✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

आयटीच्या गोष्टी - ऑनसाईट (१)

ध
धन्या यांनी
Sun, 02/24/2013 - 01:30  ·  लेख
लेख
आयटीच्या गोष्टी - नमन आयटीच्या गोष्टी - ऑन द बेंच शिक्षण संपलेलं असतं. नोकरीलाही आता जवळपास दोन वर्ष होत आलेली असतात. इथे आता कामात मन लागत नसतं, डोळ्यांना तिकडचे वेध लागलेले असतात. मॅनेजरला तसं आडून आडून सुचवणं चालू असतं. मनात आशा निराशेचा हिंदोळा झुलत असतो. कारण, आयटीत नोकरीला लागल्यानंतर अगदी पहिल्या दिवसापासून ज्या गोष्टीसाठी देव पाण्यात बुडवून ठेवलेले असतात ती गोष्ट वास्तवात उतरण्याची वेळ आलेली असते. दोन वर्ष ऑफशोअरला (म्हणजे भारतात) काम केलं आता मला कंपनीने ऑनसाईटला पाठवायलाच हवं असं तो ठामपणे इतरांना सांगत असतो. काय असतं एव्हढं ऑनसाईटमध्ये की ज्यामुळे आयटी इंडस्ट्री जॉईन करणारा जवळपास प्रत्येक कॉलेज पासआऊट अगदी नोकरीच्या पहिल्या दिवसापासून एक दिवस ऑनसाईटला जाण्याची स्वप्नं पाहू लागतो? काय असतं एव्हढं ऑनसाईटमध्ये की ज्यामुळे प्रत्येक अनुभवी आयटी ईंजिनीयर नविन नोकरीसाठी मुलाखत देऊन झाल्यानंतर "हाऊ अबाऊट ऑनसाईट?" असा प्रश्न मुलाखतकाराला न चुकता विचारतो? काय असतं एव्हढं ऑनसाईट असाईनमेंटमध्ये? ऑनसाईट म्हणजे बरंच म्हणजे बरंच काही असतं. आपण ऑनसाईटबद्दल अगदी सविस्तर माहिती घेऊया. या आधीच्या लेखात आपण दोन प्रकारच्या आयटी कंपन्यांची ओळख करुन घेतली, एक प्रोडक्ट बेस्ड आणि दुसरा प्रकार सर्व्हीस बेस्ड. प्रोडक्ट बेस्ड कंपनीची एक किंवा अनेक संगणक प्रणाली उत्पादने असतात. आणि ही उत्पादने ती कंपनी आपल्या ऑफीसमध्ये डेव्हलप करुन ईतर नित्योपयोगी वस्तूंसारखी संगणकाच्या दुकानांमार्फत किरकोळ विक्री करत असते. ही सारी उत्पादनं एका सीडीत किंवा अनेक सीडीच्या संचात मिळतात. आपण सीडी घरी आणायची, त्यातला सेटप प्रोग्राम रन करायचा, सेटप प्रोग्रामच्या सुचनांनुसार माहिती द्यायची की झालं. जेमतेम पंधरा वीस मिनिटांत ते सॉफ्टवेअर आपल्या संगणकामध्ये वापरण्यास उपलब्ध होतं. विंडोज सारखी संचालन प्रणाली संगणकावर स्थापित करायची असेल तर दिड दोन तास लागतात. अर्थात हे झालं वैयक्तिक वापरातील सॉफ्टवेअरबद्दल. काही संगणक प्रणाली उत्पादनं मोठमोठया उद्योगसंस्थांमध्ये त्यांचा पुर्ण कारभार संगणकीकृत करण्यासाठी वापरली जातात. अशा संगणक प्रणालींना उद्योग संसाधने नियोजन प्रणाली (ईआरपी - एंटरप्राईज रीसोर्स प्लानिंग सिस्टीम) म्हणतात. आणि या सिस्टीम बरेच वेळा ग्राहकाच्या गरजेनुसार बनवल्या जातात किंवा आयटी कंपनी जी ईआरपी सिस्टीम बाजारात विकते तिच्यात ग्राहकाच्या गरजेनुसार फेरफार (कस्टमायझेशन) केले जातात. हे अर्थात उपलब्ध असलेल्या ईआरपी सिस्टीम मध्ये फेरफार करुन ती ग्राहक कंपनीच्या कर्मचार्‍यांच्या वापरायोग्य करण्यासाठी किंवा पुर्णतः नविन ईआरपी सिस्टीम बनवण्यासाठी संगणक प्रणाली विकासकांना (सॉफ्टवेअर डेव्हलपर्स) ग्राहक उद्योगाची सखोल माहिती (डोमेन नॉलेज) असावी लागते. त्या ग्राहक उद्योगाचे वेगवेगळे विभाग एकमेकांशी कशा पद्धतीने जोडलेले आहेत, त्यांच्यात कशा पद्धतीने माहितीची देवाण घेवाण होते ही माहिती गोळा करणे आवश्यक असते. तसेच एकदा हवी तशी संगणक प्रणाली बनवून झाली, तिच्या आवश्यक त्या चाचण्या झाल्या की ती प्रणाली ग्राहक उद्योगासाठी वापरात आणावी लागते. अर्थात आता ही प्रणाली एकाचवेळी त्या उद्योगाचे शेपाचशे किंवा हजारो कर्मचारी वापरणार असल्याने ती वापरात आणणे एक सेटप प्रोग्राम रन करुन होणार नसते. त्यासाठी सेवादाता (सर्व्हर), विदागार (डेटाबेस) अशा उच्च शक्तीच्या संगणक यंत्रणा बसवाव्या लागतात. आणि ही सारी कामे करण्यासाठी आयटी कंपनीला आपली काही माणसे त्या ग्राहक उद्योगाच्या कार्यालयात पाठवावी लागतात. संगणक प्रणालीच्या निर्मितीचं किंवा तिच्या स्थापनेचं किंवा तिच्या देखभालीचं काम ग्राहकाच्या कार्यालयातूनच करणे म्हणजे ऑनसाईट असाईनमेंट. सर्व्हीस बेस्ड आयटी कंपन्यांमधल्या कामामध्ये काही वेळा थोडासा फरक असतो. बरेच वेळा प्रोजेक्टच्या सुरुवातीला एक दोन माणसे ग्राहकाच्या कार्यालयात संगणक प्रणालीच्या गरजांची माहिती (रिक्वायरमेंट गॅदरींग) मिळवण्यासाठी जातात. त्यानंतर ती संगणक प्रणाली पुर्णपणे आयटी कंपनीत विकसीत केली जाते. काही ग्राहक कंपन्यांचे स्वतःचे संगणक विभाग असतात. अशावेळी आयटी कंपन्यांचे काही विकासक ग्राह्काच्या कार्यालयातून ग्राहक कंपनीच्याच संगणक तज्ञांच्या देखरेखीखाली काम करतात. कामाचा व्याप जास्त असेल तर जोडीला आयटी कंपनीच्या कार्यालयातूनही काही माणसे काम करतात. म्हणजे आता एकाच प्रोजेक्टवर काम करणार्‍या दोन टीम तयार झालेल्या असतात. ग्राहकाच्या कार्यालयातून काम करणारी ऑनसाईट टीम आणि आयटी कंपनीच्या कार्यालयातून काम करणारी ऑफशोअर टीम. ऑनसाईट टीममधला आयटी कंपनीचा ज्येष्ट विकासक ऑफशोअर टीम आणि ऑनसाईट टीम मधला दुवा (ऑनसाईट कॉऑर्डीनेटर) म्हणून काम करतो. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की कुठून तरी कामच करायचे आहे. मग ते ग्राहकाच्या कार्यालयातून केले काय किंवा आयटी कंपनीच्या कार्यालयातून केले काय. काय फरक पडतो. फरक पडतो. ग्राहक जर परदेशातील असेल तर खुपच फरक पडतो. एव्हाना तुमच्या हे लक्षात आले असेल की मोठया संगणक प्रणालींचे दोन प्रकारचे ग्राहक असतात. १. देशांतर्गत ग्राहक (डोमेस्टीक क्लायंट) २. आंतरराष्ट्रीय ग्राहक (ईंटरनॅशनल क्लायंट) जर देशांतर्गत ग्राहकाच्या कार्यालयात जाऊन विकासकांना काम करावयाचे असेल आणि हे ग्राहकाचे कार्यालय दुसर्‍या शहरात असेल तर आयटी कंपनी आपल्या विकासकांना प्रवासभत्ता देते. विकासकांची त्या शहरात राहण्याची सोय करते. पगार मात्र जो आहे तोच चालू राहतो. ग्राहक जर परदेशातला असेल तर आयटी ईंजिनीयर्ससाठी ती सुवर्णसंधी असते. कामानिमित्त का होईना, कंपनीच्या खर्चाने परदेशवारी घडते. काम जास्त दिवस चालणार असेल तर कंपनीच्या खर्चाने सहा महिने वर्षभर त्या देशात राहताही येते. पगार मात्र दोन प्रकारे दिला जाऊ शकतो. एक म्हणजे कंपनी भारतातलाच पगार देते परंतू परदेशातला राहण्याचा आणि जेवणाचा खर्च कंपनी करते. म्हणजे भारतातला पगार पुर्णपणे बचत करता येऊ शकतो. दुसरा प्रकार म्हणजे आयटी कंपनी आपल्या आयटी ईंजिनीयर्सना ग्राहकाकडे कंत्राटी कर्मचारी म्हणून पाठवते. ग्राहक कंपनी आयटी कंपनीला प्रत्येक कंत्राटी कर्मचार्‍याच्या कामाचा मोबदला महिना अखेरीस देते. आयटी कंपनी त्या रकमेतून आपले खर्च, फायदा वगैरे वजा करुन एक ठराविक रक्कम (त्या देशातील चलनात) आपल्या त्या देशातल्या कर्मचार्‍यांना देते. या पद्धतीत राहण्याची आणि जेवणाची सोय कर्मचार्‍यांनी आपली आपण करायची असते. तसेच तो कर्मचारी जेव्हढे दिवस परदेशातून काम करेल तितके दिवस भारतातील पगार बंद असतो. कामाचा कालावधी एक वर्षापेक्ष जास्त असेल तर बर्‍याचशा आयटी कंपन्या अकरा महिन्यानंतर आपल्या कर्मचार्‍यांना एक महिन्याची बिनपगारी सुट्टी घेऊ देतात. या सुटटीत त्या कर्मचार्‍याला भारतात येऊन परत जायचे असेल तर प्रवासभाडयाचा खर्च कंपनी करते. देशांतर्गत ग्राहकाकडे ऑनसाईटला जाऊन काम करण्यास आयटी ईंजिनीयर्स तितकेसे उत्सुक नसतात. कारण एक दुसर्‍या शहरात जाऊन राहण्याचा अनूभव सोडला तर त्यात विशेष काही फायदा नसतो. कंपनी जरी प्रवासभत्ता देत असली आणि राहण्याची सोय करत असली तरी काही काळासाठी स्थलांतरीत होण्याच्या दगदगीमुळे आयटी ईंजिनीयर्स या प्रकाराला नाक मुरडतात. परदेशात ऑनसाईट जाण्यासाठी मात्र आयटी कंपन्यांमध्ये गळेकापू स्पर्धा असते. कंपनीच्या खर्चाने परदेशवारी, वर्ष दोन वर्ष परदेशात राहावयास मिळाल्यास होणारी दहा वीस लाखांची बचत, परत आल्यानंतर मिळणारा "फॉरीन रीटर्न्ड" टॅग आणि आयटी मार्केटमध्ये मिळणारा भाव असे अनेक फायदे असल्यामुळे बरेच वेळा एखादया ऑनसाईट जागेसाठी आयटी ईंजिनीयर पाठवताना कधी कधी राजकारणाईतकेच गलिच्छ राजकारण खेळले जाते. मॅनेजर लोक आपल्या चमच्याचा नंबर लावण्यासाठी कधी कधी अनाकलनिय कोलांटया उडया मारतात. तसेच एकदा कोण जाणार हे नक्की झाले की तो जाणार्‍या पहिल्यांदाच त्या देशात जाणार असेल तर व्हिजा ईंटरव्ह्यू नावाचं एक दिव्य जाणार्‍याला पार पाडावं लागतं. या सार्‍या गमती जमती आपण पुढच्या भागात पाहू.

