कॉर्पोरेटिझम, समाज आणि संशोधन
“It is one of the great ironies of corporate control that the corporate state needs the abilities of intellectuals to maintain power, yet outside of this role it refuses to permit intellectuals to think or function independently.”
― Chris Hedges
तुमचा भुतांवर विश्वास आहे का? तुमचा भानामतीवर विश्वास आहे का? तुमचा देवावर विश्वास आहे का? या आणि अशा अनेक प्रश्नांच्या चालीवर तुमचा ग्लोबल वॉर्मिंगवर विश्वास आहे का असा प्रश्न लोक एकमेकांना विचारताना पाहिले की विज्ञान ही एक श्रद्धा-अंधश्रद्धा ठेवण्याची गोष्ट आहे की काय असे वाटू लागते. तथाकथित सुशिक्षित लोक आणि भूत-भानामती वगैरेंवर चर्चा करणारे लोक यात साम्य वाटायला लागते. थोडे खोलात शिरून पाहिले तर असे दिसते की या गोष्टींवर वाद घालणारे दोन्ही बाजूकडचे लोक स्वतःला वैज्ञानिक दृष्टिकोन असलेले समजत असले तरी ते केवळ दुसर्यांनी दिलेल्या माहितीचे आणि बर्याच वेळा, दुसर्याच कोणीतरी त्या महितीकडे वेगवेगळ्या कोनांतून पाहून मांडलेल्या, गृहीतकांचे वापरकर्ते आहेत. त्यांना वैज्ञानिक दृष्टी नाही असे मला म्हणायचे नाही. पृथ्वी गोल आहे, सूर्य पृथ्वीभोवती फिरत नसून पृथ्वी सूर्याभोवती फिरते, बर्फाची घनता पाण्यापेक्षा कमी असते वगैरे अतिकीचकट नसलेल्या गोष्टी हे लोक तर्कशुद्ध गणिते व प्रयोगांनी सहज सिद्ध करू शकतात. दुर्दैवाने आजचे विज्ञान या साध्या-सरळ गृहीतकांच्या अनेक प्रकाशवर्षे पुढे गेले आहे. आज कोणत्याही क्षेत्रात काम करणारे वैज्ञानिक इतक्या खोलवरच्या आणि कीचकट गोष्टींवर संशोधन करत आहेत की सामान्य माणसाला स्वतः प्रयोग करून, गणित करून त्या गोष्टी पडताळून पाहणे शक्य नाही. किंबहुना एका क्षेत्रात काम करणार्या बुद्धिमान शास्त्रज्ञाला दुसर्या क्षेत्रातल्या संशोधनाबद्द्ल माहिती असेल असे तर नाहीच; शिवाय स्वतःच्या क्षेत्रात संशोधन करण्यासाठी लागणारी यंत्रसामुग्री व उपकरणे तयार करणे वा विकत घेणे ही एकट्या-दुकट्याच्या आवाक्यातली गोष्ट असेल असेही नाही. म्हणजेच आजच्या संशोधनाला मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आणि मनुष्यबळाची आवश्यकता असते. ही मोठ्या प्रमाणावरची गुंतवणूक आणि मनुष्यबळ एक तर सरकार पुरवू शकते किंवा मोठमोठ्या खाजगी कंपन्या.
सरकार हे लोकांचे प्रतिनिधीत्व करते त्यामुळे लोकांच्या भावी गरजा किंवा प्रश्न ओळखून त्यावर उपाय शोधण्यासाठी कोणत्याही आर्थिक फायद्याची अपेक्षा न ठेवता सरकार संशोधनाला मदत करू शकते. कंपन्यांचे मात्र तसे नाही. कंपन्या किंवा कॉर्पोरेशन्स एका विशिष्ट हेतूने जन्म घेतात आणि तो हेतू म्हणजे पैसा कमावणे. कायद्याच्या दृष्टीने कॉर्पोरेशन म्हणजे पैसा कमावण्यासाठी जन्माला आलेली एक विशिष्ट व्यक्ती असते आणि पैसा कमावण्यासाठीच प्रयत्न करणे हे कायद्याने तिच्यावर बंधन असते.
सरकारने सर्व लोकांच्या हितसंबंधांचे रक्षण करायचे आणि कंपन्यांनी आपल्या भागधारकांसाठी संपत्ती निर्माण करायची असे दोन वेगवेगळे मार्ग या संस्थांच्या वाटचालीसाठी असले आणि या दोन्ही संस्था लोकांपासूनच बनलेल्या असल्या तरी बर्याच वेळा त्यांचे मार्ग एकमेकांना आडवे जातात आणि दोन्ही संस्थांमधल्या माणसांचे ध्येय पैसे कमावणेच असल्यास त्या चव्हाट्यावर बर्याचदा विज्ञानाचा खून पडतो.
