✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

नरेंद्र मोदी: आपत्ती की इष्टापत्ती?

ऋ
ऋषिकेश यांनी
Fri, 02/08/2013 - 12:04  ·  लेख
लेख
गडकरींना 'टाटा, बाय-बाय' केल्यानंतर आलेल्या राजनाथसिंगांच्या आगमनानंतर भाजपामध्ये काही मोठे बदल होताना दिसत आहेत. राजस्थानचे प्रदेशाध्यक्षपद वसुंधराराजेंना देणे हे पहिले मोठे पाऊल राजनाथसिंगांनी उचलले आणि अनेकांच्या भुवया उंचावल्या. वसुंधराराजेंचे जनमानसातले स्थान बघावे की काम या संभ्रमात भाजपा असताना, त्यांचे नाव घोषित करून आपण 'ब्लॅकमेलिंग'ला किती सहज बळी पडू शकतो हे राजनाथसिंगांनी दाखवून दिले. गडकरी पक्षाध्यक्ष असेपर्यंत नरेंद्र मोदींचे नाव राष्ट्रीय पातळीवर घेणे टाळले जात होते. तेच राजनाथसिंग यांनी वसुंधराराजेंच्या धमक्यांनंतर घेतलेल्या निर्णयानंतर मोदी समर्थक आक्रमक झालेले दिसतात. या पार्श्वभूमीवर लोकसत्तामध्ये आपत्ती की इष्टापत्ती? हा सुनील चावके यांचा लेख वाचनात आला. एकूणच मोदी प्रवासाचा, त्यांना पंतप्रधानाचा उमेदवार घोषित केल्यास निर्माण होऊ शकणार्‍या परिस्थितीचा अंदाज या लेखात चांगला घेतला आहे. हा लेख वाचून तुम्हाला काय वाटते?
  • भाजपापुढे मोदींना पंतप्रधान पदाचा उमेदवार घोषित करण्यावाचून दुसरा पर्याय शिल्लक आहे का?
  • काँग्रेस पक्षालाही सद्यस्थितीत असे धृवीकरण आवश्यक असल्यानेच -लेखात म्हटल्याप्रमाणे - शिंदेंकरवी संघाला अधिक हिंदुत्ववादी दिशेने ढकलून मोदींनाच उमेदवार घोषित करण्यास भाग पाडणे काँग्रेससाठीही पथ्याचे असेल काय?
  • मोदींना उमेदवार घोषित केल्यास भाजपामधील अनेक नेत्यांनी एकत्र येऊन निर्णय घ्यायची परंपरा खंडीत होण्याचा धोका आहे असे वाटते का?
  • मोदींचा करिश्मा भाजपाला २०० जागा मिळवून देऊ शकेल काय?
  • मोदींचा राष्ट्रीय पातळीवरील उगम तुम्हाला आपत्ती वाटतो की इष्टापत्ती?
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
55892 वाचन

💬 प्रतिसाद (172)

प्रतिक्रिया

>>>भाजपापुढे मोदींना

श्रीगुरुजी
Fri, 02/08/2013 - 12:17 नवीन
>>>भाजपापुढे मोदींना पंतप्रधान पदाचा उमेदवार घोषित करण्यावाचून दुसरा पर्याय शिल्लक आहे का? आहे. सुषमा स्वराज हा दुसरा पर्याय आहे. या दोघांव्यतिरिक्त तिसरा पर्याय नाही. परंतु २०१४ साठी भाजपने मोदींना पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर करू नये, कारण २०१४ मध्ये १९९६ सारखी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मोदींचे नाव जाहीर केले तरी काँग्रेसबद्दल जनतेचा अजून पूर्ण भ्रमनिरास झाला नसल्यामुळे (उत्तराखंड व हिमाचल ची निवडणुक ही ताजी उदाहरणे) भाजपला खूप मोठे यश मिळणे अवघड आहे. मोदींना २०१४ नंतरच्या निवडणुकीपर्यंत थांबावे लागेल. >>> काँग्रेस पक्षालाही सद्यस्थितीत असे धृवीकरण आवश्यक असल्यानेच -लेखात म्हटल्याप्रमाणे - शिंदेंकरवी संघाला अधिक हिंदुत्ववादी दिशेने ढकलून मोदींनाच उमेदवार घोषित करण्यास भाग पाडणे काँग्रेससाठीही पथ्याचे असेल काय? नक्कीच. संयुक्त जनता दलाने भाजपशी युती तोडावी व बिजद, तेलगू देसम इ. पक्षांनी २०१४ मध्ये भाजपबरोबर युती करू नये, म्हणूनच काँग्रेस धार्मिक आधारावर ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न करीत आहे. >>> मोदींना उमेदवार घोषित केल्यास भाजपामधील अनेक नेत्यांनी एकत्र येऊन निर्णय घ्यायची परंपरा खंडीत होण्याचा धोका आहे असे वाटते का? नाही. कारण काही प्रमाणात सुषमा स्वराजांचा अपवाद सोडल्यास, भाजपातील इतर कोणताही नेता राष्ट्रीय पातळीवर मोदींच्या लोकप्रियतेची बरोबरी करू शकणार नाही. >>> मोदींचा करिश्मा भाजपाला २०० जागा मिळवून देऊ शकेल काय? देऊ शकेल, पण २०१४ मध्ये नाही. भाजपला त्यासाठी २०१४ नंतरच्या निवडणुकीपर्यंत थांबावे लागेल. २०१४ मध्ये भाजप जास्तीत जास्त १५० पर्यंत जाऊ शकेल. >>> मोदींचा राष्ट्रीय पातळीवरील उगम तुम्हाला आपत्ती वाटतो की इष्टापत्ती? अर्थातच ही इष्टापत्ती ठरेल. याच विषयावर हा एक चांगला लेख वाचा. http://www.thehindu.com/opinion/lead/the-man-who-would-rule-india/article4390286.ece?homepage=true
  • Log in or register to post comments

नेमके आहे मात्र..

ऋषिकेश
Fri, 02/08/2013 - 14:15 नवीन
शेवटी दिलेला लेख सकाळीच वाचला होता. :) चांगला लेख आहे. बाकी सगळे नेमके आहे मात्र.. फक्त इतकेच की राहुल गांधी हा काँग्रेसचा पंतप्रधानपदासाठी उमेदवार असेल असे वाटत नाही. तो पुढेमागे त्याच्या आईप्रमाणे पक्षातील अध्यक्षपद घेण्यास प्राधान्य देईल असे वाटते. मात्र तो डाव खेळायच्या आधी भाजपाला कॉर्नर करत मोदींना रिंगणात उतरायला लावायचा डाव काँग्रेस आणि मोदी समर्थक दोघेही (मात्र एकत्रितपने किंवा संगनमताने नव्हे) खेळत आहेत असे म्हणायला जागा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

