाही.' 'मोगरा फुलला' सारखी गाणी त्यांना 'हाय फाय मराठी' वाली गाणी वाटतात. कारण त्यांची मजल कोंबडी पळाली च्या पुढे जातच नाही. ते तरी कळतं का कुणास ठाऊक. हे म्हणजे चोर घर लुटून नेतायत; आणि मंडळी एक एक कुलुप स्वतः उघडून देतायत, असं झालं. कमॉन! आपली भाढा आहे. शिक्षण आपल्या मातृभाषेतून आणि आपल्या मातृभाषेतूनच झालं पाहिजे. परदेशी असाल, इलाज नसेल तर ठीक; पण त्या जागी तुमची जबाबदारी इतरांपेक्षा दुप्पट असते. कारण तुम्हाला मराठी शाळा नसूनही त्या मुलाला मराठीत 'रुजवायचं' असतं. झाडं आभाळात वाढली तरी बीज हे मातीतच रुजलेलं असतं. मुळं जमिनीतच वाढलेली असतात. तीच झाडं मजबूत असतात. बाकी सगळी बांडगुळं. - अ. ज. ओक

महाराष्ट्रातील सगळ्या घरात सध्या एक अगदी चर्चेचा मुद्दा असतो. तो म्हणजे मुलांना मराठी माध्यमाच्या शाळेत घालायचे की इंग्लिश मिडीयमच्या शाळेत.
बहुदा तुम्ही हा लेख २०-२५ वर्षे उशीरा लिहिला आहात असे वाटते.सध्या कुठेही (निदान शहरांमध्ये तरी) या विषयावर चर्चा चालत असेल असे वाटत नाही.आता याविषयीचा निर्णय म्हणजे मुलांना इंग्लिश शाळेतच घालायचा पक्का आहेच. आमच्या घरी कामाला येणार्‍या बाईची मुलगी इंग्लिश मिडियममध्येच जाते.आता बोला. मी शाळेत असताना अगदी कट्टर मराठीवाला होतो.आता मला जाणविते की मी भविष्यात नोकरीनिमित्त महाराष्ट्राबाहेर किंवा देशाबाहेरही जाऊ शकेन.अशा परिस्थितीत माझ्या मुलांना मराठी शाळेत टाकणे म्हणजे गाढवपणा ठरेल. असो.

In reply to by क्लिंटन

क्लिंटनसाहेबांशी सहमत. माझ्या पहाण्यात तरी निदान शहरी महाराष्ट्रात या विषयावर आगगाडी ठेसन सोडून कधीच निघालेली आहे (मराठीत, "द ट्रेन हॅज लेफ्ट द स्टेशन!!") एक पालक म्हणून विचार करायचा झाला तर आपला/ली पाल्य ज्या वातावरणात वाढत आहे आणि त्याहीपेक्षा ज्या वातावरणात त्याने भविष्यात वावरावं असं त्याला आणि आपल्याला वाटतं त्या वातावरणात वापरात असलेली भाषा त्या पाल्यासाठी योग्य होईल. हे फक्त आमचं मत आहे, कुणाला पटत नसल्यास सोडून द्यावं, आजकाल वादावादी करायचा उत्साह राहिलेला नाही.... आणि आजकालच्या दृक-श्राव्य (मराठीत "ऑडिओ-व्हिज्युअल") जमान्यात मुलांना संस्कृती कळण्यासाठी भाषेची फारशी अडचण येत नाही असा अनुभव आहे... "फॅविट्रा रिष्टा मधली फूर्वी ही ओव्हीपेक्षा जास्त क्यूट आहे!" हे ज्ञान आमच्या चिरंजीवांनी आम्हां उभयतांना ऑलरेडी दिलेलं आहे!!! त्याला संस्कृतीमधलं मुद्द्याचं ते सगळं कळतं हे पाहून आम्ही आनंदी झालो आहोत!! :)

कोणत्याही शाळेत टाकलं तरी शेवटी आजची परिस्थितीनुसार पाल्याला जागतीक बाजारपेठेत तग धरायचा असेल तर इंग्रजी वाचून पर्याय नाही. कोणी जपान जर्मनीचं उदाहरण देऊन पाहिल, पण आपल्या देशाची परिस्थीति वेगळी आहे. शिवाय शाळेत असताना पाल्य पुढे कोणत्या क्षेत्रात जाणार आहे हे आपण (किंवा पाल्य) ठरवू शकत नाही. अशा वेळी त्याला जास्तित जास्त संधी उपलब्ध होतील हे पाहणे पालकांच्या हातात असते. मराठी माध्यमातील मुलांना कॉलेजमधे अचानक इंग्रजीतून शिक्षण घ्यावे लागल्याने त्यांच्यात न्यूनगंड किती बळावतो हे मी स्वतः अनुभवलेले आहे. शाळेत असताना हुशार म्हणून गणलेला मुलगा/मुलगी पुढे पास होण्यासाठी सुद्धा धडपडतो ह्याच्या फार विचित्र परिणाम होऊ शकतो. विषेशतः त्या आडनिड्या वयात मुलं पालकांशी यावर बोलतीलच असं नाही. मग अशातून काही मुलं फारच निराश होऊन जातात किंवा कोडगी होतात. अर्थात सगळी अशी होतात असं नाही. पण होण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही.

In reply to by मराठे

मला तरी सध्या जागतिक अर्थकारण हे जास्त प्रभावी आहे असं वाटतं. कारण मी स्वतः रोज पाह्तो आहे की उर्वरीत युरोपातून बरेच लोक सध्या 'स्वित्झर्लंड्'मधे नोकरी करायला आलेले आहेत, आणि ते आपपल्या भाषेचा अभिमान बाळगून जर्मन भाषा (झुरिच मधे जर्मन भाषेचा प्रभाव जास्त म्हणून) शिकत आहेत. पण येथील बहुसंख्य उद्योगांमधे कार्यालयीन कामकाज हे मात्र इन्ग्लिश मधूनच चालते ... नव्हे तसं ते इन्ग्लिशमधेच चालावे यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. आता ह्यमागील अर्थकारण असं की इन्ग्लिशमधून कामकाज आणि संपर्कयंत्रणा चालवल्यास 'नजीकच्या भविष्यात' आउट्सोर्सिंग करणे आणि त्या अनुषंगाने खर्च कमी करणे सोपे ... मला स्वतःचा अनुभव सांगतो. मी सेमी इंग्लिश मधून आणि नंतर फर्गसन मधून पूर्ण इंग्लिश्मधून शिक्शन घेतले. पण अवतीभवतीच्या तर्खडकरी सांस्कृतिक वातवरणामुळे शालेय शिक्षणाच्या काळात इंग्लिश 'बोलण्या'चे कौशल्य विकसित झालेच नाही. शिवाय कॉलेज संपल्यानंतर सुद्धा ३/४ वर्षे सदाशिवपेठी वातवरणातील उद्योगातच नोकरी, त्यामुळे इंग्लिश संभाषणाची वानवा ... नंतर जसजसे बहुसांस्कृतिक उद्योगांत कामं करू लागलो तसतसे इंग्लिशचे तर्खडकरी ज्ञान किती तोकडं पडतं त्याची जाणीव व्हायला लागली ... मग रोज २/३ तास 'टाइम्स' आणि 'एक्सप्रेस्' वाचून शब्दसंग्रह वाढवत शेवटी कुठे थोडं थोडं इन्ग्लिश बोलायला लागलो. पण दरम्यानच्या काळात 'अमराठी' सहकारी फारसं वेगळं कौशल्य नसून सुद्धा उगाचच 'चमकून' गेले. आता एवढा स्वानुभव गाठिशी असताना मी माझ्या पुढील पिढीला त्याच दुष्ट्चक्रात कशाला ढकलावे? सांस्कृतिक मराठी जडणघडण करण्यासाठी मराठी बोलणे, तू-नळीवरील पु.ल. देशपांडे ह्यांचे कथाकथन वगैरे कार्यक्रम तसेच बोली मराठीतील म्हणी, वाक्प्रचार इतपत पुरेअसे वाटते. माझ्या मुलीला आता पु.ल. देशपांडे, प्रा. लक्ष्मण देशपांडे, हसवाफसवी मुळे दिलीप प्रभावळकर हे सर्व माहिती आहेत. शिवाय झुरिचमधील जर्मन शाळेत शिकत असल्यामुळे ती जर्मन देखील बोलू लागली आहे. नुसतेच साहित्यिकदृष्ट्या मराठी भाषेची श्रीमंती काय उपयोगाची? त्यापेक्षा बहुभाषिक बनून जागतिक स्तरावर पोचून अधिक अधिक अर्थार्जन करून मराठी अस्मितेला उंचावर नेऊन ठेवण्यास काय हरकत आहे?

