Skip to main content

अधीर उपाशी

शुक्रवार, 15/02/2013 या दिवशी प्रकाशित केले.
नोकरीत बढती मिळत नाही, पैशाची चणचण मिटत नाही, घरगुती वातावरण अशांत, अशी समस्यांची चेकलिस्ट घेऊन अमूकगावातला एक माणूस तमूकगावातल्या एका खूप मान्यता असलेल्या गणपतीच्या देवळात हजर झाला. त्याच्याच आयटी कंपनीत काम करणा-या एका मित्राने हे देऊळ त्याला ‘रेफर’ केलं ‘रेफर’. तर साहेब लगोलग गाडी बुक करून तमूकगावाला रवाना झाले आणि देवळात पोचले. ‘जे जे शक्य आहे ते ते करून बघू’ असं म्हणून. "देवा, फार लांबवरून तुझ्याइथे आलोय. तू सगळ्यांकडे बघत असतोसच. तुला माझीही अवस्था दिसत असेल. माझी स्वप्न कशी अर्धवट राहतायत, त्यांच्या पूर्ण होण्यात कशा आणि कुठल्या अडचणी येतायत, हे दिसत असेल. तरीही. देवा, मला नोकरी करून ४ वर्ष झाली पण हवी तशी प्रगती झाली नाही. कंपनीतल्या राजकारणामुळे मी डावलला जातोय. त्यामुळे पगार वाढत नाही, पण गरजा आ वासून उभ्या आहेत. घरात त्यावरून वाद होतात. कुठेच शांतता नाहीये. खूप आशेने तुझ्याकडे आलोय, कृपा कर, माझ्या या अडचणी दूर कर. मी दर वर्षी इथे येईन, तुला ५१ नारळ वाहीन." "झालं बोलून?" (थबकून)"कोण?.... कोण बोललं?" "मीच मीच. ज्याच्याशी आत्ता तू बोललास, मनातल्या मनात." "(अतिशय हर्षोल्हासित होऊन) खरंच!! मी स्वप्नात तर नाही..." "ठीक आहे ठीक आहे. सिरियलगिरी नकोय. तर तू, कुठून?... अमूकगावातून इथवर आलास. का रे बाबा? अमकेगावातही माझं देऊळ बांधलंय ना तुम्ही, इतर देवांची देवळंही आहेतच की तिथे." "हो देवा त्या देवळातही मी नेमाने जातो" "मग? ‘रिझल्ट मिळत नाही म्हणून दुसरे ‘ऑप्शन्स’ ट्राय करतोयस?" "नाही... असं नाही... तू नवसाला पावतोस असं मला माझा मित्र म्हणाला..." "तुमचा एरिया माझ्या स्कोप ऑफ ऑपरेशन मधे येत नाही. असं तुमच्या सरकारी किंवा कॉरपोरेट भाषेतलं वाक्य म्हणावसं वाटतंय मला. आणि तसंच आहे बरं का. तुम्ही आपल्या गावातली देवळं सोडून लांबलांबच्या कुठल्या देवांचं वर्कलोड का वाढवता रे? का आमची सिस्टिम डिस्टर्ब करता तुम्ही? साउथ चे लोक सिद्धिविनायकाला मुंबईत. नॉर्थची मंडळी लालबागच्या राजाला साकडं घालणार, मुंबईत. मुंबईतले स्टार जाणार बालाजी ला. बंगालची माणसं आणखी कुठे राजस्थान ला. तुम्ही मानवप्राणी ना जाम इंपेशंट झालायत. तुम्हाला बनवताना मी ‘आशा’ नावाचं एक सगळ्यात सक्षम रसायन तुमच्यात ओतलं होतं. त्याची ‘नशा’ झालीय आता ‘नशा’. हातचं सोडून पळत्याच्या