Skip to main content

We are here only to make friends..!

लेखक सस्नेह यांनी मंगळवार, 23/04/2013 या दिवशी प्रकाशित केले.
काही दिवसांपूर्वी ‘We are not here to make friends ..’ या नावाचा श्री छोटा डॉन यांचा धागा वाचनात आला. ऑफिसच्या ठिकाणी जमलेल्या गाढ मैत्रीचा, मित्र दुरावल्याचा सल सांगणारा. ऑफिसात मित्र असू नयेत या निष्कर्षावर उतरलेला.... ...खरं सांगायचं तर पटलं नाही ! मुळात माणूस (त्यातून मराठी माणूस) हा ‘माणूसवेडा’ माणूस . जिथं जाईल तिथं स्वाभाविकपणाने आपुलकीचे बंध निर्माण करणारा. काही वेळा बोलण्याबोलण्यातून दुरावाही निर्माण करणारा. सुमारे दहा तास जेव्हा आपण जेव्हा घराबाहेर राहतो, तेव्हा साहजिकच एक ‘घराबाहेरचं घर’ नकळत तयार करतो. दीर्घ सहवासातून इतर बाह्यविश्वापेक्षा ऑफिसच्या विश्वाशी भावनिक जवळीक साधली जाते. अनुभव, माहिती शेअर केली जाते. छोटी मोठी सेलिब्रेशन्स एकत्रच होतात. सुखदु:खाच्या गोष्टी होतात. जिव्हाळा आपोआप निर्माण होतो. हेवेदावेही होतात. असे संबध ही एक नैसर्गिक भूक आहे. ऑफिसमध्ये अतिशय फॉर्मल वागण्याने ताणतणाव वाढण्याचीच शक्यता जास्त. उलट वातावरण अनौपचारिक असेल तर मनेही स्थिर राहतात, कामाचा उत्साह वाढतो. ऑफिसातही वावरताना अवघडलेपणा न राहता एक प्रकारचा मोकळेपणा येतो. माझा स्वत:चा अनुभव असा की ऑफिसमधल्या मैत्रीतून जोडलेले लोक्स अडचणीच्या वेळी सख्ख्या नातेवाईकांपेक्षा जास्त मदत करतात. स्त्रिया अन पुरुषही. असेच एक दोन किस्से. नोकरीला नवीनच लागले तेव्हा खूप बिचकल्यासारखं व्हायचं. फॉर्मल वातावरणाची सवय नसल्याने अवघडायला व्हायचं. हाताखाली नाईक नावाचे एक मध्यमवयीन क्लार्क होते. काम नेमस्त अन स्वभाव बोलका. बॉससमोर मोजकंच बोलणार पण नंतर तब्येतीत निवांत गप्पा मारणार . त्यांनी सगळ्या office procedures शिकवल्या. Material Requisition पासून ते WCR (Work Completion Report) पर्यंत. एकदा म्हणाले , ‘बाई तुम्हाला आज मासा कसा करायचा ते शिकवतो.’ मी ‘आ’ वासला . ‘अहो नाईक, इथं ऑफिसात मासा करायचा ?’ तसे ते खो खो हसले, ‘अहो, मासा म्हणजे Material At Site Account.’ त्यानंतर त्यांची अन माझी इतकी दोस्ती झाली की वीस वर्षांनी परवा रिटायर होताना आवर्जून येऊन बसून बोलून जेवणाचं आमंत्रण देऊन गेले. तसेच पुण्याच्या ऑफिसात नवीन नवीन join झाले तेव्हा वेल्हाळ म्हणून सहकारी शेजारी बसायचे. रिटायरमेंट एक वर्षावर आलेली त्यांची. उंच धिप्पाड अन साधारण हबशासारखी चेहेरेपट्टी. आठेक दिवस ते अगदी जुजबी बोलत. कामापुरते. मात्र माझ्या हालचालींवर बारीक लक्ष. मला ते जाणवे. आधी मला थोडीशी भीती वाटली. नंतर मात्र राग येऊ लागला. दुपारच्या सुट्टीत डबा झाल्यावर मी पर्समधून पुस्तके काढून वाचत बसे. तेही त्यांच्या नजरेतून सुटले नाही. आठव्या दिवशी डबा झाल्यावर मला म्हणाले, ‘बाई, वाचनाची आवड दिसते तुम्हाला.’ ‘हो. का ?’ मी जरा उर्मटपणेच उत्तरले. ‘समोरचे कपाट उघडा.’ मी उठून कपाट उघडले. त्यात खालच्या दोन कप्प्यातून हारीने नामवंत साहित्यिकांची पुस्तके लावलेली ! ‘तुम्हाला हवे ते घ्या वाचायला.’ वेल्हाळ म्हणाले. ‘माझीच आहेत.’ मला खजिना सापडावा तसे झाले. अगदी चोखंदळपणे मी त्यातले जयवंत दळवींचे एक पुस्तक निवडले. वेल्हाळानी उत्सुकतेने ते पाहिले. अन जे खूष झाले ! ‘बाई, तुमची नि आमची आवड निवड जमतेय बरं का ! हे दळवींचं पुस्तक मी अन दळवींनी बसून एडीट केलंय बरं ! मासे फार आवडतात दळवींना..तुम्हाला येत असले करायला तर ओळख करून देतो...!’ अन खुदुखुदु हसू लागले. नंतर मला समजले, एडिटिंग हा त्यांचा छंद कम साईड बिझनेस होता अन पुण्यातले नामवंत साहित्यिक त्यांच्या रोजच्या बैठकीत असत... ! अन त्यानंतर पुण्यातली दोन वर्षे ते माझे मार्गदर्शक कम साहित्यिक मित्र कम वडील होऊन राहिले ! परवाच समजले ते वारले म्हणून. डोळ्यात आपोआप भरलेल पाणी, सख्खे काका वारले तेव्हासुद्धा नव्हतं भरलं...! जुदा तो होनेवाले है कभी, लेकीन क्या वजह मिलनकी हसरतही छोड दे.. ? ..तुमचं काय मत, ...make friends here or not ?