In reply to by sagarparadkar

झुरिचमधील मराठी मित्रपरीवारात एक छोटी मुलगी अशीही भेटली जिची आई मराठी आहे आणि वडील 'स्विस' आहेत. तिच्या बाबांनी अनेक वर्षं भारतात राहून भरत्नाट्यम आणि इतर पारंपारिक भारतीय शास्त्रीय संगीताचं शिक्षण घेतलं आहे, आणि ती मुलगी अस्खलित मराठी, जर्मन आणि इंग्लिश्सुद्धा बोलतेय, तेसुद्धा वयाच्या १२ ते १४ य वयोगटात असतानाच !

ह्याचं एकच एक उत्तर देणं (म्हणजे हे किंवा ते) हे चुकीचेच नाही तर वेडेपणाचं आहे. मुख्यतः कुटुंबातिल वातावरणावर खूप अवलंबून आहे. बरेचदा लोकं असे प्रश्न सोडवताना व्यावसायिक यश, समाधान, संधी ह्यांची साहित्यातून मिळणार्‍या आनंदाशी/ संसकृतीशी अनाठायी तुलना करू लागतात. संस्कार हे घरातून आधी आणि शाळेतून नंतर येतात, हे ध्यानात ठेवायला हवं! सामान्यतः वाचनाची/ भाषेची आवड ही घरातल्या परिस्थितीवर/ वातावरणावर अवलंबून असल्याचं दिसतं. (कुठल्याही कारणाने म्हणा) इंग्रजी ही व्यवहाराची, प्रगतिची, जागतिक भाषा असल्याने ज्यांच्या कक्षा विस्तारल्यात ते इंग्रजीतूनच शिक्षण घेणार, प्रगतीशील समाजात तसं होणारच!. माझा वैयक्तिक अनुभव असा की, दहावीतून अकरावीत गेल्यावर इंग्लिश माध्यमातून गणित/ विज्ञान विषय शिकण्याचा सराव करण्यात सहा-आठ महिन्याचा अमूल्य वेळ गेल्याने (आणि मग बारावी समोर उभी ठाकल्याने) आय आय टी तत्सम परिक्षांची तयारी करायला वेळच मिळाला नाही, अशी कैक हुशार मराठी मुले आहेत! * ह्यात आठवी, नववी, दहावी इंग्रजी माध्यमातून हा प्रकार नक्कीच स्तुत्य वाटतो!

भारतात राहून इंग्रजी शाळेत गेलेल्या माझ्या भाच्या पुतण्यांना चांगलं मराठी वाचता येतं. अगदी कादंबर्‍या वाचत असतील असे माझे म्हणणे नाही पण "सॉरी, माझं मराठी एवढं चांगलं नाही, यु नो!" असंही नाही. माझा मुलगा इंग्रजी माध्यमात शिकतो पण छोट्या मराठी गोष्टी वाचू शकतो. आताच्या वयात त्याने चिंवि, पुल वाचावेत असा आग्रह धरणे चुकीचे आहे. माझ्या इथे उपलब्ध असलेले, वयाला साजेसे चांगले इंग्रजी बालसाहित्य (आणि वयानुसार जे पुढे असेल ते) त्याने वाचावे असा आग्रह राहिलच. मराठीशिवाय इतरही भाषेत चांगले साहित्य आहे. तुम्ही ज्या देशात रहात असाल, मुले ज्या माध्यमातून शिकत असतील त्यातले चांगले वाचायलाच हवे. यासाठी भारतातील पालक किती आग्रही असतात हे माहित नाही पण माझ्या आजूबाजूला (मित्र) आहेत ते बर्‍यापैकी आग्रही असतात. आता माझे जे नातेवाईक पंजाबात, दिल्लीत राहतात आणि तिथेच राहणार आहेत ते इंग्रजीबरोबरच हिंदी आणि पंजाबी साहित्य वाचतात. त्यातील चांगल्या उतार्‍यांचे भाषांतर असलेल्या इ मेल्स कधीतरी आम्हाला येतात. त्यांच्याकडे इंग्रजीबरोबरच पंजाबी वर्तमानपत्र रोज घरी येते. बंगळुरास राहणार्‍या मराठी लोकांची मुले कन्नड वाचायला लागतात. माझी कोकणी मैत्रिण उत्तम कन्नड साहित्य वाचते. आता ती कोकणात राहू नाही शकली त्याला काय करणार. आईवडील जिथे राहतात तिथेच आपण लहानपणी राहतो. फक्त चांगले वाचण्याबद्दल आग्रही असण्याशी कारण! अगदी मराठी माध्यमात शिकणारी आजची मुले मुली तरी किती आणि काय वाचत असतील हा संशोधनाचाच विषय आहे.

In reply to by रेवती

भारतात राहून इंग्रजी शाळेत गेलेल्या माझ्या भाच्या पुतण्यांना चांगलं मराठी वाचता येतं. अगदी कादंबर्‍या वाचत असतील असे माझे म्हणणे नाही पण "सॉरी, माझं मराठी एवढं चांगलं नाही, यु नो!" असंही नाही.
माफ करा; पण यात कौतुक नाही. ते यायलाच हवं.

In reply to by वेल्लाभट

तुम्हाला कदाचित ते कौतुकास्पद वाटत नसेल, नसू द्या. ते माझे भाचे, पुतणे आहेत म्हणून मला काय वाटायचे ते मलाच ठरवू द्या.

