Skip to main content

युं हसरतोंके दाग

लेखक शरद
शुक्रवार, 08/02/2013 या दिवशी प्रकाशित केले.
यू हसतोंके दाग जुन्या चित्रपटांची आठवण झाली की कॉलेजमधील मैत्रीणींचीही होते. बरेच साम्य होते. त्या वयांत बर्‍याच जणी चित्रपटातील नायिकेंसारख्या दिसतात असे वाटावयाचे. आज भेटल्या कीं पुलंसारखे :अगा उज्जैनी.." म्हणावे लागते ही गोष्ट अलाहिदा. हा वयाचा परिणाम म्हणून सोडून देऊं. तरीही इतरही साम्य काही कमी नाही. जुने चित्रपट का आठवतात ? एखादा चित्रपट त्याच्या कथानकामुळे लक्षात रहातो, एखादा त्यातील अभिनयामुळे, एखादा उत्तम सेट्टिन्ग्ज/लोकेशन्समुळे, तर एखादा संगीतामुळे. ( आता या गोष्टी मैत्रीणींनाही लागू होतील पण हे एखादेवेळी बरे दिसणार नाही, अमकी { तिच्या विषयी प्रचलित असलेल्या } कथांमुळे लक्षात राहिली असे सांगणे योग्य नाहीच !). पण तरीही एखादी तिच्या टपोर, पाणीदार डोळ्यांमुळे, दुसरी तिच्या लांबसडक शेपट्यामुळे तर तिसरी कमनीय बांध्यामुळे .... हे खरेच. पण आज मैत्रीणींबद्दल सांगावयाचे नाही. आज आठवण झाली ती "अदालत " या १९५८ च्या चित्रपटाची, त्यातील अप्रतिम गाण्यांमुळे. राजेन्द्र कृष्ण याची गीतरचना, मदनमोहनचे संगीत व इतर गाणी असली तरी लताने गायलेल्या "यूं हसरतोंके दाग", उनको ये शिकायत है", " जाना था हमसे दूर " या आर्त, करूण स्वरांनी ओथंबलेल्या गीतांमुळे. यातील गीत, संगीत व स्वर ही गीतातील भावनेशी इतके एकरूप झाले आहेत की कुणी कुणाचे सौंदर्य वाढवले हे सांगणे अशक्यच आहे ; अलंकारांनी सौंदर्यवती युवतीचे कीं युवतीने अलंकारांचे ? हे सांगण्याइतकेच अवघड ! आज पहिले गीत पाहू. यूँ हसरतों के दाग़, मुहब्बत में धो लिये खुद दिल से दिल की बात कही, और रो लिये यूँ... घर से चले थे हम तो, खुशी की तलाश में -२ खुशी की तलाश में ग़म राह में खड़े थे वही, साथ हो लिये खुद दिल से दिल की बात कही, और रो लिये यूँ... मुरझा चुका है फिर भी ये दिल फूल ही तो है हाँ फूल ही तो है अब आप की खुशि इसे काँटों में तोलिये खुद दिल से दिल की बात कही, और रो लिये यूँ ... होंठों को सी चुके तो, ज़माने ने ये कहा - २ ज़माने ने ये कहा ये चुप सी क्यों लगी है अजी, कुछ तो बोलिये खुद दिल से दिल की बात कही, और रो लिये यूँ... ( युं ..अशा प्रकारे; हसरत.. आशा, आकांक्षा, निराशा, दु:ख, सीना.. शिवणे, बंद करणे) जिची कैफ़ियत आहे ती तशी काही मोठी नाहीये. जा वयांत काही आशा-आकांक्षा मनांत बाळगून, थोडेसे सुख-समाधान, प्रेम मिळावे ही इच्छा, छोटिशीच इच्छा असते, त्या कोवळ्या तारुण्यात, डोळ्यात स्वप्ने साठवत, घराबाहेर पडलेली. पण काय पडले पदरांत ? निराशेचे चटके ! पण ती खचलेली नाही. त्यांना धुवावयाला ती आपले प्रेमच वापरावयाचा प्रयत्न करत आहे. आणि हे बोलणार तरी कोणाशी ? सहृदयेतेने ऐकावयाला तर कोणीच नाही; ठीक आहे, ती म्हणते "आपण तर आहोत, स्वत:लाच स्वताच्या हृदयातील भावनांबद्दल बोलायला .