>> भाजपापुढे मोदींना

नाना चेंगट
Fri, 02/08/2013 - 12:50 नवीन
>> भाजपापुढे मोदींना पंतप्रधान पदाचा उमेदवार घोषित करण्यावाचून दुसरा पर्याय शिल्लक आहे का? हो आहे, त्यासाठी भाजपाला येशीरुममधून बाहेर येऊन विचार करावा लागेल. >> काँग्रेस पक्षालाही सद्यस्थितीत असे धृवीकरण आवश्यक असल्यानेच -लेखात म्हटल्याप्रमाणे - शिंदेंकरवी संघाला अधिक हिंदुत्ववादी दिशेने ढकलून मोदींनाच उमेदवार घोषित करण्यास भाग पाडणे काँग्रेससाठीही पथ्याचे असेल काय? मोदी उमेदवार होवो न होवो आपण मुस्लिमांचे एकमेव तारणहार आहोत ही भुमिका कॉग्रेस घेत आहे आणि त्याचवेळेस भारतात अनेक ठिकाणी मुस्लिम उग्रवादी नेते डोके वर काढत आहे हा योगायोग नाही, त्यातच बाळ ठाकरेंच्या निधनानंतर हे अधिक जाणवत आहे. (मी शिवसैनिक नाही) >> मोदींना उमेदवार घोषित केल्यास भाजपामधील अनेक नेत्यांनी एकत्र येऊन निर्णय घ्यायची परंपरा खंडीत होण्याचा धोका आहे असे वाटते का? अशी परंपरा खरोखर होती? की संघाचीच भुमिका निर्णय म्हणून मांडली जायची (अनेकवेळेला)? >>> मोदींचा करिश्मा भाजपाला २०० जागा मिळवून देऊ शकेल काय? नाही. >> मोदींचा राष्ट्रीय पातळीवरील उगम तुम्हाला आपत्ती वाटतो की इष्टापत्ती? मी कॉग्रेसप्रणित राहूल आला सगळं आता छान होणार या विचारांना हसतो. तेच मोदीना लागू.
  • Log in or register to post comments

मोदी हे भाजप चे ब्रम्हस्त्र

पिंपातला उंदीर
Fri, 02/08/2013 - 13:13 नवीन
मोदी हे भाजप चे ब्रम्हस्त्र आहे. जर ते या मुख्य अस्त्रा ला पुरवून पुरवून वापरणार असतील तर नक्कीच चुकीची रणनीती असेल. आणि एक राज्य चालवणे वेगळे आणि हा प्रचंड विविधता असणारा देश चालवणे वेगळे हे मोदीप्रेमीना कळेल तो 'सोनियाचा' दिन.
  • Log in or register to post comments

अगदी बरोबर

कापूसकोन्ड्या
गुरुवार, 02/14/2013 - 10:25 नवीन
अगदी बरोबर बोलतात. आणि एक राज्य चालवणे वेगळे आणि हा प्रचंड विविधता असणारा देश चालवणे वेगळे. थोर तरूण नेते त्यांना किती अनुभव आहे. तसा नरेंद्रानी घ्यावा मगच पंप्र ची स्वप्ने पहावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिंपातला उंदीर

जौ दे ना !

परिकथेतील राजकुमार
Fri, 02/08/2013 - 13:18 नवीन
कोणीही गादीवर बसले तरी आपल्याला काही फरक पडणार आहे का?
  • Log in or register to post comments

असं कसं म्हणता सायबा !

नाना चेंगट
Fri, 02/08/2013 - 13:20 नवीन
असं कसं म्हणता सायबा ! तुम्हाला आम्हाला नसेल फरक पडत !!:) पण काही जणांना मोदी सोडून कोणीही बसले तर चालेल.. त्यांना नक्कीच फरक पडतो ना बाप्पा !! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

तो आला ..त्याने पाहिले..

अविनाशकुलकर्णी
Fri, 02/08/2013 - 13:27 नवीन
Image removed. तो आला ..त्याने पाहिले...त्याने जिंकले.. तरुणाईला रस नाही ८५ साली काय झाले..वा भूत काळात काय झाले त्याना जागतिकी करणा मुळे ज्या व्यवसायाच्या उन्नतीच्या संधि आहेत त्या मिळवून देणारा नेता हवा आहे... उच्च शिक्षणाने विद्या विभूषित असलेली हि तरुणाई जग जिंकण्यास सज्ज आहे,.. गतकाळ..गतवैभवात व गतक्लेशात रममाण होणे ना मंजुर.... व्यवस्था परिवर्तन ,वा भूत काळात काय झाले सेक्युलर जातीवादी असले गुळगुळीत झालेले विचार ऐकून कान किटले तरुणाईचे. आहे ह्या व्यवस्थेचा वापर करीत जग जिंकणारा नेता मिळाला आहे त्याना नरेन भाई मोदि च्या रूपाने .............
  • Log in or register to post comments

आमची तरूण पिढी येणार्‍या

नानबा
Fri, 02/08/2013 - 14:40 नवीन
आमची तरूण पिढी येणार्‍या काळाचा विचार करते, भूतकाळाचा नाही. त्यासाठी राजकारणात मोठी स्थित्यंतरं होणं ही काळाची गरज आहे. तरूणाईने का म्हणून १९८०-९० च्या काळात जगणार्‍या नेत्याला मत द्यावं? बदल हा काळाचा आत्मा आहे, आणि तो बदल घडून येण्याच्या दिशेने पडणारं पहिलं पाऊल म्हणजे नरेंद्र मोदींचा राष्ट्रीय राजकारणातला सक्रिय प्रवेश. आम्ही भूतकाळ पाहिला नसेल, किंवा आम्ही फार लहान असताना काही अघटित गोष्टी कदाचित घडूनही गेल्या असतील. पण तरूणाईने पाहिले, ते गोध्रा प्रकरणानंतर गुजरातमधल्या हिंदूंमागे खंबीरपणे उभे राहिलेले मोदी, त्यानंतर गेल्या १०-१२ वर्षांत गुजरातचा आमुलाग्र बदल घडवणारे मोदी, सीमेवर आपल्या जवानाचा शिरच्छेद केल्यानंतर गुजरातमध्ये आयोजित केलेल्या बिझनेस फेयरला आलेल्या पाकिस्तानच्या लोकांना गुजरातमध्ये प्रवेशबंदी करून आल्या पावली परत पाठवणारे करारी बाण्याचे मोदी. जर त्यांच्यामध्ये बदल घडवून आणण्याची क्षमता असेल, तर त्यांनी नक्कीच २०१४ मध्ये निवडून यायला हवे. एक मुद्दा - मी मोदीसमर्थक, संघ स्वयंसेवक, भाजपा कार्यकर्ता, काँग्रेस विरोधक यापैकी कोणीही नाही. ही एक तरूण नागरिक म्हणून माझी वैयक्तिक मते आहेत.
  • Log in or register to post comments

चांगली चर्चा

सुनील
Fri, 02/08/2013 - 19:22 नवीन
सीमेवर आपल्या जवानाचा शिरच्छेद केल्यानंतर गुजरातमध्ये आयोजित केलेल्या बिझनेस फेयरला आलेल्या पाकिस्तानच्या लोकांना गुजरातमध्ये प्रवेशबंदी करून आल्या पावली परत पाठवणारे करारी बाण्याचे मोदी
हे नक्की का? करण माझी माहिती थोडी वेगळी आहे ;)
एक मुद्दा - मी मोदीसमर्थक, संघ स्वयंसेवक, भाजपा कार्यकर्ता, काँग्रेस विरोधक यापैकी कोणीही नाही
आजकाल असे डिस्क्लेमर द्यायची फ्याशन आहे काय? ;) असो, चर्चा वाचत आहेच!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नानबा

आजकाल असे डिस्क्लेमर द्यायची

llपुण्याचे पेशवेll
Wed, 02/20/2013 - 12:16 नवीन
आजकाल असे डिस्क्लेमर द्यायची फ्याशन आहे काय? असावी. कारण एखाद्याला मोदींचा कुर्ता आवडला आणि त्याने तसे बोलले तरी त्याला संघिष्ट, मोदीसमर्थक वगैरे म्हणण्याची फॅशन आहे, म्हणूनही असेल कदाचित.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील

जबराट....