Book traversal links for आयटीच्या गोष्टी - ऑनसाईट (१)

  • ‹ आयटीच्या गोष्टी - ऑन द बेंच
  • Up
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
तंत्र
लेखनप्रकार (Writing Type)
माहिती

प्रतिक्रिया द्या
32759 वाचन

💬 प्रतिसाद (127)

प्रतिक्रिया

तू बायबलात लिहीलेलं सगळं खरंच

३_१४ विक्षिप्त अदिती
गुरुवार, 02/28/2013 - 04:24 नवीन
तू बायबलात लिहीलेलं सगळं खरंच मानतेस का काय? (या बाबतीत आमचे पूर्वज निश्चितच फार महान होते. त्यांनी सदर उपकरणाची साद्यंत माहिती लिहून, कोरून ठेवली असण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि

आवेशात मर्यादाभंग झाला असेल

विश्वनाथ मेहेंदळे
गुरुवार, 02/28/2013 - 10:22 नवीन
आवेशात मर्यादाभंग झाला असेल तर माफ करा, पण माझा उद्देश कुणाचाही अपमान करण्याचा नव्हता. एखादी गरज कृत्रिमरित्या भागवायची सोय बाजारात आहे म्हणून नैसर्गिक मार्ग सोडून ती सोय आवर्जून वापरावी असे नाही, इतकेच म्हणायचे होते. आता वाटते की कोल्ड ड्रिंक आणि पाणी हे उदाहरण वापरून पण काम झाले असते :-) असो, तुमचा सेन्स ऑफ ह्युमर चांगला आहे आणि तुम्ही चुकीचा अर्थ काढणार नाही हे माहित होते म्हणून फार विचार केला नसेल मी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

टाळ्या....