मागे, काखेत कळसा गावाला वळसा, एक ना धड भाराभर चिंध्या. या म्हणी तुम्हीच बनवल्यात; त्या तुम्ही शिकलात शाळेत. उपयोग काय?" सिद्धिविनायकाला जाऊन एक आठवडा नाही झाला, चालले शिर्डीला. तिथे जाऊन ४ दिवस नाही झाले, की तुम्ही कसलासा मंत्र सुरू करता जपायला. तोही सातत्याने नाही; आणि मग ‘रिझल्ट’ नाही आला की तिसरा देव. अरे काय चालवलंय? ही रेल्वेची तिकिट विंडो नाही की जिथे कमी रांग दिसते तिथे उभं रहावं. किंवा आमची देवळं म्हणजे वेगवेगळी हॉटेलं नाहीत कि आज चायनिज खाल्लं, उद्या पंजाबी, परवा कॉंटिनेंटल, तेरवा ब्राह्मणी. लाईन अ‍ॅंड लेन्ग्थ सातत्यपूर्ण ठेवा की जरा." "मला पटतंय देवा.... पण... आमच्या समस्या आम्हाला असं बिथरायला भाग पाडतात" "अच्छा म्हणजे समस्या तुमच्या पेक्षा बलवान झाल्या तर. मग तुम्हाला दिलेल्या बुद्धी, आत्मविश्वास, विचार, समज, या गोष्टी कुठे हरवल्या? मुळात तुमच्या मनात आम्ही जो आमचा ३जी सॅटेलाईट फोन बसवलेला असतो. तो तुम्ही कधी डायलच करत नाही. कधी मनन, चिंतन करतंच नाही. काही झालं की लगेच आय एस डी फोन करायला नाहीतर चॅट करायला देऊळरूपी सायबर कॅफेत येता. असं नसतं रे करायचं. काही फीचर्स आम्ही आमच्या प्रत्येक मानवात इन्बिल्ट बसवलेली आहेत. ती फीचर्स वापरलीच नाहीत तर तुम्हाला तुम्ही कीती ‘केपेबल’ आहात हे कधीच कळायचं नाही. काही गोष्टी आम्ही आमच्या लोकल देवळांत डेलिगेट केलेल्या आहेत, तेंव्हा लगेच असे इशू एस्कलेट करायचे नाहीत. किंवा भांबावल्यासारखं वेगवेगळी देवळं हंट करत फिरायचं नाही. विश्वास ठेवायचा. संयम ठेवायचा. प्रोसेस चालू असते. अरे प्रोग्रॅम लिहिणं एक वेळ सोपं असतं पण त्यातला बग काढायला वेळ लागतो. इन्स्टंट नसतात सगळ्या गोष्टी. आणि फरक कसा आहे माहित्ये, आम्ही सगळे एक आहोत; आणि तुमच्या एकेकाला सगळे हवे असतो." "मला खरंच सगळं कळलंय, समजलंय आणि पटलंय.... मी आणखी काहीच म्हणत नाही आता" "हं ! तेंव्हा आता शांत रहा. चांगल्या गोष्टी करत रहा. तू इथवर आलास, तुझी केस एक्स्पिडाईट करतो मी. माझ्या म्हणण्याचा वाकडा अर्थ घेऊ नकोस. तुम्हा मानवांना कीड लागलीय असे गैरसमज करून घेण्याची. देवळात या तुम्ही; मला आवडतं तुम्हाला भेटायला. पण काही गोष्टी आपल्या ३जी सॅटेलाईट फोन वरूनच बोलंत जाऊ आपण. तो जास्त जलद आणि परिपूर्ण संवाद असतो. कळलं?" "हो. (हसतो)" "तथास्तू"
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 6487
प्रतिक्रिया 43

प्रतिक्रिया

लेख अतिशय आवडला. देव खरा असो वा नसो, स्वतः प्रयत्न तर करायला हवा. दैवाला कर्माची साथ हवीच.

हे फक्त हिंदूंच्याच प्रार्थनास्थळाला लागू होते का हो?

In reply to by नगरीनिरंजन

बर ३३ तर ३३. तुम्ही ना छुट फुट गोष्टींवरुन नाराज होतात. गायीच्या पोटात जरी ३३ कोटी देव असले तरी गायीच्या पोटाला वारंवार हात लाउ नये गायीला गुदगुल्या होतात म्हणे

In reply to by श्री गावसेना प्रमुख

गायीच्या पोटाला वारंवार हात लाउ नये गायीला गुदगुल्या होतात म्हणे
हा प्रतिसाद पटला आहे! :))

लाईन अ‍ॅंड लेन्ग्थ सातत्यपूर्ण ठेवा की जरा
देवावेगळें कोणीं नाहीं| ऐसें बोलती सर्वहि |परंतु त्यांची निष्ठा कांहीं| तैसीच नसे ||१९|| म्हणौनी ऐसें न करावें| सख्य तरी खरेंचि करावें |अंतरीं सदृढ धरावें| परमेश्वरासी ||२०|| आपुलिया मनोगताकारणें| देवावरी क्रोधास येणें |ऐसीं नव्हेत किं लक्षणें| सख्यभक्तीचीं ||२१|| देवाचें जें मनोगत| तेंचि आपुलें उचित |इच्छेसाठीं भगवंत| अंतरूं नये कीं ||२२|| देवाचे इच्छेनें वर्तावें| देव करील तें मानावें |मग सहजचि स्वभावें| कृपाळु देव ||२३|| दासबोध दशक ४ समास ८

In reply to by विटेकर

आपुलिया मनोगताकारणें| देवावरी क्रोधास येणें |ऐसीं नव्हेत किं लक्षणें| सख्यभक्तीचीं ||२१||
आमचे अल्जिरीयाचे महाराजही हेच म्हणतात.

In reply to by धन्या

अल्जिरीयाचे महाराजांचे नेमके म्हणणे तुम्हाला कळले म्हणजे तुम्हाला सिद्धी प्राप्त असणार. आम्ही एकदा चांगले २ तास प्रवचन ऐकले होते, *ट कळले नव्हते. त्या प्रवचनादरम्यान काही भक्तांना समाधी पण लागली होती म्हणे, काहींची तर चक्क कुंडलिनी जागृत झाली होती. आम्ही कोरडे पाषाण राहिलो दुर्दैवाने :-(

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

विमे, विषय समजावण्यात आम्ही कमी पडलो असू तर क्षमस्व. ती माझी मर्यादा आहे. त्या त्या वेळी ती ती गोष्ट समजणं अवघड असतं. १० वी व्हायला १० वर्षं देऊ आम्ही, पण देव हा विषय आज आत्ता ताबडतोब समजला नाही तर तिथल्या तिथं लाथ. (मला वाटतंय वरच्या आशयाचा आपला हा किमान चौथा प्रतिसाद आहे. दु:ख त्याबद्दल नाहीच. टिंगल माझी करा, परमार्थाची नको. :) ) हा विषय अधिकारी माणसाकडून समजून घेतला तर त्यासारखा आनंद नाही. विन्डो शॉपिंगच करणारे असलात तर आम्ही देखील सगळीकडे करतोच. मिळून करु. :)

In reply to by प्यारे१

विषय समजावण्यात आम्ही कमी पडलो असू तर क्षमस्व. ती माझी मर्यादा आहे.
असे मी कुठेही म्हटले नाही. समजले नाही इतकेच म्हटले आहे. समजून घेण्यात आम्ही कमी पडलो असू कदाचित.
त्या त्या वेळी ती ती गोष्ट समजणं अवघड असतं. १० वी व्हायला १० वर्षं देऊ आम्ही, पण देव हा विषय आज आत्ता ताबडतोब समजला नाही तर तिथल्या तिथं लाथ.
आईशप्पथ हे ही नीटसे नाही कळले.
(मला वाटतंय वरच्या आशयाचा आपला हा किमान चौथा प्रतिसाद आहे. दु:ख त्याबद्दल नाहीच. टिंगल माझी करा, परमार्थाची नको.)
माझे टार्गेट किमान ५० प्रतिसादांचे आहे, तेव्हा स्टे ट्युण्ड ;-) बाकी टिंगल परमार्थाची नाही, तुमचीच करत आहे. चिंता नसावी. काय राव, तुम्ही इतरांची इतकी खेचता, थोडी स्वतःची पण टिंगल सहन करा.

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

असे मी कुठेही म्हटले नाही. समजले नाही इतकेच म्हटले आहे. समजून घेण्यात आम्ही कमी पडलो असू कदाचित. ब्वार्र. आईशप्पथ हे ही नीटसे नाही कळले. ब्वार्र. माझे टार्गेट किमान ५० प्रतिसादांचे आहे, तेव्हा स्टे ट्युण्ड बाकी टिंगल परमार्थाची नाही, तुमचीच करत आहे. चिंता नसावी. काय राव, तुम्ही इतरांची इतकी खेचता, थोडी स्वतःची पण टिंगल सहन करा. ब्वार्र.

सर्व प्रतिसाद वाचून आनंद झाला. सगळ्यांना धन्यवाद.