मन१
Fri, 02/22/2013 - 11:44 नवीन
उपहासात्मक प्रश्नाला उपरोधिक उत्तर. अत्र्यांना वाचताय, ऐकताय का सध्या?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll

नरेंद्र मोदी ?

चौकटराजा
Fri, 02/08/2013 - 16:13 नवीन
नरेंद्र मोदींकडे एक गोष्ट कुणापेक्षाही जास्त आहे जी नेहरूंकडे होती. ती म्हणजे लोकांचे दिल जिंकण्याची ताकद ! ती आली की की एखादी achievement कमी झाली तरी चालते. नुसते वकक्तृत्व चांगले म्हणजे ही ताकद नव्हे ! असे असेल तर ती सुषमा स्वराज, अरूण जेटली यांच्याकडेही आहे. पण भाषण वाला नेता , मने जिंकणारा नेता व व्यवहार कुशल नेता असा माणूस प्रधानमंत्री पदी असला पाहिजे. मग त्याला कुटील राजकारण कमी आले तरी चालेल. मनमोहन सिंग हे बर्‍याच पातळीवरचे पार अपयशी असे नेतूत्व आहे. मोदी हवेत की नाही याचा आमचा आग्रह नाही, मनमोहन सिंग मात्र अजिबात नकोत असा आहे .माझ्या मते मनमोहन सिम्ग व सुरेश कलमाडी याना राजकीय भवितव्य नाहीच !
  • Log in or register to post comments

मनमोहन सिंग...

लाल टोपी
Fri, 02/08/2013 - 18:56 नवीन
कोणाचे नेत्रुत्व (हा शब्द बरोबर लिहीता येत नाहीए)करतात ...?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

नेतृत्व = netRutva

शुचि
Sat, 02/09/2013 - 05:43 नवीन
नेतृत्व = netRutva
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लाल टोपी

जमला!

लाल टोपी
Sat, 02/09/2013 - 09:49 नवीन
धन्यवाद..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि

थोडेसे अवांतर पण.....

लाल टोपी
Fri, 02/08/2013 - 16:32 नवीन
२०१४ च्या सांभाव्य परीस्थितीचा विचार करता राहूल गांधी नरेंद्र मोदी किंवा सुशमा स्वराज नितिश कुमार मुलायमसिंग मायावती जयललिता अंधूक शक्यता शरद पवार यामध्ये नक्कीच मोदी उजवे वाटतात
  • Log in or register to post comments

आधी म्ह्टले तसे, राहुल

ऋषिकेश
Fri, 02/08/2013 - 19:49 नवीन
आधी म्ह्टले तसे, राहुल गांधींना काँग्रेस पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून घोषित करणार नाही. जर आवश्यक ते बहुमत मिळाले तर पी.चिदंबरम यांचा नंबर लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि कठोर पावले उचलून गृहमंत्रीपदावरून तुलनेने चांगला कारभार करणारे, प्रगतीशील आर्थिक धोरणे जोपासणारे वगैरे विशेषणे घेऊन चिदंबरम आले की मोदींविरूद्ध ध्रुवीकरण थेट आणि सोपे आहेच, शिवाय पश्चिम+उत्तरेचा काहि भाग विरूद्ध पूर्व+दक्भाग+उत्तरेचा उरलेला भाग यात समसमान जागा पडतील आणि 'इपर' तथाकथीत सेक्युलर पक्षांच्या मदतीने पुन्हा काँग्रेसला बोहल्यावर चढता येईल असा डाव असण्यास वाव नाही का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लाल टोपी

आघाड्याच निर्णायक ठरणार आहेत..

लाल टोपी
Fri, 02/08/2013 - 20:01 नवीन
विशेषतः तमिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक, बिहार, ओरीसा, प. बंगाल आणि अर्थातच उत्तर प्रदेश या सर्वांना पी. चिदंबरम स्विकाहार्य असेल असे वाटत नाही मागील दोन्ही निवड्णुकांनंतर मनमोहन सिंग यांची प्रतिमा चिदंबरम पेक्षा चांगली होती आता मात्र चित्र बदलेले असेल सर्वात मोठा फटका सोनियांना आंध्रातून मिळेल असे वाटते. त्यामुळे बहुमताजवळ स्वतःच्या ताकदीवर पोहेचेल असे वाटत नाही. अघाडीच्या राजकारणात चिदंबरम यांचे नांव मागे पडेल असेच वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश

मराठी बाणा ऑन

खटपट्या
Sat, 02/09/2013 - 06:26 नवीन
मराठी बाणा ऑन "अंधूक शक्यता शरद पवार" >>>> एकदा तरी मराठी होउद्याना राव. मराठी बाणा ऑफ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लाल टोपी

वाहत्या गंगेत हात धुण्याचा

श्री गावसेना प्रमुख
Fri, 02/08/2013 - 16:49 नवीन
वाहत्या गंगेत हात धुण्याचा प्रयत्न.(तुम्ही काँग्रेस चे छुपे प्रचारक आहात काय ,अस्र वापरुन बोथट करण्याचा प्रयत्न होतोय सगळी कडे.ह घ्या)
  • Log in or register to post comments

तसेही सध्या राष्ट्रीय

नानबा
Fri, 02/08/2013 - 16:58 नवीन
तसेही सध्या राष्ट्रीय राजकारणामध्ये आपल्या कार्याने स्वतःचा वेगळा ठसा उमटवणार्‍यांमध्ये मोदी नक्कीच सर्वात वरच्या स्थानावर आहेत. बाकी लाल टोपींनी म्हटलेल्यांचा विचार केल्यास राहुल गांधी फक्त आडनावामुळे आहेत, सुषमा स्वराज यांना पक्षातूनच विरोध आहे, नितीश कुमारांना मिळणारा पाठिंबा फक्त बिहार राज्यापुरताच मर्यादित आहे, मुलायमसिंग आणि मायावतींना पंतप्रधान होण्याइतका भरभक्कम पाठिंबा मिळेल असं चित्र नाही, तीच परिस्थिती जयललितांची. आता राहता राहिले शरद पवार. त्यांच्याबद्दल म्या पामराने काही भाकित न करणेच उत्तम.. आणि तृणमूल च्या ममता बॅनर्जी विसरलात तुम्ही...
  • Log in or register to post comments

इतरांना बरोबर घेऊन जाण्यात...

