Skip to main content

बोलतो जे अर्णव

लेखक रामबाण यांनी गुरुवार, 07/02/2013 09:23 या दिवशी प्रकाशित केले.
एके संध्याकाळी घरी पोचलो. कुठलं तरी चॅनल सुरु होतं, न्यूज चॅनलच असावं.. जाहिराती सुरु आणि अर्णव बारकाईनं बघत बसलेला, मी आत येऊन बसतो न बसतो तोच त्यानं प्रश्नांची सरबत्ती सुरु केली, ती काकू तशी का झोपलीय ओ? काय झालंय तिला? तिचं पोट दुखतंय का बाबा? मी उत्सुकतेनं टीव्हीकडे नजर टाकली तर त्यातली मॉडेल; बहुदा सनी लिओन, प्रेमानं आळोखे पिळोखे देत होती आणि ‘तुम्ही मला एक सरप्राईज द्या मी तुम्हाला एक देते’ वगैरे आवाहन करत होती… अर्णवचं लक्ष दुसरीकडे गेलं आणि ती काकू तसं का करत होती हे उत्तर द्यायचं संकट टळलं.. नशीब. arnav अर्णवलाही प्रश्न पडू लागले. मनाच्या वेळी झालेली चूक सुधारायची ठरवलं आणि जमेल तसे काही प्रश्न मोबाईलच्या नोटमधे सेव्ह केले. नवरात्र संपलं, दसरा उजाडला, मोरूचा बाप मोरूस म्हणाला, असल्या बोअर कथा टीव्हीमुळे कधीच रद्दीत जमा झाल्यात. त्यांची जागा बातम्या सागंणाऱ्या अँकर, धोनी, कोहली, क्रिकेट मॅचचे प्रेक्षक, जाहिरातीतली सनी लिओन, कृष्ण हनुमानाच्या डीव्हीडी, बेनटेन, शिंचन आणि दहापंधरा दिवस उपाशी राहणारे अण्णा यांनी घेतलीय. टीव्हीमुळे असेल कदाचित त्याच्या प्रश्नांची संख्या आणि त्यातली विविधताही वाढलीय. एक वेगळ्या प्रकारचं टेलिवर्तन… शाळेत जायची त्याला भारी हौस. कशाला गडबड करतोस बाळा? असा माझा विचार… मनात. त्याचे शाळेतले अनुभव तो अशा पद्धतीनं सांगतो की त्यावर कदाचित वेगळं पुस्तक लिहिलं जावू शकेल. त्याची आई त्याला अभ्यासाचं महत्व वगैरे सांगत असते. एकदा मी कुठलंतरी पुस्तक वाचत बसलो होतो, त्यानं मला विचारलं, बाबा, अभ्यास केल्यावर माणूस मोठा होतो? हो बाळा.. अच्छा, म आता तुम्ही मोठे होणार?? एकदा स्वारी सकाळी झोपेतून उठली. मग पहिलं काम त्याला सू करून आणायचं. नेलं त्याला बाथरूममध्ये… त्याला सू करायला सोईचं व्हावं म्हणून चड्डी खाली सरकवली. तर त्याचा प्रश्न.. बाबा, बाबा, बघा ना, नुन्नु कशी मोठी झालीय? का झालीय??????? हे असं काहीतरी पहिल्यांदाच होतंय याची भिती अस्वस्थता, त्याच्या आवाजात. होत असंतय रे, माझं एवढं सांगणंही त्याला रिलॅक्स करायला पुरेसं ठरलं. लहानपणी महालक्ष्मीला स्टार माझाचं ऑफिस असताना अर्णवला एकदा घेऊन गेलो. सगळ्यांशी बोलला, खेळला पण अर्णवच्या लक्षात राहिली ती आमची अँकर ज्ञानदा चव्हाण. तिनं काय जादू केली माहित नाही तो तिचा कट्टर चाहता बनला. तिच्या बातम्या हमखास बघणार. तिचा आवाज कुठूनही ओळखणार. तिच्याबद्दलच प्रश्न विचारणार, तिच्याशी बोलायचंय फोन करा म्हणून हट्ट करणार. इतकं की तो रडत असताना बायको स्टार माझा लावायची, ज्ञानदा असेल तर पोरगा एकदम शांत होणार. एकदा रात्री बराच उशीर झाला तरी तो झोपतच नव्हता. सगळं सांगून समजावून भिती दाखवून वगैरे झालं. काऊ झोपली, चिऊ झोपली सगळे झोपले बघ तुही झोप… अर्णवनं पटकन विचारलं, ज्ञानदा झोपली?