Skip to main content

फणसाची भाजी

लेखक सूड यांनी रविवार, 21/04/2013 08:19 या दिवशी प्रकाशित केले.
हल्ली मिपावर पारंपारिक रेशिप्या येतायेत. त्यातही कोकणातल्या फणसाच्या रेशिप्या जास्त!! उकडगरे, फणसाचा पुलाव ...म्हटलं आपणही फणसाच्या भाजीची रेशिपी टाकावी (जी अजून मिपावर आलेली नाही असं मला वाटतं). फणसाची भाजी म्हणजे जीव की प्राण. जवळजवळ दोनेक वर्ष ही भाजी केलीच नव्हती. फणस चिरायची उकडायची माहिती होती, पण मसाले? ते नक्की कोणकोणते ते आठवेना. मागे एकदा पिकनिक निघाली तेव्हा वेळासला जाणं झालं होतं. तिथं फणसाची भाजी खाल्ली होती, अतिशय सुंदर चव!! न राहावून भाजी कशी केली ते विचारलं. तर उत्तर मिळालं की, 'काही विशेष नाही जिरं मोहरीच्या फोडणीत उकडलेल्या फणसाचे तुकडे घातले, लाल तिखट घातलं आणि उतरता उतरता एक गुळाचा खडा टाकला'. तर हे येवढेच जिन्नस वापरुन भाजी चविष्ट करण्याइतकी चव काही माझ्या हातात नव्हती. मग फोनाफोनी झाली, दोन तीन ठिकाणी जालावर रेशिपी शोधणं झालं आणि सगळ्याचा सुवर्णमध्य काढून ही रेशिपी केली. आता साहित्य: एक कच्चा फणस अर्धा नारळ चार सुक्या लाल मिरच्या एक छोटी कैरी (चिंच सुद्धा चालेल) दोन छोटे चमचे एव्हरेस्ट किचनकिंग मसाला हळद जिरं मोहरी हिंग कडीपत्त्याची सात-आठ पानं साखर मीठ आधी फणस चिरायला घ्यावा. हा चिरताना घ्यायची काळजी म्हणजे दोन तीन मोठी जुनी वर्तमानपत्रं हाताशी घेऊन ठेवा. त्यातलं एक, फणस चिरायला घेतलेल्या विळीखाली अंथरा. म्हणजे फणसाच्या चिकाने फरशीची वाट लागणार नाही. आता विळीवर चिरता येत असेल तर ठीक नाहीतर सरळ विळीच्या पाटावर तो फणस ठेवा आणि सुरीने देठ कापा (त्याआधी सुरीला आणि हाताला तेल लावून घ्यायला विसरु नका). देठ कापल्या कापल्या चिकाचा ओघळ येईल तो हाताशी असलेल्या वर्तमानपत्रांचे तुकडे फाडून पुसून घ्या. बाजूचा काट्यांचा भाग तासून फणसाचे छोटे तुकडे करा. आणि निदान दोन वेळा तरी स्वच्छ धुवून घ्या. ते या फोटोत दाखवल्याप्रमाणे दिसायला हवे. आता या तुकड्यांमध्ये थोडं मीठ आणि अंदाजे दोनेक वाट्या पाणी घालून ते कुकरला लावून चार शिट्या होऊ द्या. तोवर सुक्या लाल मिरच्या साधारण कुरकुरीत होतील इतपत मध्यम आचेवर परतून घ्या. नारळाचे तुकडे करून तेही वरचेवर परतून घ्या आणि नंतर त्यात थोडं पाणी घालून बारीक वाटून घ्या. फणसाचे तुकडे उकडल्यानंतर असे दिसतील. ते आणखी बारीक चिरुन घ्या. आता एका कढईत तेल तापत ठेवा. चांगलं तापलं म्हणजे मग त्यात मोहरी घाला. ती तडतडली मग जिरं घाला. मग हिंग आणि कडीपत्त्याची पानं घाला. त्यानंतर मिरची खोबर्‍याचं वाटण घालून नीट परतून घ्या. हा मसाला रंग बदलू लागला की मग त्यात उकडलेल्या फणसाचे तुकडे घालून नीट परता, थोडं पाणी घाला. फणसाचे तुकडे ज्यात शिजवले त्यात पाणी उरलं असेल तर ते घातलं तरी चालेल. मग झाकण ठेवून एक वाफ निघू द्या. वाफ निघतेय तोवर कैरी सोलून, किसून घ्या. पाच सहा मिनीटांनी भाजीवरचं झाकण उघडून त्यात किसलेली कैरी, दोन चमचे किचन किंग मसाला, दोन चमचे साखर आणि अंदाजे मीठ घाला. नीट परतून परत झाकण ठेवा. साधारण पाच मिनीटांनी गॅस बंद करा. भाजी तयार !! तळटीपा: १) मिरची खोबर्‍याच्या वाटणासोबत खडा गरम मसाला भाजून वाटतात, पण मी किचनकिंग वर भागवलंय. २) फणस चिरुन झाल्यानंतर विळीच्या पाटाला आणि सुरीला लागलेला चिक नीट धुवून काढायची मानसिक तयारी ठेवा. ३) उकडल्यानंतर फणस चिरताना त्यातल्या आठळ्यांना सालं धरलीयेत का ते बघा, तसं असेल तर ती सालं काढून टाकावीत. नाहीतर खाताना दाताखाली येतील. ४) अतिमहत्त्वावी गोष्ट; मी अंडं घालत नसल्यामुळे ही भाजी अंडं घालून करता येते की नाही त्याचा अनुभव नाही. ज्यांना अंडी घालून पदार्थ करता येतात त्यांना कृपया असे प्रश्न विचारावे. ;)