लाल टोपी
Fri, 02/08/2013 - 18:47 नवीन
त्या ईतरांना बरोबर घेऊ शकतील असे न वाटल्यामुळे आणि एकट्या पश्चिम बंगालच्या जिवावर त्यांना पंतप्रधान होणे शक्य नाही तसेच राष्ट्रपती आणि पंतप्रधान एकाच राज्यातून येतील हे ही थोडे अशक्य वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नानबा

मुद्दा पटला... दोन्ही मोठी

नानबा
Fri, 02/08/2013 - 20:15 नवीन
मुद्दा पटला... दोन्ही मोठी पदे एकाच राज्याकडे देणं इष्ट नाही...
  • Log in or register to post comments

सुनिल साहेब, आजकाल असले

नानबा
Fri, 02/08/2013 - 20:17 नवीन
सुनिल साहेब, आजकाल असले डिसक्लेमर्स द्यावे लागतात हो... नाहीतर उगाच लोकांचे गैरसमज होतात...
  • Log in or register to post comments

मोदींना उमेदवार घोषित केल्यास

अग्निकोल्हा
Fri, 02/08/2013 - 20:32 नवीन
मोदींना उमेदवार घोषित केल्यास भाजपामधील अनेक नेत्यांनी एकत्र येऊन निर्णय घ्यायची परंपरा खंडीत होण्याचा धोका आहे असे वाटते का?
या निवडणुकित हे बहुदा होणार नाही. पण मोदिंना राष्ट्रिय पातळिवर कर्तुत्व दाखवायची संधि मात्र नक्कि मिळेल. तसचं नाना चेंगट म्हणत आहेत तसं मोदींना उमेदवार घोषित केल्यास भाजपामधील अनेक नेत्यांनी एकत्र येऊन निर्णय घ्यायची परंपरा खंडीत होण्याचा धोका आहे यातही तथ्य आहे, पण हे देशाच्या भल्यासाठीच असेल असं आज तरी वाटत आहे. देशाला एक कणखर नेत्रुत्व हवयं हे मात्र नक्कि.
  • Log in or register to post comments

किंचित विषयांतर

३_१४ विक्षिप्त अदिती
Fri, 02/08/2013 - 20:36 नवीन
चावकेंच्या लेखातूनः
आंध्र प्रदेश, अरुणाचल, हरयाणा, जम्मू आणि काश्मीर, केरळ, मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालॅण्ड, ओरिसा, सिक्कीम, तामिळनाडू, त्रिपुरा, उत्तराखंड, दिल्ली, चंदिगढ, लक्षद्वीप आणि पुडुचेरीमधील १६४ जागांवर भाजपच्या हाती शून्य आले होते
संघाने ईशान्येकडच्या राज्यांमधे प्रचारक पाठवलेले आहेत, ते तिथे निस्पृहपणे काम करतात वगैरे गोष्टी अधूनमधून कानावर येतात. वरच्या यादीत ईशान्येकडच्या ८ राज्यांपैकी आसाम वगळता बाकीची ७ राज्य आहेत. संघाने तिथे नक्की काय काम केलंय की भाजपला तिथे लोकसभेची एकही जागा मिळू नये?
  • Log in or register to post comments

दोन्ही वायले ... आणि नाळ

सुनील
Fri, 02/08/2013 - 21:11 नवीन
टवाळ मोड ऑन संघ वायला नि भाजप वायला, ही सिंपल गोष्ट तुमच्यासारख्या झंटलवूमनला माहित नाही? ;) टवाळ मोड ऑफ संघाचे प्रचारक तिथे, तिथल्या लोकांची सांस्कृतिक नाळ उर्वरीत भारताशी जोडू पाहत आहेत, असे ऐकून्-वाचून आहे. तसे असेल ते उत्तमच आहे. अर्थात, तो काही त्यांना मेन-स्ट्रीममध्ये आणण्याचा एकमेव वा चिरस्थायी उपाय नाही. त्यांचे आर्थिक हितसंबंध उर्वरीत भारताशी जुळले, तर ते अधिक चिरस्थायी आणि फलदायी होईल, असे माझे मत आहे! असो, चर्चा छान चालली आहे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

संघ वायला नि भाजप वायला, ही

३_१४ विक्षिप्त अदिती
Fri, 02/08/2013 - 22:12 नवीन
संघ वायला नि भाजप वायला, ही सिंपल गोष्ट तुमच्यासारख्या झंटलवूमनला माहित नाही? smiley
संघ? हे काय असतं? मला तर फक्त समिती माहित्ये. महान मातृत्त्व, महान संस्कृती. तुमची आई, माझी आई, आपल्या सर्वांची आई... -- अदिती (साने)
संघाचे प्रचारक तिथे, तिथल्या लोकांची सांस्कृतिक नाळ उर्वरीत भारताशी जोडू पाहत आहेत, असे ऐकून्-वाचून आहे. तसे असेल ते उत्तमच आहे.
उत्तम कोणासाठी आहे? लोकसभेच्या जागांच्या गणितावरून त्या लोकांना असं उत्तम, उदात्त वगैरे काही वाटतंय असं दिसत नाहीये.
त्यांचे आर्थिक हितसंबंध उर्वरीत भारताशी जुळले, तर ते अधिक चिरस्थायी आणि फलदायी होईल, असे माझे मत आहे!
सहमत. शिवाय उर्वरित भारतातल्या लोकांचा xenophobia कमी झाला तर ईशान्येकडच्या लोकांना उर्वरित भारतातले लोक परके समजतात हे चटकन दिसणार/समजणारही नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील

निस्पृहपणा

श्रीरंग_जोशी
Fri, 02/08/2013 - 22:25 नवीन
ते तिथे निस्पृहपणे काम करतात
पहिला वाक्याला नंतरच्या वाक्यातून प्रश्नाद्वारे मांडलेला मुद्दाच सिद्ध करतोय. कुठल्याही राजकीय लाभासाठी काम केले जात नाहीये म्हणूनच तर ते निस्पृह आहे नं... :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

दॅट एक्सप्लेन्स

विकास
Sat, 02/09/2013 - 05:25 नवीन
संघाने तिथे नक्की काय काम केलंय की भाजपला तिथे लोकसभेची एकही जागा मिळू नये?
यातून स्पष्ट होत नाही का की भाजपा आणि संघ ह्या वेगळ्या संघटना आहेत - एक राजकीय तर दुसरी सामाजीक. ? तरी आपलं पब्लीक जातायेता उगाच भाजपामध्ये काही झाले की संघाच्या नावाने बोटे मोडते!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

यातून स्पष्ट होत नाही का की

३_१४ विक्षिप्त अदिती
Sat, 02/09/2013 - 08:54 नवीन
यातून स्पष्ट होत नाही का की भाजपा आणि संघ ह्या वेगळ्या संघटना आहेत
नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

