आता सांगा..
खरंय! बेचैन नक्कीच आहे मी. अगदी फारच.
आधीही तसंच होतं आणि आत्ताही आहे. पण मला वेड लागलं आहे असं काय म्हणून म्हणाल तुम्ही? या आजाराने माझ्या जाणिवा तुम्हाला वाटतंय तशा नष्ट केलेल्या नाहीत, तर अतिशय तीक्ष्ण केल्या आहेत. त्यात सगळ्यात तीव्र आहे ती म्हणजे माझी ऐकण्याची क्षमता. अस्पष्टशा आवाजालाही वेधणारी. अत्यंत अचूक. अगदी स्वर्गातला असो, की पृथ्वीवरचा किंवा मग पाताळातलाही, कोणत्याही आवाज ऐकू शकेन मी. आता सांगा.. हा काय भ्रमिष्टपणा आहे? मी जे सांगत आहे ते नीट लक्ष देऊन ऐका. म्हणजे मी किती शांतपणे ही पूर्ण घटना सांगणार आहे ते समजेल तुम्हाला.
पहिल्यांदा ती कल्पना माझ्या डोक्यात कशी आली हे नेमकं सांगता यायचं नाही. पण एकदा ती मला पटल्यानंतर मात्र तिने माझा दिवसरात्र पिच्छा पुरवला. माझा हेतू काही नव्हता. मला कसलाही ध्यास नव्हता. मला आवडायचा तसा तो म्हातारा. ना तो माझ्याशी कधी वाईट वागला. ना अपमानास्पद वाटेलसं वागला. ना मला त्याच्या संपत्तीची अभिलाषा वाटली. पण.. पण त्याचा तो डोळा!! मला वाटतं.. तेच कारण होतं. त्याचा तो डोळा! अगदी गिधाडासारखा होता - फिकुटलेला, मळकट निळसर रंगाचा, पातळसा पडदा असलेला. ज्या ज्या वेळी ती मळकट निळी नजर माझ्यावर पडे, त्या त्या वेळी माझे शरीर ताठून जाई, रक्त गोठून जाई. हळूहळू, क्रमाक्रमाने माझा निश्चय बळावत गेला. त्या निळ्या डोळ्यापासून सुटका हवी तर त्या म्हातार्याचा जीव घेण्याशिवाय काही पर्यायच नव्हता, माझी खात्रीच झाली तशी.
आता हे बघा, मला वेड लागलं आहे, असं तुम्हाला वाटतंय. पण वेड्या माणसांना कळत असतं का काही? नाही ना? तुम्ही मला पाहायला हवं होतंत. तुम्ही पाहायला हवं होतं, किती सावधपणे मी पावलं टाकली - किती दूरदर्शीपणे - केवढ्या बेमालूमपणे - मी माझी मोहीम सुरू केली! त्या म्हातार्याचा जीव घेण्याअगोदर पूर्ण आठवडा त्याच्याशी माझं वागणं किंचितही बदललं नाही, त्यात कोणताही अवाजवी दयाळूपणा आला नाही. आणि रात्री? अंधार पडला की मध्यरात्रीच्या सुमारास मी त्याच्या दाराचं लॅच फिरवून ते दार उघडत असे.. अगदी अलगऽऽद! आणि मग, ते दार माझं डोकं आत शिरेल इतकं किलकिलं झालं, की त्या खोलीतल्या अंधारात माझ्या हातातला दिवा प्रवेश करत असे - पूर्णपणे झाकलेला! इतकाही उजेड दिसणार नाही असा झाकलेला. आणि मगच मी माझं डोकं आत घालत असे. माझी ही चलाखी बघून तुम्हाला नक्कीच हसू फुटल्याशिवाय राहिलं नसतं! मी माझं डोकं धीमे धीमे .. अगदी धीमे धीमे आत शिरू देत असे. आता मला त्याची झोपमोड थोडीच करायची होती?? तब्बल एक तास लागायचा मला फक्त माझं डोकं आत घालायला, मग कुठे माझं लक्ष्य, तो म्हातारा मला पलंगावर झोपलेला दिसू लागे. आता सांगा.. एखादी वेडी व्यक्ती अशा हुशारीने वागू शकते का?
तर.. एकदा का माझं डोकं पूर्ण आत शिरलं, की माझा दिवा मी सावकाऽऽश मालवत असे.. त्याचा आवाज होऊ नये इतका सावकाश, आणि त्यातून केवळ एकच प्रकाशकिरण बाहेर येऊन त्या गिधाडासारख्या डोळ्यावर पडेल इतकाच..!
सतत सात रात्री मी हे केलं. नेमक्या मध्यरात्रीच्या वेळी. मला त्या म्हातार्याचा काही त्रास नव्हता, हे सांगितलंय मी तुम्हाला. पण तो निळा डोळा! खिजवत असे तो डोळा मला!! पण दरवेळी तो डोळा मिटलेलाच दिसे. त्यामुळे मग.. त्या निळ्या डोळ्यापासून सुटका हवी तर त्या म्हातार्याचा जीव घेण्याशिवाय काही पर्यायच नव्हता! हो की नाही?
दररोज सकाळी मात्र मी सहजपणे त्याला भेटत असे, अगदी त्याच्या नावाने हाक मारून त्याची विचारपूस करत असे. रात्री शांत झोप लागली ना.. हेही विचारत असे! अगदी साधा सरळ म्हातारा होता हो तो.. तो झोपलेला असताना दर मध्यरात्री त्याच्या खोलीत शिरून कोणी त्याला निरखतं आहे, अशी शंकाही येणं शक्य नव्हतं त्याला.