वाचने 5879
प्रतिक्रिया 40

प्रतिक्रिया

मस्त लिहिलं आहेस! दोन्ही किस्से खूप आवडले. मैत्री स्थलकालावयातीत असते असं आपलं मला वाटतं. :)

आवडलं डॉणचा डॉ.अस्थाना झाला आणी तुमचा मुन्नाभाई

लेख आवडला. मैत्री करायचीच - हे दोन्ही अट्टहास सोडले की ऑफिसातही असे अनेक 'मित्र- मैत्रिणी' मिळतात असा माझाही अनुभव आहे. फक्त एखाद्या व्यक्तीशी नाही आपलं सूत जमलं तर तेही तितक्याच सहजतेने स्वीकारलं की प्रश्न संपतो. काही मैत्र्या (हेच मैत्री शब्दाचं अनेकवचन आहे का?) टिकतात, काही सुटतात! आणि हो, काही कधीकधी त्रासदायक होऊ पाहतात - त्यातून अलगद निसटता आलं की झालं :-)

अगदी खरे आहे... माझे पण असे बरेच अनुभव आहेत. पण इथे असं नाहिये. हे इथले लोक, अगदी फक्त कामा पुरतच बोलणार... आपल्याकडे अगदी आपुलकीने काळजी आणि चौकशी करतात, इथे उलट चौकशी केली की त्यांना राग येतो.

मला डान्याचाही लेख कळाला नव्हता आणि हा देखील कळाला नाही. मित्र हे मित्र असतात, त्यात हापिसमधले, ट्रेनमधले, बारमधले अशी कॅटेगरी कशी करता येते ? मुळात लोकांचा परिचीत आणि मित्र ह्यामध्ये सगळ्यात जास्ती गोंधळ उडत असावा काय ?

In reply to by परिकथेतील राजकुमार

मित्र हे मित्र असतात, त्यात हापिसमधले, ट्रेनमधले, बारमधले अशी कॅटेगरी कशी करता येते ? मुळात लोकांचा परिचीत आणि मित्र ह्यामध्ये सगळ्यात जास्ती गोंधळ उडत असावा काय ? मला असं वाटतं की जरी मित्र हे मित्रच असले तरी सगळे मित्र एकाच वेळी एकाच ठिकाणी भेटत नाहीत. वेगवेगळ्या ठिकाणी भेटणारे जिवश्च कंठश्च मित्र असल्याने 'ऑफिसातले मित्र' ही कॅटेगरी आली असावी. माझे कट्ट्यावरचे, सोसायटीतले, शाळेतले, जुन्या / नव्या कंपन्यांमधले, मुंबईचे, बँगलोरचे आणि आंतरजालीय असे अनेक ठिकाणचे एका हाकेवर धाऊन येतील असे मित्र आहेत.

