मना कधी नव्हे ते २-३ तास खूप रडली. आत्ताच झोपी गेल्याचं अंजलीनं सांगितलं. तिचं रडणं थांबत नव्हतं. विजयसोबत अंजली मनाला एका प्रथितयश डॉक्टरकडे दाखवून आलेली. विजय त्याच्या मुलीला त्याच डॉक्टरकडे घेऊन जायचा.म्हटलं बरं झालं, लहानांच्या दुखण्याकडे दुर्लक्ष करुन उपयोग नाही. त्या डॉक्टरीनबाईनं मनाला कसलं तरी इंजेक्शनही दिलं होतं. त्या गुंगीतच ती कदाचित रात्रभर झोपली असावी.
मी सकाळीच ऑफीसला निघून गेलो. त्यावेळेस मोबाईल सर्वसामान्यांच्या हातात यायचा होता. त्यामुळे घरी टचमधे राहण्याचा प्रश्नच नव्हता. दुपारी शिफ्ट संपवून घरी निघालो.
मना २-३ महिन्यांची झाल्यावरच तिला हैदराबादला आणुयात असं मी आणि अंजलीनं ठरवलेलं. आपल्या घरी म्हणजे बीडला माणसांचा-नातेवाईकांचा ओघ आटत नाही, तिथं आजी-आबांसोबत गजबजल्या घरात असणं कधीही चांगलं. अशी अनेक कारणं.
त्यावेळी मी वनस्थळीपुरमला राहायचो. दोनेक वर्षात तीनेक घरं बदलून झालेली. विजय माझा सहकारी. दोघांनी एक मोठ्ठं २ बीचके घर भाड्यानं घेतलं. त्याची मुलगीही लहान, दोन्ही बायकांना आणि मुलींना एकमेकींची चांगली सोबत होईल आणि पैसेही वाचतील असा उद्देश. चांगले संबंध बिघडण्याची जोखीम होतीच पण त्यावेळी तो पर्याय चांगला वाटला. पुढं तो प्रयत्न फसला. फसणारच होता असो.
पावसाळा सुरु झाल्यावर कधीतरी आई-आज्जीसोबत मना हैदराबादला आलेली. हैदराबादचं बसस्टँड आशियातलं सर्वात मोठं. सेमी लक्झरी ‘एशियाड’ गाडीत रात्रभर आजीच्या मांडीवर निवांत झोपून मना आलेली. मला पाहताच तिच्या चेहऱ्यावर ओळखीचं मस्त हसू आलं, तिनं जवळजवळ झेपच घेतली अंगावर. बापाला अजून काय हवं असतं? ऑफिसातून आल्यावर तिच्याशी थोडावेळ जरी खेळलो तरी दिवसभराचा ताण-थकवा पळून जायचा.
नेहेमीप्रमाणेच थोडे दिवस राहून आई परत गावी गेली, फक्त यावेळी तिचा पाय घरातून लवकर निघत नव्हता. नातीची तिला ओढ लागलेली.
वनस्थळीपुरम ते रामोजी फिल्मसिटी म्हणजे आमचं ऑफीस हे तासाभराचं अंतर. तुम्ही फिल्मसिटी पाहिली असेल तर सांघी टेंपल लक्षात राहातंच. समोरच्या टेकडीवर गाडी उजवीकडे वळण घेत चढावर घुसली आणि हलकासा पाऊस सुरु झाला. अशा वातावरणात डोंगराच्या पदरातल्या रस्त्यातून वळणं घेत होणारा प्रवास आणखीनच रेंगाळायला लावणारा. माझा स्टॉप सुषमा टॉकीजचा.
कधी उतरलो आणि घरी पोहोचलो कळलंही नाही.
जीना चढत असतानाच मनाचा रडण्याचा आवाज कानावर आला. तो भीतीदायक होता. घरात पाऊल टाकलं तर अंजली मनाला कडेवर घेऊन चकरा मारत होती, डोळ्यातली काळजी लपवण तिला अवघड गेलं. विजय आणि त्याची बायकोही अस्वस्थ होते. दिवसभर गुंगीत असलेली मना दुपारनंतर कधी तरी जागी झाली ती रडतच. गुंगी उतरताच तिला पुन्हा त्रास सुरु झालेला. घरगुती सगळी औषधं देऊन झाली. आई बीडला परत गेल्यामुळं अशावेळी जो मोठा आधार वाटतो तोही जवळ नव्हता. मीही प्रयत्न करुन पाहिला. पण मनाचं रडणं काही कमी होत नव्हतं. असह्य वेदनेत असं मनाला पाहायची ती माझी पहिली वेळ. तिच्या त्या रडण्याचा आवाज अजुनही कानात घुमतो.