मन१
Tue, 02/26/2013 - 18:04 नवीन
अत्यंत सेन्सिबल प्रतिसाद . आधी "ज्याचे सुख त्याला ठरवू दे" हे वरवर ठीक वाटलेलं. पुन्हा प्रतिसाद वाचून दुसरी बाजू जाणवली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

वाचतोय

राजेश घासकडवी
Tue, 02/26/2013 - 01:56 नवीन
या सगळ्यामागचं अर्थशास्त्र काय आहे यावरही कधीतरी वाचायला आवडेल. वेगवेगळ्या क्लायंट्सकडून कंत्राटं मिळवणं, त्यासाठीची स्पर्धा, त्यात नक्की काय पणाला लागलेलं असतं, त्यात लबाड्या कशा होतात वगैरेवरही येऊ द्यात. (यातल्या काही बाबींचा ओझरता उल्लेख केलेला आहेच...) पूर्वी आखाती देशांत जाण्याची क्रेझ होती. तिथे जाणारे लोक अशिक्षित मजूर म्हणून जायचेच, पण काही सुशिक्षित लोकही व्हाइट कॉलर जॉब करायला जायचे. अर्थातच सगळेच लोक आपापल्या क्षेत्रातली कमी स्किलची कामं करायचे, फक्त पैसा दाबून मिळायचा म्हणून जायचे. सध्याच्या ऑफसाइटी लाटेतही तेच चित्र आहे का? एकंदरीत भारतीय आयटीची कौशल्य-पातळी गेल्या दशकांत वाढलेली आहे का? अशा इतरही अनेक विषयांवर वाचायला आवडेल. तूर्तास सगळे लेख वाचतो आहे.
  • Log in or register to post comments

सहमत...

आनन्दिता
Tue, 02/26/2013 - 02:14 नवीन
सहमत... या एकंदर अर्थकारणाबद्दल ऐकायला आवडेल. per diem बद्दल थोडं लिहा की राव!! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

पैसा आणि अनुभव मिळविणे

येडा अण्णा
Tue, 02/26/2013 - 02:43 नवीन
ऑनसाईट जाण्यामागे मुख्य उद्देश हा पैसा आणि अनुभव मिळविणे असतो. माझा तरी आहे :). कंपनीच्या खर्चाने परदेशवारी हा अजुन एक फायदा असतोच. per diem बद्दल थोडं लिहा की राव!! per diem हे जेव्हा तुम्ही बिझनेस विजावर ऑनसाईट जाता तेव्हा लागू होते. कम्पनि तुमचा रहाण्याचा आणि प्रवासाचा खर्च करते आणि काहि रक्कम वरखर्चाला देते. या वरच्या रकमेतुन जेवढे वाचतिल तेवढे पैसे तुम्हाला मिळतात. भारतात तुमचा पगार चालूच रहातो. कामाचा कालावधी एक वर्षापेक्ष जास्त असेल तर बर्‍याचशा आयटी कंपन्या अकरा महिन्यानंतर आपल्या कर्मचार्‍यांना एक महिन्याची बिनपगारी सुट्टी घेऊ देतात. या सुटटीत त्या कर्मचार्‍याला भारतात येऊन परत जायचे असेल तर प्रवासभाडयाचा खर्च कंपनी करते. आमची कंपनी २ आठवड्याच्यावर सुट्टी देत नाहि आणि प्रवासभाडयाचा खर्च हि देत नाहि. मला ३ वर्षे झाली पण अजुन एकदाहि सुट्टी नाही मिळाली :( बाकि अफवे बद्दल विमेशी सहमत.
  • Log in or register to post comments

आमची कंपनी २ आठवड्याच्यावर

धन्या
Tue, 02/26/2013 - 20:02 नवीन
आमची कंपनी २ आठवड्याच्यावर सुट्टी देत नाहि आणि प्रवासभाडयाचा खर्च हि देत नाहि. मला ३ वर्षे झाली पण अजुन एकदाहि सुट्टी नाही मिळाली.
आणि तरीही तुम्ही दुसरी नोकरी शोधत नाही? आयटीत एकाच नोकरीला वर्षानुवर्षे चिकटून राहण्याचा काय अर्थ घेतला जातो हे तुम्हाला माहिती असेलच. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: येडा अण्णा

आणि तरीही तुम्ही दुसरी नोकरी

येडा अण्णा
Tue, 02/26/2013 - 21:47 नवीन
आणि तरीही तुम्ही दुसरी नोकरी शोधत नाही? आयटीत एकाच नोकरीला वर्षानुवर्षे चिकटून राहण्याचा काय अर्थ घेतला जातो हे तुम्हाला माहिती असेलच
कुणी काहीही अर्थ घेतला तरी आपल्याला फरक पडत नाही. आणी दुसरी नोकरी ऑनसाईट्ला असे पर्यन्त शोधायची गरज नाहि धनाजीराव. कारण दुसरी नोकरी शोधायचे मुख्य कारण ऑनसाईट अथवा बढती मिळवणे असते. मला दोन्हि आहे तिथेच मिळतेय. मग कशाला दुसरीकडे जावु? आणी असेही एल १ विजा वर नोकरी नाही हो बदलता येत :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

आणी दुसरी नोकरी ऑनसाईट्ला असे

धन्या
Tue, 02/26/2013 - 22:30 नवीन
आणी दुसरी नोकरी ऑनसाईट्ला असे पर्यन्त शोधायची गरज नाहि धनाजीराव. कारण दुसरी नोकरी शोधायचे मुख्य कारण ऑनसाईट अथवा बढती मिळवणे असते. मला दोन्हि आहे तिथेच मिळतेय. मग कशाला दुसरीकडे जावु?
गंमतीत म्हटलं होतं राव. लईच सिरीयसली घेतलं तुम्ही.
आणी असेही एल १ विजा वर नोकरी नाही हो बदलता येत.
हा खुप छोटा प्रॉब्लेम आहे. जेमतेम दोन वर्षांच्या करीयरनंतर एल १ वर गेलेल्या पोरांनी समोरच्या अमेरिकन कंपनीला एच १ काढायला लावून एल १ वर अमेरिकेत पाठवणार्‍या भारतीय कंपनीला तिकडूनच टाटा बाय बाय केल्याची खुप उदाहरणे पाहीली आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: येडा अण्णा

बर्‍याच वेळा ऑनसाईटला जायला

खटपट्या
Tue, 02/26/2013 - 03:02 नवीन
बर्‍याच वेळा ऑनसाईटला जायला मिळतेय म्हणून मनाला न आवडणारे कामही करावे लागते. सध्या मी हे अनूभवतोय ......
  • Log in or register to post comments

> > एक प्रोडक्ट बेस्ड आणि

नर्मदेतला गोटा
Tue, 02/26/2013 - 03:10 नवीन
> > एक प्रोडक्ट बेस्ड आणि दुसरा प्रकार सर्व्हीस बेस्ड एक मालक कंपनी दुसरी नोकर कंपनी असे का म्हणत नाही
  • Log in or register to post comments