कदाचीत

विकास
Sun, 02/10/2013 - 10:40 नवीन
यालाच eat the cake and have it :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

ही तर संघाची नीती

३_१४ विक्षिप्त अदिती
Sun, 02/10/2013 - 13:01 नवीन
ही संघाचीच "नीती" आहे. दुर्दैवाने तर्कशास्त्र त्यापेक्षा अधिक किचकट आहे. भाजपचा अध्यक्ष कोण असावा याबद्दल संघाचे (कोणतेसे पदाधिकारी) वैद्यांचा जीव वरखाली होणार. (तशा बातम्या प्रसिद्ध झाल्या, त्यावर उलटसुलट चर्चा झाली, पण बातमी खोटी असल्याचं कोणी, कुठे, काही म्हटल्याचं पाहिलं नाही.) पण संघ आणि भाजपचा काहीही संबंध नाही असंही म्हणायचं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

उत्तर

विकास
Wed, 02/13/2013 - 22:42 नवीन
उत्तर देयचे राहीलेच की!
ही संघाचीच "नीती" आहे.
खरं की काय? कुठे वाचलेत? :-)
भाजपचा अध्यक्ष कोण असावा याबद्दल संघाचे (कोणतेसे पदाधिकारी) वैद्यांचा जीव वरखाली होणार.
मला वाटते आपण मा. गो वैद्यांबद्दल बोलत आहात. ते आधी संघाचे पदाधिकारी होते आता केवळ स्वयंसेवक असतील. ते त्यांच्या ब्लॉगमधे लिहीतात असे कुठेतरी वाचलेले आहे... त्यामुळे ते संघाचे अधिकृत मत नाही. त्यामुळे कोणी लक्ष देखील देत नाही.
पण संघ आणि भाजपचा काहीही संबंध नाही असंही म्हणायचं.
हे कळायला अवघड का जाते समजत नाही. त्यात काही रॉकेट सायन्स नाही! जेंव्हा पहील्यांदा संघप्रेरीत स्वयंसेवकांनी जनसंघ स्थापला तेंव्हा त्यावर संघाच्या विचारांचा प्रभाव (कंट्रोल नाही) होता असे म्हणता येईल. १९७७ च्या जनता पार्टीच्या फुटीनंतर जेंव्हा भाजपा जन्मास आली तेंव्हा त्यात पूर्वाश्रमीचे जनसंघातले अनेक असले तरी सगळेच नव्हते. आता तर तितके देखील नाहीत असे वाटते. त्या व्यतिरीक्त दोन्ही संस्था, त्यांची ध्येय वेगळी आहेत, हे जर वाचलेत तर समजेल. संघाचे सर्व स्वयंसेवक काही भाजपाच्याच बाजूने असतात असे देखील नाही. किंबहूना मी किमान केरळच्या बाबतीत वेगळेच ऐकले/वाचल्याचे आठवते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

संघ म्हणजे भाजप नाही, वनवासी

३_१४ विक्षिप्त अदिती
Wed, 02/20/2013 - 23:17 नवीन
संघ म्हणजे भाजप नाही, वनवासी कल्याण आश्रम नाही, समिती नाही, माजी पदाधिकारी नाहीत, मागो वैद्य नाहीत, खाकी हाप्पँट मिरवणारे नितीन गडकरी नाहीत, संघ स्वयंसेवक काही बोलला तर त्याची जबाबदारी संघावर नाही (पण कोणी व्यक्तिगत काही चांगलं केलं तर श्रेय मात्र संघाचं). असे सगळ्यांना बाजूला काढाल तर वीस-पंचवीस-साठ लाखांपैकी (विकीपीड्याचा आकडा. संघाच्या संस्थळावर सापडला नाही.) दोन-चार लोक म्हणजे संघ एवढंच उरेल. पहा बुवा. त्यापेक्षा काँग्रेसही बरी. दिग्विजय सिंगांनी काही अचाट विधान केलं की निदान जाहीररित्या "ही आमची अधिकृत भूमिका नाही" असा स्टँडतरी घेते. वैद्यांनी म्हणायचं "हो", दुसर्‍याने म्हणायचं "वैद्य म्हणजे संघ नाहीत", तिसर्‍याने त्यावर "वैद्यांची भूमिका मला थोडी मान्य आहे" असं म्हणायचं. गडकरींनी त्यावरून फुशारून जायचं. पण संघाची भूमिका काय हे गुलदस्त्यातच. सगळ्यांच्या व्यक्तिगत भूमिका. भाजपाध्यक्ष निवडताना नागपूरच्या राजीखुशीच्या एवढ्या बातम्या येतात त्याच्याबद्दल कोणी काही अवाक्षरही काढत नाही हे कसं काय ब्वॉ? संघवाले (स्वयंसेवक हा शब्द फार किचकट आहे.) गठ्ठ्याने भाजपला मतदान करतात, ते कसं काय ब्वॉ? (संघाच्या शाखा कुठे भरतात आणि त्या वॉर्डांमधे कोणाला सर्वाधिक मतं मिळतात याचा अभ्यास पुरेसा असावा.) संघात काँग्रेसच्या नावाने शंख होतो, ते कसं काय ब्वॉ? (मी संघासाठी गावकुसाबाहेरची असले तरी आमचे खबरीं चारों तरफ फैले हुए है।) संघाचे स्वयंसेवक, ईशान्येमधले प्रचारक, अर्धेमुर्धे स्वयंसेवक वगैरे लोक माझ्याही ओळखीचे आहेत. त्या लोकांना भाजपबद्दल भारी प्रेम असतं! भारतात जन्मलेल्या लोकांना भारताबद्दल असतं तसंच! या प्रचारकांची मतंही संघाची मतं नाहीत का? अरेरे बिचारे! त्या प्रचारकांनामात्र संघ म्हणजे आपलाच असं प्रेम आहे संघाबद्दल. ही तर ड्यांबिस भांडवलशाही, कामगारांना राबवून घ्यायचं, पण हक्क नाही द्यायचे. बरं, मग संघाची मतं म्हणजे नक्की कोणाची मतं?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