खाण्यापिण्यात काहीतरी आलं असेल? कान दुखत असेल? इथपासून ते आजीआबा दिसत नाही म्हणून रडत असेल इथपर्यंत अनेक कारणांचा विचार झाला. मनाचं रडणं सुरुच होतं आईबाप होण्याची पहिलीच वेळ असल्यामुळे अशावेळी नेमकं काय करायचं तेही आम्हाला सुचत नव्हतं, पुन्हा ‘त्या’ डॉक्टरीनबाईकडे जायचं ठरलं, मनाचं रडणं सुरुच. खाली उतरलं की मागच्या दोन गल्ल्या सोडून तो दवाखाना. कालचा रस्ता अंजलीच्या लक्षात होताच.
आम्ही पोहोचलो त्यावेळेस दवाखान्यातले सगळे लाईट लागलेले नव्हते. बाहेर पावसाची भुरभुर सुरुच होती. पावसामुळं अंधारून आलेलं. कारण काहीही नव्हतं पण तो दवाखाना मला गुढ वाटत होता. तेवढ्यात बाल्कनीमधे एक बाई अवतरल्या. त्याच डॉक्टरीनबाई होत्या. काहीतरी चुकीचं घडतंय अशी माझी फिलिंग वाढली. खाली गेटच्या समोरच्या खोलीत त्या आल्या, मनाचं रडणं सुरुच होतं.
अजुन पोरीला बरं वाटत नाहीय का वगैरे इंग्रजी कम हिंदीत त्यांनी अंजलीला विचारलं आणि मनाचं पोट दाबून बघितलं. तसा तिचा आवाज आणखीनच वाढला. मग त्यांनी मनाला बाजुच्या बाकावर झोपवलं, टेथस्कोप वगैरे लावून तपासलं. गंभीर होत म्हणाल्या, "तिच्या पोटात काहीतरी मेजर प्रॉब्लेम असू शकतो, आपल्याला काही टेस्ट कराव्या लागतील, मी लिहून देते तिथं जा मग ठरवू काय करायचं ते… सध्यातरी मी काल दिलेलं इंजेक्शन तिला देतेय" असं म्हणून बाजुच्या कपाटातून डॉक्टरीणबाई ते मोठ्ठं इंजेक्शन काढू लागल्या. माझी चुळबुळ वाढली, मी त्यांना थांबवलं. मी काय म्हणालो ते आठवत नाही, फक्त तिथून पटकन बाहेर पडायचं एवढा एकच विचार डोक्यात होता. खिशातून पैसे काढले आणि डॉक्टरीनबाईच्या हातात टेकवले. मनाला घेऊन आम्ही बाहेर पडलो.
त्यावेळी लेकराबाळावाले सहकारी कमी होते. वनस्थळी मार्केटजवळ एक टेलिफोन बुथ होता. तिथूनच न्यूज डेस्कला फोन केला. गिरीधर पांडेला हा प्रकार सांगितला. त्यानं शांतपणे ऐकून घेतलं, "घाबरु नकोस; एनजीओ कॉलनीत एक लहान मुलांचे चांगले डॉक्टर देशमुख आहेत त्यांच्याकडे जा". त्यांना मराठी कळत हे आवर्जुन सांगितलं. त्याच्या सार्थकला तो देशमुखांकडेच घेऊन जायचा. एनजीओ कॉलनी म्हणजे पनामा गोडाऊनपासून सुरु होणाऱ्या वनस्थळीचा शेवटचा स्टॉप.
घरातून बाहेर पडून आम्हाला तास सव्वा तास झाला. मना रडतच होती. आमचे चेहरे आणि रडणारी मना पाहून रिक्षावाल्यानं वेगानं आम्हाला तिथं नेलं असावं. रस्त्यालगतचा एक साधा गाळा म्हणजे देशमुखांचा दवाखाना. तिथे बरीचशी गर्दी, लांब रांग, पावसामुळे आलेला कोंदटपणा आणि वेगवेगळ्या वयातली छोटी मुलं. कुणी रडत होती तर कुणी रडून रडून थकून झोपलेली. तेलुगुतून हळु आवाजात बोलणं सुरु होतं. लेकरांसोबत त्यांचे आईबापही. त्यांच्या चेहऱ्यावर आमच्यासारखेच भाव. भीतीचे.
