पी आय ए- पी के ३२६ अपहरण
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
मार्च १९८१ मध्ये पाकिस्तानात कार्यरत असणारी एक दहशतवादी संघटना अल झुल्पिकारने पाकिस्तान विमान कंपनीचे विमान अपहरण केले. या दहशतवादी गटाचा नेता होता पाकिस्तानचे माजी अध्यक्ष झुल्फिकार अली भुत्तो यांचा मुलगा मुर्तजा भुत्तो . हे अपहरण नाट्य तब्बल १३ दिवस चालले होते त्यावेळी हे सर्वात जास्त काळ चाललेले अपहरण नाट्य होते.
पी आय ए चे विमान उड्डाण क्र. पी.के. ३२६ नियमित देशांतर्गत वाहतुकीसाठी दिनांक २ मार्च, १९८१ रोजी कराचीहून पेशावरच्या दिशेने झेपावले. या विमानात एकुण १३५ प्रवासी आणि ९ कर्मचारी मिळून १४४ जण होते. सदर विमानाचे उड्डाण होतांच तीन शस्त्रसज्ज अतिरेक्यांनी अपहरण करून हे विमान अफगाणिस्तानच्या काबूल विमानतळाकडे वळवण्यात भाग पाडले.
पाकिस्तानच्या विविध कारागृहात कैद असणा-या ९२ राजकीय कैद्याची सुटका करण्यात यावी अशी मागणी या अपहरणकर्त्यांनी केली. हे सर्व कैदी प्रामुख्याने पाकिस्तान पीपल्स पार्टी (सध्याचा सत्तारूढ पक्ष) आणि इतर काही डाव्या विचारधारेच्या पक्षाचे होते. मात्र कराचीमध्ये तुरुंगात असलेल्या पक्षाच्या सहाध्यक्ष बेनझीर भुत्तो यांनी या अपहरणाचा विरोध केला होता.
या घटनेच्या पांचव्या दिवशी दिनांक ७ मार्च, १९८१ रोजी स्त्रीया, लहान मुले, आजारी व्यक्ती अशा २९ जणांची सुटका काबूल विमानतळावर उभ्या असलेल्या विमानातून करण्यात आली. हे विमान आठवडाभर तेथेच उभे होते. तत्कालीन पाकिस्तानी अध्यक्ष जनरल झिया उल हक यांनीअपहरणकर्त्यांची मागणी स्पष्ट शब्दात फेटाळल्या नंतर सर्व प्रवाश्याच्या समोर पाकिस्तानी परराष्ट्र सेवेतील अधिकारी असणारे प्रवासी तारीक रहीम यांची हत्या करून त्यांचा मृतदेह हवाईपट्टीवर फेकून दिला. तारीक रहीमला अपहरणकर्ते लष्करी कायद्याचे तत्कालीन प्रशासक जनरल राहिमुद्दिन खान यांचा मुलगा समजले होते. मात्र रहीम त्यांचा मुलगा नव्हता.
त्यानंतर अचानक ९ मार्चला हे विमान १०० पेक्षा जास्त प्रवाशांसह उड्डाण करून सीरियाच्या दमास्कस विमानतळावर उतरले. येथे उतरताच अपहरणकर्त्यांनी सर्व प्रवाशांसह विमान उडवून देण्याची धमकी दिली मात्र त्याचवेळी विमानतळवरील नियंत्रण कक्षातून सिरीयन अधिकारी पाकिस्तानी अधिका-यांच्या संपर्कात होते. या अधिका-यांनी अपहरणकर्त्यांना सबुरीचा सल्ला दिला. चर्चेचे सत्र संपत नाही हे पाहून अपहरणकर्त्यांनी निर्वाणीचा संदेश सिरीयन अधिका-यांपर्यंत पोहोचवला ९२ ऐवजी ५५ कैदी सोडवले तरी चालेल मात्र ठराविक वेळेत जर ही मागणी मान्य झाली नाही तर विमातील तीन अमेरीकन नागरीकांची हत्या करण्यात येईल, त्यांचे मृतदेह स्वीकारण्याची तयारी करा. ही मात्रा बरोबर लागू पडली आणि अपहरणकर्त्यांनी दिलेली वेळ संपण्याच्या २० मिनिटे आधी अध्यक्ष झिया उल हक यांनी ५५ कैद्यांना मुक्त करून सिरीयात आश्रय घेण्यासाठी खास विमानातून सोडण्याचा आदेश दिला. या आदेशानंतर चर्चेत सहभागी पाकिस्तानी अधिकारी सर्फराज खान यांचे उद्गार होते, "संपले एकदाचे हे प्रकरण"
परंतु प्रकरण संपले नव्हते कारण यादीतील ५५ कैद्यांपैकी एकाचा ठावठिकाणा लागत नव्हता तर काही कैद्यांनी पाकिस्तान सोडून जाण्यास साफ नकार दिला होता. या सर्व भानगडी निस्तरून खास बोईंग ७०७ लिबियाच्या त्रिपोली विमानतळाच्या दिशेने झेपावले आणि इकडे सीरियाने आपला निर्णय फिरवला त्यांनी अपहरणकर्त्यांना आणि त्यांच्या मित्राना राजकीय आश्रय देण्यास नकार दिला. पुन्हा एकदा ओलीस प्रवाशांचे जीव धोक्यात आले होतेच त्याबरोबरच सक्तीने मुक्त करण्यात आलेल्या कैद्यांना घेऊन उड्डाण केलेल्या विमानाचे भवितव्य देखील अधांतरी झाले होते. एक नवाच पेच निर्माण झाला होता.
शेवटी सिरीयाने अपहरणकर्त्यांना राजकीय आश्रय देण्याचे मान्य केले आणि अपहरणकर्त्यांनी शस्त्रे खाली टाकली. विमानाचा कप्तान सर्वात शेवटी बाहेर आला एक फारच लांबलेला प्रवास संपला होता.
सुटका झालेले जवळ्पास सर्व कैदी मध्यम वर्गीय कुटुंबातील तरुण होते त्यांनी सुटके नंतर अल झुल्पिकार संघट्नेचे सदस्यत्व घेतले या संघटनेचा मुख्य उद्देश माजी अध्यक्ष झुल्फिकार अली भुत्तो यांच्या हत्येचा बदला घेणे हे होते.
या अपहरणाचा नेता सालामुल्ला टिपूची काबुलच्या कारगृहात रवानगी करण्यात आली १९८४ मध्ये एका अफगाणी नागरिकाची हत्या केल्या प्रकरणी त्याला फाशी देण्यात आले त्याचा मृतदेह मात्र परत आला नाही. असे मानले जाते की त्याचे काबूल जवळच अज्ञात ठिकाणी दफन करण्यात आले.
मुर्तझा भुत्तो या प्रकरणानंतर अफगाणिस्तान मध्ये निघून गेला. त्यावेळच्या पाकिस्तानी लष्करी प्रशासनाने खटला भरला आणि त्याच्या गैरहजेरीत त्याला मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली. त्यानंतर १९९३ मध्ये त्याची बहिण बेनझीर भुत्तो पंतप्रधान असतांना पाकिस्तानात परतला. मात्र दहशतवादी कृत्ये करण्याचा आरोप ठेवून त्याला खुद्द बेनझीर भुत्तोंच्याच आदेशावरून अटक करण्यात आली. जामिनावर सुटून त्याने सिंध प्रांतातील विधानसभेची निवडणूक जिंकली आणि बेनझीरचे पती आणि सध्याचे राष्ट्रपती असिफ अली झरदारी यांचा कट्टर विरोधक बनला हे मतभेद टोकाला गेल्यानंतर सप्टेंबर १९९६ मध्ये पोलीस कारवाईत त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणावरून बेनझीरचे सरकार पदच्युत करण्यात आले आणि झरदारी यांची रवानगी जेलमध्ये करण्यात आली.
गेल्या काही दिवसांत मिपा वर भारताच्या १९९९ च्या विमान अपहरणा संबंधी लिहून येत आहे अशाच अपहरण करण-यांच्या दृष्टीने यशस्वी ठरलेल्या अपहरणाची ही एक कहाणी सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
प्रतिक्रिया
छान लेखन !
सहमत..
नविनच माहिती. छान लेख.
धन्यवाद
धन्यवाद
लेखन आवडले. मोदकाला कांपिटीसन
नाही हो...
लेख आवडला
या प्रकारचे अधिक लेखन वाचायला
या प्रकारचे अधिक लेखन वाचायला आवडेलहेच बोल्तो!!!धन्यवाद!!
प्रवाशांचा सामाजिक दर्जा
काही प्रमाणात फरक पडत असावा
परंतु रेल्वे किंवा इतर ठिकाणी
-
अशा प्रकारच्या घट्ना..
अशा प्रकारच्या
चांगली माहिती
हे एकच कारण नसावं