वेल्लाजी आवडले लिखाण. छान आहे कन्सेप्ट पण. :) शुभेच्छा. . .थोडे अवांतर : सगळ्यांना स्वतंत्रपणे धन्यवाद देण्यापेक्षा एकदम दिलेत तरी चालेल. वाचक समजून घेतील. काही प्रत्युत्तर असेल तर प्रतिसाद दिलात तरी चालेल. (मी ही वाचकच आहे नुसता :))

In reply to by अभ्या..

हो मला कळलंच ते. त्यामुळे मी लगेच सगळ्यांना धन्यवाद अशी एक प्रतिक्रिया पोस्ट केली. तुमच्या प्रतिसादाच्या 'जस्ट' आधी. आभार.

लेखनाचे सार ?

In reply to by परिकथेतील राजकुमार

लेखनाचे सार : तथास्तू (स्तू दीर्घ काढलेला)

बरं झालं तुम्ही हे लिहिलात ते मी आजच जाणार होते दुसर्‍या एका दुरच्या गणपतीला. आता नाही जाणार. आमच्या गल्लीतला राम काळा असला तरी आता तोच चालवुन घेते नवसा बिवसाला.

"अच्छा म्हणजे समस्या तुमच्या पेक्षा बलवान झाल्या तर. मग तुम्हाला दिलेल्या बुद्धी, आत्मविश्वास, विचार, समज, या गोष्टी कुठे हरवल्या? मस्तच. देवाला मंदिरात शोधणारे : पापी : ज्याला आपल्या पापाची जाणीव झाली आहे रोगी : एकदा असाध्य रोग जडलेला भिकारी: काहीना काही अपेक्षा ठेवणारा चोर : चप्पल ते देवाच्या मुर्ती ड्ल्ला मारणारे पुजारी: ऐतखाउ दलाल

तेंव्हा आता शांत रहा. चांगल्या गोष्टी करत रहा.
जोक ऑफ द डे!
"अच्छा म्हणजे समस्या तुमच्या पेक्षा बलवान झाल्या तर. मग तुम्हाला दिलेल्या बुद्धी, आत्मविश्वास, विचार, समज, या गोष्टी कुठे हरवल्या?
सत्तेपुढं शहाणपण चालतं का देवा ?

बाब्बौ!! या देवाच्या बोलण्यात लैच विंग्रजी शब्द दिसून राह्यलेत ना बाप्पा.

पटल, आवडल. मी प्रसिद्ध देवस्थाने केवळ पर्यटन हा एकच हेतू ठेऊन जातो.. आणि इतर स्थानिक मंदीरात देखील गेलोच तर त्या त्या देवाचा वार नसताना म्हणजे गर्दी कमी मिळते.. बाकी आहे मी नास्तिक त्यामुळे मागायचे असे काही नसते त्याच्याकडून..

In reply to by तुमचा अभिषेक

मी प्रसिद्ध देवस्थाने केवळ पर्यटन हा एकच हेतू ठेऊन जातो..
तिथली अस्वच्छता पाहण्यासाठी का? अर्थात अपवादाने काही देवस्थाने स्वच्छ आहेत, नव्हे तोच त्यांचा युएसपी आहे. पण बाकीच्या देवस्थानांचं काय? :)

In reply to by धन्या

ज्यांना तुम्ही अपवादाने स्वच्छ आहेत असे म्हणालात तिथेच मी जातो असे समजा.. :) तसेही पर्यटनाबद्दलच्या माझ्या अपेक्षा एखादी नवीन जागा बघणे होईल इतक्या माफक आहेत.. :)

>>> काही गोष्टी आम्ही आमच्या लोकल देवळांत डेलिगेट केलेल्या आहेत, तेंव्हा लगेच असे इशू एस्कलेट करायचे नाहीत. किंवा भांबावल्यासारखं वेगवेगळी देवळं हंट करत फिरायचं नाही. सहमत आहे. म्हणूनच मी आमच्या गावातल्या लोकलच्या सर्व देवळात जातो आणि देवाचंही माझ्याकडे बरं लक्ष आहे. -दिलीप बिरुटे

म्हणजे गणपतीबाप्पा आता उपदेशही करू लागले म्हणता ? ...चला मारुतीला....

काही देवळं जागॄत असतात.. म्हणजे नक्की काय? आणी मग इतर काय निद्रीस्त? ;)