… हो ती ही झोपली असं सांगितल्यावरच महाराज झोपले. हैदराबादचे दिवस आठवले. लंचनंतर बेसमेंट कॅंटीनच्या कट्ट्यावर सगळे थोडावेळ एकत्र जमलेलो, जवळच्या झाडावरुन चिमण्या चिव चिव करत उडाल्या, आणि ‘ती बघ चिवचिव’ असं म्हणायची तीव्र इच्छा झाली, म्हणालो की नाही ते आठवत नाही. असंख्य लहान मुलांप्रमाणे तिनं ब्बा ब्बा ब्बा ब्बा… द्दा द्दा द्दा द्दा… म्मा म्मा म्मा म्मा अशी सुरुवात केली त्या दिवसात तर आपण बाहेरही चुकून बोबडं बोलू की काय असं वाटायचं. हाईट म्हणजे बऱ्याचदा ऑफिसमधे अचानक सहकारी समोर आला की त्यांना ‘भ्भॉ’ करावं असंही वाटायचं. मनासोबत खेळायचो त्याचा परिणाम. हैदराबादमधे घालवलेल्या सात वर्षातले ते काही मस्त क्षण होते. मना बालसुलभ प्रश्न विचारु लागली तेव्हा फार मजा यायची. खरं तर तिचे प्रश्न लिहून ठेवायचे, त्याला ‘मनाचे बोल’ नाव द्यायचं असं त्यावेळी मी आणि अंजलीने ठरवलेलं, पण आयुष्यात ज्या अनेक गोष्टी करायच्या ठरवल्या पण केल्या नाहीत त्यात आणखी एका गोष्टीची भर पडली इतकंच. अर्णवसोबत खेळताना तोच आनंद पुन्हा अनुभवतोय. ‘तुम्ही माझ्यासोबत असं खेळतच नाही’ अशी तक्रार मृणाल सारखी करत असते हा भाग वेगळा. मी तिच्यासोबत असा दंगा केला असेल हे सांगूनही तिला काही केल्या पटत नाही. आणि माझ्याकडे टाईम मशीनही नाही. आता करीना कपूरही अर्णवला आवडू लागलीय बहुदा, पण ऑफिशियली त्याचा पहिला क्रश म्हणजे ज्ञानदाच… प्ले ग्रुपसाठी शाळेत जाऊ लागला तेव्हापासून मात्र ज्ञानदाचं वेड नकळत कमी होतंय असं आमच्या लक्षात आलं. माझा शिक्षण पद्धतीवरचा राग अनाठायी नाहीय. आपण बॉय का आहोत? त्या गर्ल का आहेत? तुम्हाला दाढी का आहे? अंगावर केस का असतात? रावणाने सीतेला का पळवून नेलं, तो वाईट का होता? कोटी म्हणजे काय? पेप्सी कशापासून तयार करतात? टायगरला बोलता का येत नाही? भिकाऱ्याला जेवायला का मिळत नाही? आंदोलन कसं असतं ? असे एक न अनेक प्रश्न. कितीतरी निरुत्तर करणारे, कितीतरी विचार करायला लावणारे… आत्ता गणपतीला गावी गेलेलो. लाड पुरवणारे आजी-आबा, येता जाता आवर्जून बोलणारे लोक, आणि स्क्वेअर फुटाच्या गणितात न अडकलेलं ऐसपैस घर. मना आणि अर्णव दोघेही प्रचंड रिलॅक्स असतात तिथे. आतल्या छोट्या खोलीतल्या जुन्या लाकडी कपाटावर एक तुटका कंगवा पडलेला, तो अर्णवच्या हाती आला, त्यानं विचारलं, अरे या कंगव्याचे दात का पडलेयत? हां नीट ब्रश करत नाय म्हणून याचे दात पडले ना… सुट्ट्या संपल्या, लवकर संपतात त्या. मी इथेच राहतो आज्जीआबांसोबत असं नेहेमी म्हणणाऱ्या अर्णवची परत यायची इच्छा नसतेच, तशी तर माझीही नसते, तरीही आम्ही मुंबईच्या बसमधे चढतो. सोबतचं माणूस यायला थोडासा उशीर झाला तरी लहानमुलं फार अस्वस्थ होतात. अंजली आणि मना खाली बोलत उभ्या होत्या, गाडी सुरु झाली आणि अर्णवनं गडबडीत सीट एका हातात आणि हँडल एका हातात घट्ट पकडून ठेवलं आणि मलाही म्हणाला बाबा बाबा पटकन असं पकडून ठेवा म्हणजे त्या दोघी येईपर्यंत गाडी पुढे जाणार नाही. आधीच्या प्रवासात तो असाच अस्वस्थ झाला होता तेव्हा, घाबरु नको रे त्या येईपर्यंत मी गाडी पकडून ठेवतो असं सहज त्याला बोललो ते त्यानं असं लक्षात ठेवलं. सकाळी सकाळी मुंबईत पोचलो. सोसायटीत पाऊल टाकत असतानाच, आळसावलेल्या स्वरात अर्णवनं विचारलं, बाबा आपण मुंबईला का आलो? या प्रश्नाचं उत्तर मीच शोधतोय. गेले अनेक दिवस. त्याला काय सांगणार? मी शांत असतो… वरुन.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 8337
प्रतिक्रिया 58

प्रतिक्रिया

तुमचंच बालपण परत आलंय असं वागा त्याच्याशी

In reply to by संजय क्षीरसागर

तसा प्रयत्न करत असतोच, पण दरखेपेला जमतंच असं नाही :-) वागणं एकवेळ जमेलही, काही मस्त प्रश्न भंबेरी उडवून देतात.

त्या दिवसात तर आपण बाहेरही चुकून बोबडं बोलू की काय असं वाटायचं
अगदी अगदी.... माझ्या भाच्याच्या जन्मानंतर आमच्या सर्व कुटूंबाची भाषा गेल्या ४ वर्षात जाणवण्या इतपत बदलली आहे... अर्णव मोठा गोड दिसतोय..:)

In reply to by आनन्दिता

हो लेकरं सगळ्यांना त्यांची भाषा शिकायला भाग पाडतात.. :-) पहिल्यांदा मला असं वाटायचं की अनुभव नवा आहे सो लेकीसोबत म्हणजे मनासोबत खेळताना आपण जास्त इन्वॉल्व होतोयत, पण आता काही वर्षांनतर अर्णवसोबतही तीच मजा. उलट मनासोबत खेळताना आलेला अनुभव जास्त कामाला येतोय असं वाटतं.

वाचनखुणेत टाकल्य लेखाला.

मला वाटले होते की हा लेख टाईम्स नाऊ वरच्या अर्णब गोस्वामीवर आहे की काय :)

In reply to by पुण्याचे वटवाघूळ

हाहाहा!एवढं लिहून येतंय त्याच्यावर. पामर काय लिहिणार :-) लिहिलाच तर आता वेगळं शीर्षक शोधावं लागणार.

In reply to by पुण्याचे वटवाघूळ

हाहाहा!एवढं लिहून येतंय त्याच्यावर. पामर काय लिहिणार :-) लिहिलाच तर आता वेगळं शीर्षक शोधावं लागणार.

निरागस प्रश्न. शेवट वाचून हे गाणे आठवले- "तुमसे नाराज नहीं जिंदगी हैरान हू मैं, तेरे मासूम सवालोंसे परेशान हूं मैं" (- पूर्वीच्या ईटीव्हीतल्या प्रकाश फडणीसांचा एक मित्र)

In reply to by विसुनाना

हो विसुनाना, निरागसपणे ते काय विचारतील नेम नाही. मजा येते पण. अरे वा, हैदरबाद सोडताना फडणीस काकांची भेट झाली होती, 6 वर्षांपूर्वी.

सुरेख लेख आहे. खुप दिवसांनी एवढं हलकंफुलकं आणि निरागस लिखाण वाचायला मिळालं, छान वाटलं. असेच अजुन लेख येऊद्यात. - छोटा डॉन

In reply to by छोटा डॉन

धन्यवाद छोटा डॉन. खरं तर हा दोनेक महिन्यांपूर्वी माझ्या ब्लॉगसाठी लिहिला होता. मिपात नेमकं कसं सहभागी व्हायचं कल्पना नव्हती. आज प्रयत्न करुन पाहिला.:-) नवीन चांगलं काहीतरी सुचेपर्यंत तिकडचे आणखी 2-4 लेख शेअर करेन. संयमाची परीक्षा... :-)

In reply to by रामबाण

मिपात नेमकं कसं सहभागी व्हायचं कल्पना नव्हती. आज प्रयत्न करुन पाहिला. नवीन चांगलं काहीतरी सुचेपर्यंत तिकडचे आणखी 2-4 लेख शेअर करेन.
बिलकुल, काहीच हरकत नाही. तुमच्या ब्लॉगवरचे काही निवडक लेख इथे जरुर टाका, इथली जनता त्यालाही प्रतिसाद देईल, मात्र कुठलेही लेख टाकताना २ लेखांमध्ये किमान काही दिवसांचे अंतर राहिल ह्याची काळजी तुम्ही स्वतःच घेतली तर पब्लिकही योग्य तो प्रतिसाद देईल. त्याचे काय आहे की मिपावर जॉइन झाल्याझाल्या धपाधप लेखाचा रतिब टाकणार्‍याला इथले पब्लिक कसे घोळात घेते हे तुम्ही पाहिल असेलच, म्हणुन आपुलकीचा सल्ला. असो, लिखाण आवडले आहे, अजुनही वाचायला आवडेल. - छोटा डॉन

तुमच्या या लेखामुळे एक महत्वाचा निर्णय घ्यायला मदत झाली.. धन्यवाद!!!

In reply to by पिलीयन रायडर

ग्रेट, सगळ्यांनीच जमेल तसं लिहून ठेवलं तर एक वेगळा विश्वकोष की काय म्हणतात तो तयार होईल, किमान एखादी मस्त साईट तरी :-)

मुलगा गोड आहे अगदी ! लहानपणीच त्याला १७६० कोर्सेस,स्विमिंग,क्रिकेट,चित्रकला असे उद्योग त्याच्या मागे लाऊन त्याचं बालपण हरवू देऊ नका.
ती काकू तशी का झोपलीय ओ? काय झालंय तिला? तिचं पोट दुखतंय का बाबा?
बाकी असेच निरागस प्रश्न मी हि आमच्या आबासाहेबांना विचारले होते 'स्टे फ्री' ची जाहिरात बघताना. ;)

In reply to by मालोजीराव

इच्छा तर तशीच आहे. दोन्ही लेकरांना सध्याच्या शिक्षण पद्धतीपासूनही शक्य तितक्या दूरच ठेवायचं होतं/आहे. सध्यातरी बंड फसणार असं दिसतंय. पण कुणी सांगावे... :-)

In reply to by ५० फक्त

हाहा! मजाय मग. सगळ्यात अवघड प्रश्नपत्रिका असेल ही, अंदाज येणं कठीण, त्यामुळे तयारीचाही उपयोग नाही. :-) गेल्या 2-4 महिन्यात तर माझ्याकडेही साठा वाढलाय. शेअर करेन लवकरच.

अगदी ह्याच फेसमधून जातोय.. प्रश्नांची सरबत्ती आणि उत्तर मिळेपर्यंत पाठपुरावा दोन्ही चालू असतं.. शक्यतो उतर दिलं जाईल हे आम्ही दोघेही जाणीवपूर्वक बघतो.. ह्यातूनच त्याचं शिक्षण होतय आणि मुलास प्रश्न पडणे, ते त्याने बिनधास्त विचारणे हे चांगलच केव्हाही. अजून गोष्ट म्हणजे, मुलगा सही सही अनुकरण करतो.. एखादी गोष्ट करायला सांगितली तर ती बाबा करतोय का आणि नसेल तर का नाही असा प्रश्न तयार असतो. त्यामुळे आधी स्वतः केले मग सांगितले हा उपाय आम्हाला बरा वाटतोय सद्ध्या (तोसव्वा तीन वर्षाचा आहे).

In reply to by उपास

खरंय, पाठपुरावा करावा तो लहान लेकरांनीच आणि त्यांचं 'मिशन अनुकरण' कधी आपली गोची करेल सांगता येत नाही. :-)

रामबाण सुरेख लेखन !एकदम natural ...ओघवता .....लेख!!! ..खूप मुलगा गोड आहे तुमचा !मना चा पण टाका फटू फोटो .... आम्ही ही "उपवास, ५० फक्त " सारखेच. माजे पिल्लू आता लवकरच ३ वर्षे पूर्ण करेन २ एक महिन्यात. पण प्रश््नांची सरबत्ती आणि उत्तर दोन्ही चालू असतं. कधी कधी तोच उत्तर देतो हे जास्त च नाही का.... कधी कधी खूप दमून आलेले असतो आणि हे साहेब एकदम तयार असतात. असाच एक किस्सा. एकदा माझी मैत्रीण घरी आलेली ...तिला ८ वा म्हींना चालू होता. तिला बसताना उत्तन मी मदत करत होते तर आमचेस छोटे साहेब मानले "मावशी तुजे पोट दुखतेना. बघ केवडा मोठा बबल झाला आहे तुझ्या पोटात" आम्ही सगळे पोट धरून हसत होतो आणि तो ही !!!!

In reply to by नक्शत्त्रा

हाहाहा, बबल.. मस्त! त्यांच्या जन्माआधीचे फोटो बघून, मी का नाहीय या फोटोत किंवा तेंव्हा मी कुठे होतो असा एक प्रश्न ठरलेला. :-)

एक आठवण शेयर करावीशी वाटली.. माझ्या ३ वर्षाच्या भाच्याला कधीतरी एकदा गोष्ट सांगत असताना ड्रॅगन चा संदर्भ आला तेव्हा त्याला ड्रॅगन म्हणजे ज्याच्या नाकातोंडातून आग आणि धुर येतो असा प्राणी असं सांगितलं मी होतं.. या सगळ्याला ४-५ महीने लोटून गेले होते.. एका संध्याकाळी त्याला घेऊन दुकानात गेले असताना त्याने बाहेर उभं राहुन सिगारेट ओढणार्या एका त्याने माणसाला पाहीलं आणि "मावशी हा बघ ड्रॅगन " अशी आरोळी ठोकली.. अन डोळ्यात अनंत आश्चर्याचे भाव घेऊन टाळ्या ही पिटल्या.. पण तो ' ड्रॅगन' मात्र माझ्याकडे खाऊ की गिळू असा पाहु लागला..

छान आहे लेख... पोरं म्हणजे वाढत्या वयासोबत वावटळ बनतात.. अवघड स्थिती करुन ठेवतात अगदी. तुमचं लिखाण मनाला भिडलं.. जरा अवांतरः सनी लिऑनी टीव्हीवर कोणत्या प्रोग्राममधे झोपली होती? हे आपलं सहज म्हणून विचारतो आहे. लंबा जिओनी लंबा जिओनी सनी लिऑनी रे.. हे रेड एफएमचं वाह्यात गाणं या निमित्ताने आठवून गेलं... ;)

In reply to by गवि

धन्यवाद!
जरा अवांतरः सनी लिऑनी टीव्हीवर कोणत्या प्रोग्राममधे झोपली होती? हे आपलं सहज म्हणून विचारतो आहे
. बहुतेक मॅनफोर्स ची जाहिरात असावी. :-)

मस्त लिहिलं आहे. आवडलं. शेअर करायला सद्या तरी काही नाही पण इथल्या अनुभवांचा उपयोग होइल पुढे असे वाटते. ;)

धागा उघडाल्या उघडल्या बक्करून फोटू दिसला. मला वाटलं, घ्या, परत पोरानी वक्तृत्व स्पर्धेत उत्तेजनपर वगैरे बक्षीस मिळवल्यामुळे कौतुकपर धागा आहे काय. :) पण वाचून अपेक्षाभंग झाला. प्रामाणिक लिखाण. अजून येउ द्या.

दृष्ट काढा हो पोराची! मला म्हातारी म्हंटलात तरी चालेलम, पण असे फोटो दाखवु नयेत पोरांचे. नजर लागते. फार छान अनुभव लिहिले आहेत. खर सांगु का? आई म्हनुन इतकी जबाबदारी वाटते आम्हाला की आम्ही अस एंजॉय नाही करु शकत, पण अ‍ॅज अ बाबा तुम्ही लोकं ते एंजॉय करता म्हणुनच आईपेक्षा बाबाच अप्रुप जास्त असत लेकराला.

In reply to by स्पंदना

दृष्ट काढा हो पोराची!
त्यांची आजी जवळ असते तेव्हा दृष्ट काढणं ठरलेलं. :-) फोटोंचं म्हणाल तर फारसा विचार केला नव्हता कधी, फेबुवर बरेच चांगले फोटो शेअर करणं सुरु असतं अधूनमधून.. पण आता लक्षात ठेवेन नक्की.
अ‍ॅज अ बाबा तुम्ही लोकं ते एंजॉय करता
तसंच असावं. नाहीतर लेकरांचे असे गुण, प्रसंग आईचं जास्त जवळून पाहत असते, पण व्यापच एवढा की काय आणि किती लक्षात ठेवू असं होत असणार.

छान अनुभव. छान लिहीलेतही. लेखामुळे आमच्या अर्णवची ( माझा भाचा ) आठवण झाली, तो आता ५ वर्षांचा आहे, त्यामुळे त्याचे प्रश्न आता थोडे वेगळे असतात. ह्या लेखामुळे एका अतिशय जुन्या गाण्याची आठवण झाली " क्यू न रोटीयों का पेड हम लगाले, आम तोडे रोटी तोडे, रोटी आम खा ले" असं एक लहानगा त्याच्या आईला विचारतो....:)

In reply to by इन्दुसुता

धन्यवाद. किशोरचं गाणंय बहुतेक. रोटीयों का पेड असतं तर आईला चुलीसमोर स्वयंपाकाचा होणारा त्रास वाचला असतं असं काहीतरी आहे. मस्त. बरीच वर्ष झाली पाहून-ऐकून.

मस्त ....खुपच छान ओ. बाबाना सुद्द्दा इतका वेळ असतो.... खुपच छान वाट्ल नाहितर शहरानमद्धे वेळ कुणाला असतो हि ओरड......

वेळ नसायला काय झालं? दिवसभराचा सगळा शीण-ताण हलका करणारे ते क्षण. लेकरांसाठी आता वेळ नाही काढला तर आपण काय मिस केलं ते खूप उशीरा कळेल, तेव्हा कळून उपयोग नसेल कारण लेकरं मोठी झालेली असतील. सो :-)