आम्ही उतरताच सगळ्यांचं लक्ष मनाकडे गेलं, म्हणजे आम्हाला त्याची सवय होतीच कारण मना खूप गोड दिसायची, पण यावेळचं पाहणं तिच्या रडण्यामुळे जास्त होतं. नंबर लावला, नेहेमी 7 वाजेपर्यंत येणारे डॉक्टर नेमकं आज 7.30 होऊन गेले तरी आले नाहीत. माझी घालमेल आणखी वाढली, शक्य तितक्या संयमानं शिव्या बाहेर पडत होत्या. तुम्ही चीड चीड करुन काही उपयोग आहे का असं अंजलीनं किती वेळेस सांगितलं हे नक्की आठवत नाही.
अखेर उशिरानं का होईना डॉक्टर आले, मनाचं आतडं पिळवटून टाकणारं रडणं ऐकून तिथल्या सगळ्या बायाबापड्यांनी आम्हाला चक्क सगळ्यात आधी आत जा असा इशारा केला. मनातल्या मनात त्याचे आभार मानले. आत टेबलापलिकडे बसलेल्या माणसानं स्मितहास्य केलं, त्यात कृत्रिमपणा नव्हता. माझ्या मनात नेहेमीप्रमाणेच येणाऱ्या शंकाना थारा मिळणार नाही असा आश्वासक मध्यमवर्गीय चेहरा होता डॉक्टर देशमुखांचा. काय काय झालं ते सांगत असतानाच उजव्या हातानं त्यांनी गोळ्यांची एक डबी उचलली आणि टेबलावर टकटक करत, ते शिटी वाजवू लागले. माझ्या मांडीवर बसलेल्या मनाचं तिकडं लक्ष गेलं आणि काही क्षणांसाठी ती एकदम शांत बसली.
"काळजी करु नका. काही नाही झालंय तिला, बरं वाटेल थोड्यावेळात. बाहेरच्या दुकानातून ही गोळी घ्या आणि तिथेच पाव गोळी बारीक करुन पाण्यातून तिला द्या. दुसरं औषध घेऊन मला दाखवायल या". बस्स??? अरे, पोरगी दोन दिवसांपासून एवढी रडतीय आणि पाव गोळी अर्धी गोळी काय? कुठला डॉक्टर असं सांगेल? शंका मनातच दाबून ठेवत विचारलं किती झाले? 30 रुपये. आँ. पुन्हा धक्का.
मेडिकलवर गेलो 1 रुपयाला 1 की 2 गुलाबी रंगाच्या गोळ्या आल्या. आमची अवस्था बघून मेडिकलवाल्यानेच पाणी दिलं, तिथेच अंजलीनं तुकडा करुन गोळी बारीक केली. चमचाभर पाण्यातून मनाला दिली. काही सेकंद मधे गेले, ढेकराचा आवाज आला आणि मनाचं रडणं थांबलं, काही मिनिटात तर काही न झाल्यासारखी ती पुन्हा इकडं तिकडं बघत खेळू लागली, तिचं ते मस्त हसू चेहऱ्यावर परत आलं. च्यायला हा डॉक्टर आहे का जादूगार?
पुन्हा दवाखान्यात जाऊन डॉक्टरना भेटलो, सहसा लहान मुलात कॉमनली आढळणारा हा प्रकार आहे घाबरु नका, इति डॉक्टर. ती गोळी होती जेलुसिल. मना खेळत होती, थकली होती पण नेहेमीसारखंच हसण्याचा प्रयत्नही करत होती. खूप रिलॅक्स वाटलं. त्यानंतर मी हायकोर्ट कॉलनीत म्हणजे आणखी दूर राहायला गेलो. तिथून रिक्षाचा खर्च 40 रुपये व्हायचा आणि डॉक्टर ची फी 30 रुपये, कधीकधी तर तीही घ्यायचे नाहीत. रिपोर्टची जाड फाईल नाही, महागडी औषधं नाहीत की मोठ्ठी फी नाही. "सर्दी ताप आला तर लगेच येऊ नका किंवा कॅलपॉलही देवू नका, तिच्या शरीराला लढायची सवय लागू द्या" असं सांगणारे डॉक्टर मोजकेच असतील. हैदराबादमधे होतो तोवर गरज पडली की मनासाठी डॉक्टर देशमुखांकडेच जायचो. "काय मग तू मृणाल काळे का गोरे?" हा ठरलेला पहिला प्रश्न त्यांनी विचारला की मना आणि तिचे आईबाबा रिलॅक्स झालेच समजा.