उदाहरण

विकास
गुरुवार, 02/21/2013 - 02:48 नवीन
दिग्विजय सिंगांनी काही अचाट विधान केलं की निदान जाहीररित्या "ही आमची अधिकृत भूमिका नाही" असा स्टँडतरी घेते.
तसा त्यांना घ्यावा लागतो कारण दिग्विजयसिंग हे काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी आहेत. त्यामुळे ते जे काही बोलतात ते अधिकृत समजले जाऊ शकते...काँग्रेसचे जे अधिकृत ऑफिसहोल्डर्स नाहीत त्यांच्याबद्दल असला प्रश्न येत नाही आणि तेथे काँग्रेस काही बोलायला देखील जात नाही. तोच मुद्दा संघाच्या बाबतीत आहे. जे ऑफिसहोल्डर्स नाहीत त्यांनी काय म्हणावे हा त्यांचा प्रश्न आहे. तेच माध्यमांनी काय लिहावे हा त्यांचा प्रश्न झाला. त्याला उत्तर द्यावे का नाही हा ज्या संघटनेबद्दल / व्यक्तीबद्दल लिहीले जात आहे त्या व्यक्तीचा झाला. उद्या म्हणाल या धाग्यात नरेन्द्र मोदींनी टिपण्णी केली नाही... इंदिरा गांधी एकदा पंतप्रधान असताना (त्यांच्यावर होणार्‍या टिकेस) वैतागून म्हणाल्या होत्या की वर्तमानपत्रे ही उद्याची रद्दी आहे, किती लक्ष देयचे हे ज्याचे त्याने ठरवावे... आता हे वाक्य म्हणून (तेव्हा लहान असून) मलाच काय अनेकांना पटले नाही, अगदी काँग्रेसी पत्रकारांना देखील पटले नाही. पण त्यांचा मुद्दा इतकाच होता, की प्रत्येक ठिकाणी तयार केलेल्या स्वतः संदर्भातील बातम्यांना आपली बाजू मांडत बसायला वेळ कुणाला आहे. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

संघाच्या माजी पदाधिकार्‍याची

३_१४ विक्षिप्त अदिती
गुरुवार, 02/21/2013 - 22:10 नवीन
संघाच्या माजी पदाधिकार्‍याची मतं ही संघाची अधिकृत मतं नाहीत तर संघाचा कोणताही पदाधिकार कोणत्याही काळी असल्याचं ज्या व्यक्तीबद्दल माहित नाही त्या व्यक्तीची मतंही संघाची अधिकृत मतं कशी मानायची? कशावरच काहीच मतं मांडली नाही की सेफ. सगळीकडून सगळं बोलता येतं. समिती*ने म्हणायचं, "... भारतात बलात्कार होतात..." संघा**ने म्हणायचं, "भारतात असं काही होत नाही." संघ आणि समिती एक नाहीतच. संघात बायका गावकुसाबाहेरच्या आहेत, पण समिती आहे की! त्यांना त्यांचं विचारस्वातंत्र्य आहेच की! सगळीकडून ढोल वाजवायचा. *माजी प्रमुख * आ़जी प्रमुख आता या लोकांची मतं समिती आणि संघाची अधिकृत/आधिकारिक मतं मानायची का नाही?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

दहा तोन्डाचा राक्षस. अजुन एक

पिंपातला उंदीर
Fri, 02/22/2013 - 09:49 नवीन
दहा तोन्डाचा राक्षस. अजुन एक उदाहरण म्हणजे वाजपेयी सरकारने परकीय गुंतवणुकीसाठी विदेशी कंपन्याना देशाची दार उघडायची आणि दत्तोपन्त यांच्या मजदूर संघाने आणि स्वदेशी जागरण मान्चाने त्याचा विरोध करायचा. तू म्हणतेस त्याप्रमाणे 'सेफ' वैइगेरे होता येत : )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

ते इतकं सरळ नाहि आहे

अर्धवटराव
Fri, 02/22/2013 - 10:20 नवीन
राव सरकारने मुक्त आर्थीक धोरण स्विकारलं, भारताने गेट करारावर सह्या केल्या व भारत मुक्त अर्थ व्यवस्थेच्या वाटेने ४ पाऊले चालला. त्या अर्थनितीला १८० डिग्री टर्न देऊन त्यामार्गे देशाची आर्थीक प्रगती करायची म्हणजे हाती निरंकुश सत्ता हवी, व ति देखील किमान दोन दशकं. हे अशक्य होतं. शिवाय वाजपेयींचे विचार कधीच टीपीकल संघी नव्हते. दत्तोपंत ठेंगडी म्हणा किं वा इतर कुणिही कामगार संघटनेचा नेता म्हणा, तो बाय डिफॉल्ट स्वदेशीवाला असायचा (बर्‍याच अंशी अजुनही असतो). त्यांच्या जागी ते बरोबर होते. या मुद्द्यावरुन वाजपेयी सरकार व स्वदेशी परिवार बरेचदा उघडपणे आमने-सामने आले होते. देशाच्या अर्थनितीचा लांब पल्ल्याचा विस्तार बघता आपल्या जुन्या धोरणात लवचीकता आणणे वेगळे व दहा तोंडाने तोंडपाटीलकी करणे वेगळे. वाजपेयी, ठेंगडी वगैरे लोकांचा मगदूर लक्षात न घेता त्यांना दिग्गीराजांच्या सवंग पंगतीला बसवण्याचा प्रयत्न अत्यंत बाष्क्ळ म्हणावा लागेल. फॉर दॅट मॅटर, दशमुखी राजकारणाचं उदाहरणध देतो म्हटलं तर खादी घालुन महात्म्याच्या मांडीला मांडी लावुन आंदोलनं करणारे पंडीतजी पंतप्रधान झाल्यावर गांधीवादाला मुठमाती देतात व गांधीजी "जवाहरने मला वापरुन घेऊन क्षुल्लक पिंपळाच्या पानासारखं फेकुन दिलं" असा उसासा टाकतात. असो. अर्धवटराव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिंपातला उंदीर

फक्त एकच दहा तोंडाचा राक्षस ?

श्रीगुरुजी
Sat, 02/23/2013 - 12:03 नवीन
"दहा तोन्डाचा राक्षस. अजुन एक उदाहरण म्हणजे वाजपेयी सरकारने परकीय गुंतवणुकीसाठी विदेशी कंपन्याना देशाची दार उघडायची आणि दत्तोपन्त यांच्या मजदूर संघाने आणि स्वदेशी जागरण मान्चाने त्याचा विरोध करायचा. तू म्हणतेस त्याप्रमाणे 'सेफ' वैइगेरे होता येत : )" वरील उदाहरण घ्यायचं झालं तर एनडीए किंवा भाजपच्या तुलनेत युपीए/काँग्रेस हे किमान एक सहस्त्र तोंडाचे सैतान समजावे लागतील. काही उदाहरणे . . . (१) नरसिंहरावांनी १९९१ मध्ये इस्राईलशी राजनैतिक संबंध प्रस्थापित केल्यावर काँग्रेसमधल्याच अनेकांनी त्यांच्यावर टीका करून या निर्णयाला विरोध केला होता. (२) नरसिंहरावांनी १९९१ मध्ये अर्थव्यवस्था खुली करून परकीय भांडवलावरचे निर्बंध कमी केल्यावर काँग्रेसमधल्याच अनेकांनी (उदा. अर्जुनसिंग, ना. द. तिवारी) त्यांच्यावर टीका करून या निर्णयाला विरोध केला होता. (३) २०१२ मध्ये म.म.सिंग सरकारने किरकोळ किराणा क्षेत्रात थेट परकीय गुंतवणुकीला परवानगी दिल्यावर काँग्रेसमधल्या अनेकांनी या निर्णयाला विरोध केला होता. (४) २००४ पासून म.म. सिंग सरकारने घेतलेल्या काही आर्थिक निर्णयाविरूद्ध सोनिया गांधींच्या नेतृत्वाखालील तथाकथित राष्ट्रीय सल्लागार समितीने (यात तिस्ता सेटलवाड सारख्या अनेक निधर्मांधांचा समावेश आहे) विरोध दाखविला होता व सोनिया गांधींनी अनेकवेळा थेट म.म. सिंगांना पत्र लिहून या निर्णयांना जाहीर विरोध केला होता. (५) सध्या चर्चेत असलेल्या बहुचर्चित अन्नसुरक्षा विधेयकाला म.म.सिंग, चिदंबरम इ. चा विरोध आहे तर सोनिया गांधी व त्यांची तथाकथित राष्ट्रीय सल्लागार समितीचा या विधेयकाला ठाम पाठिंबा आहे. ही फक्त पाचच उदाहरणे दिली. प्रत्येक उदाहरणामागे काँग्रेस नामक राक्षसाला १० तोंडे आहेत असे मानले तर इथेच ५० तोंडे झाली. इतिहासातील इतर उदाहरणे काढली तर काँग्रेस नामक राक्षसाला किमान एक हजार तोंडे आहेत असे लक्षात येईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिंपातला उंदीर

