Skip to main content

स॑ण आणि संस्कृती.

लेखक तुमचा अभिषेक यांनी गुरुवार, 25/04/2013 17:35 या दिवशी प्रकाशित केले.
काल रात्री ठिक बारा वाजता जेव्हा घड्याळाचे दोन काटे एकमेकाना भिडले अन तिसर्‍याने त्यांच्यापासून दूर पळायला सुरुवात केली तेव्हा अचानक मे भयानक कानठळ्या बसवणारे आवाज अंगाखांद्यावर कोसळू लागले अन मी पुरता बावचळून गेली की काय हे, मुंबई आयपीएल मध्ये एक मॅच काय जिंकली तर फटाक्यांच्या लडीच्या जागी कानफाडी करणारा कसला हा गोंधळ... आवाजाचा धमाका इतका जोरदार होता की तब्बल सत्तावीस सेकंद उलटून गेल्यावर मी भानावर आलो आणि आणखी सतरा सेकंदांनी म्हणजे एकूण चव्वेचाळीसाव्या सेकंदाला मी ओळखले की हा आवाज एका भल्यामोठ्या स्पीकरमधून येत होता ज्याचा "बास" इतका जबरदस्त होता की "आता बास" म्हणावेसे वाटत होते अन "ट्रबल" तर जणू एखाद्या शांतताप्रिय माणसाला ट्रबलमध्ये टाकणारा होता. पुढची काही सेकंदेच नव्हे तर मिनिटेच्या मिनिटे मी या खोलीतून त्या खोलीत पळापळ करत एकेक खिडक्या बंद करत होतो. जेव्हा शेवटची खिडकी बंद केली तेव्हा अचानक आवाज बंद झाला. मी एक दीर्घ श्वास घेतला. पण दुसरा श्वास घेतो न घेतो तोच दुसरे गाणे सुरू. या दोन गाण्यांच्या मधल्या काळात माझ्या आईने मला माहिती पुरवली की "अरे बाळा, उद्या हनुमान जयंती नाही का, त्याचीच असावीत ही गाणी.... शक्य आहे की नाही यावर आम्ही चर्चा करत होतो अन दोन्ही गाण्यांचे मिळून आतापर्यंत जे भक्तीपर शब्द कानावर पडले होते त्यावरून एका निष्कर्शाला पोहोचणारच होतो इतक्यात आमच्या त्या हनुमानाच्या जयंतीच्या अनुमानाची शकले उडवणारे तिसरे गाणे सुरू झाले... वान्ना बी माय छम्मकछल्लो.. ओ ओह ओ.. वान्ना बी माय छम्मकछल्लो.. ओ ओह ओ.. बस्स पुढे काय ते विचारू नका.. चादर फक्त डोक्यावरून, पंखा फुल्ल स्पीडला, कानात कापसाचे बोळे, अन मुखी तोडकीमोडकी रामरक्षा म्हणत मी झोपी गेलो. सर्व मिपाकरांना हनुमान जयंतीच्या शुभेच्छा.! सण हे सणासारखे साजरे करा, सांस्कृतिक मुल्ये जपता येत नसल्यास किमान उपद्रवमूल्यांचा त्याग करा हिच विनंती. ! - Tumcha ABHISHEK

वाचने 12605
प्रतिक्रिया 77

प्रतिक्रिया

असंच आमच्या कडे बरोब्बर १ ५ मार्च ला पारायण सुरु होतं . पहाटे ४ पासून रात्री १२ पर्यंत भसाड्या आवाजात गोंगाट चालू असतो . शाळा कॉलेज सगळ्यांच्या परीक्षा असतात डोक्यावर . या वेळी पहिल्या २ दिवसात मी आणि माझे २ मीन जाउन सांगून आलो होतो . आवाज इतका हि नका वाढवू कि त्याचा त्रास होईल परीक्षा आहे मुलांच्या . त्या मंडळाने या विनंती ला मानही दिला . आवाज अगदी कमी होता . (आणि काही खूप चांगली भजनी मंडळे पण होती . त्यामुळे ऐकायला मजा येत होती ) पण दुसऱ्या दिवशी यांचा "चेरमन " आला . आणि म्हणे देवाची भक्तीच करतोय . परीक्षा काय येत जात असतात . हवं तर तुम्ही लोक पण येउन बसा इथे . मार्क चांगले पडतील . . . आम्हाला रात्री जागरणाची सवय . आणि पारायण एका देवळाच्या आवारात चालतं . रात्री जाउन देवळावर लावलेले स्पीकरच्या वायरी कापून यायचो . :D

ना. विलासराव देशमुख यांच्या काळात ज्या चांगल्या गोष्टी झाल्या त्यापैकी एक म्हणजे माहिती अधिकार कायदा दुसरी म्हणजे ध्वनिवर्धकावर वेळेची मर्यादा. पण या निर्बंधामुळे २००५ ला पुणे पेटले होते गणपतीच्या काळात.

जी गोष्ट स्पिकरची तिच गोष्ट फटाक्यांची.. माझी आजी शेवटच्या आजारात हॉस्पिटल मधे असताना समोरच्या रस्त्यावर कोणी आमदार येणार म्हणून दहा हजारांची फटाक्यांची माळ लावली होती. आजी अक्षरशः थरथरत होती. तिथे जाऊन बोलावं तर पोलिस तिथेच उभे होते त्या आमदारच्या सुरक्षेसाठी ! उपप्र॑श्नः ती वडारवस्ती तिथे आधीपासूनच होती. हॉस्पिटल नंतर आलं. अशावेळी हॉस्पिटलांना परवानगी देण्यापूर्वी नगरपालिकेकडे काही नियम असतात की नाही?

In reply to by मराठे

दुर्दैवी प्रकार आहे... नियम असावेत.. सायलेन्स झोन, नो हॉर्न झोन सुद्धा असतो.. नक्की नियम गूगाळावे लागतील.. कोणी जाणकार असेल तर जाणून घेण्यास उत्सुक.

In reply to by मराठे

तुमचे आक्षेप वडारवस्तीत हॉस्पिटल उभे करु नये असा आहे? की आमदारांनी गाजत-वाजत हॉस्पिटलच्या आवारात येऊ नये असा आहे? - कळलं नाही.

हेहे. असंच होतं बाबा! साँड लय भारी आला पाय्जे तरच सगळ्यांना कळेल ना आपला पन 'सन' आय! (कुठेतरी ऐकलेलं वाक्य) (व्याकरण मुद्दाम जसंच्या तसं लिहीलंय.)