Skip to main content

पहिले चऱ्हाट

गुरुवार, 28/02/2013 या दिवशी प्रकाशित केले.
नेहमीप्रमाणे कामाचा ताण असह्य झाला होता.अंतर्मनाच्या विलपॉवर नामक टॉनिकवर वावर चालू होता.(म्हणजे तो आताही तसाच आहे.against will...) बाहेरच्या जगात काय चालले आहे, हे आपल्याच जगात असणाऱ्या माणसांना कसं उमगणार? घाण्याला जुंपलेला बैल त्या चऱ्हाटाबरोबर रवंथ करत करत तोंडाला फेस येईस्तोवर जसा गपगुमान फिरत राहतो तशी अवस्था झाली होती.पिंजऱ्यात ठेवलेले गिनिपिग एकाच जागी ते चक्र निरर्थक गोलाकार फिरवत राहातात तसा वेळात वेळ काढून काही उत्साही सहकारी ट्रेड मिलवर धापा टाकत होते.सध्या हाती असलेले प्रोजेक्ट लवकर संपवायचे आहे नि पुढचा प्रोजेक्ट हाती आला की एक मोठी पार्टी आणि काही दिवस सुटी घेऊन outing करू अशा थापा बॉस मंडळी आपल्या मरगळलेल्या कलीग्ज्सना ठोकत होते.फायलींचे ढिगारे उपसून थकले भागलेले कर्मचारी मग आणखी चरफडत होते.साहेबलोकांची ही जुनी ट्रिक ते जाणून होते.बाहेर खिडकीवर फडफड करीत बसलेली कबुतरेसुद्धा आपल्यापेक्षा नशीबवान आहेत असं हापिसातल्या अनेकांना त्यावेळी वाटून गेलं असणार.तसं वाटूनही काही उपयोग होणार नव्हता.कारण वाटणीला आलेलं काम डोक्याला झिणझिण्या आणून संपता संपत नव्हतं.त्या क्षणी 'ओ मिस्टर... डोकं ठिकाणावर आहे काय ?' असं जरी कुणी विचारलं असतं ना, तर 'थांबा फायलीत शोधून सांगतो' इतका कामाचा तो भयानक effect होता. आजच्या जीवघेण्या स्पर्धेत टिकून राहायचे असेल तर ते चक्र परिघाच्या आत राहून गोलाकार फिरवत ठेवणे भाग आहे.म्हणजे आपलाही गिनिपिग झाला आहे तर.परिघाच्या आत म्हणजे वातनूकुलित हापिसात चेहऱ्यावरची इस्त्री बिलकुल न बिघडवता सुहास्य(?) वदनाने वावरायचे असते.फार प्रयत्नांती हे शिकून घ्यावं लागतं.बॉसच्या नावाने एक चिठ्ठी ड्रावरमध्ये सरकवून आपणच आपल्या कंठ लंगोटाची गाठ आवळावी असा क्रूर,आगतिक,आत्मघातकी विचारही काहींच्या मनात उसळ्या मारत होता. पण तरीही 'कशासाठी पोटासाठी,खंडाळ्याच्या घाटासाठी 'अशी री ओढत काळ्याकुट्ट बोगद्यांतून अंधारी येईपर्यंत घाटा-घाटांतून चढणीला,मागचा सारा कुटुंबकबिला ओढत अथक धावणाऱ्या दख्खनच्या राणीसारखी प्रत्येकाची अवस्था होती. काहीही झालं तरी दिवाळसणाला सुट्टी हवीच,या हेतूनं सुमारे महिनाभर आधी टाकलेल्या रजेचा अर्ज मंजूर व्हायचे काही चिन्ह दिसेना.तसे पाहिले तर आज वसुबारस.