Skip to main content

प्रश्न प्रश्न प्रश्न

लेखक नाना चेंगट यांनी बुधवार, 13/02/2013 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मंडळी हल्ली मला अनेक प्रश्न पडत आहेत. (वय झाल्याचा परिणाम, नुसतेच प्रश्न पडतात उत्तरे मिळत नाहीत) तर अगदी लहानपणापासून कृष्णाने नरकासुराला, रामाने रावणाला मारल्याचा आनंद मी साजरा केला आहे. कॄष्णाने कंसाला, भीमाने जरासंधाला मारल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. मात्र हल्लीच असे करणे हे पातक असल्याचे जागतिक स्तरावर मानले जाते असे समजते. मला आता मोठे प्रश्न पडलेले आहेत. १)असा आनंद साजरा करणे हे योग्य की अयोग्य? २) योग्य असेल तर आनंद कसा साजरा करावा? ३) अयोग्य असेल तर त्याचे कारण काय? ४) १९ व्या शतकाने देवाचा मृत्यु पाहिला तर २० व्या शतकाने माणुसकीचा. २१वे शतक भावनांचा मृत्यु करणारे मानावे काय? ५) आपला परका हा भेद अशा प्रकारच्या आनंदाचा भाग असेल तर आपला परका हा भेद असे आनंद न साजरे करण्याने संपेल काय? ६) भेद न संपला तर भेदामुळे उत्पन्न होणार्‍या भावनांना आवर घालण्यासाठी काही प्रक्रिया आचरता येईल काय ? ७) भावना शुष्क करुन भेद संपला नाही आणि राष्ट्रवादास आधारभुत नकाशावरील रेघांचे वा निसर्गात आभाळाच्या पार्श्वभूमीवर फडकणार्‍या रंगीत कपड्याचे अस्तित्व शिल्लक राहिले तर रेषेच्या अलिकडील वा रंगाशी एकनिष्ट लोकांमधे एकसुत्री धागा कसा ओवता येईल? असे अनेक प्रश्न आहेत... मला तरी नीटसे उत्तर सापडत नाही. असो. एवढच सांगायचं होत. :)

वाचने 5933
प्रतिक्रिया 43

प्रतिक्रिया

७) भावना शुष्क करुन भेद संपला नाही आणि राष्ट्रवादास आधारभुत नकाशावरील रेघांचे वा निसर्गात आभाळाच्या पार्श्वभूमीवर फडकणार्‍या रंगीत कपड्याचे अस्तित्व शिल्लक राहिले तर रेषेच्या अलिकडील वा रंगाशी एकनिष्ट लोकांमधे एकसुत्री धागा कसा ओवता येईल?
कृपया महाराष्ट्रीत न लिहिता मराठीत लिहावे ;) असो, मीदेखिल उत्तरांच्या प्रतीक्षेत!!!

डिपेंड्स....मिपाकरांच्या मताप्रमाणे हा धागा किती शतके/अर्धशतके मारू शकेल ते पाहूच! मीपण प्रतीक्षेत!

आता व्हॅलेंटाईन डे येणार. कोणाला प्रपोज मारू? शिमगा येणार, मग कोणाच्या नावाने शिमगा करू? असले महत्त्वाचे प्रश्न विचारात घ्या. हे राष्ट्र का असावे वैग्रे प्रश्न हस्तिदंती मनोर्‍यात राहणार्‍यांना विचार करायला सोडून द्या.

कायतरीच प्रश्न पडतात नान्या तुला.... पर्‍या गुजरातला गेला नि तुझी बसायची सोय राहिली नाही असं काही आहे का???? चल. बसू. पर्‍याच्या नावाने बारच्या पश्चिमउत्तरेत एक पेग ठेवू! :)

आनंद झाला रे झाला (म्हणजे वाटला/ जाणवला की. उगा PJ करु नयेत.) की तो साजरा करुन घ्यावा.... परत होईल न होईल, नेम नाही. -अट्टल जुगारी माउ :)