>> एक प्रोडक्ट बेस्ड आणि

धन्या
Tue, 02/26/2013 - 20:15 नवीन
>> एक प्रोडक्ट बेस्ड आणि दुसरा प्रकार सर्व्हीस बेस्ड >> >>एक मालक कंपनी दुसरी नोकर कंपनी असे का म्हणत नाही नाही. इथे कंपनी मालक किंवा नोकर असण्याचा संबंधच नाही. त्यामुळे दोन्ही मराठी शब्द चुकीचे ठरतील. प्रोडक्ट बेस्ड = स्वतःची संगणक प्रणाली उत्पादने बाजारात विकणारी कंपनी. या प्रकाराला आपण उत्पादक कंपनी किंवा उत्पादनाधिष्टीत कंपनी म्हणू शकतो. हे म्हणजे एखाद्या घरगुती खानावळीने पोळ्या विकण्यासारखे आहे. आपल्याला पोळ्या हव्या असतील तर त्या खानावळीत जायचे, पैसे द्यायचे आणि पोळ्या घेऊन यायच्या. सर्व्हीस बेस्ड = ग्राहकांना त्यांच्या आवश्यकतेनुसार हवी तशी संगणकीकरण्सेवा देणे. याला सेवादाता कंपनी म्हणता येईल. हा प्रकार अगदी घरकामाला येणार्‍या बाईंसारखा आहे. त्या बाई ज्यांच्याकडे घरकामाला जातात त्यांच्या गरजेनुसार पोळ्या बनवतात, घराची साफसफाई करतात, कपडे धुतात वगैरे. बरीचशा भारतीय आयटी कंपन्या याच प्रकारचे काम करतात. म्हणून तर भारतीय आयटी ईंजिनीयर्सना आयटी हमाल म्हणतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नर्मदेतला गोटा

दोनी उदाहरण बेस हयता ........

खबो जाप
Wed, 02/27/2013 - 15:51 नवीन
दोनी उदाहरण बेस हयता ......... :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

>> म्हणून तर भारतीय आयटी

नर्मदेतला गोटा
गुरुवार, 02/28/2013 - 13:27 नवीन
>> म्हणून तर भारतीय आयटी ईंजिनीयर्सना आयटी हमाल म्हणजे तेच ना मालक कंपनी आणि हमाल कंपनी . हे हे ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

या प्रकाराच्या अर्थकारणाबद्दल

५० फक्त
Tue, 02/26/2013 - 07:42 नवीन
या प्रकाराच्या अर्थकारणाबद्दल डिट्टॅल मध्ये वाचायला आवडेल. आमचा बराचसा धंदा यावर अवलंबुन आहे म्हणुन.
  • Log in or register to post comments

वाचतोय. जबर्‍या मज्जा येते

मृत्युन्जय
Tue, 02/26/2013 - 11:52 नवीन
वाचतोय. जबर्‍या मज्जा येते आहे. पुलेशु.
  • Log in or register to post comments

दोन गमतीदार अनुभव

प्रसाद१९७१
Tue, 02/26/2013 - 12:07 नवीन
ही गोष्ट शिकागो ची, २००% खरी. जसे वर कोणीतरी म्हणले आहे तसे शिकागो मधे एका अपार्टमेंट कॉम्प्लेक्स मधे बरेसचे तेलगू आटी वाले लोक रहात होती. त्यांच्या बायका भारतातल्या सवयीनुसार साड्या खिडकीत वाळत घालायच्या त्यामुळे त्या बाहेर लोंबायच्या. अपार्ट्मेट मॅनेजमेंट ला हा प्रकार बघुन काही कळेना, मग थोडे दिवस वाट बघुन त्यांनी एक नोटिस circulate केली. "खिडक्यांना आतुन पडदे लावावेत. बाहेरुन लावले तर त्यामुळे अपार्टमेंट ची शोभा जाते" वर उल्लेखलेल्या बायकाच त्या कॉम्प्लेक्स च्या जलतरण तलावात पूर्ण कपडे घालुन पोहायच्या ( म्हणजे डुंबायच्या ). तेंव्हा सुद्धा अपार्ट्मेट मॅनेजमेंट ला नोटिस काढावी लागली
  • Log in or register to post comments

वर उल्लेखलेल्या बायकाच त्या

परिकथेतील राजकुमार
Tue, 02/26/2013 - 12:15 नवीन
वर उल्लेखलेल्या बायकाच त्या कॉम्प्लेक्स च्या जलतरण तलावात पूर्ण कपडे घालुन पोहायच्या ( म्हणजे डुंबायच्या ). तेंव्हा सुद्धा अपार्ट्मेट मॅनेजमेंट ला नोटिस काढावी लागली
काय नोटीस काढली म्हणे ? पूर्ण कपडे घातले असतील तर तलावाच्या बाहेरच उताणे पडून हातपाय हलवावेत ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१

पूर्ण कपडे घातले असतील तर

संजय क्षीरसागर
Tue, 02/26/2013 - 13:42 नवीन
तलावाच्या बाहेर पालथे पडून हातपाय हलवावेत ! (अशी नोटीस असेल) किंवा ` कपडे उतरवायचे नसतील तर घरच्या टबातच डुंबावे'
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

प्रेसिडेन्शियल टॉवर्स का?

समीरसूर
Tue, 02/26/2013 - 14:01 नवीन
ही गोष्ट शिकागोमधल्या प्रेसिडेन्शियल टॉवर्स मधली आहे का? तिथे खूप भारतीय आणि त्यातल्या त्यात तेलुगु खूप राहतात. पण अपार्टमेंट मस्त आहे हे खूप. तुम्ही म्हणता तसे मी कधी पाहिले नाही तिथे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१

प्रेसिडेन्शियल टॉवर्स

आजानुकर्ण
Tue, 02/26/2013 - 18:49 नवीन
प्रेसिडेन्शियल टॉवर्सचा ऐकलेला एक किस्सा असा की एका मराठी माणसाचे आईबाबा प्रेसिडेन्शियल टॉवरच्या बाहेर खुर्ची टाकून ऊन खात बसले होते. एक अमेरिकन युटिलिटी कंपनीचा नोकर कोणालातरी शोधत तिथे आला आणि त्याने कोणा जॉन स्मिथ बाबत यांच्याकडे चौकशी केली. यावर या मराठी महाशयांनी उत्तर दिले की 'नो फॉरिनर्स लिव हिअर. ओन्ली इंडियन्स'
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: समीरसूर

वर उल्लेखलेल्या बायकाच त्या

बॅटमॅन
Tue, 02/26/2013 - 14:07 नवीन
वर उल्लेखलेल्या बायकाच त्या कॉम्प्लेक्स च्या जलतरण तलावात पूर्ण कपडे घालुन पोहायच्या ( म्हणजे डुंबायच्या ). तेंव्हा सुद्धा अपार्ट्मेट मॅनेजमेंट ला नोटिस काढावी लागली
तसे केले नसते तरी चाल्ले असते. नोटिशीचे पालन त्या बैकांनी केल्यावं परत दुसरी नोटीस काढायला लागली असती ती वेगळीच =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१

सेवादाता (सर्व्हर), विदागार

खबो जाप
Tue, 02/26/2013 - 12:08 नवीन
सेवादाता (सर्व्हर), विदागार (डेटाबेस) मस्तच.... सहा वर्षाच्या कालावधीत / अनुभवत कधीच हे शब्द वापरले नव्हते कि माहित नव्हते
  • Log in or register to post comments

इथुन पुढचे सर्व भाग इनो घेऊनच

स्पा
Tue, 02/26/2013 - 12:38 नवीन
इथुन पुढचे सर्व भाग इनो घेऊनच वाचायला लागणार बहुतेक अरारा जामच जळजळ होतेय ;)
  • Log in or register to post comments

हा भाग रंगतदार.