(१) नरसिंहरावांनी १९९१ मध्ये

पिंपातला उंदीर
Sat, 02/23/2013 - 16:10 नवीन
(१) नरसिंहरावांनी १९९१ मध्ये इस्राईलशी राजनैतिक संबंध प्रस्थापित केल्यावर काँग्रेसमधल्याच अनेकांनी त्यांच्यावर टीका करून या निर्णयाला विरोध केला होता. - कुणी आणि कधी? अधिक माहिती आवडेल. (२) नरसिंहरावांनी १९९१ मध्ये अर्थव्यवस्था खुली करून परकीय भांडवलावरचे निर्बंध कमी केल्यावर काँग्रेसमधल्याच अनेकांनी (उदा. अर्जुनसिंग, ना. द. तिवारी) त्यांच्यावर टीका करून या निर्णयाला विरोध केला होता. नंतर त्यानी राजीव कॉंग्रेस नावाचा वेगळा पक्ष काढला. दत्तोपन्तानि असे काही केल्याचे आठवत नाही. म्हणजे सत्तेचे फायदे पण उपटायचे आणि सोयीस्करारत्या सोयीस्कर वेळी सोयीस्कर विरोध पण करायचा अशी काही नीती आहे का ? (३) २०१२ मध्ये म.म.सिंग सरकारने किरकोळ किराणा क्षेत्रात थेट परकीय गुंतवणुकीला परवानगी दिल्यावर काँग्रेसमधल्या अनेकांनी या निर्णयाला विरोध केला होता. पण कोणी कॉंग्रेस वाले त्याविरुद्ध राष्ट्रीय संपात सामील झाळ्याचे आठवत नाही. जसा मजदूर संघ झाला होता. (४) २००४ पासून म.म. सिंग सरकारने घेतलेल्या काही आर्थिक निर्णयाविरूद्ध सोनिया गांधींच्या नेतृत्वाखालील तथाकथित राष्ट्रीय सल्लागार समितीने (यात तिस्ता सेटलवाड सारख्या अनेक निधर्मांधांचा समावेश आहे) विरोध दाखविला होता व सोनिया गांधींनी अनेकवेळा थेट म.म. सिंगांना पत्र लिहून या निर्णयांना जाहीर विरोध केला होता. कोणते निर्णय? (५) सध्या चर्चेत असलेल्या बहुचर्चित अन्नसुरक्षा विधेयकाला म.म.सिंग, चिदंबरम इ. चा विरोध आहे तर सोनिया गांधी व त्यांची तथाकथित राष्ट्रीय सल्लागार समितीचा या विधेयकाला ठाम पाठिंबा आहे. म. म. सिंग आणि अर्थमंत्र्यांचा विरोध आहे हे मत कुठले संपादकीय वाचून बनवले आहे का याला वस्तुस्थिती चा पण आधार आहे. कारण त्या दोघांी जाहीर रित्या तसे काही म्हंतल्याचे आठवत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

हा वाद पुढे पण जाउ शकतो. पण

पिंपातला उंदीर
Sat, 02/23/2013 - 16:16 नवीन
हा वाद पुढे पण जाउ शकतो. पण एकदा कॉंग्रेस आणि भाजप ( म्हणजेच संघ परिवार) या एकाच नाण्याचा दोन बाजू आहेत हे एकदा समाजल की बस. एकाला झाका आणि एकाला काढा. रालोआ सरकारने पण कॉंग्रेस सारखाच वैचारिक विरोधाभास आणि दिवे लावले आहेत हे बहुदा मान्य असेल तुम्हाला : )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिंपातला उंदीर

तुमचा हा लेख वाचुन केंद्र

श्री गावसेना प्रमुख
Sat, 02/23/2013 - 16:23 नवीन
तुमचा हा लेख वाचुन केंद्र सरकार ने काही डिसीजन घेतली का?उदा.दारुगोळा विमाने,रणगाडे विकत घेणे इ..(ह घे)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिंपातला उंदीर

त्या लेखाची प्रिंट आउट काढून

पिंपातला उंदीर
Sat, 02/23/2013 - 16:52 नवीन
त्या लेखाची प्रिंट आउट काढून पंतप्रधान कार्यालयाला पाठवली आहे. बाकी तूर्त इथल्या पब्लिक ने पण तो लेख सीरिस्ल्ली घेतला नाही त्यामुळे फारशा अपेक्षा नाहीत ; )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्री गावसेना प्रमुख

माझ्या मते आपत्तीच

श्रीरंग_जोशी
Fri, 02/08/2013 - 22:20 नवीन
रालोआचा मार्च १९९८ ते एप्रिल २००४ हा कारभार संपुआच्या आजवरच्या कारभारापेक्षा नक्कीच उजवा होता. वाजपेयींसारखे उत्तुंग नेतृत्व असतानादेखील २००४ च्या लोकसभा निवडणूकीमध्ये रालोआचा निर्णायक पराभव झाला. या पराभवामागे अनेक कारणे असली तरी फेब्रुवारी २००२ पासून पुढील दोन वर्षे गुजरातमध्ये जे झाले ते व त्यावर केंद्रीय नेतृत्वाचा निष्क्रियपणा हे सगळ्यात मोठे कारण होते. जो माणूस भाजप व मित्रपक्षांच्या आजवरच्या सर्वाधिक अनपेक्षित पराभवाचे सर्वात मोठे कारण आहे त्यालाच सर्वोच्च नेतृत्व देणे म्हणजे आत्मघात ठरेल. रालोआमध्ये आजच्या घडीला पंतप्रधानपदासाठी लागणारी पात्रता असणाऱ्या नेत्यांमध्ये मी जसवंतसिह यांना प्रथम स्थान देईन. १९९८ ते २००४ मध्ये तत्कालीन पंतप्रधान वाजपेयी यांनी जितक्याही जबाबदाऱ्या त्यांच्यावर सोपवल्या त्या यशस्वीपणे पार पाडल्या. उदा. नियोजन आयोगाचे उपाध्यक्षपद, पोखरण अणुचाचणीनंतर पंतप्रधानांचे विशेष दूत म्हणून अमेरिकन परराष्ट्रमंत्र्यांशी वाटाघाटी, परराष्ट्रमंत्री, संरक्षणमंत्री, अर्थमंत्री वगैरे वगैरे. त्याखेरीज केंद्र सरकारची धोरणे ठरविण्यातही वाजपेयींचे उजवे हात ते समजले जात. दुर्दैवाने नंतरच्या काळात पुस्तक वगैरे लिहून स्वतःचे राजकीय अवमूल्यन केले नसते तर आज परिस्थिती वेगळी असती.
  • Log in or register to post comments