आठवी रात्र. मी रोजच्यापेक्षा अधिकच सावध असल्याचं चांगलं आठवतंय मला. घड्याळाचा मिनिटकाटादेखील माझ्या मनापेक्षा जलद धावत होता, हे अगदी खात्रीपूर्वक सांगू शकेन मी. माझ्या ताकदींची, माझ्या बुद्धिमत्तेची इतकी जाणीव मला पहिल्यांदाच होत होती. मी माझ्या ध्येयाच्या जवळ पोचत असल्याचा आनंद माझ्या मनात मावत नव्हता. मी इथे दार उघडून त्या खोलीत प्रवेशत असताना त्याला मात्र माझ्या अंतस्थ हेतूंची, आणि कृतींचीसुद्धा स्वप्नातही कल्पना नव्हती! माझ्या मनाला या विचाराने गुदगुल्या होत होत्या, मला आलेलं हसू मी दाबलं खरं.. पण तरी बहुधा त्याने ते ऐकलं असावं!! झोपेत दचकावं तसा तो पलंगावरच हलला!! आता सांगा.. मी मागे फिरण्याचा विचार केला असेल असं वाटतंय ना तुम्हाला? छे, मुळीच नाही. कारणच नव्हतं तसं. एक म्हणजे त्या खोलीत डोळ्यात बोट घातलं तरी दिसणार नाही, इतका अंधार होता (खिडक्या घट्ट बंद करून घ्यायची त्याची सवय माहीत होती मला), आणि दुसरं, त्या पलंगावरून खोलीचा दरवाजा मुळीच दिसत नसे. त्यामुळे मी माझं आत शिरायचं काम सुरूच ठेवलं. डोकं आत घातल्यावर रोजच्याप्रमाणे दिवा मालवण्यासाठी मी हालचाल केली.. आणि माझं बोट सटकलं!! अस्पष्टसा आवाज झाला!!
म्हातारा ताडकन् उठून बसला! 'कोण आहे??' त्याचा भ्यायलेला आवाज खोलीत घुमला!
मी स्तब्ध राहून तोंडातून अवाक्षरही काढलं नाही. गप्प! निश्चल! पूर्ण एक तास! पण त्या एक तासात तो अजिबात आडवा झाला नाही. खोलीत नेमकं काय आहे याची चाहूल घेत राहिला. जशी मी त्याच खोलीत गेले सात रात्री घेतली होती - त्याच्या मृत्यूची.
अचानक त्याच्या तोंडून भयाचा सुस्कारा ऐकू आला. मरणाच्या भीतीने. शंकाच नको. अगदी व्यवस्थित समजलं मला ते. या उद्गाराशी चांगलाच परिचय होता ना माझा.. सगळं जग झोपलेलं असताना, न संपणार्या मध्यरात्रीच्या गडद एकटेपणात माझ्याच खोलीत कितीदा माझ्याच तोंडून आलेला ऐकलाय तो मी! दया आली मला त्याची, आणि हसूही फुटलं मनातल्या मनात. मला चांगलंच ठाऊक होतं, तो पहिल्यांदा पलंगावर वळला, त्या क्षणापासून त्याची झोप उडालेली होती. त्याची भीती नकळत त्याचा पुरता कब्जा घेत होती. ती भीती निरर्थक ठरवायचा तो आटोकाट प्रयत्न करत असणार, पण ते जमत नव्हतं त्याला. तो स्वतःशी बोलत असणार.. 'छे! एखादा उंदीर.. नाहीतर किडा.. बाकी काही नाही..'. त्या आवाजाचं पटेलसं स्पष्टीकरण शोधत होता ना तो.. पण नाईलाज होत होता त्याचा. कारण खरोखरच मृत्यू त्याच्या खोलीत उभा राहून त्याच्याकडे गालातल्या गालात हसून पाहत होता. त्या काळोख्या अंताची चाहूल नाकारणं शक्य तरी होतं का त्याला? डोळे टक्क उघडे ठेवून तो पलंगावर बसला होता...
..डोळे टक्क उघडे ठेवून तो पलंगावर बसला होता! तो निळा डोळा! सताड उघडा! गेले सात रात्री मी ज्याची वाट पाहिली तेच होतं हे.. तेच!!
मी दिव्यावरचं आवरण अगदी स्थिर हाताने किंऽऽचित हटवलं. प्रकाशाची एक तिरीप थेट त्या गेले सात दिवस माझं लक्ष्य बनलेल्या, मला बेचैन करणार्या, गिधाडासारख्या, निळ्या डोळ्यावर पडली!
- क्रमशः
(ही अनुवादित कथा आहे. रहस्य राखण्यासाठी मूळ कथा कोणती, हे पुढच्या भागात उघड करत आहे..)
Book traversal links for आता सांगा..
वर्गीकरण
प्रतिक्रिया
थरारक
नीट अंदाज बांधता येत नाहीये,
अॅगाथा ख्रिस्ती का हिच्कॉक ?
मस्तच
अग्ग्ग्ग्ग्ग्ग! मस्त अनुवाद!
उत्सुकता वाढलेली आहे. अगदी
मस्त!
एडगर अॅलन पो ची कथा?
एकदम मस्त अनुवाद
+१
वा मस्तच..
स्सही.
वाचतोय
आवडले
मस्त लिवलयंस इनिगोय अगदी..
मस्त अनुवाद!
काहीतरी जबरी घडणार आहे असे
उत्कंठावर्धक!
वाचतोय..
डोळ्याचे वर्णन आवडले.
अरे डोळा रे डोळा रे डोळा रे.
मुळ कथी वाचलीये त्यामुळे
क्रमशः का टाकलंय असं वाटायला
आता काय सांगावं ?
मस्त झालंय एकदम. मजा आली
थरारक!!
भन्नाट अनुवाद
छान
खिळवून ठेवणारी कथा! पुढच्या
बाप रे!
काय हे?
पुढे??