भले आसवांचा बांध फुटेना कां !" सुखाच्या शोधात बाहेर पडल्यावर रस्त्यावर दिसले कोण ? दु:ख, वेदना. कुठल्याही वळणावरून जा, हेच उभे. शेवटी तिच्या लक्षात आले, " अरे, हेच तर आपले हमराही, आता आयुष्यात यांचीच सोबत. चला, त्यांनाच सगे-सोयरे म्हणावयास पाहिजे, निदान ते तरी शेवटपर्यंत इनामइतराबाने बरोबर रहातील ! एकदाच ती कळवळून म्हणते, " अरे, विदीर्ण झाले आहे हे खरे, पण माझे हृदय हे एक फूलच आहे ना ? आता त्याची तुलना कांट्यांशी करायची का ? तुझीच मर्जी !" अखेर तिच्या लक्षात येते, जगात कोणालाच आपली फ़िकीर नाही. आपले बोलणे ऐकून घेण्यात कुणाला स्वारस्य नाही. तिने आपले ओठ दाबून घेतले, मौन धरले, पण अशाने हे आपमतलबी जग थोडेच गप्प बसणार होते, छद्मीपणाने, आपुलकीचा भाव आणून त्याने चौकशीस सुरवात की, " का ग, अशी गप्पगप्प कां ? काही तरी बोल ना !" हा झाला या गझलचा साधासुधा अर्थ. आता त्यातील सौंदर्य उलगडून पहावयाचा प्रयत्न करू. तुमच्या प्रेमाला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही तर आशेऐवजी निराशाच पदरात पडणार, तिचे दु:ख झेलावे लागणार हे तर उघडच आहे. हसरत या एकाच शब्दाचे सगळे अर्थ कसे चपखलपणे बसतात. पण हे "दाग" कुठले ? काय आहे, अशी काही भानगड झाली की शिंतोडे उडतात ते स्त्रीवरच. "हीच चवचाल" असे दोषारोप सुरू होतात. आणि प्रत्येकीला सीतेसारखी अग्नीपरिक्षा थोडीच देता येणार ? हेच ते दाग जे ती आपल्या निष्टावंत प्रेमाने स्वच्छ करू पहात आहे. परत या सर्वात बाहेर कुणाकडे मदत मागणेही शक्य नाही. जे काय सांगावयाचे स्वत:चे स्वतालाच. जे काही रडू फुटेल तेही आतल्या आतच दाबून ठेवावयाचे ! गझलचे दुसरे कडवे सर्वात सुरेख आहे. उबदार घरट्यातून पहिल्यांदी बाहेर पडणार्‍या पाखराच्या पिल्लाला बागेत वसंताचा बहार फुलून आला असेल असे वाटणे सहज आहे. पण बागेत सगळीकडे रक्तबंभाळ करणारी काटेरी झुडूपेच आहेत व जागोजागी जाळी पसरून वाट बघणारे पारधीच आहेत असे दिसल्यावर जसे वाटावे तसे हिच्या नशिबात लिहले आहे. बिचारीला अनिर्वार्य दु:खाला जन्मभर सोबती म्हणून स्विकारणे भाग पडले आहे. तिसर्‍या कडव्यात तिचा विषाद उघड होतो. आपला पराभव तिला समोर दिसत आहे. आपले हृदय हे एक फूल आहे पण आता ते पाकळ्या गळू लागलेल्या अवस्थेला पोचले आहे हेही ती जाणते. नवोन्मीलित फूल आजूबाजूच्या काट्यांची पर्वा न करता रसिकाचे मन आकर्षून घेते. पण सुकलेल्या फुलाच्या पाकळ्या शेवटी काट्यांवर पडणार. कोमल फुलाला उचलून हृदयाशी घ्यावयाचे की सुकून देऊन "काटेमोल" करावयाचे हे "त्या" रसिकाच्या मर्जीवर ठरणार ! "आप" याचा दुसरा अर्थ "आपण स्वत:" असा घेऊनही चालेल. फूल, फूल म्हणून इतके दिवस गौरवलेले, जोपासलेले आपले "दिल" यापुढे "काट्या"सारखे आपल्या आयुष्याला ओरखडत रहाणार आहे हे भविष्य जाणून ती स्वत:लाच बजावत आहे, "बाई ग, हे काटेरी जगणेच आपल्याला "आपलीच खुशी" म्हणून व्यतीत करावयाचे आहे. फूल सुकले, आता ते विसरून गेले पाहिजे." तिने ठरवले चला, आता गप्प बसून राहणेच श्रेयस्कर. निदान या दुनियेपासून तरी सुटका मिळेल. पण जग फार चलाख आहे. तुम इतना जो मुस्कुरा रहे हो, क्या गम है जिसको छिपा रहे हो ! असे विचारणारी ही दुनिया . ती काय तोंडाला कुलुप लावण्याने फसते की काय ? मात्र आव आणाणार तो काळजीचा. अजीजी करणे हा वाग्प्रचार मराठीत आला तो अशा प्रसंगांतूनच. पण एकदा का तिने जरासे तोंड उघडले की पराचा कावळा करावयाला हे तत्पर. राईचा पर्वत करणे हा दुनियेचा हातखंडा खेळ. ही गझल वाचल्यावर व विशेषत: लताचे गाणे ऐकल्यावर एकच पंक्ती आठवते ...पराधिन आहे जगती... गाणे इथे ऐका. http://atulsongaday.me/2009/01/30/yoon-hasraton-ke-daag/
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 4580
प्रतिक्रिया 23

प्रतिक्रिया

सुंदर लिखाण सर. मुळात राजेंद्र कृष्ण, साहीर, शैलेंद्र हे हिंदी चित्रपटातील सुवर्ण युगाचे प्रवर्तक. फार छान ओळख.

In reply to by मिसळलेला काव्यप्रेमी

+१

हे गाणे खुप वेळा ऐकले आहे. या चित्रपटातील सगळी गाणी सुंदर आहेत. लहानपणी शाळेत असताना वडिलांनी कॅसेट आणली होती,ते आठवले. यातील अजुन काही गाणी आठवली.. १. जाना था हम से दुर बहाने बना लिये. २. उनको ये शिकायत है के हम कुछ नही केहेते. ३. जमी से हमे आसमाँपर बिठाके गीरा तो न दोगे..(आवडते गाणे). जरुर ऐका. :)

In reply to by अक्षया

लता आणि मदनमोहन म्हणजे सुरांचा आणि भावनांचा मखमली गालिचा. लेख आवडला. याच सिनेमात 'जा जा रे जा, साजना, हे आणखी एक अप्रतिम गाणे आहे. त्यांत एकाच गाण्यात लतासाठी करुण चाल तर आशासाठी उडती चाल देऊन मदनमोहनने आपले कौशल्य दाखवले आहे.

"आज पहिले गीत पाहू. " हे वाचले नाही त्यामुळे मी त्या चित्रपटातलेच दुसरे माझे आवडते गाणे इथे पोस्ट केले..

आशा व रफि हि ओपी नय्यर ची कवच कुंडले तर लता विणा मदन मोहन हि कल्पनाच करवत नाहि.. मदन भैय्याच्या सा~या गाण्याचे सोने केले लता दिदिनी त्या पैकि हे एक गाणे....

मुळात राजेंद्र कृष्ण, साहीर, शैलेंद्र हे हिंदी चित्रपटातील सुवर्ण युगाचे प्रवर्तक.
सहमत. पण एक नाव राहिले, ते राजा मेहंदी अली खान यांचे. त्यांची लग जा गले से, है इसि मे प्यार की आबरू, नैनों मे बदरा छाये, लग जा गले के फिर ये हसी रात हो ना हो, आप की नजरों ने समझा, नैना बरसे रिमझिम रिमझिम, जिया ले गयो जी मोरा सावरिया (लता दीदी), एक हसीन शाम को दिल मेरा खो गया (मो. रफी), आप यूं ही अगर हमसे मिलते रहे (मो. रफी, आशा भोसले), झुमका गिरा रे (आशा भोसले) अशी कित्येक सुंदर गाणी ओठांवर येतात.. सगळेच अप्रतिम..

ओपींचा कडक पंखा असूनही मी सर्वोत्तम कॉम्बो म्हणून लता मदनमोहन चीच निवड करेन. काही गाणी घेऊन मात्र सलीलदा या निवडीला काही काळ स्टे आणतील पण तेवढेच ! काव्य, आवाज , चाल व वाद्यव्रंद सारेच ए वन आहे या गीतात !

मदनमोहन आणि लता एक भन्नाट combination गझलकाराला परिपूर्ण न्याय देणारी जोडी. "राहते थे कभी उनके दिल मे हम जान से भी प्यारोन कि तरह , बैठे है उन्हीके महफ़िल मे हम आज गुणाहागारोन कि तरह " या गझल चे गझलकार कोण? स्वरसाज लता आणि मदनमोहन यांचा आहे. फिल्म ममता.

आवडलं लेखन. रहते थे कभी जिनके दिलमें ही मजरूह सुलतानपुरी यांची गझल आहे. पण संगीत रोशन यांचं आहे ममता या चित्रपटाला.

लता आणि मदनमोहन म्हणजे हिंदी चित्रपटातील दु:खाचा उद्गार. एका सुरेख गाण्याचे तितकेच सुरेख रसग्रहण.

Chhaan lekh

या रसायनाला तोड नाही. अर्थातच राजेंद्र कृष्ण, राजा मेहंदी अली खा यांचासुद्धा वाटा आहेच.