अग्निकोल्हा
Tue, 02/26/2013 - 12:43 नवीन
अजुन येउदे.
  • Log in or register to post comments

मालिका चांगली..

चौकटराजा
Tue, 02/26/2013 - 14:12 नवीन
धन्याजी बाबा, मालिका चांगली आहे. अगदी सिडने शेल्डन किंवा आर्थर हेली ची कादंबरी वाचल्या सारखे वाटतेय !( आपण त्याचा मराठी अनुवादच वाचतो म्हणा ) स्पर्धा, राजकारण, सूड, फसवणूक अशी त्या कादम्बर्‍यांची जाहिरात करतात.मला तर हिंजवडीच्या साईडला फिरायला गेले की भलताच कॉम्प्लेक्स येतो. त्यावेळी पुण्यात पंचवीसेक संगणक होते ( १९८६ ) त्या वेळी त्यातील एका संगणका वर मी काम करायचो. ( त्यावेळी एसी रूमला घाबरायची पद्धत होती) . आज त्या पांढर्‍या गाड्यातून ते विंजनेर जाताना पाहिले ना की " कोण होतास तू काय झालास तू ? किंवा कशी नशीबानं थट्टा आज मांडली या गाण्यांची आठवण येते.
  • Log in or register to post comments

ऑनसाईट

समीरसूर
Tue, 02/26/2013 - 14:30 नवीन
लेख छान आहे. ऑनसाईट एक चांगली संधी असते खरी. नवीन देश, नवीन माणसे, नवीन संस्कृती अनुभवणे, बर्‍यापैकी पैसे कमवणे, एक अनुभव म्हणून परदेशात राहून बघणे या सगळ्या दृष्टीने ऑनसाईट ही एक चांगली संधी असते. पण काही काही लोकं पैशापायी कुठल्याही थराला जातात. बायको ऑनसाईटला आणि नवरा भारतात किंवा अगदी उलट असा ३-४ वर्षे सलग रिमोटली संसार करणारी कितीतरी जोडपी माझ्या ओळखीची आहेत. मुलगा/मुलगी आणि नवरा भारतात आणि बायको ६ महिने - १ वर्ष अमेरिकेत असे ही एक जोडपे माझ्या पाहण्यात आहे. सासू-सासर्‍यांशी पटत नाही म्हणून घरच्या जबाबदार्‍या (वृद्ध आणि आजारी आई-वडील, त्यांच्या देखभालीसाठी कुणी नसणे, बहीण लग्नाची असणे परंतु लग्न न जुळणे, इ.) असून देखील नवर्‍याला २-३ वर्षे परदेशी घेऊन जाणार्‍या बायका माहित आहेत. सलग ३-४ वर्षे कुटुंबासहित अमेरिकेला जाणारी कुटुंबे तिकडे जातात पण इकडे भारतात कधीतरी अवचित दुर्दैवाने दोघांपैकी (नवरा किंवा बायको) कुणाचे बाबा किंवा आई किंवा आजी-आजोबा यांचा अकस्मात अकाली मृत्यू होतो. माझ्या एका मित्राचे वडील अचानक हृदयविकाराचा धक्का येऊन पहाटे ४ च्या सुमारास गेले. मुलगा, सून, नातू, नात असे चौघे अमेरिकेत होते. त्यांना तेथून निघून त्यांच्या अमरावतीजवळच्या गावी पोहोचण्यात ३०-३२ तास उलटून गेले. तो घरी पोहोचल्यावर हबकला. सगळे विधी आधीच पार पडले होते. ज्यांनी जन्माला घातले, वाढवले, शिकवले, अलोट निरपेक्ष माया केली त्यांनी असे एकदम निघून जाणे, त्यांची वर्षा-दोन वर्षात भेट न होणे, आणि त्यांचे शेवटचे दर्शनही न मिळणे याचे दु:ख त्याला इतके बोचले की तो पुन्हा अमेरिकेत जाऊन सगळं आवरून दीड महिन्यात भारतात कायमचा परत आला. आईच्या सोबत जास्तीत जास्त राहून तिच्या सहवासाचा अमूल्य ठेवा मला गमवायचा नाही असे तो गप्पांमध्ये म्हणाला. माझ्या एका दूरचा भावाच्या बाबतीत असेच घडले. आई-वडील वृद्ध आणि आजारी! हा भाऊ बायको-मुलांसकट बरीच वर्षे दुबईमध्ये! अचानक वडीलांनी जगाचा निरोप घेतला. पण केवळ सुनेचे सासूशी पटत नाही म्हणून सासू असेपर्यंत भारतात परत यायचे नाही हा तिचा ठाम निर्धार! आता त्याची आई खूप आजारी आणि जवळपास पलंगावर झोपूनच असते. तिच्यासाठी २४-तास नर्स, बाई वगैरे सगळं आहे पण जिवाभावाचं कुणीच नाही. तिची मुलगी तिची काळजी घेते आणि मुलगा परदेशात राहतो. बघा, मुलगा असणं चांगलं की मुलगी? बरेच (मुख्यतः तेलुगु) लोकं दाटीवाटीने अमेरिकेत एका १बीएचके फ्लॅटमध्ये बेकायदेशीररीत्या ६-७ जणं राहतात. अतिशय गचाळ राहतात. त्यांचे भात-सांबाराचे पदार्थ ऑफीसमध्ये घेऊन तिथल्या कँटीनमध्ये ओंगळ पद्धतीने हादडतात. गोरे लोकं त्यांच्या त्या किळसवाण्या प्रकाराकडे बघून नाके मुरडतात आणि त्यांच्याविषयी तक्रारही करतात. हीच मंडळी स्थानिक (कृष्णवर्णीय) लोकांशी पैशाचे व्यवहार करतात आणि गुंडगिरीमध्ये क्वचित मरतातही. कसे ही करून अमेरिकेत रहायचे, अतिशय किळसवाणी काटकसर करून पैसे साठवत रहायचे हाच यांचा खाक्या असतो. भारतीय लोकं वस्तू विकत घेऊन, वापरून आवडली नाही म्हणून परत करण्यात ही अग्रेसर असतात. ऑनसाईट ही संधी असते खरी पण सगळा सारासार विचार करून घेतलेली संधी जास्त आनंद देते. नुसत्याच पैशाच्या हव्यासाने घेतलेली संधी बर्‍याच वेळा पराकोटीच्या तडजोडी करण्यास भाग पाडते असे एक निरीक्षण आहे. मग त्यातून बर्‍याच इतर गुंतागुंती उद्भवतात. त्या टाळायच्या असतील तर फक्त पैसा ध्येय न ठेवता नीट विचार करून ऑनसाईटची संधी घेणे/ न घेणे जास्त श्रेयस्कर असे मला वाटते.
  • Log in or register to post comments