In reply to by रेवती

महाराष्ट्रात असतील ते तुमचे भाचे पुतणे तर, शाळेत मराठी विषय असतो. त्यामुळे कित्येक अमराठी मुले सुद्धा मराठी व्यवस्थित वाचतात. शिवाय लिपी देवनागरी आहे ना. हिंदीची पण तीच असते. घरी मराठी बोलत असतील आणि शाळेत हिंदी वाचायला शिकवले तर मराठी वाचणे फार अवघड नाही ना ? कौतुक वाटण्याला आक्षेप नाही आहे. अवांतर :- माझा १० वर्षाचा भाचा आहे. सर्दी झाली कधी तर आपला शेंबूड आपणच पुसतो. अगदी कुण्णाकुण्णाची मदत न घेता. या गोष्टीचे मला भयंकर कौतुक वाटते ;-)

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

सहमत. परदेशी रहाणार्‍यांना आपली मुलं भारतातल्या... आय माय स्वारी इंडीयातल्या आजी-आजोबांशी मराठीत बोलतात याचंही कौतिक देखिल असतं विमे, आहात कुठं, व्हेअर आर यू? ;)

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

विश्वनाथ मेहेंदळे, तुमचा उपप्रतिसाद आवडला नाही. तुमच्याशी आपण होऊन संवाद साधणे नेहमी टाळत आले आहे. अर्थातच तुम्हाला ते माहित हवे असा आग्रह नाही. यापुढे मला उपप्रतिसाद न दिल्यास उत्तम. द्यायचा असेलच तर निदान बर्‍या उद्देशाने द्यावा हे सांगणे, त्यातील असह्मती व्यक्त करायची असल्यासही चालेल. तुमच्या उपप्रतिसादाने आणखी चारजणाचे फावलेले मी बघतीये. मला ते आवडलेले नाही हे स्पष्टपणे सांगतीये. नुसते बरे शब्द वापरले की काम झाले असे नसते. मला वाटते पुरेसे स्पष्ट सांगितलेले आहे.

In reply to by रेवती

विश्वनाथ मेहेंदळे, तुमचा उपप्रतिसाद आवडला नाही. तुमच्याशी आपण होऊन संवाद साधणे नेहमी टाळत आले आहे. अर्थातच तुम्हाला ते माहित हवे असा आग्रह नाही.
हे मला माहित असण्याचे काही कारण नव्हते आणि अजूनही त्यामागचे कारण माहित नाही. तुम्हाला वैयक्तिक दृष्ट्या माझ्याबद्दल काय तक्रार आहे ते मला माहित नाही. तुम्हाला सांगायचे असेल तर ऐकायला माझी हरकत नाही. सांगायचे नसेल तरी काहीही हरकत नाही. एकतर कुणाला आवडावे म्हणून मी प्रतिसाद देत नाही. मी माझा मुद्दा मांडतो. तो तुम्हाला आवडला नाही हा तुमचा प्रश्न आहे.
यापुढे मला उपप्रतिसाद न दिल्यास उत्तम. द्यायचा असेलच तर निदान बर्‍या उद्देशाने द्यावा हे सांगणे, त्यातील असह्मती व्यक्त करायची असल्यासही चालेल.
मुळात मी प्रतिसाद कुणी दिला आहे हे पाहून खाली लिहित नाही. या पुढेही तसे करण्याची इच्छा नाही. सबब ही सूचना/विनंती मान्य करता येणार नाही. आज्ञा असेल तरीही नाही. माझा प्रतिसाद बऱ्या उद्देशाने दिला नव्हता हे तुम्हीच ठरवलेत ?? वैयक्तिक राग तुमचा आहे माझ्यावर. माझा तुमच्यावर नाही. त्यामुळे मला मुद्दाम वाईट उद्देशाने लिहिण्याचे काही कारण नाही. मला तर कधी तुमच्याशी वाद झालेला पण आठवत नाही.
तुमच्या उपप्रतिसादाने आणखी चारजणाचे फावलेले मी बघतीये. मला ते आवडलेले नाही हे स्पष्टपणे सांगतीये.
त्याला संकेत स्थळाचा format कारणीभूत आहे. मी काय करु ?? शिवाय तुमच्या आवडीनिवडी जोपासायला मी इथे येत नाही.
मला वाटते पुरेसे स्पष्ट सांगितलेले आहे.
स्पष्टपणा आवडला. माझाही तुम्हाला आवडेल अशी अपेक्षा.

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

तुम्ही माझ्या प्रतिसादाला उपप्रतिसाद देऊ नये हे सुचवल्यावर आलेला हा प्रतिसाद पाहून खरेच उद्धटपणाची कमाल झाली आहे असे म्हणते.

In reply to by रेवती

मी सद्गुणांचा पुतळा आहे असा दावा कधीच केला नाही. उद्धट तर उद्धट. Frankly, I don't give a damn. माझ्या आयुष्यातले निर्णय मी तुम्हाला विचारून घेत नाही. माझ्यापुरता विषय संपला... Rhett विमे Butler

मी स्वतः इंग्रजी माध्यमात शिकले आहे तरी मला मराठी साहित्य वाचायला खूप आवडतं. माझी आई इंग्रजी माध्यामात शिक्षिका होती तरीही ती मला व माझ्या मोठ्या बहिणाला लहानपणापासून मराठी पुस्तकं, कांदबर्‍या वाचायाला लावायची. इंग्रजीइतकेच मला मराठी वाचनाची आवड आहे किंबहुना जास्तचं आहे. मिसळपावावर माझे येणं त्याच कारणासाठी झाले. माझी भाची इंग्लडात राहते, शाळा अर्थातच इंग्रजी माध्यम आहे पण घरी आई-बाबांशी ती शुध्द मराठी बोलते. आपल्या भाषेची ओळख तिला लहान असताना दादा-वहिनीने करुन दिली . बाराखडी तिच्याकडून गिरवून घेणं, बालगीते शिकवणं, लहान मुलांच्या गोष्टी वाचायला देणं, आपले श्लोक म्हणवून घेणं, सणासुदीचे महत्व समजावून सांगणे, ह्यामुळे ती जसे फाडफाड इंग्रजी बाहेर बोलते तसेच अस्खलित मराठी घरी बोलते. भारतवारीत तिला तिथे नातलंगाशी अगदी व्यवस्थित बोलता येतं न लाजता न अडखळता. माझा नवरा मराठी माध्यमात शिकला असून त्याला इंग्रजीशी जुळवून घेताना कठिण गेले नाही . शेवटी ते आपल्यावर आहे आपण जसे शिकत गेलो तसेच आपण आपल्या मुलांना शिकवू /घडवू शकतो.असो.

खरं हे आहे की निरर्थक आणि सोयीस्कर कारणांसाठी इंग्रजीची वकीली करणा-यांना मराठी म्हणवण्याचा कमीपणा वाटतो. दुर्दैवी आहे हे. त्यांना याचा बोध होईल तोवर खूप उशीर झालेला असेल; त्यांच्यासाठी. आपल्या मातेचं नाव घ्यायला ज्याला कमीपणा वाटतो तो करंटा होय.

अलबत इंग्रजी भारतात अनेक भाषा ह्या राज्य भाषा असल्या तरी महाराष्ट्रात दहावीनंतर इंग्रजीतून शिक्षण अनिवार्य आहे. जर्मनीत सर्व शिक्षण जर्मनीतून होते कारण संपूर्ण देशात एकाच भाषा बोलली जाते. जर भारताची फाळणी झाली असती व महाराष्ट्र एक स्वतंत्र राष्ट्र असते तर मराठीतून शिक्षण ही संकल्पना समजू शकतो. पण आपल्या भारतात प्रत्येकाचा प्रांतिक भाषिक अभिमान कम दुराभिमानाचे दाखले इतके वेळा निदर्शनाला येतात की त्यामुळे परकीय भाषा इंग्रजी ही खरे तर एक समान भाषा म्हणून देशात प्रचलित झाली पाहिजे. माझे काही आफ्रिकन मित्र मला सांगतात. त्यांच्याकडे बहुतेक लोक हे त्यांची स्थानिक भाषा व इंग्रजी बोलतात. अर्थात हे खुपदा हे इंग्रजी खेडवळ इंग्रजी ह्या प्रकारातले असते त्यांच्यात व्याकरणाचे ,नियम हे खुपदा गैरलागू असतात. फ्रेंच वसाहत असणारे मोरिशश किंवा आफ्रिकन राष्ट्रे त्यांची स्थानिक भाषा व फ्रेंच अस्स्खलित बोलतात. भारतात अनेक राज्यात हिंदीला संपर्क भाषा असण्याच्या बाबतीत असलेला रोष पाहता इंग्रजी त्याला उत्तम पर्याय होऊ शकते. राहिला प्रश्न मराठी साहित्य व कवितेचा तर माझ्या मते ही पालकांची जबाबदारी आहे. आज आम्हाला पालकांनी इंग्रजी सिनेमे ,कादंबर्‍या , कविता वाचायला प्रोत्साहन दिले नाही आम्ही मराठी माध्यमात असलो तरी ह्या भाषेचे साहित्य , सिनेमे आम्हाला जसे जमेल तसे आत्मसात करत राहिलो. माझ्या दोन वर्षाच्या अबुधाबी च्या वास्तव्यात तेथे व दुबई मधील जन्मलेल्या मुलांचे मराठी भाषेवर प्रभुत्व विस्मयकारी होते. जो पर्यंत आपल्या समाजात विज्ञान व वाणिज्य उच्च व कलाशाखा कनिष्ठ मानण्याचा प्रकार चालू राहीन तो पर्यंत भाई म्हणतात तसे आयुष्यात मला भावलेलं एक गुज सांगतो. "उपजीविकेसाठी आवश्यक असणाऱ्या विषयाचं शिक्षण जरुरी घ्या. पोटापाण्याचा उद्योग जिद्दीनं करा, पण एवढ्यावरच थांबू नका. साहित्य, चित्र, संगीत, नाट्य, शिल्प, खेळ ह्यातल्या एखाद्या तरी कलेशी मैत्री जमवा. पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगवतील., पण कलेशी जमलेली मैत्री तुम्ही का जगायचं हे सांगून जाईल." हे नावापुरता उरले आहे. आपल्याकडे घोका आणि परीक्षेत ओका ह्या न्यायाने शिक्षणाचा उपयोग शिक्षित होण्यासाठी करतो , सुसंस्कृत होण्यासाठी नाही. शेवटी ब्रीद वाक्य हे कशासाठी पोटासाठी एवढेच जर असेल. अश्या अवस्थेत तुम्ही कोणत्याही माध्यमात शिकले तर फरक पडत नाही. शेवटी भाई म्हणतात त्या प्रमाणे माझ्या एक सामान्य आर्थिक परिस्थितीतले स्नेही आपल्या आठनऊ वर्षांच्या मुलाला घेऊन गाण्याच्या बैठकीला आले होते. मी विचारले, "मुलाला गाण्याची... आवड आहे वाटतं?" ते म्हणाले, "नक्की सांगता येणार नाही मला, पण लागावी अशी इच्छा आहे. गेल्या खेपेला कुमार गंधर्वाच्या गाण्याला घेऊन गेलो होतो. आज ह्या गाण्याला यायचंय का, असं विचारलं आणि 'हो' म्हणाला, म्हणून आणलं. त्याला लागलीच चांगल्या गाण्याची आवड तर आनंदाचा धनी होईल. दुसरी काय इस्टेट देणार मी त्याला? आयुष्यभर बरोबर बाळगील अशा चार चांगल्या आठवणी देतो-" 'संस्कार' ह्याचा अर्थ ह्या बापाला कळला असे मला वाटते. मराठी अभिजात व नवजात साहित्य श्राव्य पुस्तकात रूपांतर होणे गरजेचे आहे. मी मातृभाषेतून शिक्षण घेतले. माझी पुढची पिढी तिच्या मातृभाषेतून येथे शिक्षण घेईन, ह्याचेच काहीसे समाधान मानायचे. .

स्वताच्या भाषेचा अभिमान जपण्याच्या नादात मुलांच्या भविष्याशी खेळू नका. उद्या पंधरा-वीस वर्षांनी तुमच्या मुलांनी तुम्हाला मराठी माध्यमात घातल्याबाबत दोष दिला तर मग पश्चाताप करायची वेळ ही निघून गेली असेल. ईंग्रजी माध्यमात शिकणारे मराठी संस्कार आणि संस्कृतीपासून दूर जातील ही कल्पना देखील खुळचटच. उलट अश्यांमार्फत महाराष्ट्रीयन संस्कृती देशोदेशी पोहोचेल मराठी ही मातृभाषा असल्याने मराठीशी नाळ जुडलेली असणारच, अट फक्त एकच - घरून तशी शिकवण द्या.

In reply to by तुमचा अभिषेक

ईंग्रजी माध्यमात शिकणारे मराठी संस्कार आणि संस्कृतीपासून दूर जातील ही कल्पना देखील खुळचटच.
+१.अशी मराठी संस्कार आणि संस्कृतीविषयी भिती वाटणे म्हणजे न्यूनगंडाचे लक्षण आहे.आणि लहानसहान कारणांवरून धर्म बुडेल अशी बकवास करणार्‍यांपेक्षा अशा लोकांची मानसिकता फार वेगळी आहे असे वाटत नाही फक्त ते धर्माच्या ऐवजी भाषा बुडेल असे म्हणतात.

In reply to by तुमचा अभिषेक

माफ करा पण बरेचसे मुद्दे पटले नाहीत.
स्वताच्या भाषेचा अभिमान जपण्याच्या नादात मुलांच्या भविष्याशी खेळू नका.
मराठी माध्यमात घालणे म्हणजे मुलांच्या भविष्याशी खेळणे?
उद्या पंधरा-वीस वर्षांनी तुमच्या मुलांनी तुम्हाला मराठी माध्यमात घातल्याबाबत दोष दिला तर मग पश्चाताप करायची वेळ ही निघून गेली असेल.
मुलं काय कशाबद्दलही दोषी धरतील एकुलतं एक मूल त्याच्या एकटेपणाबद्दल दोषी धरेल. मूलं नाचवतील तसं नाचायचं का हा प्रश्न आहे.
ईंग्रजी माध्यमात शिकणारे मराठी संस्कार आणि संस्कृतीपासून दूर जातील ही कल्पना देखील खुळचटच. उलट अश्यांमार्फत महाराष्ट्रीयन संस्कृती देशोदेशी पोहोचेल
कशावरनं सगळी इंग्रजी माध्यमातील मूलं देशांतर करतीलच अन कशावरनं मराठी माध्यमातील मूलं ते करणार नाहीत?

In reply to by शुचि

माझ्या आजुबाजुला ईंन्लिश मिडेयम मधुन शिकलेली अशी जनता आहे की त्यांना मराठीचं काही घेणं देणं नसतं, "बोलता येत आहे ना, तेवढं पुष्कळ झालं" असाही सुर असतो अनेकांचा.. आजच यांची अशी अवस्था आहे तर १० वर्षांनी पुढली पिढी काय करेल बरं?? :( कधी कधी वाटतं सेमी इंग्लिश हा पर्याय उत्तम. मातृभाषेची नीट ओळख होतेच, शिवाय सायन्स मधे करियर कराय्चं असेल तर सोन्याहुन पिवळे..

In reply to by कोमल

अहो कोमल ताई, वरती उपास दादानी हेच सागितले आहे. ह्याचं एकच एक उत्तर देणं (म्हणजे हे किंवा ते) हे चुकीचेच नाही तर वेडेपणाचं आहे. मुख्यतः कुटुंबातिल वातावरणावर खूप अवलंबून आहे. बरेचदा लोकं असे प्रश्न सोडवताना व्यावसायिक यश, समाधान, संधी ह्यांची साहित्यातून मिळणार्‍या आनंदाशी/ संसकृतीशी अनाठायी तुलना करू लागतात. संस्कार हे घरातून आधी आणि शाळेतून नंतर येतात, हे ध्यानात ठेवायला हवं! सामान्यतः वाचनाची/ भाषेची आवड ही घरातल्या परिस्थितीवर/ वातावरणावर अवलंबून असल्याचं दिसतं. (कुठल्याही कारणाने म्हणा) इंग्रजी ही व्यवहाराची, प्रगतिची, जागतिक भाषा असल्याने ज्यांच्या कक्षा विस्तारल्यात ते इंग्रजीतूनच शिक्षण घेणार, प्रगतीशील समाजात तसं होणारच!.

In reply to by शुचि

माफ करा पण बरेचसे मुद्दे पटले नाहीत.
माफ करा कशाला, मी मुद्दाम मुद्देच असे मांडतो की ते प्रथमदर्शनी पटू नयेतच, कारण चर्चेला सुरुवात इथूनच होते. मराठी माध्यमात घालणे म्हणजे मुलांच्या भविष्याशी खेळणे? मी मराठी माध्यमात शिकलोय, माझे बरेच मित्र मराठी माध्यमातील आहेत, सन्माननीय अपवाद वगळता थोडीफार बोंब लागलीच आहे सर्वांची. अन ही आजची स्थिती, पंधरा वर्षांनी तर ईंग्लिशला पर्याय नसेल. अर्थात हे माझे वैयक्तिक मत माझ्या अनुभव आणि निरीक्षणावरून बनवले आहे,जर आपले मत असे नसेल तर मराठी माध्यमाची कास धरण्यात हरकत नाही पण माझा मूळ मुददा हाच की तुम्हाला वाटत असेल की मराठीत शिक्षण घेतल्याने नुकसान न होता फायदाच होइल तरच तसे करा... मातृभाषेचा अभिमान वगैरे अश्या भावनिक गोष्टींच्या आहारी जाऊन तो निर्णय घेतलेला नसावा.
कशावरनं सगळी इंग्रजी माध्यमातील मूलं देशांतर करतीलच अन कशावरनं मराठी माध्यमातील मूलं ते करणार नाहीत?
थोडीशी गल्लत होतेय.. मराठी संस्कार अन संस्कृती पसरवणे साठी देशांतर गरजेचे नाही.

In reply to by तुमचा अभिषेक

थोडीशी गल्लत होतेय.. मराठी संस्कार अन संस्कृती पसरवणे साठी देशांतर गरजेचे नाही.
खरय!!

In reply to by तुमचा अभिषेक

मी मराठी माध्यमात शिकलोय, माझे बरेच मित्र मराठी माध्यमातील आहेत, सन्माननीय अपवाद वगळता थोडीफार बोंब लागलीच आहे सर्वांची.
तुमच्या मित्रांची बोंब लागली तर दोष मराठी माध्यमाचा कसा काय ?? मी पण स्वतः मराठी शाळेत शिकलो आहे. माझेही बरेच मित्र मराठी माध्यमातीलच आहेत. सगळ्यांचे उत्तम चालले आहे. माझ्याच शाळेतल्या वर्गातील मित्र आर्किटेक्ट पासून डॉक्टर, इंजिनीअर ते थेट चित्रपट निर्माता म्हणून काम करत आहेत. माझा एक मित्र जेजेतून कमर्शियल artist झाला आणि मग पुढील शिक्षणाला अमेरिकेत गेला. तिथे शिकताना अनेक स्पर्धात भाग घेऊन पहिला क्रमांक पटकावला. त्याचे जाहिरात क्षेत्रातील काम मी पाहिले आहे. मराठी माध्यमाचा कुठेही त्रास नाही झाला. माझ्या १-२ batch मागे पुढे असणारे अनेक जण असे कर्तृत्व दाखवत आहेत. शाळा तीच, कालखंड तोच आणि मित्रही त्याच विभागातले (गिरणगाव). तरीही इतका फरक का पडावा ??? थोडक्यात, चष्मा बदला... कुणाच्या नाकर्तेपणाचे खापर माध्यमावर फोडू नका.

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

कोणत्याही शाळेत तुकडी अ पासून तुकडी फ पर्यंतचे विद्यार्थी असतात तसेच प्रत्येकाची ईंग्लिश कॅपचर करायची क्षमता भिन्न असते. तुम्ही जसे मित्र म्हणत आहात तसे माझेही मित्र आहेत. पण तशे मित्र आणि असे मित्र यांचे गुणोत्तर पाहता मी या निष्कर्शावर आलोय. थोडक्यात चष्मा बदलूच नका तर घालूच नका. उघड्या डोळ्यांनी जग बघा म्हणजे त्यात सारेच दिसतील. :)

In reply to by तुमचा अभिषेक

कोणत्याही शाळेत तुकडी अ पासून तुकडी फ पर्यंतचे विद्यार्थी असतात तसेच प्रत्येकाची ईंग्लिश कॅपचर करायची क्षमता भिन्न असते.
मग याचा परिणाम बालवाडी किंवा पहिलीत नाही का होणार ??? जो त्रास पाचवीत, आठवीत किंवा अकरावीत होतो तो बालवाडीत झालेला जास्ती वाईट. प्रॉब्लेम भाषेचा नाही. अनाठाई न्युनगंडाचा आहे.
थोडक्यात चष्मा बदलूच नका तर घालूच नका. उघड्या डोळ्यांनी जग बघा म्हणजे त्यात सारेच दिसतील.
तेच म्हणतो आहे मी. पण कधीकधी डोळ्यातच दोष असतो त्याचे काय करायचे ??

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

>>>प्रॉब्लेम भाषेचा नाही. अनाठाई न्युनगंडाचा आहे. ह्याच मुद्द्यावर आक्खे च्या आक्खे (सगळे नाही म्हणत) पक्ष चालतात, चालवले जातात विमे, आहात कुठं? तेच व्हेअर यु आर?

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

नाही होत... लहानवयात काहीही शिकायची अन कॅप्चर करायची क्षमता जास्त असते.. तसेच मुलांना ईंग्लिश शाळेत पाठवून आपण त्याला मराठी घरी शिकवू शकतो.. उलटे करने तितकेसे सोपे नाही.. न्यूनगंडाचे म्हणाल तर मला सांगा, हा न्यूनगंड आला कुठून हो, नाही म्हणजे कोणी बाजारात अफवा उठवल्यात की ईंग्लिश आले तरच स्पर्धेत टिकाल, मराठी डाऊनमार्केट आहे वगैरे वगैरे.. जी आहे ती सत्य परिस्थिती आहे आणि त्यानुसार स्वताला तयार करणार नाही तर न्यूनगंड हा आपसूकच येणार.

In reply to by तुमचा अभिषेक

लहानवयात काहीही शिकायची अन कॅप्चर करायची क्षमता जास्त असते..
आणि
तसेच मुलांना ईंग्लिश शाळेत पाठवून आपण त्याला मराठी घरी शिकवू शकतो.. उलटे करने तितकेसे सोपे नाही..
या तुमच्या लागोपाठच्या वाक्यात किती विरोधाभास आहे. शिकवणारा चांगला असला की झालं. आम्ही (सेमी) मराठी माध्यमात शिकलो. घरी कुणी इंग्रजी बोलत नसे. पण तरीही जुजबी बोलण्या पुरता इंग्रजी शाळेत असतानाच शिकलो. पुर्व पुण्याईने आमच्या काळी शिक्षक चांगले होते.

In reply to by गणपा

विरोधाभासाची एक गंमत सांगतो बघा.. जर आईवडील मराठी शाळेत शिकलेले असतील तर त्यांना मुलांना मराठी शाळेत पाठवून घरी ईंग्लिश शिकवणे जडच जाणार. तसेच जर आईवडील ईंग्लिश माध्यमात शिकले असतील तर मुलांना मराठी मिडीयममध्ये शिकवायचा पर्याय त्यांच्या डोक्यात येणेही कठीण आहे. ;)

मी शाळेत असताना एका मुलीच्या घरी (त्यांना परवडत होते म्हणून) इंग्लीश शिकवण्यासाठी ट्युटर येत असे. तिला व तिच्या भावंडाना शिकवण्यासाठी! शाळेतर्फे अनेक स्पर्धांमध्ये ती भाग घेत असे. मराठी माध्यमात असूनही ती फाडफाड इंग्लीश बोलत असे. असे बरेच कमी ठिकाणी होत असल्याने ती चर्चेचा विषय ठरली होती. ;) पण असलेल्या चांगल्या आर्थिक परिस्थितीचा असा उपयोग करणं मला आवडलं.

आजकाल इंग्लिश फ्लुएंट आले पाहिजे अश्या अपेक्शा लग्नासाठी मुलींकडुन यायला सुरवात झालेली आहे...

लाल हिरव्या रंगाचं, चमचमणारं, खेळणं एखाद्याच्या हातात दिसलं, की आपल्या हातातलं आई बाबांनी आणून दिलेलं लाकडी खेळण टाकून ते लाल हिरवंच चांगलं; मला तेच हवं हा हट्ट करणा-या मुलासारखी गत झालीय बहुतांश मराठी म्हणवणा-यांची. 'म्हणवणारे' यासाठी कारण त्याबद्दलचं प्रेम जर खुंटीवर टांगूनच ठेवायचं असेल तर ते बाळगू नये असं माझ स्पष्ट मत आहे. आणि तसंही चालेल. व्यक्तीस्वातंत्र्य आहे. पण मग एका दगडावर पाय ठेवावा. एकीकडे 'इंग्रजी हेच भविष्यातलं हत्यार आहे' वगैरे अशा वायझेड कल्पनांची वकीली करत फिरणं आणि दुसरीकडे 'आम्हाला मराठी वाचन पण अस्खलित येतं, अगदी कादंब-या वगैरे नाही...' अशी स्पष्टीकरणात्मक उक्ती करून मराठी भाषेचा अवमान करू नये. भुलली आहेत ही माणसं रे! भुलली आहेत.

या वरुन आठवले... सुटीत बहिणीची मुले रहायला आली होति..दोघेहि कोन्व्हेंट मधे शिकत होति गप्पा मारताना त्याना म्हटले" काहि म्हणा तुम्हा कोन्व्हेंट च्या पोरांच मराठी कच्च असत.." त्या वर छोट्यानी त्याच्या दादाला विचारले "दादा कच्च म्हणजे काय?" दादा म्हणाला "अरे कच्च म्हणजे रॉ" मला हसु आले मनात आले ह्या मुलांच्या लेखि कच्च फळ..कच्च वय..व कच्च मराठी यातले सारे "कच्चे" म्हणजे "रॉ" च

In reply to by अविनाशकुलकर्णी

काका, जसे तुम्ही त्यांचे मराठी चुकल्यावर हसता ना तसे मराठी मुलांचे ईंग्लिश चुकल्यावर जग हसतं... आता कोणाचे हसणे परवडले हे आपले आपणच ठरवायचे आहे..

प्राथमिक शिक्षण मातृभाषेत झाले पाहिजे यावर जगभरातील शास्त्रज्ञांचे एकमत आहे. त्याप्रमाणे जर पूर्वीच्या काळात( माझ्या वडिलांच्या) जसे मराठी सातवीनंतर इंग्रजी पहिली ते चौथी असे शिक्षण होते त्यात दोन्ही भाषा मुलांना अकरावीत उत्तम येत असत. पूर्ण मराठी माध्यमातून शिकलेली पण हुशार असलेली मुले आपल्या हुशारीवर पुढचा मार्ग सहज काढतात पण हुशार नसलेली मुले पूर्ण मराठी माध्यमाच्या शाळेत शिकून शिक्षित होतात पण बाजारात नोकरी मिळवण्यात अपात्र ठरतात त्यामुळे चार वर्षे मी मुंबईत विविध कॉर्पोरेट संस्थामध्ये मराठी मुलांची पीछे हाट होताना पहिली आहे आणि पाहतो आहे. मराठी मुले म्हणून फक्त मॉल मध्ये किंवा तत्सम ठिकाणी सेल्स बॉय किंवा सिक्युरिटी गार्ड म्हणून दिसतात. जेथे जनसंपर्क येतो तेथे इंग्रजी न आल्यामुळे त्यांना नोकर्या मिळत नाहीत हि वस्तुस्थिती प्रत्यक्ष पाहिल्यामुळे मोलकरीण रिक्षाचालक आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमात घालताना आढळतात. कारण केवळ इंग्रजी बोलता किंवा लिहिता येते या कारणावरून त्यांना बँकेत किंवा कार्यालयात तृतीय श्रेणी कर्मचारी, लेखनिक इत्यादी पांढरपेशा नोकर्या मिळतात हि वस्तुस्थिती आहे. उत्तम मराठी न आल्यामुळे मराठी माणसे हिंदी किंवा इंग्रजी बोलताना का दिसतात याचे हे एक कारण आहे. मराठी संस्कृती जपण्याचा कितीही टाहो फोडला तरी उत्तम इंग्रजी बोलत आले नाही तर जागतिक बाजारपेठेत मराठी माणसाचा टिकाव लागणार नाही हे सत्य आहे. मी स्वतः पूर्ण मराठी माधमातून शिक्षण घेतले आहे. (लष्करात असल्यामुळे माझ्यामुलाना केंद्रीय विद्यालयात इंग्रजी मध्यम घ्यावे लागले अहे. परंतु मी मुंबईत असतो तरी पूर्ण मराठीतून मुले शिकली असती काय हे सांगणे मला आजही कठीण वाटते. माझी बायको कोन्व्हेन्ट शिक्षित आहे पण आम्ही घरात पूर्ण मराठी बोलतो आणि माझी मुले (लौकिकार्थाने) शुद्ध मराठी बोलतात. आणि टी व्ही वर मराठी कार्यक्रम पाहतात किंवा मराठी वाचतात. सर्व सामान्य माणसाला इंग्रजी माध्यमातून १० वि पास होऊन पांढरपेशी नोकरी मिळू शकते हि वस्तुस्थिती आहे तशी वस्तुस्थिती इंग्रजी न येणाऱ्या मुलाची आजतरी नाही. जोवर प्राथमिक शिक्षण मराठीत आणि नंतरचे शिक्षण इंग्रजीत असे नाही तोवर मराठी शाळा बंद पडून इंग्रजी माध्यमाच्या शाळा वाढणार हि वस्तुस्थिती आहे. कल्याणकारी राज्यकर्त्यांना याकडे लक्ष द्यायला केंव्हा वेळ मिळेल तो सुदिन.