गल्लत होते आहे बहुतेक ( हे वाक्य कित्येक दिवसांनी लिहायला मिळालेय ह्याचा कित्ती कित्ती आनंद झालाय काय सांगु, ह्या संधीबद्दल तुम्हाला स्पेशल धन्यवाद)... माझ्या धाग्याचे शिर्षक मी "We are not here to make friends... खरचं?' असे प्रश्नार्थी केले होते/आहे. ऑफिसात दोस्ती करु नये, ऑफिसात कामापुरतेच ओळख-पाळख दाखवावी वगैरे वगैरे जे प्रवाद आहेत त्यांना उत्तर म्हणुन मी ऑफिसात दोस्ती होऊ शकते आणि दोस्त दुरावल्यावर काय वाटते त्याचा आढावा घेतला होता. माझ्या लेखातुन 'ऑफिसात दोस्ती होऊ शकते आणि ती करावी' असेच म्हणणे मांडले होते. माझ्या लेखातली काही काही वाक्ये त्याची साक्ष आहेत. त्यामुळेच "ऑफिसात मित्र असू नयेत या निष्कर्षावर उतरलेला" असा माझा धागा अजिबात नाही हे मी ठामपणे सांगु इच्छितो, बहुतेक काही गल्लत झाली आहे. लोकांना कदाचित त्या लेखातुन तसे कळाले नसेल तर जे काही अपयश आहे ते माझे. कदाचित माझे म्हणणे मांडण्यास मी अपुरा पडुन अयशस्वी झालो असेन. असो, ह्यानिमित्ताने इथे हे स्पष्टीकरण देता आले ते बरे झाले. बाकी तुमच्या मूळ धाग्यातले किस्से आवडले. - छोटा डॉन

In reply to by छोटा डॉन

खरय मला कळला तो धागा. मुकुंदाने लावलेला जिव्हाळा व तदनुषंगिक मित्र करावेत हे पटविणारा धागा होता तो.

In reply to by शुचि

"खरय मला कळला तो धागा. मुकुंदाने लावलेला जिव्हाळा व तदनुषंगिक मित्र करावेत हे पटविणारा धागा होता तो."- शुचितै ,मला वाटते तो धागा श्रीकांत ने लावलेला जिव्हाळा व तदनुषंगिक मित्र करावेत हे पटविणारा धागा होता.

In reply to by छोटा डॉन

मला पण समजल्यासारखा वाटला लेख. स्पष्टीकरणाशिवायच. अपयश वगैरे काही नाही. तैंचे दोन्ही किस्से आवडले.

In reply to by छोटा डॉन

मला दोन्ही लेख आवडले ''लोकांना कदाचित त्या लेखातुन तसे कळाले नसेल तर जे काही अपयश आहे ते माझे. कदाचित माझे म्हणणे मांडण्यास मी अपुरा पडुन अयशस्वी झालो असेन'' माझ्या आठवणीप्रमाणे वीणा नावाच्या मासिकात वाचकांचा पत्रव्यवहार या सदरावर एक वाक्य होते ते पुढीलप्रमाणे ''मित्र तोडण्याची आणि शत्रू जोडण्याची नाजूक कला '' आता लगेच आणखी खुलासा करता येतो ,आणखी स्पष्टीकरण होऊ शकते पण हे करण्यानेही जे कळावे असे लेखकाला वाटते ते कळते ?

पण एक नक्कीच आहे. ऑफिसमधे जी मैत्री होते तोपर्यंत आपण बरेच "शहाणे" झालेले असतो त्यामुळे बदली, नोकरी बदलणे अशा कारणांनी हे मित्र लांब गेले तरी वाईट वगैरे वाटत नाही. आपण पुढे चालू लागतो. शाळा कॉलेजमधे मात्र मित्र दुरावणे हा फार मोठा आघात ठरतो. डोन्याने या लेखातलीच भावना लिहिली होती. फक्त ती काहीशी " ना ना करते प्यार तुम्हीसे कर बैठे" या प्रकारातली होती.

In reply to by रेवती

हा हा हा, सहमत आहे. ’श्री’ वगैरे काय, उगाच अंगावर झुरळ पडल्यासारखं वाटतं, त्यापेक्षा नुस्तं डॉन्या म्हटलं तरी हरकत नाही, बाकी पब्लिक तेच म्हणतं. - छोटा डॉन

In reply to by छोटा डॉन

जणू काही तुला आम्ही काय हाक मारायची हे तूच सांगितलंस / की आम्ही विचारलं होतं की तुला काय हाक मारू. अ‍ॅज इफ यु हॅव अ चॉईस :)

स्नेहा नेम जरी चुकीचा लावला असलास तरी बार एकदम दणदणीत उडालाय. डॉनराव लिहीत होते ते, या सग्ळ्यातुनही झालेल्या मैत्रीबद्दल. ते ही मस्तच होत, पण उगा लहान तोंडी मोठा घास नको म्हणुन छान वगैरे म्हंटल नाही. लय मोठी माणस ती, आम्ही चिल्लर माणसांनी छान बीन म्हंटल आणी राग्बीग आला तर? तुझे पण दोन्ही किस्से आवडले. पण एक आहे हं, डॉन्रावांच लिखाण भावनेने ओतप्रोत भरल होतं.

