Skip to main content

फणसाच्या कुवर्याची भाजी.

लेखक ज्योति प्रकाश यांनी सोमवार, 11/03/2013 00:25 या दिवशी प्रकाशित केले.
कुवरा म्हणजे कोवळा फणस. साहित्यः-१)कुवरा २)भिजवलेली तुरडाळ.(काळे वाटाणे,हिरवे वाटाणे,छोले,चवळी,शेंगदाणे पण घालू शकता.) ३)हळद. ४)मीठ ५)हिरवी मिरची.(उभी चिरलेली) ६)चवीपुरता गूळ. ७)खोबरेल तेल. ८)मोहरी(फोडणीसाठी) ९)बारीक चिरलेला कांदा.( optional) १०)खवलेले ओले खोबरे. कृती :-प्रथम कुवर्याच्या फोडी करून कमी पाण्यामध्ये कुकरमध्ये दोन शिट्या काधून शिजवून घ्याव्या.(भिजवलेले कडधान्य(तुरडाळ सोडून) घालायचे असल्यास कुकरमधेच फोडीबरोबर घालावे.) शिजलेला कुवरा कुस्करून घ्यावा. त्यात हळद्,गूळ व मीठ घालावे. एका भांड्यात खोबरेल तेल घालून तापल्यावर मोहरी घालून फोडणी करावी. मोहरी तडतडली की भिजवलेली तूरडाळ्,व उभी चिरलेली हिरवी मिरची घालावी व ढवळून झाकण ठेवावे व त्यावर पाणी ठेवावे. डाळ थोडी शिजली की कुस्करलेली भाजी घालून ढवळून थोडे फोडी शिजलेले पाणी घालून झाकून ठेवावे. भाजीतील पाणी आटले की त्यात ओले खोबरे घालून भाजी ढवळावी. ता.क.साहित्याचा फोटो काढताना त्यात हळद व मोहरी ठेवायची राहिली.(चु.भु.दे.घे.)

वाचने 5831
प्रतिक्रिया 13

प्रतिक्रिया

'जीवटाकार्ह' भाजी आहे ही..कृतीबद्दल धन्यवाद..आता पर्यंत खाण्यापुरताच विचार केला होता हिचा.. :)

ही भाजी कधी खाल्ली नाहिये ,पण खायला आवडेल :)

In reply to by कच्ची कैरी

कच्च्या कैरीनं, कच्च्या फणसाची भाजी खाल्ली नाहीये, असो मी देखील खाल्ली नाहीये. बाकी पातेल्यातल्या तेलात पडलेल्या मोहरीचा फोटो मस्त आला आहे, जॉमेट्री मस्त जमलीय सर्कल्सची. धन्यवाद.

पारंपरिक पाकृ. अशी भाजी लै आवडते. पण फणसाचा चीक काढून चिरणे हे काम कोण करणार? या प्रश्नापाशी गाडी अडून रहाते.

फणसाचा मधला भाग टणक असतो,( त्याला पाव म्हणतात आमच्याकडे) ती चिरताना काढणे आवश्यक आहे. कारण ती शिजत नाही. वरील फोटोत तो भाग काढलेला दिसत नाही. चिरताना विळीला किंवा ज्याने चिरणार त्या गोष्टीला तेल लावून घ्यावे. ज्या भांड्यात तो शिजवणार त्यालाही तेल लावून घ्यावे मग पाणी घालून पाण्यात शिजलेला फणस घालावा. यामुळे चिक साफ करायचा त्रास वाचतो.

ईकडे कच्चा फणस मिळण जरा कठिण आहे त्यामुळे भारतात आलो कि खायला तुमच्याकडेच येतो.

हा डिंक फार चिकट असतो. फणस आडवा चिरल्या चिरल्या कागदाचा बोळा घेऊन फणसाच्या कापलेल्या पृष्ठभागावर गोल गोल फिरवल्यास डिंकाची तार त्या बोळ्याभोवती गुंडाळली जाते. पूर्वी हा डिंकाचा गोळा कोनाड्यात भिंतीवर चिकटवून ठेवत. विस्तवाशी संबंध न येणार्‍या भांड्यांना छोटी छिद्रे पडली तर हा डिंक थोडा गरम करून त्यावर चिकटवीत असत. भांडे अगदी वॉटर्-प्रूफ बने. डाग काढणारी माणसे नेहमी उपलब्ध नसत. अशावेळी हा तात्पुरता उपाय कामी येई.