अमर्याद वाढीवर आधारित असलेली अर्थव्यवस्था आणि तिने निर्माण केलेली इंडस्ट्रीयल सिव्हिलायझेशन जसजशी जगभर पसरत गेली तसतसे हे मार्ग अनेकवेळा एकमेकांना आडवे गेलेले दिसतात. जागतिक तंबाखू उद्योग हे याचे एक अत्यंत ठळक असे उदाहरण आहे. विशेषतः कॅपिटॅलिझम(R) आणि डेमॉक्रसीTM यांची गंगोत्री असलेल्या अमेरिकेत विडीउत्पादक कंपन्यांनी शोधलेले आणि वापरलेले (कु)प्रचाराचे तंत्र क्रांतिकारक ठरले. श्री. एडवर्ड बर्नेज या सिग्मंड फ्रॉईडच्या भाच्याने त्याच्या मानसशास्त्राच्या ज्ञानाचा उपयोग करून पाश्चात्य जगात सिगारेट्सचा खप प्रचंड वाढवला. प्रत्येक बाबतीत पुरुषांची बरोबरी म्हणजेच मुक्ती असे समजणार्या स्त्रियांची मानसिकता अचूकपणे हेरून जाहिरातींतून धूम्रपानाला त्याने स्त्रियांच्या मुक्तीशी जोडून टाकले आणि पाहता पाहता स्त्रियांचे एक मोठे मार्केट या कंपन्यांना खुले झाले. पुढे फुप्फुसांच्या, गळ्याच्या वगैरे कर्करोगामागे आणि श्वसनसंस्थेच्या अनेक विकारांमागे धूम्रपान हे कारण असावे असा विदा समोर येऊ लागला तेव्हाही या कंपन्यांनी आपली प्रचारयंत्रणा वापरून आणि काही शास्त्रज्ञांना पैसे देऊन लोकांचा बुद्धिभेद करायचा प्रयत्न केला. 'धूम्रपान करणार्यांमध्ये फुप्फुसाचा कर्करोग जास्त दिसतो म्हणजे धूम्रपानाने फुप्फुसाचा कर्करोग होतो असे नाही' असा 'Correlation is not causation' मुद्दा या कंपन्यांनी मांडला. अजूनही धूम्रपानामुळे नक्की कशा प्रकारे कर्करोग होतो यावर संशोधन पूर्ण झालेले नाही. सुदैवाने धूम्रपानाने अनेक विकार होतात हे बर्याच लोकांना आणि सरकारांनाही पटले आणि पूर्ण बंदी नाही तरी या कंपन्यांच्या दबावाला बळी न पडता थोडी उपाय योजना करता येणे शक्य झाले.
एडी बर्नेजच्या प्रचारतंत्राचा निर्विवाद विजय म्हणून ज्याकडे बोट दाखवले जाते ते म्हणजे फ्लोराईडेशन. फ्लोराईड हे कारखान्यांतल्या रासायनिक प्रक्रियांमधून निर्माण होणारे एक घातक प्रदूषक रसायन आहे. या रसायनाने हाडे ठिसूळ होतात आणि हे रसायन जमिनीत सोडल्याने सगळी गुरे, झाडे व नदीतले मासे मेले म्हणून अमेरिकेतल्या मोहॉक इंडियन्सनी अॅल्युमिनिअम कंपनीवर केलेला खटला जिंकलाही होता. असे असूनही त्याने दात शुभ्र होतात असे समजून टूथपेस्टमध्ये फ्लोराईड असण्याचा आग्रह धरणारे जगभरातले ग्राहक आणि इतकेच नाही तर स्वतःच्या पिण्याच्या पाण्यात हे फ्लोराईड मिसळण्यास आक्षेप न घेणारे अमेरिकन ग्राहक हा या प्रचारतंत्राचा चमत्कारच म्हटला पाहिजे. पिण्याच्या पाण्यातून वा टूथपेस्ट मधून हे फ्लोराईड शरीरात साठत जाते आणि त्याचे दुष्परिणाम म्हातारपणी जाणवू लागतात. हे सगळं कशासाठी तर दात शुभ्र दिसण्यासाठी ज्याची गरजही कंपन्यांच्या प्रचारानेच निर्माण केलेली! या प्रचारातून कंपन्यांचा मात्र भरमसाठ फायदा झाला. प्रदूषण नियंत्रणाचा खर्चही वाचला, शिवाय ते सरकारला विकून बक्कळ पैसाही कमावता आला.