कामाच्या ठिकाणी अशा माणसांचा सहवास लाभणं म्हणजे मे महिन्यातल्या उन्हात पायपीट करणार्‍या माणसाची तृष्णा नारळपाण्याने भागविली जाणं...

लेखन आवडलं. पण वरती कुनीतरी म्हटलं तसं मित्र व्हायचेच तर कुठेही होउ शकतात असे दिसते.

In reply to by तुमचा अभिषेक

आपले अनुभव सविस्तर विषद (हा विषादाला जवळ जाणारा शब्द आहे का?) करा. आणि >>> ऑफिसमधल्या मुलींशी प्रेम होऊ शकते हे वाक्य स्थल, काल आणि मुख्यत्वे घटना ह्यांच्या सापेक्ष आहे किंवा कसे तेही स्पष्ट करा.

In reply to by प्यारे१

सविस्तर म्हणाल तर कधीतरी एखादी कथाच लिहायचा प्रयत्न राहील... थोडक्यात म्हणाल तर, पहिल्या नोकरीला असताना एका गुजराती मुलीशी जमवायचा प्रयत्न चालू होता, नंतर समजले की तिचा साखरपुडा जवळपास एकदीड वर्षे आधीच झाला होता.. पण हे समजायच्या आधी आणि समजल्यानंतरही बरेच किस्से घडलेत.. त्यानंतर दुसर्‍या कंपनीत देखील असेच काहीसे, पण इथे मात्र मराठी मुलगी होती.. इथे जमायला हरकत नव्हती पण त्याचवेळी मी स्वतःच ऑर्कुट या सोशल साईटवर आणखी एका मुलीच्या प्रेमात पडलो अन मग तिच्याशीच फायनल.. सध्या तिसर्‍या जॉबला आहे आणि विवाहित आहे, मात्र ऑफिसमधील एकदोन माझ्या टाईपच्या मुली बघून वाटते की मी अविवाहित असतो तर यापैकी एकीच्या मागे नक्की असतो.. :)

In reply to by सुबोध खरे

हा हा... छान फुलफॉर्म... पण नाहिये तसा.. म्हणजे आता पहिल्यासारखे येताजाता कोणत्याही मुलीच्या प्रेमात पडायचे सोनेरी दिवस गेल्याची हळहळ वाटते खरी.. पण त्या भावना हळहळ वाटण्यापुरताच असतात.. :)

In reply to by तुमचा अभिषेक

"प्यार पर बस तो नही लेकीन फिर भी ये बता दे के तुझे प्यार करुं या ना करुं"
तेच आहे ना अभिषेक प्रेम होऊ शकते. मैत्री नाही. कारण मैत्री पारखून, विचाराअंती केली जाते.

In reply to by शुचि

नाही हो.. तुम्ही म्हणता ते आंधळे अन नादान प्रेम शाळा-कॉलेजच्या वयात होते.. ऑफिसमध्ये जे प्रेम करतो ते विचारपूर्वक केलेली निवड असते.. माझी वरची पोस्ट ही वाचाल.. मी आयुष्यात दोन्ही प्रकारचे अनुभव घेतलेत, हक्काने बोलू शकतो. :)

शाळेतले मित्र जर संपर्कात असतील तरच मित्र रहातात. नाहीतर नाही.कारण कालपरत्वे अनेक संदर्भ बदलेलेले असतात. काही " यशस्वी" ना अपयशी नको असतात तर काही मागे पडलेल्याना पुढे गेलेल्याना ओळख दाखविण्यात संकोच वाटतो. एकूण काय मैत्रीत बाधा. ऑफीसातले मित्र हे अगदी मनोभावे मित्र झालेले असतातच असे नाही, ऑफिसातील काही व्हेस्टेड इन्टरेस्ट मुळे हे आपल्या भोवती फिरतात वा मान तरी ठेवतात. निवृत्त झालो की त्यातले निम्मे एका दिवसात परके होतात. काही हळू हळू परके होत जातात. रहाता राहिले सोसायटीतील मित्र. एखाद्याशीच आपले सूर जुळले तर तो उत्तम मित्र म्हणून दीर्घकाळ राहू शकतो.पण अठरा पगड जाती धर्माच्या लोकात आवडी निवडी , मतमतांतरे ई मधे सूर जुळणे कठीणच असते. त्यातील व्यवस्थापनाची भाडणे असतील तर विचारून नका. शत्रू मात्र लगेच बनत जातात. मला वाटते वरील प्रकारामुळे मिपा सारख्या ठिकाणी " समानधर्मा" शोधत आपण भटकत असतो. येथे चिकाटीने टिकून राहिले तर रंगा, धमु, अभ्या लांबचे व समवयस्क नसले तरी जवळचे वाटयला लागतात. मैत्री ही प्रीतीप्रमाणेच मनाची एक अवस्था आहे हेच खरे !