म्हणजे छोटी दिवाळी.काहीही झालं तरी नरक चतुर्दशी,लक्ष्मी पूजन नि पाडव्याला सुटी हवीच,हा वर्षानुवर्षे चालत आलेला नियम.टाळकंच सटकलं.तावातावाने मी उठलो.बॉसच्या केबिनकडे निघालो.तेवढयात विजारीच्या खिशात गुदगुल्या झाल्या.विजेचा सौम्य प्रवाह वाहिल्यासारखे झाले. vibration modeवर ठेवलेला भ्रमणध्वनी हसत होता. पलीकडून हिचा आवाज.'जयन्तु, नेट down आहे.काहीतरी गडबड आहे.ते चालू होईल तेंव्हा होवो.पण त्या आधी मला चकलीची रेसिपी हवी आहे.मी आता माधुरीबरोबर शॉपिंगला चालले आहे.' ......' माधुरीला माहिती असेल ना चकलीची रेसिपी...' __मी 'नाही रे बाबा...गेल्या वेळी तिच्या चकलीचे कडबोळे झाले होते.तिलाही हवी आहे रेसिपी.काहीही करून आज रेसिपी आणच.'__ती आता बोलणेच खुंटले.'बरं बघतो मी' एवढंच मी म्हणालो.पुन्हा डेस्कवर आलो.एकीकडे Excel मध्ये डोके खुपसुन परवाच्या कोटेशनची नवी amendment उघडून,दुसरीकडे नेटवर पाककृती search करू लागलो. आम्ही बऱ्यापैकी खवय्ये असलो तरी बल्लवगिरी आम्हाला फारशी कधी जमली नाही. तेवढयात गणपाशेठ आठवला. लिहिलेल्या रेसिपी,करून बघण्याआधीच इतक्या चविष्ट वाचनीय असतात हा अनुभव मला पहिल्यांदा 'खा-रे-खा'वर आला.तेंव्हापासून जेंव्हा कधी आठवण होईल तेंव्हा मी 'खा-रे-खा'वर चक्कर टाकत असतो.तिथे उजव्याबाजूला असलेल्या वर्गवारीत चमचमीत click करावे की दिवाळी ? या विचारात असतानाच मला 'मिपा दिवाळी अंक' अशी कडी दिसली. दिवाळी अंक अशी अक्षरे दिसताच डोळे चमकले.नाकात नकळत उटण्याचा सुगंध दरवळला.अभ्यंग झाले की सकाळच्या तिखट गोड फराळाबरोबर चमचमीत दिवाळी अंकांवर उड्या पडण्याचे दिवस आठवले.दिवाळी अंक म्हणजे मराठी मनाचे मोरपिस.आपल्या भावंडांनी लपवून ठेवलेले दिवाळी अंक शोधून काढण्यासाठी कित्येकदा केलेला आटापिटा आठवला.कारण सर्वांनाच अंक वाचायची घाई झालेली असायची.अर्थातच मग पुढच्या काही दिवसांतच,आधाशासारखी मिसळ खावी तसा 'मिपा'चा हा वाचनीय अंक वाचून संपवला.संपवला म्हणण्यापेक्षा तृप्त पावलो असे म्हणणे योग्य ठरेल.एक नवीन मराठी संकेत स्थळ गवसल्याचा अतोनात आनंद झाला.आणि मग रीतसर इथे प्रवेशता झालो.तेंव्हा या प्रवेशाच्या निमित्ताने माझे इथले हे पहिले चऱ्हाट.हा चिरोटा(वातड की खुसखुशीत हे तुम्हीच ठरवायचे आहे) गोड मानून घ्यावा. ___जयन्तु
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 5988
प्रतिक्रिया 33

प्रतिक्रिया

आपले स्वागत आहे - अत्यंत मुंबईकर स्पा

चकलीचा चिरोटा छान झालाय. मिपावर स्वागत. असेच लिहीत रहा. फक्त एकच आपुलकीची सूचना, कृपया प्रत्येक प्रतिसादावर धन्यवाद देऊ नका. शेवट एकदम दिलेत तरी आम्हाला आवडतील.

In reply to by पैसा

मिपावर स्वागत. अवांतरः पैसापणजी नाय नाय खापर पणजी वरचा परतिसद पहिला कय?

In reply to by इरसाल

अशीच दिवसेंदिवस प्रगती होत राहिली तर माननीया सदस्या महोदया येत्या काही दिवसांतच चित्तचक्षुचमत्कारिक लेखन करून तुमच्या वळवळणार्‍या जिह्वांना मुखांत प्रतिबद्ध करून टाकतील, आणि भाषाभक्षक वाल्गुदेयाला मुखात कराङ्गुली घालायला लावतील.

In reply to by पैसा

_/\_ =))

In reply to by पैसा

=)) पै पणजीबाई, त्या धाग्यावरचा प्रतिसाद इथे पुन्हा देतोय. माननीया सदस्याचं अत्तिशय वेगाने शिकत जाण्याचं कौतुक वाटतंय.

In reply to by किसन शिंदे

१. आउटस्टँडिंग २. एक्सलंट ३.हॅव गुड ग्रास्पिंग ४.क्विक लर्नर ५. टेक्स अडिशनल रिस्पॉन्सिबिलिटी. सध्या अपरेझल चालु हायती. माननीया सदस्यांक्डे वरील सर्व गुण मौजुद आहेत.

छान लिहिले आहे. स्वागत आहे.

वारे बहाद्दरा पहिल्या लेखात बाजी मारली. तो आला ,त्याने चऱ्हाट ले व त्याने जिंकले. फक्कड लेख झाला आहे, मिपावर स्वागत लिहिते रा

मिपावर स्वागत! चिरोटा खुसखुशीत, माफक गोड झालाय. वाचकांनी पुढील लेखनाची वाट पहायला हरकत नाही. रेवती_ अत्यंत बीनपुणेरी

नक्कीच खुसखुशीत झाले आहे. मिपावर स्वागत. पु.ले.शु.

मिपावर स्वागत आहे! लिखाणात स्पार्क आहे तुमच्या; पण प्रत्येकाला धन्यवाद म्हणण्याच्या सवयीवरून तुम्ही अत्यंत पुणेरी वाटत नाही आहात. -(अत्यंतच)नगरीनिरंजन

In reply to by नगरीनिरंजन

@नगरीनिरंजनराव_ सूचनेबद्दल अत्यंतच आभारी...आता सवयच होईलच इथली, तोवर मिसळीतली तर्र्री गडबडीतच अंगावरच सांडणारच आमच्याच. आमच्या की-बोर्डातली enter कळ सरकारी नळाप्रमाणे आहे..असले पाणी की ढगाला कळ लागावी तशी बदाबदा एकाच्या दहादा एन्ट्रॅया करते.आणि अडली तर दहाव्या मजल्यावरून जरी की-बोर्ड आपटला तरी ही स्थितप्रज्ञ्च.आमच्या पुणे मनपाच्या कर्मचाऱ्यान्प्रमाणे असो. तर सांगायचा उद्देश काय ...! घ्या ह्या गाड्याला लिंबू-टिंबू मानून सांभाळून. (ता क : की-बोर्ड बदलण्यासाठी अर्ज भरलाय...तिथेही म्हणे चितळेंच्या दुकानात असते तशी रांग आहे.आमचा लंबर येइपोत्तुर' की-बोर्ड' संपले अशी पाटी न झळको. म्हणजे मिळवले.)

In reply to by नगरीनिरंजन

@नगरीनिरंजनराव_ सूचनेबद्दल अत्यंतच आभारी...आता सवयच होईलच इथली, तोवर मिसळीतली तर्र्री गडबडीतच अंगावरच सांडणारच आमच्याच. आमच्या की-बोर्डातली enter कळ सरकारी नळाप्रमाणे आहे..असले पाणी की ढगाला कळ लागावी तशी बदाबदा एकाच्या दहादा एन्ट्रॅया करते.आणि अडली तर दहाव्या मजल्यावरून जरी की-बोर्ड आपटला तरी ही स्थितप्रज्ञ्च.आमच्या पुणे मनपाच्या कर्मचाऱ्यान्प्रमाणे. असो. तर सांगायचा उद्देश काय ...! घ्या ह्या गड्याला लिंबू-टिंबू मानून सांभाळून. (ता क : की-बोर्ड बदलण्यासाठी अर्ज भरलाय...तिथेही म्हणे चितळेंच्या दुकानात असते तशी रांग आहे.आमचा लंबर येइपोत्तुर' की-बोर्ड' संपले अशी पाटी न झळको. म्हणजे मिळवले.)

चांगली सुरुवात भाउअराव. लिहित रहा. वाचत राहूच.