स्वतःच्या फायद्यासाठी अपायकारक पदार्थांबद्दल चुकीची माहिती संशोधनाच्या नावाखाली खपवणे इतक्यावरच या कंपन्यांचा उपद्रव सीमित नाही. स्वतःच्या व्यवसायास हानीकारक ठरू शकेल अशा संशोधनाविरुद्ध संशय निर्माण करून लोकांचा बुद्धिभेद करणे हा सगळ्यात जास्त गंभीर गुन्हा या कंपन्या करतात. नाओमी ओरेस्केस आणि एरिक कॉनवे यांच्या मर्चंट्स ऑफ डाऊट या पुस्तकात त्यांनी या कंपन्यांसाठी संशयाचे सौदागर म्हणून काम करणार्या शास्त्रज्ञांचा समाचार घेतला आहे. स्वतःचे हितसंबंध जपण्यासाठी हवामानात बदल होतच नाहीत असे म्हणणे, नंतर बदल होत आहेत असे मान्य केले तरी मानवाच्या प्रदूषणाचा त्यात हात नाही असे म्हणून आपला धंदा आहे तसाच वाढत राहील याची काळजी घ्यायचा प्रयत्न करणे, योग्य वेळ असूनही सौर व इतर ऊर्जास्रोतांचा विकास न होऊ देता खनिज तेलाच्या व्यवसायासाठीच सवलती चालू राहतील हे पाहणे, प्रत्यक्षात पर्यावरणाचा न भूतो न भविष्यति असा नाश होत असला तरी स्वतःची ग्रीन इमेज दाखवणे इत्यादी उद्योग सर्रास चालू असतात.
त्याचवेळी निसर्गाची भीती माणसाला दाखवत त्या भीतीपोटी पैसे आणि सत्ता मिळवणे हाही या कंपन्यांचा व त्यांच्या सरकारात असलेल्या साथीदारांचा आवडता उद्योग आहे. आजवर कोणताही नवीन आजार सापडला तर त्याचे मूळ आधी कोणत्यातरी विषाणूत असणार अशा दृष्टीनेच संशोधनाला सुरुवात केली जाते. स्कर्व्ही, बेरीबेरी, SMON आणि कॅन्सर अशा अनेक रोगांच्या बाबतीत विषाणूंचाच शोध घेत राहिल्याने महत्त्वाचा वेळ आणि अनेक जीव गेले. स्कर्व्ही, बेरीबेरी वगैरे रोगांचे कारण कुपोषण आणि जीवनसत्त्वांचा अभाव आहे हे सिद्ध झाले असले तरी कॅन्सर होण्याचे कारण अद्याप कळलेले नाही. कर्कजनक द्रव्यांचा त्यात मोठा वाटा आहे आणि ही कर्कजनकद्रव्ये कारखान्यांच्या व वाहनांच्या प्रदूषणातून निर्माण होतात हे सगळ्यांना माहित असले तरी कोणीही त्यावर चकार शब्द काढत नाही.
वेगवेगळ्या समूहांमध्ये विभागल्या गेलेल्या समाजाच्या कॉर्पोरेटिजमचे हे युग आहे आणि स्वत:च्या हितसंबंधांचे रक्षण करण्याच्या धुमश्चक्रीत उडणार्या धुरळ्यात सत्याचा आणि विज्ञानाचा विपर्यास अनेकदा होत राहील. त्यांच्या प्रचाराच्या गदारोळात स्वतःच्या अस्तित्वाचा मुळापासून विचार करणे, विज्ञान आणि तंत्रज्ञानातला फरक ओळखणे, खर्या अर्थाने परिपूर्ण आयुष्यासाठी स्वत:ला कशाची गरज आहे हे शोधणे आणि ते कळल्यावर तसे वागण्याचे धैर्य मिळवणे हाच आजचा खरा जीवनोपयोगी विज्ञानवादी दृष्टीकोन; तो सगळ्यांना लाभो ही सदिच्छा!
वर्गीकरण
प्रतिक्रिया
मस्त लेख!
छान लेख
+१
+१
हे पहा !
फ्लोराईड काय, अन सिगारेट काय,
पण लहान मुलांसाठी नेस्ले
छान आढावा..
दोन तासांचा दुवा तूर्त बाजूला
प्रतिसाद आवडला!
रसायने
लेखन आवडले. बरंच काय काय
वेगवेगळ्या समूहांमध्ये
अतिशय उत्कृष्ट लेख
किटाणु...
+११११११११११११११११११११.
ह्या ही पुढे जाउन कुठल्यातरी
हम्म असेलही. तसे काही केले तर
हिंदाळलेलं मराठी
+११११११११११११११.
धन्यवाद
शुद्ध लेखनातील चुका-दिलगीर आहे
छान लेख
जोपर्यंत सामान्य लोक
छान लेख
काय ताप आहे डोक्याला?
मस्तच लेख..
भारतासंबंधी दोन बातम्या:
लेख