जनरलायझेशन

मैत्र
Tue, 02/26/2013 - 17:59 नवीन
खोटे रेझ्युमे, बेकायदेशीर एकत्र राहणे, गचाळपणे खाणे, कामात फेका मारणे हे प्रकार अनेक प्रांतीय करतात. तेलूगू लोक म्हणजे कानफाट्या प्रकार झाला आहे. अतिशय खोटेपणा करणारे, डोक्यात जाईल असा चिंधीपणा करून सहकार्‍यांना वात आणणारे, अत्यंत गचाळ घरे असलेले, अनेक इतर प्रांतीय - बिहारी/मराठी/उत्तर भारतीय्/मारवाडी/तमीळ इ. बघितले आहेत. आणि अति बुद्धिमान्/एम एस / पीएचडी उत्तम प्रकारे केलेले भारतात अतिशय नामवंत ऑर्गनायझेशन्स मध्ये महत्त्वाच्या जबाबदार्‍या सांभाळणारे तेलूगू पाहिले आहेत. अर्थात अमेरिकेचे वेड घेतलेले आणि अक्षरशः इतर देशांचं ऑनसाईट - युके / ऑस्ट्रेलिया सारखं सुद्धा नाकारून अमेरिकेचीच वाट पाहणारेही खूप तेलूगू पाहिले आहेत. पण आयटी मध्ये कसलाही नाव ठेवण्याचा विषय आला की लोक बेधडक तेलूगू म्हणून ठोकून देतात. भात सांबार गचाळपणे असंख्य दक्षिण भारतीय खातात. आणि व्यवस्थितही खातात. तेलूगू थोडे खत्रूड असतात हे खरं पण जनरलायझेशन जास्त होतंय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: समीरसूर

+१

आजानुकर्ण
Tue, 02/26/2013 - 18:50 नवीन
अनेक तेलुगू सहकाऱ्यांचा अनुभव चांगला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मैत्र

सहमत आहे.

नगरीनिरंजन
Wed, 02/27/2013 - 11:22 नवीन
सहमत आहे. घाणेरडेपणा करणे, पै-पै वाचवून परदेशात गरिबीत दिवस काढणे, जाऊ तिथे घाण करणे यात कोणत्याही एका प्रांताच्या लोकांची मक्तेदारी नाही. सगळ्या प्रांतांमधले असे नमुने पाहिलेले आहेत. ऑनसाईटवर असताना एका देशातून दुसर्‍या देशात जायला नेमकी अडचण होऊ नये म्हणून बायकोचा गर्भपात करून घ्यायला तयार असल्याचे सांगणारा महाभाग पाहिलेला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मैत्र

ऑनसाईटवर असताना एका देशातून

आदूबाळ
Wed, 02/27/2013 - 19:30 नवीन
ऑनसाईटवर असताना एका देशातून दुसर्‍या देशात जायला नेमकी अडचण होऊ नये म्हणून बायकोचा गर्भपात करून घ्यायला तयार असल्याचे सांगणारा महाभाग पाहिलेला आहे.
काय भयंकर असतात लोक...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन

मस्त प्रतिसाद!

दादा कोंडके
Tue, 02/26/2013 - 18:20 नवीन
नुसत्याच पैशाच्या हव्यासाने घेतलेली संधी बर्‍याच वेळा पराकोटीच्या तडजोडी करण्यास भाग पाडते असे एक निरीक्षण आहे.
हा हा. आमच्या क्यांटीनमध्ये अगदी मांसाहारी पदार्थ नाहीत तरी सकाळी नाष्ट्याला अंड्याची पोळीतरी ठेवा अशी सुचना एका फोरम मध्ये केली होती. त्याच वेळी हॉलमधलली ९०% लोकं (बहुतांशी साउथ इंडीयन) इइइइ, यक्क म्हणून चिरकली होती. त्यापैकीच माझा एक सहकारी युयस मध्ये रेड मीट खाणार्‍या गोर्‍याच्या मांडीला मांडी लाउन रस्सम ओअरपत होता ते आठवलं. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: समीरसूर

ऑनसाईट मॅनेजरला भेटवस्तू

शुचि
Tue, 02/26/2013 - 18:38 नवीन
ऑनसाईट मॅनेजरला भेटवस्तू आणण्याची चढाओढ चालू असते असे नीरीक्षण नोंदवते. एकाने आणले की मग दर खेपेस येणारे लोक आणतातच. कशाकरता हा भुर्दंड व मस्कापॉलीश त्यांचे तेच जाणो. _______________________ काहीजण नाईट क्लबला वगैरे कधीही मिळाले नाहीत ना मिळणार नाहीत अशा रीतीने जातात. आसपासच्या ऑनसाईट सहकार्‍यांच्या टोमण्यांवरुन ते लक्षात येते.
  • Log in or register to post comments

ऑनसाईट मॅनेजरला भेटवस्तू

धन्या
Tue, 02/26/2013 - 21:10 नवीन
ऑनसाईट मॅनेजरला भेटवस्तू आणण्याची चढाओढ चालू असते असे नीरीक्षण नोंदवते. एकाने आणले की मग दर खेपेस येणारे लोक आणतातच. कशाकरता हा भुर्दंड व मस्कापॉलीश त्यांचे तेच जाणो.
आयटीत याला चाटूगीरी म्हणतात. हा आयटीमधला प्रगतीचा महामार्ग आहे. एकवेळ प्रामाणिकपणे, उत्तम दर्जाचे काम करुन पगारवाढ किंवा ऑनसाईटला जाण्याची संधी मिळणार नाही. पण या वाटेने गेल्यास "प्रगतीची" हमखास हमी असते.
काहीजण नाईट क्लबला वगैरे कधीही मिळाले नाहीत ना मिळणार नाहीत अशा रीतीने जातात.
खरं आहे हे. स्ट्रीपर्स क्लबबद्दल पुढच्या भागात सविस्तर लिहिनच. नाईट क्लब आणि स्ट्रीपर्स क्लब बर्‍याच देशांत अधिकृत व्यवसाय आहेत. भारतात मात्र या गोष्टी मसाज पार्लर वगैरे नावांनी चोरीछुपे चालतात. त्यात पुन्हा रेड पडली तर दुसर्‍या दिवशी पेपरमध्ये चेहरे लपवलेले फोटो छापून यायची शक्यता असते. त्यामुळे ऑनसाईटला जाणार्‍या ज्या पब्लिकला अशा गोष्टींमध्ये रस असतो ते "पुन्हा यायला भेटेल न भेटेल" अशा धारणेनेच नाईट क्लब आणि स्ट्रीपर्स क्लबला जातात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि

अरे वा !

चौकटराजा
Tue, 02/26/2013 - 21:32 नवीन
अरे वा ! स्ट्रीपर्स क्लब वगैरे ? आता कोलंबिया पिकचर प्रेझेंट्स ...महेश भट्स .. आय टी'ज आफ्रडायटी... स्टारिंग डेमी मूर... असे काही बाही सुचायला लागले. धन्या तुझ्या या कादंबरीचे जागतिक हक्काचे काय ते बघ बुवा !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

चाटु

चिरोटा
Tue, 02/26/2013 - 22:43 नवीन
आयटीत याला चाटूगीरी म्हणतात. हा आयटीमधला प्रगतीचा महामार्ग आहे. एकवेळ प्रामाणिकपणे, उत्तम दर्जाचे काम करुन पगारवाढ किंवा ऑनसाईटला जाण्याची संधी मिळणार नाही. पण या वाटेने गेल्यास "प्रगतीची" हमखास हमी असते.
आय.टी. हा व्यवसाय आहे.सांगितलेले प्रोग्रॅम न बोलता लिहिणे हा व्यवसायातला एक घटक आहे. ईतर नोकरी/धंद्यात असलेले अनेक घटक-मार्केटिंग्,विक्री,पोपटपंची आयटी.तही असतात.खाते/ग्राहक टिकवायचा तर तुम्ही algorithm कसा लिहिता ह्यापेक्षा आलेली वेळ कशी मारून नेता,ग्राहकाशी कसे जुळवून घेता ह्याला जास्त महत्व असते.कंपनी यशस्वीरित्या चालवण्यासाठी सर्व प्रकारचे लोक लागतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

ते मी नाकारत नाही.