प्रश्न पडणे हे भावना जिवंत असल्याचे लक्षण आहे, विचारवंताचे लक्षण आहे, तस्मात नाना अजून (प्रश्न ) येउंद्यात, उत्तराची चिंता करु नका. आणि कय हो, रामाने रावणास मारल्याची आठवण म्हणून दरवर्षी जाळतो त्याला दसर्‍याला, तसंच कृष्णाने नरकासुरास मारल्याबद्दल पण आठवणीने आंघोळ करतो.. ते ही जोडा बरोबरीने.. बरं आता माझा प्रश्न - १. आपण दोन दोन गणेश जन्म का साजरे करतो? हिंदूंमधल्या सर्वग्राह्यवृत्तीमुळे (पक्षी: एक मार्गदर्शन पीठ नसल्याने.. (जसे मुसलमानांत मक्का, ख्रिस्तांत पोप आहेत) असे होत असावे काय? (जिथे दोन किंवा जास्त शिवजयंत्या होतात, तिथे काहीही होणे शक्य आहे म्हणा.. इथे शिवाजी महाराजांचा माणूस म्हणून विचार करण्यात आला आहे, देव-माणूस नाही.) २. कुंभमेळ्यात गंगोदकात मारणारे साधू इथे लक्ष देतिल काय?

In reply to by उपास

माघी विनायकी हाच गणेशाचा जन्मदिन मानला जातो.भाद्रपद विनायकी नाही. त्यामुळे निदान गणेशाच्या बाबतीत जन्मदिवस एकच आहे.

कुंभमेळ्यात गंगोदकात डुबक्या मारणारे साधू इथे लक्ष देतिल काय?

अकस्मात तोही पुढे जात आहे. दुसर्‍याच्या सुखदु:खावर आपला आनंद अवलंबून असू नये असे जाणते लोक सांगतात. इथे सुख म्हणजे कंफर्ट्,मनाची आरामदायी अवस्था आणि आनंद म्हणजे ब्लिस असा काहीसा अर्थ घेतला आहे. आपला कोण परका कोण हेच ठरलेले नसते तर त्यावरून डोकेफोड का करावी?'सुखदु:खे समेकृत्वा...ततो युद्धाय युज्यस्व.' इथे युद्धाय ही चतुर्थी अर्थपूर्ण वाटते. केवळ 'हे युद्ध तू लढ' असे नाही. युद्धासाठी तयार हो. कर्मामागे कोणताही हेतु नाही,क्रमप्राप्त आहे ते करायचे,कर्मासाठी कर्म, युद्धासाठी युद्ध.हेच निष्काम कर्म आणि हेच सांख्य. अगदी जमिनीवरचे उदाहरण द्यायचे झाले तर शेजारील बांग्लादेशीयांचे राष्ट्रीयत्व एका पिढीत तीनवेळा बदलले.त्यांच्या निष्ठाही बदलल्या.कालचा मित्र आजचा शत्रू आणि पुन्हा उद्याचा मित्र. खालिस्तानवाद्यांना बेअंतसिंह नायक वाटतो.प्रभाकरन हाही कित्येकांचा हीरो आहे.बाळासाहेब ठाकरे कित्येकांचे हीरो आणि अनेकांचे दुश्मन. लॉर्ड माउन्ट्बॅटन हे उमदे व्यक्तिमत्व अनेकांचे आवडते, पण आयरिश बंडखोरांना तसे वाटले नाही. कंस आणि रावणवधानंतर सामान्य जनतेने हर्षोल्लास व्यक्त केला: कृष्ण रामांनी केला असेल का?

खरच , वय झाल्याचा परिणाम ;)

१)असा आनंद साजरा करणे हे योग्य की अयोग्य?
घटना घडली. त्यात योग्य अयोग्य हे सापेक्ष आहे. आपण निरपेक्ष रहावे मग उरते ती केवळ घटना ;)
२) योग्य असेल तर आनंद कसा साजरा करावा?
गैरलागु.. योग्य अयोग्य असे काहि नसतेच!
३) अयोग्य असेल तर त्याचे कारण काय?
गैरलागु.. योग्य अयोग्य असे काहि नसतेच!
४) १९ व्या शतकाने देवाचा मृत्यु पाहिला तर २० व्या शतकाने माणुसकीचा. २१वे शतक भावनांचा मृत्यु करणारे मानावे काय?
भावनांचा मृत्यू आवश्यक असे श्रीकृष्णाने गीतेतच सांगितले आहे. निष्काम कर्मयोग करत रहावे असे शिकलेल्या भारतीयांना २१वे शतक कशाला हवे? ;)
५) आपला परका हा भेद अशा प्रकारच्या आनंदाचा भाग असेल तर आपला परका हा भेद असे आनंद न साजरे करण्याने संपेल काय?
कोण आपला, कोण परका? एकाच पंचतत्त्वाचे या सार्‍या बाहुल्याच नाहीत का?
६) भेद न संपला तर भेदामुळे उत्पन्न होणार्‍या भावनांना आवर घालण्यासाठी काही प्रक्रिया आचरता येईल काय ?
२१वे शतक उजाडले आहे.. सारे आपोआप होईल, प्रकीयेची गरज नाही
७) भावना शुष्क करुन भेद संपला नाही आणि राष्ट्रवादास आधारभुत नकाशावरील रेघांचे वा निसर्गात आभाळाच्या पार्श्वभूमीवर फडकणार्‍या रंगीत कपड्याचे अस्तित्व शिल्लक राहिले तर रेषेच्या अलिकडील वा रंगाशी एकनिष्ट लोकांमधे एकसुत्री धागा कसा ओवता येईल?
बापरे! याचे उत्तर साक्षात श्रीकृष्ण देऊ शकेल ;)

"भावना शुष्क करुन भेद संपला नाही आणि राष्ट्रवादास आधारभुत नकाशावरील रेघांचे वा निसर्गात आभाळाच्या पार्श्वभूमीवर फडकणार्‍या रंगीत कपड्याचे अस्तित्व शिल्लक राहिले तर रेषेच्या अलिकडील वा रंगाशी एकनिष्ट लोकांमधे एकसुत्री धागा कसा ओवता येईल?" भावना शुष्क पेक्षा आर्द्र असाव्यात नाही का? आकाशात रेघा नाहीत,जमिनीवर तात्पुरत्या आहेत.फडकणार्‍या कपड्याचे अस्तित्व राहील पण रंग विटतील,बदलतील. कदाचित (डौलाने)फडकण्याऐवजी ते कापड चिंध्या-चिंध्या होऊन लोंबूही लागेल. किंवा त्याच कापडाच्या जागी तेच लोक नवे कापड/गुढी उभारतील. कुणी सांगावे?

अभिनंदन, झाडावरून पडलेले सफरचंद सारे जण खायला धावतात. मात्र तो न्यूटनच होता ज्याला प्रश्न पडला. त्याला सफरचंद आवडत नव्हते की धुवायचा आळस होता देव जाणे. :)

नान्या नान्या, नुसते प्रत्येक प्रतिसादाखाली आभार मानून धागा कसा वर राहील नि शतक होईल बरं? काही कमेंटा कर, काड्याघालू प्रश्न विचार, एखादं विव्क्षित शहर, एखादा अहिंसा वादी नेता, एखादा विद्रोही कवी , ३.५ % वाली संघटना काहीतरी.... कसं जमणार रे? श्या! फुकट फुकट गेलं सगळं आं जा आयुक्ष तुझं!

In reply to by प्यारे१

सहमत आहे. मुदलात प्रश्न वाचूनच अनेक कार्यकर्ते (सदस्य नाही) फरार झाले असावेत असे वाटते. ;)

खर तर आपण रावणाला जाळतो, तेव्हा ते फक्त रीत म्हणून करतो का? नाही. वाईटावर चांगल्या गोष्टीचा विजय होण, ह्या गोष्टीला आपण पुरस्कृत करत असतो. यात योग्य किव्हा अयोग्य या गोष्टींचा प्रश्नच नसतो. चांगलेपणावरचा विश्वास, सत्याची जीत या गोष्टींचा सामाजिक प्रचार व्हावा,आणि वाईट मनोवृत्तीला आळा बसाव, म्हणून हे सण आपण साजरे करत असतो. आणि म्हणूनच सार्वजनिक ठिकाणी रावण दहनाचे कार्यक्रम होत असतात. १९ व्या शतकात देवांचा मृत्यू झाला अस तुम्ही म्हणालात. पण मला नाही वाटत तसं. मला सांगा, तुम्ही देवाच्या नावाने पैसे खाणाऱ्या लोकांबद्दलच्या बातम्या वाचल्या नाहीत काय? मला अस म्हणायचं कि, अजूनही लोक देवावर विश्वास ठेवतात.(स्वार्थासाठी का होईना....)पण देवापुढे डोकं टेकवण्याचे काम जवळ जवळ ९०% लोक करतातच.

असे अनेक प्रश्न आहेत... मला तरी नीटसे उत्तर सापडत नाही. असो. एवढच सांगायचं होत.
आम्हाला प्रश्न विचारलेले नसल्याने धन्यवाद. मात्र उत्तरे सापडली की अवश्य कळवा ही विनंती. Namaste

मायला आमच्या नान्याला भारी प्रश्न पडतात आजकाल चल परा नाय तर मी येतो बसायला थोडी घेतल्यावर तुला सगळ्यांची उत्तर सापडतील