महाराष्ट्रातल्या माणसाला आंध्रप्रदेशच्या राजधानीत कर्नाटकातून आलेल्या डॉक्टरचा आधार वाटावा हे बरंच काही सांगून जातं.
नंतर मुंबईत आलो, अर्णवला पहिल्यांदा दवाखान्यात न्यावं लागलं तेव्हा खरंतर मी एका देशमुख डॉक्टरच्या शोधात होतो पण मला ते सापडले नाहीत. मुंबईत सापडतील अशी आशाही सोडलीय.
कोणत्याही लहान मुलाला कधीही किंवा किमान बोलता येईपर्यंत तरी कसलाही त्रास होऊ नये असं मला कायम वाटत आलंय. काय दुखतंय हे त्यांना सांगता येत नाही, आपण पूर्णपणे डॉक्टरवर डिपेंड असतो, त्यांचं निदान चुकलं तर? किंवा आपली डॉक्टरची निवड चुकली तर? मी त्या संध्याकाळी घाबरुन मनाला टेस्टसाठी नेलं असतं तर…? देशमुख डॉक्टरकडे गेलो नसतो तर..?
परवा आमीरचा सत्यमेव जयते पाहात असताना हे सगळं डोळ्यासमोरुन गेलं. एक तर लेकरं आजारी पडूच नयेत, पडलेच तर मनाला जसे डॉक्टर देशमुख भेटले तसे त्यांनाही भेटावेत.
थँक्यू डॉक्टर देशमुख, थँक्यू आमिर.
(२९/०५/१२)
मिसळपाव
प्रतिक्रिया
बापरे! नशीब तुमचं की
बापरे! नशीब तुमचं की तुम्हांला योग्य डॉ. योग्य वेळी भेटले.
लिखाणाची शैली आवडली.
होना, अशा प्रसंगामुळे नशीबावर
In reply to बापरे! नशीब तुमचं की by यशोधरा
होना, अशा प्रसंगामुळे नशीबावर विश्वास ठेवावासा वाटतो :-)
काही विचारु नका लहान बाळांची
काही विचारु नका लहान बाळांची दुखणी. खरच असा शहाणा डॉक्टर मिळण फार अवघड.
मुंबईत कुठे असता? साकिनाक्याजवळ डॉक्टर सोनाग्रा म्हणुन आहेत. डॉ. देवकरण सोनाग्रा. आता साकिनाका, अन तिथला गोंगाट सोडलात तर डॉक्टर हुषार अन शहाणा आहे. माझा राजेश्वरी अन ऋतुची दिड वर्ष असा अनुभव आहे. हा आता थोऽऽडा बिझनेस माइंडेड वाटतो पण फुकाची औषध देत नाही. फक्त एव्ह्ढी काळजी घ्या की तिथल्या बाकिच्या स्टाफला हात लावायला नका देउ. दॉक्टरला सरळ सांगा. ओन्ली यु हु विल अॅडमिन्स्टर एनी मेडीसीन. इंजेक्शन वगैरे पण त्याला स्वतःलाच द्यायला सांगा. बाकिचा स्टाफ त्याला चिकटलाय किंवा फोर्सड आहे.
हाहा, म्हणजे इथेही विठ्ठल आणि
In reply to काही विचारु नका लहान बाळांची by स्पंदना
हाहा, म्हणजे इथेही विठ्ठल आणि बडवे वगैरे :-)
मी नवी मुंबईत.
काहीतरी चुकीचं घडतंय अशी माझी फिलिंग वाढली
हे गट फिलींग प्रत्येक क्रिटीकल सिश्युएशनमधे उपयोगी आहे!
+१
In reply to काहीतरी चुकीचं घडतंय अशी माझी फिलिंग वाढली by संजय क्षीरसागर
येस !
किशोरकुमारनं म्हटलेलंच आहे
In reply to +१ by स्पंदना
जहां नही चैना, वहां नही रहेना!
आतला आवाज, तेवढ्या गडबडीत
In reply to काहीतरी चुकीचं घडतंय अशी माझी फिलिंग वाढली by संजय क्षीरसागर
आतला आवाज, तेवढ्या गडबडीत/टेन्शनमधेही मला ऐकू आला हे नशीब :-)
छान लिहिले आहे..
छान लिहिले आहे..
मुले आजारी पडली कि काहि सुचत नाहि..ती रडतात व आपला जिव कळवळतो...
परशुराम रडत आहे ग
काय करावे समजत नाहि ग ..
ह्या गाण्यासारखी अवस्था होते
ती रडतात व आपला जिव कळवळतो...
In reply to छान लिहिले आहे.. by अविनाशकुलकर्णी
अगदी, त्यामुळेच मला लहान मुलांच्या (चांगल्या) डॉक्टरांचं फार कौतुक वाटतं..
शब्दावाचून कळतं त्यांना (बहुतेकांना)
तिच्या पोटात काहीतरी मेजर
तिच्या पोटात काहीतरी मेजर प्रॉब्लेम असू शकतो, आपल्याला काही टेस्ट कराव्या लागतील, मी लिहून देते तिथं जा मग ठरवू काय करायचं ते… सध्यातरी मी काल दिलेलं इंजेक्शन तिला देतेय.
कसलं इंजेक्षन , कशासाठी
कसलं होतं माहित नाही..बहुदा
In reply to तिच्या पोटात काहीतरी मेजर by निशांत५
कसलं होतं माहित नाही..बहुदा पेन किलर वगैरे असावं.
याच डॉक्टरीणबाईंनी आदल्या दिवशी एक मोठं इंजेक्शन दिलं होतं मुलीला. तिचं रडणं थांबलं पण ती पुढचे १२-१४ तास गुंगीतच होती. दुसऱ्या दिवशीही तेच इंजेक्शन द्यायला निघाल्या होत्या मॅडम, पण त्याचा परिणाम मी पाहिला होता सो थांबवावं वाटलं त्यांना..थांबवलं.
हम्म...
छान अनुभव.
'ड्वाक्टर अनेकांचे जीव वाचवतात पण खूप जण ड्वाक्टरांनी उपचार न केल्यामुळे वाचतात' अशा अर्थाचं एक कोट वाचल्याचे स्मरते. एखाद्या नवीन ठिकाणी जायचा प्रसंग आला तर मी बर्यापैकी गर्दी असलेला दवाखाना निवडतो मग तो दवाखाना कसल्याही वस्तीत असेना किंवा अगदी ड्वाक्टर मग बी.यच.यम.यस. असला तरीही. ;)
एक सहजच निरिक्षण म्हणून आपण भारतीय (मध्यमवर्गीय) लोक्स लहान मुलांच्या रडण्याला लगेच घाबरतो.
भारतीय (मध्यमवर्गीय) लोक्स लहान मुलांच्या रडण्याला लगेच घाबरतो
In reply to हम्म... by दादा कोंडके
नाही हो. बोलायला लागण्यापूर्वी लहान मुलांकडे रडण्याशिवाय पर्याय नसतो. तीच त्यांची भाषा. त्यांच्या रडण्याचा अर्थ कळणं संगोपनाच्या सुरूवातीच्या काळात फार महत्त्वाचय. थोडी मोठी झाल्यावर त्यांच्या हट्टासाठी रडण्याकडे मात्र दुर्लक्ष हा नामी उपाय आहे.
हो
In reply to भारतीय (मध्यमवर्गीय) लोक्स लहान मुलांच्या रडण्याला लगेच घाबरतो by संजय क्षीरसागर
म्हणजे ते रडत असले तरीही दुर्लक्ष करायचं असं मी म्हणत नाही. पण आपण पॅनिक होतो. बिथरल्यासारखं करतो.
परवाच एका दवाखान्यात एक गोरी मड्डम आपल्या दोन-तीन वर्षाच्या मुलाला घेउन आली होती. ते पोरगं अशक्य कळवळून रडत होतं. त्या बाईने शांतपणे त्याला समजावलं, हे बघ, आपण आता दवाखान्यात आलोय की नै? तुला आता बरं वाटेल. आणि ती माउली शांतपणे मासिक वाचत बसली. बाकीच्या लोकांनी तिला आधी जायला सांगितलं पण ती म्हणाली, काही गरज नाही.