In reply to by सुबोध खरे

सर्व सामान्य माणसाला इंग्रजी माध्यमातून १० वि पास होऊन पांढरपेशी नोकरी मिळू शकते हि वस्तुस्थिती आहे डॉक्टर साहेब - पांढरपेशी नोकरी म्हणजे नक्की काय म्हणावयाचे आहे...?

In reply to by मोदक

वातानुकुलीत कार्यालयात बसून (पांढरी कापडे खराब न करता) करता येण्यासारखी मग ती स्वागत कक्षात सहाय्यक का असेना किंवा कारकुनी असेल व कॉल सेंटर असेल तरी. चार वाक्ये इंग्रजी बोलता आली पाहिजेत (पोपटपंची सुद्धा) म्हणजे झाले.(good morning sir how may I help you?) अकलेचा संबंध नाही.

In reply to by सुबोध खरे

पांढर्‍या कपड्यांची व १० वी पास चालू शकेल अशी एकच नोकरी (माझ्या अत्यल्पानुभवानुसार) अस्तित्वात असावी.. ती म्हणजे खाजगी शोफरची - यातही गाडी चालवण्याचे कौशल्य महत्त्वाचे ठरते. (आणखी कोणती असेल तर जरूर कळवावी) मोठ्या हॉटेलांमध्ये बहुतांश उच्चपदस्थांशी / परदेशी लोकांशी रोजचे बोलणे असल्याने १० वी पासला ड्रायव्हर म्हणून घेतील का हाही प्रश्न आहेच! स्वागत कक्षात सहाय्यक का असेना किंवा कारकुनी असेल व कॉल सेंटर असेल तरी अशा ठिकाणी अधिक शिक्षणाची आवश्यकता असते. किमान १०+२ किंवा १२ वी नंतर एक दोन वर्षे ग्रॅज्यूएशन वगैरे. मध्ये एका वर्तमानपत्रामध्ये सरकारी कार्यालयांमध्ये चपराशांच्या जागेसाठी किती ग्रॅज्यूएट्स, किती पोस्ट ग्रॅज्यूएट्स व खेळाडूंनी अ‍ॅप्लाय केला अशी यादी आली होती.. अधिक माहिती आहे का कुणाकडे..?

मुळात पोरांना शाळेत घालायचेच कशाला ?

In reply to by परिकथेतील राजकुमार

शाळेत जावून काडीचाही फायदा झाला नाही. जगाचे टक्के-टोणपे खातच जगत आहे.. आणि त्यातच खरी मजा आहे..

माझे शालेय शिक्षण मराठी माध्यमातुन झाले. नाही म्हणायला ८ वी पासुन सेमी इंग्रजी होते. पण त्याचा फारसा उपयोग झाला नाही. झालच तर तोटाच झाला. पण एकुणात मराठी माध्यमात शिकलेलो असल्याने काही तोटा झालासे वाटत नाही. इंग्रजी उत्तम येते. लिखित स्वरुपात तर शष्प त्रास होत नाही. कार्यालयीन लिखित इंग्रजी मध्ये मी कित्येक इंग्रजी माध्यमातुन शिकलेल्या लोकांपेक्षा सरस आहे हे नक्की सांगु शकतो. इंग्रजी बोलतानाही कधी त्रास जाणवत नाही. मी माझे विचार समोरच्यापर्यंत उत्तम पोचवु शकतो. फाडफाड येत नाही. पण त्याची गरजही नाही. (उलट योग्य त्या टोनमध्ये बोलल्याने मी लोकांना अभ्यासू आणि विचारी वाटतो ;) ). आणि हे मी जगभरातल्या इंग्रजी आणि इतर भाषिक लोकांशी बोलल्यानंतर खात्रीपुर्वक सांगु शकतो. ज्या गोर्‍यांशी निवांत बोलण्याचा वेळ मिळाला त्यांना मी आवर्जुन सांगतो की मी मातृभाषेतुन शिकलो आणी आजवर एकही गोरा असा भेटला नाही की जो म्हणाला नाही की " तुझे इंग्रजी बघुन असे वाटत नाही". थोडक्यात कार्यलयीन, कायदेविषयक, खाजगी अश्या कुठल्याही संभाषणात किंवा लिखाणात् मी मराठी माध्यमात शिकलेलो असल्याने इंग्रजीमध्ये कमी पडलो नाही. माझे बरेच शालेय सहाध्यायी परदेशात स्थायिक झालेले आहेत. आणि मला माहिती आहे की त्यांचे इंग्रजी अतिशय उत्तम आहे. अश्या परिस्थितीत जर कोणी म्हणत असेल की मराठी माध्यमात शिकल्याने पोरांचे इंग्रजी कच्चे राहिल तर ते मला अजिबात मान्य नाही. पण तरीही पोरांना मराठी माध्यमाच्या शाळेत घालताना मी नक्कीच कचरेन. सध्याच्या मराठी माध्यमाच्या शाळा अतिशय वाईट स्थितीत आहे. शिक्षक अतिशय सुमार दर्जाचे आहेत. मी शाळेत असताना अत्त्युत्तम शिक्षक होते. ते जाउन जे लोक आले आहेत ते कीव करण्याजोगे आहेत. मराठी शाळा अजुनही शिक्षणाच्या जुनाट पद्धतीत अडकुन पडल्या आहेत. सर्वांगीण विकासाच्या सोयी सुविधा मराठी शाळांमध्ये अतिशय गचाळ आहेत. आपण सग्ळे याच वातावरणात वाढलो आणि या सोयिसुविधांशिवायच शिक्षण घेतले. पण त्यावेळेस किमान शिक्षक चांगले होते. आता ते ही नाही. शिवाय जग फार वेगाने पुढे चालले आहे. आता मुलांना काळानुरुप चालले पाहिजे. जुनाट शिक्षणपद्धतीत शिकत बसले तर काळ फार वेगाने पुढे निघुन जाइल. त्यामुळे अनिच्छेने का होइना मुलांना इंग्रजी माध्यमातुन शिकवले पाहिजे असे म्हणेन.

In reply to by मृत्युन्जय

>>सध्याच्या मराठी माध्यमाच्या शाळा अतिशय वाईट स्थितीत आहे. शिक्षक अतिशय सुमार दर्जाचे आहेत. मी शाळेत असताना अत्त्युत्तम शिक्षक होते. ते जाउन जे लोक आले आहेत ते कीव करण्याजोगे आहेत. केवळ ह्याच कारणांमुळे मी मराठी मिडिअम मध्ये मुलांना घालु नका म्हणुन म्हणतो. बाकी मराठी शाळांमध्ये सुमार शिक्षक कोणत्या धोरणाने आले ते सर्वश्रुत आहे.

In reply to by मृत्युन्जय

मुक्तपीठ होत चाललेल्या धाग्यावर अखेर एक उत्तम प्रतिसाद दिसला म्हणून लिहावंसं वाटलं. मृत्युंजयाच्या बहुतेक सर्व मतांशी बाडीस. पण ८ वी ते १०वी इंग्रजीने काही तोटा झाला नाही. थोडा फार फायदाच झाला विशेषतः त्याच गणित शास्त्र विषयात ११वी / १२वी आणि अर्थात भारतीय डिग्री जी पूर्ण इंग्रजीतून असते तिथे. कुठल्याही गोर्‍याला असा विश्वास होत नाही की मी माझ्या मातृभाषेत ८-१० वर्षे शिकलो आहे. इतकेच काय परदेशात शिक्षण घेताना बरोबरचे २० भारतीय विद्यार्थी बहुधा इंग्रजी आणि शक्यतो कॉन्व्हेंट मध्ये शिकलेले आणि बरेच बड्या घरातले होते. त्यांना वर्षाच्या शेवटी एकदा विषय निघाला गप्पांमध्ये तर विश्वास बसला नाही की मराठी माध्यमात शिकलो आहे. यात माझा बडेजाव काही नाही. माझ्या वर्गातली असंख्य मुले याच अनुभवातून गेली असतील. म्हणजे मराठी माध्यमात शिकल्याने इंग्रजीत कुठल्याही स्वरुपात (कार्यालयीन, कायदा जसे अ‍ॅग्रीमेंट वगैरे, इतर देशातील लोकांशी संभाषण यात इंग्रजी देश याबरोबर इतर मुख्य भाषा असलेले इटली, जर्मनी हेही आले.) आमचे शाळेतले इंग्रजी म्हणजे मराठि माध्यमातले लोअर इंग्रजी अगदी बाळबोध आणि शुद्ध तुपातले होते. त्याचा विशेष फायदा झाला नाही आणि खूप तोटाही नाही. अभिषेकच्या प्रश्नांना उत्तर सरळ आहे - शिक्षणाच्या दर्जाची खात्री असेल तर खुशाल मराठी शाळेत जाऊदे मुलांना. प्रबोधिनी सारखी मराठी पण आणि संस्कृती जपणारी शाळा असेल तर उत्तम. म्हणजे एकीकडे गणपतीमध्ये पथके आणि दुसरीकडे शाळेत सीबीएसई. अशा ठिकाणी काही एक एकांगीपणा असतो तो चालवून घेता येत असेल तर प्रबोधिनीमधल्या माझ्या मित्र मैत्रिणींचा तिथे जाउन फायदाच झाला आहे. जेव्हा एनटिस ला सर्व शाळा एकत्र येतात तेव्हा बहुतेक वेळा प्रबोधिनीचे विद्यार्थी पुढे होते. अर्थात या गोष्टिला फार वर्ष झाली. सद्यपरिस्थिती माहीत नाही. अक्षरनंदन/ गुरुकुल अशा शाळा हा एक दुसरा पर्याय आहे. मराठी माध्यमात शिकला नाही तर वाचन बंद होणार हे मात्र सत्य आहे आणि अजून एक दोन पिढ्यांमध्ये शहरी उच्च मध्यमवर्गातून जुन्या साहित्याचे उच्चाटन होणार. याला भाषेइतकाच मराठी शाळांचा खालावता दर्जा कारणीभूत आहे. माझ्यासारखे नूमवि, भावेस्कूल, गरवारे, इ. चा कितीही अभिमान असणारे पालक मुलांना त्या शाळेत घालण्याचा विचार करू शकणार नाहीत ही वस्तुस्थिती आहे. आणि ज्यांच्या नोकरी व्यवसायात एका ठि़काणी राहण्याचा पर्याय नाही / शक्यता कमी आहे त्यांना इंग्रजी माध्यम सोय म्हणून स्वीकारावे लागेल. तरिही घरात असंख्य पुस्तके असतील, व्याख्याने सभा यांची आवड असेल, पुलंचे कथाकथन वगैरे आवड असेल तर मुलांना किमान गोडी तरी राहील. माझ्या माहितीत अशि काही मुले माझ्या वयाची पण आहेत. महाराष्ट्राबाहेर कायम राहून किमान शक्य तेवढी आवड जोपासणारे..

पण माझे असे एक निरीक्षण आहे कि मराठी माध्यमातून शिकलेली मुले तुलनेने जास्त बहुश्रुत..गमते..खोडकर..परिस्थिती बद्दल तक्रार न करता त्या वर मात करणारी असतात

एक लहान मुलानी मराठीत लिहिलेला निबंध मिळाला..तो चिकटवत आहे.... न बोलता बरच काहि सांगुन जातो तो निबंध ========================================================== खूप long ago असताना गणपतीची एक tragedy झाली होती. त्याच्या ममाला बाथ घ्यायला जायचं होतं. तेंव्हा त्याचे पप्पा कुठेतरी बाहेर गेले होते. मग त्याच्या ममानी आपल्या बॉडीवरचा डस्ट एकत्र करून एक artificial बॉय बनवला. ...आणि त्याला बाथरूमच्या डोअरवर वॉच ठेवायचा जॉब दिला. मग त्याची ममा बाथ घ्यायला गेली. थोडया टाईम नंतर त्याचे पप्पा गॉड शंकर तिथे आले. मग आपला जो artificial बॉय होता नां, त्यानी शंकरला आत येऊ दिलं नाही. डोअरच्या तिथेच अडवून धरला. त्यामुळे शंकर खूप angry झाला. शंकरला खूप इंसल्टी झाल्याचा फील आला. त्यांनी गणपतीचा हेट केला. मग त्याने रागात जावून गणपतीचा नेक कापला. त्यामुळे गणपतीचं बॉडी आणि हेड सेपरेट झालं. थोडया वेळानी त्याची ममा बाथ घेऊन आली. गणपतीचा तुटलेला नेक बघून तिला खूप शॉक बसला. तिनी angry होऊन गॉड शंकरला खूप scold केलं. माझा गणपती मला जिवंत करून दे म्हणून सांगितलं. मग गॉड शंकरनी थोडा वेळ थिंक केलं, आणि जिवंत करतो म्हणून तिला प्रॉमिस केलं. मग गॉड शंकरनी गणपतीला नवीन नेक आणण्यासाठी सगळीकडे खूप लोकं पाठवली. त्यांना सर्च करता करता जंगल मधून एक एलिफंट जात असलेला दिसला. मग त्यांनी त्या एलिफंटचा फेस गणपतीला बसवण्याचं प्लानिंग केलं. ...आणि त्या एलिफंटचा नेक कापून गॉड शंकरला आणून दिला. गॉड शंकरनी तो नेक हातात घेतला आणि magic करून गणपतीला फिट करून टाकला. मग रिअल गणपती तयार झाला. पप्पांकडून त्याला गिफ्ट म्हणून माऊस प्रेझेंट मिळाला. गणपती खूप मोठ्ठा गॉड आहे. मला गणपती खूप आवडतो. आय लव्ह यु गणपती.

सेमी इंग्लिश शाळेत घालावे, म्हणजे गणित आणि विज्ञान इंग्लिश मागे आणि मराठी हि प्रथम भाषा असावी

आमच्यावेळी प्रयोग फक्त विज्ञानाच्या बाई प्रयोगशाळेत आम्हाला करायला द्यायच्या. आता शिक्षणमंत्री विद्यार्थ्यांच्या भवितव्याबाबत दरवर्षी नित्यनियमाने प्रयोग करतात

In reply to by निनाद मुक्काम …

आमच्यावेळी प्रयोग फक्त विज्ञानाच्या बाई प्रयोगशाळेत आम्हाला करायला द्यायच्या.
__/\__ कहर !!

बायदवे पुण्यातली ज्ञानप्रबोधिनी शाळा कशी आहे? चांगली आहे असे ऐकून आहे.

In reply to by बॅटमॅन

=)) =)) =)) बॅट्या आपल्यासार्ख्यांना भरपूर वेळ हाय बे हा विचार करायला. आणि जेंव्हा वेळ येईल तोपर्यंत घरीच शिकवायची सुविधा पण असेल भौतेक. तवा तू अभ्यास चालू ठेव. ;)