"या पराभवामागे अनेक कारणे

श्रीगुरुजी
Fri, 02/08/2013 - 22:35 नवीन
"या पराभवामागे अनेक कारणे असली तरी फेब्रुवारी २००२ पासून पुढील दोन वर्षे गुजरातमध्ये जे झाले ते व त्यावर केंद्रीय नेतृत्वाचा निष्क्रियपणा हे सगळ्यात मोठे कारण होते. " असहमत! २००४ मध्ये एनडीए पराभूत झाले कारण भाजपने आपले अनेक मित्रपक्ष गमावले होते व काँग्रेसने अनेक मित्रपक्ष मिळविले होते. तामिळनाडूत द्रमुकने भाजपची साथ सोडून काँग्रेसशी शय्यासोबत केली व भाजपला अद्रमुकबरोबरही युती करता आली नव्हती. त्यामुळे तामिळनाडूतून एनडीएला शून्य जागा मिळाल्या (१९९९ मध्ये द्रमुक २१ व भाजप ४ अशा २५ जागा होत्या). आंध्रप्रदेश मध्ये काँग्रेसने वेगळ्या तेलंगणाला पाठिंबा दिला व चंद्रशेखर रावच्या तेलंगणा राष्ट्रीय समितीशी युती करून ४२ पैकी तब्बल ३६ जागा जिंकल्या. भाजप+तेलगू देसमला फक्त ६ जागा मिळाल्या (१९९९ मध्ये एनडीएला तब्बल ३७ जागा मिळाल्या होत्या). २००१ मध्ये सोनिया गांधींनी वाजपेयींना पत्र लिहून तेलंगणाचे स्वतंत्र राज्य करण्याची मागणी केली होती. आता तेच तेलंगण बूमरँगप्रमाणे काँग्रेसवर उलटले आहे. या दोन मोठ्या राज्यात एनडीएने तब्बल ५५ जागा गमाविल्या. त्याबरोबर १९९९ मध्ये काश्मिरमध्ये फारूख अब्दुल्लाबरोबर युती करून एनडिएने ६ जागा मिळाल्या होत्या. २००४ फारूकने काँग्रेसशी शय्यासोबत केल्याने एनडीएचा आकडा शून्यावर आला. बिहारमध्येही पास्वानने व बंगालमध्ये मनता बॅनर्जीने भाजपशी युती तोडली होती. त्यामुळे २००४ मधल्या एनडीएअच्या पराभवाचे मुख्य कारण गुजरात दंगल नसून अनेक मित्रपक्षांनी सोडलेली साथ हे मुख्य कारण होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

इतर कारणे आहेतच

श्रीरंग_जोशी
Fri, 02/08/2013 - 22:54 नवीन
इतर कारणे आहेतच पण या कारणाचा परिणाम तेव्हाही झालाच अन भाजपाच्या वाटचालीवर अजूनही होतोच आहे. २००४ मध्ये बरेच मित्रपक्ष गमावण्याचे कारणही हे असू शकतेच. गुजरातमध्ये जे घडले त्याला दंगल म्हणणे माझ्या मते संयुक्तिक नाही. १९९२-९३ मध्ये जे घडले त्यास दंगल म्हणता येईल. दंगल ही दोन बाजूंच्या हिंसेने होत असते. २००२-०३ साली २४ तास प्रक्षेपण असणार्‍या वाहिन्या होत्या, इंटरनेट होते, भ्रमणध्वनी होते. त्यामुळे १९९२-९३ किंवा त्यापूर्वी केवळ अफवांमुळे दंगलींची तीव्रता वाढत असे तो घटक यावेळी नव्हता. १९९२-९३ नंतर संपूर्ण देशभरात गुजरातचा अपवाद वगळता एवढ्या मोठ्या प्रमाणात हिंसाचार कधीच झालेला नाही. यावरून या गोष्टीमुळे झालेले नुकसान स्पष्ट होते. गुजरात तर नामनिराळे राहिले पण तिथे जे घडले त्याची किंमत महाराष्ट्राने २००३ पासूनच्या अतिरेकी हल्यांनी आजवर चुकवली आहे. त्याअगोदर १२ मार्च १९९३ नंतर कुठलाही मोठा अतिरेकी हल्ला झाला नव्हता. भाजपमधील धुरिणांना हे कारण नक्कीच मान्य असावे नाहीतर मोदी यांना केव्हाच आगामी काळातले सर्वोच्च नेतृत्व म्हणून जाहीर करण्यात आले असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

शंका

आजानुकर्ण
Fri, 02/08/2013 - 23:12 नवीन
काँग्रेस करते ती शय्यासोबत आणि त्याच पक्षांबरोबर भाजपा करते ती युती हा फरक तुम्हाला कसा काय शोधता आला?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

२०१४ मध्ये १९९६ सारखी

श्रीगुरुजी
Fri, 02/08/2013 - 22:21 नवीन
२०१४ मध्ये १९९६ सारखी त्रिशंकू परिस्थिती येण्याची शक्यता आहे असे नुकत्याचा झालेल्या मतदाता सर्वेक्षणावरून वाटत आहे. अर्थात पुढील वर्षात कारगिल युद्ध किंवा १९८४ सारखी परिस्थिती निर्माण झाली तर चित्र एकदम पालटू शकते. अजून एक शक्यता वाटते. जर काँग्रेस आणि युपीए स्वबळावर सरकार बनविण्याच्या परिस्थितीत नसतील (म्हणजे एनडीएला अंदाजे २०० जागा, युपीएला १५०-१६० च्या आसपास जागा व उर्वरित पक्षांना मिळून अंदाजे १७५ जागा), तर काँग्रेस धाडस करून मीरा कुमारांचे नाव पंतप्रधानपदासाठी पुढे करेल. एका दलित असलेल्या व वादग्रस्त नसलेल्या महिलेच्या पंतप्रधान पदाला विरोध करण्याचे धाडस बहुसंख्य पक्ष करणार नाहीत. डाव्या पक्षांचाही त्यांना विरोध नसेल आणि मुख्य म्हणजे त्या बिहारच्या असल्याने संयुक्त जनता दल, राजद व लोजप या बिहारी पक्षांनाही त्यांना विरोध करता येणार नाही. म्हणजे आता माझ्या दृष्टीने २०१४ मधल्या पंतप्रधानपदाच्या शॉर्टलिस्ट मध्ये ४ नावे झाली - नितीशकुमार, जयललिता, मीरा कुमार व अजित सिंग.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा