Skip to main content

ये कहां आ गये हम

लेखक रामदास यांनी बुधवार, 27/02/2013 21:46 या दिवशी प्रकाशित केले.
मराठी भाषा दिनानिमीत्त आणि या प्रतिसादासाठीन्माझी काही टिपणे गविच्या चरणी अर्पण पैसाआजी, आय डिसअग्री बरं का.. अधुनमधून केले यूज इंग्लिश वर्ड्स तर काय इश्यू आहे. मराठी भाषेनेच नव्हे तर कोणत्याही लँग्वेजने नेहमी अडाप्टेबल राहिलं पाहिजे, तरच सर्व्हायवल आहे. इंग्लिश वर्ड्स रोजच्या भाषेत मिंगल झाले आहेतच तेव्हा प्रत्येकवेळी डिक्शनरी घेऊन त्याचं ट्रान्स्लेशन करावं असं मी नाही इन्सिस्ट करणार बुवा.
हे माझे रीसेंट थॉट्स आहेत. माझी रीक्वेस्ट सगळ्यांनी व्होल्हार्टेडली काँट्रीब्युट करावे मी मराठीतून ईम्ङ्रजी शिकतो आहे ते अप्रीशिएट करावे
मराठी भाषा दिवसाच्या निमीताने थोडा आढावा घ्यावा म्हणतो आपल्या आयुष्याचा भाषेच्या माध्यमातून. भाषेचे रुप दर पिढीगणीक बदलते हा अस्वस्थतेचा मुद्दा नाही. भाषा नदीसारखी वाहती असते. नविन शब्द येतात -वाहून जातात किंवा तळाशी जातात. नवनवे अविष्कार चाकोरीपलीकडे जातात आणि भाषा समृध्द करतात पण काळजी वाटते ती सध्याच्या वापरात असलेल्या मराठीतून व्यक्त होणार्‍या समाज जीवनाची. भाषा असते संवादासाठी. संवादासाठी वेगवेगळी माध्यमे उपलब्ध होउनही संवाद त्रोटक झाले आहेत. लघुरुप वापरण्याची - त्यातल्या त्यात इंग्रजी लघुरुपांचा वापर-पध्दत मराठी संभाषणात वाढत जात आहे.पूर्वि तार पाठवण्यासाठी किंवा छोट्या जाहीराती लिहीताना जो शब्दांचा आटोपशीर वापर होत होता तो रोजच्या वापरात आला आहे. जे आधी हास्यास्पद होतं ते आता लोल झालं आहे.एकीकडे संवादाच्या अभावानी माणसे दूर होताना दिसत आहेत त्याच वेळी संवादाची शक्यता लघुरुप् वापरून कमी होताना दिसते आहे.असे परस्पर विरोधी चित्र एकाच वेळी दिसते आहे तेव्हा बरेच प्रश्न मनात उभे राहतात.कदाचीत ह्या अभावाने भाषेचा वापर कमी होऊन काही दिवसांनी व्यक्त होण्यासाठी फक्त स्मायलींचाच वापर तर होणार नाही ना ? आणखी एक अस्वस्थ करणारी गोष्ट म्हणजे साध्यासोपे मराठी शब्द हळूहळू हद्दपार होताना दिसत आहेत. उदाहरणार्थ पतली गली हा शब्द आला आणि बोळ हा शब्द दिसेनासा झाला. ग्लास टेबलावर आले ,त्याची गिलासं झाली आणि फुलपात्र हा शब्द अडगळीत किंवा मोडीत गेला. अ‍ॅलर्जी आली आणिइ वावडं गेलं.पूर्वी मी कामासाठी शिपायाला पाठवत होतो आता तेच काम बंदा किंवा बंदी करते आहे. सुयोग्य शब्दांचा वापर आता लोकांना अनावश्यक वाटयला लागला आही की काय असे वाटायला लागले आहे. त्या त्या क्षेत्राची जर्गन आता राजमान्य भाषा झाली आहे.काही बदल संगणकाच्या भाषेनी आणले आहेत तर काही नवीन विक्रीकलेनी आणले आहेत. एखाद्या कार्यक्रमाची घडण मराठीत सांगीतली तर समोरून उत्तर येते की प्लीज हा अल्गोरीदम समजत नाही. केवळ शब्दांच्या रुपाने मराठी बदलते आहे असे नाही तर व्यक्त होण्यासाठी वापरली जाणारी ढब आणि उदगाराचे स्वरुप पण बदलते आहे. लैंगीक क्रिया किंवा लैगीक छटा असणारे वाकप्रचार किंवा शब्दांची नवनविन रुपे अतिशय स्पष्ट शब्दात येते आहे. परवा बोलता बोलता एक मुलगी म्हणाली ते सर तर वर्गात सगळ्यांवर चढायलाच येतात. त्याच संभाषणात पुढे ती म्हणाली प्रेसेंटेशन देताना माझी तर फाटलीच होती. चढणे म्हणजे माउंटींग फॉर कॉप्युलेशन किंवा फाटणे ह्या शब्दाचा उगम ** फाटणे हा संदर्भ न समजता जेव्हा संभाषणाचा वापर होताना दिसतो तेव्हा या पिढीला आम्ही सांस्कृतीक वारसा म्हणून काय दिले असा प्रश्न पडून मन उद्वीग्न होते.
लेखनविषय:

वाचने 36465
प्रतिक्रिया 80

प्रतिक्रिया

In reply to by बाळ सप्रे

भान..भाषाभान.. नुसता जाणीव शब्दही चालेल. "कॉन्शसनेस" हा शब्द नि:संदिग्ध वाटत असताना आणि कोणालाही न समजण्याची शक्यता नसताना कशाला शोधताय आल्टर्नेट बादवे? ;)

असेच एका सुट्टित घरी चुलत वगैरे भावंड जमली अस्ताना चुलत बहिणीचा व भावाचा टिवीवर कोणते चॅनल लावायचे यावरुन वाद सुरु झाला. हा वाद शेवटी भावाने जिंकला, त्याच्या हातात रिंमोट आदळत बहिण एकदम बोलुन गेली "घे, बघ तुला पाहिजे ते. तुझीच लाल. बस." तिच्या तोंडून "तुझीच लाल" हा शब्द ऐकून तिथेच असलेले काका खूप भडकले व तिला फैलावर घेतले. पण त्या बिचारीला ह्यातून नेमका काय अर्थ निघतो तेच माहित नव्हते. ती म्हणाली मी तो शब्द "घे , तुझंच म्हणणं खरं" ह्या अर्थाने वापरला होता.

लेखातील विचारांशी सहमत. भाषा ही प्रवाही असावी. तिचे बदलते स्वरूप हेच तर तिच्या जिवंतपणाचे लक्षण आहे. सतत बदलणार्‍या जगात ते बदल व्यक्त करताना भाषा बदलणे देखिल स्वाभाविकच आहे असे वाटते. नदीचा प्रवाह जसा अडथळा आला तर वळण घेऊन पुढे वाहू लागतो तसेच भाषेचे आहे. माझा मुलगा प्राथमिक शाळेत असताना त्याला 'सुंदर' या शब्दाचा विरूद्ध अर्थी शब्द लिहायला सांगितले तर त्याने 'घाण' असे लिहिले. त्यांच्या टीचर ने ते चूक दिले. आणि ते का चूक आहे हे मला त्याला सांगता आले नाही. तसेच सम्राट या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप त्याने सम्राटीण असे लिहीले होते. पण यात मला त्याची चूक आहे असे म्हणता येणार नाही. कारण रोजच्या अनुभवातील नियम त्याने तेथे वापरला. मुलांना भाषेचे बारकावे जाणिवपूर्वक समजाऊन सांगणे, ही त्यांच्या आईवडिलांचीच जबाबदारी आहे. (त्या साठी त्यांना चांगली मराठी अवगत असायला हवी.) पण भाषेतील भेसळीचा प्रश्न फक्त मराठीलाच भेडसावत नसावा. माय फेअर लेडी या चित्रपटातील इंग्रजी भाषेचा आभ्यासक असलेला प्रोफेसर हिगिन्स सुद्धा वैतागून म्हणतोच, "व्हाय कान्ट इंग्लीशमन स्पीक इंग्लीश?" अर्थात भाषेची अतिरेकी भेसळ नक्कीच टाळायला पाहिजे. भाषाशुद्धी, आणि भाषेचे सौंदर्य या खूप पुढच्या गोष्टी आहेत. पण निदान आपण जी भाषा बोलतो ती ऐकताना कानाला आणि ऐकल्यानंतर मनाला ओंगळवाणी वाटू नये. माझी मराठी देखील म्हणावी तितकी शुद्ध नाही याची जाणीव आहे, पण मी जास्तीतजास्त शुद्ध मराठी बोलण्याचा आणि लिहिण्याचा नक्कीच प्रयत्न करते. मायमराठी आणि My मराठी यात संघर्ष न होता सलोखा असावा. आणि मराठीला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त व्हावा ही मनापासून इच्छा.

भाषायुद्धाबद्दल अभिजन विरुद्ध सामान्यजन असा झगडा मांडलेलं पुलंचं "ती फुलराणी" कुणी पाहिलय का?

In reply to by मन१

मनोबा, या तुझ्या प्रतिसादावरून एक आठवले. मागे मराठवाड्याकडील एक साहित्यिक म्हणाला होता ते पुण्याचे " पाणी " हा शब्द चुकीचा आहे " पानी" हा शब्दच बरोबर आहे. संस्कृत मधे पानीयं असेच म्हणतात ना ? " आता बोला कोणती भाषा " प्रमाण भाषा " ?

In reply to by चौकटराजा

पानीयं वरून पाणी हे मराठीच्या अभिजन बोलीत केले गेलेले रूप आहे, सबब ते शुद्ध म्हणून रूढ झालेय. संस्कृतमध्ये जिथे मूळ न, ल, इ. असेल, तिथे ण, ळ लावायची मराठीची खोड सर्वश्रुत आहे, त्याप्रमाणेच हे झालेय. शुद्ध आणि अशुद्ध हा वाद व्याकरणाबद्दल बोलताना थोडा तरी अर्थपूर्ण राहतो, बाकी शब्दरूपांबद्दल बोलायचे झाले तर तो आर्बिट्ररी असतो बर्‍याचदा. असो.

"पाचर मारली" हा असाच वाक्प्रचार ........ कधीही वापरला जातो ....

रामदासजी, अगदी समयोचित चर्चा घडवून आणलित, वरचे बरेच प्रतिसाद आवडले. पण, एकूणात लेखात थोडं अरण्यरोदन वाटलं, लेखाच्या नावासहित. भाषा प्रवाही, वापरायला सोप्पी असावी.. पु.लं, तें ह्यांनी आपल्या कलाकृतींतून / विचारातून वारंवार सांगितलय आणि ते पटलही. पुढच्या पिढीला जेवढं देता येईल तेवढं द्यायचं, घ्यायला तिला तयार करायचं, ह्यापलिकडल्या सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींवर आपला अंकुश नाही हे समजून/ मान्य करुन समाजाबरोबर चालत राहवं असं वाटतं. आता अपशब्द (स्लँग) विषयी, मुलं काय आणि मुली काय, त्यातला अर्थ समजावून घेऊन तो वापरलात जातो असं नाहीच. ती अपेक्षाच का ठेवायची, शब्दावर जोर यावा, राग/ लोभ भावनावेग व्यक्त करता यावा ह्यासाठी हे शब्द जोरकस रीत्या उच्चारले जातात... हे वारंवार होत राहिलं की ते बोथट/ गुळगुळीत बनतात, त्यांच्या अर्थात न शिरलेलंच बरं.. नुसता उच्चारण्यातच आस्वाद(!) घ्यायचा ;) जाता जाता, मराठी मध्ये हिंदी/ इंग्रजी शब्द आलेले जसे अप्राप्य वाटतात तितकेच संस्कृत शब्द वाटत नाहीत, ते सुद्धा परकेच की! विचार करण्यासारखी गोष्ट आहे.

काका , सध्या मराठी भाषेकडे अक्षम्य दुर्लक्ष्य होते आहे आणि आता तर काय सगळेस लघु रूप झाले आहे