धन्या
Tue, 02/26/2013 - 22:59 नवीन
खाते/ग्राहक टिकवायचा तर तुम्ही algorithm कसा लिहिता ह्यापेक्षा आलेली वेळ कशी मारून नेता,ग्राहकाशी कसे जुळवून घेता ह्याला जास्त महत्व असते
आयटी कंपन्यांमध्ये अल्गोरिदम इम्प्लिमेंट करणारे आणि ग्राहकाला गुंडाळून वेळ मारुन नेणारे वेगळे असतात. प्रकल्प पातळीवर हे काम ऑनसाईट कॉर्डीनेटर करतो. ऑफशोअर टीम प्रामुख्याने डेव्हलपमेंटचं काम करते. काही कारणास्तव ऑफ्शोअर टीमला काम वेळेत पुर्ण करणे जमले नाही. तर मग ऑनसाईट कॉर्डीनेटर ग्राहकाला खरी खोटी कारणे सांगून शांत करतो. यात त्याच्या "सॉफ्ट स्किल्स"चा कस लागतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिरोटा

नकारात्मक टोन

मैत्र
Wed, 02/27/2013 - 13:54 नवीन
ऑनसाईट कोऑर्डिनेटर अथवा फंक्शनल कन्सल्टंट बरेचदा फेकाही मारतात पण क्लायंट सांभाळणे, विश्वास निर्माण करणे हे कौशल्याचे आणि महत्त्वाचे काम असते. विश्वास - ट्रस्ट असला की जेव्हा पुढे लहान सहान बग्ज येतात तेव्हा क्लायंट आकाश पाताळ एक करत नाही. काही वेळा ऑफशोअर किंवा ऑनसाईट टेक टीम क्लायंटची गरज समजून घेऊ शकत नाही आणि सर्व फोकस हा तांत्रिक सोल्युशन वर राहतो. अशा वेळी क्लायंटचा प्रॉब्लेम समजून घेणे / शोधणे आणि तो तांत्रिक टीमला त्यांच्या गरजेप्रमाणे /माहितीप्रमाणे समजावणे हे अतिशय महत्त्वाचे असते. जर हे क्लायंट मॅनेजमेंट / रिक्वायरमेंट अ‍ॅनालिसिस आणि 'ट्रान्सलेशन' नीट झाले नाही तर भले भले प्रोजेक्ट फेल होतात. फक्त ग्राहकाला गुंडाळून वेळ मारुन नेणारे एवढंच किंवा हेच काम नसतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

धागा आय टी चा आहे की

शुचि
Tue, 02/26/2013 - 23:25 नवीन
धागा आय टी चा आहे की अपत्यसंगोपनाचा तेच कळना झालय =))
  • Log in or register to post comments

हा हा

चिरोटा
Tue, 02/26/2013 - 23:38 नवीन
+१ बघ ताई हा ऑनसाईट आला,फेकून रिस्युमेवर भरजरी स्कील्स. डॉलरचे पाठवले हे चेक्स भूवरी, त्यावरून डौलाने ये त्याची स्वारी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि

फार तिरकं तिरकं

राजेश घासकडवी
Tue, 02/26/2013 - 23:31 नवीन
फार तिरकं तिरकं लिहावं लागू नये म्हणून नवीनच प्रतिसाद देतो आहे रेवती, पिलीयन रायडर, शुचि वगैरे सगळ्यांना. आईच्या दुधाविषयी अनेकांनी ओथंबून येऊन लिहिलेलं आहे. दोन मुख्य फायदे सांगितले - एक म्हणजे दुधातून ऍंटिबॉडीज जातात. दूध पाजण्याच्या प्रक्रियेतून, आईशी जवळिकीतून मूल अधिक आत्मविश्वासू होतं. हे दोन्ही तत्वतः मान्य आहेत. पण तो किती होतो नक्की परिणाम? Image removed. वरील चार्टवरून दिसतं की २५ टक्के अमेरिकन मुलांना जराही आईचं दूध मिळत नाही. किंबहुना पन्नासेक टक्क्यांना ते फारसं मिळत नसावं. भारतीयांमध्ये यापेक्षा बरीच जास्त टक्केवारी आहे असा अंदाज आहे. पण भारतीय हे अमेरिकनांपेक्षा अधिक आत्मविश्वासू आणि अधिक सुधृढ असतात का? म्हणजे अनेक वेगवेगळ्या घटकांतून या दोन गोष्टी ठरतात. मातेचं दूध मिळालं नाही तर त्या दोन गोष्टी मिळणारच नाहीत असं नाही. बाकी मुद्दा रहातो की त्या बायका एका आनंदाला मुकत आहेत. हेही ठीक, पण ती त्यांची निवड आहे. ऑफशोअरला जाण्याच्या आनंदाला काही बायका मुकतातच की.
  • Log in or register to post comments

काही व्हेरीएबल्स आहेत जसे

शुचि
Wed, 02/27/2013 - 03:04 नवीन
काही व्हेरीएबल्स आहेत जसे नंतरचे डाएट. कदाचित अमेरीकन लोक लहानपणी झालेली आबाळ पुढे झपाट्याने भरुन काढत असतील. अमेरीकन लोकांची पालकांशी अ‍ॅटॅचमेंट कमी असते ती यामुळेही असू शकेल. यावर जोवर नीट अभ्यास होत नाही तोवर कोणताही निष्कर्ष काढता येत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

इतरही व्हेरिएबल्स आहेत हे

राजेश घासकडवी
Wed, 02/27/2013 - 04:01 नवीन
इतरही व्हेरिएबल्स आहेत हे अगदी बरोबर. किंबहुना तेच मला म्हणायचं होतं, आईचं दूध हा एक आणि एकच निकष लावता कामा नये.
कदाचित अमेरीकन लोक लहानपणी झालेली आबाळ पुढे झपाट्याने भरुन काढत असतील.
आबाळ हा शब्द मी वापरणार नाही, कारण अमेरिकन मुलं, अगदी काही महिन्यांचीसुद्धा, रोगट दिसत नाहीत. चांगली गुटगुटीतच दिसतात.
अमेरीकन लोकांची पालकांशी अ‍ॅटॅचमेंट कमी असते
हा नवीनच मुद्दा आलेला आहे. आणि आत्मविश्वासाचा मुद्दा निघून गेलेला दिसतो. असो. मला एवढंच म्हणायचं आहे की मुलाला आईचं दूध आणि सहवास की संसारासाठी तीस लाख रुपयांची बचत पण मुलाला आजी-आजोबा-वडील यांनी सांभाळणं या दोनपैकी कुठचा चॉइस स्वीकारण्याबद्दल कोणाला नावं ठेवू नये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि

कुठचा चॉइस स्वीकारण्याबद्दल

शुचि
Wed, 02/27/2013 - 04:26 नवीन
कुठचा चॉइस स्वीकारण्याबद्दल कोणाला नावं ठेवू नये.
सहमत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

लई वेळा सहमत.