वाचने 12278
प्रतिक्रिया 31

प्रतिक्रिया

घरात फणसाचे गरे आहेत. कैरी नाही पण चिंच नक्कीच आहे. तेव्हा आजच करते. मात्र किचन किंगपेक्षा सगळा गरम मसाला घालून करते. फोटो काढून फेसबुकावर तुला टॅग नक्कीच करीन! :D

सुड तू स्वतः फणस कापायच धाडस केलस? धन्य आहेस. मी तर हे धाडस नाही करणार, त्या ऐवजी बाजारात पाव फणस मिळतो तो आणुन भाजी करेन.

In reply to by स्पंदना

फणस कापणे फारसे अवघड नसते, त्याची एक टॅक्ट आहे. एक धारदार लांब पात्याची सुरी, पेपर आणि गोडतेल हाताशी घेवून.. १) फणसाचे पहिल्यांदा दोन भाग करायचे - ही गोष्ट जरा त्रासदायक असते - पण हीच स्टेप फक्त. २) चिक पेपरने टिपून घ्यावा ३) फणसाच्या काटेरी पाठीवर दोन इंचावर एक पाव चकती इतका भाग कापून तितक्याच भागातले गरे काढायचे, तो भाग मोकळा झाला की सहज कापून टाकता येतो.. मग पुढचा भाग.. कापा फणस असेल तर आजीबात टेन्शन नाही.

In reply to by मोदक

>>कापा फणस असेल तर आजीबात टेन्शन नाही. मला वाटतं त्या भाजीच्या फणसाबद्दल बोलतायेत, कच्चा फणस कापा असो की बरका तितकासा फरक पडत नाही असं मला वाटतं.

यु टु ब्रुट्स? अरे सध्या काय कमी छळ चाललाय का इथे?

In reply to by गणपा

गणपा दादा आता पाककृती का टाकीत नाही. खूप दिवसात गणपादांची पाककृती आली नाही. जेव्हा मिपा नवीन नवीन वाचायला सुरवात केली त्यांचा पाककृती वाचून मिपा जास्तच आवडायला लागले.