खूप जण ड्वाक्टरांनी उपचार न
In reply to हम्म... by दादा कोंडके
खरं असावं ते.
अनुभवकथन चांगले.
मुलगा लहान असताना असेच अनुभव आले आहेत. पेडिअॅट्रिक डॉक्टरपेक्षा साध्या बीएचमएस डॉक्टर च्या औषधाचा गुण चांगला आला असा अनुभव आहे.
आणि त्याचे साईड इफेक्टही
In reply to अनुभवकथन चांगले. by सस्नेह
आणि त्याचे साईड इफेक्टही नसतली फारसे.
डॉक्टर चांगला असेल तर कुठलीही पॅथी लागू पडते,असं मला वाटतं.
छानाच लिहिलंय
छानाच लिहिलंय
आमचाही 'पिड्या' (पेडिआट्रीशिअनचा शॉर्ट ;) ) असंच सांगतो.
बाळ वर्षाचे होईपर्यंत बेबी-क्रोसिनचे चार-आठ ड्रोप्स सोडल्यास कोणतेच औषध त्यांनी दिलेले नाही. "मी एकदा औषध दिलं की ते दरवेळी द्यावं लागेल. शरीरातच अँन्टिबॉडिज तयार होउद्यात" असे ते नेहमी सांगतात.
बाळोबा बरे होतात हो मात्र, आमचे ताप, सर्दी आमच्या पालकांना असा पिड्या न भेटल्याने आयुष्यभर डॉ.शिवाय सुटत नाही असंही डोक्यात येतं ;)
'पिड्या'
हाहा,
चांगला नसेल तर पीडा नायतर पिड्या :-)
हा लेख वाचुन आमच्या
हा लेख वाचुन आमच्या सांताक्रूझच्या डॉक्टर बालाजींची आठवण झाल्या वाचुन राहिली नाही.
हा ही असाच भन्नाट माणूस. एकदम साधा, रहाणी ही त्याच्या साधेपणाला साजेशी. हाताला गुण ९९.९९%. भारतातल्या १२ भाषा बोलायचा. दादर भागातही त्याचा एक दवाखाना होता म्हणे. सकाळी तिथे असायचा संध्याकाळी सांताक्रुझला यायचा.
त्याचं बील कधी ३-५ रुपयां वर कधी गेलं नाही. इंजेक्श्न मागुनही मिळत नसे. त्यांना अगदीच गरज वाटली तर ते द्यायचे मग त्यादिवशी बील व्हायचं ८ रुपये. (ही ९०च्या दशकातली गोष्ट.) औषध म्हणुन ज्या गोळ्या द्यायचा त्यापण ईतक्या वेग वेगळ्या आकाराच्या आणि रंगाच्या की त्या पाहुनच मुलांचा अर्धा आजार गुल. :)
असे डॉक्टर आताही असतील? आता
In reply to हा लेख वाचुन आमच्या by गणपा
असे डॉक्टर आताही असतील? आता तर पैसेही जातात आणि गुणही येत नाही अशाच केसेस जास्त.
डॉ. आपटे, आठवले सोलापुरचे,
डॉ. आपटे, आठवले सोलापुरचे, आणि आता अनुभवतो आहे, पोराला गेले सहा महिने मातीत खेळायला पाठवतोय, पोट दुखी फार दुर्मिळ झाली आहे तेंव्हापासुन.
आमचा एक मित्र असंच बार्शीच्या
In reply to डॉ. आपटे, आठवले सोलापुरचे, by ५० फक्त
आमचा एक मित्र असंच बार्शीच्या डॉ. नेनेबद्दल सांगत असतो. अनेक दशकांचा अनुभव. भरपूर गोळ्या लिहून देतात, पैसेही घेतात पण गुण हमखास. असा त्याचा अनुभव.
कै. डॉ. रवींद्र धुमाळे, मिरज.
कै. डॉ. रवींद्र धुमाळे, मिरज. पर्फेक्ट हातगुण. काहीही असो, त्या आरूनफिरून दोनतीन गोळ्या-पॅरा-निमोडॉल की कुठल्याशा.
"मी सांगितल्याशिवाय शाळेला जायचं नाही".
