Skip to main content

आभार

लेखक तिमा यांनी गुरुवार, 21/03/2013 या दिवशी प्रकाशित केले.
बर्‍याचशा समारंभात, शेवटी एक 'गोग्गोड' असा आभारप्रदर्शनाचा औपचारिक कार्यक्रम असतो. आता वय झाले की जुन्या आठवणी येणारच. अशा आठवणी उगाळत असताना एक विचार चमकून गेला की, आपला शेवट जवळ आला आहे अशी कल्पना केली तर मी देवाचे आणि इतरांचे आभार कसे मानीन? आणि तेही औपचारिक नव्हे तर मनापासून. १. सर्वप्रथम, या जगांत मनुष्यप्राणी म्हणून जन्माला घातल्याबद्दल आभार. २. त्यानंतर, एका चांगल्या, मध्यमवर्गीय घरांत, साधे जीवन आणि उच्च विचार करण्याची संवय लावल्याबद्दल त्या स्वर्गस्थ मातापित्यांचे आभार. ३. मुलगा किंवा मुलगी यांत काहीच फरक नाही असे सरकारी पातळीवर जरी सांगत असले तरी, मुलगा म्हणून जन्म मिळाल्याने जे विशेष फायदे मिळाले आणि लग्न होईपर्यंत, घरांत ज्या कामचुकारपणा करण्याच्या संधी मिळाल्या त्याबद्दल आई-वडीलांचे आणि भावंडांचे आभार. ४. माझा जन्म झाला तेंव्हा आपल्या देशाला नुकतेच स्वातंत्र्य मिळाले होते त्यामुळे सर्व लोकांमधे एक विशेष उत्साह होता. काहीतरी करुन दाखवण्याची उर्मी होती. त्यामुळे त्या कालखंडात, उत्तम संगीत, उत्तम साहित्य, उत्तम कला आणि उच्च मूल्ये असलेली अनेक नाटके व सिनेमे बघण्याचे भाग्य लाभले. श्रीपाद डांगे, आचार्य अत्रे अशा अनेक वक्त्यांची उत्कृष्ट भाषणे ऐकण्याची संधी मिळाली. तर अशा भारलेल्या कालखंडात आयुष्याचा उमेदीचा काळ व्यतीत करायला मिळाला म्हणून आभार. ६. संगीताचा कान मिळाला नसता तर किती मोठ्या आनंदाला मुकलो असतो? लता-आशा यांच्या गाण्यांनी मनामधे एक न्यूनतम मानक निश्चित करुन टाकले. त्या मापदंडाने मोजूनच इतरांची पातळी ठरवता येऊ लागली. त्यावेळचे अजरामर संगीतकार, रफी, किशोर आणि तलत यांनी त्या आनंदात भरच टाकली. शास्त्रीय संगीतात तर, ज्यांचे नुसते नांव काढले तरी आदराने कान धरावे, अशा दिग्गजांना, याचि देही याचि डोळा बघण्याचा आणि त्यांच्या मैफिलीत डुंबण्याचा जो आनंद मिळाला त्याबद्दल खास आभार. ७. यश अपयशाचे क्षण प्रत्येकाच्या वाट्याला येतातच. पण अशा प्रसंगी, डोके खांद्यावर आणि पाय जमिनीवर ठेवण्याची बुद्धी दिल्याबद्दल आभार. ८. आत्मसंतुष्ट वृत्ती हा दोष असेल कदाचित, पण त्यामुळेच आहे त्यांत समाधानी राहून, या जगातल्या शर्यतीत भाग न घेता , त्याकडे अलिप्तपणे पहाण्याची दृष्टी दिल्याबद्दल आभार. ९. आयुष्याच्या विविध वळणांवर भेटलेल्या आणि चांगले-वाईट, उत्कट्-मातकट अनुभव देणार्‍या सर्व द्विपाद, चतुष्पाद, षटपाद, अष्टपाद व बहुपाद आणि सरपटणार्‍या प्राण्यांचे आभार. १०. आणि सरतेशेवटी, आधुनिक तंत्रज्ञानामुळे आपले विचार जालावर मुक्तपणे व्यक्त करण्याची संधी मिळाल्यामुळे, सर्व मराठी संकेतस्थळांचे विशेष आभार. टीपः वरील विचारांचे मनसोक्त विच्छेदन व्हावे,त्याची विडंबने पाडावीत किंवा त्यांत मौलिक भर पडावी असे वाटत असल्याने धागा 'काथ्याकूटात' टाकला आहे.