मस्त दिसतेय भाजी. ईकडे कच्चा फणस मिळतो पण चिरायचं धाडस होनार नाहि त्यामुळे येत्या भारत्वारीत तुझ्याकडेच येतो खायला कसं?

सूड तुझी ही पहिलीच पाकृ असली तर शुभेच्छा रे.

आवडेश एकदम.

शेवटचा फोटो गंडल्यामुळे काही मजा वाटेना गड्या. :( जरा चांगला फोटो टाक की. हल्ली आतल्या मालापेक्षा मार्केटींग नि जाहिरात यांना जास्त महत्त्व आहे. -पष्ट ;) प्यारे

आयला भारीच बे सुडकेश!!!!! मान गये :) अवांतरः फणसाच्या भाजीचा फील, आणि काही प्रमाणात चव चिकनसारखी असते. निदान मला तरी तसे जाणवते.

भारीच खटपट केलेली दिसतेय भाजीसाठी ! जमतेय का बघते.

ही आणि केळफुलाची! नुसती खायलाही आवडते!

In reply to by यशोधरा

केळफुलाची काळे वाटाणे किंवा चणाडाळ घालून बनवलेली भाजी खूपचं आवडते :) @ सूड फणसाची भाजी छान झालेली दिसतेय , कृती आवडली :)

अप्रतीम,प्रथमच पाहतोय ही भाजी,बर्‍याच दिवसांनी काहीतरी नाविन्यपुर्ण पाकक्रुती पाहायला मिळाली,पण करायला जमणे अवघड वाटतेय.

@aparna aksha@: कोकणातल्या माणसाने फणसाला घाबरुन कसं चालेल. ही भाजी एकदा पानात पडली की केलेले सर्व उपद्व्याप काहीच वाटत नाहीत. @अभ्या: इदु थर्ड/ फोर्थ रेशिपी अदं अन्ना !! सर्च माडी. @ प्यारेकाका: समर्थ रामदासांचे अनुयायी असूनही वरल्या रंगाला आपण कसे भुललात याचं नवल वाटलं. ;)

फार झकास. मुळात फणसाच्या भाजीला विशेष मसाले घालतच नाहीत असं आजीने आणि आईने सांगितल्याचं आठवतं. मसाल्यांमुळे फणसाचा मुळात माईल्ड असलेला मूळ स्वाद पूर्ण मारला जातो. तस्मात अगदी साधा तिखटहिंगादि फोडणीचा मसाला वापरुन साधीच भाजी चांगली लागते. गरम मसालाही जास्त ओव्हरपॉवरिंग होईल असं मत आहे. फणस चिरणे हा बोकड सोलण्याच्या बरोबरीचा प्रकार हाच एक या भाजीतला अडथळा. पण बनलेली भाजी ही जगातल्या सर्वाधिक फक्कड भाज्यांतली एक असते यात शंकाच नाही. पाकृबद्दल धन्यवाद.

In reply to by सामान्य वाचक

>>फणसाची (कुयरी) भाजी तितकी आवडत नसल्याने फणस झाडावरच होते.. असं मी म्हणालो होतो? नक्की?

मस्तच.. खुप आवडीची भाजी.. ( मी_देव - Mon, 22/04/2013 - 18:56 ) यांच्यासाठी होते. चुकीच्या ठिकाणी पोस्ट केला गेला अभिप्राय

In reply to by सामान्य वाचक

हॅ हॅ.. मला वाटतं खाणार्‍याला भाजी आवडत असण्याने फरक पडत नसून बनवणार्‍याला आवडत असणं मुख्य आहे.. विशेषतः फणसासारख्या चिरण्यासोलण्यास किचकट भाजीत. ;) म्हणून "घरात विशेष आवडत नाही" अशा स्वरुपाची मी_देव यांची ती रचना असावी..

फारच किचकट काम असते फणसाचे. पण चवीसाठी सगळे माफ!! आणि वाटण घाटण न करता , साध्या फोडणी ची चव जास्त छान येते.