"पाणी उकळून प्यायचं, गावात साथ आलेली आहे."
"फळे आजिबात खाऊ नका(साथ आलेली आहे), बाकी दूधभात वरणभात चालेल."
द्रव औषध द्यायचे असेल तर "बाटली आणली नसेलच!" असे म्हणून हसायचे.
काही असो. १०-१५ रुपयांपलीकडे बिल फार रेअरलि जायचं, प्रचंड लोकप्रिय होते. अचानक अॅटॅकने गेले. लै हळहळ वाटली होती.
मी सांगितल्याशिवाय शाळेला
In reply to कै. डॉ. रवींद्र धुमाळे, मिरज. by बॅटमॅन
या उपायामुळे लवकर बरं वाटत असणार :-)
जगायला हवे होते जास्त. आधीच दुर्मिळ असा डॉक्टर भेटणं.
लिखाण आवडले
माझ्या आणि माझ्या पोरांच्या नशीबाने आत्तापर्यंत मुलांचे डॉक्टर्स चांगलेच भेटलेत. आता कधीतरी रस्त्यात भेटले तर मुलाने त्यांचे बोट चावल्याच्या वगैरे मनोरंजक आठवणी निघतात. एरवी आता दोघांसाठी डॉक्टर्स लागत नाहीत, हीच तेव्हाचे पेडिआट्रिशिअन्स चांगले मिळाल्याची खूण आहे!
माझ्या आणि माझ्या पोरांच्या
In reply to लिखाण आवडले by पैसा
खरंच नशीब.
तसे सगळ्यांना मिळोत.
बरेच येडे पाहिलेत
बरेच येडे पाहिलेत त्यात अजुन एक भर !!
"पाप आणि पुण्य" लवकरच
चांगल्या-चांगल्याची झडती घेणारा
वाश्या
(No subject)
In reply to बरेच येडे पाहिलेत by सुहास..
:-)
तिच्या शरीराला लढायची सवय
इंस्टंट जमान्यात हे कसे शक्य आहे ?
नैसर्गिकंय ते. नेमकं तेच
नैसर्गिकंय ते. नेमकं तेच बऱ्याच डॉक्टरांना नकोय.
प्रतिकारक्षमता वाढली, आजारी पडण्याचं प्रमाण कमी झालं तर दुकान चालणार नाही, गल्ला भरणार नाही याची भिती. सो इन्स्टंट.. फक्त लक्षण गायब करण्यावर भर.
रोग्याला झेपेल अशी औषधं द्यायची की कंपन्यांनी लाच देऊन आपल्या माथी मारायला दिलेली?
काही महिन्यांच्या लेकराला स्टरॉईड्स सजेस्ट केल्याचा माझ्या मित्राचा ताजा अनुभव. कसं होणार?
काल सहज म्हणून सर्चताना द
काल सहज म्हणून सर्चताना द हिंदू मधला हा लेख गावला, डॉक्टर देशमुखांच्या फोटोसहीत :-)
For the benefit of the sick and poor
https://www.thehindu.com/todays-paper/tp-features/tp-downtown/article11…
मी पुर्ण पणे समजुन शकते..
आज माझं लेकरु माझ्या ह्याच गट फिलींग मुळे जिवंत आहे.. मलाही लिहायचय ह्या विषयावर एकदा.. खुप खुप लिहायचय.. शब्दात पकडता येत नाही फक्त इतकं भरुन येतं...
लिहा नक्की
In reply to मी पुर्ण पणे समजुन शकते.. by पिलीयन रायडर
लिहा नक्की
१९७५ पुर्वी
१९७५ पुर्वी सोलापुरातील डॉ. तेलंग व डॉ. वळसंगकर आठवतात.
खुप छान
खुप छान ओळ्ख करुन दिलीत डॉक्टर साहेबांची .
तुमचे नशीब खरंच चांगल आहे आणी असे डॉक्टर सगळ्यांना मिळोत.
बाकी पोटच्या पोराच्या डोळ्यातील अश्रु नाही हो पाहवत आई बापांना.
धन्यवाद नि३. मेन म्हणजे सुचत
In reply to खुप छान by नि३सोलपुरकर
धन्यवाद नि३. मेन म्हणजे सुचत नाही काय करायचं नेमकं ते, सो डॉक्टरावर सारी मदार