वाचने 3133
प्रतिक्रिया 14

प्रतिक्रिया

>>> आयुष्याच्या विविध वळणांवर भेटलेल्या आणि चांगले-वाईट, उत्कट्-मातकट अनुभव देणार्‍या सर्व द्विपाद, चतुष्पाद, षटपाद, अष्टपाद व बहुपाद आणि सरपटणार्‍या प्राण्यांचे आभार. काय को लाजीवता हय तिमा भो! -प्यारक सराफ ;)

८. आत्मसंतुष्ट वृत्ती हा दोष असेल कदाचित, पण त्यामुळेच आहे त्यांत समाधानी राहून, या जगातल्या शर्यतीत भाग न घेता , त्याकडे अलिप्तपणे पहाण्याची दृष्टी दिल्याबद्दल आभार.
ये एकही आभार काफी हय.

बाकी सगळंच उत्तम पण
मुलगा किंवा मुलगी यांत काहीच फरक नाही असे सरकारी पातळीवर जरी सांगत असले तरी, मुलगा म्हणून जन्म मिळाल्याने जे विशेष फायदे मिळाले आणि लग्न होईपर्यंत, घरांत ज्या कामचुकारपणा करण्याच्या संधी मिळाल्या त्याबद्दल आई-वडीलांचे आणि भावंडांचे आभार.
हे प्राञ्जळपण विशेष आवडलं.

"शास्त्रीय संगीतात तर, ज्यांचे नुसते नांव काढले तरी आदराने कान धरावे, अशा दिग्गजांना, याचि देही याचि डोळा बघण्याचा आणि त्यांच्या मैफिलीत डुंबण्याचा जो आनंद मिळाला त्याबद्दल खास आभार"

आवडल तिमा. उगा डोळे मिटाय्च्या आधी या सगळ्याचा उलगडा होउन मग तेंव्हा बोलायचीही शक्ती नाही म्हणुन विझुन जाण्याऐवजी हे अस आधीच बोलुन मन मो़कळ करण हे फार मोठेपणाच लक्षण झाल.

तिमाजी अप्पा जे काय लिहिलंय ते आवडलं हो. :D पण मी काय म्हणते, तेवढे बायकोचे आणि मुलाचे आभार मानायचे राहिले नै का? का ती दोघं ही "सर्व द्विपाद, चतुष्पाद, षटपाद, अष्टपाद व बहुपाद आणि सरपटणार्‍या " प्राण्यांमधे मोडतात.. नाही एक शंका आली आपली ( आणि तुमच्या टिपे मुळे विचारायची हिंम्मत केली एवढंच). :D :D कृ. ह्.घे.

In reply to by इन्दुसुता

तुमचे म्हणणे बरोबर आहे. त्यांचे आभारही मानणार आहे. पण ते अगदी शेवटी, म्हणजे व्हेंटिलेटरवर जाण्याच्या आधी! कारण अजून त्यांच्याकडून अनेक उपकार करुन घ्यायचे आहेत. द्विपाद च्या जागी खरं मला पक्षी असं लिहायला हवं होतं. पक्षी निरिक्षणाने मला खूप आनंद दिला आहे. चतुष्पादः कुत्रे,मांजरं यांनीही मला आनंद दिला आहे. बहुपादः लहानपणी एकदा झोपेत असताना मी रात्रभर तळमळत होतो, सकाळी कपडे धुताना आईने पाहिले तर माझ्या शर्टाच्या खिशात गोम होती. बाकी द्विपाद माणसांच्या सगळ्याच अनुभवांनी मला खूप काही शिकायला मिळालं आहे. त्यामुळे कोणाविषयीही कडवटपणा नाही. अवांतरः तिरशिंगरावचे तिमा केल्यावर त्याचे तिमाजीअप्पा होईल हे माहित असते तर मी तिमा च्या ऐवजी 'तिलोत्तमा' नांव घेतले असते!

उत्कट्-मातकट अनुभव देणार्‍या सर्व द्विपाद, चतुष्पाद, षटपाद, अष्टपाद व बहुपाद आणि सरपटणार्‍या प्राण्यांचे आभार.
:) हे 'count your blessings' इथे टाकल्याबद्दल तुमचे आभार!

आम्ही तुमच्या नावाचं 'तिमाजी अप्पा' केलेलं आवडलं नाही का काय? आमच्या साठी तर तुम्ही माणुसघाणे असतानाही तिमाजी अप्पाच होतात. :D