५० फक्त
Wed, 02/27/2013 - 08:47 नवीन
कुठचा चॉइस स्वीकारण्याबद्दल कोणाला नावं ठेवू नये. दोघांना तर कधीच नाही, एक आपली बायको किंवा नवरा आणि दुसरं म्हणजे ज्यांनं आपल्याला नोकरी देताना आपला इंटरव्ह्यु घेतला होता ती व्यक्ती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि

१८व्या वर्षीच स्वत:च्या

शिल्पा ब
Wed, 02/27/2013 - 09:04 नवीन
१८व्या वर्षीच स्वत:च्या पायावर उभं राहायचं असल्याने आत्मविश्वास नसुन चालणारच नाही. त्याचा अन दुधाचा काय संबंध? आईचं दुध बाळासाठी अत्यावश्यक आहे हेच मेडीकल विश्व सांगत असल्याने तुमच्या चार्टचा उद्देश समजला नाही. बाकी कोणीही काहीही मुद्दा मांडला की लग्गेच "तुम्ही कसे चुकीचे" हे कुठुन कुठुन डाटा गोळा करुन दाखवायच्या सवयीचे कौतुक वाटते. असो. धन्या लेखमाला चांगली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

हे एक झालं

पैसा
Wed, 02/27/2013 - 09:21 नवीन
पण आमचा आणखी आक्षेप पोरांना जन्माला घालून म्हातार्‍या आईबापांना ती पोरं सांभाळायचं काम लावण्याबद्दलही आहे. आपलं सुख शोधताना दुसर्‍याला त्रास देणे अन जबाबदार्‍या ढकलून देणे ही चुकीचीच गोष्ट आहे. त्यात या टेबलांचा आणि आकडेवार्‍यांचा काय उपयोग?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

हे बाकी खरंच आहे. लग्नानंतर

बॅटमॅन
Wed, 02/27/2013 - 14:33 नवीन
हे बाकी खरंच आहे. लग्नानंतर आईबापांवर उगा भर कशाला घालायचा? ते आगोदरच खपत असतात, अजून कशाला तरास म्हंतो मी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

स्तनपान

सुबोध खरे
Wed, 02/27/2013 - 12:44 नवीन
स्तनपान हि कटकट वाटणाऱ्या स्त्रियांच्या बद्दल मला काहीच म्हणायचे नाही. पण वैद्यकीय दृष्ट्या काही सत्य विधाने मी आपणापुढे मांडू इच्छितो. १) मुल जर पहिले ६ महिने पूर्णपणे आईच्या दुधावर वाढले तर त्याची प्रतिकारशक्ती नक्कीच जास्त चांगली वाढते आणी त्याला एलर्जी दमा सारखे रोग निश्चितपणे कमी होतात २) सुदृढ दिसणे आणी असणे यात फरक आहे. जे मुल पूर्ण आईच्या दुधावर वाढते अशा मुलांमध्ये लठ्ठपणा हा फार कमी प्रमाणात येतो आणि या तुलनेत बाटलीने दुध पिणाऱ्या मुलांमध्ये तो खूप जास्त प्रमाणात दिसतो याचे कारण असे कि आईचे दुध पिण्यासाठी मुलाला चोख्ण्याचे कष्ट करावे लागतात त्यामुळे मुलाचे पोट भेरले कि ते चोखणे बंद करते त्यामुळे अति आहार(overfeeding) आपोआप टाळला जातो. बाटलीने दुध पिणाऱ्या मुलांना तसे करता येत नाही. बाटलीतील दुध गुरुत्वाकर्षणाने खाली उतरले जाते आणि मुल ते गिळायच्या रिफ्लेक्स ने आपोआप पीत राहते.(यात मुलाला कोणताही पर्याय choice राहत नाही) याने अति आहार(overfeeding)होते आणि मुलाच्या शरीरात चरबीच्या पेशी वाढून त्याला लठ्ठपणा (hyperplastic obesity) येतो. ३)मानवी immuno globulin A हि प्राणीजन्य immuno globulin A पेक्षा निराळी असल्याने आईचे सोडून कोणतेही दुसरे दुध दिल्यास आतड्याची प्रतिकारशक्ती वाढवण्यास निरुपयोगी ठरतात.त्या मुळे आतड्याचे आजार आणि पाचन शक्तीचे विकार पूर्णपणे आईच्या दुधावर वाढलेल्या मुलामध्ये खूप कमी होतात. ४)प्रत्येक मुल हे आईच्या पोटातून प्रतीकारशक्तीचे गामा ग्लोब्युलीन घेऊन आलेले असते. तेंव्हा आईच्या दुधातील प्रथिने आणि प्रतिजैविके त्याला आपल्या शरीरात सामावून घेणे जास्त सोपे होते. ५) मुलाला दुध पाजण्या मुळे स्तनाग्राला (चेतना मिळाल्याने stimulation ) आईच्या मेंदूत ऑक्सिटोसीन नावाचे संप्रेरक तयार होते ज्यामुळे गर्भाशय आकुंचन पावण्यास मदत होते आणि हे संप्रेरक आपल्याला अतीव आनंदाचा अनुभव देणारे रसायन असल्याने स्त्रियांना खरोखरच हा आनंद मिळतो( हा केवळ मानसिक नाही तर शारीरिक सुद्धा आहे) आणि हे मातृत्वाचे उदात्तीकरण नाही.Recent studies have begun to investigate oxytocin's role in various behaviors, including orgasm, social recognition, pair bonding, anxiety, and maternal behaviors.[2] For this reason, it is sometimes referred to as the "love hormone"The relationship between oxytocin and human sexual response is unclear. At least two uncontrolled studies have found increases in plasma oxytocin at orgasm – in both men and women. wikipedia ६)आईचे दुध कमी पडले हि दुध विकणाऱ्या कंपन्यांची चापलुसी आहे. गायीचे दुध कमी पडले म्हणून वासरू हाडाडले असे आपण फारच क्वचित ऐकले असेल. हा सर्व मानवी मनाचा खेळ आहे. पहिल्या काही दिवसात आईला फक्त काही मिली दुध येते आणि ते मुलाला पुरेसे असते. पण ते पुरे पडत नाही असे एकदा त्या स्त्रीने मनावर घेतले तर आपोआप तिचे दुध कमी होते.(गरीब आयामध्ये असे काही नसल्यामुळे अगदी रस्त्यवर दगड फोडणाऱ्या स्त्रियांची मुले पहिले ६-८ महिने गुटगुटीत असतात) आईचे दुध पाजण्यात वेळ कोणी आणि किती घालवावा हे प्रत्येक स्त्रीने ठरवावे वैद्यकीय सल्ला वर दिल्याप्रमाणे आहे.तो घ्यावा कि न घ्यावा हा वैयक्तिक प्रश्न आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

कडक प्रतिसाद

स्पा
Wed, 02/27/2013 - 13:11 नवीन
घासकडवी आणि अदितीच्या प्रतिक्रियांच्या प्रतीक्षेत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा